अजूनकाही
साहित्य, कला, नाटक, लेखन, नेपथ्य, पेंटिंग, पुस्तकांची वेष्टनं आणि जाहिराती अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या षांताराम पवार या प्रतिभावान अवलिया चित्रकाराचं काल मुंबईत वयाच्या ८३ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. २०११ साली त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘दीपस्तंभ : षांताराम पवार’ हे पुस्तक दीपक घारे व रंजन जोशी यांनी संपादित केलं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील हा एक लेख संपादित स्वरूपात...
.............................................................................................................................................
१९७५च्या जून महिन्याचा दुसरा आठवडा. जे. जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्टचा पहिला दिवस. डिप्लोमाचा वर्ग म्हणजे कॉलेजचं शेवटचं वर्ष. नव्या इमारतीचा सर्वांत वरचा, सर्वांत मोठा वर्ग. ४०-४५ तरुण-तरुणी नव्या क्लास टीचरची वाट पाहत बसलेली. वर्गात बरीच उत्सुकता. डिप्लोमाचं वर्ष म्हणजे पवार सर येणार आणि पवार सरांची ख्याती म्हणजे ‘हम आने से पहले हमारे अफसाने पहुंच जाते हैं ’ प्रकारातली.
पवार सर महाखडूस आहेत! एकच काम दहा-दहा वेळा करायला लावतात! किंवा अगदी दिवस-रात्र एक करून फिनिश केलेलं काम स्वत:च्या हातानं फाडायला लावतात. सरळ बोलत नाहीत, त्यांना नक्की काय म्हणायचंय हे समजत नाही. स्वत:ला मवाली समजतात. हा शेवटचा मामला आम्हाला दुखावणारा होता. कारण तोपर्यंत कॉलेजच्या चार वर्षांच्या वास्तव्यात आम्ही फी वाढीविरुद्ध एक संप, गॅदरिंगचे राडे, निवडणुकीमधील मारामाऱ्या, शेजारच्या अंजुमन इस्लाम शाळेवर दगडफेक, आदी पराक्रम करून ‘मवाली’ म्हणून लौकिक प्राप्त केला होता. त्या वर्षी मी ‘स्टुडंट मजलीस’चा सेक्रेटरी होतो. म्हणजे या पराक्रमावर शिक्कामोर्तबही झालं होतं. अशा मवाल्यांच्या वर्गावर स्वत:ला ‘मवाली’ म्हणवणारा मास्तर येणार, म्हणजे ‘जंजीर’मधील ‘ये तुम नहीं तुम्हारी वर्दी बोल रही हैं,’ अशी सिच्युएशन होती.
आम्ही सर्व गँगमंडळी आधीच्या मे महिन्याच्या सुट्टीचा फायदा घेऊन दाढ्या वगैरे वाढवून, आमच्या ग्रुपच्या म्हणवणाऱ्या दोन-चार पोरीबाळी ज्या बिनधास्त खांद्यावर हात टाकून बोलत, खिदळत असत, त्यांच्याबरोबर वर्गात मास्तरांची ‘टु सर विथ लव्ह’मधल्या टोळक्यासारखी वाट बघत होतो. यथावकाश पोलिसी खाक्याची दिसणारी, हाफ बुशशर्ट आणि खाकी रंगाकडे झुकणारी पॅण्ट घालणारी, जमिनीला समांतर, ओठावर एका रेषेत मिशी कापणारी, डोक्यावर भरघोस काळे केस असणारी (जे अजूनही तसेच आहेत) एक व्यक्ती आत आली, मास्तरांची एण्ट्री झाली.
काशीनाथ घाणेकर रंगमंचावर येण्याआधी विंगेमध्ये आरडाओरडा करून वातावरण निर्माण करून एण्ट्री घेतानाच, वर लाइट बॅटनकडे पाहून आपल्यावर ‘स्पॉट’ आला आहे की नाही याची खात्री करून घेत असे, त्या धर्तीवर मास्तरांनी वर पंखा चालू आहे की नाही हे पाहून घेतलं.
“मी षांताराम पवार. आता प्रत्येकानं आपापलं नाव नीट ऐकू येईल, अशा आवाजात सांगायचं. या पहिल्या बेंचपासून सुरू करा. पण… थांबा, त्याआधी…”
पवार सर आमच्या एक-एक मेंबरकडे हात करून उठवू लागले.
‘तू’, ‘हा-तू, लाल शर्ट.. आणि तू.. तू दाढी.. तू काळा शर्ट.. यू.. दॅट लेडी इन ग्रीन. तू… चष्मेवाला..’
असं म्हणत त्यांनी सात-आठ टाळकी शोधून काढली आणि म्हणाले, ‘गेट आउट. माझ्या वर्गात बसायचं नाही. बाहेर उभे राहा तास होईपर्यंत.’
बाहेर पडता पडता नीलेश म्हणाला, ‘‘आम्ही ‘आउट स्टॅण्डिंग’ स्टुडंट्स आहोत.’’ जराशी खसखस पिकली. पण खरं म्हणजे आमची टाळकी पिकली होती. चला, पहिल्याच सलामीला चकमक झाली होती. आता वर्षभर मास्तरला नडायला मजा येणार होती. प्रत्येकाच्या डोक्यातून कल्पना येऊ लागल्या. आम्ही गॅलरीच्या कठड्यावरच बसून दबल्या आवाजात प्लॅन करू लागलो; मान्सून पिकनिकला घेऊन जाऊ या, मजबूत पाजू या आणि… ‘च्यायला, खंडाळा कशाला? ही गॅलरी भरपूर उंच आहे.’
एक ना दोन बराच वेळ गेला. वर्गात बसलेल्या पोरांना काही प्रॉब्लेम (काम) देऊन सर बाहेर व्हरांड्यात आले. माझ्याकडे हात करत म्हणाले,
‘सिगारेट दे. चारमिनार ओढतोस ना, दे!’
मी सिगारेटचं पाकीट दिलं. नेहमीच्या पद्धतीनं काडेपेटीनं सिगारेट पेटवून त्यांनी विझलेली काडी फेकून न देता काडेपेटीमध्ये पुन्हा ठेवून दिली.
धूर वाऱ्यावर सोडत म्हणाले, “त्याचं काय आहे, मी मवाली, तुम्ही मवाली. आपला त्रास या वर्गात बसलेल्या सज्जन पोरांना का? त्यांना नीट पास वगरे होऊन आई-बापाचा पैसा कारणी लावायचा आहे. नोकऱ्या करायच्या आहेत. आपलं तसं कुठं आहे? आपण वेगळे, तेव्हा आपला वर्गही वेगळा. काय?”
खरं तर सरांचं वेगळेपण जाणवण्यास सुरुवात झाली होती. पोरं हुशार आहेत, पण शिस्तीच्या चौकटीत बसणारी नाहीत. त्यांना त्यांच्या भाषेत शिकवलं पाहिजे. म्हणून आव्हान म्हणून ते त्या वर्षी आमच्या वर्गावर आले होते. हे त्यांनीच पुढे बऱ्याच वर्षांनी आम्हाला सांगितलं. बाहेर काढलेल्यांपैकी बरेच जण आज जाहिरात विश्वात पन्नास ते पाऊण लाखाचं महिन्याला मानधन घेत आहेत, हेही तितकंच खरं. यथावकाश सरांमधला आणि आमच्यातला तणाव निवळला. मान्सून पिकनिकपर्यंत म्हणजे महिन्याभरातच खुन्नस काढण्याची भाषा संपून एकमेकांना ‘सांभाळून’ घेण्यास सुरुवात झाली.
प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीत हुशार असतो किंवा असावा, अशा भंपक शिक्षणपद्धतीवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नको असलेल्या गोष्टींचा बोजा ठेवण्यापेक्षा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांला गती आहे त्या गोष्टीत त्याला रमू देणं सरांना पटत असे. बऱ्याच वेळा स्वत: विद्यार्थ्यांला त्याच्या सामर्थ्यांची ओळख नसते; ती ओळखून त्याला त्याची जाणीव करून देण्यात सरांचा हात कोणी धरणार नाही. सर, पोरांनी केलेली कामं फाडतात म्हणून त्यांचा लौकिक होता, पण मी कधी त्यांना दुसऱ्याचं काम फाडताना पाहिलं नाही. समोरच्या पोराला ‘हे झालेलं तुझं काम कसं चुकीचं आहे. आता समजलं ना कसं हवं ते? मग हे ठेवण्यात काय पॉइंट आहे, फाडण्याच्याच लायकीचं आहे,’ असं पटवून देऊन त्याच्या स्वत:च्या हातानं फाडायला सांगत. आणि फाडल्यानंतर ‘का फाडावं लागलं, याचा विचार कर,’ म्हणून पाठ थोपटत असत. ही ताकद त्यांना येत असे, कारण स्वत:ची कित्येक ड्रॉइंग्ज त्यांनी स्वत: फाडून टाकलेली असत.
एका जाहिरातीसाठी मी लिहिलेली कॉपी वाचत असताना अचानक त्यांनी मला विचारलं होतं, ‘कविता करतोस काय?’ मी कविता करतो, हे मी यांना कधीच सांगितलं नव्हतं. मग यांना कसं समजलं, अशा विचारात असतानाच ते म्हणाले, ‘उद्या वही, डायरी, काय असेल ते बाड आणून दे. आणि हे बघ, ज्यांना चांगलं लेटरिंग वगैरे करता येतं त्यांच्याकडून तुझं काम करून घेतलंस तरी हरकत नाही. मात्र वर्गातील सर्वांची कॉपी तू लिहायची, काय?’
‘सर्वांची! जवळजवळ चाळीस वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत!’
‘हो. मग मी नाही चाळीस-पन्नास पोरांना शिकवत एका वेळेला? गाढवा, उभ्या आयुष्यात चाळीस-पन्नास गोष्टींवर काम करायला मिळत नाही, ते एका वर्षांत करायला मिळतंय हे नशीब समज. आणि सगळ्यांना दुसऱ्याकडून लेटरिंग करून घ्या म्हणून सांगितलं नाहीये, हे पण लक्षात ठेव.’
वर्ष सरता सरता माझा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. तो त्यांनीच संपादित केला होता. सरांची रूम कॅण्टीनच्या जवळ होती. जुन्या ब्रिटिश काळातील षटकोनी आकाराची. खालच्या मजल्यावरून दुपारी वर्गावर आले म्हणजे हमखास सर सांगत असत, ‘भटा, कॅण्टीनमध्ये मस्त कांदाभजी तयार आहे. खाऊन ये.’ लौकिक अर्थानं शिक्षक-विद्यार्थी यांच्यामधील नात्याला साजेसं आमचं वागणं कधीच नव्हतं. आणि जे.जे.सारख्या कॉलेजात तर ते मुश्कीलच होतं. पहिल्या वर्षी अॅडमिशन, फी, वगैरे सोपस्कर करण्यासाठी आलेल्या माझ्या काकांनी वर्गातील रंगीबेरंगी बाटिक डिझाइनचा झब्बा घालून बसलेल्या शिक्षकांकडे बघून हे तुमचे सर? म्हणून अविश्वासानं वासलेला ‘आ’ मला अजून आठवतोय.
एकदा एक परदेशी कलाकारांचं शिष्टमंडळ कॉलेजला भेट देण्यासाठी आलं होतं. फॅकल्टीनं केलेलं काम दाखवण्याचा सोपस्कार होत होता. तेव्हा सरांनी आपण केलेली पुस्तकांची मुखपृष्ठं त्यांना दाखवली. ती बघून त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, ‘आपण बरेच श्रीमंत दिसता. मग कधी परदेशवारीवर आला नाहीत ते?’ तेव्हा सर म्हणाले, ‘श्रीमंती कलेची आहे, पैशाची नाही.’ त्यावर तो आश्चर्यचकित होत म्हणाला, ‘आमच्याकडील कलाकारानं वर्षाला चार-पाच मुखपृष्ठं केली तरी त्याचा वर्षाचा खर्च आरामात निघू शकतो. तुमच्या कामाकडे बघून तुम्ही लक्षाधीश नक्की असणार अशी आमची समजूत झाली.’ तेव्हा त्याची गरसमजूत दूर करत आणि स्वत:ची समजूत घालत सर म्हणाले, ‘त्या कामाचे पाचशे रुपयांवर पैसे मिळाले तगादा न लावता, तरी भरून पावलं म्हणायचं.’
सरांची त्या वेळची ती रूम म्हणजे अनेक लोकांचा अड्डा होता. अरुण खोपकर, दावतर सर, अशोकजी परांजपे, अमोल पालेकर, जयंत धर्माधिकारी, अरुण सरनाईक, वसंत सबनीस, अरुण कोलटकर… अनेक प्रतिभावंत कलाकार, चित्रकार, नाटककार, कवी यांची सतत वर्दळ असे. कॉलेजमध्ये दामू केंकरे, रमाकांत देशपांडे, ईर्शाद हाश्मी आदी नाटकवेडी मंडळीही होती. कॉलेजच्या कपाटांमध्ये भारतीय विद्याभवनच्या स्पर्धेत सलग अकरा वर्षं जिंकलेल्या ट्रॉफ्या उभ्या होत्या.
नाटकाचं नेपथ्य ही आणखी एक सरांची हळवी बाजू. ‘असं झालं आणि उजाडलं’ नाटकाचं नेपथ्य बघून माधव मनोहरांनी ‘सोबत’मध्ये ‘महाराष्ट्राला निष्णात नेपथ्यकार मिळाला’ म्हणून हेडलाईन दिली होती. या नाटकातील काळ गेल्याचं दर्शवण्यासाठी संडासाच्या खिडकीत उघडझाप होणाऱ्या प्रकाशाच्या खेळान टाळ्या घेतल्या. पण त्यामुळे नाटकाच्या रंगतीमध्ये बाधा येऊ लागल्यावर सरांनी स्वत: तो इफेक्ट काढायला लावला होता. नेपथ्यापेक्षा नाटक महत्त्वाचं, असं सांगणं आणि तसं वागणं वेगळं!
जे.जे.त जाण्यापूर्वी ‘तुघलक’ नाटकाच्या जाहिराती वेगळ्या आहेत म्हणून मी कापून ठेवल्या होत्या. त्या सरांनी केल्या होत्या हे कित्येक वर्षांनी समजलं, तेव्हा ती सर्व कात्रणं मी त्यांना नेऊन दिली होती.
तुम्ही चित्रकार आहात, नुसतेच नाटककार नाही आहात, तेव्हा तुमचं नेपथ्य देखणं असायलाच हवं किंवा तुमची दृश्यमाध्यमाची ताकद इतरांपेक्षा अधिक आहे, तिचा वापर व्हायलाच हवा; असा त्यांचा अट्टाहास असे. मग त्यात तडजोड मुळीच नाही.
नृत्य आणि गाणं या दोन कला सोडल्या तर आपल्याकडे गुरुकुल पद्धतीप्रमाणे शिष्याला प्रत्यक्ष हात धरून शिकवणं संपलेलं आहे. याच परंपरेचा अखेरचा शिलेदार म्हणता येईल अशा पवार सरांचा सहवास आम्हाला मिळाला ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि हा सहवास लौकिक अर्थानं गुरुशिष्यांचा संबंध कॉलेजपुरता न राहता त्यांच्या पहिल्या भेटीपासून आजतागायत व्यापून राहिला आहे. रोज किंवा दिवसाआड सकाळी आवर्जून त्यांचा फोन येतो आणि “तुला केलेल्या फोनचं बिल कधी देणार आहेस. सगळे लिहून ठेवले आहेत” असं म्हणत “एकदा तरी तू कर” म्हणून तक्रारीचा सूर लावतात. सकाळच्या पेपरातील एखादी अधोगती दर्शक बातमी घेऊन त्यांचं पोटतिडकीचं बोलणं सुरू होतं. कधी घरासमोरच्या कचऱ्याच्या ढिगाकडे बघून लिहिलेली कविता फोनवरून ऐकवतात; तर कधी शनिवारी आवर्जून दक्षिण मुंबईमधील झाडून सर्व आर्ट गॅलऱ्यांची फेरी होते. गाडीमध्ये आवडीचं कॅन्ड मद्य, सिगारेट आणि नुकत्याच पाहिलेल्या चित्रांबद्दल बोलणं किंवा ‘समोवार’मधल्या बदललेल्या वातावरणाची तिडीक.
बारीक, नीट बसवलेले केस, भरघोस मिशा, आडवा देह, हाफ बुशशर्ट, बऱ्याच वेळा खाकी ढगळ फँट, अशा वेषात सरांना मुफ्तीमधील पोलिस अधिकारी म्हणून अनेक लोकांनी गल्लत केली आहे किंवा सरांसारखाच दिसाणारा कोणी मोठा अधिकारी पक्का खाबू असावा. त्याच्या लौकिकाला साजेशी सरबराई आमच्या वाट्याला बऱ्याच वेळा आली आहे.
एकदा काहीतरी कारणावरून तणातणी झाल्यावर आम्हाला ते ‘शक्ती’ चित्रपट बघण्यासाठी ‘चित्रा’ सिनेमात घेऊन गेले. दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चनचा ताणलेल्या तारांसारखा अभिनय बघून सरांची तबियत खूश झाली. वरून पोलिसी खाक्याचा कडक पण आतून हळवा बाप त्यांच्या खूप जवळचा होता. थिएटरमधून बाहेर पडताना सर दिलीपकुमार आणि आपण अमिताभ बच्चन असल्याप्रमाणे आम्हाला वाटत होतं.
खऱ्या बापापेक्षा सेनापतीला मानणाऱ्या सैनिकांची मन:स्थिती काय असेल, भावना काय असतील, याचा त्या दिवशी अनुभव आला. आमचं नशीब, आम्ही दुसऱ्या कोणाच्या प्रभावाखाली येण्याआधी आम्हाला पवार सर भेटले!
.............................................................................................................................................
‘कळावे’ या षांताराम पवार यांच्या कवितासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘दीपस्तंभ : षांताराम पवार’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment