‘माध्यमरंग’ हे पुस्तक माध्यमाकडे अधिक सजगतेनं पाहण्याची दृष्टी देईल!
ग्रंथनामा - आगामी
रविराज गंधे
  • ‘माध्यमरंग’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 14 December 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी माध्यमरंग Madhyamrang रविराज गंधे Raviraj Gandhe

पत्रकार रविराज गंधे यांचं ‘माध्यमरंग’ हे पुस्तक येत्या २५ डिसेंबरला ‘ग्रंथाली वाचक दिनी’ प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेलं मनोगत...

.............................................................................................................................................

जागतिकीकरण, समाजमाध्यमांचा जगदव्याळ वापर, चंगळवादी जीवनशैली अन् त्यातून निर्माण होणारी अगम्य-अतर्क्य असं हॅपनिंग लाईफ जगण्याची समाजाला लागलेली आस, भांडवलशाहीचा अतिरेक, हवामान बदल धर्मांधता-जातीयता वाढता हिंसाचार, अन् लैंगिकता, माणुसकी अन् मानवी मूल्यांचा ऱ्हास, प्रचंड राजकीय महत्त्वाकांक्षा अन् त्यापोटी होणारं सामाजिक शोषण, शेती आणि उद्योग-व्यवसायातील मंदी अशा असंख्य घटकांचा व्यामिश्र परिणाम समाजजीवनावर नित्यनेमानं होताना आपण पाहतो-अनुभवतो. हे सारे घटक सर्वसामान्यांचं जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित करतात. साहजिक प्रसारमाध्यमातदेखील याचे पडसाद तीव्यतेनं उमटतात. बऱ्याच वेळा हे असे पडसाद प्रसारमाध्यमात अतिरेकी व अतिरंजित स्वरूपात उमटतात. त्यामुळे समाजमनाची वैचारिक-मानसिक बैठक मोठ्या प्रमाणावर प्रभावित होते. काही वेळा ती संभ्रमित होते. दूषित होते.

अशा वेळी प्रसारमाध्यमाद्वारे माध्यमकर्मींनी एक सकारात्मक भूमिका घेऊन आशय-विषय (कंटेट) मांडणं महत्त्वाचं असतं. प्रसारमाध्यमं बहुतांशी तो मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. वाढत्या व्यापारीकरणांमुळे प्रसारमाध्यमांची दमछाक होते हेही तितकंच खरं आहे. असं असलं तरी माध्यमात काम करू इच्छिणाऱ्या, माध्यमांत नव्यानं काम करणाऱ्या अन् पत्रकारिता या विषयाचा अभ्यासक्रम करणाऱ्या तरुण-तरुणींना कार्यक्रमांचा, बातम्यांचा, लेखनाचा कंटेट काय व कसा असावा, तो लोकांसमोर कसा सादर करता येईल या विषयावर एक उद्बोधन-दिशादर्शन करण्याचा प्रयत्न मी ‘माध्यमरंग’ या पुस्तकाद्वारे केला आहे. प्रसारमाध्यमातील शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत या विषयातील अवांतर वाचनाचं हे पुस्तक आहे.

माध्यमात जाणीवपूर्वक आगळंवेगळं कामं करणाऱ्या माध्यमकर्मीच्या विचारांचा परिघ वाढवण्यासाठी पुस्तकातील माहिती उपयुक्त ठरेल. प्रसारमाध्यम या संज्ञेची व्याप्ती खूप मोठी अन् वैविध्यपूर्ण अशी आहे. आज अनेक शाखा- उपशाखांनी माध्यमं बहरत आहे. एका पुस्तकात माध्यमातील सर्व शाखांच्या तंत्र-कौशल्याविषयी सर्वांगाने अन् सर्वांशानं माहिती देणं उदबोधक करणं शक्य नाही. तो हेतूही नाही. त्यासाठी प्रसारमाध्यमातील अनेक विद्याशाखांचं रितसर शिक्षण घेणं आवश्यक आहे. अर्थात या क्षेत्रातील केवळ पदवी घेऊन माध्यम क्षेत्रात प्राविण्य मिळवता येत नाही. त्यासाठी माध्यमात सातत्यानं काम करून आपल्यातील गुणांचा अन् क्षमतेचा विकास करणं आवश्यक असतं. या क्षेत्रात अनुभव हाच सर्वांत मोठा गुरू ठरतो. कुठल्याही क्षेत्रात चांगलं काम करण्यासाठी माणसामध्ये शिक्षणासोबतच काही गुण उपजत असावे लागतात. नसल्यास ते प्रयत्नपूर्वक मिळवावे लागतात आणि त्यासाठी एकूणच त्या त्या विषयाची समज-उमज वाढणं आवश्यक ठरतं.

जगविख्यात कार उत्पादक हेन्री फोर्ड याचा एक किस्सा सांगितला जातो. अमेरिकेतील त्यांच्या मोटार उत्पादनाच्या कारखान्यातील एक मशीन अचानक बंद पडलं अन् कारचं उत्पादन थांबलं. कारखान्यातील तंत्रज्ञांनी हरप्रयत्न करूनदेखील ते यंत्र चालू होईना. चिंताग्रस्त झालेल्या फोर्ड यांनी कंपनीबाहेरील एका तंत्रज्ञाला पाचारण केलं. त्या तंत्रज्ञानं मशीनचं बारकाईनं निरीक्षण केलं व त्या यंत्रातील एक नट ढिला झाला होता. तो त्यानं स्क्रू ड्रायव्हरनं घट्ट बसवला आणि यंत्र पूर्ववत सुरू झालं. फोर्ड यांनी त्याची कौतुकानं पाठ थोपवून एक डॉलर दिला. त्या तंत्रज्ञानं फोर्ड यांच्याकडे १०० डॉलरची मागणी केली. तेव्हा फोर्ड म्हणाले, ‘अरे! एक साधा नट तू बसवलास अन् त्याचे १०० डॉलर मागतोस?’ त्यावर तंत्रज्ञ उत्तरला, ‘सर! नट बसवण्याचा एक डॉलर अन् कुठला नट ढिला झाला आहे हे ओळखण्याचे ९९ डॉलर! तुमचे कारागीर तो ओळखू शकले नाहीत.’ तंत्रज्ञान अन् कौशल्य यातील काय फरक असतो हे आपल्याला या किश्श्यावरून लक्षात येतं. दूरचित्रवाणीचा निर्माता, पत्रकार, लेखक आणि सूत्रसंचालक या नात्यानं गेल्या चार दशकांपासून मी मुद्रित-दृकश्राव्य या माध्यमात कार्यरत आहे.

मुंबई, नाशिक, पुणे येथील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या विषयाचं विविध अभ्यास शिकवणाऱ्या महाविद्यालयांत मी मानद व्याख्याता म्हणून गेल्या ८-१० वर्षांपासून कार्यरत आहे. प्रसारमाध्यमातील विविध कौशल्य आणि तंत्राविषयी मी विविध कार्यशाळाचं आयोजनही केलंय. ‘मंत्र माध्यमा’चा या शीर्षकाअंतर्गत माध्यम कौशल्याविषयी माहिती देणारे दै. ‘लोकसत्ता’च्या व्यवसाय मार्गदर्शन पुरवणीत माझे अनेक लेख प्रसिद्ध झाले. या अनुषंगानं माध्यम क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. ती अशी की, या सर्वांना माध्यमाविषयी खूप आकर्षण, माध्यमात काम करण्याची इच्छा व जिद्द आहे, ही मुलं हुशार अन् चौकस आहेत, आपण म्हणणं हिरीरीनं मांडतात, आपल्या क्षेत्राचं समर्थन करणारं एक स्वतःच असं तत्त्वज्ञानही त्यांच्याजवळ आहे. मेहनत करण्याची तयारी आहे. त्यांच्या कलागुणांचं व विचारांचं स्वागतच आहे. गरज आहे ती या तरुणांमध्ये माध्यमकर्मी म्हणून काम करताना एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्याची! माध्यमात काम करताना व्यापारीकरणाची बूज राखून समाजउपयोगी लोक कल्याणकारी दृष्टिकोन विकसित होण्याची, व्यवस्थेच्या चौकटीत राहून उत्तम कंटेट कसा देता येईल त्यासाठी आवश्यक कौशल्य माध्यमकर्मींना कसं आत्मसात करता येईल याचं दिशादर्शन करण्याचा प्रयत्न ‘माध्यमरंग’ या माझ्या प्रसारमाध्यमावरील पुस्तकातून केला आहे.

