‘अनुभव’ दिवाळी २०१८ : समकालीन वास्तवाचे भान राखणारे लेखन
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘अनुभव’ दिवाळी २०१८चं मुखपृष्ठ
  • Mon , 21 January 2019
  • पडघम सांस्कृतिक दिवाळी अंक २०१८ Diwali ank 2018 अनुभव Anubhav

‘अनुभव’ (म्हणजे ‘महाअनुभव’) चा या वर्षीचा दिवाळी अंक नेहमीप्रमाणे दर्जेदार आहे, यात शंका नाही. समकालीन वास्तवाचे भान राखणारे लेखन यात आहे. या अंकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे अंकाला संपादकीय नाही! वाचकांनी थेट मजकुराला भिडावे, असा हेतू त्यामागे असू शकतो.    

अंकाची निर्मिती

संपादक, सहसंपादक, मांडणी व सजावट यांच्या अथक प्रयत्नांमुळे अंकाची निर्मिती दर्जेदार झाली आहे. मजकुरानुसार चित्रे, नकाशे, रेखाटने आहेत. सतीश भावसार, गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्या चित्रांनी लेख व कथा उठावदार झाल्या आहेत. काही लेखातील चित्रे खुद्द लेखकांनीच घटनास्थळी काढलेली चित्रे असल्याने त्यांचा मजकूर अधिक बोलका झाला आहे.   

कोणत्याही दिवाळी अंकात असणाऱ्या लेख आणि कथा या दोन मुख्य आधारस्तंभासोबत अन्य सदरांनी अंक भरलेला आहे. लेख, रिपोर्ताज, कथा, ललित, माणसं, अनुभव असे लेखनभाग आहेत. ‘लेखाजोखा’ हा वर्गवारीत नसलेला पण वेगळा मजकूर आहे. अंकात बहुधा सारे जानेमाने जुने लेखक आहेतच, पण काही नवीन लेखक त्यांच्या तात्कालिक लेखनामुळे अंकाचे मानकरी बनू शकले आहेत. लेखक जुने असले तरी मजकूर अर्थातच नवा आहे. एक लेख पुनर्मुद्रित केलेला आहे.    

‘लेख’ या भागात संपादक सुहास पळशीकर यांचा ‘आपली संतप्त सार्वजनिक संस्कृती’, राजेश्वरी देशपांडे यांचा ‘परस्परांच्या प्रकाशात गांधी आणि मार्क्स’, नरेन्द्र चपळगावकर यांचा ‘कायद्याचं राज्य : अपेक्षा आणि अडचणी’ असा मजकूर आहे. ‘रिपोर्ताज’ भागात अनुराधा मोहनी व रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ या जोडलेखकांचा ‘कोलकात्याचीची जादुई जलभूमी’, दीप्ती राऊत यांचा ‘दंडकारण्यात रुजतंय लोकांचं राज्य’ असे दोन वृत्तअहवाल आहेत.   

‘कथा’ भाग सजला आहे तो रत्नाकर मतकरी यांच्या ‘...न बजेगी बासुरी’ आणि रंगनाथ पठारे यांच्या ‘सोयरिक’ या नवीन कथांनी. ‘ललित’मध्ये समकालीन प्रकाशनचे लेखक अनिल अवचट यांचे ‘मी गुणगुणसेन’ हे ललित आणि गणेश कुलकर्णी यांचा ‘ये दुनिया तुफान मेल’ असे ललित आहे.

‘माणसं’ या वेगळ्या सदराची उंची वाढवली आहे ती नितीन दादरावाला यांच्या ‘विवियन मेयरच्या शोधात’, अंकाच्या सहसंपादक गौरी कानेटकर यांच्या ‘अंधारगर्भात...’ आणि ज्येष्ठ समीक्षक व कवी चंद्रकान्त पाटील यांच्या ‘श्याम मनोहर : जगण्यात मजा येत नाही’ या शब्दचित्रांनी.

‘अनुभव’ या भागात श्री. द. महाजन यांचा ‘एका फळाचा प्रसाद’, वृषाली जोगळेकर यांचा ‘अवेळीच जेव्हा दाटला अंधार’ आणि दीनानाथ मनोहर यांचा ‘ताडोबाचे सगेसोयरे’ असे सत्यअनुभव कथन सामोरे येते. कौस्तुभ आमटे यांनी ‘लेखाजोखा’ घेतला आहे तो आनंदवनाचा; ‘आनंदवन समाजभान अभियान’ या पुनर्जागरणाने.

लेख

आपली संतप्त सार्वजनिक संस्कृती

संपादक सुहास पळशीकर यांच्या ‘आपली संतप्त सार्वजनिक संस्कृती’ या लेखात नव्याने बदलत असलेल्या भारताचे चित्र रंगवले आहे आणि ते बदल भय, तणाव, संशय, हिंसा, प्रत्येक इतराचा द्वेष, बहुसंख्याकांचा दबाव इत्यादी स्वरूपाचे आहेत. नवा भारत ‘लाल संतप्त’ देश आहे. ‘शांतीदूत संत परंपरा ते अशांतीप्रसारक संतप्त नवता’ यांचा संघर्ष कसा घडतो आहे, याची निवडक माहिती या लेखात आहे. भारतीय समाजमानसाचा सार्वजनिक स्वभाव हिंसेकडे कसा प्रवास करतो आहे, याचे विश्लेषण; राष्ट्रप्रेम, राष्ट्रवादाच्या हिंदुत्ववादी पक्षपाती बदलत्या व्याख्या, सांस्कृतिक ते राजकीय बहुसंख्यावादाचा भयावह दबाव, ‘विविधतेतून एकते’च्या जागी जबरदस्तीने घुसलेली ‘एकता विरुद्ध विविधता’, त्यामागे कारणीभूत असणारी अर्धीकच्ची लोकशाही या मुद्द्यांच्या आधारे भारतीय संस्कृती कशी स्वतःवरच संतापून भस्मासूर बनून आत्मघाताकडे वाटचाल करते आहे याचे यथार्थ वर्णन हा लेख करतो. 

परस्परांच्या प्रकाशात गांधी आणि मार्क्स

राजेश्वरी देशपांडे यांचा ‘परस्परांच्या प्रकाशात गांधी आणि मार्क्स’ हा लेख मार्क्सची जन्मद्विशताब्दी आणि गांधींची दीडशेवी जयंती यांचे निमित्त साधून आला. या दोन्ही जागतिक विचारवंतांच्या विचारांतील अंतस्थ सूत्रांचे एकमेकांच्या संदर्भात वाचन केल्यास प्रत्येकाचे स्वतंत्र आणि परस्पर वैचारिक नात्याचे कोणते मर्मस्पर्शी दर्शन घडेल यांचे विवेचन या लेखात केले आहे. १) मार्क्स आणि गांधी यांचा कार्यकाल आणि कार्यक्षेत्र भिन्न भिन्न असले तरी त्यांना तात्त्विक पातळीवर एकाच व्यासपीठावर आणणारा दुवा म्हणजे दोघांनीही शोषक भांडवलशाही व्यवस्थेच्या विश्लेषणासाठी व त्यावरील उपायांसाठी मांडलेले प्रवाही पद्धतीशास्त्र, २) बदल घडवण्यासाठी ‘नीती हेच राजकारण’ चे समीकरण आणि ३) या दोघांना भारतीय कर्मभूमीत एकत्र आणण्याचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळाच्या पहिल्या पिढीने केलेले प्रयत्न तसेच ४) या दोघांचे प्रवाही गतिशास्त्र किंवा पद्धतीशास्त्र आत्मसात करीत त्यांच्या विचारविश्वाला एकाच नाळेत गुंफण्याचा आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर यांनी केलेला ‘सत्याग्रही समाजवादी’ प्रयत्न, यांची चर्चा लेखिकेने केली आहे.         

कायद्याचं राज्य : अपेक्षा आणि अडचणी

न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांच्या ‘कायद्याचं राज्य : अपेक्षा आणि अडचणी’ या लेखात भारतातील ‘कायद्याचं राज्य’ या न्यायसंबद्ध राजकीय संकल्पनेची तार्किक चर्चा आहे. भारताच्या राज्यघटनेत या संकल्पनेची व्याख्याच केलेली नाही, ती फक्त अतिशय उथळपणे केवळ गृहीत धरली गेली आहे, या धक्कादायक माहितीने लेखाची सुरुवात होते. ‘वर्तमानकालीन  राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या संतप्त बनलेला एकांगी देश’ म्हणजे भारत हा कायद्याचे राज्य नाही आणि ते नसण्याची बीजे फार आधीच पेरली गेली आहेत, या सत्याचा पुरावा आहे, हेच सत्य उजेडात येते. भारताचा मध्ययुगीन भूतकाळ, बहुधर्मीय व बहुजातीयता आणि बहुमत म्हणजेच लोकशाही (म्हणजेच अल्पमतवाल्यांवर हिंसात्मक दहशत आणि शोषण ) अशा तीन अडचणी असल्याचे न्यायमूर्तींचे निरीक्षण अचूक आहे. हा लेख एका अर्थाने सुहास कुलकर्णींच्या लेखाचा उत्तरार्ध आहे आणि राजेश्वर्री देशपांडे यांचा लेख या दोन लेखांना दिलेले उत्तर आहे, असे म्हणता येते. 

रिपोर्ताज

कोलकत्त्याची जादुई जलभूमी

अनुराधा मोहनी आणि रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ या जोडलेखकांच्या ‘कोलकात्याची जादुई जलभूमी’ या वृत्तअहवाल रवींद्रनाथांच्या, मदर तेरेसांच्या कोलकात्यातील एका प्राचीन वैज्ञानिक शोधाची जन्मकथा सांगतो. खेडी, शहरे आणि महानगरे यांच्या मलनि:सारण समस्येचा भयानक राक्षस साऱ्या जगात घाणवास मारतो आहे. पण एकही पैसा खर्च न करता सांडपाण्याचं शुद्धीकरण कारणारी नैसर्गिक रचना कोलकात्यात आहे आणि तिचे यथार्थ उपयोजन गेल्या किमान शंभर वर्षांपासून तेथे चालू आहे. ही जैविक शुद्धीकरण यंत्रणा चक्क चकटफू आहेच, पण उलट स्थानिक मच्छीमार मंडळीना भरघोस उत्पन्न देणारी आहे, अशी आश्चर्यजनक माहिती लेखक जोडगोळी देते. सोपान जोशी या विज्ञान व पर्यावरण लेखकाच्या व्याख्यानातून प्रेरणा घेवून थेट कोलकाता गाठून त्यांनी हा ज्ञानस्त्रोत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. या यंत्रणेची तांत्रिक माहिती आणि कोलकात्याच्या बानताला या भागातील अशा प्रकारे राबवल्या जाणाऱ्या जलभूमीत नैसर्गिकरीत्या कार्यान्वित असलेल्या या जादुई घटनेची माहिती दिली आहेच, पण त्याच वेळी त्या जादुई जलभूमीचे तारणहार डॉ. ध्रुवज्योती घोष यांच्या अतुलनीय संघर्षमय कार्याची, तेथील मुदियाली परिसरातील भेरी व्यवस्थापनाची संक्षिप्त ओळख हा लेख करून देतो.                   

दंडकारण्यात रुजतंय लोकांचं राज्य

दीप्ती राऊत यांचा ‘दंडकारण्यात रुजतंय लोकांचं राज्य’ हा वृत्तअहवाल शिकलेला प्रामाणिक, सचोटीचा देशभक्त माणूस लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काय काय करू शकतो, याची सत्यकथा सांगतो. ‘सत्याचे प्रयोग’ वास्तवात कसे येऊ शकतात, याचा सज्जड पुरावा या अहवालातून मिळतो. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त जंगलात लोकनियुक्त सरकारही जो विकास करू शकले नाही, त्या विकासाची गंगाच नव्हे तर थेट गंगोत्रीच निर्माण कशी होते, हे यात आहे. भामरागड तालुक्यात खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात आणण्याचा कायदेशीर प्रयत्न यशस्वी करून दाखवणाऱ्या अॅड लालसू सोमा बोगाटी यांची ही कहाणी आणि त्यांचे कार्य एकजीव आहे. अॅड बोगाटी हे  जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. अॅड बोगाटी, त्यांचे सहकारी रमेश पंगाटी, सपना रामटेके इत्यादी अनेक सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ‘पेसा’ (पंचायतस् एक्स्टेंशन टू शेड्यूल एरियाज – कायदा १९९६) आणि वनहक्क कायदा यांचाच आधार घेवून म्हणजे घटनेचा आधार घेवून, कोणतीही घटनाबाह्य बेकायदेशीर कामे न करता विकास कसा घडवता येतो, याची ही कहाणी आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचे शासकीय स्तरावरील प्रयत्नाची नोंद या लेखाने घेतली आहे तशी डॉ. प्रकाश आमटे यांच्या “शासकीय यंत्रणा काम करत नाही, हाच खरा प्रश्न आहे”, या वास्तव भाष्याचीही नोंद यात आहे.            

कथा

प्रसिद्ध कथाकार रत्नाकर मतकरी यांच्या ‘...न बजेगी बासुरी’ ही कथा एका सच्च्या, नेक पत्रकाराच्या आणि त्याच्या पत्नीच्या लढ्याची गोष्ट आहे. नवऱ्याचा घातपाती मृत्यू झाल्यानंतरही लढणाऱ्या त्याच्या पत्नीची शोकांतिका यात आहे. ही शोकांतिका केवळ त्या वीरमहिलेची नाही तर तिला नामशेष करणाऱ्या गुन्हेगारी विश्वाच्या विजयाची, निर्घृण व्यवस्थाशरणतेची कथा आहे, म्हणजे लोकशाहीच्या पराजयाची आहे. मराठी साहित्याला आपल्या वेगळ्याच धाटणीच्या घडीव भाषेची सवय लावणाऱ्या कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची ‘सोयरिक’ ही कथा त्यांच्या आगामी ‘सातपाटील’ या कादंबरीचे एक प्रकरण आहे. निजामशाही आणि आदिलशाहीच्या मलिक अंबरपूर्व काळातील पठाण स्त्री आणि मराठा सरदार पुरुष यांची प्रेमकहाणी हा तिचा विषय आहे. कथा नेहमी मुळातूनच वाचल्या पाहिजेत.        

ललित

समकालीन प्रकाशनचे आवडते अनिल अवचट यांचे ‘मी गुणगुणसेन’ हे ललित संगीताच्या अनोख्या तरल दुनियेत वाचकाला घेऊन जाते. अवचटांचे लेखन नेहमीच त्यांच्या अलिखित आत्मकथनाचा हिस्सा वाटावा, हा माणूस कसा घडत गेला असावा, याचे निवेदन असते. संगीत आयुष्यात कसे आले, जगणे कसे खरेच ‘नादावले’ याचे हे सुंदर वर्णन आहे. ओ पी नय्यर, राजकपूर, विलायत खाँसाहेब, आमीर खाँसाहेब, निखिल बॅनर्जी, किशोरीताई, कुमारजी अशा अनेक थोर दिग्गज गायक, वादक यांची किंचित भेट इथे होतेच, पण माणसाने ‘कानसेन’ असण्याबरोबरच गाणं गुणगुणत राह्यलं तर त्याच्यातून एक ‘गुणगुणसेन’ कसा उत्क्रांत होवू शकतो, याची जाणीव अवचटांच्या कथनातून होते, ते महत्वाचे आहे.         

