अजूनकाही
‘संग्रहालय-महर्षी डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी’ हे पुण्यातील केळकर संग्रहालयाच्या संस्थापकांचं चरित्र मृदुला प्रभुराम जोशी यांनी लिहिलं आहे. साहित्य-संस्कृती मंडळाने हे चरित्र प्रकाशित केलं असून त्याचं प्रकाशन येत्या भाषा दिनी होईल. त्यानिमित्तानं जोशी यांचं हे मनोगत...
.............................................................................................................................................
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या मालिकेत महनीय व्यक्तींची चरित्रं प्रकाशित केली जातात. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात अनेक थोर व्यक्तिमत्त्वं होऊन गेली. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करण्यास त्यांनी बहुमोल हातभार लावला आहे. महाराष्ट्रात आधुनिक विचार रुजवण्यात त्यांचं अमूल्य योगदान आहे. महाराष्ट्राला जागं करणारी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक नेतृत्व देणारी ही व्यक्तिमत्त्वं होती. त्यांची योग्य अशी ओळख करून देणारी आणि पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारी चरित्रं या मालिकेत प्रकाशित केली जातात.
या दिग्गज व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे पुण्याच्या राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयाचे निर्माते डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी. फार लहान वयात त्यांना इतिहासाचा छंद जडला आणि त्यातून दोन महान गोष्टी जन्माला आल्या.
एक म्हणजे त्यांच्या उपजत प्रतिभेतून निर्माण झालेल्या ऐतिहासिक कविता आणि दुसरा प्राचीन वस्तूंचा संग्रह. ‘अज्ञातवासी’ या टोपणनावानं त्यांनी शेकडो कविता लिहिल्या आणि त्यांतून महाराष्ट्राच्या भव्यदिव्य इतिहासाचं भान जागृत केलं. त्यांच्या कविता सोप्या, आकर्षक आणि वृत्तबद्ध असल्यामुळे त्या ज्याच्या त्याच्या तोंडी खेळत असत आणि त्यांतूनच शिवबाचे पराक्रम, शिवशाही आणि पेशवाईतील महाराष्ट्राचं तत्कालीन वैभव व वास्तव ऐकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर उभं राहत असे. अत्यंत परिणामकारक कविता लिहिणारे कवी म्हणून ‘अज्ञातवासी’ मराठी साहित्याच्या इतिहासात अजरामर झाले आहेत.
त्यांच्या कवितांइतकाच, किंबहुना काहीसा जास्तच प्रभाव त्यांनी आयुष्यभर कष्टपूर्वक जमवलेल्या पुराणवस्तूंच्या संग्रहानं महाराष्ट्रावर टाकलेला आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना जुन्या वस्तू, चित्रं, शिल्पं, मूर्ती, दागदागिने, वाद्यं गोळा करण्याचा जो ध्यास लागला, तो वयाच्या ९५ व्या वर्षी निधन होईपर्यंत त्यांनी प्राणपणानं जपला. त्यासाठी अपार कष्ट केले, खर्च केला आणि अक्षरशः तनमनधन अर्पून स्वतःच्या घरात आजचं तीन मजली वस्तुसंग्रहालय उभं केलं.
आज या राजा दिनकर केळकर संग्रहालयाची ख्याती जगभर पसरली आहे, ती हे संग्रहालय संपूर्ण विश्वातील मोजक्या ‘एकहाती संग्रहांपैकी एक’ (वन-मॅन-कलेक्शन) म्हणून आणि देशविदेशांतील हजारो पर्यटकांना महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा इथं बघायला मिळतो म्हणून. या संग्रहालयातील दालनांमागून दालनं डॉ. दिनकर केळकर या एकांड्या शिलेदारानं एक अपूर्व ध्यास घेऊन जमवलेल्या वस्तूंनी ओसंडून जात आहेत आणि त्यातून प्रेक्षकाच्या मनात इतिहासाची ओढ जागृत करत आहेत. डॉ. दिनकर केळकर यांनी अफाट परिश्रम करून जमवलेला हा एकोणीस हजार वस्तूंचा संग्रह महाराष्ट्राच्या जनतेला अर्पण केला, हे या संग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
डॉ. दिनकर केळकर यांचं मी इंग्रजीत लिहिलेलं चरित्र ‘Pursuit and Rhetoric of Dinkar Kelkar : Preserving Heritage of India’ या नावानं २०१२ साली प्रसिद्ध झालं आहे. हे चरित्र संग्रहालयाचे तत्कालीन मानद संचालक डॉ. हरि गोविंद रानडे यांनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं आणि ते लिहिण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आणि संशोधनसाधनं त्यांनी मला पुरवली होती. परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे चिरंजीव, संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी हा चरित्रग्रंथ पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वार्थानं भरीव योगदान दिलं. या पुस्तकाची निर्मिती उत्कृष्ट व्हावी यासाठी त्यांनी कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. उत्तम आर्टपेपरवर चाररंगी छपाई, संग्रहालयातील दुर्मीळ वस्तूंची, दालनांची तसंच संग्रहालयाला भेट देणाऱ्या मान्यवर व्यक्तींची अनेक छायाचित्रं देऊन हे पुस्तक आकर्षक रीतीने सादर केलं होतं.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
योगायोगानं त्याच सुमारास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे त्या वेळचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या पाहण्यात हे पुस्तक आलं आणि त्यांनी ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या मालिकेत डॉ. दिनकर गंगाधर केळकर यांचं चरित्र मी लिहावं असं सुचवलं. मराठीत चरित्र लिहिण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता होती. त्याप्रमाणे मी कामाला सुरुवातही केली, परंतु दरम्यानच्या काळात मला दुर्धर व्याधीचा सामना करावा लागला. त्यातून बरं होऊन पुन्हा लेखनाला सुरुवात करण्याची प्रेरणा मला साहित्य संस्कृती मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाबा भांड आणि सचिव मीनाक्षी पाटील यांनी दिली आणि अनेक हिंतचिंतकांच्या मदतीनं मी ही जबाबदारी पार पाडली. कै. केळकर यांचा आणि माझा पूर्वजन्मीचा काही ऋणानुबंध होता की काय असं आता मला वाटतं. नाहीतर माझ्या हातून त्यांचं चरित्र इंग्लिश आणि मराठी या दोन भाषांतून लिहिलं जावं, या योगाची उकल कशी होणार?
कवी अज्ञातवासी हे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील ख्यातनाम कवी होते आणि त्यांच्या स्फूर्तिदायक कविता आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. परंतु त्यांचे जे काही मोजकेच कवितासंग्रह प्रसिद्ध झाले होते, जे आज दुर्मीळ झाले आहेत. त्यामुळे ही माहिती मिळवण्यात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची मोलाची मदत झाली.
या पुस्तकाचे लेखन, आशय आणि निर्मितीमूल्य यांचं संवर्धन करण्यासाठी डॉ. केळकर यांच्या सुकन्या रेखाताई रानडे आणि त्यांचे सुपुत्र सुधन्वा रानडे, सुदर्शन आणि सुरेंद्र रानडे यांनी सर्व मदत तत्परतेनं पुरवली. या सर्वांची मी मनापासून आभारी आहे.
या चरित्रग्रंथाचं औपचारिक प्रकाशन येत्या ‘मराठी भाषा गौरव दिनी’ म्हणजे २७ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे. परंतु हे पुस्तक आतापासूनच विक्रीसाठी उपलब्ध आहे.
संग्रहालय-महर्षी डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी - मृदुला प्रभुराम जोशी
साहित्य-संस्कृती मंडळ, मुंबई, मूल्य - ११८ रुपये
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4053
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment