टॅग युवर फ्रेंड : नो, डोंट टॅग धिस युवर फ्रेंड
पडघम - तंत्रनामा
मिलिंद कांबळे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 21 February 2018
  • पडघम तंत्रनामा टॅग युवर फ्रेंड Tag Your Friends फेसबुक Facebook मेमेज Memej

सध्या फेसबुकवर मेमेजचा ट्रेंड चालू आहे. फेसबुकवर विविध पेजेस मित्रमैत्रीणीना टॅग करण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या जातात. त्यातूनच काळ्या रंगाच्या मुली, उंचीनं कमी असणारी मुलं, गरीब कष्टकरी स्त्रियांचे फोटो टाकून थट्टा उडवली जाते. त्याबद्दलचा हा लेख.   

.............................................................................................................................................

सध्याचा जमाना ‘डिजिटल’ आहे. त्यात सोशल मीडिया आघाडीवर आहे. एकट्या फेसबुकवर  २.०७ बिलियन खातेधारक आहेत. २४१ मिलियन भारतीय फेसबुक वापरतात. (त्यातल्या फेक अकाउंटची संख्याही खूप मोठी आहे. पूजा, नेहा इत्यादी नावाच्या फेक अकाउंटसची संख्या मोजली तर व्हॅटिकन सिटीसारखे दोन-तीन देश होतील!) फेसबुक हा कन्ज्युमर डाटा (ग्राहक-माहिती) गोळ्या करण्यासाठी सगळ्यात सोपा आणि फ्री असणारा स्त्रोत आहे. फेसबुकवर विविध पेजेसद्वारे लोकांची माहिती संकलित केली जाते. त्यांच्या सवयी, आवडीनिवडी यांचा माग ठेवला जातो. आणि हा डाटा विकला जातो. मार्केटिंग करण्यासाठीसुद्धा फेसबुकचा खूप चांगला वापर होतो. यूजर्सला फेसबुकवर कायम अॅक्टिव्ह राहण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. उदा.- ‘# सिक्स वर्डस स्टोरी’.

सध्या फेसबुकवर ‘मेमेज’चा ट्रेंड आहे. यात मुख्यत: एखादा फोटो असतो. आणि त्यात एखादा संदेश दिलेला असतो. जास्तकरून हे संदेश टीका आणि टीकेतून विनोदनिर्मिती अशा पद्धतीचे असतात. त्याची पुढची पायरी म्हणजे ‘टॅग युवर फ्रेंड’. फेसबुकवरच्या विविध पेजेसनी हा नवा ट्रेंड सुरू केला आहे. गेले काही दिवस फेसबुक उघडलं की, या पोस्टवर तुमच्या मित्रमैत्रिणीनं तुम्हाला टॅग केलं आहे, अशी नोटिफिकेशन येतात (बहुतांश लोकांना याचा अनुभव आला असेल). या पोस्ट/मेमेजमध्ये बहुधा ‘टॅग करा त्या मित्र अथवा मैत्रिणीला जो फक्त पोरींना पार्टी देतो’, ‘घरी खूप अभ्यास करतो, वर्गात बाकीच्यांना अभ्यास करू देत नाही’ वगैरे वगैरे लिहिलेलं. असो.

पण सध्या या ‘टॅग युवर फ्रेंड’ या ट्रेंडनं एक वेगळं वळण घेतलं आहे. ते म्हणजे कृष्णवर्णीय भारतीयांच्या भाषेत बोलायचं झाल्यास काळ्या, जाड, शरीराचा एखादा अवयव मोठा वा लहान असणाऱ्या स्त्रियांचे फोटो टाकून, त्यात कुणा राहुल, कुणा रोहितला टॅग करायला सांगितलं जातं.  आणि प्रकाराला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे.

फेसबुकवर युवापिढी संख्येनं जास्त आहे. (फेसबुकवर येण्यासाठी १८ वर्षं पूर्ण असण्याची अट आहे, पण आजकाल अगदी सातवीपासूनची मुलं-मुली आहेत.) तर ही युवापिढी एकमेकांची चेष्टा करण्यासाठी बिनधास्त अशा पोस्टमध्ये आपल्या मित्रांना टॅग करतात आणि मज्जा करतात. त्यांच्याकडून हे अगदी कळत-नकळतपणे होत असतं. पण त्यातला धोका समजावून घेतला पाहिजे.

अशा पोस्ट/मेमेजमधले फोटो हे जास्तकरून आफ्रिकन स्त्रियांचे असतात. भारताबद्दल बोलायचं झाल्यास राखी सावंत, सनी लिओनी आणि गरीब मजुरी करणाऱ्या वयस्कर स्त्रियांचे फोटो असतात. यातल्या बहुतांश पोस्टमधील स्त्रिया या रंगानं काळ्या असतात.

जगाच्या इतिहासात विषमता सुरू करणारे जे काही घटक (जात, धर्म, लिंग इत्यादी) आहेत,  त्यात ‘रंगा’चा क्रमांक खूप वरचा आहे. रंगामुळे कशी विषमता आली, गोरा रंग उच्च मानून शोषण कसं केलं गेलं याचं अमेरिका हे सर्वांत मोठं उदाहरण आहे. (सध्या तिथं ‘ब्लॅक पँथर’ हा कृष्णवर्णीय नायकाचा सिनेमा खूप गाजतो आहे.) आता कुठे रंगावरून भेद मिटत चालला आहे. पण या अशा पोस्टसमुळे नकळतपणे आपल्या मनावर काळा रंग म्हणजे कुरूप, खराब असं बिंबवलं जातं. किशोरवयीन आणि तारुण्यात पदार्पण करणाऱ्या पिढीच्या मनावर हे अजून जास्त लवकर ठसलं जाऊ शकतं.

ज्याला आपण दूर ढकलण्यासाठी इतकी वर्षं समतेची लढाई लढत आहोत. ‘डार्क इज ब्युटीफुल’सारखी चळवळ सुरू आहे. अभय देओल, सुशांतसिंग राजपूत, स्वरा भास्कर, कल्की कोचीन अशा मंडळींनी गोऱ्या रंगाचं उदात्तीकरण करणाऱ्या  जाहिराती नाकारल्या आहेत. (शाहरुख खानला पण अशीच जाणीव यावी असं मनोमन वाटत राहत मला!). मानवी शरीराचा रंग हा नैसर्गिक आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार तो बदलू शकतो. सोशल मीडिया सध्या मतं बनवण्यात महत्त्वाची भूमिका वठवत आहे. त्यामुळे त्यावरून ही अशी चुकीची मतं बनवली गेली तर कसं होणार?  

दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ‘बॉडी शेमिंग’. अशा पोस्टसमध्ये काळ्या रंगाबरोबरच विनोदनिर्मितीसाठी मानवी शरीराच्या विविध अवयवांची किळसवाणी थट्टा उडवली जाते. म्हणजे मोठं नाक, बाहेर आलेले दात, मोठे डोळे, उंचीनं कमी, बाहेर आलेलं पोट, टक्कल यांवरून चेष्टा केली जाते. विशेषत: उंचीनं कमी असलेल्या मुलांची किंवा मुलींची जास्तच थट्टा केली जाते.मानवी शरीराचे विविध अवयव हे एखाद्या ऑर्डर केलेल्या वस्तूप्रमाणे नसतात की, ते हव्या त्या प्रमाणात असतील. (‘चला, हवा येऊ द्या’मध्ये तर उंचीनं कमी असलेल्या कलाकारांचा वापर करून विनोद निर्मितीचा जो केविलवाणा प्रयोग होतो, तो असह्य होतो!).

या अशा पोस्ट ज्यांना टॅग केल्या जातात, त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. बाकीच्या लोकांपेक्षा आपण कुठेतरी कमी आहोत अशी बोच मनात टोचत राहते. या प्रकारामुळे लोकांच्या मनातून ‘बॉडी शेमिंग’ जाण्याऐवजी उलट ते वाढतच आहे. मुलींना तर हा त्रास बऱ्याचदा सहन करावा लागतो. लग्नाच्या वेळेस मुलगी नकटी आहे, बटाट्या डोळ्याची आहे अशी अपमानकारक विशेषणं लावून बॉडी शेमिंग वाढवलं जातं. 

तिसरा मुद्दा आहे ‘भारतीय लोकांच्या दुटप्पीपणाचा’. गेल्या काही वर्षांपासून आपण बातम्या वाचतो की, अमुक अमुक भारतीयावर अमेरिका वा ऑस्ट्रेलिया इत्यादी देशामध्ये हल्ला झाला वगैरे वगैरे. (शिल्पा शेट्टीला ‘बिग बॉस’मध्ये वर्णद्वेषाला सामोरं जावं लागलं, हे मला अजूनही स्क्रिपेटेड वाटतं!) आपण भारतीय लोक, आपला भारतीय मीडिया अशा वेळेस समतेचा जागर करत असतो. पण प्रत्यक्षात मात्र आपण अशा गोष्टींना नकळतपणे पाठबळ देतो. भारतात तर कायम आफ्रिकन लोकांवर हल्ले होत असतात. कोणत्या तोंडानं आपण भारत समतावादी आहे असं म्हणून शकतो?

माझ्याकडून अशा पोस्ट बऱ्याचदा लाईक झाल्या होत्या. माझा एक फेसबुक फ्रेंड आहे. तो आहे स्पॅनिश, पण राहतो आफ्रिकेत. त्यानं ‘नोमा’ (http://www.imdb.com/title/tt5847576/) नावाची एक फिल्म बनवली आहे. त्यानं मला एकदा विचारलं की, तुम्ही भारतीय एवढे वंशवादी कसे काय? आपण भारतीय म्हणून आणि माणूस आपली ही कायम जबाबदारी आहे की, आपण समता मानली पाहिजे. 

भारत आणि आफ्रिकन देशांचे परराष्ट्र संबंध या अशा पोस्टसमुळे कदाचित प्रभावित होणारही नाहीत. पण एवढं मात्र नक्की आहे की, या पोस्ट्स इंग्लिशमध्येही येत आहेत. हळूहळू आफ्रिकन लोकांना या गोष्टी कळतील की, भारतीय लोक आपली थट्टा करतात, नकळतपणे अपमान करतात.

या पोस्ट्समधले सगळेच फोटो त्या संबंधित व्यक्तीला न विचारता अपलोड केलेले असतात. एखाद्या व्यक्तीनं जर कायदेशीर कारवाई केली तर शिक्षा होऊ शकते. काही दिवसांपूर्वी मार्क झुकरबर्गनं फेसबुक चांगल्या गोष्टीसाठी वापरलं जात नाही म्हणून चिंता व्यक्त केली होती.  

अशा पोस्टसना आळा घालण्यासाठी मी मागे एकदा संदीप भूषण, क्रितीग रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी माझे मॅसेज वाचलेसुद्धा, पण त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. फेसबुक तरी किती लक्ष घालणार आणि किती पोस्टसना काढून टाकणार? 

या अशा पोस्टसना आळा घालण्यासाठी जनजागृती हाच पर्याय आहे. वर्णभेदी पोस्ट टाकली म्हणून पेजच्या अॅडमिनवर गुन्हासुद्धा होऊ शकतो, पण त्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. म्हणून एखाद्या मित्रानं आपल्या अशा पोस्ट्समध्ये टॅग केलं की, त्याला समजावयाचं. त्याच्या पोस्ट्सला लाईक करणं सोडून द्यायचं. त्यांला थोडा राग येईल. पण हाच एक सोपा मार्ग आहे. ज्यांना ज्या पद्धतीनं या प्रकाराला आळा  घालता येईल, त्यांनी तो घातला पाहिजे. 

सध्या जगभरात वर्णभेद, जातिभेद, धर्मभेद, लिंगभेद करणाऱ्या शक्ती जोमात आहेत. अशा वेळेस आपली ही जबाबदारी आहे की, या गोष्टींना आपल्याकडून चुकूनसुद्धा पाठबळ मिळता कामा नये. या पोस्ट्समुळे युवापिढीच्या मनावर चुकीच्या गोष्टी बिंबवल्या जातात. सौंदर्य म्हणजे फक्त गोरा रंग, सरळ नाक, डोळे इत्यादी नाही, सौंदर्याची व्याख्या ही फक्त शरीरावर अवलंबून नसते, याची त्यांनी जाणीव व्हायला हवी.

यावर एक शेर आठवतो. कुठे वाचला हे मात्र आठवत नाही, पण शेर खूप अर्थपूर्ण आहे. तो असा -

काफी ठोकरे खायी है इन्सानने बस एक ‘इन्सान’ होने के लिये 

अंजाने में कुछ ऐसा ना हो कि खुद से ही  ‘नफरत’ पैदा ना हो जमाने भर के लिये. 

म्हणून पुढच्या वेळेस अशा पोस्ट्समध्ये कुणी टॅग केलं की, त्याची थट्टा करू नका. त्याला रिपोर्ट करून भेद पसरवणाऱ्या प्रवाहात सामील होऊ नका.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4383

.............................................................................................................................................

लेखक मिलिंद कांबळे स्मार्ट सिटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रोजेक्ट कॉऑर्डिनेटर आहेत.

milind.k@dcfadvisory.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......