गणेश कुलकर्णी यांचा ‘ये दुनिया तुफान मेल’चं पूर्ण नाव ‘ये दुनिया तुफान मेल’... रेल्वे, चित्रपट आणि बरंच काही’ असं युवापिढीला जोडून घेणारं आहे. हे ललित रेल्वेदर्शनचा महाअनुभव आहे. सिनेमांमध्ये माध्यम, वस्तू, कथेचा अनिवार्य किंवा गंमत म्हणून येणारी रेल्वे सामान्य प्रेक्षकांना माहित असते. प्रेक्षक प्रवासी असू शकतात, पण ते रेल्वेत कामाला नसतात.रेल्वेत इंजिन ड्रायव्हर म्हणून नोकरीच करणाऱ्या कुलकर्णींच्या नजरेत वास्तवातील रेल्वे कशी असते आणि पडद्यावरची रेल्वे कशी दाखवली जाते, याचा हा शब्दानुभव विलक्षण आहे. रेल्वे आणि रेल्वेचा फलाट साहित्य आणि संस्कृतीच्या निर्मितीत कसा सहभाग देतो, हेही मुळातून वाचले पाहिजे.  

माणसं

‘माणसं’ हा ‘अनुभव’ चा भाग वैशिष्ट्यपूर्ण मानता येईल. त्यात माणसांचा ‘शोध’ आहे.   

नितीन दादरावाला यांचा ‘विवियन मेयरच्या शोधात’ हा लेख विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’मधून पुनर्प्रकाशित केलेला आहे. एका साहित्यिक नियतकालिकात येऊनही ‘आपल्या’ वाचकांना तो मिळावा, या हेतूने पुन्हा काही पाने ‘अनुभव’ने खर्ची घालावीत, यातच या लेखाचे साहित्यिक मूल्य व संदर्भ स्पष्ट होते. विवियन डोरोथी मेयर ही साधारण कुटुंबात जन्मलेली आणि जन्मभर मुलांना सांभाळणारी दाई होती, केवळ छंद म्हणून ती तिच्या काळात महत्त्वाच्या व्यक्ती, घटना, प्रसंग यांचे प्रचंड फोटो काढत होती. तिची फोटोग्राफी आश्चर्यजनक आहे. ती काळाच्या उदरात गडप झालेली होती. तिचा जॉन मलूफ या पत्रकाराला अचानक शोध लागला; तिने ठेवलेल्या दीड लाख निगेटिव्ह्ज, असंख्य चित्रपट, टेप्स इत्यादी सामानाचा खजिना कसा गवसला आणि तिच्या रूपाने इतिहासाचे एक पान कसे लिहिले गेले, याची विस्मयकारक माहिती हा लेख देतो.           

अंधारगर्भात...

गौरी कानेटकर यांचा ‘अंधारगर्भात...’ हा माणसाने पृथ्वीच्या गर्भगाराचा घेतलेला ‘शोध’ आहे. विश्वाच्या अनंत पोकळीत जे असेल ते, पण भूमातेच्या पोटात आत आत खूप खोलवर अनेक गुहा आहेत, त्यातील मेक्सिकोच्या पर्वतराजीतील ‘चायवे’ या अतिप्रचंड गुहेच्या शोधाची कथा, म्हणजे त्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे. ज्याला आठवा खंड म्हटले जाते, तो हा शोध आहे. गुहा शोधकाला ‘Caver’ म्हणतात. ज्युल्स व्हर्नच्या ‘Journey to the Centre of The World’मधील कल्पित वास्तव, सत्य वास्तव वाटावे, असेच इथे आहे. गुहांच्या शोधामुळे ‘एकस्ट्रिमोफाइल्स’ नावाच्या organism चा शोध लागला आहे. ही चित्तथरारक सत्यकथा नव्या ज्ञानाची गोष्ट आहे.                    

