लेखन साधना
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन वैद्य
  • वाइल्ड, हिटलर आणि जी.ए. यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठं आणि त्यांची छायाचित्रं
  • Sun , 20 November 2016
  • जी.ए.कुलकर्णी G. A. Kulkarni जीएंची कथा – परिसरयात्रा अर्पणपत्रिकांतून जीएदर्शन वि. गो. वडेर

‘साधना’ या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे तपश्चर्या. एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी तनमनधनानं अविरत श्रमत कष्टत राहणं… अशा साधनेच्या वाचनाच्या संदर्भातल्या अलीकडेच वाचनात आलेल्या काही नोंदी…

थॉमस राइट हा वाचनाचा नादी तरुण. वयाच्या १६व्या वर्षी जुन्या पुस्तकांच्या दुकानातल्या हुडकाहडुकीत त्याला ‘कंम्पिल वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड’ पुस्तकाची कापडी बांधणीतली जाडजडू प्रत मिळाली अन त्याचं तोवरचं आयुष्य बदलून गेलं. या पुस्तकाच्या वाचनानंतर तो पूर्वीचा राहिला नाही. ऑस्कर वाइल्डच्या लेखनाने झपाटलेला थॉमस पुढची तब्बल २० वर्षं वाइल्डच्या शोधार्थ जगभर साहित्यपर्यटन करत राहिला. वाइल्डने लिहिलेल्या पुस्तकांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या, त्यानं वाचलेली नोंदलेली पुस्तकं हुडकत राहिला. वाइल्डनं वास्तव्य केलेली स्थळ, त्यानं वापरलेल्या अभ्यासिकांना भेटी देत या सगळ्यातून वाइल्डला शोधत राहिला. त्याच्या अथक धडपडीच्या या शोधक प्रवासाला त्यानं २० वर्षांनंतर वयाच्या चाळीशीत मूर्त रूप दिलं. ‘हाऊ रीडिंग डिफाइन्स द लाइफ ऑफ ऑस्कर वाइल्ड’ हे त्यानं लिहिलेलं वाङ्मयीन चरित्र थॉमस राइटच्या अपार धडपडीचंही चरित्र आहे.

जागतिक साहित्याचे तौलनिक साहित्य-अभ्यासक आनंद पाटील यांनी त्यांच्या लेखात (घटना, वाङ्मयीन विचार, प्रकार, प्रवाह आणि परिभाषा, ललित दिवाळी २०११) ही नोंद केली आहे (किरण देसाई यांना ‘इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक आणि त्र्यं.वि.सरदेशमुख यांना ‘डांगोरा एका नगरीचा’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी एकाच वर्षी, २००४ रोजी मिळालं. आनंद पाटील यांनी या दोन्ही कादंबऱ्यांमधल्या सांस्कृतिक तपशिलांची तुलना करणारा लेख किरण देसाईंवरच्या समीक्षालेखसंग्रहासाठी लिहिला होता. त्याचं मराठी रूपांतर (सिमंतिनी चाफळकर) आशय, दिवाळी २००५मध्ये प्रसिद्ध केलं गेलं होतं. हे जाता जाता…)

ही साधना.

लेखक, प्राध्यापक, गाढे वाचन व्यासंगी नीतिन रिंढे यांनी ग्रंथदिनाच्या निमित्ताने आधी फेसबुकवर थोडक्यात आणि ब्लॉगवर (नीतीन रिंढे ब्लॉगस्टॉट) तपशिलानं नोंदवलेला एक वाचनानुभवही याच पठडीतला आहे. तो टिमोथी रिबॅकच्या ‘हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी’ या पुस्तकाच्या संदर्भातला आहे.

जगभर ज्यूद्वेष्ट्या, क्रूरकर्मी म्हणून गणला गेलेल्या हिटलरचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह मोठा होता. त्यात ज्यू लेखकांचीही पुस्तकं होती. मॅक्स ऑसबर्न या ज्यू लेखकाचं बर्लिन शहरावरचं पुस्तक त्यानं अखेरपर्यंत जपलं होतं… हीच आपल्यासाठी बातमी असते. आत्महत्येनंतर स्वतःचा मृतदेह शत्रूच्या हाती लागू नये म्हणून त्याची विल्हेवाट कधी लावावी, याबद्दल हिटलरने सविस्तर सूचना केल्या होत्या; पण स्वतःच्या ग्रंथसंग्रहाबद्दल मात्र त्याने काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे विजयनानंतर बँकरमध्ये प्रथम घुसलेल्या अमेरिकी सौनिकांना हिटलरचं शव नाही, तरी त्याचा ग्रंथसंग्रह हाती लागला. या सैनिकांनी ही ‘लूट’ घरी तर नेलीच, पण नंतरच्या पिढीतही ती रद्दीत वा अन्य मार्गाने नष्ट न होता ‘सुरक्षित’ ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये पोहोचली (आपल्यासाठी हेही दर्शनच).

हिटलरचा अमेरिकाभर विखुरलेला ग्रंथसंग्रह शोधणं, हे टिमोथी रिबॅकचं पॅशन (वेड) झालं. अथक परिश्रमानं त्यानं तो शोधला, त्यातल्या पानापानावर झालेला हिटलरचा स्पर्श शोधला (अनेक पुस्तकं अस्पर्शही होती), वाचून समासात वा अन्यत्र हिटलरने केलेल्या नोंदी तपशिलात, बारकाइनं पाहिल्या). त्यातून जगातल्या कुख्यात असलेल्या हिटलरच्या मुखवट्याआडचा माणूस शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचं आयुष्य आणि त्यानं जमवलेली, जपलेली पुस्तकं यांच्यातलं नातं त्यानं ‘हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी’मधून शब्दबद्ध केलं. आवर्जुन लिहिलं ते पॉप्युलर हिस्ट्री या प्रकारात मोडणारं, सामान्य वाचकांशी नाळ जोडणारं… रिंढेंना हे महत्त्वाचं वाटतंच, पण आपल्याकडे असलेली अशा बौद्धिक परिश्रमांना खुंटीवर मारून ठेवायची मानसिकताही बोचते.

ही साधना…

आपल्या मराठीतली ही अशीच अलीकडची नोंद.

जी.ए.कुलकर्णी मराठीतले महत्त्वाचे लेखक. ते गेले त्याला तीन दशकं (१९८७) होत आली. त्याआधी दशकभर त्यांनी कथालेखन थांबवलं होतं. म्हणजे हे लेखन येऊन चाळीसावर वर्षं झाली, तरी आजही त्यातली आवाहकता, त्यांच्या (कथांमधली) आकलनातल्या नव्या शक्यतांचा शोध संपलेला नाही. त्यांनी कथांमधून उपस्थित केलेले सनातन आधिभैतिक प्रश्न आणि त्यांची तथाकथित रेडिमेड उत्तरं निग्रहाने नाकारात गाभ्याला थेट भिडण्याचा जीएंचा प्रयत्न अपयशी झाला (तसा तो होणार होताच…), तरीही या ओघात त्यांनी जे लिहिलं, त्यानं मराठी साहित्यविश्व वादळून गेलं. इतक्या वर्षांनंतरही या कथांच्या आकलनाला अभिव्यक्तीच्या चिमटीत पकडण्याचे प्रयत्न सतत होत असतात. वि. गो. वडेर बेळगावचे. जीएंचे, त्यांच्या परिसराचे गाढे वाचक. जीएंची कथा घडते, ती स्थळं प्रत्यक्षात बेलघाव-धारवाड परिसरातली असावीत (त्यांचं सारं आयुष्य या परिसरातच गेलं), असं त्यांना वाटत होतंच. मग त्यांनी अ. रा. यार्दी या धारवाडमधल्या जीएंच्या स्नेह्याबरोबर शोधयात्राच सुरू केली. कथेचं लेखन झाल्याचा काळ २३-२४ वर्षं वा त्याहूनही जुना. शिवाय लेखन आठवणींतून झालेलं. त्या अधिक जुन्या. दरम्यानच्या शहरीकरणाच्या वेगात सगळंच बदलत चाललेलं होतं. त्यामुळे कथांमधून आलेले तपशील आणि परिसर या दोघांचा अनुभव हाताशी असूनही हा शोध अवघडच होता. शिवाय या शोधाचं फलित काय? कथेच्या आशयाशी या तशा साहित्यबाह्य गोष्टींचा काय संबंध? हेही प्रश्न होतेच; पण वेड्या माणसांना प्रश्न पडत नाहीत हे खरं. ‘‘जीएंच्या कथेतल्या मातीनं झपाटलं होतं’’, असं वडेर सांगतात. यार्दींबरोबर जीएंच्या कथेतला परिसर, त्यांतल्या गूढ अनवट वाटांची वडेरांची भटकंती मग काही वर्षं चालली. मग लक्ष्मी, वीज, राधी, वंश, तळपट, कवठे, हुंदका, बळी, कैरी, स्वामी अशा जी.एं.च्या मराठी कथासृष्टीमधल्या दहा कथा-लेण्यांमधल्या स्थळांचा प्रत्यक्षातला साक्षात्कार राजहंसकडे २००५साली प्रकाशनार्थ गेला. या सुमारास वडेरांना जी.एं.चं विश्वासार्ह चरित्र उपलब्ध नसल्याची जाणकारांनी नोंदवलेली खंत बोचत होती. ‘जीएंची कथा – परिसरयात्रा’च्या लेखनानंतरच्या अवस्थेबद्दल वडेर लिहितात, ‘मरणप्राय बैचेनी आणि रितेपणाने मन भरून गेले होते… रस्ता संपलेला, पण प्रवास सुरूच असलेल्या जी.एं.च्या प्रवशासारखीच अवस्था… काही नवे कळावे, सुचावे, करावे असे वाटूनही तसे घडत नव्हते…’ चरित्र लिहावे, तर विश्वासार्ह साधनांचा पूर्ण अभाव. एक वाट दिसली. जीएंचं व्यक्तिगत आयुष्य किंचित किलकिलं झालं, ते त्यांच्या स्वतंत्र कथांच्या आठ संग्रहांच्या (हयातीत प्रकाशित जालेल्या) अर्पणपत्रिकांमधून…’ एका एका अर्पणपत्रिकेतून जी.एं.नी काहीसा उलगडेला, बराचसा अनावृत राहिलेला भावबंध आधाराला घेत वडेरांची शोधयात्रा पुनश्च सुरू झाली. २००६ ते २०१४ अशी आठ वर्षं वडेर हे भारावलेपण वाहत जीएंच्या आयुष्याला खोदत राहिले. जीएंशी प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे, दूरान्वयानेही संबंधित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा परिसरातल्या २३ गावांमधल्या ९८व्यक्तींना वडेर भेटले. झालेल्या बातचितीतून, पाहिलेल्या ठिकाणांमधून जीएंना शोधत राहिले, आणि साकारालं, ‘अर्पणपत्रिकांतून जीएदर्शन’.

हे अर्थात जीएंचं पूर्ण चरित्र नव्हे, पण आजवर पूर्ण अंधारात असलेल्या (त्यांनी स्वतः पत्रव्यवहारातून उलगडलेल्या काही धाग्यांव्यतिरिक्त) व्यक्तींवर आणि जीएंवर उजेडाचे काही कवडसे पडले आहेत, हे तर यशच आहेच; पण पुढे-मागे कधी पूर्ण चरित्राचं शिवधुनष्य पेलू पाहणाऱ्यांसाठी या दोन्ही पुस्तकांमधून जवळपास १५ वर्षांच्या अविश्रांत परिश्रमांमधून वडेरांनी सुपीक भूमी तयार केली आहे, हे महत्त्वाचं!

 

लेखक पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......