भारत : अस्वाभाविक राष्ट्र आणि अस्वाभाविक लोकशाही
ग्रंथनामा - झलक
रामचंद्र गुहा
  • ‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 09 March 2018
  • ग्रंथनामा Granthnama झलक रामचंद्र गुहा Ramchadra Guha आधुनिक भारताचे विचारस्तंभ Aadhunik Bharatache Vicharstambha शारदा साठे Sharda Sathe

आधुनिक भारताचे इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा शारदा साठे यांनी मराठी अनुवाद केला आहे. तो नुकताच रोहन प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला आहे. एक अस्वाभाविक राष्ट्र आणि अस्वाभाविक अशी लोकशाही प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती वैचारिक मांडणी कारणीभूत झाली हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रस्तुत ग्रंथ निर्माण केला आहे. या पुस्तकात गुहांनी राजा राममोहन रॉय (भाग १); सय्यद अहंमद खान, जोतिराव फुले, ताराबाई शिंदे, गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक (भाग २); एम.के. गांधी, रवींद्रनाथ ठाकूर, भीमराव आंबेडकर, एम.ए. जिना, ई.व्ही. रामस्वामी, कमलादेवी चटोपाध्याय (भाग ३); जवाहरलाल नेहरू, माधव गोळवलकर, सी. राजगोपालाचारी, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आणि व्हेरियर एल्विन (भाग ४). हमीद दलवाई (भाग ५). या १९ विचारवंतांचा समावेश केला आहे. या पुस्तकाला त्यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश.

.............................................................................................................................................

१.

आधुनिक भारताविषयी एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती ही की, ज्या स्त्री-पुरुषांनी आधुनिक भारताचा इतिहास घडवला, त्यांनीच त्याविषयी अधिकारवाणीने लिहिले आहे. जे देशाचे राजकीय पुढारी होते, तेच नेतृत्वस्थानी असलेले राजकीय विचारवंत होते. मोहनदास के. गांधी, जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या त्रयीबद्दल तर ते अधिकच खरे आहे. पहिले गांधी, भारतीय राष्ट्रवादाचे पिता. त्यांनी १९२०-१९४० या काळात ब्रिटिश वासाहतिक साम्राज्याविरुद्ध देशव्यापी चळवळीचे हत्यार परजले. दुसरे जवाहरलाल नेहरू- आधुनिक भारताचे रचनाकार. स्वतंत्र भारताच्या जन्मापासून- ऑगस्ट १९४७ पासून ते मे १९६४मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची धुरा वाहिली. तिसरे डॉ. बी. आर. आंबेडकर- अस्पृश्य जाती आणि पददलितांचे महान नेता. भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेवर देखरेख केली. ते भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले. पण या लढाया आणि संघर्ष करताना, नेतृत्व आणि राज्यकारभार करतानाच गांधी, नेहरू आणि आंबेडकर या तिघांनीही सभोवतालचे जग पाहिले आणि घडवले, इतकेच नव्हे, तर त्याबद्दल भरपूर लिहून ठेवले आहे.

गांधींचे समग्र वाङ्मय भारत सरकारने १९५८ ते १९९४ या काळात प्रकाशित केले आहे. त्याचे ९० पेक्षा अधिक खंड आहेत. नेहरूंच्या निवडक लेखनाचे ५०च्या वर खंड आहेत. ते त्यांच्याच नावाने निर्माण केलेल्या ट्रस्टने प्रकाशित केले आहेत. १९८०च्या दशकात आंबेडकर जिथे जन्मले, त्या महाराष्ट्र राज्याने १६ भागांत त्यांचे लेखन प्रकाशित केले. प्रत्येक भागात जवळजवळ १०००च्या वर पाने आहेत. त्यापैकी बरीच पाने नित्याची पत्रे, भाषणे यांसाठी खर्ची पडली आहेत. काही प्रदीर्घ निबंध आहेत. राष्ट्रीय अस्मिता, लोकशाही, धर्मसंस्कृती, सामाजिक न्याय यांसारखे विषय त्यांत हाताळले आहेत. सर्व भारतीयांना (खासकरून भारतीय लेखकांना) भरपूर आणि शब्दबंबाळ लिहायला आवडते. पण या तिघांच्या बाबतीत आपण एक गोष्ट निश्चित म्हणू शकतो- त्यांनी खूप लिखाण केले म्हणून काही त्यांच्या लेखनाची गुणवत्ता कमी झाली नाही. पण राजकीय क्रियाशीलता आणि सैद्धांतिक विचार हे काही या तिघांचेच वैशिष्ट्य होते असे नाही. अन्य भारतीय राजकारणी आणि सुधारकसुद्धा गंभीर लेखन करणारे होते. आपापल्या मर्यादित क्षेत्रात त्यांनी आपल्या संकल्पनांची उत्तम अभिव्यक्ती केली आहे. त्यांचे सिद्धान्त आणि संकल्पना त्यांच्या काळातही अतिशय प्रभावी होत्या आणि आजही त्या आपल्यावर तसाच प्रभाव टाकू शकतात.

आधुनिक भारत एका बाबतीत आगळावेगळा आहे. इथे जे राजकारणी आहेत, तेच अभिजात, मूलभूत राजकीय विचारवंतही आहेत. पण याबाबत भारत हे एकमेव असे राष्ट्र नाही. इतरही काही राष्ट्रांमध्ये त्यांची जडणघडण करणारे कार्यकर्ते, वादपटू यांनी लेखनही केले आणि राजकीय खेळ्याही केल्या. अमेरिकन राष्ट्रवादाच्या पहिल्या पिढीतील नेते- मॅडिसन, हॅमिल्टन, जेफर्सन, फ्रँकलिन हे जसे कार्यकर्ते होते, तसेच विचारवंतही होते. क्युबाचा जोश मार्टी, सेनेगलचा लिओपोल्ड सेन्गॉर, घानाचा क्वामे नक्रुमा यांनी परकीय वर्चस्वातून आपापले देश मुक्त करण्यासाठी चळवळीत भाग घेतला. त्याचप्रमाणे प्रचारासाठीचे महत्त्वपूर्ण लेखन केले आणि तसेच विद्वत्तापूर्ण लेखनही केले.

नवीन राष्ट्रे जन्माला येतात तेव्हा आणि संकटसमयीसुद्धा कार्यकर्ते-विचारवंत जन्माला घालतात असे दिसते. गेल्या शतकाच्या मधल्या दशकांमध्ये इंग्लंड आणि फ्रान्सचे सार्वभौमत्व नाझी जर्मनीमुळे धोक्यात आले. त्या वेळी ज्या राष्ट्रभक्तांनी नाझीविरोधी भूमिगत चळवळ केली, त्यांनीच त्यात प्रेरणादायी लेखनही केले. विन्स्टन चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि नंतर जे लेखन केले त्यासाठी त्यांना वाङ्मयक्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्याचप्रमाणे १९४० आणि १९५०च्या दशकात चार्ल्स-द-गॉलने लक्षणीय लेखनाचा धडाकाच लावला. द गॉलचे हे खळबळजनक लेखन, फ्रान्स राष्ट्र म्हणून काय चीज आहे आणि फ्रेंच असणे म्हणजे काय, याचे आपल्याला एक नवेच दर्शन घडवते.

आणखी एक व तिसरे अनुमान म्हणजे- राजकारणी- लेखक निर्माण होऊ शकणे हा शासनव्यवस्थेत घडून आलेला क्रांतिकारक बदल होय. लेनिन आणि माओ यांना राजकारणी-लेखक म्हणून उत्तम आदर्श म्हणता येईल. लेनिन आणि माओ हे अनुक्रमे रशियन व चिनी क्रांतीचे जगन्मान्य नेते होते. ते त्यांच्या कृतिशीलतेबद्दल प्रसिद्ध होते, पण त्याचबरोबर त्यांनी राजकारण आणि अर्थकारण यांचे पृथक्करण करणारे अत्यंत प्रभावशाली असे लिखाण केले. त्यांचे प्रबंध आणि ग्रंथ त्यांच्या स्वत:च्या देशात वाचनासाठी अत्यंत आवश्यक मानले जात असत. इतकेच नव्हे, तर इतर देशांतही त्याबद्दल खूप आकर्षण होते.

असा हा सर्व इकडचा-तिकडचा इतिहास पाहिला तरी मला असे वाटते की, भारताची कथा आगळीवेगळीच आहे. हे वेगळेपण तीन बाबतीत आहे. इतर कोणत्याही क्रियाशील देशापेक्षा भारतात कार्यप्रवण विचारवंतांची परंपरा प्रदीर्घ काळापासून आहे. १८व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिका हे राष्ट्र घडवणाऱ्या अध्वर्यूंकडे लोकशाही आणि राष्ट्रीयत्व यांबद्दलच्या विलक्षण व रोमांचकारी संकल्पनांचा खजिना होता. पण त्यानंतरच्या अमेरिकन राज्यकर्त्यांनी फक्त राज्य केले आणि प्रशासन चालवले. काही वेळा गैर पद्धतीने राज्य व प्रशासन चालवले त्यांच्या वर्तमान संकल्पना व्यावसायिक विचारवंत अथवा बुद्धिवाद्यांनी जन्माला घातल्या. पण १९व्या शतकाच्या पहिल्या दशकापासून २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत भारतातील प्रभावी राजकीय विचारवंत हेच बहुतांशी प्रभावी राजकीय कार्यकर्ते होते. भारताला एक राष्ट्र म्हणून आकार येण्यापूर्वी भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रदीर्घ वाटचालीत, तसेच स्वतंत्र भारताच्या पहिल्या काही दशकांत भारतीय समाजाबद्दल व राजकारणाबद्दल अत्यंत रोचक वैचारिक मांडणी ज्या स्त्री-पुरुषांनी केली तेच राजकीय प्रक्रियेत क्रियाशीलरीत्या गढलेले होते.

दुसरा मुद्दा असा की, विचारवंत व्यक्तींची सयुक्तिकता भारतात इतरांपेक्षा अधिक काळ टिकून राहिली आहे. उदाहरणार्थ, लेनिनच्या संकल्पना साधारणपणे सत्तर वर्षे प्रभावशाली राहिल्या, म्हणजे सोविएत संघराज्याच्या निर्मितीपासून ते सोविएत युनियन विलयाला जाईपर्यंत टिकल्या. माओच्या संकल्पना त्याहीपेक्षा कमी काळ म्हणजे साधारणपणे तीन दशकेच प्रभावी राहिल्या. १९४९ साली चिनी क्रांती यशस्वी झाल्यापासून डेंग झाओ पिंने १९७०च्या दशकात आपल्या नेत्याच्या संकल्पनांना आव्हान दिले तिथपर्यंतच त्यांचा प्रभाव राहिला. पश्चिम युरोपातील विचारवंतांकडे पाहिले तर, विन्स्टन चर्चिलने ब्रिटिश साम्राज्यशाहीचे जे उत्कट समर्थन केले त्याने १९५० नंतर कोणीच प्रभावित झाले नाही. द गॉल आपल्या ‘भव्य दिव्य फ्रान्स’च्या भावना उद्दीपित करण्यासाठी प्रसिद्ध होते. पण त्या संकल्पना व भावना आता पातळ (सुदैवाने?) झाल्या असून फक्त युरोपियन युनियन भक्कम करण्यासाठी उपयोगात येत आहेत. या पुस्तकाच्या पानांमधून तुम्हाला याचा प्रत्यय येईल की, १९व्या आणि २०व्या शतकांतल्या भारतीय विचारवंतांनी जो वैचारिक ऊहापोह केला, तो वर्तमान प्रश्नांसाठीसुद्धा सयुक्तिक ठरला आहे.

तिसरा मुद्दा असा की, भारतीय राजकीय परंपरेत बहुविध विचारवंतांची रेलचेल आहे. अगदी गांधी-नेहरूंनासुद्धा आपल्या देशात ‘अखेरचा शब्द’ देणाऱ्या अवलियाचे स्थान कधीही मिळाले नाही, जे माओ आणि लेनिन यांना त्यांच्या-त्यांच्या देशात लाभले होते. कोणताही क्षण बघा- गांधी-नेहरूंच्या विचारांना विरोध करणारे असंख्य विचारवंत अस्तित्वात होते आणि तितकेच असंख्य अनुयायीही होते. दुसरे म्हणजे राजकारणी आणि सामाजिक सुधारकांनी इतक्या प्रकारच्या प्रश्नांवर चर्चा आणि कृती केली आहे की, तशी व्याप्ती इतर कुठल्याही देशात आढळत नाही. अशा प्रकारचे वैचारिक वैविध्य आणि खोली हा एकूणच भारतीय समाजाच्या वैविध्याचा आणि खोलीचा परिपाक आहे असे मला वाटते.

२.

फार पूर्वीपासून मला असे वाटत आले आहे की, भारत हा जगातील सर्वांत कुतूहलजनक देश आहे. एक इतिहासकार या नात्याने माझे हे वस्तुनिष्ठ असे मत आहे. या देशाचा नागरिक म्हणून मी भारताला झुकते माप देत नाही. भारतात सर्वाधिक विषमता असण्याची शक्यता आहे. तो एक गर्हणीय देशही असू शकेल आणि तसेच तो तुम्हाला हतबुद्ध करणारा देशही असू शकतो. यांपैकी भारतासाठी तुम्ही कोणतेही विशेषण वापरलेत तरी एक गोष्ट नक्कीच आहे, की भारत हा सर्वांत जास्त कुतूहल जागवणारा देश आहे. तो इतका प्रचंड आहे की, जगातील एक सष्टमांश लोक भारतात राहतात. दुसरे म्हणजे भारतामध्ये भौगोलिक वैविध्यही आश्चर्य वाटावे इतके प्रचंड आहे. वेगवेगळे धर्म, भाषा, जात आणि वांशिकता यांत इथली जनता विभागलेली आहे. इतकेच नव्हे, तर पर्यावरण, तंत्रज्ञान, वेशभूषा आणि खाद्यजीवन यांतही अफाट वैविध्य आहे.

