‘मदर करेज अँड हर चिल्ड्रेन’ अर्थात ‘एव्हरीबडी लव्हज् अ गुड वॉर!’
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘मदर करेज अँड हर चिल्ड्रेन’चं एक पोस्टर आणि त्यातील दृश्य
  • Sat , 23 September 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe मदर करेज अँड हर चिल्ड्रेन Mother Courage and Her Children बर्टोल्ट ब्रेश्त Bertolt Brecht

बर्टोल्ट ब्रेश्त (१८९८ ते १९५६) हा जर्मन नाटककार जेव्हा कार्यरत होता, तेव्हा त्याच्या देशात म्हणजे पूर्व जर्मनीत साम्यवादी राजवट जोरात होती. शीतयुद्ध जोरात होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात राजकीय तत्त्वज्ञानाची लढाई सुरू झाली. एका बाजूला भांडवलशाही प्रमाण मानणारी अमेरिका व मित्र राष्ट्रं, तर दुसरीकडे साम्यवाद प्रमाण मानणारा सोव्हिएत युनियन व मित्र राष्ट्रं अशी ही लढाई होती. या लढाईचं स्वरूप जगानं आधी बघितलेल्या इतर सर्व लढायांपेक्षा सर्वस्वी वेगळं होतं. यात राजकीय तत्त्वज्ञान अतिशय महत्त्वाचं होतं. म्हणूनच ही लढाई जशी रणांगणावर लढली गेली, तशीच जीवनाच्या इतर क्षेत्रांतही लढली गेली.

एकाच उदाहरणातून या लढाईचं स्वरूप लक्षात येर्इल. १२ एप्रिल १९६१ रोजी रशियन अंतराळवीर युरी गागारीननं जेव्हा प्रथमच पृथ्वी प्रदक्षिणा केली, तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी घोषणा केली की लवकर अमेरिका चंद्रावर जाईल व यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते ते आम्ही करू. यात एक माणूस अंतराळवीर झाला याचा आनंद नव्हता, तर आमचे स्पर्धक आज जरी विजयी झालेले दिसत असले तरी लवकरच आम्ही त्यांना मागे टाकू, असा गर्व होता. नंतर अमेरिकेनं हरप्रयत्न करून जुलै १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग हा अंतराळवीर चंद्रावर उतरवला. भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद या लढाईचं सर्वंकष स्वरूप लक्षात घेतलं म्हणजे ब्रेश्तसारख्या डाव्या विचारांच्या साहित्यिकाच्या कलाकृतीकडे जाणं सोपं होतं.

जर्मनीत हिटलरचा उदय झाला व वैचारिक स्वातंत्र्यावर बंधनं यायला लागली, तेव्हा ब्रेश्तनं १९३३ साली स्थलांतर केलं. स्वीडन, डेन्मार्क करत तो १९४१ साली अमेरिकेला गेला. १९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. त्या अगोदर ब्रेश्तनं ‘मदर करेज अँड हर चिल्ड्रेन’, ‘द कॉकेशीयन चॉक सर्कल’, ‘द लाईफ ऑफ गॅलिलिओ’ वगैरे महत्त्वाची नाटकं लिहिली होती. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ब्रेश्त १९४९ साली जर्मनीला परत  आला. सुरुवातीला त्याला पूर्व जर्मनीतील साम्यवादी राजवटीबद्दल ममत्व होतं. यथावकाश त्याचा भ्रमनिरास झाला. त्या काळातील त्याची एक गाजलेली कविता आहे-

After the uprising of the 17th of June

The Secretary of the Writers Union

Had leaflets distributed in the Stalinallee

Stating that the people

Had forfeited the confidence of the government

And could win it back only

By redoubled efforts.

Would it not be easier

In that case for the government

To dissolve the people

And elect another?

ब्रेश्तच्या नाटकाचे जगभर सतत प्रयोग होत असतात. यातील ‘मदर करेज अँड हर चिल्ड्रेन’ हे नाटक अलिकडेच मुंबईत बघण्याचा योग आला. हा प्रयोग आदित्य बिर्ला उद्योगसमूहातर्फे चालवण्यात येत असलेल्या ‘आद्यम’ या उपक्रमांतर्गत होता. या नाटकाचं दिग्दर्शन मुंबईतील इंग्रजी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या क्वासार ठाकोर पद्मसी या तरुण रंगकर्मीनं केलं आहे. आपल्या मायमराठीत ब्रेश्तची नाटकं विजया मेहता यांनी सत्तरच्या दशकात आणली. मेहतांनी बे्रश्तच्या ‘कॉकेशन चॉक सर्कल’चं ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नावानं प्रयोग केले होते.

ब्रेश्तनं ‘मदर करेज अँड हर चिल्ड्रेन’ हे नाटक १९३९ साली लिहिलं आहे. त्यानं नाझीवादाचा विरोध करणारी जी नऊ नाटकं लिहिली, त्यातील हे एक महत्त्वाचं नाटक आहे.

काही खुळचट व्यक्तींना नेहमी वाटत असतं की, युद्ध करून समस्या सुटतात. पहिल्या महायुद्धाची तर घोषणाच होती- War to eliminate all wars. यातील पोकळपणा दाखवणारं नाटक म्हणजे ‘मदर करेज…’. हे उघडपणे राजकीय नाटक आहे. त्याच्या पार्श्वभूमीला युरोपच्या इतिहासात गाजलेलं, तीस वर्षं चाललेलं (१६१८ ते १६४८) आणि युरोपच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारं युद्ध आहे.

हे नाटक म्हणजे तीन मुलांच्या आणि एका चलाख आईची कथा आहे. ही बाई स्वीडिश सैन्याबरोबर फिरत खानावळ चालवत असते. तिला अपेक्षा असते की, या युद्धात ती प्रचंड नफा कमवेल. नाटक संपतं, तेव्हा तिच्या व प्रेक्षकांच्या लक्षात येतं की, ज्या युद्धात तिला भरपूर नफा कमवायचा होता, त्याच युद्धानं तिची तिन्ही मुलं संपवली.

या नाटकाला जरी तीस वर्षं चाललेल्या युद्धाची पार्श्वभूमी असली तरी नाटकातील कथानक १४२४ ते १४३६ या बारा वर्षांत घडतं. यासाठी ब्रेश्तनं बारा प्रसंग लिहिले आहेत. ब्रेश्तच्या नाटकाबद्दलच्या ‘एपिक थिएटर’च्या थिअरीनुसार तो या नाटकातील एकाही पात्राबद्दल प्रेक्षकांच्या मनांत सहानुभूती निर्माण होऊ देत नाही.

यातील मुख्य पात्र म्हणजे आई. पण तीसुद्धा लबाड असल्याचं ब्रेश्तनं दाखवलं आहे. इथं साने गुरुजींच्या ‘श्यामच्या आई’ला स्थान नाही. उदाहरणार्थ नाटकाच्या सुरुवातीला सैन्यात भरती करणारे अधिकारी येतात आणि या बाईला तीन मुलं आहेत म्हटल्यावर त्यांचे डोळे चमकतात. ती त्यांच्याशी सौदा करून एका मुलाला सैन्यात जाऊ देते. मात्र सरतेशेवटी तिची तिन्ही मुलं युद्धात मारली जातात.

या पाश्चात्य नाटकाचं भारतीयीकरण करण्यात आलं आहे. मूळ नाटकात ‘कॅथलिक ख्रिश्चन’ विरुद्ध ‘प्रोटेस्टंट ख्रिश्चन’ असं युद्ध आहे, तर क्वासार ठाकोर पद्मसीनं सादर केलेल्या नाटकात ‘धर्मांध शक्ती’ विरुद्ध ‘पुरोगामी शक्ती’ असा बदल आजच्या काळाशी सुसंगत बदल केला आहे. आईला (अरुंधती नाग) तीन मुलं आहेत- अलीफ (अभिषेक क्रिशन), स्वामीद (जुनैद खान) व मुलगी कमरीन (भावना पानी). नाटकाचं भारतीयीकरण अधोरेखित करण्यासाठी अधूनमधून गुजराती, हिंदी व मराठीत संवाद टाकले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री अरुंधती नाग यांनी हे नाटक सुमारे ३० वर्षांपूर्वी कन्नड भाषेत केलं होतं. आता त्या पुन्हा आईच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आल्या आहेत.

युद्ध सुरू होतं तेव्हा आई व तिच्या कुटुंबासारख्या सामान्य माणसांचा कोणीही विचार करत नाही. अशी सामान्य माणसं फोलपटासारखी वारा येईल, त्या दिशेनं उडून जातात. नाटकातील आईला प्रसंगानुसार परिस्थितीशी समझोते करावे लागतात आणि जमेल तसं जगत राहावं लागतं.

एवढा मोठा मनुष्य जातीचा इतिहास असूनही आजही जगाच्या निरनिराळ्या भागात युद्धं होतच असतात. याचं कारण त्यात मूठभर लोकांचा फायदा दडलेला असतो. ब्रेश्तचं नाटक शिकवतं ते हे.

नाटकाचं दिग्दर्शन क्वासार ठाकोर पद्मसीनं केलं आहे. त्याला अरुंधती नाग यांची फार मोलाची साथ लाभली आहे. त्यांनी आईच्या भूमिकेत जीव ओतला आहे. त्यांनी आईची तडफड, तिचा आर्थिक स्वार्थ, जमेल तसं, जमेल तेव्हा, जमेल तसा सौदा करून जगायची धडपड करायची वगैरे परस्परविरोधी भावना अतिशय मनःपूर्वक व्यक्त केल्या आहेत.

या नाटकाचा प्रयोग एनसीपीएच्या जमशेट भाभा नाट्यगृहाच्या भव्य रंगमंचावर झाला. रंगमंचावर सतत आर्इची ढकलगाडी असते, ज्यात ती व्यापार करायच्या वस्तू ठेवते व ही ढकलगाडी तिची मुलं ओढत नेतात. नाटकाच्या शेवटी तिच्यावरच ही ढकलगाडी ओढण्याची वेळ येते. नाटकाचे नेपथ्य अबिर पटवर्धन यांनी केलं आहे. त्यांनी आईची ती गाडी बहुउद्देशीय केली आहे. त्यामुळे सतत रंगमंचावर असणारी ढकलगाडी या नाटकातील एक महत्त्वाचं पात्र होतं. प्रकाशयोजना अग्यार लाहिरी यांची आहे. त्यांनी नाटकातील अनेक प्रसंग प्रकाशयोजनेद्वारे उत्तम प्रकारे प्रेक्षकांसमोर उभे केले आहेत. 

पार्श्वसंगीताची जबाबदारी गंधार संगोराम यांनी सांभाळली आहे. क्वासार ठाकोर पद्मसी यानं नाटकाचं दिग्दर्शन सफाईदारपणे केलं असून मूळ नाटकाच्या दाहक आशयाला कोठेही धक्का लागू दिसेला नाही. फक्त नाटकाची गती थोडी संथ वाटते. मात्र नाटकाचा आशयच एवढा जबरदस्त  आहे की, प्रेक्षक सतत आज आपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या युद्धखोर वातावरणाचा विचार करत असतात. या नाटकाचं एक प्रकारे उपशीर्षक आहे - everybody loves a good war! हे किती अर्थपूर्ण आहे! अशी नाटकं कालातीत आशय व्यक्त करतात.

.............................................................................................................................................

लेखक मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......