अजूनकाही
ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे यांचं ‘ग़ज़लियत’ हे नवं पुस्तक नुकतंच डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकातील हे काही मासले...
.............................................................................................................................................
बस, तेरी बदौलत है…
शायरी क्या है, दिली जज़बात का इज़हार है
दिल अगर बेकार हैं तो शायरी बेकार है…
रसिक वाचकांशी लेखन रूपानं संवाद साधण्याचा आनंद योग आला आहे… तोसुद्धा माझ्या आवडीच्या ग़ज़ल-शेरांच्या माध्यमातून… जे एक सशक्त माध्यम आहे भावनांच्या अभिव्यक्तीचं..
‘समजावून सांगणं’ या प्रकाराचं वावडंच असतं शायरीला… ‘ये हृदयीचे ते हृदयी’ असा हा प्रवास असतो…
प्रसिद्ध शायर मजरुह सुलतानपुरी असं सांगतात की, “ग़ज़लचा शेर हा आपला अर्थ कधीच सांगत नाही, तर तो केवळ अर्थाची दिशा दाखवितो… आणि अर्थाच्या या दिशा तरी किती?... ऐकणाऱ्यांचं जगणं, जगण्याचे जसे अनुभव तसा अर्थ. काव्य हे बहुआयामी असतं या म्हणण्याची जणू प्रचितीच.” १९७२ सालापासून हा छंद जडला… आणि तेव्हापासून आजतागायत ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’प्रमाणे ग़ज़लनं साथ दिली. नुसती साथच नाही तर आयुष्यात मला सगळं काही दिलं… भरभरून आनंद दिला… रसिक श्रोत्यांची दाद व प्रेम दिलं… उमेदपणानं जगायला शिकविलं… सुख आणि दु:ख, तसंच अपयश आणि यशसुद्धा पचवायला शिकविलं…
आजवरच्या या प्रवासात मला जे आवडलं, मनाला भिडलं ते रसिक वाचकांसोबत शेअर करण्याचा माझा नेक इरादा आहे. माझ्या ‘आवडण्या-भावण्या’मध्ये ग़ज़ल असेल, एखादा शेर अथवा रुबाई असेल… एखादा किस्सा, आलेला अनुभव किंवा क्वचित प्रसंगी छंदोरचनेचा विचार किंवा ग़ज़लच्या गायकी अंगाचं सारसुद्धा असेल. मैफिलीप्रमाणे इथंही तुम्हा जिन्दादिल रसिकांचा प्रतिसाद मिळेल ही आशा करतो. शेवटी तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला एक शेर मदतीला धावून आला आहे. मुलाहिजा हो –
तेरा प्यार भी दौलत है, तेरा दर्द भी दौलत है
जो कुछ मेरी दौलत है, बस तेरी बदौलत है…
………………………………………
ग़ज़ल क्या है?
ग़ज़ल क्या है, ग़ज़ल का फ़न क्या है
चन्द लफ्ज़ों में कोई आग छुपा दी जाये…
‘शब्दांत पेरलेली आग…’ असं शायरनं इथं म्हटलं असलं तरी ग़ज़ल क्या है, हा सवाल अनेकांनी उठवलेला आहे. कधी प्रेमानं, कधी कुतूहलानं, तर कधी उपहासानं…
खुद्द अमीर खुसरोसारख्या प्रयोगशील कलंदराला ही विधा सुरुवातीला पसंत नव्हती… तर ग़ालिब साहेबांनाही आपल्या अभिव्यक्तीसाठी हा आकृतीबंध तोकडा वाटायचा…
‘सुखन अज़् माशुक गुफ़्तन…’ आपल्या प्रियतमेशी केलेल्या गुजगोष्टी, एवढ्या सिमित व्याख्येनं सुरुवात झालेल्या या काव्यप्रकारानं काय झेप घेतली! छंदात बंदिस्त असलेल्या ग़ज़लचा आवाका तरी केवढा… सगळ्या मानवी भावभावनांना कवेत घेण्यासाठी, त्यांना हुंकार देण्यासाठी ती समर्थ ठरली.. या हृदयातून निघाली अन त्या काळजापर्यंत पोहोचली, असं न होता, ‘या काळजातून उसळली आणि त्या काळजावर कोसळली’, असा प्रकार झाला… आणि उचंबळून दाद येते ती यामुळेच… असो! ग़ज़ल कुण्या एका व्याख्येत मावणं शक्यच नव्हतं. मग अनगिनत शायरांनी आपापल्या परीनं सांगितलं… ग़ज़ल क्या है…
नसीम रिफ़अत ग्वालियरी म्हणतात –
दिल के जज़बात है, ग़ज़ल क्या है
चन्द लमहात है, ग़ज़ल क्या है…
फिक्रो-अल्फ़ाज की अदालत में
कुछ बयानात है, ग़ज़ल क्या है…
मनातील उत्कट भावभावनांचा निचरा आणि खऱ्या अर्थानं जगलेल्या क्षणांचा गोषवारा किंवा शब्द आणि आशयाच्या न्यायालयात शायराचा कबुलीजबाब म्हणजेच तर ग़ज़ल!...और क्या!
………………………………………
साक्षात मृत्यूची भेट…
हिरवंगार रान…
हरीण एकटंच बिचारं निवांत चरत आहे…
चारा खाण्यात एवढं मश्गूल झालं आहे की, एक घोर संकट आपली चाहूल घेत पुढे-पुढे सरकत आहे, याचं भान त्याला खूप उशिरा आलं…
एव्हाना त्याला कळून चुकलं की, एक पारधी आपल्या कमठ्यावर तीर चढवून त्याचा वेध घेण्यास टपला आहे.
जीव वाचवायला हवा. आपली सगळी चपळाई एकवटून हरीण पळत सुटलं…
आपला वेग आणि चपळाईच्या विश्वासावर शिकाऱ्याला हुलकावण्या देत पळता पळता एका दाट झुडपात त्याची शिंगं अडकतात… सोडवण्याच्या प्रयत्नात वेलींमध्ये अधिक गुंतत जातात. काही केल्या निघत नाहीत… पारधी आता हरिणाच्या नजरेच्या, तर हरीण त्याच्या बाणाच्या टप्प्यात आलेलं आहे… पुन्हा निकराचा प्रयत्न… केविलवाणी नजर पारध्याकडे… आता सुटका नाही… कुठल्याही क्षणी तीर सुटेल आणि आपल्या काळजाचा ठाव घेईल. अशा असहाय अवस्थेत हरिणानं फोडलेली आर्त किंकाळी म्हणजे ग़ज़ल!
ख़ामुशी से हज़ार ग़म सहना
कितना दुश्वार है ग़ज़ल कहना…
खरं तर ग़ज़लच्या सर्वांत अधिक जवळ जाणारं हे रूपक… हरिणाचं! आणि गंमत अशी आहे की, ‘गझील’ हा अरबी शब्द… त्यापासून झाला ‘गझाल’… म्हणजे हरीण… या शब्दाचा वाच्यार्थ ‘प्रणयगीत’ किंवा ‘प्रेयसीशी वार्तालाप’ आणि फार्सी शब्दकोशातील अर्थ आहे – हरिणाचा आक्रोश!
क्या बात है!
………………………………………
नया शहर ढुंढिये…
आचार्य रजनीशांच्या पुस्तकात फार पूर्वी वाचलेलं एक अरबी वचन अंधुकसं आठवतं…
‘हे मरणशील प्राणी, तू तभी खूश रह सकेगा… जब की अपना ठिकाना जल्दी-जल्दी बदल लिया करें… क्योंकी जीवन का उल्हास विभिन्नता में है… और भविष्य, ना तो तेरा है और ना मेरा!’
आपल्या खालील शेराचं म्हणणं काहीसं असंच आहे… इतकी माणसं भेटली, इतकी ओळखली-जोखली की, मनासारख्या माणसाचा शोध घेण्यासाठी नकाशा घेऊन नवीन शहर शोधण्याची वेळ आली…
नक्शा उठा के कोई नया शहर ढुंढिये
इस शहर में तो सब से मुलाक़ात हो गई…
यातल्या ‘मुलाक़ात’ शब्दातच सगळी गोची आहे. केवळ भेटणं, बोलणं, सोबत वावरणं म्हणजे ‘मुलाक़ात’ नव्हे… सूर जुळायला हवेत… संवाद व्हायला हवा. अन्यथा काही नवीनता नसलेलं, रहाटगाडग्यासारखं रटाळ आयुष्य वाट्याला येतं आणि मग जगण्याचा न सुटणारा गुंता ठरलेलाच!
आयुष्य तेच आहे, अन हाच पेच आहे…!
संवेदनशील माणसाला कठीण जाईल, पण नसीमसाहेब म्हणतात त्याप्रमाणे प्रयत्न करून बघूया…
आजकल इतनी होशियारी रख
सिर्फ दुनिया से दुनियादारी रख
दिल किसी से अगर न मिल पाये
हात मिलने की रस्म जारी रख…
कोशिश करने में क्या हर्ज है!
.............................................................................................................................................
ग़ज़लियत - भीमराव पांचाळे, डिंपल पब्लिकेशन, मुंबई, मूल्य - २८० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4297
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment