‘#MeToo’ : तरुण तेजपाल ते मुबश्शर अकबर!
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर
  • तरुण तेजपाल आणि एम. जे. अकबर
  • Mon , 22 October 2018
  • पडघम माध्यमनामा मी टू #MeToo तरुण तेजपाल Tarun Tejpal एम. जे. अकबर M. J. Akbar

नामवंत पत्रकार एम. जे. अकबर यांनी अखेर केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला! खरं तर तो त्यांनी आधीच दिला/घेतला असता तर ‘पार्टी वुइथ डिफरन्स’ म्हणवून घेणार्‍या भाजपच्या दुटप्पी नैतिकतेशी ते सुसंगत ठरले असते, पण ना तो त्यांनी लगेच दिला, ना त्यांच्या पक्षानं तो घेतला. राजकीय पक्ष आणि राजकारणी किती निर्ढावलेले आहेत, याचं मन विषण्ण करणारं उदाहरण म्हणजे अकबर यांचा राजीनामा आहे. कारण ही ‘अकबरी’ वृत्ती सर्वपक्षीय आणि राष्ट्रीय आहे! अकबर यांच्या इनिशियल्समधील ‘एम’ म्हणजे मुबश्शिर/मुबश्शर हा मूळ अरबी शब्द असून त्याचा अरबी भाषेतील अर्थ आहे ‘सुवार्ता घेऊन येणारा’. अरबी भाषेत तो शब्द ‘मुबशिर’ असा उच्चारला जातो. भारतीय ‘मुबशिर’ अकबर मात्र अनेक महिला सहकार्‍यांसाठी ‘कुवार्ता’ आणणारा आणि कुकृत्य करणारा पुरुष ठरलेला आहे!

अकबर यांच्या संदर्भातील बातम्या वाचत असताना ‘तहलका’चे सर्वेसर्वा तरुण तेजपाल यांची आठवण होणं अपरिहार्य आहे. २०१३च्या नोव्हेंबर महिन्यात तरुण तेजपाल यांना एका महिला सहकार्‍याचा (तिनं धाडसानं पुढे येऊन केलेल्या तक्रारीच्या आधारे) लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून अटक झाली, तेव्हा माध्यमांत मोठ्ठा भूकंप झाला होता. तेव्हा मी दिल्लीत होतो आणि आणि त्या सनसनाटी नाट्याचा एक साक्षीदार होतो. तेव्हा दिल्लीतील अनेक ज्येष्ठ सहकारी म्हणत, ‘नये हो दिल्ली में, इस शहर में तेजपाल की फसल है’. तेव्हा मी ‘आणखी किती तेजपाल’ असा मजकूर ‘लोकमत’ या दैनिकातील माझ्या ‘दिल्ली दिनांक’ या सदरात लिहिला तेव्हा महाराष्ट्राच्या माध्यमांतही असे अनेक ‘तेजपाल’ कसे बहुसंख्येनं आहेत, याबद्दल अनेकींनी माहिती दिली होती; अनेकांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली होती, तर अनेक अस्वस्थ झालेले होते.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

पेड न्यूज, गळेकापू स्पर्धा, धंदेवाईक व्यवस्थापन आणि समाज माध्यमांनी उभ्या केलेल्या आव्हानांमुळे तशीही माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात आलेली असताना ‘तेजपाल ते अकबर’ या व्यापक घृणास्पद पटामुळे माध्यमांची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे, हाही याचा आणखी एक निष्कर्ष आहे.   

||१||   

आधी तो ३० नोव्हेंबर २०११३ अंकात प्रकाशित झालेला मजकूर असा -

लबाडी तोकड्या चादरीसारखी असते, तोंडावर ही चादर ओढून घेतली की पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर तोंड उघडे पडते अशी एक म्हण मराठवाड्यात प्रचलित आहे. तरुण तेजपाल नावाच्या पत्रकाराचा उदय आणि सध्याचा झालेला लोचा बघताना या म्हणीची प्रचीती येते. १५ मार्च १९६३ रोजी एका सैनिकी अधिकाऱ्याच्या घरात जन्माला आलेल्या तरुण नावाच्या मुलाने पुढे अर्थशास्त्रात पदवी संपादन केल्यावर एक पत्रकार होण्याचे स्वप्न पाहिले. त्याला नोकरीची पहिली संधी दिल्लीत मिळाली. (ती ज्याने दिली, त्याच्याच मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा गुन्हा या तरुण तेजपालविरुद्ध आता दाखल झाला आहे.) उमेदवारीच्या काळातच तेजपालांनी जोरजोरात हात-पाय मारणे सुरू केले. एक प्रकाशन संस्था सुरू केली. याच संस्थेच्या वतीने अरुंधती रॉय यांची बुकर पारितोषिक विजेती कादंबरी प्रकाशित झाली.

गेल्या पन्नास वर्षांत सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रांत अनेक बदल झाले, यंत्र आणि तंत्र बदलले. पंतप्रधानपदी नरसिंहराव आणि अर्थमंत्रीपदी मनमोहनसिंग असताना नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभी आपल्या देशाला जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा रेटा बसला. हा रेटा इतका जोरदार होता की, त्यामुळे आलेल्या बदलाची गती भोवंडून टाकणारी होती. तोवर नजरेच्या टप्प्यात नसणाऱ्या चांगल्यासोबतच वाईट बाबीही केव्हा कवेच्या अंतरावर आल्या हे कळले नाही. जग हे एक खेडे झाले. सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही जगण्याचे संदर्भ बदलले. त्यासोबत समाजाची मानसिकता तसेच गरज बदलत गेली. या अतिप्रचंड बदलांचे पडसाद पत्रकारितेवर होणे अपरिहार्यच होते. याच काळात मीडियाचा मुद्रित ते इलेक्ट्रॉनिक्स  असा विस्तार आणि ‘मिशन ते प्रोफेशन’ असा प्रवास झाला.

या बदलात स्टिंग नावाचे परीस हाती लागल्यावर तरुण तेजपाल या  स्टारचा पत्रकारितेत झंझावाती उदय झाला. स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ‘तहलका’ नावाने तेजपाल यांनी भारतीय समाजासमोर पत्रकारितेचा एक नवा पैलू सादर केला. सुरुवातीच्या काळात काही शासकीय खात्यातील आर्थिक गैरव्यवहारांची प्रकरणे खऱ्या अर्थाने तहलका माजवणारी आणि तेजपाल यांची लोकप्रियता शिगेला पोहोचवणारी ठरली. वयाच्या अवघ्या चाळीशीत तेजपाल पत्रकारितेत प्रवेश करणाऱ्या भारतातल्या पिढीचे आयकॉन ठरले. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे केलेले स्टिंग, तेजपाल यांच्या कर्तृत्वाचा कळसाध्यायच होता.

मात्र या कळसावर टिकून राहण्यात तेजपाल अयशस्वी ठरले. स्टिंग पत्रकारिता तारतम्य बाळगून झाली नाही तर बुमरँगसारखी उलटू शकते याचे विस्मरण तेजपाल यांना झाले. ते जसे स्टिंग करू शकतात, तसेच इतरही करू शकतात याचे भान तर सुटलेच, पण त्यासोबत स्टिंग करण्याचा धंदा सुरू झाला. कारण ते काही मतलबी राजकारण्याच्या हातात गेले, त्यांच्या  इशाऱ्यावर नाचू लागले. सत्तानिष्ठ राजकारणी आणि केवळ धनवृद्धीचा विचार करणाऱ्या धनवंतांना अशा कठपुतळ्या हव्याच असतात. त्यांच्या सत्ता संपादन आणि धनवृद्धीचा खेळ खेळण्यासाठी अशा या कठपुतळ्या त्यांच्या तालावर नाचवणे हा त्यांचा चाळा असतो. या कठपुतळ्या सोयीप्रमाणे बदलणे, हा या खेळाचा अलिखित नियमच असतो. या खेळाचा नेमका हाच नियम तेजपाल विसरले आणि मोहाच्या बहुपाशात अडकले.       

तेजपाल यांना या खेळातून पैसा भरपूर मिळू लागला, संपत्ती वृद्धिंगत करण्याची त्यांनाही चटक लागली. त्यापुढचे पाऊल म्हणजे ‘पेज थ्री’ संस्कृतीच्या झगमगत्या तसेच विलासी विळख्यात तेजपाल अडकले. त्या ऐशोआरामी जगण्याची चटक लागल्यावर, आहे त्यापेक्षा श्रीमंत होण्यासाठी ‘काय वाट्टेल ते’ अशी धारणा असलेल्याच्या गटात तेजपाल यांचा प्रवेश झाला. दिल्लीचे पाणी भल्याभल्यांच्या सात्त्विकतेचा भंग करणारे आणि दुर्वर्तनाच्या मायाजालात गुरफटवून टाकणारे आहे. त्याला तेजपालांचा अपवाद ठरले नाहीत.  घोंगावणाऱ्या वादळात तळहातावरील दिव्याची ज्योत तेवत ठेवण्याचे व्रत म्हणजे पत्रकारिता आहे याचा तेजपालांना विसर पडला, लबाडी हेच व्रत झाले. ‘नेकीचा व्यवसाय’ आणि ‘बनेल धंदा’ यातील सीमारेषा पुसल्या गेल्या, तारतम्याशी फारकत झाली आणि मत्त होण्याच्या मार्गावर त्यांची वाटचाल सुरू झाली, पाहता पाहता वाल्मिकीचा वाल्या झाला!

दिल्लीत असे अनेक ‘तेजपाल’ पत्रकारितेसह सर्वच क्षेत्रांत असल्याच्या दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या आणि आहेत. त्यापैकी तेजपाल नावाच्या अध:पतनाची चर्चा वास्तव म्हणून जगासमोर आली आहे. त्यामुळेच तेजपाल यांचे स्वैर वागणे उघड झाल्यावर बहुसंख्येने व्यक्त झालेली ‘ये तो होना ही था!’ ही प्रतिक्रिया अर्थगर्भ होती. जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेत झालेल्या  मीडियाच्या बदलात स्टिंग नावाचे परीस हाती लागूनही त्याची माती होण्याचे जळजळीत उदाहरण म्हणजे तरुण तेजपाल नावाची प्रवृत्ती आहे. दिल्लीत आता चर्चा आहे ती असे अनेक तेजपाल उघडकीस येण्याची.

||२||

योगायोग असा की तेजपाल यांच्यापेक्षा एम. जे. अकबर यांची पत्रकार आणि लेखक म्हणून कारकीर्द काकणभर सरसच आहे. त्यापेक्षा जास्त वलयांकित त्यांचा राजकीय उदय आहे, तसंच जास्त सुरस त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते प्रवक्ते होते आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून गेले होते. आता ते भाजपच्या मंत्रीमंडळात आहेत आणि त्याच पक्षाचे राज्यसभा सदस्य आहेत. बुद्धिवंतांच्या जमातीतील कुणाचा एवढा विरोधाभासी राजकीय प्रवास अपवादात्मकच असाव. म्हणजे इथंही वैचारिक व्यभिचार आहेच! ‘अकबर कांडा’मुळे भाजपचं फार काही राजकीय नुकसान होण्याची शक्यता नाही. कारण ही कृत्यं अकबर यांनी पत्रकारितेत असताना केलेली आहेत. त्यामुळे अकबर यांच्या त्या कृत्याचं पाप पक्षावर न घेण्याचा पवित्रा घेतला जाऊ शकतो. शिवाय भारतीय राजकारणात असे अनेक सर्वपक्षीय ‘रंगीले रतन’ आहेत.    

उल्लेखनीय म्हणजे तरुण तेजपाल ‘कांड’ घडलं, तेव्हा दिल्लीच्या माध्यमांत ज्या कुणाची नावं त्या यादीत समाविष्ट होत होती, त्यात एम. जे. अकबर यांच्याही नावाची चर्चा तेव्हा होती... शिवाय अजून माध्यमांतील अनेक धक्कादायक नावं त्यात यादीत होती. ती नावं जेव्हा उघड होतील, तेव्हा मला तरी आश्चर्य वाटणार नाही, हे नक्की! 

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

‘मी टू’ मोहिमेला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतो आहे, तो लक्षात घेता या सर्व ‘थोर नरवीर पुंगवां’ची नावं आज ना उद्या एक्सपोज होतीलच याची आता खात्री वाटू लागली आहे. हे ‘थोर’ केवळ दिल्लीतीलच नसतील तर आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमांसकट संपूर्ण देशातील असतील. हे असे उद्योग करणारे धर्म, जात-उपजात-पोटजात, पंथ, विचारविरहित असतात आणि ते सर्वत्र असतात. असे अनेक डावे आणि उजवे, कथित पुरोगामी आणि प्रतिगामी असा तो व्यापक विस्तार आहे आणि ती नावं सर्वांनाच चांगली ठाऊक आहेत!

तेजपाल काय किंवा अकबर काय यांच्याविरुद्ध पुरावे उभे करण्यात त्या स्त्रिया यशस्वी होतील किंवा नाही याबद्दल व्यक्त केली जाणारी शंका काहीशी रास्तच आहे. कारण न्यायालयात नुसतं सत्य बोलून चालत नाही, तर त्या सत्याचं भक्कम समर्थन करणारा पुरावाही लागतो, हेही एक विदारक सत्य आहे. अर्थात अकबर काय किंवा अन्य ‘मी टू’ घटनात बदनामीचं भय न बाळगता पुढे येऊन ‘ब्र’ उच्चारणार्‍या महिलांना त्याची कल्पना नाही असं नाही. तरी शोषणाला बळी पडल्याचा दावा करणार्‍या स्त्रियांची एकजूट पाहता त्या परिस्थितीजन्य पुरावा तरी उभा करण्यात यशस्वी होतील असं आजचं चित्रं आहे.  

‘मी टू’ मोहिमेत पुढे येऊन बोलणार्‍या सर्वच महिला खोटं बोलत आहेत, असा भ्रम बाळगण्यात अर्थ नाही आणि याचा अर्थ हे केवळ माध्यमांतच आहे, या भाबडेपणाच्या कोशात मश्गुल राहण्यात काहीच मतलब नाही. अकबर, तेजपाल आज जात्यात आहेत आणि राजकारण, प्रशासन,  समाजकारण, शिक्षण, सांस्कृतिक समाजाच्या अशा सर्व स्तरातील ‘रंगीले रतन’ सुपात आहेत!

(अरबी भाषा संदर्भ- मोईज हक, नागपूर / महेश देशमुख, औरंगाबाद)

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......