डोकं बाजूला ठेवून पहावा असा टिपिकल बॉलिवुड मसालापट 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘जुडवा २’चं पोस्टर
  • Sat , 30 September 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie जुडवा २ Judwaa 2 वरुण धवन Varun Dhawan डेव्हिड धवन David Dhawan

‘जुडवा २’च्या सुरुवातीच्या एका दृश्यात झाकीर हुसेन सचिन खेडेकरला उद्देशून ‘काय तो तुमचा आउटडेटेड मेलोड्रामा सुरू करतोय?’ अशा अर्थाचं वाक्य म्हणतो. पण पुढे मात्र हा चित्रपट असाच डेव्हिड धवनच्याच यापूर्वीच्या नव्वदच्या दशकातील चित्रपटांमध्ये आणि १९९७ मधील ‘जुडवा’मध्ये वापरला गेलेला मसाला आपल्यासमोर मांडतो. पण ही काही नवीन गोष्ट नाही. कारण डेव्हिड धवननेच चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुलाखतींमध्ये म्हटल्याप्रमाणे हा चित्रपट काही सीक्वेल नाही तर ओरिजिनल ‘जुडवा’चाच रिबूट आहे. आणि यामध्ये बदललेली लोकेशन्स, कालानुरूप बदललेले संदर्भ आणि काही नवीन विनोदी दृश्यं वगळता इतर बहुतेक कथानक पूर्वीचंच आहे. 

कथा अगदी साधी सोपी आहे. राजा आणि प्रेम (दोन्ही वरुण धवन) हे दोन जुळे भाऊ जन्मतःच चार्ल्स या स्मगलरमुळे एकमेकांपासून दूर होतात. प्रेम हा त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये मोठा होतो, तर राजा मुंबईमध्ये. पण काही (ओढूनताणून समोर आणलेल्या) कारणानं राजाला मुंबईतून लंडनला पळून यावं लागतं. मग इथं येतानाच फ्राइटमध्ये त्याची भेट अलिष्काशी (जॅकलिन फर्नांडिस) होते. आणि अर्थातच तो तिच्या प्रेमात पडतो. तर इकडे प्रेमदेखील समाराच्या (तापसी पन्नू) प्रेमात पडलेला आहे. मग या दोघांमुळे जो काही घोळ तयार होतो तो आणि मग त्यानंतर त्यांच्या एकत्र आल्यानं घडलेल्या घटना म्हणजे ‘जुडवा २’. 

मुळात या चित्रपटाचा भार पूर्णतः वरुण धवनच्याच खांद्यावर आहे. कारण यात आपल्याकडील नव्वदच्या दशकातील बहुतांशी चित्रपटांमध्ये जसा अभिनेत्रींचा फक्त शोभेच्या बाहुल्या म्हणून वापर होत असायचा, तसंच काहीसं तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिसबाबत होतं.

आणि वरुण हा भार उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. त्यात त्याला थोडंफार यश मिळालंही आहे. पण मुळातच जराशा 'ओल्ड स्कूल' कथानकात फक्त काही तत्कालीन घटनांचे आणि अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे संदर्भ देऊन शाहरूख, संजीव कुमारची मिमिक्री करून चित्रपटातील उणीवा दूर होत नाहीत. 

मूळ चित्रपटामध्ये मुंबईत घडणारं कथानक यात लंडनमध्ये घडवल्यानं फारसा फरक पडत नसला तरी इंग्रजी पात्रांकडून भारतीय पात्रांच्या नावांच्या उच्चारासंबंधित काही विनोद उकळण्यात लेखकाला यश आलं आहे. 

कथानकामध्ये येणाऱ्या (किंवा जबरदस्तीने आणलेल्या) पात्रांना आणि पोलिसांना उल्लू बनवून आपलं काम काढून घेणं, मेलोड्रामॅटिक बोलणं, अभिनय करत असल्याचा आव आणणं वगैरे गोष्टी सध्या पटत नाहीत. शिवाय, यावर कहर म्हणजे जॅकलिनदेखील या चित्रपटात आहे. मुळातच अभिनयाच्या नावानं बोंब असलेली जॅकलिन इथं नुसती एक उत्तेजक गोष्ट म्हणून वावरते. पण वाईट याचं वाटतं की, तापसीसारख्या गुणी अभिनेत्रीचाही तसाच वापर करण्यात येतो. 

आणि याहून महत्त्वाची बाब म्हणजे कितीही प्रयत्न केले तरी आधीच्या चित्रपटाशी तुलना केल्याशिवाय राहवत नाही. कारण सलमान आणि शक्ती कपूरच्या जोडीची सर वरुण धवन आणि राजपाल यादवच्या जोडीला येत नाही. शिवाय मुकेश ऋषीच्या 'टायगर' या बासरी वाजवणाऱ्या, नाही म्हटलं तरी खलनायक म्हणून प्रभावी वाटणाऱ्या पात्राची सर यातील चार्ल्स किंवा अॅलेक्स या दोन्हींनाही येत नाही. 

कुठल्याही डेव्हिड धवनच्या चित्रपटाप्रमाणे यातही दुय्यम भूमिका करणाऱ्या विनोदी कलाकारांची चांगलीच फौज उभी केली आहे. मग यात अगदी जॉनी लिवर, उपासना सिंग ते अली असगर पर्यंत सर्व लोक दिसतात. शिवाय, पवन मल्होत्रादेखील एका विनोदी भूमिकेत दिसतो. 

या सगळ्या पात्रांमुळे आणि अभिनेत्यांमुळे विनोदाची भट्टी उत्तम जमून आली आहे. असं असलं तरी यानं चित्रपट केवळ 'बिट्स अॅन्ड पीसेस'मध्ये चांगला होतो. बाकी या पात्रांचा संपूर्ण चित्रपटाच्या कथानकात फारसा हस्तक्षेप आणि उपयोग तसा नाहीच. 

झाकीर हुसेनचा चार्ल्स त्यानं कितीही चांगला साकारला असला तरी खलनायकाला जितकं स्ट्राँग बॅकग्राऊंड किंवा बॅकस्टोरी असायला हवी होती, ती नाही. त्यामुळे झाकीर हुसेनचा खलनायक तितकासा प्रभावी वाटत नाही. तेच अॅलेक्सबाबत. 

कथानकात बरेच दोष आहेत. पण सर्वांत ठळकपणे समोर येणारा दोष म्हणजे चित्रपटाच्या शेवटी खलनायकच गायब होतो. पुढे त्याचा काही उल्लेख किंवा पोलिसांनी पकडून नेण्याचं दृश्य वगैरे दिसत नाही.

शिवाय, सुरुवातीच्या एका दृश्यात मनोज जोशी कस्टम ऑफिसरसमोर सचिन खेडेकरला धमकी देऊन निघून जातो, हे दृश्य आजच्या काळाशी सुसंगत वाटत नाही आणि ते पटतही नाही. त्यामुळे पटकथेवर फारशी मेहनत न घेता आधीच्याच पटकथेत काही नवीन दृश्यांची भर घालत चित्रपट केलाय, हे मात्र नक्की आहे. 

संगीत आणि पार्श्वसंगीताचा उल्लेख न केलेला बरा. कारण बहुतेक ठिकाणी जुडवाचंच पार्श्वसंगीत आहे. आणि गाणीही लक्षात राहतील अशी किंवा गुणगुणावीत अशी नाहीत. जुन्याच चित्रपटातील 'ऊँची है बिल्डिंग' आणि 'टन टना टन' ही गाणी तेवढी लक्षातत राहतात. पण त्यातही पुन्हा अन्नू मलिकच्या आधीच्या गाण्यांइतकी मजा नाही. 

पण डेव्हिड धवनचा चित्रपट म्हणजे हे सगळं ओघानेच आला. त्यामुळे कुठल्याही टिपिकल बॉलिवुड मसालापटाप्रमाणे याही चित्रपटाला जायचं असल्यास डोकं आणि लॉजिक बाजूला ठेवून गेलं तरच चांगलं. नाहीतर फार प्रश्न पडणार असतील तर त्याची उत्तरं मिळणार नाहीत हे गृहीत धरून चालायचं. 

बाकी वरुण धवन आता टाइपकास्ट होत चाललाय. बदलापूरमधून त्यानं अभिनयाबाबत केलेल्या प्रयोगातून तो काय ताकदीचा अभिनेता आहे याची चुणूक दिसली होती. पण असाच टिपिकल बॉलिवुडपटांचा सपाटा लावल्यास आणखी एक चांगलं पोटेन्शियल असलेल्या अभिनेता खर्च होण्याची शक्यता आहे. 

बाकी जर डेव्हिड धवन किंवा वरुणचे चाहते असल्यास एकदा पहायला हरकत नाही. आणि सलमानचे चाहते असाल तर याकडे न फिरकलेलंच बरं. 

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......