ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णविषयक दुर्बोध व बोधप्रद उपपत्ती
पडघम - सांस्कृतिक
विजय बाणकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 23 November 2018
  • पडघम सांस्कृतिक विजय बाणकर Vijay Bankar ब्राह्मण Brahmins क्षत्रिय Kshatriya s वैश्य Vaishya शूद्र Shudras वर्णव्यवस्था Varnvyvastha

मानव-समाजाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार विभाग म्हणजे चार वर्ण. या चार वर्णांच्या मानवांच्या उत्पत्तीबाबत विविध उपपत्ती सांगितल्या गेल्या आहेत. उदा. श्रीकृष्णाने म्हणजे स्वत: देवानेच आधी गीतेत आपण ‘गुणकर्म विभागानुसार चातुर्वर्ण्य’ निर्माण केल्याचे व नंतर भागवतात देवाच्या ‘मुखादींपासून ब्राह्मणादी निर्माण झाले’ असल्याचे म्हटले आहे. अर्थात स्वत: देवानेच वर्णोत्पत्तीबाबत दोन वेगवेगळ्या उपपत्ती सांगितल्या आहेत. या दोन उपपत्तींचा व अन्य ग्रंथांमध्ये असलेल्या विविध उपपत्तींचा सुसंगत अर्थ लावता येत नसल्याने त्या दुर्बोध असल्याचे वाटत राहते.

ऋग्वेदातील पुरुषसूक्तात व संत श्रीएकनाथांनीही परमेश्वराच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र निर्माण झाले, असे म्हटले आहे. याहून वेगवेगळी असलेली वर्णने इतर ग्रंथांमध्ये आहेत. त्यामुळेही ही व इतर अनेक उपपत्तीदेखील दुर्बोध वाटू लागतात. ते कसे ते पाहूयात

१) उपनिषदातील (वेदान्तातील) वेगळे वर्णन

उपनिषदे म्हणजे वेदान्त. ‘ऐतरेय’ उपनिषदात, ‘पुरुष जेव्हा आपला रेतोरूप गर्भ ऋतूमती भार्येच्या ठिकाणी शिंपतो, तेव्हा पिता त्या रेतोरूप गर्भाला प्रथम जन्म देतो. नंतर आईच्या उदरातून बाहेर येणे हा संसारी जीवाचा दुसरा जन्म होय’, असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे (वर्णविषयक उपपत्ती सांगणारे) श्रीकृष्ण मातेच्या पोटातूनच जन्मले होते, असे संत श्रीनामदेवांनी म्हटले आहे. म्हणूनच, देवशरीराच्या चार भागांपासून चार वर्ण निर्माण झाले म्हणजे नेमके काय, ते समजून घेणे अवघड होते.

२) ‘मनुस्मृती’तील वेगळे वर्णन

‘मनुस्मृती’तही ‘आधी’ देवशरिराच्या चार भागांपासून चार वर्ण झाल्याचे म्हटले आहे; पण, ‘नंतर’च्या सविस्तर सृष्टीनिर्मिती वर्णनात मानव हे सिंह, हरिण, लांडगा यांच्याप्रमाणे मैथुनधर्मातून म्हणजे नरमादीसंबंधातून जारजयोनीत जन्मणारे प्राणी होत, असे म्हटले आहे.

देवशरीरापासून झालेले चार वर्ण व नरमादीसंबंधातून जन्मणारे मानव हे एकरूप नाहीत, असे मनुने सांगितले नाही काय?

.............................................................................................................................................

‘विषमतेचा पूरस्कर्ता मनू’ या डॉ. प्रदीप गोखले यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

३) आणखी एका उपनिषदातील वेगळे वर्णन

बृहदारण्यक उपनिषदात आदि स्त्री व आदिपुरुष म्हणजे शतरूपा व मनु या दोघांच्या मिथुनातून माणसे जन्मली, असे वर्णन आहे.

सर्व मानवांच्या निर्मितीचे हे वर्णन उपरोक्त ऐतरेय उपनिषदातील वर्णनाशी जुळणारे आहे व म्हणून वास्तविक वाटते.

४) महाभारतातील आणखी वेगळे वर्णन 

ऋग्वेदापासून वैश्य, यजुर्वेदापासून क्षत्रिय आणि सामवेदापासून ब्राह्मण जन्मले, असे महाभारताच्या शांतिपर्वात म्हटले आहे. तीन वेदांपासून तीन वर्णांचे मानव जन्मले, हे वाक्य विलक्षण गूढ आहे. कारण, त्यामुळे ‘ज्या’ वेदांपासून मानव जन्मले ‘त्या’ वेदांचे स्वरूप काय, हा प्रश्न पडतो.

५) विष्णुपुराण व सिद्धान्तबोध या ग्रंथातील आणखी वेगळे वर्णन

चतुर्मुख ब्रह्मदेवाने आपल्या अनुक्रमे पूर्व, दक्षिण, पश्चिम व उत्तर बाजूच्या मुखातून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांना निर्माण केले, असे ‘विष्णुपुराणात’ व ‘सिद्धान्तबोधा’त म्हटले आहे

या दोन ग्रंथांमधील हे विधान व महाभारतातील पूर्वोक्त विधान ही दोन्ही विधाने एकत्रित विचारात घेता ‘अथर्ववेदापासून शूद्र जन्मले’, हे विधान करणे योग्य ठरेल, असे वाटते. ब्रह्मदेवाच्या मुखांमधून निर्माण झालेल्या चारपैकी फक्त तीनच वेदांतून तीन वर्ण निर्माण झाले, हे स्वीकारायचे आणि शूद्रनिर्मितीचे स्थान म्हणून ब्रह्मदेवाच्या उत्तर बाजूच्या मुखातून म्हणजे अथर्ववेदापासून शूद्र निर्माण झाले, हे मात्र का उल्लेखायचे नाही ते समजत नाही.

ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे तिन्ही वर्ण देवाच्या मुखातूनच जन्मले म्हणून समान ठरतात.         

महाभारतात पूर्वदिशेचे माहात्म्य वर्णिले आहे. त्यानुसार जर पूर्वही सर्वश्रेष्ठ दिशा असेल तर देवाच्या पूर्व बाजूच्या मुखातून जन्मलेले ‘वैश्य’ हे सर्वश्रेष्ठ ठरतील आणि त्याच्या खालच्या पायऱ्यांवर असतील अनुक्रमे शूद्र, ब्राह्मण व क्षत्रिय. अर्थात, वर्णवर्चस्वश्रेणीबाबत प्रश्न निर्माण होतो.

६) यजुर्वेदात असलेले आणखी वेगळे वर्णन

प्रजापतीने ब्राह्मणाचा वर्ण प्राण, अपान व व्यान ह्या वायूंपासून केला. दहा बोटे, दोन हात, दंड व बेंबीचा वरील भाग ह्यातून क्षत्रियाचा वर्ण निर्माण केला. नऊ प्राण व हाताची दहा अंगुले ह्यांपासून वैश्य-शूद्रांना निर्माण केले, असे यजुर्वेदात म्हटले आहे.

ऋग्वेदात शूद्र हे देवाच्या पायांपासून निर्माण झाले, असे म्हटले आहे; तर यजुर्वेदात शूद्र हे प्रजापतीचे नऊ प्राण व हाताची दहा बोटे यांच्यापासून निर्माण झाले, असे म्हटले आहे. म्हणजे, शूद्र देवाच्या पायांपासून निर्माण झाले, असे यजुर्वेदात म्हटलेले नाही. अर्थात, दोन वेदांमध्ये वर्णोत्पत्तीबाबत वेगवेगळी विधाने आहेत. यापैकी कोणत्या वेदातले कोणते विधान स्वीकारार्ह आहे, हे कसे निश्चित करायचे?

यजुर्वेदातील सदर वर्णनातून शूद्र, वैश्य व क्षत्रिय यांच्या निर्मितीसाठी प्रजापतीची दहा बोटे उपयोगात आली असल्याने त्यांच्यात साम्य आहे, असे सूचित होते. या वर्णनातून पुढील प्रश्नही निर्माण होतात - वैश्यनिर्मितीसाठी दहापैकी जे नऊ प्राण लागले ते कोणते? क्षत्रिय-निर्मितीत एकही प्राण खर्ची पडला नाही काय? योगशास्त्रानुसार अपानवायू मलमूत्रविसर्जनाचे कार्य करतो. व्यान-नामक प्राण सर्व नाड्यात असतो. प्राण हा ‘श्वासोच्छ्वास येरझार’ करीत असतो. म्हणून, प्राण, अपान व व्यान या वायूंपासून ब्राह्मण वर्ण निर्माण झाला, हे विधान ‘परमेश्वराच्या मुखापासून ब्राह्मण वर्ण निर्माण झाला’, या विधानास छेद देत नाही काय?

.............................................................................................................................................

‘शुद्र पूर्वी कोण होते?’ या डॉ. आंबेडकरांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

७) ‘शतपथ ब्राह्मण’मधील वेगळे वर्णन

ब्राह्मण ब्रह्मापासून, क्षत्रिय तेजापासून, वैश्य मरुद्गणांपासून व शूद्र हे कष्टापासून निर्माण झाले, असे ‘शतपथ ब्राह्मण’मध्ये म्हटले आहे.

ब्राह्मण ब्रह्मापासून निर्माण होतात हे जितके खरे आहे तितकेच इतर मानवदेखील ‘ब्रह्मांशच’ आहेत, हेही खरे आहे. कारण, देवानेच जीव ब्रह्माचे अंश असल्याचे ‘गीतेत’ म्हटले आहे. अर्थात, ब्राह्मणेतर तिन्ही वर्णही ब्रह्मापासून निर्माण झाले, असे स्वीकारणे क्रमप्राप्त ठरते.

तथापि, ‘शतपथ ब्राह्मण’मधील हे वर्णन चार वर्णांचे वेगवेगळेपण सूचित करते, असे गृहीत धरून त्याचा अर्थ लावता येतो. उदा. क्षत्रिय तेजापासून निर्माण होतात, याचा अर्थ असा : तेज म्हणजे पराक्रम. पराक्रमी, शूर, लढवय्ये वगैरे असण्यासाठी तेजाची गरज असते. या अर्थाने क्षत्रिय व्यक्ती ‘तेजप्रधान’ असते.

परंतु, सदर वर्णनातील, मरुद्गणांपासून वैश्य निर्माण होतात, हे विधान समजून घेणे मात्र अवघड आहे. कारण, यापूर्वी जसे वेदांपासून वर्ण जन्मले हे समजून घेण्यासाठी त्या वेदांचे स्वरूप समजून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे, तसेच इथे मरुद्गण म्हणजे नेमके काय, ते समजून घेणे आवश्यक होय. 

८) ऋग्वेदातील वर्णाधारित वर्णवर्णन

ब्राह्मणाचा पांढरा, क्षत्रियाचा तांबडा, वैश्राचा पिवळा व शूद्राचा काळा वर्ण म्हणजे रंग असल्याचे ऋग्वेदात म्हटले आहे.

या विधानाचा वाच्यांश घ्यावयाचा नसून त्याचा लक्ष्यांश ग्रहण करावयाचा आहे, असा मार्गदर्शक विचार भारताचार्य चिं. वि. वैद्य यांनी मांडला आहे. ते म्हणतात, की वर्णविषयकही उपपत्ती सत्त्वरजतमगुणावर लावली आहे. सत्त्वगुणाचा रंग पांढरा असतो व तमाचा रंग काळा असतो. रज व तम यांच्या मिलाफाचा रंग पिवळा असतो. सत्त्वरजतमांच्या काल्पनिक रंगांवरून वर्णाची कल्पना केली आहे; तथापि, त्यात स्वभावभेद हा मुद्दा सुटलेला नाही. ब्राह्मण सत्त्वशील असतात, शूद्र तमोयुक्त असतात तर क्षत्रिय रजोयुक्त असतात, इत्यादि वर्णनात वर्णांच्या स्वभावभेदाचे अस्तित्व मान्य केले आहे.

या मताधारे, ऋग्वेदातील सदर विधानाचा अर्थ स्पष्ट करणे शक्य आहे. तो असा - रंगविषयक आवडीवरून स्वभावकल सूचित होतो. ब्राह्मण आत्मज्ञानाचा उपासक असतो. आत्मज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश असतो. म्हणून ब्राह्मणाचा वर्ण पांढरा मानला आहे. शौर्य, धाडस, बळ यांचा संबंध रक्ताशी आहे. रक्त तांबडे म्हणून क्षत्रियाचा रंग तांबडा. सुवर्ण म्हणजे संपत्ती व सुवर्णाचा क्रयविक्रय करणारे ते सुवर्णाचे उपासक. सोन्याचा रंग पिवळा म्हणून वैश्याचा वर्ण पिवळा. मतिमंद लोकांच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधार असतो. अंधाराचा रंग काळा म्हणून शूद्राचा रंग काळा.

या वर्णनामुळे उदा. कोणत्याही वर्णातील ज्ञानवान माणूस ब्राह्मण, व्यापार-उद्योग करणारे कोणत्याही वर्णाचे मानव वैश्य व कोणत्याही वर्णाचे कर्मचारी शूद्र असतात व आहेत, हे वास्तव लक्षात येते. तसेच, यातून एकाच कुटुंबात चारही वर्णांचे मानव असू शकतील, असेही अनुमानित होते.

साने गुरुजींनी वर्णव्यवस्थेचा श्रमविभागणीचे तत्त्व म्हणून विचार केला आहे. त्यांनी केलेल्या विश्लेषणाचा धागा पकडून भारतीय हिंदु मानवांचे ‘गुणकर्मविभागश:’ स्थूल वर्गीकरण करणे शक्य आहे, ते असे -

ब्राह्मण : धर्मोपदेशक, शिक्षक, लेखक, कवी, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ इत्यादी

क्षत्रिय : आमदार, खासदार, मंत्री, न्यायाधीश, वकील, सैनिक, पोलीस इत्यादी

वैश्य : शेतकरी, व्यापारी, उद्योगपती, व्यवस्थापक, बँकर्स इत्यादी

शूद्र : कामगार, नोकर-चाकर, मोलमजुरी करणारे, अतिशय कष्टाची कामे करणारे इत्यादी.

‘गीतातत्त्वविवेक’ या ग्रंथातही ‘वर्ण-विश्लेषण केले आहे. लेखक श्री. देसाई यांच्या मते, कृष्णवर्णी, पीतवर्णी, श्वेतवर्णी व रक्तवर्णी अशा वंशाचे लोक आजही पृथ्वीवर आहेत. रंग (पिगमेंट) जसा स्थूलात (कातडीचा) आढळतो, तसा तो सूक्ष्मातही आढळतो. व्यक्तिभोवती असलेले तेजोवलय योग्याला दिसते. माणसांच्या भोवती भिन्न भिन्न रंगछटांनी रुक्त असलेल्या तेजोवलयानुसार माणसांच्या या गटांना वर्ण असे सार्थ नामाभिधान द्रष्ट्यांनी दिले असण्याची शक्यता आहे. हे तेजोवलय दृश्य झाल्यास व त्यातील रंगछटांचे शास्त्रीय ज्ञान झाल्यास माणसांचे ब्राह्मणादि वर्ण निश्चित करता येतील.

.............................................................................................................................................

‘विषमतेचा पूरस्कर्ता मनू’ या डॉ. प्रदीप गोखले यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

९) चार विकासावस्था = चार वर्ण

मानव-विकासाच्या चार अवस्था याच चार वर्ण असल्याचेही वर्णिले गेले आहे. शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था संपेपर्यंत व्यक्ती शूद्र असते. शूद्रावस्थेनंतर वयाच्या ४०व्या वर्षापर्यंत वैश्य, त्यानंतर ६०व्या वर्षापर्यंत क्षत्रिय आणि ६०व्या वर्षानंतर ती ब्राह्मण असते.

बाल्य, तारुण्य, प्रौढावस्था व वृद्धावस्था या चार अवस्था (कालखंड) म्हणजे अनुक्रमे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम होत. यावरून, वर्ण व आश्रम या समानार्थी संकल्पना आहेत, असे सूचित होते.

शैशवावस्थेत, बाल्यावस्थेत व किशोरावस्थेत असलेली व्यक्ती आज्ञाधारक, नम्र व सेवाभावी असते. तिचा अद्याप विकास व्हावयाचा असतो. ही ‘शूद्र’ लक्षणे होत. या शूद्रावस्थेनंतरच्या वयाच्या ४०व्या वर्षापर्यंतचा कालखंड धनार्जनात, विविध शारीरिक-मानसिक सुखे उपभोगण्यात, गृहस्थाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यतीत होतो. व्यापार-उद्योग करणाऱ्या ‘वैश्या’प्रमाणे गृहस्थाश्रमी व्यक्ती व्यग्र‘, उद्योगरत वा व्यस्त असते, म्हणजे ‘वैश्य’ असते. यानंतरच्या ‘क्षत्रिया’वस्थेत व्यक्तीच्या जबाबदाऱ्या व शक्ती यांचा व्यापक विकास होतो. ती स्वतःच्यापेक्षा, घरच्यांच्यापेक्षा सामाजिक, राष्ट्रीय कारभाराकडे आकृष्ट होते. राज्यकारभारात लक्ष घालणे, त्यात सहभागी होणे, देशसेवा करणे, कुटुंबाबरोबरच समाजाच्या सुरक्षिततेची वा सुव्यवस्थेची काळजी वाहणे, यात ती रममाण होते. म्हणून या अवस्थेतील व्यक्ती क्षत्रिय असते. ६०व्या वर्षानंतर वृद्धावस्था म्हणजे ब्राह्मणावस्था सुरू होते. वृद्धावस्थेत भौतिक संपत्तीचे, शारीरिक-मानसिक उपभोगांविषयीचे आकर्षण कमी झालेले असते. अनेक वर्षांच्या अनुभवसमृद्धीमुळे सल्ला देणे, मार्गदर्शन करणे, जीवनावर भाष्य करणे, यासारखी कामे व्यक्ती कळतनकळत  करू लागते.

