मानव देहातील जीवाने आत्मरूप देवाची सोऽहंभावाने भक्ती करणे, हा स्वधर्माचरणाचा शुभंकर अर्थ आहे!
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 08 December 2018
  • पडघम सांस्कृतिक विजय बाणकर Vijay Bankar ब्राह्मण Brahmins क्षत्रिय Kshatriya वैश्य Vaishya शूद्र Shudras वर्णव्यवस्था Varnvyvastha

‘स्वधर्म आचरीत असताना आलेले मरणही श्रेयस्कर असते आणि परधर्माप्रमाणे वागणे हे भयावह असते, असे गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाच्या निमित्ताने विश्‍वातील सर्व मानवांना उपदेशिले आहे. तू क्षत्रिय आहेस म्हणून युद्ध करणे हे तुझे प्राप्त कर्तव्य आहे, असे सांगून श्रीकृष्ण अर्जुनास युद्ध करण्यास प्रवृत्त करीत होता. पण अर्जुनास त्याचे म्हणणे पटत नव्हते. शेवटी, तुझ्या व सर्वांच्या आत असलेला आत्मारूपी देवच खरा कर्ता करविता आहे, असे तो अर्जुनाच्या अनुभवास आणून देतो; मगच देहाभिमान, वर्णाभिमान, कर्माभिमान, कुलाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान वगैरे सर्व द्वैतबुद्धी निर्माण करणारे अभिमान सोडून देऊन म्हणजे पूर्णत: अभिमानरहित होऊन देवाला अनुस्मरत नि:शंकपणे अर्जुन युद्ध करता होतो. अर्थात, आत्मज्ञानपूर्वक वर्णोचित म्हणजे वेदशास्त्राने व गीता-ज्ञानेश्‍वरीत सांगितल्याप्रमाणे स्वधर्माचरण करणे हेच अंतिमत: श्रेयस्कर वा हितावह होय.

मनुष्यदेहात असणारे आपण सारे जीवात्मे परमेश्‍वराचे अंश आहोत. आपले ते खरे स्वरूप अनुभवणे हे आपले सर्वश्रेष्ठ कर्तव्य होय. आपला जीवात्मा अविनाशी असल्याचे अनुभवता येणे म्हणजे आत्मज्ञान होणे व असणे होय. अर्थात आत्मज्ञानप्राप्ती हाच खरा शुभ लाभ होय. तोच व्हावा या एकमेव हेतुने म्हणजे निष्काम बुद्धीने स्वधर्माचरण करावयाचे असते. आत्मज्ञानाशिवाय अन्य कोणत्याही म्हणजे शरीर, मन व बुद्धी यांना सुखद वाटणार्‍या गोष्टी नाशवंत असल्याने त्याच मिळवण्याचा प्रयत्न करणे हा परधर्म होय. कारण, अध्यात्मशास्त्रदृष्ट्या स्व म्हणजे आत्मा होय व शरीर, मन, बुद्धी वगैरे गोष्टी पर म्हणजे स्वेतर होत. या अर्थाने आत्मज्ञानाशिवाय अन्य कोणत्याही म्हणजे शरीर, मन व बुद्धी यांना सुखद वाटणार्‍या गोष्टी नाशवंत असल्याने त्याच मिळवण्याचा प्रयत्न करणे हा परधर्म होय. काठकोपनिषदात विशद केल्याप्रमाणे त्या सार्‍या गोष्टी ‘प्रेयस’ होत; तर, आत्मज्ञानजन्य मुक्ती हे ‘श्रेयस’ होय. आत्मज्ञानानेच मुक्ती मिळत असते. गीतेत म्हटल्याप्रमाणे जगात आत्मज्ञानासारखी पवित्र दुसरी गोष्ट नाही. म्हणूनच विश्‍वव्यापी आत्म्याचे अनुभवयुक्त ज्ञान प्राप्त होईल अशा रीतीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांच्या माणसांनी स्वधर्माचरण करावयाचे असते.

ध्यानावस्थेत शरीर मन, बुद्धी यांच्याही पलीकडे गेल्यावर अविनाश आत्मा हेच आपले खरे वा मूळ स्वरूप आहे, अशी खात्री होते. शरीर, मन, बुद्धी यांच्या पलीकडे जाणे म्हणजे देहातीत होणे होय. ‘हित आहे देहातीत। म्हणोनि निरुपिती संत।..’, अशा शब्दात देहातीत झाल्यावरच आत्मज्ञानरूपी हित साध्य होते हे सत्य श्रीरामदासांनी ‘दासबोधात’ व्यक्त केले आहे.

श्रीरामानंदांनी आपल्या ‘दीपरत्नाकर’नामक ग्रंथाच्या अध्याय क्र. ११ ते १३मध्ये वर्णोचित स्वधर्माचे जे हितावह स्वरूप स्पष्ट करून ठेवले आहे ते क्रमश: समजून घेऊयात.

(१) ब्राह्मणाच्या स्वधर्माचरणाचे स्वरूप

यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान व प्रतिग्रह ही ब्राह्मणाची सहा कर्मभूषणे आहेत. स्नान, संध्या, जप, होम, पूजन, आतिथ्य व वैश्‍वदेव ही त्याची नित्यकर्मे होत. ही तेरा कर्मे व एकादशी हे नैमित्तिक कर्म अशा ब्राह्मणाने करावयाच्या एकूण चौदा कर्मांचे श्रेयस्कर स्वरूप असे -

अ) ब्राह्मणाची सहा कर्मभूषणे -

१) यजन -

यजन म्हणजे यज्ञ करून देवांना संतुष्ट करणे. देव संतुष्ट झाले की पर्जन्यवर्षाव होतो. पर्जन्यामुळे धान्ये पिकतात. त्यामुळे अन्न मिळून माणसे सृष्टीत टिकून राहतात. अशा प्रकारे मनुष्यामुळे सृष्टीचे कर्म घडते व मनुष्यकृत यजनामुळे वेदांचा महिमाही वाढतो. देव तृप्त होऊन त्यांनी पर्जन्यवृष्टी करावी म्हणून ब्राह्मणांनी जो यज्ञ करावयाचा आहे त्याचे स्वरूप असे आहे -

विश्‍वात सर्वत्र एक आत्मतत्त्वच विलसत असते. म्हणून द्वैतभावना सोडून देऊन विधिपूर्वक म्हणजे आत्मज्ञानपूर्वक यज्ञ केल्याने सर्व देवांना सुख होते. ब्राह्मणाने ‘मी ब्रह्म आहे’ असे अनुभवून सर्व कर्मांना साक्षीभूत व्हावयाचे असते; तसेच सोऽहंभावाने श्रीसद्गुरुस्वरूप जाणून घ्यावयाचे व आत्मज्ञानरूपी अग्नी चेतवून त्याने कोऽहंभ्रांति नष्ट करायची असते. जे जे दृश्यमान आहे त्याची होमद्रव्य म्हणून आत्मज्ञानरूपी अग्नीत आहुती द्यावयाची असते. त्यामुळे अज्ञानरूपी धूर निघून जातो. ‘तो मी आहे आणि मी तो आहे’ असा रात्रंदिवस निदिध्यास घेऊन देहाभिमानरूपी पशूचा बळी द्यायचा आणि पुरोडाश म्हणून मन अर्पण करायचे. असा हा ज्ञानयज्ञ श्रीसद्गुरुदास्याशिवाय शक्य होत नाही आणि हा यज्ञ केल्याशिवाय देवाचे समाधान होत नाही.

द्वैतभावनेने केलेले यज्ञ वेदबाह्य व व्यर्थ होत -

सर्वव्यापक यज्ञपुरुषाची ओळख झालेली नसलेल्या, आत्मरूप आपण सर्व कर्मांचे साक्षी आहोत असा अनुभव नसलेल्या म्हणजे आत्मज्ञान नसलेल्या व म्हणून ‘मी देह आहे’ असा अहंकार म्हणजे द्वैतभावना असलेल्या मानवांकडून होत असलेले यज्ञ वेदबाह्य व व्यर्थ होत.

आत्मानुभव नसलेल्यांना यज्ञ करण्याचा अधिकार नाही -

ज्यांना आत्मानुभव नाही त्यांना यज्ञ करण्याचा अधिकार नाही आणि तरी देखील ते जे यज्ञ करतात तो पोरखेळ होय. अशा यज्ञाने देव कधीही तृप्त होत नाही. कारण आत्मानुभवावाचून केलेले ते कर्म अकर्मच असते, ते अप्रमाण असते. मृगजळाच्या पाण्याने जर धान्य निर्माण होत असते तरच असे वेदबाह्य यज्ञ करून नारायण तृप्त झाला असता. पण असे होत नाही. म्हणून आत्मज्ञानावाचून केलेला तो यज्ञ वाया जातो, अशी पुनरुक्ती श्रीरामानंदांनी केली आहे.

देहाभिमानरहित यज्ञाने ब्राह्मणास ब्राह्मणपण येते  - 

जीवदशा म्हणजे देहाभिमानयुक्त स्थिती होय. ‘मी देह’ किंवा ‘मी जीव’ असा ज्यांचा भाव असतो त्यांनी केलेला यज्ञ हा अप्रमाण होय तर शरीरभावना त्यजून आत्मज्ञानपूर्वक तूर्यावस्थेतील साक्षीभावाने, मी-तू-पणा समूळ सोडून देऊन, जो केला जातो तो उत्तम यज्ञ होय. असा यज्ञ हे ब्राह्मणाचे खरे कर्मभूषण असून त्यामुळेच ब्राह्मणाला ब्राह्मणपण प्राप्त होते.

२) याजन -

याजन म्हणजे दुसर्‍यांकडून यज्ञ करवून घेणे. आपण स्वत: साक्षीभावाने जसा यज्ञ करतो तसाच दुसर्‍याकडून करवून घेणे ही याजनाची आत्मानुभवातून समजून येणारी खूण श्रीसद्गुरुकृपेमुळे लाभते. आत्मप्रचीति, गुरुप्रचीति व शास्त्रप्रचीति घेऊनच यजन, याजन केले किंवा ज्ञानयज्ञ करावयास शिकले, शिकवले तरच नारायण संतुष्ट होतो व भरपूर पर्जन्यवृष्टी होते.

जो ब्राह्मण ज्ञानयज्ञ जाणतो त्यालाच वेदान्ती म्हणावे आणि जो आत्मज्ञानयज्ञ जाणत नाही तो वेदबाह्य जाणावा, अशा सुस्पष्ट शब्दात श्रीरामानंदांनी वेदशास्त्रसंमत यज्ञकर्त्याबाबतची कल्पना दिली आहे.

३) अध्ययन -

अध्ययन म्हणजे अभ्यास, शिकणे, समजून घेणे व आत्मानुभव घेणे होय. पुढील तीन व्याख्या वाचताना अध्ययनाचे स्वरूपसमजते : १. वेदशास्त्राची व्युत्पत्ति लक्षात घेऊन सर्व भूतमात्रांमध्ये आत्मा पाहणे, मनात येणार्‍या सर्व कल्पनांची शांती करणे म्हणजे अध्ययन होय. २. अष्ट प्रकृति म्हणजे आपल्या आठ देहांचे स्वरूप जाणणे व मायेचे तसेच अविद्येचे निरसन करून देहाभिमानाचा त्याग करणे म्हणजेच अध्ययन होय. ३. आत्मस्वरूप जाणून घेता यावे म्हणून उपनिषदादी अद्वैतपर ग्रंथ पहात सोऽहंहंसाचा (तो परमात्मा मी जीवात्मा आहे, हा) विचार करणे म्हणजेच अध्ययन होय.

अध्ययनाचे विषय -     

मी कोण आहे? मी जीव की प्राण? देह की मन? जागृती, स्वप्न व सुषुप्ती या अवस्थांचे स्वरूप काय? ‘तत् त्वं असि’ या महावाक्यातील तीनही पदांचा अर्थ काय? ॐकाराच्या मात्रा किती? श्रीज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे प्रणवाचे भेद आपल्या शरीरातच कसे उकलावयाचे? क्षर पुरुष व अक्षर पुरुष असे कोणाला वा कशाला म्हणतात? सगुण व निर्गुण म्हणजे काय? प्रकृति व पुरुष यांच्यातील भेदलक्षणे कोणती? आपला जन्म कशासाठी? इत्यादि प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करणे.

अध्ययन करताना पाळावयाची पथ्ये -

अध्ययन करताना पुढील महत्त्वाची पथ्ये पाळावयाची असतात- कामक्रोधादि विकारांचा त्याग करणे, लोकेषणा, वित्तेषणा, पुत्रेषणा, शरीरसुखेषणा यांचा त्याग करणे, देहाभिमान त्यजून श्रीगुरुंकडून अध्यात्मज्ञान समजून घेणे, मी देह नसून मी ब्रह्म आहे, मी अच्युत आहे, मी अनंत आहे, मी चराचरातील आत्मा आहे, मी नाशिवंत प्रपंचाचा अखंड साक्षी आहे, केवळ माझा देहच नव्हे तर सारे विश्‍व माझ्या आत्मस्वरूपात स्थिर आहे, मज आत्म्याव्यतिरिक्त कुठेही काही अस्तित्वात नाही, मीच सर्वत्र आहे या निदिध्यासाने युक्त असणे. 

पोटासाठी अध्ययन ही अध्ययनाची विटंबना होय -    

आत्मज्ञानप्राप्तीसाठी व आत्मज्ञानपूर्वक केलेले अध्ययनच खरे ‘अध्ययन’ होय. विद्याविनययुक्त असूनही जे अध्ययन आत्मज्ञानरहित असते, जो अभ्यास केवळ पोटासाठी असतो, ती अध्ययनाची विटंबना असल्याचे आपल्याला आपल्या  चित्तातच जाणवते, अंतरात्मा न जाणता होणारे अध्ययन ही फजिती होय, म्हणून ज्ञाते अशा प्रकारचे अध्ययन करत नसतात. ‘आत्मज्ञान नाही तिथे कर्मणा (= करमणूक) असते’ व आत्मज्ञानाव्यतिरिक्त सर्व ‘पोटविद्या’ होय, असे समानार्थी विधान समर्थ श्रीरामदासांनीदेखील ‘दासबोधात’ केले आहे.

४) अध्यापन -

स्वतः अध्ययन करून जे आत्मज्ञान झाले ते इतरांना शिकवणे म्हणजे अध्यापन होय. आपल्या आठ देहांचे निरसन करून आत्मानुभवाची खूण सांगणे हे सर्वोत्तम अध्यापन होय. औट हात लांबीचा पंचभूतात्मक स्थूल देह, अंगुष्टप्रमाण वासनात्मक सूक्ष्म देह, अर्धबोटप्रमाण कारण देह व मसुरप्रमाण महाकारण देह या पिंडातील चारही देहांचे आपण आत्मरूप साक्षी आहोत, असे स्वतः अनुभवून तेच शिष्याला समजावून सांगणे व त्याजकडून आत्मज्ञानसाधना करून घेणे म्हणजे अध्यापन होय. असे अध्यापन ब्रह्मज्ञानी ब्राह्मणाने व सद्गुरुंनी करावयाचे असते. इंद्रियांना अगोचर असे जे ब्रह्म ‘ते तू आहेस’ हा बोध शिष्यास आत्मानुभवाच्या वाटेवरील खुणा सांगत क्रमशः करवून देणे म्हणजे अध्यापन होय.

आत्मज्ञानाशिवाय किंवा ब्रह्मज्ञानाशिवाय असलेली इतर सर्व ज्ञाने केवळ नाशिवंत शरीराची पोषक व मनोरंजक असतात, हा ज्ञानेश्‍वरीतील सन्मार्गदर्शक विचारही श्रीरामानंदांनी समशब्दात मांडला आहे -‘ब्रह्मज्ञानाविण। ज्ञान ते अवघेचि अप्रमाण। नाना व्युत्पत्ति करिता जाण। जैसे नेत्रेंविण शरीर॥’ म्हणून, ब्राह्मणवर्णीय मानवाने आत्मज्ञानाशिवाय अन्य विषयांचे अध्यापन करावयाचे नसते.

५) दान -

दान करणे म्हणजे देणे. दानाचे अनेक प्रकार आहेत. द्रव्यदान, अन्नदान, वस्तुदान वगैरे. ‘मी दाता’ असून कुणीतरी ‘घेता’ म्हणजे याचक आहे, असे वाटत राहणे ही द्वैतभावना होय. अशा द्वैतभावनेने युक्त असे दान हे आत्मविषयक अज्ञान पुष्ट करते. म्हणून त्या दानकर्माचे पुण्यफळ भोगावे लागते व त्यासाठी जन्म घ्यावे लागतात. म्हणजे, जन्ममरणाच्या पुनरावृत्ती चुकत नाहीत. फलाभिलाषारहित बुद्धीने आणि आत्मरूप आपण केवळ साक्षिभूत आहोत अशा भावनेने सत्पात्रीं दान करणे हे सद्दान होय.

देव भेटविणार्‍या वेदोक्त दानाचे स्वरूप -        

श्रीरामानंदांनी मोक्षकारक व देव भेटवणार्‍या दानाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. सर्वत्र परमेश्‍वरच असून ‘नाहं’ म्हणजे ‘आपण नाही आहोत’ अशा लीन भावनेने राहणे, हे दान होय. आपल्या शरीरातील विकार, त्रिगुण यांचा साक्षी होणे, हे निर्विकल्प दान होय. इंद्रियाधिष्ठात्री देवतांचे स्वरूप समजून घेऊन त्यांना निष्कामभावनेने विधिपूर्वक त्यांचे त्यांचे भोग अर्पण करणे हे श्रेष्ठ दान केल्याने आपले हित होते. देवभेटीसाठी या निर्विकल्प दानाव्यतिरिक्त कोणतेही दान उपयुक्त नसते. म्हणून वेदशास्त्राने हेच दान सांगितले आहे आणि साधुसंतांनीही दात्याला पावन करणारे हेच दान केले आहे.

थोडक्यात, अहंतेचे, देहाभिमानाचे, विकारांचे, तर्ककुतर्कांचे, कल्पनेचे दान करणे (ध्यान करताना मनाने कल्पना करणे निःशेषपणे सोडून देणे) हेच खरे दान होय. ज्याच्यावर सदगुरुंची कृपा आहे तोच ही दानाची खूण जाणू शकतो; इतर मंदमति लोक देहाभिमानाने वेगवेगळी दाने करीत राहतात व आत्मज्ञानावाचून फजिती पावतात. शुकदेव, वसिष्ठ, नारद, व्यास यांनी ‘मी ब्रह्म’ या भावनेने निर्विकल्प दान केले म्हणूनच ते सुखी झाले. त्यांच्यासारख्या दानशूर महात्म्यांमुळेच पृथ्वी पवित्र होत असते.

६) प्रतिग्रह -

प्रतिग्रह म्हणजे घेणे. प्रतिग्रहाचा आत्मज्ञानवृद्धीकारक व आत्मज्ञानप्रधान अर्थ असा अर्थ - जे जे दृश्यमान भासते ते ते भगवंत म्हणून मनोमन स्वीकारणे, त्यास भगवंत मानणे, हा खरा प्रतिग्रह केल्याने स्वहित साध्य होते. प्रतिग्रहाचा हा परम अर्थ ‘जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोग निश्‍चित। जाण माझा॥’ या  श्रीज्ञानेश्‍वरकृत भक्तियोगाच्या व्याख्येत अनुस्यूत आहे.

आत्मानुभव नसताना दान घेणे हा भयावह परधर्म होय -

आपण ‘पूर्ण ब्रह्म’ आहोत, सर्वसाक्षी आहोत, असा स्वानुभव आल्यानंतर जर एखाद्याने दिलेल्या द्रव्यादींचा प्रतिग्रह म्हणजे स्वीकार केला तरी बद्धता येत नाही. आत्मानुभव नसताना दान घेणे मात्र बाधक ठरते, कारण, अग्नीत गवत पडले की ते जसे तत्काळ जळून जाते तसा ब्रह्मज्ञानी माणसाने केलेला प्रतिग्रहही पवित्र होत असतो. ‘यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते । हत्वाऽपि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥’, या गीतेतील श्‍लोकाच्या श्रीज्ञानेश्‍वरकृत ज्या भावार्थात अहंभावरहित व्यक्तीस कोणतेही कर्म बाधक का होत नाही, ते सांगितले आहे त्याचा सार असा - ‘जो केवळ शुद्ध आत्मस्वरूपच झाला आहे, त्याला ही कर्माची बंदीशाळा नाहीच नाही.’ आत्मानुभव नसताना दान घेणे मात्र बाधक ठरते. कारण, त्या मानवाच्या ठिकाणी ‘मी देह’ हा भाव असतो. जोपर्यंत ऐक्यता बाणलेली नाही म्हणजे विश्‍वात सर्वत्र एक आत्माच आहे असा अनुभव आलेला नाही, तोपर्यंत कुणाकडून काही घेणे हे पाप ठरते, भयावह म्हणजे पुनरपि जन्ममरणास कारणीभूत होणारा परधर्म ठरतो.

ब) ब्राह्मणाचे नित्यकर्मात्मक स्वधर्माचरण -

स्नान, संध्या, जप, होम, पूजन, आतिथ्य व वैश्‍वदेव ही ब्राह्मणाने करावयाची नित्य कर्मे होत. आत्मज्ञानरूपी शुभ लाभास साधनीभूत होईल अशाप्रकारे ही नित्य कर्मे करणे म्हणजे वर्णोचित स्वधर्माचे पालन होणे होय.

७) स्नान -

आत्मानुभवरूपी तीर्थात स्नान केल्याने भवभयाचा मळ धुवून जातो, त्रिविध तापाची समाप्ती होते. स्थूळ, सूक्ष्म, कारण व महाकारण ही चार देहरूपी वस्त्रे फेडून, देहाभिमानरूप पायपोस बाजूला ठेवून, तुर्येचे अंगवस्त्र नेसून आत्मानुभवरूपी तीर्थात स्नान करावयाचे असते.

यथासांग स्नानाचे स्वरूप - श्रीसद्गुरुकृपेवाचून आत्मानुभवतीर्थात स्नान होणे शक्य नाही आणि या तीर्थात स्नान घडत नाही, तोपर्यंत देहाभिमान जात नाही. देहाभिमान जात नाही तोपर्यंत कोणीही सोवळा होत नाही; तोपर्यंत व्यक्ती ओवळी असते. अर्थात, आत्मानुभवाशिवाय ब्राह्मणाचे ‘स्नान’ हे स्वकर्म यथासांग होत नाही. ‘यथासांग ते कर्म काही घडेना । घडे कर्म ते पुण्य गांठीं पडेना ।’ या ‘मनाचे श्‍लोका’तून श्रीरामदास स्वामींनी केलेल्या मार्गदर्शनाचा अर्थ इथे उलगडतो. देहाभिमान असतो म्हणजे ‘हे पाणी व मी स्नान करणारा’ असा द्वैतभाव ज्याच्या ठिकाणी असतो त्याला कल्पनेचा विटाळ असतो. त्यामुळे त्याचे स्नानकर्म निरर्थक ठरते, वाया जाते. अशा स्नानाने व्यक्ती तत्त्वतः शुद्ध होत नाही.

आत्मज्ञानकारक वा आत्मज्ञानयुक्त स्नानाची रीत -

‘मनाचा मळ त्यागणे। तेचि शुद्ध स्नान म्हणणे।...’ स्नानाचे वाक्स्नान, बाह्य व अंत:शुद्धी हे निर्मळ स्नान, इंद्रियांचा व वासनेचा निग्रह, सर्वाभूतीं करुणा व जलस्नान हे पाच प्रकार श्रीनामदेवांनी सांगितले आहेत. यातील पाण्याने करावयाचे पाचवे स्नान हे लौकिकार्थ म्हणजे केवळ शारीरिक स्वच्छतेसाठी करावयाचे असते. देव भेटावा म्हणून शुचिर्भूत होण्यासाठी सत्कर्मरूपी तीर्थच उपयुक्त आहे, असे स्पष्ट मार्गदर्शन ‘तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे  । एवं तीर्थे जाण निर्मळे । सत्कर्मचि ॥’ या ओवीतून श्रीज्ञानेश्‍वरांनी केले आहे.

८) संध्या -

स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चार देहांचे वस्त्र जो त्यागतो, त्यालाच स्नान घडते व तोच संध्येचा अधिकारी होतो.

संध्येचा खरा अर्थ - संधि म्हणजे मनाचा लय होय. स्वतः ब्रह्म होऊन राहणे म्हणजे संध्या होय. प्रकृती व पुरुष यांची म्हणजे अनुक्रमे रात्र व दिवस यांची संधि पाहून प्राणायाम करणे म्हणजे संध्या करणे होय.

ब्रह्मज्ञान नसलेला संध्या करण्यास वर्ज्य होय - आध्यात्मिक, अधिदैविक व अधिभौतिक तापाचे अर्घ्य ज्ञानसूर्याने होणार्‍या प्रातःकाळीच्या संध्येच्या वेळी सोऽहंमंत्राने वैराग्य-अंजुळीने द्यावयाचे असते. जो ब्रह्मभावाला प्राप्त झालेला नाही किंवा ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले नाही, तो अशुद्ध (अशौच) असून तो संध्या करण्यासाठी वर्ज्य होय.

माध्यान्ह काळी करावयाच्या संध्येचे स्वरूप - अहं म्हणजे आत्मा. सोऽहं म्हणजे परमात्मा. या दोन्हींची संधि म्हणजे जीवात्मा. जीवाचे व शिवाचे मीलन करणे म्हणजे माध्यान्ह काळीची संध्या करणे होय. वेदशास्त्रात सांगितलेली ही संध्या विद्वज्जन करतात. जीव, शिव, माया या तिघांचे अर्घ्य दिल्याने त्रिपुटीभान हरपते, तेव्हा पूर्ण-संध्या होते.

सायंकाळी करावयाच्या संध्येचे स्वरूप - आत्मस्वरूप पूर्णत्व पावल्याने समाधिस्थ राहणे ही रात्र होय. आपले पूर्णत्व विसरून राहणे ही वेदान्ती सांगितलेली तिसरी संध्या, जे सदगुरू-उपासना करतात किंवा जे सदगुरू-स्वरूप जाणतात, ते वेदान्तीच जाणत असतात.

संत श्रीएकनाथांचा “झाली संध्या संदेह माझा गेला। आत्माराम हृदयीं प्रगटला..’’ हा अभंगही आत्मज्ञानप्रधान संध्येची सूचना करतो. मी-तू-पण हरपणे, भेदभाव निःशेष जाणे, आत्मस्वरूपाचे दर्शन होणे हे संध्येचे सुचिन्ह आहे. जोपर्यंत मनबुद्ध्यादिकांचा लय होत नाही, तोपर्यंत विधियुक्त संध्येचा अधिकार प्राप्त होत नसतो.

आत्मज्ञानाने देहाभिमानरूप ओवळेपण जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत व्यक्ती प्रपंची असते. अशा व्यक्तीने केलेली बाह्य संध्या म्हणजे बहुरूप्यासारखी विनोदसंपादणी होय. ज्यांनी स्वदेहातच ॐकार-विवरण केले, जे देहातच ब्रह्मत्वाला प्राप्त झाले, त्यांना ब्राह्मण म्हणतात व म्हणूनच ते वंदनीय असतात.

९) जप -

ब्राह्मणाने व ब्राह्मण होण्यासाठी सोऽहं हा अजपाजप सावकाश जपायचा असतो. हा जप सहज होत असतो. ‘सोऽहं’ हा अजपाजप आहे, असे श्रीरामदासांनी ‘दासबोधात’ पटवून दिले आहे.

वेदांनी ईश्‍वरविषयक निर्णय ‘अहं ब्रह्मास्मि’ वगैरे महावाक्यांतून व्यक्त केला आहे. म्हणून, आपला आत्मा हाच ब्रह्म म्हणजे परमेश्‍वर आहे, असे अनुभवावयाचे असते व त्यासाठी वेदातील महावाक्यांचा अर्थ संक्षेपाने सांगणारा ‘सोऽहं’ हा जप जपावयाचा असतो. अजपाजप जपला नाही, त्याचा मनेविण अनुभव घेतला नाही किंवा श्रीसदगुरुकृपेने तो लाभला नाही तर व्यक्तीची अधोगती होते. म्हणून या मंत्राचा परम अर्थ समजून घेऊन व तो जपून आत्मरूपाने साक्षी व ब्रह्म होऊन रहावयाचे असते. जे पूर्ण वेदान्ती असतात तेच अजपाजप जपत असतात.

हा जप आहे आणि मी जपकर्ता आहे अशी अहंता निर्माण झाली की व्यक्ती बद्ध होते. म्हणूनच ज्ञानी पुरुष अहंतेचा त्याग करून सोऽहं या अजपा मंत्राचा पूर्ण जप करतात, या जपानेच व्यक्ती पूर्ण ब्रह्म होते. अजपा मंत्र जपून आपणमुक्त झालो असल्याचे “सोऽहं सिद्धमंत्रें प्रोक्षिला संसार । मरणाची येरझार खुंटियेली ॥’’ या अभंगातून श्रीज्ञानेश्‍वरांनीही सांगितले आहे.

१०) होम -

होम म्हणजे अग्निहोत्र.

पंचप्राणसंबंधित होम : होमाचा पहिला प्रकार - शरीरातील पंचप्राणांशी संबंधित असलेला होम हा होमाचा पहिला प्रकार होय. ज्ञानी ब्राह्मणाने तो करावयाचा असतो. त्याचे स्वरूप असे - प्राण हा होता, अपान हा पूर्ण ऊर्ध्व अग्नी, व्यान म्हणजे ब्रह्मत्व व उदान ही अर्धयुग खूण होय. समान-नामक प्राण हा यजमान होय. अहंकार हा पशु, उकार हा यज्ञस्तंभ, बुद्धी ही पत्नी, होय. सृष्टी ही वेदिका, रामरूप दर्भ, जिव्हा ही स्रुचिका, दोन्ही हात हेच श्रुत्वा यज्ञभाग होत. अशा प्रकारे ज्ञानी (= ब्राह्मण) आत्मानुभूतिपूर्वक प्राणाग्नि तयार करतात व त्यात विकारांचा होम करतात.

पंचज्ञानेंद्रियसंबंधित होम : होमाचा दुसरा प्रकार - आत्मज्ञानी वा ब्रह्मज्ञानी ब्राह्मण पंचज्ञानेंद्रियरूप पाच कुंडामध्ये विषयांचा होम करतात, विषयाची आहुती देऊन त्याचे भस्म अंगाला लावतात. नेत्रकुंडात रूपविषयाचा होम करतात म्हणजे रूपात अरूपाचा (आत्म्याचा) ते अनुभव घेतात. कर्णकुंडात शब्दांचा होम ते करतात; अर्थात, शब्दाच्या म्हणजे वाचेच्या मुळापर्यंत जाऊन ते निःशब्द होतात. परिणामी द्वैताचे भान लय पावते. याचप्रमाणे रसनाकुंडीं रस, घ्राणकुंडीं गंध व त्वचारूप कुंडीं स्पर्शाचा होम करून ज्ञानी निर्विषय होतो.

११) पूजन -

निर्विषय झालेला ज्ञानी मनुष्यच देवपूजेचा पूर्ण अधिकारी होतो. स्वरूपतः ब्रह्म असलेला आत्मा विषयसंग झाल्याने जीवदशेला प्राप्त झालेला असतो. तो विषयांचा होम म्हणजे त्याग करून आत्मपूजेचा अधिकारी होतो.

अध्यात्मशास्त्रीय देवपूजेचे स्वरूपव रीत - ज्याचा स्वभाव त्यासच अर्पण करून स्वतः निर्विकल्प राहणे ही देवपूजा होय. अर्थात, कानाचे ऐकणे, डोळ्यांचे पाहणे, नाकाचे वास घेणे इत्यादी क्रिया ध्यानपूर्वक (प्रत्याहाराने) बंद करून निर्विषय होणे, हीच अध्यात्मशास्त्रीय देवपूजा होय. आत्मदेवाला गुणयोगें प्रकृतिस्वभाव प्राप्त होत असतो, ही त्याची करणी (कर्म) त्याच्याच ठिकाणी लय करणे म्हणजे त्यास अर्पण करणे, ही पूजनाची रीत आहे; किंवा सत्त्व, रज, तम यांची वेगवेगळी कर्मे निर्हेतुकपणे (=निष्काम बुद्धीने) आत्मस्वरूपीं अर्पण करणे (= आत्मसंस्थ होणे) हे महापूजन होय. श्रीसद्गुरुकृपेशिवाय या महापूजनाची रीत कल्पान्तींही प्राप्त होत नाही.

निर्विकार पूजेचे स्वरूपव माहात्म्य - हा संसार नाशिवंत असून मी त्याहून पर म्हणजे साक्षी आहे, असा अहंकार बाळगणे ही निर्विकार पूजा होय. आत्म्याच्या या पूजेवाचून होणार्‍या इतर पूजा अपूज्य होत. आत्मरूप पूर्ण ब्रह्माला सोडून देवदेवतांचे पूजन करणारे लोक आपल्या पूर्णत्वाला चुकलेले असतात. द्वैतभावाने पूजा करणे हे अशौच होय. त्यामुळे पाप लागते. म्हणून विद्वज्जन ते पूजन करत नाहीत. थोडक्यात, अद्वैतपूजेने भगवान संतोषतो व अद्वैत पूजन हेच ब्राह्मणाचे पूजा-लक्षण होय.

१२) आतिथ्य -

अतिथी हा भगवानच आहे, असे समजून त्याची विधियुक्त पूजा करणे व त्याची आशा पूर्ण करणे म्हणजे आतिथ्य होय. आपल्याजवळ अन्नद्रव्यादी असूनही जो अतिथीस, याचकास विमुख करतो तो पाखंडी होय. ब्राह्मण हा ब्रह्म जाणणारा असतो. म्हणून तो अतिथीचा आत्मरूपाने पूजा करतो. त्यामुळे तो अच्युतपदाला प्राप्त होतो. उदा. श्रियाळने, बळीने, कर्णाने असे आतिथ्य केले होते. आतिथ्यविषयक सूचना - अतिथी कोणत्याही जातीचा असला तरी त्याचे आत्मभावाने पूजन केले पाहिजे. हेच वेदान्ताचे सार व वेदशास्त्राचे मर्म आहे. 

१३) वैश्‍वदेव -

जीव ब्रह्म होणे म्हणजे वैश्‍वदेव - कर्म व अकर्म याविषयक अज्ञान या जणू शेणी (शेणाचे वाळलेले तुकडे वा गोवर्‍या) होत. त्या फोडून जाळून नष्ट करण्यासाठी सोऽहंभावयुक्त वायूने बुद्धीरूपी कुंडात ज्ञानाग्नी प्रज्ज्वलित करावा. त्यात कामक्रोधादी विकारांच्या आहुती देत मी-तूपणाचा होम करावा. मी-तूपणाचा भाव उपरमतो त्यावेळी कल्पना करणे नि:शेषपणे थांबते. संकल्पविकल्प करणारे मन मुरले की, अहंभावाचा बळी दिला जातो व स्व-आत्म्याचा अनुभव येतो. ‘हा आत्माच ब्रह्म’ आहे, या अनुभवाची निश्चिती होऊन जीव ब्रह्म होणे म्हणजे वैश्‍वदेव होय.

वर सांगितल्याप्रमाणे स्नान, संध्या, जप, होम, पूजन, आतिथ्य व वैश्‍वदेव ही नित्यकर्मे करणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य आहे. या नित्य कर्मांना जे मुकतात ते त्यांच्या त्या कर्मामुळेच न्यूनता पावतात, तेजोहीन होतात.

क) ब्राह्मणाचे नैमित्तिक कर्मात्मक स्वधर्माचरण -

विशिष्ट निमित्तांनी करावयाच्या कर्मांना नैमित्तिक कर्मे म्हणतात. ब्राह्मणाने ही कर्मे अहंकर्तृभावरहित होऊन म्हणजे निरहंकारपणे करावयाची असतात.

१४) एकादशी -

श्रीरामानंदांनी ‘एकादशी’ या नैमित्तिक कर्माचेमानसिक एकादशी व बाह्य एकादशी असे दोन प्रकार वर्णिले आहेत.

मानसिक एकादशी - एकादशी हे सर्वश्रेष्ठ व्रत श्रेष्ठ आहे. ते सर्व पातकांची धुणी करते. ब्रह्मादी देवही या व्रतास वंदन करतात आणि ऋषीमुनी ते आदरपर्वक करतात. एकादशी येते त्यादिवशी ‘एकादशी-व्रत’ आचरावयाचे असते.

