‘माहेर’ : नवलेखक अन् नव्या विषयांचा कारवाँ
पडघम - सांस्कृतिक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘माहेर’ दिवाळी अंक २०१८चं मुखपृष्ठ
  • Tue , 08 January 2019
  • पडघम सांस्कृतिक दिवाळी अंक २०१८ Diwali ank 2018 माहेर Maher

‘‘माहेर’ आपलं, कुटुंबाचं’ अशी बिरुदावली असलेल्या ‘माहेर’चे हे ५६ वे वर्ष आहे. इंटरनेटच्या युगात प्रकाशन व्यवसाय आणि मासिके, नियतकालिके टिकून राहणे, हे आव्हानात्मक आहे, याची जाणीव संपादकीयात सुजाता देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

कोणतेही आव्हान पेलण्यास ‘माहेर’ नेहमीच कटिबद्ध असते, ही मानवी कुटुंबव्यवस्थेचे टिकून राहण्याचे सांस्कृतिक लक्षण आणि सामर्थ्य आहे. सासर हेही कोणाचे तरी ‘माहेर’ असतेच की! त्यामुळे ‘स्त्रीच्या जीवनात ‘माहेर’ चिरंतन अबाधित स्थान असते आणि पुरुष त्या व्यवस्थेचा महत्त्वाचा बिंदू असतो. (पुरुषाला माहेर नसते, हे खरे तर खूप मोठे सांस्कृतिक नुकसान मानले पाहिजे.) कुटुंबव्यवस्था ज्या ‘माहेर’वर अधिष्ठित आहे, तोच वसा घेऊन मेनका प्रकाशनचा हा ‘माहेर’चा दिवाळी अंक २०१८ ‘आपलं, कुटुंबाचं’ ही बिरुदावली सार्थ करतो.

‘माहेर’ने दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दिवाळी कथास्पर्धा आयोजित केली. त्या एकूण तेरा कथा आणि दहा लेख यांनी हा अंक समृद्ध बनला आहे. कथा आणि लेखक यांची गावे पाहता बरेचसे लेखक महाराष्ट्राबाहेरील असल्याचे लक्षात येते, याचाच अर्थ असा की अंकाची कीर्ती केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नसून ती बाहेर आणि विलायतेपलीकडे गेली आहे, असा होतो. कथास्पर्धेतील पहिली आलेली कथा शिरीन म्हाडेश्वर यांची यूएसएहून आली आहे. संपादकीयात सुजाता देशमुख त्याचीच कथा सांगतात.          

कथालेखक आणि कथा

संदीप सरवटे-इंदौर (ये रे माझ्या मागल्या), सुप्रिया अय्यर-नागपूर (शिट्टी), शिरीन म्हाडेश्वर-यूएसए (अथांग), स्नेहा अवसरीकर-पुणे (पिंपळ), नयना कुलकर्णी-पुणे (जन्मांतर), चिन्मय कानिटकर-पुणे (बाल्या) , यशवंत सुरोशे-मुरबाड (केक), श्रीनिवास फडके-ठाणे (ऑसम कस्तुरी), विजय खाडिलकर-मुंबई (गजरे), प्रवीण मुळ्ये-पुणे (द्वंद्व-एकांतवासावातलं), सुजाता सिद्ध-पुणे (एकाकी किमर्थम्?), राहुल शिंदे-पुणे (सलपत्र) आणि अनुवादित कथा पूजा तत्सत्-अहमदाबाद : (समांतर : अनुवाद – अंजली नरवणे-पुणे).

लेख आणि लेखक

कमलेश वालावलकर-सोलापूर (महाभारत : एक विकारयात्रा), शिवकन्या शशी-ओमान (तुम्हाला म्हणून सांगते जोशी..), मंदार बिच्चू-शारजा (आवाज की दुनिया के दोस्तो, बहनो और भाईयों, अमीन सयानी का नमश्कार ...), चिन्मय दामले-पुणे (अमृतानुभवाची दिठी), सुकृत करंदीकर-पुणे (पाणी ‘टाटां’च्या नव्हे, भीमेच्या हक्काचं), आसिफअली पठाण-पुणे (‘अपहरण’ एका चित्रपटाचं), अमृता देसर्डा-पुणे (सजीव शब्दांची गोष्ट), प्राची पाठक-नाशिक (संगीत ऐकताना, जगताना), निरंजन मेढेकर-पुणे (अटळ युद्ध), वंदना खरे-मुंबई (एक अकेली शहर में).

दिवाळी अंक कथास्पर्धेतील मानकरी

पहिली (विभागून) : अथांग - शिरीन म्हाडेश्वर आणि  पिंपळ - स्नेहा अवसरीकर, दुसरी : जन्मांतर- नयना कुलकर्णी, तिसरी : केक - यशवंत सुरोशे. 

स्टोरीटेल

यातील  संदीप सरवटे यांची ‘ये रे माझ्या मागल्या’, शिरीन म्हाडेश्वर यांची ‘अथांग’, ही    सुप्रिया अय्यर – शिट्टी ही कथा ‘स्टोरीटेल’ या अॅपवर ऐकता येतील, अशी नव्या माध्यमाशी व तंत्रज्ञानाशी घातलेली जोड ही उल्लेखनीय मानली पाहिजे.    

कथांचे अंतरंग

प्रत्येक कथा आणि लेख वस्तुतः मुळातून वाचणे आवश्यक आहे. कथांपैकी स्पर्धेतील विभागून पहिली आलेली शिरीन म्हाडेश्वर यांची ‘अथांग’ ही कथा ‘प्रेम जसं व्यक्त होतं त्यावर त्याची तीव्रता ठरावी का?’ या मुद्द्याभोवती गुंफली आहे. अमेरिकास्थित असूनही लेखिकेने आसाममध्ये राहणाऱ्या एका जोडप्यातील जोडीदार नाहीशा झालेल्या विरहिणीची संघर्षमय भावदशा व्यक्त केली आहे. स्नेहा अवसरीकर यांची विभागून पहिली आलेली अन्य कथा ‘पिंपळ’ ही बरीचशी अस्तित्ववादी म्हणता येईल अशी आहे. सुखवस्तू स्त्रीला किमान एकदा तरी आपल्या अस्तित्वासंबंधी प्रश्न उपस्थित करता आला पाहिजे, हे या कथेतून अधोरेखित होते.

कथांपैकी स्पर्धेतील दुसरी आलेली ‘जन्मांतर’ ही नयना कुलकर्णी यांची प्रेमीजीवांच्या दुरावण्याची हळवी अबोल प्रेमकहाणी सांगते. ‘केक’ ही तिसरी यशवंत सुरोशे लिखित कथा एका पुरुषी सत्तेखाली दाबल्या गेलेल्या आणि आपले अस्तित्व टिकवू पाहणाऱ्या आईची कथा आहे. हजारो रुपये पगार असूनही मुलाच्या वाढदिवसाला आणलेला साधा अख्खा केकही त्याला भरवता येत नाही, त्याऐवजी पोळीत केकचा तुकडा गुंडाळून देणारी आई इथे भेटते.  