वृद्धावस्थेतील शूद्रही पूज्य (= ब्राह्मणासम) असतो, असे मनुनेही म्हटले आहे. अनुभवसंपन्नता हे त्यामागील कारण होय.

हे वर्णन विश्वातील सर्व मानवांना लागू पडते. म्हणजे, सर्व मानव चारही वर्णांचे असतात, असू शकतात.

१०) कृतयुगात एकच शुद्ध हंसवर्ण होता

कृतयुगात सर्व मानवांचा एकच शुद्ध हंसवर्ण होता. चार वर्ण नव्हते. नंतरच्या त्रेतायुगारंभी वैराजपुरुषोत्तमाच्या निःश्वासातून सत्त्वरजतमगुणयुक्त कर्म प्रगटले. त्याच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य व चरणीं शूद्र जन्मले, असे श्रीएकनाथांनी ‘भागवतात’ म्हटले आहे.

श्रीकृष्णाने आधी ‘गीता’ आणि नंतर ‘भागवत’ सांगितले. मी ‘गुणकर्मविभागशः चातुर्वर्ण्य’ निर्माण केल्याचे ‘गीतेत’ सांगणाऱ्या श्रीकृष्णानेच चार वर्णांचे दिव्यजन्म ‘भागवतात’ उल्लेखिले आहेत. असे का, हा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होतो. गीता-ज्ञानेश्वरी व श्रीएकनाथी भागवत या दोन्ही ग्रंथांमध्ये चारी वर्णांचे गुण व कर्म यांचा सविस्तर विचार केला आहे. म्हणूनच देवाने आपल्या शरीरापासून निर्माण केलेले चार वर्ण व देवानेच गुणकर्मविभागानुसार निर्माण केलेले चार वर्ण या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत की नाहीत, याची साधार तपशीलयुक्त खात्री करून घ्यावी लागेल. 

गीता-ज्ञानेश्वरीत अश्वत्थ वृक्षाचे वर्णन आहे. या वृक्षाच्या जारज खाणीरूपी फांदीवर मनुष्यरूपी शाखा वाढते व तिच्या मध्यभागीच चार वर्णांच्या चार फांद्या फुटतात. जारज, स्वेदज, अंडज व उद्भिज अशा चार जीवखाणी आहेत. मानव हे जारज म्हणजे मादीच्या गर्भाशयातून जन्मणारे प्राणी आहेत, असे सदर अश्वत्थ वृक्ष-वर्णनात स्पष्ट होते. म्हणून वैराजपुरुषाच्या (देवाच्या) चार भागांपासून जन्मणारे चार वर्ण व जारज खाणीत जन्मणारे सर्व मानव हे दोन्ही एकच आहेत की नाहीत, असा प्रश्न विचारणे सयुक्तिक ठरते. म्हणूनच, ‘गीता’ व ‘भागवत’ यांच्यातील तसेच ‘ज्ञानेश्वरी’ व ‘श्रीएकनाथी भागवत’ यांच्यातील चौवर्णवर्णनांचा सुसंगत अर्थ शोधून घेणे आवश्यक ठरते.

.............................................................................................................................................

‘शुद्र पूर्वी कोण होते?’ या डॉ. आंबेडकरांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

११) ब्राह्मणच नंतर निरनिराळ्या वर्णाचे झाले

महाभारतात तो अर्थ शोधला आहे, असे मला वाटते. पूर्वी एकाच जातीचे असलेले मानव नंतर निरनिराळे वर्ण बनले. त्याबाबत भृगु ऋषी म्हणतात, “सर्व मानव प्रथम ब्राह्मणच होते. पण, कर्माच्या अनुरोधाने त्यास वर्णाचे स्वरूप आले. ब्राह्मणांपैकी जे रजोगुणी होते ते विषयोपभोगाची प्रीती, कोपिष्टपणा, साहस कर्माची आवड यामुळे क्षत्रिय झाले. रज व तम यांच्या मिश्रणामुळे जे ब्राह्मण पशुपालन व कृषी करू लागले ते वैश्य बनले आणि जे तमोगुणी असल्यामुळे हिंसा व असत्य यावर आसक्त झाले आणि हव्या त्या कर्मावर उपजीविका करू लागले ते शूद्र झाले.”

पण, अगोदर जे ब्राह्मण वा सत्त्वगुणी होते त्यांच्यातलेच काही रजोगुणीही होते, काहींच्या ठिकाणी रज व तम हे गुणही होते किंवा त्यांच्या ठिकाणी रज व तम हे गुण विकसित झाले, हे समजून घेणे अवघड आहे. कारण, मग त्या ब्राह्मण-मानवांच्यातच क्षत्रियत्व, वैश्यत्व व शूद्रत्वही अगोदरपासूनच होते, असे होत नाही का! आजकालही सर्व मानवांच्यात ब्राह्मणत्व, क्षत्रियत्व, वैश्यत्व व शूद्रत्व आहे, ही वस्तुस्थिती नाही काय?

१२) समाजाच्या चार गरजा पूर्ण करणारे चार वर्ण

पृथ्वीवर पूर्वी कृतयुगी एकवर्णी मानव होते. नंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे कर्माचरणी व त्रिगुणात्मक स्वभावाचे मानव विकसित झाले, असे सूचित करणारे एक सूक्तसमुच्चय बृहदारण्यक उपनिषदामध्येदेखील आहे. त्याचा अर्थ वर्णविकास व सुसंघटित समाजाचा विकास समजून घेण्याच्या दृष्टीने (कै.) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लावला आहे.

मानवी समाजाच्या ढोबळमानाने ज्ञान, संरक्षण, शेती-व्यापार व कष्टसेवा या चार गरजा होत. यांची पूर्तता करणारे म्हणून चार वर्ण निर्माण झाले. प्रथम ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य व तद्नंतर शूद्र आणि शेवटी या सर्वांच्या व्यक्तिहितासाठी व सामाजिक सुस्थिरतेसाठी नियमन करणारा ‘धर्म’ असे निर्माण झाले, असे ते सूक्तसमुच्चय वाचताना वाटत असले तरी हे वर्णन म्हणजे समाजपुरुषाचे स्वरूप समजून घेणाऱ्या माणसाचा वैचारिक प्रवास आहे.

ज्ञान, संरक्षण, शेतीव्यापार व कष्ट या चार व्यापक विभागांतर्गत समाविष्ट होणारी विविध कर्मे ज्या समाजात धर्मानुसार म्हणजे न्यायानुसार होतात, तोच समाज सत्ययुक्त राहू शकतो, त्यातील मानवांना सुरक्षितता वाटू शकते, असे या वर्णनात अनुस्यूत आहे. हे बुद्धिगम्य व समर्थनीयही आहे. हे वर्णन विश्वातील सर्व मानवी समाजांना लागू पडणारे आहे.

१३) अंतरालवर्ण ही कल्पना पुरुषसूक्तातील विधानाला छेद देते

शूद्रादि चार वर्ण हे ब्रह्मदेवाने निर्माण केले व ते वर्ण भारतीय मूळ मानवगण आहेत, हे काल्पनिक गृहीतक आहे, असे (कै.) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात. त्यांच्या मते, या गृहीतकाच्या आधारावरच प्राचीन काळी धर्मशास्त्र निर्माण झाले. या चार वर्णांच्या बाहेरचे वा भारताबाहेरचे जे जे मानवगण मनु, गौतम, वसिष्ठ इत्यादि धर्मशास्त्रकारांना दिसले त्यांना त्यांनी ‘बाह्य’ अशी संज्ञा दिली. ....नंतर नंतर या भारतातील वा बाह्य लोकांमध्ये निकटतम संबंध येऊन चार वर्णांची बनलेली समाजसंस्था शुद्ध स्वरूपात न दिसल्यामुळे ज्यांचे चार वर्णात व्यवस्थित वर्गीकरण होऊ शकत नव्हते, अशा जमातींना वा व्यवसायी लोकांना वर्णव्यवस्थेच्या चौकटीत बसविण्याकरिता अंतरालवर्ण कल्पना आली. ब्राह्मण व क्षत्रिय या दोघांमधला, क्षत्रिय व वैश्य या दोघांमधला, वैश्य व शूद्र या दोघांमधला, शूद्र व शूद्रापेक्षाही खालचे मानलेले वर्ण यांच्यामधला, अशा तऱ्हेने अंतरालवर्ण मानावे लागले. असे अंतरालवर्ण पंधरा होत, असे ‘मनुस्मृति’त म्हटले आहे.

वर्णभेद व लग्नसंबंध या दोन कारणांनी हे अंतरालवर्ण निर्माण झाले, अशी कल्पना धर्मशास्त्रकारांनी केली.

अंतरालवर्ण ही कल्पना वर्तमानकालीन मानवी परिस्थितीशी जुळते. संदर्भित धर्मशास्त्रे निर्माण होण्यापूर्वी, त्यांच्या निर्मितीकाळी व त्यानंतर आजपावेतों मानव मानवांपासूनच जन्म पावत आहेत, कुणाचाही पुरुषसूक्तात सांगितल्याप्रमाणे ‘दिव्यजन्म’ होत नाही, हे निर्विवाद सत्य या अंतरालवर्णवर्णनात अनुस्यूत आहे.

.............................................................................................................................................

‘विषमतेचा पूरस्कर्ता मनू’ या डॉ. प्रदीप गोखले यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

१४) प्रत्येक माणूस चौवर्णी असतो

मानवी शरीराचे चार भाग कल्पून तेच चार वर्ण असल्याचे विश्लेषणही केले गेले आहे. मानवाच्या मुखकमलामध्ये शरीराचा राजा असलेला मेंदू (मन), डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा ही ज्ञानेंद्रिये एकत्रित आली आहेत. पार, पोट व छाती या भागांच्या तुलनेत मुखाचे ठिकाणी अधिक ज्ञानसाधने आहेत. ज्ञानसाधनांच्या आधिक्यामुळे मुख ब्राह्मण होय. शरीराचे संरक्षण बाहुबलामुळे व हृदयातील रक्ताभिसरणामुळे शक्य होते म्हणून बाहु व छाती ही दोन्ही क्षत्रिय होत. जन्मापासून मरेपर्रंत खाऊनही जे भरत नाही ते पोट म्हणजे वैश्य होय आणि या तिन्ही भागांचा भार सहन करणारे, त्यांना वाहून नेणारे म्हणजे त्यांची सेवा करणारे पाय हे शूद्र होत.

एका ब्रह्मनिष्ठ व श्रोत्रिय प्रवचनकाराने केलेले चार वर्णांचे हे स्पष्टीकरण सर्व मानवांना लागू पडते व यावरून विश्वातील प्रत्येक माणूस चौवर्णी असल्याचे स्पष्ट होते. 

मानव-शरीर चौवर्णी आहे, हे सत्र समजून घेतले की पुरुषसूक्तात व अन्य ग्रंथात असलेले चार वर्णांचे ‘दिव्यजन्मस्थळवर्णन’ हे दुर्बोध असल्याचे पटू लागते.

१५) वेदांमधील वचने खऱ्या संतयोग्यांनाच कळतात

ऋग्वेद, यजुर्वेद, उपनिषदे, मनुस्मृति, विष्णुपुराण, सिद्धान्तबोध इत्यादि ग्रंथातील वर्णोत्पत्तीविषयक वर्णनांचा विचार करताना ती गूढ स्वरूपाची आहेत व ती यौगिक अनुभवाशिवाय समजणारी नाहीत, असे जाणवत राहते. याबाबत महायोगी श्रीअरविंद यांनी केलेले स्पष्टीकरण हे स्वधर्मनिष्ठ व्यक्तीला मार्गदर्शक ठरेल, असे आहे. ते म्हणतात, “वेदोपनिषदातील वचनातील सखोल सत्य हे साधनसंपन्न व संस्कारित साधकांसाठी आहे. त्यांच्यासाठीच ते बाजूला ठेवलेले होते (आहे). असे साधकच त्याचा आंतरिक अर्थ आचारात आणण्यास समर्थ असतात; हे ‘गुप्त’ शब्द आपला आंतरिक अर्थ फक्त द्रष्ट्यापुढेच प्रकट करतात, असे ऋषी म्हणतात. ..... प्राचीन सूक्तांचे हे स्वरूप उत्तरकाळी समजेनासे झाले. सूक्तांच्या गुप्त अर्थाचे ज्ञान, त्यांची परंपरा संपली, नष्ट झाली. आधुनिक पंडित जे वैदिक प्रतिकात्मक भाषा जाणण्याचा खटाटोप करतात, त्यांनी वैदिक सूक्तांच्या गुप्त अर्थांकडे मुळीच लक्ष दिलेले नाही, देत नाहीत.”

थोडक्यात, चौवर्णविषयक उपर्युक्त विविध उपपतींचे गुप्त अर्थ समजून घेणे अतिशय अवघड असल्यामुळे चारी वर्णांबाबत लोकांच्यामध्ये असलेले वादविवाद मिटून त्यांच्यात निदान वैचारिक पातळीवर का होईना सुसंवाद निर्माण करणे व होणे अतिशय कठीण होते.

महायोगी श्रीअरविंद यांनी म्हटल्याप्रमाणे वेदातील वा धर्मग्रंथातील वचनांचे सखोल अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्यास फक्त साधनसंपन्न व्यक्तीच म्हणजे खरे योगी वा खरे संतच समर्थ असतात. उदा. श्रीरामानंद यांनी आपल्या ‘दीपरत्नाकर’ नामक ग्रंथात चौवर्णकल्पनेचा जो अध्यात्मशास्त्रीय अर्थ विशद केला आहे, तो श्रेयस्कर वाटतो. वर्तमानकालीन परिस्थितीत तो बहुतांशी समजून घेण्याजोगा असल्याने या लेखाअंती त्याचा थोडक्यात विचार करूयात -

१६) आपले चार देह म्हणजे आपले चार वर्ण

श्रीरामानंद यांनी ब्राह्मण, क्षत्रिर, वैश्य व शूद्र या चार वर्णांचे मूलग्राही, मार्मिक व मार्गदर्शक विश्लेषण केले आहे. वर्णकल्पना स्पष्ट करीत स्वधर्माचरणाचा आपण सांगत असलेला अर्थ उपनिषदातील, वेदशास्त्रातील व संत श्रीज्ञानेश्वरांनी पूर्वीच सांगितलेला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. आपल्या देहातच चारही वर्णांच्या स्वधर्माचे अनुभवगम्य ज्ञान आपल्याला प्राप्त झाले व कुणाही स्वधर्मसाधकास ते प्राप्त होऊ शकते, असे त्यांनी सूचित केले आहे –

“चहु वर्णांचे कर्म सांगितले । जे सद्गुरुकृपें अनुभवा आले ।

आपुले देहींच पाहिजे पाहिले । ज्यासी झाले गुरुज्ञान ॥”

मनुष्याचा पिंड हा चार देहांचा (चतुर्देहात्मक) आहे. पिंडाचे स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे देहच अनुक्रमे शूद्र, वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण आहेत, असे जाणावयाचे असते. जे आत्मानुभवी वा आत्मज्ञानाचे साधक आहेत त्यांनाच हा वर्णकल्पनेचा स्वहितकारक अर्थ समजू शकतो, इतरांना कळत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आपला स्थूल देह हा आपला शूद्र वर्ण होय

आपला स्थूल देह म्हणजे आपला शूद्र वर्ण होय, असे श्रीरामानंदांनी तीन वेळा उल्लेखिले आहे. कारण, परिचर्या, तीर्थाटन, व्रताचरण, अनुष्ठाने, ग्रंथवाचन, कथाकीर्तन, देवीदेवतापूजन, संतसमागम इत्यादि स्थूलभक्तिप्रकार स्थूल देहामुळेच शक्य होतात. या देहाने वरील भक्तिप्रकाररूपी सेवा केल्यानेच हा देह पावन होतो; अन्यथा, तो अपवित्र राहतो, हे आपले वचन सत्य मानावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

उल्लेखित स्थूलभक्तिप्रकार सर्व हिंदूधर्मीय करीत असतात. अर्थात, या न्यायाने आपण सर्व शूद्र आहोत.

वर्णव्यवस्थेनुसार त्रैवर्णिकांची सेवा शूद्राने करावी, असे गीता-ज्ञानेश्वरी-भागवत वगैरे ग्रंथात सांगितले आहे. उदा. -“आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हा द्विजन्मे तिन्ही वर्ण । ययांचे जे शुश्रूषण । ते शूद्रकर्म ॥”

या ओवीत अभिप्रेत असलेले शूद्र कर्म हे श्रीरामानंदांच्या मते, द्वैतभावनेवर आधारित असून ते केवळ ‘बाह्य संपादन’ असू शकते आणि तसे आचरण केल्याने स्वहित साधले जात नाही. - “जे बाह्य व्यवहार करिती जाण । तेणें करूनि हित नोहे ॥” अर्थात, ‘मी ब्राह्मण’, ‘मी शूद्र’ अशा द्वैतभावनेने युक्त असलेले म्हणजे देहाभिमानयुक्त, अहंकारयुरुक्त आचरण करणारास आत्मज्ञान होऊ शकत नाही.

थोडक्यात, निरहंकारपणे विश्वातील सर्व जीवांची सेवा करणे हा स्थूल देह असलेल्या आपण सर्व मानवांचा स्वधर्म होय.

आपला सूक्ष्म देह हा आपला वैश्य वर्ण होय

श्रीरामानंदांच्या मते, सूक्ष्म वा लिंग देह म्हणजे व्यक्तीचा वैश्य वर्ण होय. मन, बुद्धी, अहंकार हे सूक्ष्मदेहरूप वैश्याचे भांडवल असून पंचज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये यांच्याकरवी ते व्यापार-उद्योग करीत असतात. त्यायोगे अपार सुखदुःख त्यांना भोगावे लागते. व्यापारी माणूस ज्याप्रमाणे धनलाभाने आनंदित व तोट्याने दुःखी होतो, त्याप्रमाणे सुखदुःखामुळे सूक्ष्मदेहाच्या ठिकाणी अनेक कल्पनांच्या लहरी उठत असतात. म्हणून तसे होऊ न देता वैश्यधर्माचे पालन करताना आपण आपले हित ज्यात आहे तेच कर्म प्रथम केले पाहिजे. म्हणजे, सुखदुःखातीत (स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धी, उन्मन) झाले पाहिजे.

आत्मज्ञान-साधकांनी हा मार्गदर्शक विचार अधिक स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक होय. ज्याप्रमाणे वैश्य व्यक्तीच्या ठिकाणी अर्थतृष्णा अतिगहन असते, त्याप्रमाणे मनही अविरत कल्पना करीत असते. जोपर्यंत मनाचे कल्पना करणे थांबत नाही तोपर्यंत सुखदुःखाचे आघात होत राहतात व मन कल्पनातीत झाले की व्यक्ती सुखदुःखातीत होते, असे बहिणाबाईंनी पुढील अभंगातून सूचित केले आहे -“जेथवरी मना तुझा असे वारा । तेथवरी थारा सुखा नाही ॥” वृत्ती, द्रव्य, भूमी, राज्य इत्यादींचा हव्यास करणाऱ्यांना कधीही देव भेटत नाही या अर्थाचा श्रीबहिणाबाईंच्या गुरुंचा म्हणजे श्रीतुकारामांचा पुढील अभंगदेखील श्रीरामानंदांच्या म्हणण्याला पुष्टी देतो -“वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्यां निश्चिती देव नाही ॥” ‘लिंगदेहाचे मर्दन’ करणे म्हणजे त्याचा नाश करणे होय. लिंगदेहाचा नाश झाला तरच ‘जनीं जनार्दन’ दिसतो.

थोडक्यात, धनार्जन करणारा वैश्य-मानव व कल्पना करणारे मन-बुद्धी हे स्वहिताची साधना करीत नसतात. आत्मारूपी अक्षय्य धन प्राप्त करणारा व स्थितप्रज्ञताजन्य संतोषरूप धनार्जन करणारा सूक्ष्म देहच खरा वैश्य होय.

मन-बुद्धी-अहंकार-रूप भांडवल विश्वातील सर्व मानवांजवळ असते. म्हणून विश्वातील सर्व मानव वैश्य ठरतात.

आपला कारण देह हा आपला क्षत्रिय वर्ण होय

श्रीरामानंदांनी, कारण देह हाच क्षत्रिय आहे, हे जाणून घेण्यास सांगितले आहे -“कारण देह तोचि क्षत्रिय जाण । तेथे दुजियाचे नाही भान । एकान्त नांदे आपण । धरी खूण मानसीं ॥”

क्षत्रिय शक्तिमान असतो. त्यामुळे सिंहाप्रमाणे तो एकटा (एकान्तात) राहतो, तो इतरांची तमा बाळगीत नाही, इतरांचे त्याला भानही नसते. क्षत्रिय स्वभावतः बलवान असल्याने तो अन्यसहाय्यनिरपेक्ष-शूर असतो. म्हणजे, इतरांच्या सहाय्यावर त्याचे शूरपण अवलंबून नसते. म्हणूनच तो एकटा वा एकान्तात राहू शकतो, रहात असतो. अज्ञानात्मक कारण देहालादेखील इतरांचे भान नसते. सुषुप्ती ही कारणदेहाची अवस्था आहे. गाढ झोपेत जसे आपल्याला इतरांचे भान नसते तसा क्षत्रिय इतरांविषयी निरपेक्ष असतो. स्वविषयक अज्ञानामुळे क्षात्रवृत्ती बळावते. उदा. व्यक्तीच्या कारण देहाच्या ठिकाणी आकाशतत्त्वामुळे क्षात्रवृत्तीला शोभणारा मद, वायुतत्त्वामुळे निर्माण होणारी अप्राप्य गोष्ट मिळविण्याची वांछा, तेजतत्त्वामुळे निर्माण होणारी धनद्रव्यादि मिळविण्याची इच्छा, जलतत्त्वामुळे निर्माण होणारी करुणा आणि पृथ्वीतत्त्वामुळे निर्माण होणारे अविवेकजन्य धाडस इत्यादि निर्माण होतात. हे श्रीदिनकरस्वामींनी केलेले कारणदेहाच्या स्वरूपाचे विवरण श्रीरामानंदांना अभिप्रेत असलेले ‘कारणदेहाचे क्षत्रियत्व’ सुस्पष्ट करते.

.............................................................................................................................................

‘शुद्र पूर्वी कोण होते?’ या डॉ. आंबेडकरांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

आपला महाकारण देह हा आपला ब्राह्मण वर्ण होय

ज्ञानी ब्राह्मणास जसे क्षत्रिय, वैश्य व शूद्र या तीनही वर्णांचे ज्ञान असते त्याप्रमाणे तूर्यावस्थेत ज्ञात होणाऱ्या महाकारणदेहाला (म्हणजे आपल्या महाकारण देहाचे ज्ञान झालेल्या साधकाला) कारण, सूक्ष्म व स्थूल या तीनही देहांचे ज्ञान असते. या तीन देहांच्या अनुक्रमे जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांच्या नंतरच्या ज्ञानरूपिणी तूर्यावस्थेत महाकारण देहाचे ज्ञान झाले, की व्यक्ती ब्राह्मण वर्णाची होते, ती वेदादिशास्त्र, काव्य, व्याकरण, ज्योतिष व शुद्ध ब्रह्मज्ञानात निपुण होते. म्हणून महाकारण देह हा ब्राह्मण होय व या चौथ्या देहाचे ज्ञान असलेली व्यक्तीच ब्राह्मण वर्णाची होय.

श्रीदिनकरस्वामींनी स्पष्ट केल्याप्रमाणे महाकारण देहाचे ज्ञान होणे म्हणजे आपण स्वरूपाने पूर्ण, अज, अदाह्य, अक्लेद्य, अशोष्य, असंग, अछेद्य, व्यापक, प्रकाशरूप, पावनस्वरूप, निर्मळ, क्षमावंत, अमोल आहोत, असे सानुभव जाणणे होय. आत्मज्ञानाने किंवा ‘अहं ब्रह्म अस्मि’ या ज्ञानाने व्यक्ती महाकारणदेहस्वरूप म्हणजे ब्राह्मण होते. आत्मज्ञान तूर्यावस्थेत प्राप्त होते म्हणून ज्यांना तूर्यावस्था प्राप्त झाली आहे ते मानव ब्राह्मण होत; ज्यांना तूर्यावस्था प्राप्त झालेली नसते ते ब्राह्मणेतर होत.

आपण स्वरूपतः चौवर्णातीत आहोत

श्रीरामानंदांनी केलेल्या या विवेचनाच्या आधारे असा निष्कर्ष निघतो, की आत्मज्ञानप्राप्तीरूप मार्गावरील शूद्र, वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण हे चार टप्पे आहेत. हे टप्पे ओलांडून आपल्याला चौवर्णातीत असे स्वरूप प्राप्त करून घ्यावयाचे आहे. श्रीतुकारामांनीदेखील “नम्र झाला भूतां । तेणें कोंडिले अनंता ॥” या अभंगातून ‘शूद्रत्व ते ब्राह्मणत्वप्राप्तीनंतरचे संतत्व’ या श्रेयस्कर आध्यात्मिक प्रवासाची दिशा सूचित केली आहे.

आपण स्वरूपतः चौदेहातीत असल्याने चौवर्णातीतही आहोत, हाच खरा अध्यात्मशास्त्राचा वर्णविषयक निःश्रेयस्कर वा कल्याणकारी सिद्धान्त आहे. श्रीरामानंदांनीदेखील तो सूचित केला आहे. ते म्हणतात, की आत्मारूपी आपण चार देहांचे चालक आहोत, या चारही देहांचे आपल्याला ज्ञान असल्याने आपण चारही देहांच्या पलीकडचे आहोत, चौवर्णातीत आहोत म्हणजे आत्मारूपी मी सर्वव्यापी आहे, अशी अखंड भावना करून म्हणजे मनात कोणताही हेतू न ठेवता जणू काही आपण नाहीच आहोत, ही अनुभवाची खूण बाणल्याने व्यक्ती पावन होते.

आत्मज्ञानाने पवित्र झालेले संत हेच खऱ्या अर्थाने पावनकर म्हणजे इतरांना पवित्र करणारे असतात. त्यांना आपल्या स्वरूपाचे ज्ञान झालेले असल्याने ते चौवर्णातीत असतात. म्हणूनच चारी वर्णांच्या मानवांना मार्गदर्शक ठरेल असे म्हणजे श्रीरामदासस्वामी म्हणतात तसे ‘स्वस्वरूपात राहणेरूप म्हणजे स्वधर्मनिष्ठ आचरण’ करीत असतात. नेमका हाच सन्मार्गदर्शक विचार उदा. संत श्रीसेनामहाराज यांनी ‘चौवर्णां देऊनी हात । सेना राहिला निवांत ॥’ अशा शब्दांत व्यक्त केला आहे. अर्थात संत हेच आत्मज्ञानाची शिकवण देणारे खरे गुरू म्हणजे सद्गुरू असतात.

.............................................................................................................................................

हा लेख पुणे विद्यापीठाला १९९७ साली सादर केलेल्या ‘स्वधर्म : विश्वव्यापी मानवधर्म – एक चिकित्सा’ या लेखकाच्या पीएच.डी. प्रबंधावर आधारित आहे.

.............................................................................................................................................

लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.

vijaymaher@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 26 November 2018

नमस्कार प्राध्यापक विजय बाणकर! माझ्या मते शूद्र म्हणजे केवळ कष्टकरी वर्ग नव्हे. उदाहरणार्थ आजची वास्तुविशारद ( = आर्किटेक्ट), अभियंता ( = इंजिनियर ) ही कर्मे शूद्र आहेत. कारण की ती ब्राह्मण, क्षत्रिय वा वैश्य या प्रकारांत मोडंत नाहीत. शूद्र म्हणजे खालच्या पायरीवरचा ही कल्पनाच मुळातून चुकीची आहे. एखादा अभियंता सुरुवातीस नोकरी करतांना शूद्र असेल तर पुढे स्वत:चा व्यवसाय उभारतांना वैश्य होईल. त्यामुळे हे वर्णदेखील गच्च नाहीत. ब्राह्मणाचं काम समाजात सात्त्विकता सांभाळणे आहे. क्षत्रियाचं काम समाजाचं संरक्षण करणे व राज्यकारभार चालवणे आहे. वैश्याचं काम समाजात संपत्ती यथोचित रीतीने फिरवणे आहे. संपत्ती म्हणजे 'सम प्रकारे पतित होते अशी ती'. इथे पतित होणे म्हणजे वहाणे किंवा वितरीत होणे असा अर्थ अभिप्रेत आहे. तर शूद्राने या तिघांना सहाय्य होईल अशा प्रकारची कर्मं करावीत. मात्र सगळी कर्मं काही हीन दर्जाची नसणारेत. अभियंता, वास्तुविशारद, ललितकलाकार, इत्यादि कर्मे अतिकुशल सदरांत मोडतात. फक्त त्यांचा समाजाच्या धारणेशी थेट संबंध नसतो, इतकंच. त्यामुळे शूद्र हा खालच्या पायरीचा मानण्यात येऊ नये. आपला नम्र, -गामा पैलवान