अजूनकाही
पत्रकार श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ या पुस्तकाचं प्रकाशन शुक्रवारी पुण्यात झालं. ११ वर्षांत तब्बल ३०७ सिनेमे ब्रह्मे यांनी पाहिले. त्यांविषयी वर्तमानपत्रांमध्ये लिहिलं. त्यातील निवडक परीक्षणांचा समावेश या पुस्तकात केला आहे. या पुस्तकाला ब्रह्मे यांनी लिहिलेल्या मनोगताचा संपादित अंश...
सिनेमाचं वेड मला कधी लागलं, ते आठवत नाही. माझ्या आईकडून व आजोबांकडून, म्हणजे तिच्या वडिलांकडून हा वारसा माझ्याकडं आला असावा. आईचं लहानपण मराठवाड्यातल्या छोट्या-मोठ्या गावांत गेलं. पण आजोबा बार्शी किंवा सोलापुरात नेऊन तिला आणि तिच्या भावंडांना सिनेमे दाखवत असत. एकदा तर तिनं सलग तीन शो पाहण्याचा पराक्रम केला. तो तिचा विक्रम मी अजूनही मोडू शकलेलो नाही. माझं लहानपण जामखेडमध्ये (जि. नगर) गेलं. तिथं दोन टुरिंग टॉकीज होत्या. आमच्या लहानपणी मुलांनी बघण्यासारखा एखादा सिनेमा आला की, आम्हाला तिथं नेण्यात येई. सिनेमा सुरू होण्यापूर्वी कर्ण्यावर गाणी लागत. माझ्या लहानपणी 'एक दुजे के लिए'ची गाणी फेमस होती. तीच सारखी लागायची. सिनेमा सुरू व्हायच्या आधी सनई लागे. थोड्याच वेळात सिनेमा सुरू होणार असल्याची ती सूचना असे. पूर्वी गावात रात्री विलक्षण शांतता असे. त्यामुळं अगदी किलोमीटर-दीड किलोमीटर अंतरावरच्या आमच्या घरातही ही सनई ऐकू यायची. मग घरातून निघायची लगबग. जामखेडच्या जुन्या स्टँडसमोर ही दत्त टॉकीज होती. तिचं नाव एकदा 'दत्त' असे, तर एकदा 'न्यू दत्त' असे. (फार नंतर याचा उलगडा झाला. त्यांना टुरिंगचा परवाना असल्यानं एकाच नावानं सलग मुक्काम टाकता येत नसे. वास्तविक ही टॉकीज होती एकाच जागेवर... पण तो दर आठवड्याला जागा बदलण्याऐवजी टॉकीजचं नाव बदलत असावा.)
माझे वडील एसटीत कामाला होते आणि एसटी स्टँडच्या समोर ही टॉकीज होती. त्यामुळं आमची तिथं वट असे. बाकी जनता खाली वाळूत बसायची, तर आम्हाला बसायला मागे बाक वगैरे टाकलं जाई. त्या छोट्याशा पटांगणात मधोमध एक छोटी भिंत घातलेली असे. त्यात डाव्या बाजूला बायका आणि उजव्या बाजूला पुरुषमंडळी बसत. बऱ्याचदा वाऱ्यानं पडदा हले. मग ब्रेक डान्स करणारे अमिताभ, रेखा, शत्रुघ्न सिन्हा, अशोक सराफ, निळू फुले पाहावे लागायचे. तेव्हाही मला त्या प्रोजेक्टर रूमची विलक्षण उत्सुकता असे. तिथं पडलेल्या फिल्म्स मी उचलून आणी आणि घरी खोक्याला खाच पाडून, त्यात ती फिल्म लावून, समोर भिंग धरून पडद्यावर मी 'सिनेमा' दाखवत असे. अर्थात, जामखेडमध्ये राहत असतानाही आम्ही पुणे, नगर किंवा लातूरसारख्या शहरांमध्ये सुट्टीसाठी नातेवाइकांकडं आलो, की तिथं मोठ्या बंदिस्त टॉकीजमध्ये सिनेमे पाहायचो. 'बालशिवाजी' हा सिनेमा आमच्या नानानं (काका) आम्हाला मुद्दाम नगरला नेऊन दाखवला होता. पुण्यात प्रभात टॉकीजमध्ये अष्टविनायक हा सिनेमा, तर लातूरला उषाकिरण नावाच्या टॉकीजमध्ये 'सामना' पाहिल्याच्या अंधुक स्मृती आहेत. शिवाय टीव्ही नुकताच आला होता. त्यावर शनिवारी संध्याकाळी लागणारे मराठी सिनेमे न चुकता पाहिले जायचे. आमच्या घरी टीव्ही नव्हता. पण गावात ज्या ओळखींच्याकडे टीव्ही असे, तिथं सगळेच जमत.
पुढं मी नगरमध्ये काही वर्षं राहिलो आणि तिथं खऱ्या अर्थानं मोठ्या, बंदिस्त टॉकीजमध्ये सिनेमे पाहायला मिळाले. त्या वेळी नगरला महेश हे नवं कोरं आणि अतिशय आलिशान असं थिएटर नुकतंच बांधून झालं होतं. मी तिथंच जायचो. मला तिथला भव्य पडदा फार मोहवून टाकायचा. अमिताभचे सगळे जुने सिनेमे तिथं पुन्हा मॅटिनीला प्रदर्शित झाले आणि मला ते मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले.
पण असं असलं, तरी सिनेमाची ही आवड इतर चारचौघांसारखीच होती. त्या विषयी वाचायला आवडत असे, कारण मुळात वाचायचीच आवड होती. त्यामुळं सिनेमाविषयक पुस्तकंपण वाचली जायची. तरी सिनेमाचं परीक्षण लिहावंसं मला पहिल्यांदा वाटलं ते पुण्याला आल्यावर. तेव्हा मी गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकच्या होस्टेलवर राहत असे. त्या वेळी 'मुक्ता' हा जब्बार पटेलांचा सिनेमा आला होता. तो बघून होस्टेलवर आल्यानंतर मी त्या विषयी एक फुलस्केप पान भरून लिहून काढलं. तेच माझं पहिलं आस्वादन किंवा परीक्षण! पुढं 'सकाळ'मध्ये रुजू झाल्यावर कायमचा पुणेकर झालो आणि चित्रपटांचा खास संस्कार सुरू झाला. रिपोर्टिंगच्या निमित्तानं फिल्म इन्स्टिट्यूट, फिल्म आर्काइव्ह इथं जायला मिळू लागलं. पुण्यात वेगवेगळे चित्रपट महोत्सव भरायला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती. हे सिनेमे पाहायला जाऊ लागलो. नंतर रानडे इन्स्टिट्यूटमध्ये जर्नालिझम विभागात पदवीसाठी प्रवेश घेतला. तिथं अनिल झणकर सर, समर नखाते सर आम्हाला शिकवायला जायचे. सिनेमाकडं पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. अनेकांची परीक्षणं आवडायची. विशेषतः मुकेश माचकर यांच्यासारखं लिहिता यायला हवं, असं वाटायचं. त्यांची 'मटा'मधली परीक्षणं वाचूनच मलाही 'आपण हे काम करावं', असं वाटू लागलं. शिरीष कणेकरांचंही चित्रपटविषयक लिखाण आवडायचं. 'सिनेमावर आपणही लिहावं', असं वाटू लागलं. म्हणजे 'हे काम आपल्याला आवडतंय, तर सहज जमेल', असं वाटलं. मी आमचे तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांच्याकडं तशी इच्छा प्रदर्शित केली आणि काही काळानंतर मला 'सकाळ'मध्ये परीक्षण लिहायची संधी मिळाली. 'अनाहत' हा मी परीक्षण लिहिलेला पहिला चित्रपट. हे परीक्षण सप्टेंबर २००३ मध्ये प्रसिद्ध झालं. त्यानंतर मी 'सकाळ' सोडेपर्यंत, म्हणजे पुढची सात वर्षं निरनिराळ्या हिंदी-मराठी अशा १७५ चित्रपटांची परीक्षणं 'सकाळ'मध्ये लिहिली. दीक्षित यांच्यानंतरचे संपादक यमाजी मालकर, सुरेशचंद्र पाध्ये यांनीही मला प्रोत्साहन दिलं. नंतर मी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीत रुजू झालो. इथंही आमचे संपादक पराग करंदीकर यांनी मला परीक्षण लिहिण्याची परवानगी दिली आणि पहिल्या आठवड्यापासूनच मी परीक्षणं लिहायला सुरुवात केली. इथं चार वर्षं परीक्षणं लिहिली आणि मग मी स्वतःच त्यातून निवृत्त झालो. 'पीके'चं परीक्षण डिसेंबर २०१४मध्ये प्रसिद्ध झालं. तेच माझं अंकात प्रसिद्ध झालेलं शेवटचं परीक्षण. या अकरा वर्षांत मी सलग ३०७ चित्रपटांची परीक्षणं लिहिली.
या सर्व सिनेमांची परीक्षणं लिहिताना खूप आनंद मिळाला. अनेक नव्या लोकांशी ओळखी झाल्या. अनुभव गाठीला आले. हे काम म्हटलं तर आनंदाचं आणि म्हटलं तर कंटाळवाणं. आवडता किंवा चांगला सिनेमा असला, की अर्थातच आनंदाचं आणि कुठला तरी भुक्कड सिनेमा पाहावा लागला, की कंटाळवाणं! पण मी कायमच सर्व सिनेमांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कायम वाचकांचा विचार केला. 'आपल्या मनातलंच लिहिलं आहे', असं वाचकाला वाटलं पाहिजे, असा माझा प्रयत्न असायचा. आणि तशी दादही अनेकदा मिळायची. 'तुमचं वाचूनच आम्ही ठरवतो सिनेमाला जायचं की नाही...' हे वाक्य मी किती तरी लोकांकडून ऐकलंय. ते ऐकून खूप छान पण वाटायचं आणि जबाबदारीची जाणीव व्हायची.
मराठी सिनेमांवर फार टीका करायची नाही, असा एक अलिखित दंडक त्या वेळी मराठी वृत्तपत्रांत होता. मराठी वृत्तपत्रांचे संपादकच या ना त्या प्रकारे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते; पण आम्ही (म्हणजे मी आणि अभिजित पेंढारकर) पुढच्या काळात हा दंडक साफ मोडून काढला आणि मराठी चित्रपट वाईट असतील, तर त्यांना वाईट म्हणायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीसा गहजब उडाला. आम्हाला थोडाफार त्रास झाला, पण अंतिमतः यात मराठी चित्रपटांचंच भलं झालं. आज मराठी चित्रपट जागतिक पातळीवर आणि त्या दर्जावर पोचला आहे. यात खारीएवढा तरी वाटा नक्कीच आमचा आहे, असं मला इथं नोंदवावंसं वाटतं. कारण ही टीका वैयक्तिक आघात करणारी नव्हती. कुणाविरुद्ध आम्ही मोहीम उघडली नव्हती. उलट मराठी चित्रपटांतील वैगुण्यं सांगावीत आणि त्यातून त्यांनी सुधारावं हीच एकमेव इच्छा होती. जे सिनेमे चांगले होते, त्यांना चांगलंच म्हटलं. श्वास हा सिनेमा पुढं एवढा मोठा 'माइलस्टोन' ठरेल, हे माहिती नव्हतं. पण तेव्हा त्या सिनेमाच्या परीक्षणाचं शीर्षकही 'मराठी चित्रसृष्टीला नवी दृष्टी देणारा' असं पुरेसं सूचक होतं. त्या सिनेमावर पुरवणीत लेख लिहिला, त्याचंही शीर्षक 'श्वासपर्व' असं होतं. ते पर्व असल्याचं पुढे खरोखर सिद्ध झालं.
चित्रपटांविषयी वृत्तपत्रांत लिहिणं ही तारेवरची कसरत असते. अनेकदा डेडलाइनचा ताण असतो. 'सकाळ'मध्ये रविवारी परीक्षणं प्रसिद्ध व्हायची. 'मटा'मध्ये तर शनिवारी आणि आता तर अनेकदा शुक्रवारीच परीक्षणं प्रसिद्ध होतात. शनिवारी परीक्षणं छापायची असल्यास शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित झाल्याबरोबर सकाळचा पहिला 'शो' पाहून मग घरी येऊन ते परीक्षण लिहायचं आणि मग ऑफिसला जायचं अशी धांदल उडायची. त्यामुळं बहुसंख्य सिनेमे खरोखरच 'फर्स्ट डे फर्स्ट शो'च पाहिलेले आहेत. मराठी सिनेमा क्वचित आधीच पाहायला मिळायचा. अनेकदा तर प्रेस शो व्हायचे, पण सिनेमाच रिलीज व्हायचा नाही. हिंदी सिनेमांचे प्रीमिअर शो बहुतांश मुंबईतच होतात. त्यामुळं पुण्यात फक्त मराठी सिनेमांच्या प्रीमिअरला जाता यायचं. अनेकदा तर हे प्रीमिअर शो संध्याकाळी असायचे आणि मला नेमकं ऑफिस असायचं. मग सकाळचाच शो पाहावा लागे. अनेकदा उत्साहानं शो पाहायला जावं, तर तो शोच कॅन्सल झालेला असे. मग सिनेमाच्या पीआरला गाठा, धावपळ करा, दुसरीकडं जा अशा अनंत अडचणींतून तो सिनेमा पाहिला जायचा. अनेकदा लोकांना वाटतं आणि ते बोलूनही दाखवतात, की काय बुवा, तुमची मज्जा आहे! ऑफिसच्या खर्चानं सिनेमा पाहायला मिळतोय आणि एवढ्या स्टार्सना जवळून पाहायला मिळतंय. यात थोडी गंमत आहे, हे मान्य करूनही मी असंच म्हणीन, की त्या आनंदापेक्षा यात श्रम अधिक आहेत.
सिनेमानं मला भरपूर आनंद दिला. अजूनही मी मुक्तपणे ब्लॉगवर मला हवं तेव्हा, हव्या त्या सिनेमाचं परीक्षण लिहू शकतो. अनेक चाहतेही मला पुन्हा वृत्तपत्रात परीक्षण लिहिणं सुरू करण्याची मागणी करत असतात. त्यांच्यासाठी आता हा ब्लॉगचा पर्याय उपलब्ध आहे. या निवडक सिनेमा-परीक्षणांमधून वाचकांना केवळ त्या सिनेमांविषयीच नव्हे, तर त्या-त्या काळातल्या जनजीवनाविषयी, सांस्कृतिक धारणांविषयी आणि लेखकाच्या जीवनविषयक दृष्टीविषयी अधिक काही समजू शकेल, अशी आशा आहे. त्या अर्थानं हा एकविसाव्या शतकातल्या मराठी समाजाचा एक सांस्कृतिक दस्तावेज आहे, असं म्हणायला हरकत नाही.
फर्स्ट डे फस्टे शो - श्रीपाद ब्रह्मे, चपराक प्रकाशन, पुणे, पाने - १४५, मूल्य - १०० रुपये.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment