फ्लॉलेस विद्या बालन @ ‘कहानी २’
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
आशुतोष जरंडीकर
  • ‘कहानी २’चं एक पोस्टर
  • Sat , 03 December 2016
  • हिंदी सिनेमा Hindi Cinema कहानी २ Kahaani 2 विद्या बालन Vidya Balan सुजोय घोष Sujoy Ghosh

'बाऊंडस्क्रिप्ट एंटरटेनमेंट' हे नाव पडद्यावर दिसलं की, पटकथेबद्दलची चिंता संपून जाते. आणि त्यात जर लेखक-दिग्दर्शक म्हणून सुजोय घोष असेल, तर गोष्टीच निराळी. 'कहानी' असं नाव घेतलं की, प्रत्येकाच्या समोर उभी राहते ती वणवण फिरणारी गरोदर बिद्या बागची आणि कोलकता शहरातील विक्षिप्त दुनिया. २०१२ मध्ये येऊन गेलेला हा चित्रपट आजदेखील प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतो. त्याचा दुसरा ‘कहानी २’ या नावाने काल प्रदर्शित झाला. 

या चित्रपटाचं प्रमोशन सुरू झाल्यावर हा ‘कहानी’चा सिक्वेल नसणार, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पहिल्या भागाचा या दुसऱ्या भागाशी काहीही संबंध नाही. हा एक स्वतंत्र चित्रपट आहे.
अर्थात पहिल्या भागाचा प्रेक्षकांवरील प्रभाव अजूनही कायम आहे. त्यामुळे ‘कहानी २’ची तुलना पहिल्याशी होणार हे माहीत असल्यामुळेच कदाचित सुजोय घोषने जाणीवपूर्वक या भागाची मांडणी पहिल्या भागाची आठवणच होणार नाही, अशाच पद्धतीने केली आहे. पण तरीसुद्धा पहिल्या कहानीमधील ‘कि-इलेमेन्ट’ यात आहेत. कोलकता शहर, काही बंगाली कलाकार, प्रमुख आणि सशक्त स्त्री व्यक्तिरेखा आणि अर्थातच विद्या बालन.

'कहानी : दुर्गा राणी सिंग' ही नावं पडद्यावर झळकतात आणि काहीतरी भन्नाट, रोमांचित करून टाकणारं पाहायला मिळणार, या अपेक्षेनं प्रेक्षकवर्ग सरसावून बसतो. चित्रपट सुरू होऊन चार-पाच मिनिटं झाल्यापासूनच तो प्रेक्षकांचा आणि त्यांच्या मनाचा ताबा घेतो. जे काही नाट्य पडद्यावर सुरू होतं, ते पाहण्यात प्रेक्षक मग्न होऊन जातो. एकामागून एक येणाऱ्या धक्क्यांमुळे प्रेक्षक खुर्चीला खिळून जातो. एकावर एक पडत जाणारे प्रश्न आणि प्रचंड (माझ्यासाठी पहिल्यांदाच) तणाव तयार करणारी पटकथा, भन्नाट बॅकग्राउंड स्कोअर आणि पडद्यावर दिसणारी हतबल विद्या! 

थ्रिलर चित्रपटासाठी आवश्यक असणारी चढत्या भाजणीची पटकथा, मती गुंतवून ठेवणारे प्रसंग, ट्विस्ट व टर्न्समुळे बुचकळ्यात पडणारा प्रेक्षक आणि खास 'कहानी'चा इमोशनल टच, यामुळे पूर्वार्धामध्ये सर्वच चोख आणि खणखणीत कामगिरी करतात. सादारीकरणामध्ये चित्रपटाचा पूर्वार्ध पहिल्या भागापेक्षासुद्धा सरस ठरतो, हे नक्की!

पण उत्तरार्ध सुरू होतो आणि या गोष्टी काही काळापुरत्या का होईना पण बदलून जातात. चित्रपट थोडासा अपेक्षित वळणे घेऊन पुढे सरकतो. ही थ्रिलर चित्रपटासाठी सर्वांत वाईट बाब. पहिल्या कहानीमध्ये अर्णब बागची आणि मिलन दामजी यातील गुंता जसा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतो, तसं इथं दुर्दैवानं घडत नाही. दुर्गा राणी सिंग आणि विद्या सिन्हा या दोन व्यक्तिरेखांमधील गुंता काहीसा लवकर सुटतो आणि चित्रपट केवळ थ्रिलर (पण काहीसा कमी थ्रिल देणारा) जॉनरमधील चित्रपट, या अंगाने पुढे सरकतो. पूर्वार्धामध्ये असणारा प्रचंड तणाव काहीसा कमी होतो. हेच काय ते या चित्रपटाचं एकमेव अपयश. या अपयशाचा एक भाग म्हणून येतात, त्या चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखा. ‘कहानी’मधील बॉब बिस्वास, सत्योकी, इन्स्पेक्टर खान या अथवा यांना पर्यायी अशा भूमिकांचा इथं अभाव आहे. सहाय्यक अभिनेत्यांमध्ये येणारे अर्जुन रामपाल, जुगल हंसराज, नाईशा खन्ना तरीसुद्धा चांगले काम करतात, हे विशेष. खास करून जुगल हंसराजची काही प्रसंगात भीती वाटते. पण मग शेवटाकडे येताना चित्रपट पुन्हा चांगली पकड घेतो आणि एक चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान प्रेक्षकांना देतो.