दुसरं असं की आज मोबाईल वापरणाऱ्यांची भारतातील संख्या आज ९० कोटींच्यावर जाऊन पोहचली आहे. त्यातील ४० टक्क्याहून अधिक लोक स्मार्टफोनचा वापर करतात. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, विविध पोर्टल्स, यु-ट्युब चॅनल्स आदींचा वापर मोठ्या प्रमाणावर आपले विचार-मत मांडण्यासाठी वापर करतात. जगामध्ये सर्वांत जास्त फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा वापर भारतीय लोक करतात असं निरीक्षण आहे. ही मंडळी आपल्या विचारांच्या समर्थानार्थ विविध प्रकारचा मजकूर, फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. कुठल्याही माध्यमसंस्थेत म्हणजेच वृत्तपत्र, रेडिओ अथवा टीव्ही चॅनलमध्ये काम न करता पत्रकारिता करणारी ही मंडळी माध्यमकर्मीच आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या हातातील या नवमाध्यमांचा वापर काळजीपूर्वक होणं गरजेचं आहे. या अनुषंगानं या माध्यमकर्मींचं उदबोधनही या पुस्तकाद्वारे व्हावं अशी इच्छा आहे. एखाद्या विषयावर जनमत तयार करण्यासाठी समाजमाध्यमावर कार्यरत असलेली ही मंडळी महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि त्यांच्या भूमिकेला ‘फॉलो’ करणारे किंवा ‘फॉरवर्ड’ करणारे असंख्य वाचक प्रेक्षक असतात. त्यांचंही या माध्यमासंदर्भात उदबोधन व्हावं असं वाटतं.

‘माध्यमरंग’ या प्रसारमाध्यमावरील पुस्तकात गेली तीन-चार दशकं विविध प्रकारच्या मुद्रित-दृकश्राव्य माध्यमात मी काम करत असताना मला आलेले अनुभव-निरीक्षण, कार्यक्रम संकल्पनेविषयी तसंच कार्यक्रमाच्या सादरीकरणाविषयीची माझे व्यक्तिगत मत-विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसंच या क्षेत्रातील मला वाटत असलेल्या माझ्या खारीच्या वाट्याच्या योगदानाचाही वाचकांना परिचय व्हावा हाही एक हेतू आहे.

प्रसारमाध्यमांच्या विविध शाखांचा जसा जसा विकास होऊ लागला, तशी माध्यमं देश-काल-स्थळांच्या सीमा ओलांडून सर्व माणसांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकत गेल्या. सामन्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. त्याचबरोबर लोकांकडून उधळलेल्या स्तुती सुमनांची आणि टीकेची धनी होऊ लागली. मनोरंजन करणाऱ्या मालिका पाहणारे प्रेक्षक रोज आवडीनं मालिका पाहू लागले आणि आपली पसंती नापसंती जाहीररित्या व्यक्त करू लागले. वृत्तवाहिनी त्यावरील कार्यक्रम आणि बातमीपत्र नित्यनेमानं पाहणारे प्रेक्षक वाहिन्यांच्या न्यूज कंटेट आणि सादरीकरणाविषयी वाद चर्चा करू लागले. प्रत्येक वाहिनी टीआरपीच्या स्पर्धेत राहण्यासाठी इष्ट-अनिष्ट गोष्टींचा कमी जास्त प्रमाणावर अंगीकार करू लागल्या. वाहिन्याचा वाढता व्यापारीकरण, राजकीय वापर, छुपे अजेंडे आदी अनेक बाबींबद्दल लोक उघडपणे बोलू लागले. माध्यमांच्या उपयुक्ततेविषयी, सामाजिक बांधीलकी आणि हेतूविषयी लोक शंका घेऊ लागले. प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या लोकांना ‘मीडियावाले’ असं संबोधलं जाऊ लागलं. बऱ्याच वेळा एखाद्या विशिष्ट वाहिनीवर एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचं समर्थन करणारी, असा आरोप होऊ लागला. त्या कंपनीच्या-मालकाच्या सत्ताधाऱ्यांच्या संबंधीविषयी, आर्थिक स्त्रोताविषयी शंका निर्माण होऊ लागल्या. अर्थातच सरसकट सर्व वृत्तवाहिन्या आणि मनोरंजन करणाऱ्या वाहिन्यांच्या संपादकांविषयी असं चित्र नाही. अनेक वृत्तपत्रं, वाहिन्या आणि समाजमाध्यमातील विविध माध्यमकर्मी अतिशय उत्तम कामगिरी करताना दिसतात.

प्रसारमाध्यम हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील एक गरज झाल्यानं आपणास ती गरज पुरविणाऱ्या व्यवस्थेविषयी मत-मतांतरं होणं साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमात काम करू इच्छिणाऱ्या माध्यमकर्मींमध्ये काम करण्याची पॅशन निर्माण व्हावी आणि माध्यमाकडे त्यांनी मिशन म्हणून पाहावे अशी अपेक्षा आहे.

कौन्सिल ब्रॉडकॉस्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC) गेल्या वर्षी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतातल्या टीव्ही सेट्स असलेल्या घरांची संख्या १९.६७ कोटींच्या घरात आहे, तर जवळपास ८३.५८ कोटी लोक टीव्ही पाहतात. ग्रामीण भागात टीव्ही सेट्सची संख्या १० कोटीच्या आसपास आहे, तर शहरी भागात उर्वरीत टीव्ही सेट्स आहेत. हे प्रमाण अनुक्रमे ग्रामीण भागात ५४ टक्के तर शहरी भागात ४६ टक्के एवढे आहे. भारतीय दूरचित्रवाणीचा व्यवसाय ६० हजार कोटींच्या घरात आहे. दरवर्षी यात १० टक्के वाढ होणं अपेक्षित आहे. आजमितीला ८५० खाजगी तर २०० सरकारी वाहिन्या कार्यरत आहेत. यापैकी ४०० वृत्तवाहिन्या आहेत. सध्या सिनेमा आणि टीव्ही उद्योगजगत एकमेकांना पूरक पद्धतीनं काम करत आहेत. सिने व्यवसायाला आपल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी टीव्हीची गरज लागते आणि टीआरपी मिळवण्यासाठी टीव्ही उद्योगाला सेलिब्रिटिजची नितांत गरज भासते. या दोन्ही माध्यमात कलाकार, तंत्रज्ञांना भरपूर काम उपलब्ध आहे. आज जरी दूरचित्रवाणी व्यवसायाचं चित्र आकर्षक दिसत असलं तरी भविष्यात ऑनलाईन करमणुकीच्या प्रचंड आक्रमणाला सिनेमा व टीव्ही दोघांना तोंड द्यावं लागणार आहे. झपाट्यानं लोकप्रिय होत असलेल्या वेबमालिका, यु-ट्यूबवरील फिल्म-व्हिडिओज्, यु-ट्यूब चॅनल्स तरुणांना आणि आबालवृद्धांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहेत. एका रात्रीत सामान्य माणसं आपल्या कलागुणाचं प्रदर्शन करून स्टार बनत आहेत. त्यांना लाखो हिट्स-लाइक्स मिळत आहेत. केवळ करमणूक नव्हे तर आरोग्य, गुंतवणूक, पाकक्रिया, समुपदेशन, शिक्षण, कौटुंबिक, व्यावसायिक खरेदी-विक्री अशा अनेकविध कारणांसाठी समाजमाध्यमांतील विविध अ‍ॅप्सचा पोर्टल्स, ग्राहकबांधणीसाठी वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. वास्तविक प्रिंट, इलेक्टॉनिक आणि न्यू मीडिया यांना स्वतःचं असं एक स्थान/वैशिष्ट्य आणि मर्यादादेखील आहेत.

भारतातील सुशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत सर्व थरातील लोक या माध्यमांचा आपापल्या आकलन-आवडीनुसार वापर करतात. आज इंटरनेट सेवेचा वापर करण्याची संख्या ४० टक्के आसपास आहे. आर्थिक व्यवहार डिजिटली करण्याकडे कल आहे. टीव्ही युगाची भारतात सुरुवात झाली, तेव्हा वृत्तपत्र कालबाह्य होतील अशी भीती व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात ती फोल ठरली. टीव्ही माध्यमाचा जसा प्रसार होऊ लागला, तसा राष्ट्रीय-प्रादेशिक वृत्तपत्रांचा व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊन वृत्तपत्र आणि त्यांच्या अनेकविध रंगीत पुरवण्याच्या संख्येत वाढ झाली. वृत्तपत्रांनी आपल्या आशय-विषयात अमूलाग्र बदल केला. नामवंत वृत्तपत्रांच्या विविध शहरातील स्थानिक आवृत्त्या प्रकाशित होऊ लागल्या. भारतातील शिक्षण-साक्षरतेचं वाढलेलं प्रमाण, अत्यंत माफक-स्वस्त दरात सुलभरितीनं उपलब्ध होणारं मुद्रित साहित्य-वृत्तपत्रं आणि भारतीयांचा उंचावलेला आर्थिक स्तर यांमुळे मुद्रित माध्यमांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आजमितीस ६५९ प्रकाशन केंद्र, ९१० नियतकालिकं, ७७४ दैनिकं, १२५ नियतकालिकं भारतातून प्रकाशित होतात. ती अधिकाधिक आकर्षक आणि वाचनीय झाली. टीव्हीच्या प्रसाराने त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. जगभरात हेच चित्र दिसतं.

रेडिओच्या बाबतीतही हाच अनुभव आल्याचं दिसतं. आज सरकारी आणि खाजगी मिळून जवळपास ७०० रेडिओ स्टेशन्स कार्यरत आहेत. एका सर्वेक्षणानुसार रेडिओवरील काही कार्यक्रमांची लिसनर-शिप श्रोतृसंख्याही टीव्ही कार्यक्रमांपेक्षा जास्त असल्याचं निदर्शनात आलं आहे. भारतातील सर्वाधिक लोकांपर्यंत पोहचता यावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी आकाशवाणीची निवड केली आहे. हे असं का घडलं? कारण त्या त्या माध्यमांनी काळाची पावलं ओळखून आपल्या कार्यक्रमाच्या दर्जात, आशय-विषय निवड, सादरीकरणात कालानुरूप लोकाभिमुख लोकांना रुचतील असे बदल केले. म्हणून ते स्पर्धेत टिकून राहिले. त्यामुळे आज जरी न्यू मीडियाची लाट आलेली असली तरी सर्व माध्यमं आपापल्या गुणविशेषासह स्पर्धेत टिकून राहतील अशी आशा आहे. कारण बाजारपेठेची मागणी म्हणून एकमेकांना पूरक व्यवसाय करण्याची निकड सर्व माध्यमांना आता लक्षात आली आहे. या तीव्र स्पर्धेमुळे आणि माहितीच्या महास्फोटात टिकून राहण्यासाठी माध्यमंही बाजार शरण होत चालली आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही. जसं पर्यावरण संवर्धन हे विकासाचा समतोल साधून करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमाचा दर्जा, प्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीही व्यवसाय सांभाळूनदेखील करता येते. त्यासाठी प्रतिभा, कल्पकता आणि सामाजिक बांधिलकी माध्यमकर्मींनी अंगी बाणवणं आवश्यक आहे.

‘माध्यमरंग’ या पुस्तकातील विविध प्रकरणांद्वारे प्रसारमाध्यमाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तकात मी दूरदर्शनवरील कार्यक्रम निर्मिती संदर्भात केलेल्या आगळ्यावेगळ्या कलात्मक प्रयोगांची दिलेली सविस्तर माहिती माध्यमकर्मींना प्रेरक ठरेल. तसंच माध्यमकर्मींची एक चांगली वैचारिक, मानसिक बैठक तयार व्हावी या दृष्टीने विविध लेख, मुलाखती, भाषणं नमुना आणि अभ्यास म्हणून देण्यात आलं आहे. माध्यमक्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला आपला मार्ग आपल्याला स्वतःच शोधावा लागतो. हे शोधकार्य करताना अन्य माध्यमकर्मींचा अनुभव आणि त्या क्षेत्रातील प्रवास जाणून घेणं नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.

‘माध्यमरंग’ या पुस्तकातील माध्यमाचं मला उमगलेलं भावलेलं इंद्रधनुषी रंग माध्यमकर्मींना भावतील अशी आशा आहे. तसंच सामान्य वाचकांना देखील त्याचं माध्यमविषयक कुतूहल जागं करतील, त्यांना माध्यमाकडे अधिक सजगतेनं पाहण्याची दृष्टी देतील अशी अपेक्षा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......