मानसिक एकादशीची वेदोक्त रीत - पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंदिये यांचे दमन करून म्हणजे त्यांच्या कार्यांचा आत्मस्वरूपीं लय करून राहणे ही दशमी होय. असे करताना सर्वत्र एक आत्मस्वरूप विलसत आहे, परिणामी द्वैताद्वैतभान नाहीसे झाले आहे, ज्ञातृत्वभावयुक्त (ज्ञाते) असे आपणही नाही आहोत, असा अनुभव घेणे हाच उपवास व एकादशी व्रत होय. अशा प्रकारे ऐक्यभावाने भजन करीत द्वादशीचे वेळी सहस्त्रनामाचे पक्वान्न आदरपूर्वक सेवन करावे. हे व्रत निर्हेतुकपणे करावे. हे व्रत केल्याने गुरुकृपा प्राप्त होते, हृषीकेश संतुष्ट होतो व आत्मस्वरूपविषयक ऐक्य-बोध झाल्यामुळे सर्व कर्मे अद्वैत-बुद्धीने होतात.

बाह्य एकादशी - जे सदगुरुंचे अंकित असतात ते स्वतः मानसिक एकादशी करून इतर लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी बाह्य व्यवहारातही एकादशी व्रताचे आचरण करतात. एकादशी करून पावन होईल, असा भक्तिभाव दशमीच्या दिवशी बाळगावयाचा असतो.

अंतर्बाह्य पूजनयुक्त एकादशीची रीत - सकाळी स्नान केल्यानंतर देवाचे पुढीलप्रमाणे अंतर्बाह्य पूजन करावयाचे असते - बाहेर पाटावर देवाची मूर्ती बसवावी तशीच अंत:करणातही बसवावी. मूर्तीला गंगाजलाने स्नान घालावे व अंतरीं सत्रावीने न्हात असल्याचे अनुभवावे. बाहेर देवाला आसनावर बसवावे व देवाचे निर्विकल्प स्वरूप अंतरीं संचले असल्याचे अनुभवावे. बाहेर देव आपल्याहून वेगळा असल्याचे दिसते पण अंतरीं तो सर्वत्र असल्याची भावना करावी. बाहेरील देवाला चंदन, तुळसी मंजिरी चढवावी तर अंतरीं मी-तू-पण खंडून प्रेमरूपी चंदन लावावे. बाहेर देवाला सुमन म्हणजे फूल वहावे तर अंतरीं सु-मनाने अहंकाररूपी धूप जाळावा. बाहेर देवाला फळतांबुलाचा नैवेद्य अर्पावा तर अंतरीं अभिमानरूपी दक्षिणा ठेवावी की ज्यामुळे नारायण संतुष्ट होतो.

अशा प्रकारे अंतर्बाह्य पूजन करून एकवेळ जेवावे, रात्री कीर्तन करावे, वैष्णवजनांना बोलावून टाळमृदंगघाषात नामोच्चार करावा. एकादशीच्या रात्री झोपू नये. द्वादशीच्या सुरुवातीपर्यंत जागे रहावे. आत्मज्ञानी ब्राह्मणाला भोजन द्यावे, यथाशक्ती दान द्यावे. अशी एकादशी करतात त्यांचे भवभय नष्ट होते व जे हे व्रत करीत नाहीत ते नरकाला जातात.

राजा म्हणून भक्त प्रल्हाद यांनीदेखील प्रजेला सन्मार्ग दाखवून देण्याच्या हेतूने आत्मज्ञानपूर्वक त्रिस्तरीय पूजा केली होती.

एकादशीव्यतिरिक्त विशिष्ट निमित्ताने करावयाची पितृतिथी वगैरे कर्मेदेखील ‘अशा प्रकारे’ आचरणे हे ब्राह्मणाचे स्वधर्माचरण होय.

(२) क्षत्रियाच्या स्वधर्माचरणाचे स्वरूप -

ज्याच्या ठिकाणी द्वैतबुद्धी नसते, जो देही असोनी विदेही असतो, तो पूर्ण क्षत्रिय होय. असे क्षत्रिय शौर्यतेजाने युक्त असतात, त्यांनी मी-तू-पणाचे निःसंतान केलेले असते. अर्थात, त्यांचे ठिकाणी मी-तू-पण पूर्णत: नष्ट झालेले असते. आपण ब्रह्मस्वरूप आहोत असे जाणून ते स्वधर्माचरण करीत असतात. संसाररूपी संग्रामात निर्माण झालेल्या जीव, शिव, माया, ब्रह्म वगैरेंच्या वेगळेपणाच्या महाभ्रमामुळे आपण आत्मारामास मुकलेले असतो. हे महाभ्रमयुक्त द्वैत आत्मज्ञानरूपी शस्त्रघाताने नष्ट करणे, अधर्माचा छेद करून धर्माचे पालन करणे, सर्वसाक्षी होऊन राहणे, हा क्षात्रधर्म होय.

प्रजेतील अधर्म नष्ट करणे हा क्षत्रियाचा स्वधर्म -

प्रजेत विद्यमान असलेला अधर्म नष्टकरणे हे क्षात्रकर्म होय. आत्मज्ञान नसणे, देहबुद्धीने वागणे, सर्व अशाश्‍वत मानून विषयसेवन करणे, अविधिने वागणे, अशुभ बोलणे, मी-माझे जल्पून तीर्थ-व्रतांची निंदा करणे, स्वधर्म सोडून वागणे, परमात्म्याचे एकत्व न मानणे, देवब्राह्मणांची निंदा करणे, वाडवडिलांची मर्यादा न पाळणे, आईवडिलांचा द्वेष करणे, स्त्रीवश होणे, आत्मस्तुती वा परनिंदा करणे, अखंड वाद करणे या स्थूल प्रकारचे देहोऽहं वृत्तीने वागणे हे प्रजाजनाकडून घडणारे अधर्माचरण होय; ते नष्ट करणे हा क्षत्रियाचा कर्तव्यरूपी स्वधर्म होय.

मनुष्यदेह (नरदेह) लाभूनही जो आत्मोपासना करीत नाही, त्याला क्षत्रिय म्हणू नये, असे स्पष्ट मत श्रीरामानंदांनी नोंदवले आहे.

खर्‍या क्षत्रियाची गुणकर्मलक्षणे -       

देहाभिमानजन्य अधर्माचा उच्छेद कसा करायचा ते स्पष्ट करताना श्रीरामानंदांनी खर्‍या क्षत्रियाची पुढील गुणकर्मलक्षणेही सांगितली आहेत - आपल्या मनाला इंद्रियाधीन होऊ न देता जो ‘मी आत्मा या देहाचा व सर्व जगाचा साक्षी आहे’ या भावनेने राहतो तो खरा शूर होय. ‘मी ब्रह्मच आहे’ असे ज्याने जाणले आहे, ज्ञानशस्त्राने संसाररूपी रणात ज्याने द्वैताचा म्हणजे भेदाभेदभ्रमाचा, मी-तूपणाचा, उच्च-नीचभावाचा घात केला आहे, ज्याने इंद्रिये स्ववश केली आहेत, जो आत्मस्तुती करीत नाही, परकांता मातेसमान व परद्रव्य पाषाण मानतो, दुराचारी लोकांना शिक्षा करून सर्वांना सुख देतो, तोच क्षत्रिय व तोच महाशूर होय.

यजन, अध्ययन व दान -

ब्राह्मणाप्रमाणे क्षत्रियानेदेखील यजन, अध्ययन व दान ही तीन विधियुक्त कर्मे आचरावयाची असतात. यजन म्हणजे यज्ञ करणे. आत्मज्ञानास साधनीभूत होणार्‍या यज्ञात मनबुद्ध्यादिकांचा होम करणे, अज्ञानरूपी पशूचा वध करणे, देहाभिमानाची पूर्णाहुती देणे, हाही क्षत्रियाचा स्वधर्म होय. क्षत्रियाने वेदाध्ययन केले पाहिजे. क्षत्रिय तन, मन, धन याबाबत उदासीन असल्याने याचकांच्या इच्छेप्रमाणे दान करणे, दानरूपी परोपकारात कधीही आळस न करणे, प्रसंगी या कामी जीवित्वही वेचणे, ही ‘विधियुक्त क्षात्रनीती’ होय. युद्धप्रसंगी शत्रूस विन्मुख न होणे, विपत्तीकाळ आला तरी मन विचलित न होऊ देणे, कुणाही जीवाला दुःख न देणे, सर्वांचे सुख इच्छिणे व सर्वांना सुख देणे, हेही क्षात्र कर्म होय. 

(३) वैश्याच्या स्वधर्माचरणाचे स्वरूप -

कृषी, गोरक्षण व वाणिज्य ही तीन वैश्याची सहज कर्मे होत. आत्मज्ञानप्राप्तीस साधनीभूत होणारे असे या तिन्ही कर्मांचे स्वरूप श्रीरामानंदांनी स्पष्ट केले आहे. ते क्रमश: पाहूयात -

अध्यात्मकृषी करणारांनाच मनुष्यजन्माचे फळ मिळते -

जी शेती केल्याने परमेश्‍वर संतुष्ट होतो व व्यक्तीची जन्ममरणांच्या खेपांपासून सुटका होते त्या वेदशास्त्राने सांगितलेल्या अध्यात्मकृषीचे स्वरूप असे - साडेतीन हात क्षेत्र म्हणजे आपले शरीर हेच महापिकाचे अधिष्ठान आहे. यात आपण जसे पेरू तसेच पूर्ण फळ मिळते. हे क्षेत्र महद्भाग्याने लाभले आहे म्हणून यात उत्तम शेती केली पाहिजे. जे इथे आळस करतील ते अधोगतीला जातील. अनेक जन्मानंतर लाभलेल्या या नरदेहरूपी क्षेत्रात (रानात) तृष्णेचे तण, लोभाचे वृक्ष, इच्छेचे वेळू कामनेमुळे वाढलेले आहेत. यातील ममतेच्या बाभळींना कल्पनेचे तीक्ष्ण काटे आहेत. देहाभिमानरूपी दगडांनी हे क्षेत्र पूर्ण व्यापले आहे. चिंतेच्या चिंचांमध्ये कामक्रोधादी वसले आहेत. यात मीतूपणाचे कोल्हे भुंकत आहेत. हे क्षेत्र म्हणजे जीव-शिव-माया-ब्रह्म-रूपी वेळूकळकाचे बेटच आहे. हे रान वैराग्यरूपी अग्नीने पेटवून दिले तर त्यातील पालापाचोळा जळून भस्म होईल. कामक्रोधादिक पळून जातील. नंतर विचाररूपी कुर्‍हाडीने राहिलेल्या वेगवेगळ्या झाडांचे छेदन करावे. विवेकरूप नांगराला शमदमाचे बैल जुंपून हे क्षेत्र नांगरून स्वच्छ करावे. क्षेत्र शुद्ध केल्याशिवाय पिक मिळत नाही.

नंतर श्रीसदगुरुंकडून विज्ञानाचे (सर्वत्र देव आहे, या अखंड अनुभवाचे) बीज घ्यावे, सोऽहंभावाच्या तिफण्यातून एकनिष्ठेने या शेतात पेरावे. शांतिचे कुंपण करून निंदास्तुतींची ढोरे हाकलून द्यावीत. कोऽहंभावाचे पक्षी उडवून देऊन या महान क्षेत्राचे राखण करावे. नाना तर्करूपी चोर बुद्धीबळाने मारून टाकावेत व हे क्षेत्र निर्विकल्प राखून आत्मारूपी पीक घ्यावे.  

नंतर आपणही न होणेरूपी (नाहं-भावरूपी) कापणी करून पीक बोधरूपी खळ्यात आणावे व अष्टसात्त्विकभावाने मळावे. त्रिगुणाची तिपाई करून तूर्येची तुर्याटी घेऊन प्रेमप्रीतिने त्यावर उभे राहून एकनिष्ठेने उपणावे. समताबुद्धीच्या टोपल्यातून उपणल्याने दृश्यरूपी भूस उडून जाईल व अनिर्वाच्य धान्य खाली पडेल. जे जे विचाराधीन ते ते भूस होय. जे मनबुद्धीपर आहे ते धान्य होय. या धान्याने अनंतब्रह्मांडाची सिग भरावी. हे मोजणारा (मापाडी) एक सदगुरूच होय.

हे पीक ज्याच्या हाती येते त्याचे भवजन्मीचे दारिद्रय पूर्णतः नष्ट होते, त्याला आत्मानुभवाचे वैभव प्राप्त होते व अमुप सुख मिळते. ही अध्यात्मकृषी जे करतात त्यांनाच मनुष्यजन्माचे फळ मिळते.

आध्यात्मिक गोरक्षण केल्याने द्वैत व भवभय नष्ट होते -

गो म्हणजे गायी. अकरा इंद्रियरूपी गायींचे रक्षण करणे म्हणजे गोपालन अर्थात इंद्रियरक्षण होय. श्रीरामानंदकथित अध्यात्मशास्त्रसंमत गोरक्षणाचा अर्थ असा -“गो म्हणिजे गायी । ते हे अकरा इंद्रिये पाही । हा विवेक ठेवूनिया ठायी । लावावे सोयी हिताच्या ॥ अकरा गायी त्या कोण कोण । ऐसे करिता अनुमान । तरी तेही सांगतो खूण । सावधान परिसावी ॥ नेत्र त्वचा जिव्हा घ्राण । पाचवे श्रवण इंद्रिय जाण । हे ज्ञान इंद्रियस्थान । ऐके सावधान कर्मेंद्रिय ॥ शिश्‍न पाणि पाद गुद । वाचा कर्मेंदिय शुद्ध । या दहांचा तुज केला बोध । अकरावे प्रसिद्ध मन हे ॥’’ हे मन अतिशय ओढाळ (उनाड) असून त्याने अनेकांना फसवले आहे. हे मोहकारी (भुलविणारे) असून दहादी इंद्रिये त्यामागे धावत असतात. म्हणून याला अगोदर आवरून इंद्रियरक्षण करावे. ज्ञानाची काठी हाती घेऊन या इंद्रियांना निरंजनीं (आत्मस्वरूपीं) चरावयास न्यावे. यांना विषयरूपी शेतात घुसू देऊ नये. जर या इंद्रियरूपी गायी विषयशेतात गेल्या तर त्या दुःखरूपी पदवी देतात, देहरूपी खोड्यात अडकवतात. त्यामुळे अनेक संकटे कोसळतात. देहखोड्यात अडकलेल्यांना चिंतेच्या कोरड्यांनी झोडले जाते, कल्पनेच्या कोठडीत कोंडले जाते. विषयशेतीचा शेतदार म्हणजे मालक आपली थोर विटंबना करतो. परिणामी अनेक गर्भींची (अनेक जन्मांतली) दुःखे सहन करावी लागतात. जन्मोजन्मी कामक्रोधलोभाच्या साखळदंडाने आवळले जाते, ममतेच्या तीक्ष्ण टोकावर बसवले जाते, अभिमानाचे दगड वहावे लागतात, मी-तूपणा वारंवार उठबस करतो, विकल्पाचा मारा सहन करावा लागतो, षडविकाररूप चोपदार अखंड तृष्णेचा मारा करतात त्यामुळे क्षणभरदेखील विश्रान्ती मिळत नाही.

जो वैश्य आहे त्याने इंद्रियरूपी गायींना बोधरूपी गोठ्यात व्यवस्थित बांधून ठेवावे. हेच खरे गोरक्षणनामक वैश्यकर्म होय. हे केल्याने द्वैत व भवभय नष्ट होते. 

अध्यात्मोदीम केल्याने मोक्षाची व देवाची प्राप्ती होते -

वेदशास्त्राने प्रतिपादिलेल्या मोक्षकारी आध्यात्मिक अध्यात्मोदीमाचे वा अध्यात्मशास्त्रसंमत उद्योगव्यवसायाचे स्वरूप असे - अज्ञानी लोकांच्या ठिकाणी असलेला नाशिवंत ‘देह म्हणजे मी’ हा भाव (देहभाव) ही स्वस्त (सवंग) वा सर्वांकडे असणारी गोष्ट होय. ती घेऊन तिच्या बदल्यात त्यांना अतिशय मूल्यवान (महाग) वा अत्यंत दुर्मिळ असा ‘मी आत्मा’ हा सद्भाव (देवभाव) देणे म्हणजे अध्यात्मोदीम करणे होय. (उदा. श्रीनरहरी सोनार यांच्यासारखे) संत हा व्यवसाय करीतहोते व करीत असतात. भक्तीरूपी पेठेत सद्भावाचे भांडवल गुंतवून सर्व जीव कृष्णरूपच आहेत, आत्मारूपी कृष्णच अनंतरूपांनी विश्‍वात नांदत आहे, या अनुभवाची नाणी (भावस्थितीरूपी मुद्रा) ते लोकांना वाटत फिरत असतात. लोकांच्या ठिकाणी असलेले देवाविषयीचे अज्ञान घालवून देव दाखवणारे नाम ते लोकांना देतात. हे कार्य करण्याचा हव्यास त्यांच्या ठिकाणी असतो. हा उद्योग ते मोठ्या निष्ठेने करत असतात. या व्यापारात कधीही तोटा होत नाही, जन्ममरणरूपी दारिद्रय म्हणजे भवदु:ख कायमचे नाहीसे होते. हे महासुखदायी भाग्य भाग्यवान असेल त्यालाच लाभते. वेदशास्त्रांनी प्रतिपादिलेल्या या रीतीने उद्योगव्यवसाय केल्याने वैश्य मानवास मोक्षप्राप्ती होते व याच जन्मात वा याच देहात परमेश्‍वराची प्राप्ती होते.

अशा प्रकारे उद्योग-व्यवसाय न करणारे लोक फक्त देहपोषणार्थ व देहरक्षणार्थ व्यापार करत असतात. देह नाशिवंत असल्याने व मृत्युमुळे तो व्यवसाय व्यर्थ जातो, असा स्पष्ट अभिप्राय श्रीरामानंदांनी व्यक्त करून ठेवला आहे.

(४) शूद्राच्या स्वधर्माचरणाचे स्वरूप -           

आत्मज्ञानाचे साधन म्हणून व आत्मज्ञान झाल्यानंतही सेवाभाव, नम्रता, लीनता या अंत:करण निरहंकार म्हणजे पवित्र करणार्‍या व पवित्र राखणार्‍या सदगुणांचा अंगीकार करणे म्हणजे शूद्र होणे व शूद्रभावाने राहणे होय. परमेश्‍वरप्राप्तीसाठी शूद्र होणे व शूद्रभावाने (अखंड समतायुक्त भावाने) राहणे आवश्यक असते.

तिन्ही वर्णांची परिचर्या (सेवा) करणे हे शूद्राचे स्वाभाविक कर्म होय. सर्वत्र आत्मारामच आहे असे लक्षात घेऊन व ठेवून त्याने प्रेमाने सेवाकार्य करावे. कायेने, वाचेने व मनाने देवाचे अखंड स्मरण करत रहावे, एक क्षणही रिकामे नसावे. देव व आपण तसेच चराचर विश्‍व कृष्णरूपच आहे, म्हणून भेदभावना सोडून देऊन सर्वांना वंदन करावे. शूद्राने करावयाच्या सेवेचे हे खरे आध्यात्मिक स्वरूप आहे. ही जाणीव न ठेवता केवळ शरिराने म्हणजे बाह्य सेवारूप व्यवहार केल्याने आपले हित साधले जात नाही.

ज्ञानेश्‍वरीतील ‘जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्‍चित । जाण माझा ॥’या ओवीत आणि संत तुकारामांच्या ‘नम‘ झाला भूतां । तेणें कोंडिले अनंतां ॥’ व ‘वर्ण अभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणी जाती रे ॥’ या अभंगातहीशूद्रवृत्तीची आत्मज्ञानवृद्धिकारकता अधोरेखित केली आहे.

(५) भयावह परधर्माचरणाचे स्वरूप -

स्वधर्माचरण होत रहावे म्हणून परधर्माचेही स्वरूप थोडक्यात समजून घेऊयात. वर्णविशिष्ट आचरण जेव्हा फलाभिलाषायुक्त असते, तेव्हा ते ‘मी आत्मा आहे’ / ‘मी ब्रह्म आहे’ असा अनुभव येण्यास प्रतिकूल असते. सामाजिक दृष्टीने ते ‘सभ्य’ असले तरी मोक्षप्राप्तीस ते अनुकूल नसते. आत्मज्ञान नसल्यामुळे देहाभिमान, वर्णाभिमान असलेल्या ब्राह्मणवर्णीय मानवाचे सकाम कर्माचरण हे स्वधर्माचरण नसते; ते प्राकृत आचरण म्हणजे परधर्माचरण असते, असे श्रीएकनाथांनीही ‘भागवतात’ सविस्तर विशद केले आहे. इतर वर्णीय मानवांकडूनही स्वधर्माच्या नावाखाली परधर्माचरण घडू शकते. ते घडू नये म्हणून उदा. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या निमित्ताने केलेल्या उपदेशाचे सार श्रीशहामुनीकृत ‘सिद्धान्तबोधातील’ पुढील ओव्यातून व्यक्त झाले आहे - “सांगितली स्वधर्मरचना । तेचि करावी पांडुनंदना । मी कर्ता हे भावना । उठो नेदी तत्त्वता ॥.. तू माझे बोलणे अव्हेरुनी । ‘मी अर्जुन’ हे घेसी मनीं । तरी पडसील महापतनीं । मुक्तदशा जाईल ॥’’

मानव देहातील जीवाने आत्मरूप देवाची सोऽहंभावाने भक्ती करणे, हा स्वधर्माचरणाचा शुभंकर अर्थ आहे. याउलट, पंचमहाभूतांपासून बनलेला ‘देह म्हणजचे मी’ असे समजून मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वा शूद्र आहे, मी श्रेष्ठ वा कनिष्ठ जातीचा आहे, मी पुण्यवान वा पापी आहे यासारखे अज्ञानजन्य अहंयुक्त भ्रम पोसत जगणे म्हणजे भयावह परधर्मानुसार वागणे होय. 

.............................................................................................................................................

हा लेख पुणे विद्यापीठाला १९९७ साली सादर केलेल्या ‘स्वधर्म : विश्‍वव्यापी मानवधर्म - एक चिकित्सा’ या लेखकाच्या पीएच.डी. प्रबंधावर आधारित आहे.

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......