या चित्रपटाचं चित्रीकरण कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत झालं आहे. जेव्हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट चित्रित केला जातो, तेव्हा दिग्दर्शकला त्यातल्या शहराच्या कानाकोपऱ्यांची माहिती पाहिजे असं मानलं जातं. सुजोयला त्याची पूर्णपणे माहिती आहे हे सारखं जाणवत राहतं. प्रत्येक ठिकाणातील, त्याच्या भोवतालच्या परिसरातील, अंधाऱ्या खोल्यांमधील भीषण गडदपणा प्रत्येक प्रेक्षकाचा ठाव घेतो. क्लिंटन सेरेजो याने पार्श्वसंगीत कमालीचं आणि प्रचंड मेहनतीनं तयार केलं आहे. त्यामुळे चित्रपटातील अस्सलपणा अधिक ठळक होत राहतो. संकलनाच्या बाबतीत उच्चांक गाठला गेला आहे. प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात, प्रसंगी घाबरवण्यात चित्रपट कमालीचा यशस्वी झाला आहे. 

सुजोयच्या दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर तो आणि त्याची पटकथा या चित्रपटाचा आत्मा आहे! तो चित्रपट तल्लखपणे मांडतो. पटकथेतील खोली आणि तणाव या चित्रपटात पहिल्या भागापेक्षा अधिक जरूर आहे, पण म्हणावा तितका परिणामकारक नाही. ‘कहानी’मध्ये क्लायमॅक्सला घडणारी जादू पुन्हा करण्याचा सुजोयचा प्रयत्नसुद्धा म्हणावा तितका सफल होत नाही.

पण अशा काहीशा उणिवा, उत्तरार्धात होणारं उन्नीस-बीस या सर्वांवर मात करते ती म्हणजे विद्या. तिच्या अभिनयाचं वर्णन करायचं झालं तर, पहिल्या ‘कहानी’तील विद्याचा अभिनय म्हणजे या चित्रपटाचा केवळ ट्रेलर आहे! ती भावना, असह्यपणा, हतबलता आणि स्वतःचा भूतकाळ आपल्या व्यक्तिरेखेत कमालीच्या ताकदीने साकारते. सर्वच प्रसंगांमध्ये ती जान आणते. चित्रपट 'थ्रिलर-सस्पेन्स' या जॉनरमधील असल्याने त्याची पटकथा सांगत नाही. तिचा वावर\अस्तित्व नेहमीच सुखावणारं असतं, पण या चित्रपटातला 'दुर्गा राणी सिंग/विद्या सिन्हा' म्हणून असणारा तो कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. ही भूमिका तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट म्हटली तरी फारसं वावगं ठरणार नाही. आणि हो...या वर्षी तिच्यावर पुरस्कारांचा वर्षाव झाला तरी आश्चर्य वाटायला नको.

एकुणात काय, चित्रपट पाहिल्यावर सुजोयचं एका मुलाखतीमधील वाक्य आठवतं – ‘‘कहानी २’मध्ये प्रेक्षकांना फ्लॉ सापडतील, विद्या फ्लॉलेस असेल हे नक्की!’

लेखक एमबीबीएस करत असून चित्रपट आस्वादक आहेत.

ashutosh.jarandikar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर खोलीत शिरलेल्या हत्तीची तुम्हाला भीती वाटत नसेल, तर तुम्ही त्याला भिडण्याची क्षमता राखता आणि जर ‘लाफ्टर थेरपी’वर तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही ‘सखाराम बाईंडर’चा हा प्रयोग नक्की बघाल

माणूस या विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे कधीही न मानणारे तेंडुलकर आपल्या नाटकाच्या केंद्रस्थानी मात्र नेहमी माणूसच ठेवत आले. आणि हाच माणूस, ते मानत असलेल्या दैवापुढे कसा आणि किती हतबल असतो, हेच ते आपल्या नाटकात सतत दाखवताना दिसतात. तेंडुलकर थेट विषयाला भिडतात आणि त्या विषयावर बसलेली सगळी पुटं निर्ममतेने काढून तो विषय उघडानागडा तुमच्यासमोर पेश करतात. त्यामुळे आलेला प्रेक्षक बिचकतो.......

‘अंबा’ : युद्ध थांबल्याशिवाय पुरुषांना शरीरसुख न देण्याची शपथ घेणाऱ्या बायका आणि त्यामुळे रडकुंडीला आलेल्या पुरुषांची कथा

जगाला शांततेची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा स्थितीत सद्यस्थितीकडे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे. अशा वातावरणात हे नाटक मंचित होणं फार महत्त्वाचं आहे. मूळ ग्रीक नाटकाचा काळ ख्रिस्तपूर्व म्हणजे काळाच्या दृष्टीनं पक्का आहे. मात्र आजच्या जगात कोठे ना कोठे युद्धं सुरू असतं, हिंसेचं थैमान सुरू असतं. अशा स्थितीत एखादा देश किंवा एखादा काळ न दाखवता या भीषण समस्येचं वैश्विक रूप समोर आणणं महत्त्वाचं ठरतं.......

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या किमयेची भुरळ पाडणाऱ्या जपानच्या ‘स्टुडिओ जिब्ली’चं चित्तचक्षुचमत्कारिकाहूनही चमत्कारिक विश्व! (उत्तरार्ध)

जिब्लीचे जवळपास सर्वच चित्रपट पाहून झाले आहेत, पण त्यांच्याविषयी वाटणारं आकर्षण काही कमी होत नाही. जिब्लीपट पाहिल्यानंतर त्या आकर्षणाला उधाणच आल्यासारखं वाटतं. एकदा पाहिल्यानंतरही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि प्रत्येक वेळी पाहू तेव्हा नवीन काहीतरी पाहतो आहोत, असंच वाटतं. केवळ मनोरंजनासाठी एक उत्तम निवड ठरतेच, पण त्यात जे वैचित्र्य आणि जी अद्भुतता आहे, ती पाहताना आपल्यातली सौंदर्यदृष्टीही जागी होते.......