ज्येष्ठ संपादक, लेखक प्रभाकर पाध्ये यांचं ‘असेही विद्वान’ हे जगभरातल्या काही निवडक विद्वानांची ओळख करून देणारं पुस्तक नुकतंच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकात भारतातील ३३, आशियायी देशांत २०आणि पाश्चात्य देशांतील २२ विद्वानांविषयीच्या मार्मिक, रंगतदार, बहारदार आणि उत्तम आठवणी आहेत. त्यापैकी भारतातील निवडक विद्वानांच्या आठवणींची ही एक झलक...
.............................................................................................................................................
डॉ. आंबेडकर
ही फार जुनी आठवण आहे. तो १९३८-३९ चा काळ असावा. मी तेव्हा ‘धनुर्धारी’चा संपादक होतो. काही कारणाने डॉ. आंबेडकरांची माझ्यावर मर्जी बसली होती. (पुढे लवकरच त्यांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकावर मी अभिप्रायवजा लेखमाला लिहिली आणि ती मर्जी उडून गेली!)
एक दिवस डॉक्टरसाहेबांचा निरोप आला, ‘मला येऊन भेटा’.
ते आपल्या राजगृहातील अभ्यासिकेत बसले होते. भले थोरले टेबल. त्याच्यावर फाउंटन पेन वगैरे वस्तू. मागे एक फिरणारी (swivel) खुर्ची.
मी टेबलासमोर जाऊन उभा राहिलो. त्यांनी मला बसायला वगैरे काही सांगितले नाही. ते लगेच म्हणाले, “तुम्ही माझ्या पक्षात यावे आणि निवडणुकीला उभे राहावे, अशी माझी इच्छा आहे.’’
त्यांच्या त्या वेळच्या पक्षाचे नाव ‘इंडिपेंडन्ट लेबर पार्टी’ असे होते आणि निवडणुका म्हणजे मुंबई म्युनिसिपालिटीच्या निवडणुका.
आंबेडकरांच्या पक्षातर्फे म्युनिसिपालिटीला उभे राहणे म्हणजे नक्की निवडून येणे. त्या वेळी महिना पाच रुपये भाडे भरणाऱ्याला मत असे. आंबेडकरांचे बहुतेक अनुयायी म्युनिसिपालिटीचे नोकर असत. त्यांना म्युनिसिपालिटीच्याच जागा राहायला असत. त्यांचे भाडे पाचपेक्षा अधिक असे. त्यामुळे त्यांचे मोहल्ले म्हणजे आंबेडकरांचे ‘पॉकेट बरोज्’!
पण मी ‘नाही’ म्हटले.
त्याबरोबर डॉक्टरसाहेब उखडले. त्यांनी आपली भली थोरली मूठ टेबलावर आपटली. त्यामुळे टेबलावरच्या फाउंटन पेनांनी मारलेल्या उड्या माझ्या डोळ्यांपुढे अजून आहेत. ते ओरडले,
“अरे कंगाल गृहस्था, मी तुला एक करिअर देतो आहे आणि ती तू नाकारतोस?’’ (You wretched fellow! I am giving you a career and you are rejecting it?)
डॉक्टरसाहेबांचा तो अवतार पाहून मी गडबडून गेलो. काय बोलावे तेच मला समजेना. अखेर होते नव्हते तेवढे अवसान गोळा करून म्हणालो,
“सर, मला माहीत आहे, मी गरीब आहे. माझा पगार फक्त ऐंशी रुपये आहे. पण मी एक निर्णय घेतलेला आहे- ‘आपण राजकारणात पडायचे नाही. तिथे आपला निभाव लागणार नाही.’ ’’ माझे हे उद्गार त्यांनी ऐकले मात्र, त्यांच्या चर्येत एकदम फरक पडला. ते खुर्चीत मागे रेलले नि म्हणाले,
‘You are right! If I had not been born in this wretched community, I would never have touched this dirty business of politics.’ (तुमचे बरोबर आहे. मी या नतद्रष्ट जातीत जन्माला आलो नसतो, तर राजकारणाच्या या घाणेरड्या मामल्यास स्पर्शसुद्धा केला नसता.)
.............................................................................................................................................
आचार्य जावडेकर
आचार्य जावडेकरांनी मर्ढेकरांच्या विरुद्ध अनुभव दिला. त्यांनी माझ्यासारख्यांना आपला वेळ मोडून मार्गदर्शन केले. टिळकांचे ‘गीतारहस्य’ मी जावडेकरांपाशी वाचले. (असे असूनही त्यातले मला थोडेच समजले, हा माझा दोष. त्याला त्यांचा इलाज नव्हता.)
एकदा मी आचार्यांना म्हटले, “आजकाल आपण फारसे लिहीत का नाही?’’
आचार्य उत्तरले, “आता मला लिहिण्याचे कारणच काय? तुम्ही लिहिता आहात. नानासाहेब गोरे लिहिताहेत. एस्. एम्. लिहिताहेत. मला जे सांगायचे आहे, ते तुम्ही सांगता आहात, मग मी कशाला लिहू?’’ एखाद्या भुक्कड लेखकालासुद्धा वाटते की, आपल्याला जे सांगायचे आहे, ते विशेष आहे. पण आचार्य वेगळ्या कोटीतले!
पण तोंडदेखली स्तुती करणारे आचार्य नव्हते.
एकदा त्यांनी मला विचारले, “आजच्या संपादकांमध्ये सर्वश्रेष्ठ संपादक तुम्हाला कोण वाटतो?’’
तेव्हा मी ‘नवशक्ती’चा संपादक होतो आणि आमची ‘नवशक्ती’ जोरात चाललेली होती.
मी म्हटले, “पां. वा. गाडगीळ. नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणाइतक्याच उत्साहाने ते पडीक जमिनीच्या प्रश्नावर लिहितात.’’
आचार्य म्हणाले, “बरोबर आहे. जनतेची खरीखुरी सेवा करायची असेल, तर तिच्या दैनंदिन प्रश्नांशी समरस होऊन लिहिले पाहिजे. तुमचा भर पुस्तकी प्रश्नावर अधिक असतो.’’
.............................................................................................................................................
पु. ल. देशपांडे
पु. लं.ची एक अर्थपूर्ण आठवण मजपाशी आहे.
शांता रावचे नृत्य पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. नृत्य पाहून आलो नि आमची त्या नृत्याबद्दल चर्चा सुरू झाली. मला नृत्य अतिशय आवडले होते. पु. लं.ना मुळीच आवडले नव्हते.
मी त्यांच्या मताचा प्रतिवाद केला. तो त्यांना सहन झाला नाही. ते म्हणाले, “हे पाहा पाध्ये, मी या विषयाचा थोडा अभ्यास केला आहे, त्या आधाराने मी बोलतो आहे.’’
तेव्हा मी म्हटले, “मी अभ्यास केलेला नसेल, पण मला काय आवडते व काय आवडत नाही, हे मला नीट कळते. मी त्या आधाराने बोलत आहे.’’
अशा थोड्या कटू स्वरात आमच्या वादाचा समारोप झाला.
दुसऱ्या दिवशी पु. ल. मला के. डी. दीक्षितांकडेच भेटले. तेव्हा दीक्षित दिल्लीला रेडिओत होते आणि पु. ल. देशपांडे टेलिव्हिजनमध्ये होते. भेटल्याबरोबर पु. ल. म्हणाले, “पाध्ये, तुमचे म्हणणे बरोबर आहे. ही शांता राव फार सुंदर नाचते. काल आम्ही टीव्हीसाठी तिचा डान्स रेकॉर्ड केला, तेव्हा मला समजले. वास्तविक शांता रावची पावले बेढब आहेत, पण काल माझा कॅमेरा तिच्या पावलांवरच खिळला होता. तिच्या पावलांत जादू आहे.’’
पु. लं.च्या प्रांजळपणाचा असा अनुभव मला आणखीही काही वेळा आला आहे. पु. ल. फार मोठे विनोदी लेखक होणार, हे भविष्य मी फार पूर्वी वर्तवले होते.
पु. ल. त्या वेळी अंधेरीच्या कॉलेजात फर्स्ट इयरच्या वर्गात होते. आमच्या धनुर्धारीत तेव्हा ‘कॉलेजचे विश्व’ हे सदर येत असे; त्या सदरासाठी एकदा पु. लं.चा लेख आला नि तो वाचून मी थक्क झालो. मी त्यांना पत्र पाठवले आणि भेटीला बोलावले.
ते आले. ते भेटल्यावर त्यांना मी म्हटले, “गड्या, तू एक दिवस महाराष्ट्राचा मोठा विनोदी लेख होणार!’’ पु.लं.नी माझा शब्द खरा केला.
पुढे त्यांनी, जणू माझे भविष्य खरे झाले हे मलाच नीट पटावे म्हणून माझ्यावर आपल्या विनोदाचे धारदार शस्त्र अनेकदा धरले! पण वेळ आली की अगदी प्रारंभीच्या काळात त्यांना मी उत्तेजन दिले होते, याचा उल्लेख करायला ते कधीही विसरत नाहीत!
.............................................................................................................................................
कॉम्रेड डांगे
गोष्ट १९३४ मधली (किंवा १९३५ मधली) असेल. मीरत खटल्यात झालेली शिक्षा भोगून डांगे नुकतेच सुटून आले होते. तेव्हा माडखोलकरांचा मुक्काम मुंबईत होता. क्रांतिकारक कादंबऱ्या लिहिण्याचा सोपा मार्ग म्हणून क्रांतिकारकांना भेटण्याचा माडखोलकरांना हव्यास होता.
ते डांग्यांना भेटायला गेले. त्यांनी बरोबर मला नेले.
माडखोलकरांनी माझी ओळख करून दिल्याबरोबर डांग्यांनी मला म्हटले, “तुमचा ‘प्रतिभा’ पाक्षिकात रशियन लेखकांच्या आत्महत्येबद्दलचा लेख मी वाचला. तुम्हाला हे माहीत नाही का की, आत्महत्या करण्याची प्रथा रशियन लेखकांत फार पूर्वीपासून सुरू आहे?’’
स्टालिनच्या राजवटीत लेखकांवर असा काही वरवंटा फिरवण्यात येऊ लागला की, कवींनी आत्महत्या केली आणि गद्यलेखकांनी लेखनसंन्यास घेण्यास सुरुवात केली, अशा अर्थाचा एक लेख मी काही आठवड्यांपूर्वीच ‘प्रतिभा’ पाक्षिकात प्रसिद्ध केला होता. त्याला उद्देशून डांगे बोलत होते. एका शिस्तबद्ध कम्युनिस्टाचा स्टालिनची तरफदारी करण्याचा तो प्रयत्न होता.
मी म्हटले, “हो, मला माहीत आहे. आत्महत्या करण्याची मानवजातीची जुनीच खोड आहे. पण प्रत्येक आत्महत्येला कारण कुठले झाले, याला महत्त्व असते. आज रशियात होत असलेल्या कवींच्या आत्महत्यांची कारणमीमांसा मी केली आहे.’’
त्यानंतर माडखोलकर तासभर तरी तिथे बसले होते, पण तेवढ्या अवधीत डांगे माझ्याशी एक शब्ददेखील बोलले नाहीत.
.............................................................................................................................................
धनंजयराव गाडगीळ
डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचा मी विद्यार्थी होतो, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. त्यांनी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये दिलेल्या प्रवेशाचा आणि इन्स्टिट्यूटतर्फे दिलेल्या स्कॉलरशिपचा मी काहीच उपयोग केला नाही. पण जो काही थोडासा अभ्यास मी केला, त्या संदर्भात धनंजयरावांशी झालेल्या एका संभाषणाची मला चांगली आठवण राहिली आहे. त्यांनी मला एक पुस्तक वाचण्याची शिफारस केली आणि लगेच म्हटले, “हे पुस्तक सुमारच आहे म्हणा!’’
“मग तुम्ही मला ते वाचायला का सांगता आहात?’’
“ते सामान्य आहे, हे तुम्ही ते वाचून ठरवले पाहिजे.’’
अभ्यासाविषयीचा एक सुंदर सिद्धान्त धनंजयरावांनी मला त्या वेळी सांगितला. पण पुढे प्रिन्स्टनला जाईपर्यंत त्याची नीटशी उमज मला पडली नव्हती आणि त्यानंतर तरी किती पडली, तो एक प्रश्नच आहे!
.............................................................................................................................................
डॉ. लोहिया
डॉ. लोहिया यांची एक वेळ माझ्यावर मर्जी होती. तिची खूण त्यांनी मला दिलेल्या आपल्या एका पुस्तकाच्या प्रतीत आहे. ही प्रत भेट देताना त्यांनी, ‘तुमचे राजकारण नाही, तरी तुमचे तत्त्वज्ञान तुमचे संरक्षण करील’’ अशा अर्थाचे वाक्य लिहिले होते.
‘तुमचे तत्त्वज्ञान’ म्हणजे ‘लोहियांचे तत्त्वज्ञान!’ त्यांच्या पंचमढीच्या भाषणाची भलावण करणारा प्रबंध (‘समाजवादाचा पुनर्जन्म’) मी नुकताच प्रसिद्ध केला होता! पुढे मला ते दिल्लीला भेटले. त्यांनी विचारले, “काय, वाचले का माझे पुस्तक?’’
मी म्हटले, “हो.’’
“मग कसे वाटले ते तुम्हाला?’’
मी म्हटले, “मला माहीत नव्हते की, ग्रंथलेखनातसुद्धा तुम्ही राजकारणाइतकेच बेजबाबदार असाल.’’
डॉ. लोहिया भयंकर संतापले. पण हवे असेल तेव्हा संतापावर नियंत्रण घालण्याची शक्ती त्यांच्यापाशी आहे. त्यांनी विचारले, “काय अर्थ तुमच्या म्हणण्याचा?’’
मी उत्तरलो, “इतिहास म्हणजे जात आणि वर्ग यांचा चक्रनेमिक्रम आहे, असा सिद्धान्त तुम्ही मांडला आहे. पण जात म्हणजे काय आणि वर्ग म्हणजे काय, याची व्यवस्थित फोड करण्याची काळजी मात्र तुम्ही घेतलेली नाही.’’
लोहिया गप्प बसले. जरा वेळाने निघून गेले.
अगदी अलीकडे त्यांचे-माझे भाषेच्या प्रश्नाबद्दल बोलणे झाले. तेव्हा इंग्रजी भाषेला उद्देशून ते म्हणाले, ‘I am trying to woo this fair lady for such a long time, but I have not succeeded.’ (या सुंदर ललनेचे प्रियाराधन मी किती तरी काळापासून करतो आहे, पण तिने मला दाद दिलेली नाही.)
मी म्हटले, “वा! तुमचे सारेच और! लोक भाषेकडे मातेच्या दृष्टीने पाहतात, तर तुम्ही प्रियेच्या!’’
लोहिया काही बोलले नाहीत!
.............................................................................................................................................
अच्युतराव पटवर्धन
अच्युतरावांच्या सांगण्यासारख्या दोन-तीन आठवणी आहेत. एक १९३४ मधली. गिरगावातला रामकृष्ण बुक डेपो हे स्थळ. मी काही तरी कामासाठी तिथे गेलो होतो. तेवढ्यात अच्युतराव तिथे आले. मला पाहून म्हणाले, “तुमचे ‘काँग्रेस सोशालिस्ट’मधले परीक्षण छान आहे. ते वाचताना मला मॅक्स ईस्टमनची सारखी आठवण होत होती!’’
संदर्भ असा- ग्लेब स्ट्रव्ह (Gleb Struve) यांच्या ‘सोव्हिएट लिटरेचर’ या पुस्तकाचे परीक्षण मी ‘काँग्रेस सोशालिस्ट’ या पत्रात केले होते. त्याच्यावर मॅक्स ईस्टमन यांच्या मतांची दाट छाया पडलेली असावी. मॅक्स ईस्टमन यांच्या शैलीचीही. त्यापूर्वी मी त्यांच्या ‘आर्टिस्ट इन युनिफॉर्म’ आणि ‘आर्ट अअँड लाईफ ऑफ अॅक्शन’ या दोन पुस्तकांची पारायणे केलेली होती. हे लक्षात घेतले की, अच्युतरावांच्या अभिप्रायातली खोच लक्षात येईल.
दुसरी आठवण बेचाळीसच्या काळातली.
एक दिवस अच्युतराव आले. त्यांनी एक हकिगत सांगितली आणि म्हणाले, “या आठवणीवर एक नाटिका लिहून मला द्या!’’
हकिगत अशी- उत्तर प्रदेशातल्या बलिया गावी ९ ऑगस्टचा उठाव झाला. मोठी मिरवणूक निघाली. सरकारी कचेऱ्यांचा एकामागून एक असा ताबा घेत शेवटी तहसील कचेरीचा ताबा घेतला गेला. तोपर्यंत लोक खवळले होते. धुंदी त्यांच्या डोळ्यांत भिनली होती. तहसिलीतील तिजोरी लुटण्याचा बूट निघाला. त्याबरोबर स्थानिक शाळेतला एक मास्तर पुढे झाला. मास्तर कसा? तोंडावरची माशी उडणार नाही, अशी ख्याती. त्याचा शिकवण्याचा विषय संस्कृत. पण एव्हानापर्यंत त्याचा कायापालट झाला होता. आता त्याची ठिणगी उडाली. पुढे सरसावून तो म्हणाला, “खबरदार, तिजोरीला हात लावाल तर? आता ही तिजोरी जनतेच्या मालकीची झाली आहे. जनतेच्या संपत्तीचे संरक्षण करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे- निदान माझे आहे! तिजोरी फोडण्यापूर्वी तुम्हाला प्रथम माझा मुडदा पाडावा लागेल.’’ त्याच्या तेजाचा परिणाम झाला. तिजोरी त्याच्या ताब्यात देण्यात आली.
ही हकिगत सांगून अच्युतराव म्हणाले, “यावर नाटक लिहून द्या.’’
मी कसलं नाटक लिहिणार? अच्युतरावांनी सांगितलेली गोष्ट मी शिरवाडकरांना (कुसुमाग्रजांना) दिली नि म्हटले, “अच्युतरावांना यावर नाटक हवे आहे, लिहा.’’
शिरवाडकर ‘होय’ म्हणाले, पण लहरी कलावंताला ते जमले नाही. पण ती हकिगत त्यांच्या अंतरंगात भिनली होती. पुढे त्यांनी तिच्यावर एक कादंबरी लिहिली!
आणखी एक महत्त्वाची आठवण. ‘छोडो हिंद’च्याच काळातली. एक दिवस रात्री अच्युतराव आमच्याकडे आले. रात्री साडेतीन वाजेपर्यंत नाना गोष्टींवर-वेदान्तासकट- आम्ही गप्पा मारीत बसलो. त्या साऱ्या काही मला आठवत नाहीत. पण एक आठवते.
अच्युतराव म्हणाले, “प्रत्येक चळवळीला एक मिथ् (Myth = कल्पजाल) असावे लागते. आमची ही भूमिगत चळवळ, तिचे नेतृत्व हे एक असेच मिथ् आहे.’’
अच्युतराव हे त्या आंदोलनाचे एक अस्सल प्रवर्तक पुढारी होते. पण त्यांची तिच्याविषयी ही अशी काहीशी अलिप्त वृत्ती. म्हणूनच ते राजकारणातून निवृत्त होऊ शकले.
.............................................................................................................................................
सी. डी. देशमुख
सी. डी. देशमुख हे विनोदासाठी प्रसिद्ध नाहीत. त्यांची भाषणे ऐकलेले लोक तर, ‘त्यांना विनोदाचे इंद्रियच नाही’ असा निष्कर्ष काढण्याचा संभव आहे.
पण मी त्यांचे एक विनोदाने काठोकाठ भरलेले भाषण ऐकलेले आहे. फ्रेड हॉईलचे सहकारी गणितज्ञ जयंत नारळीकर यांच्या दिल्लीच्या एका व्याख्यानाला सी. डी. अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी नारळीकरांच्या विषयातले दृष्टान्त घेऊन खूप हशा पिकवला होता.
त्यांचा एक विनोद आठवतो. (आठवतो म्हणजे आठवतो असे वाटते. याबाबतीत स्मरणशक्तीवर फार भिस्त टाकण्याची माझी तयारी नाही.) ‘एक्स्पांडिंग युनिव्हर्स’ म्हणजे प्रसरणशील विश्वाच्या कल्पनेचा आधार घेऊन ते म्हणाले होते- “या अशा सारख्या प्रसरण पावणाऱ्या विश्वात दरेक ‘शेजारी’ सारखा एकमेकांपासून दूर जात असतो, तशी या पृथ्वीवरची शेजारी राष्ट्रे जर एकमेकांपासून दूर गेली; तर आंतरराष्ट्रीय राजकारणातले किती तरी प्रश्न चटकन सुटतील, नाही?’’
मी आणि माझे मित्र सी.आर.एम.राव (‘चायना रिपोर्ट’चे संपादक) यांना ते एकदा आपल्या ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ची तयार होत असलेली नवी इमारत दाखवत होते. ही इमारत ‘लोदी गार्डन्स’ बगीच्याला अगदी लागून आहे. मधे फक्त एक दगडी कुंपण. इंडिया इंटरनॅशनल सेंटरची इमारत बांधणाऱ्या स्टाइननी मोठी कल्पकता लढवून या कुंपणाच्या बाजूने एक लांबट आकाराचा जलाशय, इमारत आणि कुंपणाची भिंत यांच्या दरम्यान ठेवून दिला आहे. ही प्रचंड इमारत आणि तो विस्तृत बगीचा यांच्यामधली ती भिंत फारशी ध्यानातच येत नाही आणि या जलाशयामुळे तर ती अधिकच लोपते व भिंतीपलीकडचा बगीचा सेंटरच्या इस्टेटीचाच भाग आहे असे वाटते!
मी असे देशमुखांना म्हटले, तेव्हा ते म्हणाले, “हो- हो, तसेच आहे. आता त्या बगीच्यात लोक फिरायला येतात; पण इथे असे अधून-मधून लोक आले तर आमची मुळीच ना नाही- वुई डोन्ट माइंड पीपल कमिंग हिअर वन्स इन ए व्हाईल, यू नो!’’
.............................................................................................................................................
जवाहरलाल नेहरू
आज इकडचा दिवस तिकडे उगवला! नेहरूंशी माझी मुलाखत अकरा वाजता ठरली होती आणि नेहरू मला अकरा वाजून वीस मिनिटांपर्यंत भेटू शकले नाहीत.
मी गेलो तेव्हा आत दुसरे लोक बसलेले असल्याचे सेक्रेटरीने सांगितले. ‘लोक’ बाहेर आले, तेव्हा त्यांच्याकडे पाहिले. कोणी फार महत्त्वाचे ‘दिसले’ नाहीत. आत गेलो. अतिशय व्यग्र! एक-दोन मिनिटे मी आल्याचे त्यांना समजलेच नाही. हे स्वागत मोठे विलक्षण होते. माझ्या कामाचे काय होणार न कळे!
दिल्लीला आम्ही टॉलस्टॉय- परिसंवाद १९६० मध्ये भरवला होता. त्यासाठी मुद्दाम एक समिती निर्माण केली होती. टॉलस्टॉयचे चरित्रकार अर्नेस्ट सिमन्ससारखे पाच परकीय पाहुणे बोलावले होते. आचार्य कृपलानी, दादा धर्माधिकारी, अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे एतद्देशीय विद्वान भाग घेणार होते. समितीचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण होते. परिसंवादाचे उद्घाटन नेहरूंनी करावे, अशी विनंती करण्यासाठी त्यांना मी भेटत होतो.
नेहरूंना सारी योजना सांगितली. सारा कार्यक्रम त्यांच्यासमोर ठेवला. कोण कोण उपस्थित राहणार आहेत, याची नामावली त्यांच्यासमोर मांडली. नेहरू ते सारे थंड वृत्तीने ऐकत होते. सारी माहिती ऐकून घेतल्यावर त्यांनी एकच प्रश्न विचारला, “या साऱ्याचा खर्च कोण करत आहे?’’
मी उत्तरलो, “काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम!’’
एवढे ऐकल्याबरोबर नेहरूंची चर्या बदलली. ते एकदम उद्गारले, “तुम्ही सारे शीतयुद्धखोर आहात!’’
नेहरूंना आमच्या संस्थेबद्दल प्रेम नाही, हे मला माहीत होते; पण तिचे नाव ऐकल्याबरोबर ते असे ‘बिघडतील’, अशी माझी अपेक्षा नव्हती.
मी गोंधळून गेलो. क्षणभर काय बोलावे, हेच समजेना. कसेबसे स्वत:ला सावरले आणि म्हटले, “सर, प्रत्येक संस्थेची किंमत तिच्या कार्यावरून करावी, हे योग्य नाही काय? आमच्या कार्यावरूनच आमची परीक्षा व्हावी, अशी अपेक्षा आम्ही करू नये काय?’’
त्याबरोबर नेहरू म्हणाले, “आय हॅव नो डाऊट दॅट यू हॅव डन सम एक्सलन्ट वर्क!’’ (तुम्ही काही फार चांगले कार्य केलेले आहे, याबद्दल मला शंका नाही.)
त्यांच्या आवाजात कौतुक वगैरे काही नव्हते, ठामपणा होता. दोन मिनिटांपूर्वी आमची निर्भर्त्सना करणारे नेहरू आता आपुलकीने नाही, तरी निश्चित स्वराने आमच्या कार्याची स्तुती करीत होते. ही वस्तुस्थिती स्तिमित करणारी होती! मी मनातल्या मनात म्हटले, असे हे नेहरू! माझ्या जीवात थोडा जीव आला.
पण नेहरू लगेच म्हणाले, “तुम्ही काही उत्तम कार्य केलेले असले, तरी तुम्ही सारे शीतयुद्धखोर आहात, याबद्दल मला शंका नाही.’’
मी काय बोलणार! पण बोलायला हवेच होते. मी म्हटले, “तुम्ही आमचे ‘एन्काऊंटर’ मासिक वाचत असाल, ते तुम्हाला शीतयुद्धखोर वाटते काय?’’
नेहरू ताड्कन उत्तरले, “आय हॅव नो टाइम फॉर जर्नल्स!’’ (मासिकेबिसिके वाचायला मला वेळ नाही.)
मी पुन्हा हतबद्ध झालो, पण बोलणे भाग होते. नेहरू आता उद्घाटनाला येणार नाहीत, हे स्पष्ट होते. पण नेहरूंचे चुकीचे आरोप मान्य करणे, हा माझा स्वभाव नव्हता. मी म्हटले, “सर, १९५० मध्ये आमची संस्था जन्माला आली, तेव्हा तिचे स्वरूप कडवे कम्युनिस्टविरोधी असेल, पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता परिस्थिती बदलली आणि आम्हीही बदललो आहोत.’’
“म्हणजे तुम्ही एकदा शीतयुद्धखोर होता, हे तुम्ही कबूल करता?’’ नेहरू थोडेसे विजयाच्या स्वरात म्हणाले.
“शीतयुद्धखोर नाही. कडवे कम्युनिस्टविरोधी!’’
“एकच!’’ - नेहरू.
मी पुन्हा अडखळलो. नेहरूंच्या कम्युनिस्टविरोधाच्या कडव्या विरोधाच्या गोळामारीला कसे तोंड द्यावे, हेच मला समजेना. मी कसेबसे म्हटले, “पण मी आपल्याला सांगितलेच की, आम्ही बदललो आहोत. आमचे नेतृत्वही काहीसे बदलले आहे. आमचे काही पुढारी आमची संस्था सोडून गेले आहेत.’’
माझ्या मनात जेम्स बर्नहॅम, आर्थर कोएस्लर वगैरे नावे होती. त्यावरून नेहरू पुन्हा कडक आवाजात म्हणाले, “मी तुमच्या संस्थेच्या पुढाऱ्यांना प्रत्यक्ष ओळखतो. दे कॅरी हेट इन देअर हार्ट्स.’’ (त्यांच्या अंत:करणात द्वेष आहे.)
“आपण जयप्रकाशांबद्दल असे म्हणू शकाल का?’’ मी विचारले.
या माझ्या प्रश्नाबरोबर नेहरू थबकले. दहा-वीस सेकंद थांबले. जे काही बोलायचे ते एकदम बोलवत नव्हते, असे काहीसे मला वाटले. थोडे थबकल्यावर नेहरू म्हणाले, “नाही, जयप्रकाश तसे नाहीत.’’
एवढे म्हटल्याबरोबर त्यांची बाजू थोडीशी खचली आहे, याची जाणीव मला झाली. मला एकदम हुरूप आला आणि मी म्हटले, “आमचे सारे पुढारी एकाच मापाने मोजता येतील, असे नाहीच मुळी. आमच्यात खूप मतभेद आहेत. प्रत्येकाचे राजकारण वेगळे आहे. आम्ही फक्त सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या एका उर्मीने एकत्र आलो आहोत. मी स्वत: इथे हिंदुस्तानात या संस्थेत अनेक मित्रांच्या बरोबर काम करतो. या साऱ्यांशी माझे राजकीयदृष्ट्या पटते असे नाही. कित्येकांशी माझे तीव्र मतभेद आहेत.’’
असे म्हणून मी थोडा थांबलो. नेहरूही स्वस्थ होते. मी पुन्हा म्हटले, “आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीचे सभासद घेतलेत, तर त्यातले निम्मे-अधिक समाजवादी आढळतील.’’
नेहरू लगेच म्हणाले, “तुमचा समारंभ केव्हा आहे?’’
मी दिवस सांगितला. त्याबरोबर त्यांनी चाव्यांचा जुडगा घेतला. त्यांच्यामागेच तिजोरी होती, ती उघडली. त्यातून डायरी काढली. उघडली. वाचली आणि म्हणाले, “ठीक आहे, मी येईन.’’
या मुलाखतीच्या- म्हणजे भांडणाच्याच- या अनपेक्षित अखेरीने मी हरखून गेलो. नेहरूंचा निरोप घेताना मी म्हटले, “सर, आपण आमच्या संस्थेबद्दल हा प्रश्न विचारलात, हे फार चांगले केलेत. त्यामुळे मला स्वत:बद्दल स्पष्टीकरण करण्यास संधी मिळाली.’’
“असे का म्हणता तुम्ही?’’ नेहरू म्हणाले, “मी काही तुमच्यावर व्यक्तिश: आरोप करीत नव्हतो.’’
मुलाखतीहून परत येताना नेहरूंचा हा प्रश्न माझ्या मनात घोळत होता. मी असे हे वैयक्तिक स्पष्टीकरण का दिले?
एक सोपे, चांगले, सुखावणारे उत्तर होते. मी माझ्या संस्थेशी एकरूप झालो होतो; पण ते पटले नाही. बऱ्याच वेळाने वाटले, ‘नाही, हा नेहरूंच्या-माझ्या वैयक्तिक संबंधांचा प्रश्न आहे.’
नेहरूंचे- माझे वैयक्तिक संबंध- असे वैयक्तिक संबंध होतेच कुठे? कधी? आज नेहरूंना आयुष्यात प्रथम भेटत होतो आणि बहुधा अशी ही वैयक्तिक भेट अखेरचीच. मग मी हे वैयक्तिक स्पष्टीकरण का केले? याचे उत्तर अबोध, ‘अंतर: कोऽपि हेतु:’ पद्धतीचे आहे. ते नीट सांगता येणार नाही. सांगितले तरी पटणार नाही.
एकच गोष्ट सांगतो- नेहरू वारले त्या दिवशी मला स्वप्न पडले- माझ्या वडिलांच्या मृत्यूचे!
आमच्या पिढीच्या लोकांचे नेहरूंशी असेच संबंध होते. त्यासाठी त्यांच्याशी वैयक्तिक परिचय होण्याची काही गरज नव्हती. ते आमच्या प्रत्येकाच्या पितृस्थानी होते. जितके दिवस राजकारण (वृत्तपत्रीय) केले, तितके दिवस नेहरूंशी भांडलो; पण लहान मुलांना बापाबद्दल जसा धाक वाटतो, तसा नेहरूंबद्दल वाटे.
याचा प्रत्यय दिल्लीला वारंवार आला. ‘तीन मूर्ती’ भवनवरून जाताना छाती धडधडे. आपण काही तरी अपराध केलेला आहे, याची जाणीव होई. नेहरू गेले आणि हा धाक संपला. त्यानंतर ‘तीन मूर्ती’वरून छाती न धडधडता अनेकदा गेलो.
.............................................................................................................................................
जयप्रकाश नारायण
जयप्रकाश नारायण विनोदबुद्धीबद्दल फारसे प्रसिद्ध नाहीत. त्यांच्या प्रकृतीत बालत्वाची द्रव्येच अधिक आहेत.
याची एक गोष्ट सांगतो. फार पूर्वीची आहे.
जयप्रकाशांना संध्याकाळी फिरायला जाणे फार आवडे. फिरायला जाताना ते हातात काठी घेऊन जात. साधारणपणे साडेपाच-सहाला ते फिरायला जायला निघत. पण एक दिवस चार-साडेचारपासूनच फिरायला जायचे वेध त्यांना लागले.
दर दहा-पाच मिनिटांनी ते प्रभावतीबाईंना म्हणत, “प्रभा, आज फिरायला नाही का जायचं? पण तुझी तर अद्याप काहीच तयारी दिसत नाही!’’
कारण?
कारण त्या दिवशी त्यांना एका मित्राने एक फिरायची काठी बक्षीस दिली होती, ती त्यांना फार आवडली होती आणि ती घेऊन केव्हा एकदा फिरायला निघतो, असे त्यांना झाले होते.
एकदा आम्ही दिल्लीत एका रस्त्याने चाललो होतो. तितक्यात एक सरदारजी आमच्या शेजारून सायकलवरून गेला. एकटाच नव्हे- सायकलवर त्याच्यापुढे एक मूल होते, मागे बायको एक मूल घेऊन बसली होती. त्याच्या डोक्यावर एक खाट होती आणि त्या खाटेवर एक बोजा होता!
त्याला पाहून जयप्रकाश म्हणाले, “आमचे सरकार निरनिराळ्या खेळांत नाना विक्रम करणाऱ्यांना बक्षिसे देते, पण या अशा लोकांना बक्षीस देण्याचे काही त्यांच्या मनात येत नाही. लोकांकडे सरकारचे लक्ष नाही, हेच खरे!’’
.............................................................................................................................................
पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा-
https://www.booksnama.com/book/4624/Asehi-Vidwan
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 07 December 2018
आयशप्पत, मस्त टाईमपास आठवणी आहेत. -गामा पैलवान