‘मृत्युंजय’ची सुवर्णमहोत्सवी डिलक्स आवृत्ती
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
संपादक अक्षरनामा
  • ‘मृत्युंजय’च्या डिलक्स आवृत्तीचे मुखपृष्ठ
  • Sat , 08 December 2018
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक Book of the Week मृत्युंजय Mrutyunjay शिवाजी सावंत Shivaji Sawant

मराठीतल्या लेखकांनी वयाच्या तिशीच्या आत लिहिलेल्या काही कादंबऱ्या ‘माइलस्टोन’ मानल्या जातात. शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’, भालचंद्र नेमाड्यांची ‘कोसला’, व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ या तिन्ही कादंबऱ्या या लेखकांनी वयाच्या तिशीत लिहिलेल्या आहेत. आणि तिन्हींची आजवरची लोकप्रियता निर्विवाद म्हणावी अशीच आहे. गेली पन्नासहून अधिक वर्षं या कादंबऱ्या मराठी वाचकांवर गारूड करून आहेत. ‘बनगरवाडी’ (१९५५)ला २००५ साली पन्नास वर्षं पूर्ण झाली. ‘कोसला’(१९६३)चा सुवर्णमहोत्सव २०१३ साली साजरा झाला. त्यानिमित्ताने ‘कोसला’ची सुवर्णमहोत्सवी आवृत्तीही प्रकाशित झाली. तर गतवर्षी ‘मृत्युंजय’ (१९६७)ला पन्नास झाली.

वरील या तिन्हींमध्ये विक्री, खप आणि प्रभाव याबाबत सावंतांची ‘मृत्युंजय’ अधिक सुदैवी ठरत आली आहे. ही कादंबरी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. २०१३ सालीही ती अशीच चर्चेत आली होती. २०१२मध्ये पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने व्यंकटेश माडगूळकरांच्या सर्व पुस्तकांचे हक्क विकत घेतले, तेव्हा मराठी प्रकाशन व्यवहारामध्ये बरीच खळबळ उडाली होती. काहींनी छन्न-प्रच्छन्न टीकाही केली होती. पण मेहतांनी माडगूळकरांची सर्व पुस्तके नव्या दिमाखात बाजारात आणली आणि लगोलग शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’ या कादंबऱ्यांचेही हक्क विकत घेण्याची तयारी दाखवली. त्याला सावंतांचे सध्याचे प्रकाशक कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने हरकत घेऊन मेहतांना कोर्टात खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा निकाल मेहतांच्या बाजूने लागला. त्यानंतर ‘छावा’, ‘युगंधर’ आणि ‘मृत्युंजय’ या सावंतांच्या तिन्ही लोकप्रिय कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केल्या. विशेष म्हणजे त्याची सुरुवात ‘मृत्युंजय’पासून करण्यात आली.

परंतु कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने त्याविरोधात जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा गेल्या साडेपाच वर्षांत न्यायालयीन लढा दिला. शेवटी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय लवाद न्यायाधीकरणाची (arbitration tribunal) नेमणूक केली. यामध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर. एम. बापट आणि डी. जी. कर्णिक, तसेच जिल्हा न्यायालयाचे एस. व्ही. नाईक यांचा समावेश होता. या तीन सदस्यीय लवाद न्यायाधीकरणाला १९९९ पासून ते २०१२ पर्यंतची सर्व कागदपत्रे दाखवून कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने आपली सत्य बाजू न्यायालयापुढे सिद्ध केली आणि त्यामध्ये यश मिळवले. त्यामुळे आता शिवाजी सावंतांच्या मृत्युपासून (२००२) त्यांच्या पुस्तकांशी संबंधीत स्वामित्व अधिकार पुढील ६० वर्षांकरीता कॉन्टिनेन्टल प्रकाशनाकडे राहतील.

गतवर्षी म्हणजे ‘मृत्युंजय’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत हा निकाल लागल्यानंतर आता या कादंबरीची नवी देखणी डिलक्स आवृत्ती कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केली आहे.