लेखांचे अंतरंग                                      

वालावलकरांचा ‘महाभारत : एक विकारयात्रा’ हा लेख महाभारताविषयक नवा दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न आहे. वालावलकरांच्या आगामी पुस्तकाचा तो एक अंश आहे. खूप पूर्वी दाजीशास्त्री पणशीकरांनी ‘महाभारत – एक सूडाचा प्रवास’ लिहिले होते, त्याची आठवण हा लेख वाचताना येते. लेखांमध्ये दोन पत्रकथा आहेत. पहिली, शिवकन्या शशी यांचा “तुम्हाला म्हणून सांगते जोशी....” हे कथेचे शीर्षक असलेला लेख भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी (१८६५-१८८७) यांचे इतिहासप्रसिद्ध पती गोपाळराव जोशी यांच्या धाडस, जोखीम आणि असाधारण कर्तृत्वाची जाणीव करून देणारा आलेख आहे. बहुतेक ठिकाणी आनंदीबाईंची माहिती मिळते, पण गोपाळराव जोशींची माहिती मिळत नाही. लेखिका शिवकन्या यांनी मोठ्या श्रमाने ती मिळवून गोपाळरावांना उद्देशून आपल्या घरी फराळाला बोलावून त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्याशी साधलेला हा संवादलेख आहे. तो अतिशय हृद्य झाला आहे. (खरे तर आनंदीबाईंच्या एम.डी. पदवीचा ‘Obstetrics among the Aryan Hindus’ (‘हिंदू  आर्य  लोकांमधील  प्रसूतिशास्त्र’) हा प्रबंध भारत सरकारने मिळवून जतन करून ठेवला पाहिजे.

दुसरी पत्रकथा अंजली नरवणे यांनी अनुवादित केलेली ‘समांतर’ ही पूजा तत्सत यांची गुजराथी कथा. निवृत्त झालेली प्रौढ मुलगी वडलांना पत्र लिहिते आणि तिचा, कुटुंबाचा आणि विशेषतः वडलांविषयी असलेला भावबंध व्यक्त करते. अमीन सयानी हे नाव आजच्या पिढीला फारसे माहीत नाही, पण ज्यांचा जन्म १९५० नंतर आणि ८० च्या आधी झालेला आहे, त्यांना अमीन सयानी हे नाव नसून गंधर्वगीतांचा ‘खुल जा सिमसिमस्वर’ आहे, याची जाणीव असते. अशा सिमसिमस्वराची-अमीनजींची मुलाखत घडवून आणली आहे ती मंदार बिच्चू यांच्या “आवाज की दुनिया के दोस्तो, बहनो और भाईयों, अमीन सयानी का नमश्कार ...” या लेखाने. अमीनजी आपल्या आत्मकथेचा केवळ ट्रेलरच या मुलाखतीत दाखवतात.  

मराठी चित्रपटसृष्टीतील नवतरुण निर्माता-दिग्दर्शक चिन्मय दामले यांचा ‘अमृतानुभवाची दिठी’ हा सुमित्रा भावे यांच्या ‘आमोद सुनासि आले’ या चित्रपटाच्या निर्मितीशी जोडला गेलेला ज्ञानानुभव आहे. दि. बा. मोकाशी यांच्या कथेवरील हा चित्रपट वारकरी रामोजीने ‘अमृतानुभव’ आपल्या दुःखाशी कसा जोडला, याचा दामले यांना आलेला हा अनुभव आहे.

सुकृत करंदीकर यांच्या ‘पाणी ‘टाटां’च्या नव्हे, भीमेच्या हक्काचं’ हा लेख टाटांच्या पाणी मक्तेदारीचा उग्र प्रश्न हाताळतो. सेनापती बापट उपाख्य पांडुरंग महादेव बापट हे विस्मरणात गेलेलं नाव आधुनिक काळातील प्रफुल्ल कदम (सांगोले, सोलापूर) या विद्यमान नावाशी कोणते नाते सांगते, त्यांचा ‘टाटा’ या अवाढव्य नावाशी कोणता व कसा शोषणाचा संबंध आहे, याचा इतिहास हा आलेख स्पष्ट करतो. व्यवस्थेला सतत नवे प्रश्न विचारत राहणे का गरजेचे असते, याचा धांडोळा घेतो.  

आसिफअली पठाण यांचा ‘अपहरण’ एका चित्रपटाचं’ हा लेख चित्रपटसृष्टीतील एका जुन्या चोरीची कहाणी कथन करतो. भारतात मूळ बंगालीत १९४९ साली प्रदर्शित झालेल्या सत्येन बोस यांच्या ‘परिबोर्तन’ चित्रपटाचे हिंदीत ‘जागृति’ कसे झाले आणि त्याचेच पाकिस्तानात १९५७ साली ‘बेदरी’ कसे झाले, याची ही चोरकथा सिनेरसिकांना वेगळा विषय देते.

