सुधीर फडके : मराठी गीत-संगीताच्या दुनियेत स्वत:चं युग निर्माण करणारा संगीतकार
दिवाळी २०१८ - माणसं : कालची, आजची, उद्याची
जयंत राळेरासकर
  • सुधीर फडके ( २५ जुलै १९१९ - २९ जुलै २००२)
  • Wed , 24 October 2018
  • सुधीर फडके Sudhir Phadke

मराठी गीत-संगीताच्या दुनियेत अनेक प्रतिभावंतांनी हजेरी लावलेली आहे. गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे, मास्टर कृष्णराव यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा श्रीधर फडके, आनंद मोडक इत्यादींपर्यंत चालू आहे. या संगीतकारांनी भरपूर योगदान दिले आहे. मात्र या सर्व काळात ज्यांचे ‘युग’ होते असे म्हणता येईल असा संगीतकार म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी! पु.ल.देशपांडे यांनी काही वर्षे संगीतकार ही भूमिका केली, पण १९५३च्या ‘गुळाचा गणपती’ नंतर त्यांनी अचानक चित्रपटसृष्टी सोडली. बाबूजींनी मात्र १९४६ ते १९९३ पर्यंत चित्रपट आणि भावगीत दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या. आणि ‘सुधीर फडके युग’ निर्माण केले.

बाबूजींची सुरुवात झाली ‘प्रभात’च्या साक्षीने. ‘गोकुळ’, आगे बढो’ हे त्यांचे सुरुवातीचे चित्रपट. हे दोन्ही चित्रपट हिंदी होते. ‘प्रभात’चे संगीतकार गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव यांच्यावर साहजिकपणे नाट्यसंगीताचा प्रभाव होता तर, केशवराव भोळे यांची गाणी  भावकवितेच्या अंगाने जाणारी होती. या पार्श्वभूमीवर बाबूजींनी केलेले चित्रपटगीत हे अधिक सोपे होते. बाबूजी स्वत: सर्व चीजांचा सूक्ष्म विचार करत. त्यामुळे चित्रपट माध्यम, साहित्यातील (शब्द-रचनेतील) रसपूर्णता आणि त्याच वेळी जनमानसाची आवड यांचा त्यांनी नेमका वेध घेतला. आणि काळाच्यादेखील पुढे जाऊन त्यांनी चित्रपटगीते केली. याच माध्यमातून त्यांनी विविध गानप्रकार हाताळत चित्रपटगीत आणि भावगीत दोन्ही काळाच्या पुढे नेले. अर्थात त्या काळी इतर संगीतकार नव्हते असे नाही. दत्ता डावजेकर, दादा चांदेकर, वसंत पवार, वसंत प्रभू इत्यादी संगीतकार होतेच. मात्र बाबूजींचे संगीत मराठी चित्रपटगीतात एक नवा प्रवाह घेऊन आले. शिवाय ती सहज सोपी होती. त्याशिवाय एखाद्या युगाला त्यांचे नाव कसे देता येईल!

२.

बाबूजी मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे पाळण्यातील नाव राम. बडील गावातील एक प्रसिद्ध वकील. रामचा कुमारवयापासून गाण्याकडे ओढा होताच. त्यात एक महत्त्वाचा योग असा होता की, त्यांच्याकडे ग्रामोफोन होता. वडिलांनासुद्धा संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांनी काही ध्वनिमुद्रिकादेखील घेतल्या होत्या. राम याच तबकड्या नेहमी ऐके आणि त्याच त्याचा गुरू बनल्या. याच तबकड्यांचे साहचर्य रामला पुढेदेखील तरुण वयात मिळाले. त्याचे असे झाले. असेच ईशान्य भारतात दौऱ्यावर असताना ते आजारी पडले आणि त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यावेळी त्यांचा मुक्काम गयेजवळ मुगलसराई येथे होता. तिथल्या मुक्कामात तबकड्या ऐकण्याची संधी पुन्हा मिळाली.

बाबुजींनी स्वत: हे ऋण एका ठिकाणी नमूद केले आहे. कोल्हापूरच्या या शालेय वयात असताना त्यांच्या मामांनी रामचे संगीत-प्रेम पाहिले होते. हे मामा जामखिंडी संस्थानात वैद्यकीय अधिकारी होते. त्यांनी रामला रीतसर संगीत शिकता यावे म्हणून पाध्येबुवा यांच्या गंधर्व विद्यालयात दाखल केले. हे शिक्षण सुरू झाले त्यावेळी ते सात वर्षांचे होते. मात्र नियतीला ही योजना पसंत नव्हती. रामच्या आईचे अचानक निधन झाले. वडिलांचे व्यवसायावरील लक्ष उडाले, परिणामी आर्थिक विवंचना निर्माण झाली. रामची रवानगी मुंबईला झाली. महाराष्ट्र संगीत विद्यालयात. इथे सुरुवातीलाच एक उत्तम संधी चालून आली. एका संगीत स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि परीक्षक होते दस्तुरखुद्द अब्दुल करीमखान. त्यांना रामचे गाणे आवडले आणि त्यांनी त्याचे कौतुकदेखील केले.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

खरे तर, याच सुमारास कोलंबिया कंपनीने त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढायचा प्रस्ताव दिला होता. पण त्या निघाल्या नाहीत. याच दरम्यान बाबूजी श्रीकृष्ण हार्मोनियम क्लासच्या न. ना. देशपांडे यांच्या संपर्कात आले. बाबूजी त्यांच्या त्या क्लासमध्ये गाणे ‘शिकवीत’ असत. स्वतंत्र चाल कशी बांधावी याचे शास्त्रशुद्ध शिक्षण आणि अर्थातच चिंतन याच काळात घडले. याच देशपांडे सरांनी बाबूजी यांचे नवे बारसे केले... आणि ‘राम’चे ‘सुधीर फडके’ झाले. बाबूजी यांनी आयुष्यभर हेच नाव शिरोधार्य मानले.

आर्थिक विवंचना खूप अंशी कमी झाल्या. पण अशाच परिस्थितीत बाबूजींचे वडील गेले. आता तशा विवंचना कमी होत्या, पण संघर्ष संपलेला नव्हता. याच दिवसात बाबूजी संघाच्या संपर्कात आले. संघाची कार्यप्रणाली आणि ध्येयधोरणे त्यांनी आपले जीवित-कार्य मानले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाच्या कार्यालयात त्यांची राहण्याची व्यवस्था झाली आणि एक महत्त्वाचा प्रश्न सुटला. मात्र अनुभव तसा कटू आला. जवळच्या मंडळीनी त्यांचे पैसे त्यांना भरीस घालून वापरले.

या काळात बाबूजींनी चहा विकला, भाजी विकली पण त्यातून म्हणावी तशी मिळकत होत नव्हती. अनेक प्रकारे लोकांनी त्यांना वापरले, पण त्यांनी त्यांची निष्ठा ढळू दिली नाही. पण ताण-तणाव, प्रकृतीची आबाळ यांमुळे अखेर आजारपण उद्भवले. मुंबईची हवा मानवत नाही, असा निष्कर्ष काढला गेला. मुंबई मानवेना म्हणून बाबूजींनी मैफिली करत भ्रमंती करायचा निर्णय घेतला. आणि केवळ महाराष्ट्र नव्हे तर अन्य राज्यांतदेखील भ्रमंती केली. निरनिराळ्या प्रकारच्या लोकसंगीताचा अभ्यास केला.