श्याम मनोहर : जगण्यात मजा येत नाही

‘श्याम मनोहर’ या अवलिया लेखकाचे मित्र ज्येष्ठ समीक्षक व कवी चंद्रकान्त पाटील यांचा ‘श्याम मनोहर : जगण्यात मजा येत नाही’ हा शब्दचित्रलेख श्याम मनोहरांचे लेखक म्हणून हा माणूस कसा घडला, त्याचे व्यक्तित्व कसे उभारत गेले, याचा शोधलेख आहे. वस्तुतः एका पूर्ण पुस्तकाचा आशय अतिशय थोडक्या जागेत आणणे, हे अन्यायकारकच असते, यात शंका नाही. चंद्रकान्त पाटील हे श्याम मनोहरांचे जवळपास अर्धशतकाचे घनिष्ठ मित्र आहेत. त्यामुळे एका समीक्षक मित्राने आपला लेखकमित्र त्याच्या इतर ज्ञातअज्ञात वाचकमित्रमंडळीना समजावून देताना त्याचे जे चित्र चितारावे; तसेच लेखन पाटील यांनी केले आहे. ‘मित्र’ या नात्याने असलेले गुणधर्म, परस्परांचा परिचय, मग मैत्रीत रूपांतर होणे ही पार्श्वभूमी वाचकांसमोर मांडून चंद्रकान्त पाटील श्याम मनोहरांची जडणघडण स्पष्ट करतात. श्याम मनोहरांची विनोदबुद्धी, तर्कबुद्धी, स्मरणशक्ती, कुतूहल, शोधाची तीव्र ओढ या व्यक्तिगत घटकांबरोबरच त्यांची या लेखकाने कथा, कादंबरी, नाटके, स्फुटे अशा विविध घाटात-फॉर्म्सचा प्रयोग कसा केला, त्यामागे त्यांची फिक्शन आणि मेटा-फिक्शनची संकल्पना कशी काम करते, त्यांच्या साऱ्या लेखनामागे ‘ज्ञेय’, ‘ज्ञान’ आणि ‘ज्ञाता’ ही त्रिपुटी कशी काम करते; ज्ञान आणि नीति यांचे समीकरण कसे जुळते यांचा याचा अतिशय धावता आढावा यात आहे. श्याम मनोहरांचे लेखक व वाचक म्हणून असलेले वाचन, शिक्षण, त्याचं रोजच्या बोलण्यातील-संवादातील वेगळेपण, त्यांच्या लेखनाची प्रेरणा (आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरांचा, समस्यांचा शोध घेणे), त्यातून विकसित झालेली त्यांची चिंतनशीलता, लेखनाची पद्धती, आशयाची विलक्षणता सुचण्याचा वेग व स्वरूप, त्यांच्या उत्तम साहित्याबद्दलचे बिनतडजोडीचे निकष, मराठी वाचक,लेखक व समीक्षक ह्या मंडळींचे जागतिक साहित्य व समीक्षा यांचे वाचन-चिंतन केल्याचा दावा असूनही मराठी साहित्यात त्या वाचन-चिंतनाच्या प्रभावाचा, प्रतिबिंबाविषयीचा अभाव का आढळतो? याची श्याम मनोहर यांना येणारी चीड अशा त्यांच्या व्यक्तिवाच्या विविध पैलूंना स्पर्श या लेखात केला आहे. श्याम मनोहरांना सगळ्याबद्दल अपार कुतूहल असूनही, ती व्यक्त करण्याचे सामर्थ्य लाभूनही, वेगवेगळ्या रीतीच्या बौद्धिक चैनी व मजा करूनही “श्याम मनोहर या लेखकाला जगण्यात मजा येत नाही, सगळं भाकड वाटतंय”, असा उच्च ज्ञानात्मक निरीक्षणवजा निष्कर्ष चंद्रकान्त पाटील काढतात, हा त्यांच्यातील विचक्षण समीक्षकाची साक्ष आहे, असे म्हणता येते.      

अनुभव   

‘अनुभव’मधील तिन्ही लेखन ही सत्यानुभवाची गोष्ट आहे. श्री. द. महाजन हे पुणे विद्यापीठातील वनस्पती विभागातील निवृत्त प्रयोगशाळा मार्गदर्शक. त्यांनी त्यांचा सुमारे तीस वर्षांपूर्वीचा गैरसमजातून विषारी बिया खाल्याचा परिणाम काय व कसा झाला, याचा अनुभव कथन केला आहे. चुकीचे बरोबर फळ कसे मिळाले त्याची ‘एका फळाचा प्रसाद’ हि गोष्ट आहे. वृषाली जोगळेकर यांचा ‘अवेळीच जेव्हा दाटला अंधार’ ही सत्यकथा त्यांच्या पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्येल्याची आणि जगण्याशी संघर्ष कसा करावा लागला आणि कोणकोण सगेसोयरे बनले याची ही कथा आहे.   

सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार दीनानाथ मनोहर यांचा ‘ताडोबाचे सगेसोयरे’ हा माणसाच्या वेगळ्या पातळीवरील सग्यासोयऱ्यांची सत्यकथा आहे. त्यांच्या उमेदीच्या काळात दीनानाथ मनोहर चंद्रपूर जिल्ह्यातील बाबा आमटेंच्या ताडोबा जंगलाचा घनदाट गर्दभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमनाथ प्रकल्पात मुक्कामी होते. त्यावेळी त्यांना भेटलेल्या सोबतीच्या लघुकथा त्यांनी कथन केल्या आहेत. रूपा नावाची बिबटीन, अचानक भेटलेली वाघीण, अंड्यांच्या रूपाने भेटलेले आणि त्यातून प्रत्यक्षात अवतरलेले मोर, मुन्ना-बादशहा ही हरणांची जोडी आणि अखेरीस परशा हा कुष्ठरोगी आणि एक हुप्प्या यांच्यातला संघर्ष दिनानाथ मनोहरांनी चितारला आहे. त्यातील ‘द्वंद्व’ ही परशा आणि हुप्प्या यांच्या ‘आमनेसामने’ ची गोष्ट आहे. ह्यात परशा हा पूर्णमानव नर आणि हुप्प्या हा पूर्वमानव वानर यांची समकालिन बिंदूवर झालेली युद्धभेट अतिशय विस्मयकारक आहे. माणूस स्वतःच्या पूर्वरूपाकडे कसा पहातो आणि अप्रगत माणूस आपल्याच प्रगत रूपाकडे कसा पाहातो, यांचे वर्णन खासच म्हणावे!                                        

लेखाजोखा 

कौस्तुभ आमटे म्हणजे डॉ. विकास आमटे यांचा मुलगा आणि बाबा आमटे यांचा नातू. कौस्तुभ यांचा ‘लेखाजोखा’ नव्या ‘आनंदवन समाजभान अभियान’ आणि ‘आनंदवन भूजल शाश्वत सहयोग’ या उपक्रम ह्यांच्या सामाजिक पुनर्जागरणाचा आहे. ही दोन नवी सामाजिक विकासाची अंगे ‘सामूहिक कृती कार्यक्रमासाठी प्रगती सहयोग’ या संकल्पनेचाच अनिवार्य हिस्सा आहेत. २०१६ रोजी सुरू झालेल्या ‘आनंदवन समाजभान अभियान’ची प्रगती आणि पुढील प्रवास यांची माहिती देवून या प्रकल्पाचा रथ पुढे हाकण्यात जोर लावणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि संस्था यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख आमटे करतात. त्यात युनिक फीचर्स आणि त्यांचे ‘अनुभव’ हे नियतकालिक यांचाही कसा मोलाचा वाटा आहे, याची योग्य नोंद आहे. आणि हा रथ पुढे नेण्यात सहप्रवासी होण्याचे वाचकांना आवाहन आहे.     

संपादक : सुहास कुलकर्णी, मुद्रक व  प्रकाशक : आनंद अवधानी, नंदन देऊलकर

सहसंपादक : गौरी कानेटकर, सहायक संपादक : प्रीति छत्रे

संपादकीय सहाय्य : चिराग देशपांडे

मुखपृष्ठ  : अन्वर हुसेन , मांडणी : संदीप साळुंके

अक्षर जुळणी : मंगला घरडे, मुद्रितशोधन : अशोक देव

मूल्य :  १५० रुपये.  

.............................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......