अमृता देसर्डा यांचा ‘सजीव शब्दांची गोष्ट’ हा लेख नव्या फेसबुक भिंतीवरची शब्दचित्रे संवादाच्या सहाय्याने कशी जिवंत होतात, याचे उदाहरण देतात. गद्य आणि पद्य यांची भावनिक मिसळणीतून हा लेख साकारतो.  

‘अटळ युद्ध’ हा निरंजन मेढेकर यांचा लेख जागतिक माध्यम कंपन्यांनी जगातील केवळ प्रौढच नव्हे तर सारी बालकेच कशी आपली शिकार बनवली आहेत याच्यावर प्रकाशझोत टाकतो. ‘वापरकर्त्याचा पिच्छा न सोडणारे तंत्रज्ञान’ (persuasive technology) भावी पिढीचे बालपणच गिळंकृत करते आहे आणि हे युद्ध सरकारचे नसून पालकांचे कसे आहे, याची सविस्तर सप्रमाण मांडणी करून घराघरात माजलेल्या युद्धाची जाणीव हा लेख देतो.

‘एक अकेला इस शहर में ....आशियाना ढूंढता है’ हे अमोल पालेकरवर चित्रित झालेलं आणि भूपिंदर सिंघने गायलेलं केवळ पुरुषाचं दुःख व्यक्त करणार गाणं बेफाम लोकप्रिय झालेलं होतं. आता या गाण्याचं लिंग बदलून ती व्यथा वेगळ्या परिप्रेक्ष्यातून मांडली आहे ती वंदना खरे यांनी त्यांच्या ‘एक अकेली शहर में’ या लेखातून. मुंबईसारख्या सेक्युलर महानगरातही एकटी राहणारी महिला आजही २०१८ सालीही कशी पुरुषी नजरेची वेगवेगळ्या अर्थाने बळी ठरते आहे, याचे भेदक विश्लेषण इथे येते. स्त्रीचे दुय्यमत्व बाहेरच्या आणि आतल्या पुरुषीसत्तेकडून सतत अधोरेखित होत राहते, या परिस्थितीत बदल का घडत नाही? स्त्रियांच्या व्यक्तिगत आयुष्याचा निर्णय तिने घेणे, तिला पूर्ण स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदर करणे आवश्यक आहे. एकल स्त्री हे आत्मनिर्भर स्त्री मानली पाहिजे, ती कुटुंबाला आणि समाजाला आव्हान मानता येणार नाही, हे यात अधोरेखित केले आहे. वंदना खरे यांना आजही २०१९ साली हा विषय सार्वजनिक पटलावर मांडावा लागतो, यातच सामाजिक प्रगतीची अधोगती सूचित होते.                        

काही नेहमीचे गुणवंत-कलावंत यांच्या सोबतीने बऱ्याच ताज्यातवान्या दमाच्या लेखक होवू पाहणाऱ्यांना ‘माहेर’ने अवकाश प्राप्त करून देवून मराठी साहित्यास समृद्ध केले आहे, हे लेखकवर्गाचे क्षितीज विस्तारण्याचे चांगले उदाहरण मानावे. यामुळे ‘माहेर’ वरचा विश्वास दृढ होतो, वाढतो... 

प्रकाशन : मेनका प्रकाशन, पुणे

दिवाळी अंक : २०१८, वर्ष ५६ वे, अंक ११ व १२  

संपादक, प्रकाशक व मुद्रक : आनंद लक्ष्मण आगाशे 

कार्यकारी संपादक : सुजाता देशमुख 

मांडणी-सजावट : राहुल फुगे, शांतिनाथ चौगुले

मुखपृष्ठ : गोपाळ नांदुरकर

आतील चित्रे : सचिन जोशी

अक्षर जुळणी : हनुमंत पवार

मुद्रितशोधन : उदय जोशी प्रकाश सपकाळे, समाधान पाटील.

मूल्य :  २०० रुपये.

.............................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

shriniwas.sh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................