अजूनकाही
नाटककार हिमांशू भूषण स्मार्त यांचं ‘परफेक्ट मिसमॅच’ हे नाटक नुकतंच कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सनं पुस्तकरूपात प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला लेखकानं लिहिलेलं मनोगत...
.............................................................................................................................................
‘परफेक्ट मिसमॅच’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक. अर्थातच नाटक लिहिताना, व्यावसायिक नाटक लिहिण्याचा संकल्प सोडला आणि नाटक लिहिलं असं झालं नाही. माझी लेखनाची प्रक्रिया इतर नाटकांसारखीच होती. हे नाटक लिहून मात्र अत्यंत झपाट्यानं झालं. एरवी पाच-सहा महिने चालणारी प्रक्रिया या नाटकावेळी केवळ तेरा दिवसांत पूर्ण झाली. त्यानंतर पहिला प्रयोग होईपर्यंत त्याचे असंख्य खर्डे झाले. उलथापालथी झाल्या. या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान ‘व्यावसायिक प्रेक्षक’ ही संज्ञा वारंवार चर्चेत यायची. या आधीही प्रेक्षक चर्चेत असायचा, पण बराचसा अध्याहृत. आता मात्र नाटकाच्या पुनर्लेखनात त्याची छाया सतत मागे होती. ते असो.
किरण हे नाटक रंगमंचावर यावं म्हणून अचाट धडपडत होता. त्यामानानं मी झटापटी केल्या, त्या केवळ लेखनाच्या स्तरावर. किरणनं हे नाटक, त्याच्या घरी, साताऱ्यात लीनाताई आणि मंगेश दादांना वाचून दाखवलं. दोघांनाही ते खूप भावलं. लीनाताईंनी या नाटकाची निर्मितीच करायचं ठरवलं. मंगेश दादांसारखा, प्रदीर्घ काळ गुणवान आणि लोकप्रिय नाटकं देणारा दिग्दर्शक लाभणं आणि लीनाताईंसारखी मर्मज्ञ निर्माती लाभणं नाटकासाठी उत्तम संकेत होते.
किरण तर होताच. आम्ही पंधरा-सोळा वर्षं एकत्र आहोत. मराठी रंगभूमीवर वेगळ्या धाटणीची नाटकं आणणारे, सोनल प्रॉडक्शनचे नंदू कदम यांनीही नाटकाच्या निर्मितीत सहभागी होण्याचं मान्य केलं. प्राचीच्या शोधार्थ, दमछाक करणाऱ्या प्रयत्नानंतर अमृता सुभाषनी प्राची करायला होकार दिला. ही नाटकासाठी अत्यंत मोलाची गोष्ट ठरली. अमृता तालमीच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर नाटक आकार घ्यायला लागलं. पात्रांची, संवादांची, प्रसंगांची विलक्षण उत्खननं सुरू झाली. फोनवरच्या दीर्घ चर्चा आरंभल्या.
अखेरीस २० डिसेंबर २०१५ ला, साताऱ्याच्या शाहू कला मंदिरात पहिला प्रयोग झाला. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सातारा पुन्हा एकदा माझ्या नाटकासाठी निर्णायक दुवा ठरला. प्रयोगाला ज्योती सुभाष, संदेश कुलकर्णी उपस्थित होते. ज्योतीताईंना नाटक वाचनामध्ये भावलं होतं, मला या गोष्टीचा मोठाच आधार मिळालेला. संदेश कुलकर्णींशी पुनर्लेखनादरम्यान झालेल्या चर्चांची खूप मदत झाली.
पुढे नाटकाला अनेक सन्मान लाभले. १२ पुरस्कार आणि १५ नामांकनं मिळाली. आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. जयंत पवार, रवींद्र पाथरे यांसारख्या समीक्षकांनी नाटकाच्या गुण-दोषांवर मर्मग्राही लेखन केलं. राजीव नाईक आणि सतीश आळेकर या माझ्या दोन गुरूंनी नाटक पाहून माझ्याशी दीर्घ चर्चा केली. माझ्या स्नेह्यांनी, मित्र-मैत्रिणींनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नाटक पाहिलं, कौतुक केलं. ज्ञात-अज्ञात प्रेक्षकांनी ईमेल्स आणि फोनवरून भरभरून प्रतिक्रिया दिल्या. कित्येक प्रेक्षकांनी नाटक अनेकदा पाहिलं. एकूण, खूप रोमहर्षक आणि आनंददायी काळ होता या नाटकाचा.
प्रदीप मुळयेंचं नेपथ्य, शीतल तळपदेंची प्रकाशयोजना, राहुल रानडेंचं संगीत, चैत्राली डोंगरेची वेशभूषा, कमल शेडगेंचं अक्षरलेखन अशी प्रगल्भ योगदानं असल्यानं, प्रयोग उजळून येणार होताच. नाटकाच्या सगळ्या सर्जक टीमचे मन:पूर्वक आभार. निर्माते नंदू कदम यांचे मन:पूर्वक आभार. माझा मित्र सुधीर देशपांडे याचे आभार. शांताराम फडतरे, श्रीकांत नलवडे आणि सुनील कारखानीस यांचेही आभार.
ज्यांच्याशी माझा प्रत्यक्ष कधीच संपर्क आला नाही त्या व्यवस्थापन टीमचे आणि तंत्रज्ञांचे आभार. किरण, लीनाताई, मंगेशदादा, अमृता यांच्याविषयी माझ्या मनात आभाराहून अधिकच्या भावना आहेत. नाटकाचं पुस्तक पंडित पब्लिकेशनकडून होतंय हा आणखी एक सुखद योग. वामन पंडितांशी माझा खूप जुना स्नेह आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं तो वृद्धिंगत होतोय. त्यांना मन:पूर्वक धन्यवाद.
नाटकाच्या पुस्तकानं प्रयोगाहून वेगळं काही साधायचं असतं, त्यानं वाचनानुभवही द्यायचा असतो. हे पुस्तक ते साधेल अशी आशा बाळगतो.
शेवटी कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो.
.............................................................................................................................................
‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment