विल्यम शेक्सपिअर : इंग्लंडचं वैभव आणि जागतिक रंगभूमी, जगाचंही!
ग्रंथनामा - झलक
राजेश हेन्द्रे
  • ‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 22 September 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक राजेश हेन्द्रे Rajesh Hendre शेक्सपिअरच्या देशातील कवी Shakespearechya Deshatil Kavi

‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक नुकतेच विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात चॉसर, शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, टेनिसन, येट्स, इलियट, स्पेन्सर, रॅले, सिडनी यांसारख्या कवींची आयुष्य, त्या वेळची परिस्थिती आणि तत्कालिन वातावरणात फुललेली त्यांची कविता यांची ओळख करून दिली आहे. या पुस्तकातील एका लेखाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

जगातील अशी एकही भाषा नसेल की, जिच्यात अजून शेक्सपिअर पोहोचला नाही. जगातल्या अनेक नाटककारांना त्याच्या नाट्यकृतींनी इतकी मोहिनी घातली की, त्यांची अनेक रूपांतरं व माध्यमांतरं काळाच्या पटावर वारंवार जन्म घेत राहिली! पुढे पुढे तर चित्रपटसृष्टीचा पडदाही त्यांनी व्यापून टाकला! त्यांवर अक्षरश: शेकडो चित्रपट निघाले!

विल्यम शेक्सपिअर हा नाटककार आपल्या ५२ वर्षांच्या आयुष्यातील २४ वर्षांच्या काळात ३६ काव्यमय नाटकांना जन्म देऊन जागतिक रंगभूमीवर आपला अमीट ठसा उमटवणारा तसा जगाच्या रंगभूमीवर एकमेवच! जगाच्या रंगभूमीवर सर्व भाषांना स्पर्श केलेला त्याचा गगनभेदी नाट्यपट विलक्षण तेजानं प्रकाशमय झाला, तरी त्याचा जीवनपट रंगभूमीच्या पडद्यामागील गोष्टींसारखा धूसरच राहिला. कारण गेली तीन शतकं लाखो वक्त्यांच्या वैखरीला शब्दांची रसद पुरवणारा हा जीवनाचा महाकवी स्वत:बद्दल बोलायला मात्र विसरला. त्यामुळे मृत्यूनंतरही तो जवळजवळ शंभर वर्षे चर्चेत नव्हता. आता अलीकडे नवीन संशोधनानं बरीच माहिती उजेडात येऊ लागली असली, तरीदेखील शेक्सपिअरचं जीवन एक गूढमय प्रवासच.

शेक्सपिअरच्या जन्मदिनांकाबाबत ठोस पुरावा उपलब्ध नाही; पण २६ एप्रिल १५६४ रोजी स्ट्रॅटफर्डमधील ‘होली ट्रिनिटी चर्च’मध्ये त्याचा बाप्तिस्मा झाल्याची नोंद आढळते. त्या काळी बाप्तिस्मा जन्मल्यावर तीन दिवसांनी करत असत, त्यावरून त्याचा जन्म २३ एप्रिल १५६४ला झाला असावा, असं मानलं जातं. त्याचा जन्म साडेचारशे वर्षांपूर्वी लंडनपासून शंभर मैलांवर असलेल्या ज्या ‘स्ट्रॅटफर्ड-अपॉन-एव्हन’ येथे झाला, ते स्ट्रॅटफर्ड गाव एव्हन नदीच्या काठावर वसलेलं आहे. शेक्सपिअरलाही पुढे ‘Bard-of-Avon’ याच उपाधीनं संबोधण्यात आलं. एव्हन नदी रमणीय होती. आजही आहे. तिच्या काठावरच शेक्सपिअरचं बालपण गेलं. बालपणी या नदीचे प्रवाह त्याच्या मनात वाहिले आणि त्याचं भावविश्व तिनं समृद्ध केलं.

विल्यमच्या बालपणाचा काळ जसा रम्य होता, तसा शिक्षणाचा नव्हता; नाहीतर त्याच्या नावावर पदवीचं शिक्षण तरी लागलं असतं. या विश्वविख्यात प्रज्ञावंतानं प्राथमिक शिक्षणानंतर वयाच्या तेराव्या वर्षीच शाळा सोडली होती, यावर खरोखरच विश्वास बसत नाही. ग्रामर स्कूलमध्ये घेतलेल्या शिक्षणानंतर तो पुढं काही शिकला नाही. याचं कारण बहुधा त्याच्या कुटुंबाची अकस्मात ढासळलेली परिस्थिती असावी. त्या काळात स्ट्रॅटफर्डमधील कित्येक जण अशिक्षित होते. आश्चर्य वाटेल, पण शेक्सपिअरचे आई-वडील, भाऊ-बहीण, बायको, मुलगी, नात कोणालाही लिहिता-वाचता येत नव्हतं. त्याच्या कुटुंबानं पाहिलेली सुरुवातीची सुबत्ता कालपरत्वे अवकळेकडे झुकू लागली, तसा त्याचा सुखमय काळ दु:खात परावर्तित होऊ लागला. आपली मेहरनजर जॉनवर निहायत खुशीनं उधळणाऱ्या भाग्यानं त्याच्याकडं अचानक इतकी पाठ फिरवली की, शहराचा मेयर असलेला हा माणूस पुढे स्वत:च्या भाकरीला महाग झाला. याला खरं तर तोच कारणीभूत झाला होता. सरकारी कामात गैरव्यवहार केल्याची त्याला ही जबर किंमत मोजावी लागली होती. त्यामुळे ज्या नगरपरिषदेचा प्रमुख म्हणून तो तोऱ्यात वावरला, कालपरत्वे तिची पायरी चढण्याची हिंमतदेखील त्याला कधी झाली नाही. पुढं ‘Who can control his fate?’ असं आपल्या ‘ऑथेल्लो’ नाटकात विचारणाऱ्या विल्यमला नशिबाचं दर्शन असं लहानपणीच घडलं. या परिस्थितीत कुटुंबासाठी हातभार लावण्याची जबाबदारी आपोआप विल्यमवर पडली आणि त्याची पावलं नोकरीसाठी एका खाटिकखान्याकडे वळली. या खाटिकखान्यातील नोकरीवर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला.

तारुण्याच्या उभरत्या वयात त्याचं एका बारा-तेरा वर्षांच्या सुंदर मुलीवर प्रेम बसलं. तिचं नाव अ‍ॅन व्हॅटली. याच काळात अजून एक अ‍ॅन त्याच्या आयुष्यात आली- अ‍ॅन हॅथवे. काही जणांच्या मते, या दोन्ही अ‍ॅन एकाच वेळी त्याच्या आयुष्यात आल्या आणि एकीकडे अ‍ॅन व्हॅटलीशी प्रेमालाप चालू असताना दुसरीकडे अ‍ॅन हॅथवेला तो लग्नाची वचनं देत होता. अ‍ॅन हॅथवेला याचा सुगावा लागताच तिनं आकाशपाताळ एक केलं; कारण त्याच्यापासून तिला दिवस गेले होते. अखेर अतिशय बिकट परिस्थितीत २८ नोव्हेंबर १५८२ रोजी त्याचं अ‍ॅन हॅथवेशी वॉर्कस्टरमधील टाऊन हॉलमध्ये घाईघाईनं लग्न झालं. लग्नाच्या वेळी विल्यमचं वय होतं १८ आणि अ‍ॅनचं २६. हे प्रेम त्याच्या बाबतीत जुगारच ठरलं; कारण लग्नानंतर ते प्रेम कुठं हरवलं माहीत नाही; पण तो मनानं अ‍ॅनशी एकरूप होऊ शकला नाही. आपल्या या चुकीची कबुली त्यानं त्याच्या ११६व्या सुनीतात दिल्याचं जाणवतं. त्यात तो म्हणतो-

Let me not to the marriage of true minds

Admit impediments. Love is not love

Which alters when it alteration finds.

अजून ‘अ‍ॅज यू लाइक इट’मध्ये रोझालिंडच्या तोंडून हा प्रेमाचा परिताप व्यक्त करताना त्याने म्हटलंय, ‘Love is merely madness and deserves as well a dark house and a whip as mad men do.’

लग्न झाल्यावर सहा महिन्यांनी २६ मे १५८३ रोजी त्यांना मुलगी झाली. या मुलीचं नाव ठेवलं सुझाना. अ‍ॅननं दोन वर्षांनी २ फेब्रुवारी १५८५ ला हॅम्नेट आणि ज्युडिथ या जुळ्या मुलांना जन्म दिला. या मुलांच्या जन्मानंतर जवळजवळ सात वर्षं शेक्सपिअरच्या आयुष्यावर काहीच प्रकाश पडत नाही; पण या काळात त्याचं मन वाचनातून काव्य आणि नाटकानं भरू लागलं होतं. स्ट्रॅटफर्डच्या गिल्ड हॉल सभागृहात नाटकाच्या खेळांना तो आवर्जून हजेरी लावत होता. अ‍ॅल्टस्टरचे उमराव फुल्क ग्रेव्हिल यांच्याकडे तो काही काळ नोकरीस होता. सर फिलिप सिडनीचे मित्र असलेल्या या ग्रेव्हिलनं त्याच्या भावविश्वाची जडणघडण केली. या काळात तो कितीतरी कामं करत असूनही कुटुंबाचा चरितार्थ म्हणावा तसा चालत नव्हता. त्यातून खाणारी तोंडं वाढली होती आणि मिळणारी कमाई तोकडी पडत होती. अखेर खूप विचार करून त्यानं गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि बायको-मुलांना गावातच ठेवून नशीब काढण्यासाठी त्याच्या पावलांनी लंडनचा मार्ग धरला.

लंडनला आल्यावर त्यानं आपला बालमित्र रिचर्ड फिल्डकडे मुक्काम टाकला. शेक्सपिअरपेक्षा तीन वर्षांनी मोठा असलेला रिचर्ड एका छापखान्याचा मालक होता. वाचन चांगलं असल्यानं सुरुवातीला शेक्सपिअरनं छापखान्यातली प्रुफं तपासारचं काम सुरू केलं. हे काम चालू असताना एके दिवशी चरितार्थासाठी अजून काय करावं या विवंचनेत असतानाच त्याची पावलं अचानक एका नाट्यगृहाकडे वळली. त्या नाट्यगृहाबाहेर उभा असताना एकानं त्याला आपला घोडा नाटक संपेपर्यंत सांभाळण्यास दिला नि त्याबदल्यात पेनी देऊ केली. हे काम त्याला बरं वाटलं. हेच काम थोडे दिवस करू, या विचारानं त्यानं नाटकं बघायला येणाऱ्या प्रेक्षकांचे घोडे सांभाळण्याचं काम सुरू केलं. हे काम पुढे इतकं वाढलं, की, त्याच्या हाताखाली बरीच मुलं ते काम करू लागली. त्यातून त्यामुळे त्याला थोडी उसंत मिळू लागली. नाटकाच्या ओढीनं त्यानं काही काळ डोअरकीपरचं काम केलं. रंगमंचावर सादर होत असलेली नाटकं तो उत्सुकतेनं पाहू लागला. त्यातील संवाद बारकाईनं ऐकू लागला. उतू जाणाऱ्या नजरेनं कलाकारांचा अभिनय न्याहाळू लागला. रंगभूमीवर उतरणारे एक एक रंग आत्मसात करू लागला. नकळत त्यातून त्याची रंगमंचीय जाण वाढू लागली आणि त्याला एखाद्या बदली नटाच्या भूमिकेचं आमंत्रण येऊ लागली. तो ते समर्थपणे पेलू लागला. इतकंच नाही, तर काही नाटकांना थोडीफार डागडुजी करण्याचं कामही तो करू लागला. यातूनच जेम्स बर्बेज आणि रिचर्ड बर्बेज यांच्या नाटक कंपनीत तो स्थिरावला. यातून त्याच्याकडे बऱ्यापैकी पैसा आला. पण केवळ हेच करण्यासाठी विल्यम शेक्सपिअर जन्माला आला नव्हता. अश्वांचे लगाम हातात धरून नाट्यसेवा करणारा विल्यम शेक्सपिअर नावाचा एक सामान्य माणूस पुढे त्याच नाटकाच्या प्रांतात जगाला वेड लावणार होता, इंग्लंडचा एक सर्वश्रेष्ठ मानदंड म्हणून मिरवणार होता आणि अवघ्या देशाला त्याचा भरभरून अभिमान वाटणार होता.

रंगमंचावर त्याची पावलं ठरत असताना अंतर्यामी कुठेतरी अस्वस्थ होत त्याच्यातला नाटककार जागा झाला आणि १५८८ मध्ये ‘किंग जॉन’ नावाचं नाटक लिहून त्यानं आपल्या नाट्यलेखनाचा श्रीगणेशा केला. जमिनीवर अश्वांचे लगाम हाती धरणारा विल्यम या नाटकाच्या रूपानं रंगदेवतेच्या रथात स्वार झाला आणि लगामाला थोडी ढील देऊन त्या रथाचं चाक त्यानं आत्मविश्वासानं हलवलं. पुढे चार-पाच वर्षांत त्याच्या लेखणीतून ‘टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना’, ‘टायटस अँड्रोनिकस’, ‘राजा हेन्री सहावा’, ‘राजा रिचर्ड तिसरा’, ‘टेमिंग ऑफ द श्र्यू’ आदी नाटकं उतरली आणि रंगमंचावर यशस्वीपणे सादर होऊ लागली.

शेक्सपिअरचा हा निघालेला नाट्यरथ आता लंडनच्या रंगभूमीवर थोड्याच दिवसांत मोठ्या दिमाखात चालणार होता, दौडणार होता, उधळणार होता; पण ही वाटचाल म्हणावी तितकी साधी नव्हती. त्या वेळीही अतिशय स्पर्धा असलेल्या या क्षेत्रात कित्येकांची मिरासदारी होती. ख्रिस्तोफर मार्लो, रॉबर्ट ग्रीन, थॉमस नॅश हे व्यावसायिक नाटककार तिथं आधीच ठाण मांडून बसले होते. आत शिरताच त्याला त्यांचे अनेक हेवेदावे अनुभवावे लागले. बेन जॉन्सनसारखे नवनवीन नाटककार आपली नाटकं स्थिरावू पाहत होते. या सर्वांनी त्याचा उघड उघड उपहास केला. त्याला अपमानित केलं; पण शेक्सपिअर त्या सर्वांना पुरून उरला. एखाद्या संताप्रमाणे त्यानं आपली लेखणी एका व्रतस्थ भावनेनं चालवली. कुणालाही त्यानं बोल लावला नाही. एक ‘यशस्वी नाटककार’ होणं हेच त्याच्यापुढे ध्येय होतं. ते त्यानं गाठलं आणि अखेर लंडन हीच त्याच्या आयुष्याची कर्मभूमी ठरली! नंतर बेन जॉन्सनसारखे विरोधक पुढे त्याचे खूप जिवाभावाचे मित्र झाले.

१५९० च्या सुमारास तो लॉर्ड चेंबरलेनच्या कंपनीचा भागीदार झाला. हीच कंपनी पुढे ‘किंग्ज मेन’ नावानं विख्यात झाली. या कंपनीसाठी त्यानं वर्षाला दोन अशी नाटकं लिहिली आणि त्यात अभिनयदेखील केला. त्यामुळे अभिनय, लेखन, नाट्यनिर्मिती आणि कंपनीचा भागधारक अशा अनेक मार्गांनी त्याच्या उत्पन्नाचं कारंजं थुईथुई नाचू लागलं. पैशाचा ओघ जसा वाढत राहिला, तसा त्याच्या यशाचा आलेखही चढत राहिला. यशश्रीनं त्याच्या गळ्यात माळ घातली. याच काळात ‘व्हीनस अँड अ‍ॅडोनिस’ आणि ‘द रेप ऑफ ल्युक्रिसी’ ही दीर्घकाव्यं त्यानं लिहिली.

सोळाव्या शतकाच्या शेवटपर्यंत तर तो चांगलाच स्थिरावला. या नाट्यवैभवाच्या जोरावर त्यानं भरपूर संपत्ती जमवली. यातून १५९७मध्ये त्यानं स्ट्रॅटफर्डला दुसऱ्या क्रमांकांचं मोठं घर खरेदी केलं आणि त्याला ‘ग्रेट हाऊस ऑफ न्यू प्लेस’ नाव दिलं. हे ‘न्यू प्लेस’देखील त्याच्या पहिल्या घरासारखंच तीनमजली होतं. (याच घरात शेक्सपिअरनं आपला अंतिम श्वास घेतला; पण आज ते घर अस्तित्वात नाही.) याच काळात त्यानं अजून दोन थिएटरचे शेअर्स खरेदी केले. १५९९ मध्ये लंडनमध्ये थेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर स्वत:चं ‘ग्लोब थिएटर’ भागीदारीत उभारलं.

शेक्सपिअरनं ‘ग्लोब थिएटर’च्या उभारणीनंतर १६०५ मध्ये स्ट्रॅटफर्डजवळच एक मोठी जमीन चारशे पौंडांना खरेदी केली; जिची किंमत पुढे दुप्पट झाली आणि त्यातून त्याला वर्षाकाठी साठ पौंड मिळू लागले. त्यानंतर त्यानं व्याजानं पैसे देणं सुरू केलं. या आर्थिक स्थैर्याच्या तटबंदीनं त्याची भविष्यासाठी पोटापाण्याची चिंता मिटली; पण त्याहूनही मोलाचं म्हणजे त्याला लिखाणासाठी मोकळा वेळ मिळाला. या काळात त्याच्याकडून ज्या नाटकांची निर्मिती झाली, त्यात ‘ज्युलिअस सीझर’, ‘हॅम्लेट’, ‘ऑथेल्लो’, ‘किंग लियर’ आणि ‘मॅकबेथ’ या अप्रतिम विश्वविख्यात शोकांतिकांचा अंतर्भाव होतो. यांतील एकेक पात्रं जागतिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरली! अखेरच्या काळात त्यानं ‘द विन्टर्स टेल’ आणि ‘टेम्पेस्ट’ या ट्रॅजिक कॉमेडीज लिहिल्या. त्याच्या सगळ्या नाटकांत मानवी जीवनाचे विविध प्रवाह नियतीची गतिमानता घेऊन खळखळून वाहतात.

नाटकांच्या या प्रचंड पसाऱ्यात शेक्सपिअरचं काव्य अडगळीत पडलेल्या पण मौल्यवान सामग्रीसारखं दुर्दैवानं दुर्लक्षिलं गेलं आहे. ‘व्हीनस अँड अ‍ॅडोनिस’ आणि ‘द रेप ऑफ ल्युक्रिसी’ या दोन दीर्घकाव्यांबरोबरच एक सुनीतकार म्हणून त्यानं इंग्रजी काव्यात घातलेली मोलाची भर लक्षात घेतली गेली नाही. नाटक ही कला त्याच्या दृश्यात्मतेमुळे नेहमीच लवकर प्रसिद्ध होते; तसं काव्याचं होत नाही. त्यामुळे शेक्सपिअरचं काव्य बाजूला पडलं असावं. ‘व्हीनस अँड अ‍ॅडोनिस’ या काव्याची प्रेरणा त्याला ओविडच्या ‘अ‍ॅडोनिस’वरून मिळाली. पुरुष सौंदर्याचा आदिबंध असलेल्या अ‍ॅडोनिसवर सौंदर्यदेवता व्हीनस अनुरक्त होते. अ‍ॅडोनिसला शिकारीची आवड असते. एका प्रसंगात व्हीनसनं केलेली कामपूर्तीची मागणी धुडकावून अ‍ॅडोनिस तिनं दिलेल्या धोकेवजा इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून जंगलात शिकारीसाठी जातो. शिकार शोधत असताना एक मोठं रानडुक्कर त्याच्या नजरेच्या टापूत येतं आणि तो मोठ्या वेगानं त्याचा पाठलाग करू लागतो. हा पाठलाग चालू असताना एका बेसावध क्षणी अचानक ते रानडुक्कर मागं फिरून अ‍ॅडोनिसवर उलट हल्ला करतं आणि आपल्या धारदार सुळ्यांनी भोसकून त्याला जखमी करतं. व्हीनसला ही खबर कळल्यावर ती दु:खावेगानं जंगलात येते. जखमी अ‍ॅडोनिसचं मस्तक मांडीवर घेऊन विलाप करू लागते. तिच्या मांडीवर अ‍ॅडोनिस प्राण सोडतो. जिथं अ‍ॅडोनिस पडलेला असतो, तिथल्या मातीत त्यांच्या रक्ताचे ओघळ तिला दिसतात. ती त्या रक्तबिंदूंवर अमृत शिंपडते. तेव्हा त्या रक्तरंजित मातीतून एक जांभळ्या रंगाचं फूल उगवतं. अ‍ॅडोनिसच्या स्मृतीची ही मरणोत्तर प्रेमभेट म्हणून व्हीनस ते फूल खुडून घेते आणि नित्यासाठी आपल्या हृदयाजवळ बाळगण्याचा निर्धार करत आपल्या ‘पॅफोसा’ या ठिकाणी निघून जाते. या कथेतून फुललेलं हे १९९ कडव्यांचं काव्य शेक्सपिअरनं ओविडपेक्षा वेगळ्या प्रकारे मांडलं आहे. व्हीनसचा अनावर वासनाआवेग आणि अ‍ॅडोनिसचा पराकोटीचा संयम याचं दर्शन त्यानं कल्पकतेनं घडवलं आहे.

तसंच ‘द रेप ऑफ ल्युक्रिसी’बद्दलही. ल्युक्रिसी ही कोलॅनिटस या रोमन वीराची पत्नी. पतिव्रतेच्या पवित्र पायरीला पोहोचलेल्या ल्युक्रिसीच्या रूपसंपन्न सौंदर्याची कीर्ती ऐकून रोमचा बादशाह टार्किनचं हृदय तिच्या भेटीसाठी उचंबळतं. तिला भेटण्यासाठी तो कॅलशियम इथल्या तिच्या घरी येतो. तिचं लावण्य पाहून त्याचे डोळे विस्फारतात! आणि तिच्या प्राप्तीसाठी तो तिच्या मिनतवाऱ्या करू लागतो. तिला नाना प्रलोभनं दाखवतो. पण ती कशालाच बधत नाही हे पाहून एक दिवस तडक तिच्या घरात घुसतो आणि तिच्यावर बलात्कार करून निघून जातो. ल्युक्रिसी आक्रंदून उठते. चार भिंतीत गुदमरलेलं तिचं रुदन शमल्यावर ती एका वज्रनिर्धारानं पत्र पाठवून कोलॅटिनसला बोलावून घेते आणि त्याला सगळं सांगून आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. या घटनेनं ब्रूटस या रोममधील विदूषकाचं हृदय हेलावतं. ल्युक्रिसीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध तो पेटून उठतो आणि प्रयत्नांची शिकस्त करून प्रभावी जनमताच्या रेट्यावर टार्किनची जुलमी सत्ता उलथून टाकण्याचं ठरवतो. अखेर या प्रयत्नात तो यशस्वी होतो आणि उफाळलेल्या जनक्षोभाच्या भीतीनं टार्किन रोममधून कुटुंबासह परागंदा होतो. ल्युक्रिसीची अंतर्वेदना मुखर करताना शेक्सपिअरनं त्याची प्रतिभा इतकी खर्ची घातली आहे, की २६५ कडव्यांचं हे दीर्घकाव्य वाचताना वाचकाच्या काळजात कळ उठते.

ही दोन काव्यं लिहूनही शेक्सपिअरच्या ‘सॉनेट्स’ना इंग्रजी साहित्यात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण शेक्सपिअरचा जीवनविषयक दृष्टिकोन जसा त्याच्या नाटकांतून व्यक्त झाला आहे, तसाच तो या सुनीतांमधूनही ओसंडला आहे. शेक्सपिअरनं आपली सुनीतं १५९२ ते १५९८ या सहा वर्षांत लिहिली. ‘सॉनेट’ हे नाव इटालियन ‘सॉनेत्तो’ या शब्दापासून बनलं आहे. त्याचा अर्थ होतो मंद स्वर. मुळात इटालियन असलेला हा प्रकार इंग्रजीत थॉमस वॅट यानं आणला. वॅटनंतर तत्कालीन कवी एडमंड स्पेन्सर, सर फिलिप सिडनी यांनी ‘सॉनेट्स’ हा काव्यप्रकार अतिशय ताकदीनं हाताळला; पण त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली ती शेक्सपिअरच्या प्रतिभेनं! पुढे मिल्टन, वर्ड्स्वर्थ आदींनाही त्याची मोहिनी पडली.

शेक्सपिअरनं लिहिलेली एकूण १५४ सुनीते टॉमस थॉर्प यानं अकरा वर्षांनंतर १६०९ मध्ये प्रसिद्ध केली. शेक्सपिअरची सुनीतं म्हणजे एक भावत्रिकोण आहे. त्याचा एक बिंदू स्वत: कवी आहे, दुसरा बिंदू त्याचा मित्र आहे, तर तिसरा बिंदू एक ‘द डार्क लेडी’ आहे. यातली सुरुवातीची १२६ सुनीतं त्यानं आपल्या मित्राला उद्देशून लिहिली आहेत. उरलेली सुनीतं ‘द डार्क लेडी’ या कृष्णसुंदरीला उद्देशून आहेत.

प्रेम या जीवनचैतन्याला नष्ट करण्यासाठी आसुसलेली वासना जीवनाला त्याच्या अंताकडे नेत असतानाही काळासह क्षणाक्षणाला कशी ग्रासत जाते, हे त्यानं फार प्रभावीपणे मांडलं आहे. या कविता काळाच्या ओघात नष्ट होणार नाहीत याबाबत त्यानंच म्हणून ठेवलं आहे-

So long as men can breathe, or eyes can see,

So long lives this and this gives life to thee.

वर्ड्स्वर्थनं पुढे या सुनीतांवर सुंदर भाष्य करताना म्हटलंय- ‘With this Key Shakespear unlocked his heart.'

खरंच शेक्सपिअरचं हृदय उघड करून दाखवणाऱ्या या किल्लीतून तो प्रत्यक्ष जीवनातही किती उत्कट भावनाप्रधान होता, याचा प्रत्यय येतो. तर ११०व्या सुनीतात तो लिहितो-

Alas, its true, I have gone here and there

And made myself a montly to the view.

जीवनाच्या अनेक मंचांवर एका क्षुद्र विदूषकासारखा भटकून मी स्वत:चं हसं करून घेतलं आहे, असे स्वत:बाबत म्हणताना तो किती संवेदनशील होता तेही कळतं. या संवेदनशीलपणामुळेच तो शब्दांचा वापर अतिशय जपून करत असे. आपल्या नाटकांत तब्बल तीस हजार शब्द खैरातीसारखे उधळूनही त्यानं शब्दांचं अनवट मोल नीटपणे ओळखलं होतं. ‘When words are scare they are seldom spent in vain’ असं आपल्या ‘रिचर्ड दुसरा’मध्ये म्हणणाऱ्या शेक्सपिअरनं शब्द अगदी पैशांसारखेच अतिशय जपून वापरले; म्हणूनच ते मौल्यवान ठरले!

या शोकनाट्याच्या शहेनशहानं १५८८ला हातात धरलेली लेखणी १६११ला आठव्या हेन्रीवरील नाटक लिहून खाली ठेवून दिली. आणि १६१४ला लंडन सोडून आपला मुक्काम पुन्हा स्ट्रॅटफर्डला हलवला. लंडनमधील दोन तपांच्या काळात तो अधूनमधून जरी स्ट्रॅटफर्डला येत होता, तरी तसा तो गावापासून तुटलाच होता. या पुनरागमनानंतर त्यानं गावाला भली मोठी पैशांची देणगी दिली. सुझानाही नवऱ्यासह स्ट्रॅटफर्डलाच राहायला आली.

स्ट्रॅटफर्डला आल्यावर आता शेक्सपिअरच्या जीवनाचं वर्तुळ पूर्ण झालं होतं आणि तो पुन्हा एकदा जीवनाच्या केंद्रस्थानी आला होता. या अखेरच्या काळात आलेल्या कटू अनुभवांनी या सौंदर्यपूजक कलावंताचं मन कमालीचं उद्विग्न झालं. एडमंड हा त्याचा सगळ्यात धाकटा भाऊ तो लंडनला असतानाच एका असाध्य आजारानं गेला होता. १६१२ला त्याचा अविवाहित लहान भाऊ गिल्बर्ट हे जग सोडून गेला. पुढच्याच वर्षी रिचर्ड हा धर्मोपदेशक झालेला भाऊही ख्रिस्तवासी झाला. आपल्या झाडाचं असं एक एक पान गळत चाललेलं पाहून तो मनानं खचला. आपल्या पंखांना पावलांची ओढ लागल्याचं समजताच त्यानं आपलं मृत्युपत्र तयार केलं आणि निरवानिरवीच्या तयारीला लागला.

फेब्रुवारी १६१६ला ज्युडिथ या त्याच्या धाकट्या मुलीनं थॉमस क्विनी या स्ट्रॅटफर्डमधल्याच दारूविक्रेत्याबरोबर लग्न केलं. थॉमसचा बाप रिचर्ड क्विनी हा जरी एकेकाळचा शेक्सपिअरचा मित्र होता, तरी थॉमस अत्यंत उच्छृंखल असल्यानं शेक्सपिअरला तो आवडत नव्हता. त्यानं ज्युडिथला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिच्या आंधळ्या प्रेमापुढे या शब्दप्रभूनं हार खाल्ली. त्यानं अत्यंत हताश मनानं या विवाहाला संमती दिली; पण थॉमसबरोबर त्याचं काही पटलं नाही. म्हणून २५ मार्च १६१६ला त्यानं आपलं मृत्युपत्र पुन्हा बदललं आणि आपली सगळी संपत्ती नातेवाईक नि मित्रमंडळीत वाटून टाकली. पण का कुणास ठाऊक जीवनभर सर्व प्रसंगांत समर्थपणे साथ दिलेल्या अ‍ॅनच्या नावानं एक पेनीसुद्धा ठेवली नाही. नाही म्हणायला एक दुय्यम प्रतीचा पलंग ठेवला. तो तिच्यावर अजूनही इतका रुष्ट का होता कळत नाही; पण "Who is't can read a woman?' असं ‘सिंबलिन’मध्ये म्हणणारा शेक्सपिअर तिला मात्र अखेरपर्यंत जाणून घेऊ शकला नाही. जाणून घेऊ शकला नाही की त्यानं जाणून घेतलं नाही, कुणास ठाऊक! "Frailty, thÿ name is woman,' असं ‘हॅम्लेट’च्या तोंडी म्हणणाऱ्या शेक्सपिअरनं त्या बिचारीला दुर्बल समजून मृत्यूनंतरही दुर्लक्षितच ठेवली! अ‍ॅन त्याच्यानंतर सहा वर्षांनी वयाच्या ६७व्या वर्षी वारली.

मानवी आयुष्याचे नाना रंग आपल्या दैवदत्त प्रतिभेनं न्याहाळत असताना उत्तरोत्तर तो जीवनाबाबत खोलवर चिंतनशीलही होत गेला आणि त्यातील वैयर्थ्य त्याला समजून चुकलं. ‘Life is a tale told by an idiot, full of sound and fury, Signifying nothing’, असे ‘मॅक्बेथ’मध्ये अत्यंत विमनस्कपणे म्हणणारा शेक्सपिअर आयुष्याबाबत अखेरच्या काळात खरोखरच उदासीन झाला. लग्नाबाबत झालेला जुगार, घरातल्या एकेकाचा होत असलेला मृत्यू, एकुलत्या एक प्रिय मुलाचा हॅम्नेटचा वयाच्या अकराव्या वर्षी झालेला मृत्यू आणि पन्नाशीनंतर डाव्या डोळ्याला झालेला असाध्य आजार त्याला कायमचा विकल करून गेला. ‘दिले हिरण्यमय हाती मृण्मय’ ही भावना वाढीस लागून माणसांच्या गर्दीत राहून मन:शांती शोधणाऱ्या त्याच्या पावलांना आत्ममग्नतेची ओढ लागली. १७ एप्रिलला विल्यम हार्ट या आपल्या मेव्हण्याचा अंत्यविधी उरकून घरी परतलेल्या शेक्सपिअरला एका अनामिक जीवनशरणतेनं आपला होता नव्हता तो सारा अहंकार डोळ्यांतील पाण्यात बुडवावासा वाटला.

त्याच्या बावन्नाव्या वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदरच २१ एप्रिल १६१६ रोजी बेन जॉन्सन आणि जॉन ड्रायटन हे कविमित्र त्याला लंडनहून भेटायला स्ट्रॅटफर्डला आले. गप्पा मारताना त्यांच्याबरोबर त्यानं भरपूर दारू प्यायली. आपल्या डाव्या डोळ्याला झालेल्या आजाराबद्दल, ज्युडिथच्या नवऱ्याबद्दल आणि एकूणच आयुष्याच्या जमाखर्चाबद्दल त्यानं आपलं मन भरभरून मोकळं केलं.

अखेर २३ एप्रिल १६१६ रोजी त्याच्या वाढदिवशी आकाशातला चंडभास्कर दिवसभर आग ओकून त्याच्या जन्म-मृत्यूच्या दिवसाचा अजब योगायोग साधतच मावळला! आणि त्याच्या मावळत्या सूर्यकिरणांत एव्हनच्या लपलपणाऱ्या लाटांशी मनातल्या मनात गुजगोष्टी करताना हा नाट्यसूर्यही अकस्मात मावळला! आपल्या मृत्यूचं कारण संदिग्ध ठेवत विल्यम शेक्सपिअरनं जगाच्या रंगभूमीवरून अखेरची एक्झिट घेतली आणि जागतिक रंगभूमी एका थोर नाटककाराला कायमची अंतरली! त्या दिवशी एव्हन तिला चिरंजीव केलेल्या निर्मात्याला आपल्या लाटांनी अखेरचं अर्घ्य देत तशीच संथपणे वाहत राहिली!!

ज्या होली ट्रिनिटी चर्चमध्ये त्याला बाप्तिस्मा दिला, त्याच चर्चच्या पूर्वेकडील भागात त्याला दोन दिवसांनी पुरण्यात आलं. त्याच्या मित्रांनी आणि नातेवाइकांनी पुढे त्या थडग्यावर स्मारक उभारलं आणि त्यावर त्यानंच कधीतरी लिहिलेल्या पुढील ओळी कोरल्या-

"Good friend, for Jesus' sake forbear

To dig the dust enclosed here

Blessed be the man that spares these stones,

And cursed be he that moves my bones.'

बेन जॉन्सननं अत्यंत दु:खित अंतकरणानं आपल्या या गहिऱ्या मित्राविषयी श्रद्धांजली वाहताना लिहिलं-

Triumh, my Britain, thou hast one to show

To whom all scenes of Euroe homage owe.

He was not of an age, but for all time!

असा ‘ऑल टाइम’ असणारा शेक्सपिअर हे आजही इंग्लंडचं वैभव आहे आणि त्यानं ते अभिमानानं सांभाळलं आहे.

.............................................................................................................................................

शेक्सपिअरच्या देशातील कवी" या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4548/Shekspearechya-Deshatil-Kavi

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......