आकारमान आणि विविधता आहेच, पण त्याहीपेक्षा भारताला कुतूहलजनक देश बनवणारी एक अत्यंत ठळक गोष्ट आहे, ती म्हणजे एकाच वेळी पाच नाट्यमय स्थित्यंतरांतून हा देश चालला आहे. एके काळी भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित होती. आता तो तोल बदलला असून ती मोठ्या प्रमाणावर उद्योग व सेवा क्षेत्रांवर आधारित आहे. एके काळी बहुसंख्य भारतीय खेड्यात राहत असत. आता कोट्यवधी लोकं छोट्या-मोठ्या शहरांतून राहतात. भारत एके काळी युरोपियन साम्राज्यांची वसाहत होता. आता तो एक स्वतंत्र देश आहे. एकेकाळी भारतातील राजकीय संस्कृती सरंजामी आणि आज्ञाधारक होती. आता ती आव्हान देणारी आणि लोकांना सहभागी करून घेणारी अशी आहे. समाज-पद्धती त्या-त्या समाज-समूहांच्या अखत्यारित होत्या व पितृप्रधान व्यवस्थेचा भाग होत्या. आता खूप मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक हक्कांना जागा करून द्यावी लागते. त्याचप्रमाणे पूर्वाश्रमीच्या दबलेल्या वा वंचित विभागांच्या- खासकरून स्त्रिया व कनिष्ठ जातींच्या- हक्कांना मजबुती यायला लागली आहे.

भारतात एकसमयावच्छेदेकरून (एकाच वेळी) पाच क्रांत्या होत होत्या आणि अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे. शहरीकरण, औद्योगिकीकरण, राष्ट्रीय जडणघडण, लोकशाहीकरण आणि सामाजिक बदल या त्या पाच क्रांत्या होत. ‘एकसमयावच्छेदेकरून’ हा शब्दप्रयोग इथे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेत या क्रांत्या वेगवेगळ्या कालखंडांत झाल्या. अमेरिकेने अठराव्या शतकात राष्ट्रीय स्वातंत्र्य जाहीर केले. त्यानंतर एकोणिसाव्या शतकात त्यांचे शहरीकरण आणि औद्योगिकीकरण झाले. स्त्रिया आणि आफ्रिकन-अमेरिकन जनतेला विसाव्या शतकात मतदानाचा हक्क प्राप्त झाला. आणि त्यानंतरच अमेरिका हा लोकशाही देश बनला. युरोप हे खंड कितीतरी राष्ट्रांमध्ये विभागलेले आहे. निरनिराळ्या युरोपीय देशांतील निरनिराळ्या क्रांत्यांची गती भिन्न भिन्न राहिली. कळीची गोष्ट अशी की, या सर्व युरोपीय राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय क्रांती प्रथम झाली आणि त्यानंतर अनेक दशके उलटल्यावर लोकशाही क्रांती झाली. याचा अर्थ असा की, विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील लोक एका झेंड्याखाली एकत्र आले आणि त्यांनी एकच एक चलन स्वीकारले. त्यांनी आपले नेतृत्व निवडण्यापूर्वीच ही गोष्ट घडून गेली होती.

भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या तिप्पट आहे. युरोपमध्ये जितक्या भाषा आहेत, जवळ जवळ तितक्याच भाषा भारतात आहेत. फरक एकच आहे- इथे प्रत्येक भाषेला स्वत:ची वेगळी अशी लिपी आहे. अमेरिका आणि युरोपपेक्षा भारतात धर्मांची संख्या खूप मोठी आहे. आणि भारत ज्या वेळी राष्ट्र म्हणून जन्माला आला, त्याच वेळी लोकशाही भारत म्हणूनही जन्माला आला. युरोप आणि उत्तर अमेरिकेत असे घडले नाही. तिथे राष्ट्रनिर्मिती अगोदर झाली. त्यानंतर बराच काळ लोटल्यावर लोकशाही अस्तित्वात आली. भारताचा महान आशियाई शेजारी चीनमध्येसुद्धा याउलट परिस्थिती आहे. चीन हे राष्ट्र म्हणून एकपक्षीय शासनसत्तेच्या दडपशाहीच्या आधाराने टिकले आहे. काहीही असो, औद्योगिक क्रांती आणि राष्ट्रीय क्रांती यांमधून कितीतरी महत्त्वपूर्ण संघर्ष आणि उलथापालथ घडू शकली असती. जगातील इतर राष्ट्रांत तसे घडलेले दिसून येते. भारतात या संघर्षाची अभिव्यक्ती दोन तऱ्हेने झालेली आहे याची नोंद करणे आवश्यक आहे. एका बाजूला सशस्त्र उठाव आणि फुटीरतावादी चळवळी झाल्या, तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची निदर्शने, कायदेशीर आव्हाने, वृत्तपत्रीय प्रचार-मोहिमा आणि संसदीय चर्चा झालेल्या दिसून येतात. याचाच अर्थ असा की, राजकीय संघटनाच्या प्रक्रियेला आणि भाषणबाजीला लोकशाही व्यवस्थेत परवानगी आहे आणि उत्तेजनही दिले जाते. भारताचा भौगोलिक पसारा, बहुसांस्कृतिकता आणि एकसमयाच्छेदेकरून झालेल्या या पाच क्रांत्या यांच्यामुळे भारत हा जगातील एक अत्यंत कुतूहलजनक देश बनला आहे.

प्रस्तुत ग्रंथात ज्या व्यक्तींचा समावेश आहे, त्या व्यक्तींनी या पाच क्रांत्यांतून आपले जीवन व्यतीत केले आहे; त्या क्रांत्या सुरू करण्याचे किंवा त्यांना आकार  देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या एकूण कारकिर्दीतील आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पाच क्रांत्यांचा स्वत:वर आणि आपल्या देशबांधवांवर काय परिणाम झाला हेही त्यांनी लिहून ठेवले आहे. आपल्या लेखनातून त्यांनी या पाच क्रांत्यांचे सखोल संशोधन करण्याचे प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ, अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करत असताना शहरी आणि ग्रामीण हितसंबंध कसे एकमेकांशी संवादी राहतील याविषयी त्यांनी खूपच विचार केला आहे. धार्मिक बहुविधता आणि धार्मिक संघर्ष यांच्या वातावरणात राष्ट्रीय एकता कशी टिकवायची, स्त्रिया आणि कनिष्ठ जातींचे हक्क कसे पुढे न्यायचे, व्यक्तिस्वातंत्र्य आणि सामाजिक समता यांमधील स्पर्धात्मक मूल्ये बाजूला सारून ते परस्परसंवादी राहण्यासाठी काय करायचे, अशा अनेक बाबींचा त्यांनी सखोल विचार केला आहे. यांतील काही विचारवंत कार्यकर्ते अंतर्बाह्य प्रेरणा घेणारे होते, त्यांना आपला देश एकात्म करायचा होता आणि लोकशाहीसुद्धा विकसित करायची होती. त्याच बरोबर भारत इतर राष्ट्रांबरोबरचे परस्परसंबंध किती सर्जनशीलतेने वाढवू शकेल याकडेही त्यांचे लक्ष होते. कारण जग आता एकमेकांशी जोडले गेलेले होते.

प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट असलेले स्त्री-पुरुष काही एका आवाजात बोलत नव्हते. त्यांची परिप्रेक्ष्ये कधी परस्परपूरक असायची, तर बहुतेक वेळा स्पर्धात्मक असायची. त्याचबरोबर ती ज्ञानवृद्धी करणारी असायची हे नक्कीच. त्यांचे लिखाण हे काही निव्वळ पढित पंडिताचे नव्हते, खरे तर त्यांच्या लेखनाचा भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीवर जबरदस्त परिणाम झालेला दिसून येतो. या ग्रंथामध्ये समाविष्ट केलेले उतारे किंवा निबंध वा भाषणे आपल्याला भारतीय उपखंडाच्या (एक प्रकारे अनाहुत) अशा आधुनिकतेच्या कालखंडाची सफर घडवून आणतात. त्याबरोबरच पुढच्या सहा दशकांतील एका सर्वांत मोठ्या राष्ट्राचा लोकशाही इतिहास उलगडून दाखवतात. याच माध्यमातून आपल्याला भारताचा २०० वर्षांचा इतिहास कळायला मदत होते. त्याचे निरूपण व विश्लेषण याच स्त्री-पुरुष लेखकांनी केलेले आहे आणि त्यांनीच तर हा देश घडवण्याचे आणि या विलक्षण कालखंडाला आकार देण्याचे काम केलेले आहे. त्यांनीच जगातील या सर्वांत विलक्षण देशाचे प्रारूप घडवले आहे.

३.

प्रस्तुत ग्रंथात एकूण १९ व्यक्तिमत्त्वांचा समावेश केला आहे. सुरुवात राममोहन रॉय यांच्यापासून केली आहे. पाश्चात्त्य जगाने उभ्या केलेल्या आव्हानाला सामोरे जाणारा हा पहिला भारतीय विचारवंत असावा. त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला. ब्रिटिश अधिपत्याखाली गेलेला हा पहिला प्रांत होय. इथे आलेल्या परकीय लोकांमुळे राममोहन एतद्देशीय समाजातील गृहीततत्त्वांचा पुनर्विचार करायला प्रवृत्त झाले. एका बाजूला त्यांनी आपल्या समाजातील कुरूप व विरूप आणि पिळवणूक करणाऱ्या साध्यासुध्या श्रद्धांमध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला गोऱ्यांचे वर्चस्व असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीकडे, त्यांच्या मायदेशी जे लोकशाही हक्क दिले जात होते, ते हक्क इथेही लोकांना दिले पाहिजेत, अशी मागणी करायलाही सुरुवात केली. वसाहतीतील जनतेला ते हक्क नाकारले गेले होते. या दोन्ही बाबतींत राजा राममोहन सुधारकांच्या विचारधारेची दिशा पक्की करायला कारणीभूत झाले. त्यानुसार पुढची सुधारकांची फळी निर्माण होत गेली.

रॉय यांच्यानंतर १९व्या शतकाच्या शेवटी शेवटी व २०व्या शतकाच्या सुरुवातीस कार्यरत असलेल्या विचारवंतांच्या पंचकाकडे आपण वळणार आहोत. १८५७मध्ये वासाहतिक राजवटीच्या विरुद्ध एक मोठा उठाव झाला. तो उठाव असंतुष्ट सैनिकांनी केला होता आणि त्यात कितीतरी शेतकरी व धर्मप्रचारक ओढले गेले होते. या उठावाचा बीमोड केल्यानंतर ब्रिटनच्या राणीने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतावर अंमल करण्याची जबाबदारी स्वत:च्या अखत्यारीत घेतली. १८८५मध्ये ही नवी राजवट हिंदुस्थानवर जम बसवत असतानाच वासाहतिक प्रजेतील काही शहरी, सुशिक्षित, लोक एकत्र आले आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. राजा आणि प्रजा यांत मध्यस्थी करण्याचे काम काँग्रेसने स्वीकारले. मुकुल केशवनच्या सुप्रसिद्ध वचनानुसार काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीयत्वाची ‘नोहाज नौका’ (पुरातून तारून नेणारी नौका) बनली. काँग्रेसच्या नावातून सूचित होते त्याप्रमाणेच काँग्रेस पक्षात सर्व भारतीयांना- स्त्री-पुरुषांना जागा होती; मग ते कोणत्याही भाषेचे, धर्माचे, प्रांताचे किंवा वंशाचे असोत. अर्थात या बाबतीत ते बऱ्याच अंशी यशस्वी झाले असले तरी त्यांना पूर्ण यश मिळाले असे म्हणता येणार नाही. बहुतांश बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी भारतीयांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यापासून दूर राहिलेलेही बरेच जण होते. त्यांच्या मते काँग्रेस ही समाजातील काही विभागांचेच प्रतिनिधित्व करणारी होती. ही समाजातील उच्च स्तरातील लोकांचे हितसंबंध जपणारी होती आणि हे हितसंबंध समाजातील वंचित लोकांच्या हितसंबंधांशी जुळणारे नव्हते, किंबहुना शत्रुत्वाचेच होते.

ग्रंथाच्या दुसऱ्या भागात ज्या पाच विचारवंतांचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांतील दोन विचारवंत प्रदीर्घ काळ काँग्रेसचे सदस्य होते. दोघे जण काँग्रेसच्या विरोधातले होते आणि पाचवा विचारवंत मूर्तिभंजक होता. पण त्या पाचही विचारवंतांनी मूलभूत आणि स्वतंत्र विचारांची अभिव्यक्ती केली आहे आणि त्यांचे प्रतिपादनही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण राहिलेले आहे. वासाहतिक वर्चस्वापासून भारत अगदी उत्तम प्रकारे कसा स्वतंत्र होऊ शकेल याबद्दल त्यांनी स्वत:च्या विभागाचा परिपोष विकसित केला आहे. त्याचप्रमाणे भारतीय समाजाअंतर्गत जे मतभेद आणि वेगळेपण असेल त्याचा सामना कसा उत्तम रीतीने करता येईल याचीही मांडणी केली आहे.

ग्रंथाच्या तिसऱ्या भागात महात्मा गांधींचे जीवन व कार्य यांच्या अनुषंगाने ज्या चर्चा सुरू झाल्या त्याच्याभोवती गुंफण केली आहे. दक्षिण आफ्रिकेत दोन दशके घालवल्यानंतर गांधी १९१५मध्ये ब्रिटिश भारतात परतले. १९२०च्या सुमारास ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते म्हणून प्रसिद्धी पावले होते. त्यानंतरच्या काही दशकांत गांधींजींनी ब्रिटिश वासाहतिक राजवटीविरुद्ध तीन महत्त्वाच्या मोहिमा संघटित केल्या. अनेक सामाजिक सुधारणांना सुरुवात केली. त्याचबरोबर या नव्याने आकार घेत असलेल्या राष्ट्रातील समस्या आणि भवितव्य यांविषयी अविरत लेखन केले.

गांधींच्या हयातीतच लोकांनी त्यांना राष्ट्रपिता हे बिरुद प्रदान केले होते. खरे तर भारताच्या भवितव्यासंदर्भात जे सारे संघर्ष आणि लढाया झाल्या, त्यांची जननीही गांधीच होते. कोणत्याही आधुनिक राजकारण्याकडे गांधींप्रमाणे खुली टीका झेलण्याची तयारी नव्हती. गांधींचा दैनंदिन व्यवहार सर्व लोकांसमक्षच घडत असे आणि लोक त्याचे निरीक्षण करू शकत आणि त्यांच्या सर्व मोहिमा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना पूर्वसूचना देऊनच सुरू होत. केवळ ब्रिटिशच गांधींच्या विरुद्ध होते असे नव्हे (किंवा मुख्य तात्त्विक विरोधक होते असेही नव्हे), गांधींच्या जवळ वावरणाऱ्या कित्येक सहकाऱ्यांनासुद्धा गांधी काय म्हणतात याचे सहजासहजी आकलन होत नसे. त्याचप्रमाणे जे राजकीयदृष्ट्या गांधींच्या विरुद्ध होते, त्यांनासुद्धा गांधींचे आकलन होत नसे.

गांधींचे सर्व आयुष्य आपल्या मित्रांशी आणि विरोधकांशी वादविवाद करण्यात खर्ची पडले. या वादचर्चा गांधीजींच्या शब्दातच प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्या चर्चांत सहभागी असणाऱ्यांच्या शब्दात त्या मांडल्या आहेत. तिसऱ्या भागात समाविष्ट असलेले अन्य पाच विचारवंतांपैकी दोन गांधींचे टीकाकार, पण चाहते होते; इतर तीन टीकाकार त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते.

ग्रंथाचा चौथा भाग पंडित जवाहरलाल नेहरूंच्या राजकीय मुत्सद्दीपणाभोवती गुंफलेला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळात देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचा आधुनिक भारतावर जवळजवळ गांधींइतकाच प्रभाव होता असे प्रतिपादन करता येईल. याबद्दल मतभेदही असू शकतात. १९५७ साली एका कॅनडियन अभ्यासक व राजदूताने नेहरूंविषयी असे लिहिले आहे की, ‘नेपोलियननंतर आजतागायत नेहरूंसारखी एकही व्यक्ती झालेली नाही, जिने आपल्या देशाचा इतिहास घडवण्यात इतकी महत्त्वपूर्ण भूमिकाही बजावली आहे आणि जनमानसातही स्थान पटकावले आहे. भारतीय जनतेसाठी जवाहरलाल नेहरू हे जॉर्ज वॉशिंग्टन, अ‍ॅब्राहॅम लिंकन, आयसेनहॉवर, रुझवेल्ट यांचा एकत्रित आविष्कार आहेत.’

नेहरूंशी तुलना करता येईल असा एकही राजकीय विचारवंत आधुनिक काळात नाही, अगदी विन्स्टन चर्चिलसुद्धा नाही. चर्चिलप्रमाणेच नेहरूंनाही इतिहासात विलक्षण रस होता, पण त्यांना राजकीय संकल्पना आणि राजकीय तत्त्वज्ञानातही तसाच रस होता. (त्यामुळेच त्यांना बुद्धिवादी लोकांबद्दल विशेष प्रेम होते) जो चर्चिलना नव्हता.

गांधींप्रमाणेच नेहरूंच्या संकल्पनाही विवाद्य होत्या. त्यांचे देशबांधवसुद्धा त्यांना विरोध करण्यात कमी नव्हते. चौथ्या भागातील जे पाच भारताचे शिल्पकार आहेत. त्यांतील एक तर उभी हयात पंतप्रधानांचा विरोधक होता, तर दुसरा एक त्यांचा चाहता होता. उर्वरित तिघे कधी सहकारी होते तर कधी सुहृद होते. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी काँग्रेस कार्यकर्ते म्हणून या सर्वांना एकाच कारणासाठी तुरुंगवास घडला होता आणि ते एकाच जेलमध्ये कैद होते. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय जनतेच्या हितासाठी कोणता मार्ग सर्वांत चांगला ठरेल, यावर त्यांनी वेगवेगळे रस्ते पकडून मार्गक्रमण सुरू केले.

नेहरूंचे व काँग्रेसचे प्रथम मित्र असलेल्या आणि नंतर प्रतिस्पर्धी बनलेल्या तिघांपैकी एक- डावा समाजवादी विचारवंत होता; दुसरा मुक्त अर्थव्यवस्थेच्या- समर्थनासाठी ‘स्वतंत्र पक्षाचा’ संस्थापक बनला तर तिसऱ्याने पक्षपद्धतीचाच; संपूर्ण धिक्कार केला. त्याने ग्रामपंचायतीवर आधारित असे तळागाळातील लोकशाहीचे नवीन प्रारूप देशापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व नेहरूंप्रमाणेच विचारवंत राजकारणी होते. त्यांच्या प्रतिपादनात नेमकेपणा होता आणि त्यांच्या वैचारिक निष्ठांची खोली त्यांच्या लेखनातून प्रतीत होत होती.

पुस्तकाच्या पहिल्या भागाप्रमाणे शेवटच्या भागात एकच व्यक्ती मैदानात आहे. पण पहिल्या भागातील व्यक्ती राममोहन रॉय हे एक प्रसिद्ध गृहस्थ होते. मात्र, शेवटच्या भागातील व्यक्ती कोणालाही फारशी माहीत नाही. भारताबाहेर तर नाहीच नाही. भारतातील बहुतांश सुशिक्षित समाजही या व्यक्तीविषयी अज्ञानी आहे, पण त्याच्या लिखाणातले जे उतारे इथे निवडले आहेत, त्यांतून आपल्याला हे सहजपणे दिसून येईल की, भारतीय राजकारणातील सर्वांत शेवटचा आधुनिक सुधारक म्हणून त्याचे स्थान आजही खूप रोचक आणि सयुक्तिक आहे.

४.

या १९ भारतीयांनी जे पाहिले आणि अनुभवले ते अत्यंत महत्त्वाचे आणि रोमहर्षक होते. आणि ते त्यांनी अतिशय उत्कटतेने गद्यलेखनात ग्रथित केले आहे, हे आपले भाग्यच म्हणायला हवे. त्यांची भाषाभिव्यक्ती कधी कधी तिरपागडी वाटली तरी अचूक भान व्यक्त करणारी होती. त्यातले टोकाचे उभयान्वयी अव्यय, व्याकरण बाजूला ठेवून प्रतिपादनाचे विषय आणि थेट भिडण्याची क्षमता याबद्दल ते विलक्षण पारदर्शी होते असे म्हणता येईल.

पूर्वीचे किंवा वर्तमानातले राजकीय पक्षपाती आपापल्या आदर्श नायकाचे किंवा नायिकेचे कार्य व योगदान सर्वांत पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतील. मी ते टाळले आहे आणि प्रत्येकाचा विचार आणि जीवन एका व्यापक, प्रदीर्घ लोकशाही चर्चेच्या आणि संघर्षाच्या परंपरेच्या अंतर्गत नेटकेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना इतरांपासून वेगळे काढून विचार करण्याने कदाचित एखाद्या विभागाला किंवा पक्षाला काहीसे समाधान लाभेलही. पण त्याऐवजी त्यांचा समग्र विचार केला तर आपल्याला भारतीय राजकीय परंपरेचा सशक्तपणा आणि सखोलता यांचे पुरावेच हाताला लागतील.

५.

माझे म्हणणे असे आहे की, भारताविषयी किंवा अन्य कोणत्याही देशाविषयी वा मानवी संस्कृतीविषयी बोलत असताना दोन वादचर्चांच्या परंपरांमध्ये फरक करणे आवश्यक आहे. एक अतिप्राचीन आणि दुसरी नजीकच्या काळातील- अशा दोन परंपरा मला इथे अभिप्रेत आहेत. पहिली परंपरा अतिप्राचीन आणि आता अस्तित्वात नसलेल्या राज्यांविषयी आणि राजेशाह्यांशी संबंधित आहे. दुसऱ्या काही परंपरा अशा आहेत ज्यांनी वर्तमान राजकीय आणि सामाजिक संस्थांना प्रत्यक्ष आकार देण्याची कामगिरी पार पाडलेली आहे.

प्रस्तुत पुस्तकात गेल्या दोन शतकांतील वादचर्चा आणि विचारवंतांचा ऊहापोह प्रामुख्याने केलेला आहे. ही निवड करण्याचे एक मुख्य कारण असे आहे की, मी स्वत: आधुनिक कालखंडाचा इतिहासकार आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की, आपल्याला जो अर्वाचीन भारत माहीत आहे, तो आपल्याच कालखंडात जन्माला आलेल्या आणि जीवन जगलेल्या व्यक्तींनी घडवलेला भारत आहे- कुठल्यातरी प्राचीन राजेमहाराजांनी नाही. एक अस्वाभाविक राष्ट्र आणि अस्वाभाविक अशी लोकशाही प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणती वैचारिक मांडणी कारणीभूत झाली हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांना डोळ्यासमोर ठेवून प्रस्तुत ग्रंथ निर्माण केला आहे. तरीही मला असेही वाटले की, भारताचा एकूण आकार लक्षात घेता इथे जे विचारसाहित्य निवडलेले आहे, त्यामुळे जागतिक पातळीवर होत असलेल्या राजकीय व्यवस्थांविषयीच्या चर्चांमध्ये भारताचा समावेश होण्यास मदत होईल आणि त्यांचे जगापासूनचे तुटलेपण कमी होऊ शकेल. २१व्या शतकात ही प्रक्रिया उपयुक्त व योग्य राहील.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4372

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......