तो दिवस, ती ‘ग्रेट भेट’ आणि निळूभाऊ फुले
संकीर्ण - श्रद्धांजली
राम जगताप
  • निळूभाऊ फुले यांच्या विविध भावमुद्रा
  • Thu , 13 July 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली निळूभाऊ फुले Niloobhau Phule निखिल वागळे Nikhil Wagle आयबीएन लोकमत Ibn-Lokmat मकबुल तांबोळी Maqbool Tamboli

आज निळूभाऊ फुले यांचा आठवा स्मृतिदिन. १३ जुलै २००९ रोजी त्यांंचं पुण्यात निधन झालं. निळूभाऊंच्या साधेपणाचे, निगर्वीपणाचे अनेक किस्से सांगितले, लिहिले गेले आहेत. त्यांच्या चित्रपटांमधील खलनायकी भूमिकांबद्दलही भरपूर लिहिलं, बोललं गेलं आहे. निळूभाऊंच्या त्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा एक अनुभव.

.............................................................................................................................................

ही बहुधा २००८मधील गोष्ट आहे. तेव्हा मी आयबीएन-लोकमत या मराठी वृत्तवाहिनीमध्ये काम करत होतो. एक दिवस वागळेंनी मला बोलावून निळूभाऊ फुले यांची ग्रेट-भेट करायची असल्याचं सांगितलं. त्यानुसार प्रॉडक्शन टीम, कॅमेरा टीम आणि मी…आम्ही सगळे कामाला लागलो. मुलाखतीच्या आदल्या दिवशी वागळे मला म्हणाले, ‘‘तू उद्या सकाळी लीलावती हॉस्पिटलला जाऊन तिथून निळूभाऊंना घेऊन अंधेरीला कामतांच्या हॉटेलमध्ये ये.’’ त्यानुसार मी लीलावती हॉस्पिटलला गेलो. निळूभाऊंचे स्वीय सहायक मकबुल तांबोळी यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितलं. आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर गाडी पार्क करून थांबलो. थोड्या वेळानं निळूभाऊ आणि तांबोळी आमच्यासमोरच एका गाडीतून खाली उतरले. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. आम्ही निळूभाऊंना आमच्या गाडीत घेतलं. मला वाटलं होतं की, निळूभाऊ त्यांच्या चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आले असावेत, पण प्रत्यक्षात त्यांची गाडी हॉस्पिटलमागच्या गल्लीतून आली. नंतर बोलताना कळलं की, ते नारायण राणे यांना भेटायला गेले होते. राण्यांनीच त्यांना भेटायला बोलावलं होतं.

आमची गाडी अंधेरीच्या दिशेनं निघाली. निळूभाऊ गाडीत आमच्याशी मध्येमध्ये बोलत होते; जुजबी चौकशी करत होते. त्यांचं थकलेलं वय त्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर जाणवत असलं, तरी त्यांचा कमालीचा साधेपणा त्यांच्याकडे आकर्षून घेत असल्याचं पहिल्या पाच-दहा मिनिटांतच माझ्या लक्षात आलं. निळूभाऊ, तांबोळी आणि मी बोलत होतो, पण बोलता बोलता निळूभाऊंना एकाएकी उबळ येऊन बेडका पडायचा. तांबोळीही बोलता बोलता अगदी सहजपणे आणि सराईतपणे पेपर नॅपकीन पुढे करून निळूभाऊंना द्यायचे आणि नंतर तो शेजारच्या बास्केटमध्ये टाकायचे; आणि बोलणं पुढे चालू व्हायचं. असं दोन-तीनदा झाल्यावर माझ्या लक्षात आलं की, निळूभाऊंना बरं नसावं. तसं मी विचारल्यावर तांबोळी म्हणाले, ‘‘नाही नाही. थोडासा खोकला आहे निळूभाऊंना. बाकी काही नाही.’’ पण दोन-पाच मिनिटांनी निळूभाऊंना उबळ येणं आणि बेडका पडणं चालूच होतं. ‘हे असंच चालू राहिलं, तर मुलाखत कशी पार पडणार? सततच्या उबळीनं मुलाखत मध्येमध्ये थांबवावी लागणार’, या कल्पनेनंच मी धास्तावून गेलो होतो; पण निळूभाऊ, तांबोळी मात्र शांत होते. मला काही कळेना. ‘हा प्रकार वागळेंना कळला, तर आपलं काही खरं नाही’, असं मला वाटायला लागलं. हॉटेलमध्ये आल्या आल्या मी वागळेंना या गोष्टीची कल्पना दिली, पण आता ऐन वेळी काय करणार? त्यामुळे वागळे म्हणाले, ‘‘पाहू’’.

हॉटेलमध्ये पोहोचल्यावर थोडा नाश्ता केल्यानंतर निळूभाऊ जरा फ्रेश झाले. नंतर ते मेकअप आर्टिस्टसोबत तयार होण्यासाठी गेले. इकडे आम्ही ‘आता काय होणार!’, या धास्तीत होतो. थोड्या वेळानं निळूभाऊ मेकअप करून आले, तेव्हा मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो! हे निळूभाऊ मघाशी माझ्यासोबत आलेले निळूभाऊ वाटत नव्हते. ते अतिशय प्रसन्न, उत्साही आणि टवटवीत झालेले होते. आता त्यांच्या पाठीचा बाकही मघापेक्षा थोडा कमी झाल्यासारखा वाटत होता. मग मी त्यांना खुर्चीत बसवलं. त्यांनी ‘‘करू या सुरुवात?’’ म्हणून वागळेंना विचारलं. आमची तयारी झालेलीच होती. त्यामुळे मुलाखतीला सुरुवात झाली आणि पुढचा तास-सव्वा तास निळूभाऊंना उबळ तर सोडाच, पण साधी उचकीही लागली नाही. ते त्यांच्या निर्मिष साधेपणानं वागळेंच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते. मनमोकळेपणानं बोलत होते.

.............................................................................................................................................

त्या मुलाखतीचा तीनेक मिनिटांचा व्हिडिओ पुढील लिंकवर जाऊन पाहता येईल -

http://im.ibnlokmat.tv/showvideo.php?id=5401

.............................................................................................................................................

निळूभाऊंनी नाटक-चित्रपट आणि अंनिसच्या चळवळीत काम करतानाचे अनेक गमतीशीर अनुभव त्या मुलाखतीमध्ये सांगितले. कुठेही आपण हे केलं, ते केलं असा सूर नव्हता. उलट चित्रपटांमध्ये अनेक वेळा बलात्काराचे प्रसंग आपल्याला करावे लागले, याची खंतवजा कबुली देताना ते म्हणाले की, ‘खरं सांगू का, चित्रपटात बलात्कार करताना महिलेपेक्षा पुरुषालाच जास्त त्रास होतो. कारण महिला निपचित पडलेली असते. पुरुषाला मात्र खूपच हालचाल, धडपड करावी लागते. त्यामुळे त्या प्रत्येक बलात्काराचा जास्त त्रास मलाच झालेला आहे.’

आपल्या खलनायकी भूमिकांमुळे प्रत्यक्ष आयुष्यातही काही महिलांनी त्यांना शिव्याशाप दिल्याच्या घटना त्यांनी सांगितल्या. त्यांच्या एका मित्रानं त्यांना एकदा घरी जेवायला बोलावलं होतं. निळूभाऊ गेले. तो मित्र आज आपल्या घरी कोण आलंय म्हणून आईला निळूभाऊंची ओळख करून द्यायला गेला. पण निळूभाऊंना पाहून ती माऊली प्रचंड भडकली. ‘इतरांच्या बायकांवर हात टाकायला तुला लाज कशी वाटत नाही?’ असं म्हणत तिनं निळूभाऊंचा उद्धार करायला सुरुवात केली. निळूभाऊंच्या मित्रानं आईला थांबवण्याच्या, हे सगळं केवळ चित्रपटातच असतं आणि ते खरं नसतं, हे परोपरीनं समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण ती माऊली काही ऐकायला तयार नव्हती. तिनं निळूभाऊंना शिव्यांची लाखोली वाहिली. शेवटी रागानं आतल्या खोलीत निघून गेली. मित्र प्रचंड खजिल झाला. त्यानं निळूभाऊंची माफी मागितली. पण निळूभाऊ त्याला म्हणाले, ‘अरे, ही तर माझ्या कामाची पावती आहे!’ आग्रहानं घरी जेवायला बोलावलेल्या त्या मित्राच्या घरचं जेवण न घेताच निळूभाऊंना आल्या पावली परत जावं लागलं.