पण पुन्हा तब्येतीने दगा दिला. आजार उलटला आणि ताप येऊ लागला. प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. त्यावेळी त्यांचा मुक्काम गया येथे होता. इथे रेल्वेत गार्ड असणारे भागवत त्यांच्या मदतेला आले. त्यांनी त्यांना मुगलसराई येथे त्यांच्या घरी नेले आणि सक्तीची विश्रांती घेणे भाग पडले. याच मुक्कामात बाबूजींच्या सोबतीला पुन्हा ध्वनिमुद्रिका आल्या. कुंदनलाल सैगल, कृष्णचंद्र डे, काननबाला, खुर्शीद इत्यादीच्या अनेक रेकॉर्ड्स या काळात त्यांनी ऐकल्या. कुंदनलाल सैगल यांच्या गायकीने प्रभावित झाले. ती गायकी त्यांनी आत्मसात केली आणि त्याचे पडसाद त्यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटात पाहायला मिळतात.

बाबुजींचा वैयक्तिक प्रवास असा सतत अस्थिर अवस्थेतून झाला होता. मात्र प्रत्येक खेपेला त्यांनी मिळालेली संधी सोडली नाही. असे म्हणतात की, चार दार बंद होतात, त्यावेळी परमेश्वर एक दार उघडे ठेवतो. बाबूजींचे संघर्षाचे हे दिवस खूप काही सांगून जातात. पण अखेर तो दिवस आलाच...

३.

बाबूजींच्या पहिल्यावहिल्या ध्वनिमुदिकेची कथा अशीच एक संधी होती. हे खरे आहे की, त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ते घडले असे! एच.एम.व्ही. कंपनीच्या वसंतराव कामेरकर यांच्यामुळे ते घडले, ते माधवराव पातकर यांच्या घरी. एक अफलातून योग असा होता की, पातकर यांच्या घरी त्यादिवशी अप्रतीम योग जुळून आला होता... कंपनीचे अधिकारी तर होतेच, पण त्याशिवाय शाहीर पिराजी सरनाईक, शाहीर हैदरली आणि गदिमा यांच्यासारखे दिग्गज एकत्र आले होते. याच बैठकीचे फलित म्हणून ‘दर्यावरी नाच करी होडी, कशी भिरभिरी...’ आणि ‘दूर रे किनारा, सागरी पिसाटला वारा’ ही दोन दर्यागीते बाबूजींकडून गाऊन घेतली. आणि त्यांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या. नशीबाचा भाग असा की, या रेकॉर्ड्स खूप खपल्या आणि लोकप्रिय झाल्या.

ही दोन दर्यागीते आणि गदिमांची झालेली ओळख पुढे अर्थात आयुष्यभर फलदायी ठरली. पुढची दोन वर्षे बाबूजींनी कंपनीत काम केले. आता ते अधिकृत कंपनीचे अधिकृत संगीतकार होते. एच.एम व्ही. कंपनीत त्या काळी अनेक प्रतिभावंत येत असत. हिराबाई बडोदेकर, माणिक दादरकर, वासंती, पद्मा पाटणकर (याच पद्मा पाटणकर पुढे सौ. गदिमा झाल्या), सरस्वती राणे, जे. एल. रानडे, यांच्या साठी गाणी करण्याची संधी बाबूजींनी याच काळात घेतली. हिराबाई बडोदेकर यांना ते गुरुस्थानी मानत. पण त्यांनी सर्व समजून संगीतकार म्हणेल त्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड केली, हे बाबूजी आदरपूर्वक नमूद करतात. ‘विनवीत शबरी रघुरायाला’ आणि ‘नाच रे ब्रिजलाला’ ही हिराबाईंची गाणी खूप लोकप्रिय झाली होती. एच.एम.व्ही.शी निर्माण झालेल्या या संबंधामुळे एक दिवस त्यांचा संबंध ‘प्रभात’शी आला. संगीतकार बाबूजींचा पहिला चित्रपट होता- ‘गोकुल’!

आणि येथूनच बाबूजींची संगीतकार म्हणून प्रतिमा तयार झाली. ‘रुक्मिणी-स्वयंवर’, आगे बढो’, सीता स्वयंवर, संत जनाबाई इत्यादी चित्रपटामुळे ते प्रकाशात आले. त्यांच्या कामाची पद्धत, चौकटीतील शिस्त, आणि विशेष म्हणजे त्यांची व्यावसायिकता, ही त्यांना परिस्थितीने शिकवलेली होती. त्यामुळे मग, पुढे यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. ‘वंदे मातरम’, ‘जीवाचा सखा’, ‘माया बाजार’, ‘पुढचं पाउल’ आणि ‘जशास तसे...’ असे एकापेक्षा एक यशस्वी, संगीत-प्रधान चित्रपट आले. ही ‘सुधीर फडके युगा’ची सुरुवात होती.

सुरुवातीच्या ‘गोकुळ’च्या वेळी त्यांची ओळख माणिक दादरकर यांच्याशी झालेली होती. साहजिकपणे सुरुवातीला माणिक दादरकर यांनी बाबूजींची अनेक गाणी केली होती. चित्रपटाबाहेरदेखील ‘गळ्याची शपथ तुला जिवलगा’, ‘सावळाच रंग तुझा’, ‘बहरला पारिजात दारी’, ‘वाजवी पावा गोविंद’ अशा अनेक गाण्यांची आठवण सहजपणे येते. अर्थात बाबूजींचा संगीतकार म्हणून विचार केला तर, आशा भोसले यांच्या गाण्यांची संख्या अधिक नक्कीच आहे. आशा भोसले यांनी सुधीर फडके यांची १९२ गाणी गाईली आहेत. इतर गायिकांची गाणी अशी आहेत- माणिक दादरकर (वर्मा) - ४५, लता मंगेशकर - ४५, ललिता फडके - ६६, सुमन कल्याणपूर - २९, मालती पांडे -३१

४.

बाबूजींच्या चित्रपटगीतांची दुनिया विविधरंगी आहेच, पण त्याचबरोबर, त्यांच्या भावगीत, भक्तीगीत यांची लोकप्रियतादेखील चकीत करणारी आहे. मराठी भावगीतांचा विषय कुठेही निघाला किंवा आठवला गेला तर सुधीर फडके यांचीच गाणी आठवली जातात. ‘तोच चंद्रमा नभात’ (शांता शेळके), ‘ते स्वप्न भाववेडे’ (वंदना विटणकर), ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘डोळ्यामधले आसू पुसती’, ‘अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेउनी जाती’ (सर्व मंगेश पाडगावकर) या आणि अशा अनेक भावगीतांची आठवण पुसता येणे शक्य नाही! मात्र चित्रपट हेच बाबूजींचे मोठे कार्यक्षेत्र होते हे खरे.

बाबूजींचे चित्रपट १९४६ पासून असले तरी त्यांचे नाव झाले ते १९४८ साली प्रदर्शित झालेल्या ‘वंदे मातरम’मुळे. ग.दि. माडगुळकर, पु. ल. देशपांडे आणि बाबूजी (या तिघांची जन्मशताब्दी यंदा आपण साजरी करत आहोत) ही त्रयी या चित्रपटात एकत्र आली. पुल आणि सुनीताबाई यांनी त्यात भूमिका तर केल्याच होत्या, पण त्याचबरोबर पुलंनी संगीतकार बाबूजींसाठी तीन गाणी स्वत: म्हटली होती. गदिमा आणि बाबूजी यांच्या प्रथम भेटीची हकीकत वेगळी आहे, हे खरे पण इथून गदिमा यांनी सतत बाबूजींना साथ दिली. गदिमांनी त्यांच्यासाठी एकंदर ३३२ गाणी लिहिली. वास्तविक गदिमा आणि बाबूजी ही संपूर्ण विसंगत जोडगोळी होती. दोघांची विचारधारा, राजकीय मते आणि व्यक्तिमत्त्व पूर्ण वेगळे होते, पण या बाबी त्यांनी कधीही गीतसंगीताच्या दुनियेत येऊ दिल्या नाहीत. इतकेच नाही तर, आपल्याकडील श्रेष्ठ ते एकमेकांना दिले.

‘रुणझुणुत्या पाखरा’ (जीवाचा सखा-मालती पांडे),“हे वदन तुझे की कमळ निळे’ (सीता-स्वयंवर-मालती पांडे), ‘मनोरथा चल त्या नगरीला’ (सीता स्वयंवर-मालती पांडे), ‘विझले रत्नदीप नगरातले’ (माया बाजार-मालती पांडे), ‘चला सख्यानो हलक्या हाते’ (माया बाजार-ललिता फडके) ही सुरुवातीची गाणी तुफान लोकप्रिय झाली. त्यानंतर बाबुजींच्या आणखी दोन गाण्यांनी कहर केला. ‘जाळीमंदी पिकली करवंद’ (पुढचं पाउल- माणिक वर्मा) आणि ‘रंगू बाजारला आते हो जाऊ द्या’ (वंशाचा दिवा- वसंतराव देशपांडे आणि ललिता फडके) ही ती दोन गाणी.

‘रंगू बाजारला जाते’च्या संदर्भात एक मजेदार किस्सा आहे. एक गावकरी हे गाणे म्हणत शेताच्या बांधावरून चालला होता. हा महिलांची छेड काढतोय या समजुतीने त्याला लोकांनी बेदम चोप दिला होता. यात अखेर खून झाला आणि प्रकरण भलतेच पेटले होते. खुद्द बाबूजींनी ही हकीकत सांगितली होती. ‘जाळीमंदी पिकली करवंद’ हे सदाबहार गाणे आज कित्येक कार्यक्रमात लहान लहान मुलेदेखील निवडत आहेत, हे आपण पाहतोच आहोत.

‘लाखाची गोष्ट’ हा बाबुजींचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट. यामधील...‘माझा होशील का...’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. गदिमांना नेहमी हा प्रश्न पडे की, एखादे गाणे असे अफाट लोकप्रिय का व्हावे? हा प्रश्न त्यांनी एका भेटी दरम्यान बाबुजींना विचारला होता. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर फार नेमके आहे, आणि एक संगीतकार म्हणून त्यांनी चित्रपटाच्या सर्व अंगांचा विचार केला होता हेच दर्शविते. ते म्हणाले... “गाण्यासाठी गाणे देण्याची आपली सवय आपण बदलायला हवी. चित्रपटातून गाणे काढले तर कथा अडून बसली पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्याकडे असे होत नाही. जबरदस्तीने गाणे घालायचे असा खाक्या असेल तर कसे चालेल? त्यात पुन्हा वादकांच्या तालमी होत नाहीत. ते ऐनवेळी येणार... ध्वनिमुद्रणाचे स्टुडियो दर डोक्यात असतात. मग प्रत्येक गाणे हे ‘माझा होशील का’सारखे कसे होईल?” 

गंगाधर महाम्बरे यांनी हा किस्सा त्यांच्या पुस्तकात दिला आहे. बाबूजींना तेवढीच साहित्यविषयक जाणदेखील होती. त्यांच्या मते गीतातील पन्नास टक्के यश हे गीतकाराचे असते. त्यांनीच एका ठिकाणी तसे म्हटले होते. त्यांनी या यशाकडे आणि लोकप्रियतेकडेदेखील शंभर टक्के व्यावसायिक दृष्टीने पाहिले हे खरे, परंतु त्याचबरोबर हेदेखील खरे की, त्यांनी स्वत:चा बाज आणि सातत्यदेखील कायम ठेवले. भावगीत असो, भजन, भक्तीगीत असो, चित्रपट-गीत असो, किंवा लावणी असो, त्यांनी अस्सलपणा राहील याची खबरदारी कायम घेतली. 

