‘माधुरी’ : नायिकेचं वय न विचारता हा चित्रपट पाहायला हरकत नाही
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘माधुरी’चं पोस्टर
  • Sat , 01 December 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie माधुरी Madhuri सोनाली कुलकर्णी Sonali Kulkarni शरद केळकर Sharad Kelkar संहिता जोशी Sanhita Joshi

कुटुंबातील नातेसंबंधांचे वेगवेगळे पदर असतात. अनेक वेळा स्वतःला आलेल्या अनुभवातून शहाणं होऊन किंवा खबरदारी म्हणून कुटुंबातील आपल्या जवळच्या व्यक्तीला वागवलं जातं. परंतु जर त्या व्यक्तीला ‘त्या’ अनुभवांची जाणीव नसेल तर मग ती ‘वागणूक’ त्याला अन्यायी वाटू लागते आणि मग साहजिकच नातेसंबंधांत दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा ‘पिढीतील अंतर’ हेदेखील त्याला कारणीभूत असू शकतं.

‘माधुरी’ या नवीन मराठी चित्रपटात अशाच एका दुरावा निर्माण झालेल्या मात्र नंतर एकमेकींची खरी ओळख पटलेल्या मायलेकींची आगळीवेगळी कथा सांगण्यात आली आहे. चित्रपटाच्या शीर्षकाखाली ‘... वय विचारू नका’ अशी टॅगलाईन आहे. अर्थात ती कथेची उत्सुकता सांगण्यासाठी टाकण्यात आली असली तरी त्यातून किंचित कथाबोध होऊ शकतो, पण कथेचं मर्म कळण्यासाठी चित्रपट पाहणं आवश्यक आहे. या चित्रपटाची निर्मिती उर्मिला मातोंडकरनं केली असून दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केलं आहे. 

या चित्रपटात पाहायला मिळते ती माधुरी प्रधान या महिलेची कथा. पाचगणीत एका शाळेत शिक्षिका असलेली माधुरी आपल्या विशीतील काव्या या तरुण मुलीबरोबर राहत असते. मात्र दोघींचं एकमेकींशी फार पटत नाही. कारण एकच ‘पिढीतील अंतर’. तिच्या कडक शिस्तीमुळे आपल्या प्रत्येक गोष्टीत माधुरी हस्तक्षेप करते असा काव्याचा आक्षेप असतो. त्यामुळे घरात दोघींमध्ये नेहमीच ताणतणावाचं नातं निर्माण होतं. स्वावलंबी होऊ पाहणारी काव्या एके दिवशी माधुरीला न सांगताच रात्रभर घराबाहेर राहते. त्यामुळे अस्वस्थ झालेली माधुरी डिप्रेशनसाठी असलेल्या गोळ्या अधिक प्रमाणात घेते आणि कोमात जाते. मात्र कोमातून बाहेर आल्यानंतर तिला ‘रेट्रोगेड अम्नेशिया’ नावाचा आजार बळावतो. म्हणजे ठराविक काळाचा स्मृतीभंश तिला होतो. तिची स्मरणशक्ती वीस वर्षांनी मागे जाते आणि त्यामुळे अर्थातच ती स्वतःला वीस वर्षांची समजायला लागते. काव्यालाही ती स्वतःची मुलगी म्हणून ओळखत नाही. त्यामुळे आईबद्दल आधीच चांगलं मत नसलेली काव्या आईच्या या नव्या आजारपणामुळे आणखी वैतागते. मात्र माधुरीवर उपचार करण्यासाठी आलेला डॉ. तुषार हा मानसोपचारतज्ज्ञ तुझ्यामुळेच ती पूर्ववत होईल असं काव्याला समजावून सांगतो आणि त्याप्रमाणे काव्या प्रयत्न करू लागते. तिच्या या प्रयत्नांना कसं फळ मिळतं, त्यासाठी हा चित्रपट पडद्यावर पाहणं आधी चांगलं ठरेल.  

खरं तर पिढीपिढीतील अंतर कमी झालं तर नात्यातील दुरावा आपोआपच कमी होईल. म्हणजे मुलगी आई झाली तर आणि आई मुलगी झाली तरी दोघींना एकमेकींना समजून घेणं किती सोपं होईल ही या चित्रपटामागची संकल्पना खूपच छान आहे. मात्र संकल्पना खूप चांगली असली म्हणून चित्रपट लगेच चांगला ठरत नाही. त्यासाठी सादरीकरणही तसं लागतं. चित्रपटाच्या सुरुवातीलाच माधुरी आणि काव्याच्या नातेसंबंधातील ‘दरार’ पाहायला मिळतं, परंतु ती का, याचं उत्तर लगेच मिळत नाही. त्यासाठी माधुरीची पार्श्वभूमी तिच्या वाट्याला आलेल्या निवडक प्रसंगांनी सांगितली असती तर कथेचा प्रभाव वाढायला मदत झाली असती. माधुरीच्या गतजीवनाचा पट उलगडतो तो फक्त वरवरच्या सांगण्यातून. आजूबाजूची पात्रं सारखी बोलत असतात. त्यातून माधुरीचा गतजीवनाचा इतिहास कळतो खरा, मात्र तो अपूर्णच असल्याची जाणीव सतत होते. माधुरीच्या जीवनात आलेला शेखर (सुबोध भावे) हा तिचा प्रियकर पडद्यावर थोडा वेळ पाहायला मिळतो. आणि त्याला माधुरीशी लग्न करायचं असतानाही केवळ आई-बाबाच्या सांगण्यावरून माधुरी कमलेशशी (हाही थोडा वेळच पडद्यावर दाखवण्यात आला आहे. मात्र त्यामुळे बऱ्याच दिवसांनी मिलिंद गवळीचं मोठ्या पडद्यावर दर्शन होतं हेही नसे थोडकं) का लग्न करते, याचाही स्पष्ट उलगडा होत नाही. त्यासाठी पटकथा अधिक बंदिस्त असण्याची गरज होती.   

चित्रपटाची कथा अर्थातच माय-लेकींची आहे. त्यामुळे माधुरी-काव्याचे काही भावपूर्ण प्रसंग छान जमले आहेत. रोहन आणि अमर हे काव्याचे दोन बॉयफ्रेंड पडद्यावर दिसतात. त्यातील अमरच्या संवादातून हलक्याफुलक्या वातावरणाची निर्मिती चांगल्या प्रकारे करण्यात आली  आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली सगळी गाणी गद्यकाव्यं आहेत आणि त्याला संगीतही तसंच दिल्याने ती रुक्ष वाटतात. 

कलाकारांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सोनाली कुलकर्णीनं माधुरीची भूमिका प्रभावीपणे वठवली आहे. ‘विशी’तील माधुरीही तिनं तेवढ्याच तडफेनं रंगवली आहे. तिच्या अभिनयामुळेच हा चित्रपट तरला आहे असं म्हणावं लागेल. काव्याच्या भूमिकेतील संहिता जोशीनंही  पहिल्याच पदार्पणात आश्वासक काम केलं आहे. शरद केळकरनंही आपल्या आवाजासारखीच तगडी भूमिका केली आहे, मात्र तो मानसोपचारतज्ज्ञ वाटत नाही. विराजस कुलकर्णी (अमर), आणि अक्षय केळकर (रोहन) यांचीही कामं चांगली झाली आहेत. मात्र दोघांच्याही व्यक्तिरेखा आणखी विकसित करण्याची गरज होती. 
थोडक्यात ‘माधुरी’चं वय न विचारता हा चित्रपट पाहायला हरकत नाही. कारण काळानुसार बदलत जाणाऱ्या नातेसंबंधाबाबतची संकल्पना खूप चांगली आहे.     

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.

shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................