अशा अनेक गोष्टींनी ती मुलाखत रंगतदार झाली.

त्यानंतर वर्षभराची गोष्ट. मी सुशील धसकटेसह संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांना भेटायला गेलो होतो. नुकतंच निळूभाऊंचं निधन झालं होतं. त्यामुळे त्यांची मुलाखत त्या दिवशी आयबीएन-लोकमतवर पुन्हा दाखवली जात होती. मोरे सर तीच पाहत होते. आम्ही गेल्यावर नेमकं निळूभाऊ त्या बलात्काराच्या प्रसंगाबद्दल बोलत होते. ते ऐकून मोरे सरांना प्रचंड हसायला आलं. असो.

चेहऱ्याला रंग लावून कॅमेऱ्यासमोर बसल्यानंतर निळूभाऊंमध्ये एकाएकी जो बदल झाला, तो माझ्या दृष्टीनं विलोभनीय होता. मुलाखत संपली. निळूभाऊंनी मेकअप उतरवला आणि त्यांना परत उबळ येऊन बेडके पडायला लागले. आमच्या गप्पा चालल्या होत्या. निळूभाऊही बोलत होते. मध्येच त्यांना उबळ येई. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असलेले तांबोळी तत्परतेनं पेपर नॅपकीन पुढे करत. नंतर तो तितक्याच सहजपणे सोबतच्या बास्केटमध्ये टाकून बोलणं पुढे चालू होई.

मुलाखतीनंतर निळूभाऊंना लगेच पुण्याला निघायचं होतं. त्यामुळे त्यांनी मला एक पाकीट देत ते दादरला एका ठिकाणी जाऊन नेऊन देण्याविषयी विचारलं. सोबत पत्ताही दिला. मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी वागळेंना विचारून ते पाकीट द्यायला दिलेल्या पत्त्याच्या दिशेनं निघालो. एका रस्त्यालगत मोठी चाळवजा इमारत होती. तिच्या तळमजल्यावर डावीकडे शेवटच्या खोलीत एक वृद्ध दांपत्य राहत होतं. बहुधा दोघंच असावेत. वयानं सत्तरीच्या पुढे तरी असतील. ‘‘निळूभाऊंनी तुम्हाला हे पाकीट द्यायला सांगितलंय’’ असं म्हणून मी त्यांच्याकडे ते पाकीट दिलं. बहुधा त्याचीच वाट पाहत असल्याप्रमाणे त्यांनी ते माझ्याकडून घेतलं; पण ते दोघंही खूपच वृद्ध असल्यामुळे इच्छा असूनही मला त्यांच्याशी बोलता आलं नाही. मी त्यांच्या घरातून बाहेर पडलो. ऑफिसला परतलो. काही दिवसांनी मला समजलं की, निळूभाऊ अनेक व्यक्ती, संस्था यांना मदत करत होते. त्यासाठी ते आपल्या उत्पन्नातली ठरावीक रक्कम दर महिन्याला बाजूला काढून ठेवत होते. हे दांपत्य त्यांपैकीच एक असणार. बहुधा ते स्वातंत्र्यसैनिक किंवा सामाजिक कार्यकर्ते असावेत. या वृद्ध दांपत्याकडे परत जाऊन त्यांच्याशी बोलायचं मी ठरवलं होतं, पण तेही राहून गेलं. तर ते असो.

निळूभाऊंच्या अनुभवानं माझ्या एवढं लक्षात आलं की, खरा अभिनेता\अभिनेत्री एकदा त्यांच्या भूमिकेत शिरले की, ते वेगळेच होतात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा येते, उत्साह येतो; आणि जोवर त्यांच्या चेहऱ्यावर रंग असतो, तोवर शरीरातले आजार गपगार होतात. तो रंग उतरला की, ते पुन्हा आपल्यासारखेच माणूस होतात! तेव्हा त्यांचे प्रश्न-समस्या आपल्यासारख्याच असतात!

लेखक ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Alka Gadgil

Thu , 13 July 2017

Wwa khoop chhan, Nilubhau great kalakar hote tasech karyakarte mhanunhi


Nivedita Deo

Thu , 13 July 2017

खूप छान