पालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
सतीश देशपांडे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 08 January 2019
  • अर्धेजग कळीचे प्रश्न संगोपन पालक

‘चिऊताई चिऊताई दार उघड, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे’ किंवा ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणुक’ अशा गोष्टी सांगत सांगत आईनं भरवलेला मऊ भात कुणाला आठवत नाही? त्या इवलुशा घासांनी पोट तर भरतंच, पण आईनं सांगितलेली त्यासोबतची गोष्ट बाळाचे कान आणि मन तयार करते. जन्मानंतरचा पहिला स्पर्श, पहिला शब्द, पहिला घास, पहिलं पाऊल या सगळ्यांची आई साक्षीदार असते. आईसोबत बाबाही असाच आनंदून गेलेला असतो. त्याच्यातलं खेळकर बाळ आता हसू-खेळू  लागलेलं असतं. नाजुकशा वेलीसारखा हा काळ. आईबाबाचं नि बाळाचं नातं भविष्यात कसं असेल याचं बीज या काळात रूजतं. बाळाच्या जडणघडणीची बीजं त्यातून अंकुरतात. बाळाच्या हसण्याला, हातवारे करण्याला, खेळण्याला जसा अर्थ देऊ, तशी त्याची जडणघडण होते. आई-वडिलांना या टप्प्यावरती बाळाचं संगोपन कसं करायचं याचं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते. या बालसंगोपन काळात संवाद हा पैलू अधिक परिणामकारक ठरणारा असतो.

कित्येक कुटुंबात आज अशी उदाहरणं पाहायला मिळतात की, वडील-मूल यांच्यात नियमित संवाद होताना दिसत नाही. आईशी झालाच तर तो अगदी त्रोटक असतो. ही मुलं मोठी झाल्यावर घरातल्या कुठल्या निर्णयाबाबत पालकांशी काही शेअर करत नाहीत. जणू एकमेकांना गृहीत धरून निर्णय घेतले जातात. मूल ज्या भावविश्वात असतं, त्यात जाऊन पालकांनी त्याच्याशी हसत खेळत संवाद साधायला हवा. त्यासाठी बाळासारखं लहान होऊन त्याच्याशी जुळवून घ्यायला हवं. त्याला आपण दोस्तासमान वाटू लागलो तरच ते आपल्याशी जुळवून घेणार. नाहीतर मग या नात्यात विसंवादी वातावरण तयार होतं. पालकांचा मुलांशी जितका संवाद होईल, तितके त्यांच्यातील बंध घट्ट होतात. पालक म्हणजे शिस्त लावणारा, अभ्यासाला बसवणारा, पाल्याच्या भविष्याची चिंता करणारा, त्याचा मार्गदर्शक वगैरे प्रतिमा तयार करताना सुसंवाद हरवू नये याची काळजी घेता आली पाहिजे. काही आदर्श पालकांची उदाहरणं पाहायला मिळतात की, जिथे शिस्त आहे, समजावणं आहे, पाल्याच्या भविष्याची काळजी आहे, पण सोबतच मित्रत्वाचं नातंदेखील आहे. हे मित्रत्वाचं नातं मुलांच्या जडणघडणीवर परिणाम करणारं ठरतं.

ग्लेझर या बालमानसशास्त्रज्ञानं सांगितलंय की, आयुष्यात सर्व्हायव्हल, फन, फ्रीडम, लव्ह आणि पॉवर (संरक्षण, मौज, स्वातंत्र्य, प्रेम आणि सामर्थ्य) या चार गोष्टी लाभल्यास प्रत्येकाचं आयुष्य फुलून येईल. फुलणाऱ्या वयात हे सर्व कुटुंबाकडून, समाजाकडून अपेक्षितच असतं. या गोष्टी नाही मिळाल्या तर याचा परिणाम बालकांच्या विकासावर होतो. ज्या पालकांना हे समजलंय ते आपल्या पाल्यांना या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका पालकांशी संवाद साधला. पालकांचं आपल्या पाल्याशी असणारं मैत्रीचं नातं, त्यांच्यामध्ये असणारा मनमोकळा संवाद याचा बालकांच्या जडणघडणीवर कसा परिणाम होतो हे यातून दिसून येते.

डॉ. मीनल नरवणे. पुण्यात यशदामध्ये त्या राज्य प्रशिक्षण नियोजन आणि मूल्यमापन यंत्रणा, मानव विकास केंद्राच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. २०१५ साली युपीएससी परीक्षेत त्यांची मुलगी अबोली राज्यात पहिली आली. अबोलीच्या यशाबद्दल आणि एकूणच जडणघडणीबद्दल माध्यमांमध्ये त्यांनी लिहिलंदेखील आहे. डॉ. मीनल यांना दोन मुली. मोठी नेहा आणि धाकटी अबोली. दोघींनी स्वत:चं करिअर स्वत: निवडलं आणि त्यात सुयश मिळवलं. दोघींच्याही जडणघडणीसाठी आई म्हणून त्यांनी आवर्जून ज्या गोष्टी केल्या, त्यातली एक म्हणजे त्यांच्याशी केलेला मनमोकळा संवाद. या संवादाचा दोघींच्याही जडणघडणीवर खूप परिणाम झाला.

त्या म्हणतात, “नेहा आणि अबोली दोघींशीही जन्मापासून माझा संवाद सुरू आहे. त्या लहान आहेत, त्यांना काय कळणार, असा कधीच मी विचार केला नाही. त्यांना मी काय म्हणतेय हे कळो वा न कळो, त्यांच्याशी खूप बोलत असे. खरं तर शून्य ते सहा हे वय म्हणजे मुलांच्या शारीरिक बौद्धिक वाढीचं वय असतं. त्यांना भवताल हळूहळू कळायला लागतो. भाषा समायला लागते. मी त्यांच्याबरोबर छोटे छोटे खेळ खेळत असे. नवनवे प्रयोग करायचे. घरातले आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोटे छोटे निर्णय त्यांना घ्यायला लावत असे. यामुळे त्या विचार करायच्या. विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागली. स्वत: निर्णय घेतल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली. विशेष वाटेल, पण मी मुलींचा अभ्यास कधीही घेतला नाही. खरं तर मुलांना अभ्यासात गोडी निर्माण करून दिली, अभ्यास का करायचा, कसा करायचा हे बंधन न घातला समजून दिलं की मग अभ्यास सहज होत जातो. दोघींनाही कधी शिकवणीची गरज लागली नाही. अबोली युपीएससीत राज्यात पहिली आली. तिच्या करिअरबद्दल अनेकांना जाणून घ्यायचं असतं, म्हणून सांगते की, अबोलीला मी ‘आयएएस हो’ असं कधीही म्हटलं नाही. तिला काय करायचंय ते तिनं ठरवलं. त्याचं मूळ तिच्यासोबत लहानपणी झालेल्या चर्चांमध्ये असावं. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही खूप चर्चा करत असायचो. मी आणि माझे पती सुनील यांनी दोघींशीही मित्रत्वाचं नातं ठेवलं. त्यांच्याशी खूप संवाद साधला. हे करा, ते करू नका, वागावं कसं वगैरे बंधनं घातली नाहीत. आम्ही त्यांना इतकंच सांगायचो की, अमुक एक गोष्ट केल्यानं काय होईल नि न केल्यानं काय होईल. घरातल्या सुसंवादी वातावरणात दोघींचीही जडणघडण झाली. दोघींनीही त्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचे निर्णय स्वत: घेतले.” 

प्रत्येक घरात निरनिराळ्या क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवण्यासाठी अशी अबोली जन्माला येऊ शकते. गरज आहे तिला घडवण्याची. त्यासाठी पालक म्हणून अधिक सजग होण्याची. डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी ‘घरोघरी जन्मती ज्ञानेश्वर’मध्ये म्हटलंय- “आपला समाज मुलांचं कौतुक खूप करतो. प्रत्यक्षात मात्र ‘मुलं वाढवणं’ या संबंधीचा मूलभूत विचार करण्याची गरज कितीशी ओळखली जाते? मुलांना जन्म देणं तरी एकवेळ सोपं, पण त्यांना संपन्न व्यक्तिमत्वाची माणसं होण्यासाठी संधी आणि वातावरण देणं फार कठीण आहे. मूल वाढवणं म्हणजे नेमके काय याची माहिती पालकांना असायला हवी. मूल लहानाचं मोठं करणं म्हणजे आनंद, जबाबदारी एवढं बहुतेकांना कळतं, पण ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वत:ला कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव अनेकदा नसते.” 

पालक हा काही तीन अक्षरांपुरता मर्यादित शब्द नाही. जो केवळ जन्म देतो तो पालक नव्हे. त्यामध्ये पाल्याला घडवणं, त्याला मोकळा अवकाश निर्माण करून देणं, ही जबाबदारी अभिप्रेत आहे. आजचे तरुण वयातले पालक ज्यावेळी पाल्य होते, त्यावेळी त्यांचा त्यांच्या आईवडिलांशी जितका संवाद होता, त्यापेक्षा अधिक संवाद आज ते स्वत: आपल्या पाल्यांशी करतात. ही गोष्ट सकारात्मक आहे. पण आजूबाजूच्या करिअरिस्टिक वातावरणाचा त्यांच्यावर खूप प्रभाव असतो. हा प्रभाव नकळत दबाव होतो. त्यांच्या मुलांकडून अपेक्षा वाढतात. मुलांना खूप साऱ्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांच्यासाठी हवे तेवढे पैसे खर्च करणं हे मग ओघाओघानं आलंच. आज आजूबाजूला असे कित्येक पालक पाहायला मिळतात की, मूल जन्माला येण्यापूर्वीच त्याला किंवा तिला कुठल्या शाळेत टाकायचं, त्यासाठी काय प्रयत्न करायचे, वगैरे गोष्टींचा विचार करतात. मुलांचं भावविश्व न समजून घेता, सतत स्पर्धेत टिकण्याचा विचार करणं, तसं मूल घडवण्याचा प्रयत्न करणं, ही गोष्ट मुलांच्या जडणघडणीसाठी सकारात्मक नाही.

पतिपत्नी दोघांनाही घराबाहेर कामानिमित्त जावं लागतं, त्यामुळं मुलांकडं लक्ष देता येत नाही, वेळ देता येत नाही, असं बोललं जातं. पण असेही काही पालक आहेत, की जे दोघेही कामानिमित्त बाहेर जातात, पतिपत्नींची साप्ताहिक सुटी देखील वेगळी असते, पण मुलांच्या संगोपनात ते कुठेही कमी पडत नाहीत. अशाच एका पालकांशी संवाद साधला. मनीष आणि शुभांगी शितोळे. पुण्यात मोशी परिसरात राहतात. दोघेही खासगी कंपनीत काम करतात. त्यांची साप्ताहिक सुटीदेखील एका दिवशी नसते. त्यांना दोन मुलं - मोठा प्रेम आणि छोटी ऊर्जा. प्रेम, ऊर्जा आणि बाबा यांच्यातलं नातं वडिल-मुलं यापेक्षा जिव्हाळ्याचे दोस्त म्हणून अधिक आहे. प्रेम सांगत होता, “पपा ज्यावेळी घरी असतो, त्यावेळी बाहेर खेळायला अजिबात जात नाही. घरीच खेळत असतो. पपा आमच्या मित्रासारखा आहे. त्याच्याशी आम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर करायला आवडते. एकदातर तो ऑफिसच्या कामासाठी मुंबईला निघाला होता. आम्हाला त्या दिवशी सुटी होती. आम्ही त्याच्यासोबत जायचा हट्ट केला. त्यानं आम्हाला सोबत नेलं. तो काम करत बसला, त्यावेळी आम्ही गाडीतच अभ्यास करत बसलो. तो फ्री झाल्यावर मग आम्ही खूप मजा केली. आम्हाला त्याच्यासोबत राहायला खूप आवडतं. तो कितीपण दमलेला असला तरी आमच्यासमोर आनंदी असतो. आम्ही सोबत खेळतो, डान्स करतो, मस्ती करतो आणि सगळे मिळून आईची काळजी करतो, कारण ती पण ऑफिसचं काम करून दमलेली असते.”

 पपा शिस्त लावतात का, अभ्यास करायला सारखं बसवतात का, विचारल्यावर तो म्हणाला, “त्यानं आम्हाला अगोदरच सांगून ठेवलंय रोजचा रोज अभ्यास मन लावून करायचा, मग हवी तितकी मजा करायची. आमच्याकडून त्याला चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतात म्हणून कधी कधी रागावतो.” प्रेम आणि ऊर्जा त्यांच्या शिरीष काकांकडं एक वर्ष कोल्हापूरला शिकायला होते. पण या तिघांमधलं बाँडिंग तसूभरदेखील कमी झालं नाही.

इतकं छान नातं कसं काय तयार झालं, कसा साधता तुम्ही मुलांशी संवाद, विचारल्यावर मनीष म्हणाले, “मोठा व्यक्ती म्हणून कधीही मुलांना दडपण वाटू नये म्हणून मी त्यांच्यातलाच एक हेाऊन जातो. आपला बाबा किंवा आई हे आपल्या मित्रासारखेच आहेत याची खात्री पटल्यावर मुलांना आईबाबांशी बोलायला काहीही आडपडदा वाटत नाही. आम्ही दोघेही जॉब करतो, पण ज्यावेळी घरी असतो, त्यावेळी भरपूर वेळ आम्ही मुलांसोबत घालवतो. गप्पा मारतो, खेळतो, फिरायला जातो, सिनेमाला जातो. आम्ही त्यांच्याशी खुलेपणाने गप्पा मारतो. पतिपत्नी म्हणून आम्ही एकत्र वेळ देणार, आम्ही गप्पा मारणार, तुमच्याशी खेळल्यानंतर आम्हालापण पर्सनल वेळ हवाय, असं ज्यावेळी आम्ही मुलांना सांगतो त्यावेळी ते दोघंही स्वीकारतात. एखादी गोष्ट त्यांनी करायला हवी किंवा नको असं ज्यावेळी सांगायचं असतं तेव्हा आम्हा त्यांना त्याचे फायदे, तोटे समजून सांगतो. ते ऐकतात. अभ्यासाचा मी उगीचच आग्रह करत नाही. नाही अभ्यास केला तर तुलाच मार्क कमी पडतील, असं सांगितलं की त्यांना आपोआप समजतं. मुलांमध्ये समज असते, एखाद्या गोष्टीचं त्यांना लगेच आकलनही होतं, आपण त्यांच्यावर दबाव आणण्यात अर्थ नसतो. मी जेव्हा दमून येतो तेव्हा ते दोघंही ओळखतात, पपा तू दमून आलाय ना, तुझ्या डोळ्यांत दिसतंय. ते ज्यावेळी चेहऱ्यावरून हात फिरवतात तेव्हा थकवा दूर जातो. त्यांच्या आहाराकडं, खेळण्याकडं आम्हा लक्ष देतो. त्यांना अधिक तंदरूस्त ठेवण्यासाठी खेळायला लावतो. त्यांच्या चुकण्यामुळं मी त्यांना कधीच रागावत नाही. मला तर असं वाटतं की, मुलांनी चुकलंच पाहिजे. हीच तर त्यांच्या शिकण्यातली एक महत्त्वाची पायरी आहे. प्रेम इतका समजदार झालाय की, आम्हा घरी नसताना तो एकटा ऊर्जाला सांभाळतो. एका अर्थानं तो लहानपणीच तिचा पालक झालाय. आम्ही घरात एकत्र टिव्ही पाहतो, त्यातल्या कार्यक्रमांवर चर्चा करतो. यातून त्यांची मतं तयार होतात.”

हे वय संस्कारक्षम असतं, मुलं या वयात पालकांचं अनुकरण करत असतात. याबद्दल मनीष म्हणाले, “ही पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्याला पाहून ते शिकतात. आपण इतरांचा आदर केला तर ती आदर करतात. आपण व्यायाम केला, वाचन केलं तर त्यांना तशी चांगली सवय लागते. त्यामुळं आपण जे काही करू ते जबाबदारीनं केलं पाहिजे. आपण कोण आहोत, कसे आहोत हे मुलांना चांगलं कळतं. ते लहान आहेत, त्यांना अजून समज नाही हा आपला गैरसमज आहे.” 

हे उदाहरण पाहून वाटलं की, वेळ नाही, आम्ही बिझी आहोत या काही बालसंगोपनाच्या आड येणाऱ्या समस्या नाहीत. कोवळ्या वयाला आकार देण्याची खूप मोठी जबाबदारी पालकांची आहे. ती डावलून चालणार नाही.

मुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.

.............................................................................................................................................

लेखक सतीश देशपांडे मुक्त पत्रकार आहेत.

sdeshpande02@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................