ताजा कलम : पु. ल. ‘वुडहाऊस’ आणि पी. जी. ‘देशपांडे’ – एक ‘ह्युमरलेस’ अभ्यास!
पडघम - साहित्यिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • पु. ल. देशपांडे आणि पी. जी. वुडहाऊस आणि ‘तुझिया जातीचा मिळो आम्हां कोणी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 21 November 2018
  • पडघम साहित्यिक पु. ल. देशपांडे P. L. Deshpande पी. जी. वुडहाऊस P. G. Wodehouse

“पु. ल. वुडहाऊस आणि पी. जी. देशपांडे - एक ‘ह्युमरलेस’ अभ्यास’’ हा पन्नास एक पानांचा लेख मी १९९५ मध्ये केव्हातरी लिहिला. नंतर त्याच्यावर बऱ्यापैकी मेहनत घेऊन, काटछाट करून, सुमारे पंचवीस फुलस्केप पानांची संक्षिप्त आवृत्ती तयार करून मी त्याची एक फोटोस्टॅट कॉपी थेट पुलंनाच पोस्टानं वाचायला पाठवून दिली.

यथावकाश पुलंचे सविस्तर उत्तर आले. त्यांना माझा लेख आवडला हे वाचून मला बरं वाटलं. नंतर मी हा लेख ‘अंतर्नाद’ मासिकाकडे पाठवला आणि संपादक भानू काळे यांनी तो जसाच्या तसा प्रसिद्ध केला. पुलंच्या अभिप्रायसुद्धा त्यांनी या लेखासोबत छापला. माझ्या या लेखाची बऱ्यापैकी तारीफही झाली.

चार वर्षांपूर्वी माझ्या एक परिचित महिलेचा मला फेसबुकवर मेसेज आला की, तिनं माझा हा लेख पुलंवरच्या लेखांचं संकलन असलेल्या एका पुस्तकात नुकताच वाचला आणि तो तिला आवडला. हे वाचून मी चाटच पडलो. पुलंवरती लेखांचं असं काही पुस्तक निघालं आहे याची मला जराही कल्पना नव्हती. मी माझ्या नेहमीच्या पुस्तक विक्रेत्याला विचारलं, तेव्हा त्यानं त्या पुस्तकाची एक प्रतच मला पाठवून दिली आणि सोबत तीनशे रुपयांचं बिलसुद्धा.

पुलंवर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या लेखांचं हे संकलन पुस्तक स्वरूपात मुंबईच्या परचुरे प्रकाशन मंदिर या संस्थेनं ‘तुझिया जातीचा मिळो आम्हां कोणी’ या नावानं २०११ साली प्रकाशित केलं आहे. त्यात त्यांनी ‘अंतर्नाद’मधल्या माझ्या या लेखाचाही समावेश केला आहे. मी विकत घेतलेली प्रत २०१२ मधल्या चौथ्या आवृत्तीची होती.

.............................................................................................................................................

 पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y9vua5v7

.............................................................................................................................................

हे पुस्तक बघून मला मोठा यक्षप्रश्न पडला. माझी परवानगी न घेता, मला याबाबत काहीही कळविण्याची तसदी न घेता माझा लेख परस्पर छापला यासाठी किंवा पुस्तकाची एक प्रत मला भेट म्हणून देण्याचंही सौजन्य दाखवलं नाही, यासाठी मी परचुरे प्रकाशन संस्थेवर नाराज व्हावं की एका चांगल्या पुस्तकात आपला लेख संकलित झाला आहे, या खुशीत त्यांना माफ करून टाकावं, हे मला कळत नव्हतं. भरीस भर म्हणजे पुस्तकातल्या माझ्या लेखाच्या या मजकुरामध्ये अनेक चुका आहेत, काही ठिकाणी शब्दही गायब आहेत. परचुऱ्यांना यासाठी कायदेशीर नोटीस पाठवणं हे एक वकील म्हणून माझ्यासाठी अत्यंत सोपं काम होतं. पण खूप विचार केल्यावर मी काहीच न करायचं ठरवलं. कारण त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नसतं. शिवाय ‘संबंधित लेखकांची अनुमती गृहित धरूनच’ आपण हे पुनर्मुद्रण केलं असल्याचा खुलासा त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच केलेला आहे. हा ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ मी त्यांना द्यायचं ठरवलं. पण मला या प्रकाराची मौज मात्र नक्की वाटली.

किती सहजपणे मोठी, नामांकित मंडळीसुद्धा हे असं चुकीचं वागू शकतात, नाही? स्वतः पु. ल. किंवा वुडहाऊस जिवंत असताना त्यांच्या लेखांबाबत हे असं करण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती. २०१८ मध्ये परचुऱ्यांच्या या संकलनाची कितवी आवृत्ती बाजारात आलेली आहे, हे माहीत नाही. पण पुढच्या आवृत्तीमध्ये तरी त्यांनी हे मुद्रणदोष दूर करावेत एवढीच माझी माफक अपेक्षा आहे.

आज इतक्या दिवसांनी मला हे सगळे आठवलं याचं कारण आज राम जगताप हा माझा लेख ‘अक्षरनामा’मध्ये पुनर्प्रकाशित करत आहेत. निमित्त आहे पुलंच्या जन्मशताब्दी वर्षाचं. हाच धागा पकडून अत्यंत थोडक्यात मी हे स्वतंत्र टिपण लिहितो आहे. हा ‘अपडेट’ आवश्यकच आहे, कारण १९९५ पासून २०१८ पर्यंतच्या तेवीस वर्षांच्या या मधल्या काळात पु. ल. देशपांडे आणि पी. जी. वुडहाऊस या दोघांवरही खूप नवं साहित्य उपलब्ध झालेलं आहे. तसंच पुलंच्या जिवंतपणी माहीत नसलेल्या वुडहाऊसबद्दलच्या अनेक नव्या गोष्टी उघडकीला आल्या आहेत. त्याचं स्वतःचंही खूप जुनं साहित्य या काळात पहिल्यांदाच प्रकाशात आलं आहे. 

.............................................................................................................................................

 पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y9vua5v7

.............................................................................................................................................

मुख्य म्हणजे माझ्या या मूळ लेखातील बरेच संदर्भ हे फ्रान्सेस डॉनल्डसन आणि रिचर्ड अस्बर्न या दोघांच्याच वुडहाऊसबद्दलच्या ग्रंथांवर आधारित होते. २००० सालानंतर त्याच्यावर बरीच नवी पुस्तकं निघाली आहेत. ती वाचून माझं स्वतःचं वुडहाऊसबद्दलचं ज्ञान १९९५ पेक्षा आज चौपटीनं वाढलं आहे. या नव्या पुस्तकांमधलं सगळ्यात गाजावाजा झालेलं, पण तेवढंच निराशाजनक पुस्तक म्हणजे रॉबर्ट मक्क्रमनं लिहिलेलं वुडहाऊसचं चरित्र.  डॉनल्डसन आणि मक्क्रम या दोघांनीही लिहिलेली वुडहाऊसची चरित्रं सदोष आणि प्रसंगी अपमानकारक आहेत, हे मी आज सांगू शकतो. (मक्क्रमच्या चरित्राचा आधार घेऊन दोन-अडीच वर्षांपूर्वी वुडहाऊसवर एक मराठी पुस्तक प्रसिद्ध झालं. हे मराठी पुस्तकसुद्धा किती सदोष आहे, यावर एक विस्तृत लेख मी ‘अक्षरनामा’साठी लिहिला होता.) आता वाट आहे ती जॉन डॉसन या अमेरिकन स्कॉलरनं बारा वर्षं मेहनत घेऊन लिहिलेल्या वुडहाऊस चरित्राची (हे दोन भागांमध्ये असणार आहे). पुढच्या काही महिन्यांतच ते बाजारात येईल. जॉनच्या या ग्रंथाचा प्रकाशनपूर्व वाचक होण्याचं भाग्य मला लाभलं आहे, हे मुद्दाम सांगावंसं वाटतं.

मी स्वतः वुडहाऊसचा प्रेमी आणि अभ्यासक आहे. माझ्यासारख्या जगभरातल्या वुडहाऊसप्रेमींचा एक इंटरनेट क्लब ‘Blandings’ (ब्लॅन्डिंग्ज्’ या नावानं (http://groups.yahoo.com/group/blandings) मी स्थापन केला आहे आणि काही पाश्चात्य मित्रांच्या मदतीनं गेल्या अठरा वर्षांपासून मी तो चालवितो आहे. पुस्तकरूपात कधीच संकलित न झालेल्या त्याच्या शेकडो वृत्तपत्रीय लेखांना, कवितांना आम्ही प्रकाशात आणलं आहे. हे काहीच पुल असताना घडलं नाही, कारण हा सगळा २००० नंतर घडलेला इंटरनेट क्रांतीचा चमत्कार आहे. इंग्लंड-अमेरिकेतल्या जुन्या जुन्या मासिकांचे आणि वर्तमानपत्रांचं ‘आर्काइव्ह्ज्’ आता ऑनलाईन उपलब्ध झालं आहे. इसवी सन १९०१ ते १९२० या काळात वुडहाऊसनं आपल्या नियमित कथा-कादंबरी-नाटक लेखनाशिवाय प्रचंड स्फुटलेखनदेखील केलं. वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं, नाटकांची परीक्षण केली. यापैकी बहुतेक सर्व स्फुटसाहित्य एकदा छापून आल्यावर अंधारात गेलं. आमच्या ‘ब्लॅन्डिंग्ज् ग्रूप’च्या काही उत्साही सदस्यांनी यातलं ७५ टक्क्यांहून जास्त लिखाण (प्रसंगी स्वतःचे पैसे खर्च करून) शोधून काढलं आणि त्याला इंटरनेटवर मॅडम युलालाय् (Madame Eulalie) या आमच्यापैकी एका मित्राच्या दातृत्वामुळे चालत असलेल्या वेबसाईटवर लोकांना विनामूल्य वाचायला उपलब्ध करून दिलं आहे. बघा - http://www.madameulalie.org/  

पुलंना यातलं काहीच वाचायला मिळालं नाही, याचं मला वाईट वाटतं. त्यांनी खूप एन्जॉय केलं असतं हे सारं.

वुडहाऊसची नवी चरित्रंही याच काळात निघाली असून त्याच्या प्रचंड पत्रव्यवहारामधून निवडलेल्या काही पत्रांचं एक नवं संकलनही सोफी रॅटक्लिफ यांनी तीन-चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलं आहे. बीबीसी आणि अन्य काही टीव्ही चॅनेल्सनी त्याच्या जीवनावर नवीन बायोपिक - डॉक्युमेंटरीज तयार केल्या आहेत.

वुडहाऊसबद्दल अजूनही काही इंग्रजांच्या मनात राग आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनांच्या कैदेत असताना बर्लिन रेडिओवरून त्यानं जी पाच भाषणं केली, त्यामुळे तो ‘देशद्रोही’ ठरतो असं मानणाऱ्यांचा एक वर्ग आजही इतक्या वर्षांनंतरसुद्धा अस्तित्वात आहे. वास्तविक असं काही नव्हतं आणि ही भाषणं हा त्याचा केवळ एक मूर्खपणा होता, हे आता सप्रमाण सिद्ध झालं आहे. युद्ध संपल्यावर त्याची सखोल चौकशी करण्यात आली होती आणि त्यात त्याला निर्दोष मानण्यात आलं होतं - म्हणूनच तो अमेरिकेत वास्तव्याला जाऊ शकला. चौकशीच्या या एकेकाळी गुप्त - क्लासिफाईड - असलेल्या फाईल्स आज जनतेला वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.

.............................................................................................................................................

 पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y9vua5v7

.............................................................................................................................................

वुडहाऊस जिवंत असतानाच ब्रिटिश सरकारनं आणि जनतेनं त्याचा आत्मसन्मान - मान - अभिमान त्याला पुन्हा बहाल केला. देशद्रोही म्हणून त्याच्यावरचा शिक्का चूक असल्यानं तो १९७५ मध्येच मिटवण्यात आला. ‘नाईटहूड’ हा किताब देऊन इंग्लंडच्या राणीनं त्याला त्याच्या जिवंतपणीच सन्मानित केलं. मरण आलं तेव्हा तो नुसता ‘मिस्टर वुडहाऊस’ नसून ‘सर पेलम ग्रेन्विल वुडहाऊस’ झाला होता. याखेरीज मादाम तुसाँ यांच्या मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयात त्याचाही एक पुतळा ठेवण्यात आला आहे.

प्रसिद्ध, नामांकित व्यक्तींना सन्मानित करण्याच्या आणखीही काही पद्धती इंग्लंडमध्ये प्रचलित आहेत. त्यातली एक म्हणजे ब्लू प्लाक. ‘P. G. Wodehouse 1881-1975 Writer lived here’ अशी माहिती असलेली निळ्या रंगाची पट्टी किंवा फलक तो एके काळी लंडनमध्ये जेथे राहत होता, त्या निवासस्थानावर (17 Dunraven Street, Mayfair, London W1K 7EG, City of Westminster) लावण्यात आला आहे.

आणि वुडहाऊसला इंग्लंडमध्ये नुसतंच माफ करण्यात आलं आहे असं नाही तर त्याला त्याचा पूर्ण सन्मान पुन्हा बहाल करण्यात आला आहे, याचा याहीपेक्षा महत्त्वाचा, कदाचित सर्वांत मोठा काही जर संकेत असेल तर तो म्हणजे नुकतीच (ऑक्टोबर २०१८ महिन्यात) करण्यात आलेली ही घोषणा - लंडनमधील वेस्टमिन्स्टर अबी या अती प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक कबरस्थानात पोएट्स कॉर्नर या कोपऱ्यात त्याच्या नावाचा स्मृतीफलक लावण्यात येणार आहे. (अधिक माहितीसाठी बघा -   
https://www.independent.ie/entertainment/pg-wodehouse-to-be-honoured-with-westminster-abbey-memorial-plaque-37415444.html
आणि https://en.wikipedia.org/wiki/Poets%27_Corner)

वुडहाऊसचं १९७५ साली अमेरिकेत न्यूयॉर्क जवळ लाँग आयलंड बेटावर असलेल्या रेम्झन्बर्ग या गावात निधन झालं आणि तिथल्याच कबरस्थानात त्याला गाडण्यात आलं. तरीसुद्धा इतक्या वर्षांनी का होईना, ब्रिटिश जनतेला ही सुबुद्धी झाली हेही नसे थोडकं. १९५२ मध्ये अमेरिकेत गेल्यावर वुडहाऊस स्वतः पुन्हा कधीच आपल्या मातृभूमीत परत येऊ शकला नाही. त्याच्यावर करण्यात आलेल्या या अन्यायाचं परिमार्जन अशा पद्धतीनं का होईना इंग्रज लोक आता करत आहेत, हे बघून त्याच्या आत्म्याला शांती मिळेल अशी आशा करायला हरकत नसावी. हा खरोखरच ‘अल्टिमेट’ (सर्वोच्च) असा बहुमान त्याला आता मिळणार आहे, हे वाचून पुलंना कल्पनातीत आनंद झाला असता.

आणखी एक उल्लेखनीय घटना म्हणजे मागच्या वर्षी पी. जी. वुडहाऊसचं पर्सनल आर्काइव्ज ब्रिटिश लायब्ररीला सुपूर्द करण्यात आलं. म्हणजे आता कोणीही लंडनला ब्रिटिश लायब्ररीत जाऊन वुडहाऊसची वैयक्तिक कागदपत्रं, त्याला आलेली किंवा त्यानं लिहिलेली पत्रं, त्याची उपलब्ध हस्तलिखितं आणि डायऱ्या, फोटो इत्यादींचा अभ्यास करू शकतो. त्याच्या मृत्यूनंतर इतकी वर्षं हा ठेवा त्याचा नातू सर एडवर्ड कॅझॅलेटच्या ताब्यात होता. त्यांनीच आता तो लोकार्पण केला आहे.

‘‘पु. ल. वुडहाऊस आणि पी. जी. देशपांडे - एक ‘ह्युमरलेस’ अभ्यास’’ हा लेख मी जर आज लिहिला असता तर त्यात या साऱ्या घटनांचा समावेश केला असता, हे नक्की. ती उणीव आज या टिपणाद्वारा भरून काढतो आहे. मूळ लेखात असलेल्या काही उल्लेखांमध्ये दुरुस्ती करण्याचीसुद्धा हीच चांगली संधी आहे  -

१. ‘बर्लिन ब्रॉडकास्ट्स्’ असं शीर्षक असलेल्या मुद्द्यात ‘वृत्तपत्रसम्राट व्हिस्काऊंट रॉदरमिअर’ असं लिहिलेलं आहे. ‘Viscount’ या इंग्रजी शब्दाचा उच्चार ‘वायकाऊंट’ असा होतो, ‘व्हिस्काऊंट’ असा नाही.

२. ‘एथेल आणि सुनीताबाई नसत्या तर...’ असं शीर्षक असलेल्या मुद्द्यात वुडहाऊस आणि भारत देश यांच्यातल्या संबंधांबद्द्ल लिहिताना मी दक्षिण मुंबईत कुलाब्यातील एका रस्त्याला प्लमच्या भावाचं म्हणजे अर्मिन वुडहाऊसचं नाव दिलेलं आहे अशी (चुकीची) माहिती डॉनल्डसनच्या पुस्तकावर विश्वास ठेवून दिली आहे. आमच्या संशोधक मित्रांनी नंतर हे सप्रमाण सिद्ध केलं की, हे नाव अर्मिनच्या नव्हे तर त्याचा आणि प्लमचा चुलत-चुलत चुलता सर फिलिप वुडहाऊस याच्या सन्मानार्थ या रस्त्याला दिलेलं आहे. हा फिलिप १९व्या शतकामधला एक मोठा राजकारणी होता आणि तत्कालीन मुंबई इलाक्याचा म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर म्हणून तो पाच वर्षं (१८७२ ते १८७७) मुंबईत वास्तव्याला होता. आज या रस्त्याला ‘नाथालाल पारेख रस्ता’ या नावानं ओळखलं जातं. लिओनोराचा जन्म १९०४ चा आहे. आणि लेनर्ड रॉलीला बंगलोरजवळ कोलार गोल्डफिल्डच्या कब्रस्तानात पुरण्यात आलं होतं. आज इतक्या वर्षांनी त्याची कबर अस्तित्वात आहे की नाही, कोण जाणे!

माझा हा इतका जुना लेख पु. ल. जन्मशताब्दी वर्षानिमित्त आवर्जून पुनर्प्रकाशित केल्याबद्दल ‘अक्षरनामा’चे मनःपूर्वक आभार.

.............................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................