१९६७ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीने सावंतांना ‘मृत्युंजयकार’ अशी उपाधी मिळाली. आतापर्यंत या कादंबरीच्या जवळपास ३० आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. शिवाय तिचे हिंदी, कन्नड, इंग्रजी, गुजराती, मल्याळम् अशा नऊ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. अलीकडच्या सात-आठ वर्षांच्या काळात या कादंबरीच्या पायरेटेड प्रतीही पुण्या-मुंबईत राजरोस मिळू लागल्या. त्यांनाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पायरेटेड प्रतींची किती विक्री झाली, याची अधिकृत आकडेवारी मिळण्याची सोय नाही. पण या सर्वांचा विचार केला तर पन्नास लाख वाचकांनी ही कादंबरी आत्तापर्यंत वाचली आहे, असे अनुमान काढता येते.

१९९० साली कोलकात्यातील ‘रायटर्स वर्कशॉप’ या प्रख्यात प्रकाशन संस्थेचे संस्थापक-संचालक पी. लाल यांनी ‘मृत्युंजय’ची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली होती. जगातल्या या सर्वोच्च सन्मानाच्या दारावर दस्तक देणारी ही मराठीतली पहिलीच कादंबरी. या सर्वांचा इत्यर्थ असा आहे की, गेली ४५ वर्षं ‘मृत्युंजय’ वाचकांवर गारूड करून आहे.  

‘मृत्युंजय’च्या लोकप्रियतेचे रहस्य सांगताना सावंत नेहमी एक विधान करायचे, ते असे- ‘रामायण जीवन कसे असावे हे सांगते, तर महाभारत जीवन कसे आहे हे सांगते.’ मानवी जीवनातल्या कमालीच्या गुंतागुंतीच्या आणि अनाकलनीय वाटणाऱ्या वाटा-वळणांचे यथार्थदर्शन महाभारतातून होते. महाभारतातला कुठला ना कुठला प्रसंग कोणत्याही माणसाला स्वत:च्या आयुष्याशी जोडता येतोच येतो. त्यामुळे रामायण थोड्या नवथर, भाबड्या वा ध्येयवादी लोकांना आवडते, तर महाभारत हे जगण्याचा पुरेसा अनुभव घेतलेल्या कुणालाही आपलेसे वाटते. रामायणाला कुणी विराट म्हणत नाही, ते भाग्य महाभारताच्याच वाट्याला शतकानुशतके आलेले आहे, ते त्यामुळेच. ‘मृत्युंजय’ ही उघडपणेच महाभारतावर आधारित कादंबरी आहे. 

सर्जनशील साहित्य नवी नैतिकता सांगत नाही, तर ते समाजात रूढ वा मान्य असलेल्या नैतिकतेच्या गोष्टींची जोडाजोड, तोडमोड करून तयार होते. महाभारत नेमके तसे आहे. कटकारस्थाने, हेवेदावे, रागलोभ, सत्ताकांक्षा, मानापमान, प्रेम-द्वेष, अहंकार, स्खलनशीलता, अवहेलना, कुचंबणा, पराक्रम, त्याग, सचोटी, प्रामाणिकपणा, शालीनता अशी सगळी मानवी मूल्ये महाभारतात पाहायला मिळतात. 

शिवाय माणसांना सुखात्मिकेपेक्षा शोकात्मिका जास्त आवडतात, आपल्याशा वाटतात. हे जागतिक साहित्यातल्या अभिजात म्हणवल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांची नावे पाहिल्यावर सहज लक्षात येते. अशा कादंबऱ्यांच्या नायकाकडे श्रेष्ठ दर्जाची गुणवत्ता असावी लागते, पण त्याचे योग्य श्रेय त्याला उपभोगता येत नाही. त्याच्या वाट्याला सतत दुर्दैव यावे लागते. अशा नायकाचा शेवट अकाली वा दु:खदरीत्या व्हावा लागतो. त्यामागे कपट-कारस्थाने, धोका, दबाव असेल तर आणखीच उत्तम. महाभारतातला कर्ण नेमका तसा आहे. (भीष्म, अश्वत्थामा, अभिमन्यूही काही प्रमाणात तसेच आहेत.) कर्णाच्या वाटय़ाला जन्मापासूनच अवहेलना आली. कुंतीपुत्र असूनही चाकरी करावी लागली. श्रेष्ठ असूनही दुय्यमत्व पत्करावे लागले...आणि अंगी शौर्य असूनही केवळ शापामुळे मरण पत्करावे लागले. म्हणजे उच्च कोटीच्या शोकात्म नायकाची सारी लक्षणे कर्णाच्या चरित्रात सापडतात. त्यामुळे कर्णासारखे वीर पुरुष जेव्हा कादंबऱ्यांचे नायक होतात, त्यातही सावंतांसारखे जादुई शब्दकळेच्या लेखकाचे नायक होतात, तेव्हा ते आणखीनच धीरोदात्त, भव्य होतात. सर्जनशील साहित्यात नेहमीच प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट केल्या जातात.

‘मृत्युंजय’मध्ये कर्णाचेही तसेच होते. बरे, हा कर्ण होमरच्या ‘ओडिशी’तला नाही की, दान्तेच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’तला नाही. तर तो आपल्या संस्कृतीचा अपरिहार्य भाग असलेल्या, आपल्या पूर्वजांच्या कैक पिढ्यांना मुखोद्गत असलेल्या महाभारतातला आहे. हा ऋणानुबंधही ‘मृत्युंजय’ला दशांगुळे वर उचलतो.

अतिशय पल्लेदार, रसाळ आणि ओघवती भाषा हे शिवाजी सावंतांच्या लेखणीचे वैशिष्ट्य. भरजरी, दिपवून टाकणाऱ्या उपमा-अलंकारांची लयबद्ध पखरण हा प्रधान शैलीविशेष. त्यामुळे त्यांची भाषा सामान्य वाचकाला बेमालूमपणे संमोहित करते. ‘मृत्युंजय’मध्ये तर ते खूपच होते. खरे तर ही कादंबरी, त्यात सावंतांसारखा शब्दप्रभू तिचा निर्माता. त्यामुळे त्यात तथ्यांची मोडतोड जरा जास्तच आहे. पण प्रेम शास्त्रकाट्याच्या तराजूत तोलायची गोष्ट नसते. ‘मृत्युंजय’वरच्या वाचकांच्या प्रेमाचेही तसेच आहे. त्याला सत्याची, तथ्याची, साक्षेपाची चाड नाही. विवेकाची भीडमुर्वत नाही. तो आपला ‘मृत्युंजय’वर लुब्ध आहे. या लुब्धतेला विश्रब्धतेची जोड आणि साक्षेपाचा आधार कधी मिळेल, हे सांगता येत नाही.

महाभारतातील प्रत्येक पात्रांशी सावंतांचा ऋणानुबंध जडला होता, तसाच वाचकांचाही सावंतांच्या ‘मृत्युंजय’शीही जडला आहे, जडलेलाच राहील. कारण ‘जगण्याचे महाभारत’ सतत चालूच असते आणि रणांगणात उभ्या असलेल्या मर्त्य मानवांपुढे सत्य, न्याय, विवेक, बुद्धिवाद या गोष्टी कोवळ्याच ठरतात!

.............................................................................................................................................

‘मृत्युंजय’च्या डिलक्स आवृत्तीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/285/Mrutyunjay-Delux-edition

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Dr.mahendra panjarpol

Sat , 08 December 2018

"शिवाय माणसांना सुखात्मिकेपेक्षा शोकात्मिका जास्त आवडतात, आपल्याशा वाटतात. हे जागतिक साहित्यातल्या अभिजात म्हणवल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांची नावे पाहिल्यावर सहज लक्षात येते." हे वाक्य वाचले आणि धन्य जाहलो. संपादक महाशयांनी जागतिक साहित्यातील अभिजात कादंबऱ्यांची केवळ नावेच 'पाहिली' असावीत. अन्यथा, इतके वरवरचे आकलन मांडायचे धाडस त्यांच्यात आले नसते. "त्यामुळे त्यात तथ्यांची मोडतोड जरा जास्तच आहे." हे वाक्यही तसलेच उथळ म्हणावे लागेल. महाभारतातील तथ्ये जगात केवळ या महाशयांनाच उद्गत झाली असावीत. अन्यथा महाभारतासारख्या चाळीसहून अधिक विभिन्न प्रकारांची कथानके असलेल्या साहित्यकृतीविषयी आणि त्या महाकाव्यावर आधारीत एका कादंबरीविषयी असे उथळ निरीक्षण ते मांडते ना. असो. असे लोक मराठी वाचकां मार्गदर्शन करण्यासाठी वाचनीय पुस्तकांची यादीही करतात यातच मराठी विचारविश्वाची दिवाळखोरी सिद्ध होते, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......