खरे तर, या दरम्यान मराठी चित्रपट कात टाकत होता. ऐतिहासिक आणि ग्रामीण बाज कमी होत किंचित का होईना, चित्रपट शहरी बाजाकडे वळला होता. ‘वहिनीच्या बांगड्या’ (भाग्यवती मी भाग्यवती- मोहनतारा अजिंक्य), ‘पाखराचे विश्व माझे’ (इन मीन साडेतीन-माणिक वर्मा), ‘उन्हपाऊस’ ( खेड्यामधले घर कौलारू- आशा भोसले), ‘पोस्टातील मुलगी’ (ते माझे घर ते माझे घर- आशा भोसले), ‘शेवग्याच्या शेंगा’ (धरणी मुकली मृगाच्या पावसाला- लता मंगेशकर), ‘माझे घर माझी माणसे’ (आज सुगंधित झाले जीवन-लता मंगेशकर) अशी अनेक गाणी त्या बदलाची साक्ष आहेत.

१९५६-५७ पासून बाबूजींनी मागे वळून पाहिलेच नाही हेदेखील सत्यच आहे. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटाबद्दल वेगळे काही बोलण्याची गरजच नाही. एक चित्रपट म्हणूनदेखील तो सर्व अंगांनी अफलातून होताच, पण बाबूजींची सर्व गाणी केवळ अप्रतिम अशीच होती. त्याची आठवण आपण कधीच विसरू शकणार नाही. मराठी चित्रपटाच्या इतिहासात ‘जगाच्या पाठीवर’ची नोंद न घेता कुणी पुढे सरकूच शकणार नाही. तीच गोष्ट ‘सुवासिनी’ (१९६१) या चित्रपटाची. ‘हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता’ हे गाणे कसे विसरता येईल? या चित्रपटात बाबूजींनी पारंपरिक बंदिशीचा एक यशस्वी प्रयोग केला होता. भीमसेन जोशी आणि ललिता यांची ‘आज मोरे मं लंगरवा  लाग्यो’ ही तोडी रागातील चित्रपटातील ही बंदिश आज कुठे फारशी ऐकायला मिळत नाही, पण बाबुजींच्या प्रतिभेचे ते एक उदाहरण म्हणून कायम लक्षात राहील. या नंतर या स्मरण-यात्रेत ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाचा उल्लेख हा करावाच लागेल. तसेच ‘एकटी’ (१९६१) मधील ‘लिंबलोण उतरू कशी’ (सुमन कल्याणपूर) या गाण्याचादेखील.

मुगलसराई येथील मुक्कामात बाबुजींनी कुंदनलाल सैगल यांच्या रेकॉर्ड्स ऐकल्या होत्या, त्याचा खोलवर परिणाम त्यांच्यावर झालेला होताच. सैगल-गायकीचे ही छटा बाबुजींनी ‘हा माझा मार्ग एकला’मध्ये नेमकी वापरली होती. हे शीर्षक गीत ऐकताना ‘दुख के अब दिन बीतत नाही...’ या सैगल यांच्या गाण्याची छटा जाणवते. आणि हेदेखील खरे की ती केवळ कुंदनलाल सैगल यांची नक्कलदेखील नाही. आपल्या आवाजाचा पोत कसा आहे याची नेमकी जाणीव बाबूजींना होती. खरे म्हणजे त्यांची गायकी ही अनेकांपेक्षा वेगळी आहे. ‘अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले’सारखे गाणे स्वतंत्रपणे ऐकून पहा, म्हणजे त्यातील वेगळेपण काय आहे हे लक्षात येईल. त्यांच्या स्पष्ट उच्चाराबद्दलदेखील आश्चर्य वाटते. इतर कुठलाही गायक तसे उच्चार करत नाही. ‘धुंद येथ मी स्वैर झोकतो मद्याचे प्याले...’ या गाण्यात या उच्चाराचे महत्त्व कळते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

५.

बाबुजींच्या एकंदर प्रवासात ‘गीत-रामायण’ हा एक महत्त्वाचा टप्पा होता. १९५५ साली ‘गीत-रामायण’ रेडियोवरून प्रसारित होऊ लागले आणि संगीतकार म्हणून बाबूजींनी एक नवा अध्याय लिहिला. गदिमा यांचे शब्द, प्रभाकर जोशी आणि आण्णा जोशी यांची वाद्य-साथ, बंडा जोशी यांचे निवेदन हा सगळा प्रकार मराठी माणसांनी डोक्यावर घेतला. मात्र इथे एक खंतदेखील व्यक्त केली पाहिजे. रेडियोवरील ते ‘गीत-रामायण’ ज्यात अनेक गायक होते, ते आज ऐकायला मिळत नाही. बाबूजींनी ते जाहीर कार्यक्रमात परिवर्तीत केले आणि आज आपण बहुतेक वेळा सगळे तेच ऐकत आहोत. ध्वनिफिती आणि सीडीजवर तेच आले आहे. मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, ललिता फडके, बबनराव नावडीकर, सुमन माटे, कुमुदिनी पेडणेकर, सुरेश हळदणकर, माणिक वर्मा, गजानन वाटवे, वसंतराव देशपांडे, मालती पांडे, योगिनी जोगळेकर, आणि लता मंगेशकर इत्यादी गायकांचे ते मूळ ‘गीत-रामायण’ आज का दुरापास्त आहे, हे  एक कोडेच आहे. त्यावेळी घडलेल्या घटना, त्यातील किस्से, गायकांचा आणि गदिमांचा सहभाग यांच्या ते आख्यायिका आपण ऐकत आहोत.... मात्र मुळातील ते ‘गीत-रामायण’ फार क्वचित ऐकू येते. बाबूजींच्या चित्रपटगीतांपेक्षा भावगीतांची संख्या नक्कीच कमी आहे हे खरे, मात्र जाहीर कार्यक्रमातून त्यांची तीच तीच गाणी ऐकवली जातात. पण त्यामुळे नितांत सुंदर अशी अनेक भावगीते आणि चित्रपट-गीते विनाकारण मागे पडतात.

इतकेच नाही, तर बाबुजींच्या संदर्भातील आणखी एक दुर्लक्षित कोपरा मला आठवतो. तो म्हणजे त्यांची हिंदीतील कार्य. वास्तविक बाबूजींची कारकीर्द सुरू झाली ती हिंदीतच. ‘मालती-माधव’, ‘भाभी की चुडिया’, या दोन चित्रपटाची सुप्रसिद्ध गाणी अधूनमधून ऐकवली जातात. ‘बांधे प्रीत फुलडोर’, ‘लौ लगाती गीत गाती’, ‘ज्योती कलश छलके’ (लता मंगेशकर) ही गाणी आठवली जातात, पण इतर गाण्यांचे काय? रेडियो सिलोनमुळे ‘खुश है जमाना आज पहिली तारीख है’ (पहिली तारीख-किशोर कुमार) हे गाणे प्रत्येक एक तारखेला ऐकायला मिळते. अनेक लोकांना हे गाणे बाबूजींचे आहे याचा पत्ताच नाही. सहज एक आठवले ते असे की, याच ‘पहिली तारीख’मध्ये ललिता फडके यांचे एक गाणे आहे – ‘हिसाब जरा सुनते जाना जी आज पहिली तारीख को...’ हेदेखील एक भन्नाट गाणे आहे, पण ते कधीच ऐकायला मिळत नाही.

वास्तविक ही गाणी बाबूजींच्या पठडीतली नाहीत, पण त्यांनी ती फारच सुरेख केली आहेत. याशिवाय ‘गोकुळ’, ‘संत जनाबाई’ (हिंदी-मराठी दोन्ही भाषेत), ‘मालती माधव’, अशा गाण्यांचे काय? ‘मन सौंप दिया अंजानेमे’ (मालती माधव-लता मंगेशकर), ‘ऐसे है सुख सपाने हमारे’ (रत्नघर-लता मंगेशकर), ‘जारे चंद्र...’ (सजनी-लता मंगेशकर), ‘कहां उ चाले है मं प्राण मेरे’ (भाभी की चुडिया-मुकेश-लता) या गाण्यांची आठवण कुणाला आहे की नाही?

हिंदीमधील एकंदर १४२ गाण्यांची नोंद बाबूजींच्या गीतकोशात आहे. हिंदीमध्ये त्यांची गाणी कवी प्रदीप, कमर जलालाबादी, मधुकर राजस्थानी, भरत व्यास, पं. मुख्रराम शर्मा, अमर वर्मा यांनी लिहिली आहेत. गायकांची यादी जरी पाहिली तरी त्यांच्या संगीतातील वैविध्य लक्षात यावे. हिंदीमध्ये बाबुजींनी किशोरकुमार, जी. एम. दुर्रानी, खुर्शीद, माणिक दादरकर, महम्मद रफी, मन्ना डे, मुकेश आणि लता मंगेशकर इत्यादी गायकांना गाणी दिली आहेत. मात्र २७-२८ चित्रपटांचा हा ऐवज बाबूजींवर प्रेम करणाऱ्या मंडळीनी देखील लक्षात घेतला नाही याचे आश्चर्य वाटते. निदान बाबुजींच्या जन्मशताब्दी वर्षांत तरी बाबूजींचे हे दुर्लक्षित क्षण रसिकांच्या समोर यावेत.

बाबूजींची संघावर, संघ-विचारांवर मोठी निष्ठा होती आणि अनेक अनुभवानंतर देखील ती अबाधित होती. गोवा मुक्ति-संग्राम, मोहन रानडे सुटका प्रकरण आणि अयोध्येचे राम-मंदिर प्रकरण या सगळ्या चळवळीतून त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक वेळा ते भूमिगत कारवायामध्ये सामील होते. त्या दरम्यान त्यांचा एकही चित्रपट आला नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एकारलेपण घेऊनच त्यांनी चित्रपट-संगीताचा हा संसार मांडला आणि यशस्वीसुद्धा केला. हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटविश्वात त्यांचा उत्तम संपर्क होता. विशेष महत्त्वाची घटना म्हणजे बाबूजी आणि ललिता देऊळगावकर यांचा विवाह संपन्न होत असताना मंगलाष्टके खुद्द महम्मद रफी यांनी म्हटली होती. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांचादेखील खूप जिव्हाळ्याचा संबंध होता. अखेरच्या दिवसात त्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील चित्रपटाचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण देखील केले हे आपण जाणतोच.

ग्रामोफोन, पाध्येबुवा, हिराबाई आणि बालगंधर्व या सर्वांना त्यांनी आपले गुरू केले होते. विशेष म्हणजे हिराबाई आणि बालगंधर्व हे दोघेही त्यांच्या संगीतात गायलेदेखील. त्यांनीदेखील आपले थोरपण विसरून शिकवलेले गाणे सादर केले. हे भाग्य अफाटच. एक काळ मराठी सिनेमाच्या बाबतीत असा होता की, बाबूजींशिवाय मराठी सिनेमाची ओळखच नव्हती. मराठीमध्ये इतर प्रतिभावंत संगीतकारदेखील त्यांना समकालीन होते, मात्र एक वर्ग असाही होता की, बाबूजींशिवाय मराठी चित्रपट म्हणजे ‘श्रीरामाशिवाय रामायण’ असे म्हणले जाई. याहून अधिक मोठे साफल्य काय असू शकते!

.............................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Vividh Vachak

Sat , 19 January 2019

खूपच सुंदर लेख. बाबूजींच्या संगीतविषयक कर्तृत्वाचा संपूर्ण आणि चौफेर आढावा घेतलात. गीत रामायणाच्या रेकॉर्डस् या आकाशवाणीसाठी केलेल्या असल्याने त्या पुणे केंद्राच्या संग्रहात फक्त मिळतील कारण त्या कधीही खुल्या बाजारात उपलब्ध होत नसत. आणि कधी कधी काही दळभद्री केंद्रांनी त्यांची कवडीमोलाने विक्री केल्याचेदेखील प्रसंग घडलेत. तेव्हा आकाशवाणीशी संपर्क साधून ज्यांची या क्षेत्रात ओळख आहे त्यांनी त्या शोधून काढल्या पाहिजेत.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख