षांताराम पवार यांची कविता : चैत्रिक संवेदनशीलतेचा भाषिक उमाळा (उत्तरार्ध)
ग्रंथनामा - झलक
सतीश तांबे
  • षांताराम पवार आणि त्यांच्या ‘कळावे’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 22 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक षांताराम पवार शांताराम पवार Shantaram Pawar कळावे Kalave सतीश तांबे Satish Tambe मौज प्रकाशन गृह Mouj Prakashan Gruh

चित्रकार षांताराम पवार यांचा ‘कळावे’ हा कवितासंग्रह नुकताच मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केला आहे. या कवितासंग्रहाला कथाकार सतीश तांबे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा उत्तरार्ध

.............................................................................................................................................

षांतारामांच्या कवितेचं रूपाबाबत चटकन जाणवणारं आणखी एक वैशिष्ट्य असं की, या कवितांना शीर्षकं नाहीत. मात्र त्यांच्या प्रत्येक कवितेत एखादा शब्द हा त्यांनी ठळक म्हणजेच ‘बोल्ड’ केलेला आहे. तो भले शीर्षक म्हणून चपखल नसेलही, पण षांतारामांना त्यातील जे काही ‘कळावे’ असं वाटतं ते व्यक्त करण्यासाठी कामाचा आहे. हा काही फार सघन प्रयोग नसला तरी याचा चटकन पूर्वाधार सापडायची शक्यता तशी कमीच असावी.

तर षांतारामांच्या चैत्रिक संवेदनशीलतेची अशी दृश्यात्मक दखल घेऊन आता आपण ‘कळावे’तील कवितांकडे वळूया. ‘कळावे’तील सुमारे दोन-तृतीयांश कविता या सामाजिक संदर्भ असलेल्या आहेत. आपल्या आसपास जे काही व्यवहार चालू असतात त्या सर्वांचाच आपल्यावर काही ना काही परिणाम होत असतोच. त्यातही कलाकाराच्या संवेदनशीलतेचं वैशिष्ट्य असं असतं की, तिला सुखही दुखू शकतं, तर दु:खाची काय कथा? (शांतारामचं ‘षांताराम’ केलं जातं ते त्यामुळेच ना?)

आता साधी गोष्ट घ्या की, मुंबापुरीची दिवसेंदिवस जी बजबजपुरी होत चालली आहे, त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस हा थोड्याबहुत प्रमाणात अस्वस्थ असतोच. षांतारामांमधील चैत्रिक संवेदनशीलता या बदललेल्या मुंबईकडे एक दृश्य म्हणून बघते. त्यामुळे त्यांना झोपडपट्टी ही चक्क ‘रूखवता’सारखी दिसते. आता रूखवत म्हटलं की, साहजिकच कुणालाही लग्न-समारंभ आठवतो, त्यामुळे पुढचीच ओळ ही

‘शहराला शेणामुताचे अत्तर फासतो’ 

अशी येते. परिणामी

‘अरेरे अरेरे, झाले काय बघ्रे, मुंबैचे मातेरे’

या ओळीनं सुरू होणारी ही कविता

‘अरेरे बाप्रे, झाले कार बघ्रे, मऱ्हाटीच्या माहेरी

आहे कुठे कोण मुंबईचा कैवारी?’ 

या ओळींनी संपते, तेव्हा वाचकाच्या बोथट संवेदनांना दचकवून जागं केलं जातं. आणि मुंबईचा कैवार राजकारणासाठी करणारे तर सोडूनच द्या, पण तुम्हीआम्ही कुणीच नाही हे त्याला जाणवतं. तर अशा प्रकारे षांतारामांच्या कवितेत ‘सामाजिक जाणीव’ही प्रखरपणे दिसते. आणि तिची लागण वाचकाच्याही मनाला व्हावी असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच तर,

‘कर्जाच्या ओझ्याखाली,

नवरुगाचा आजचा आपला शेतकरी

आत्महत्या पिकवतो आहे’

अशा ओळी लिहिताना ते लिहिण्याच्या ओघात ‘आपला’ हा अत्यंत महत्त्वाचा शब्द अगदी सहज लिहून ते वाचकालाही शेतकऱ्याच्या दु:खात शरीक करून घेतात. आणि पुढे

‘एक दिवस दुष्काळ पडेल

आणि तुमच्या आमच्या खा खा खाणाऱ्यांच्या

पिंडदानासाठी दाणा दाणा आयात करावा लागेल

आणि कावळासुद्धा शोधावा लागेल’

अशा ओळींनी शेवट करून ते बहुसंख्यांमध्ये असणाऱ्या ‘मला काय त्याचे’ वृत्तीला हादरा देतात. अर्थात आसपासच्या खटकणाऱ्या गोष्टी अधोरेखित करत असताना ते स्वत: त्यातून नामानिराळे होत नाहीत. त्यामुळेच

‘कावळे पोचणार नाहीत अशा उंचीवर

फडफडत होते झेंडे त्यांचे’

अशा दोन ओळींनी सुरुवात होणाऱ्या ‘रक्त लांछित’ या कवितेत आसपासच्या राजकारणावर टीका करत असतानाच कवितेची शेवटची ओळ

‘सर्वच जण आपण राजकारण करत होतो.’

अशी लिहून स्वत:सकट कुणाचीच गय करत नाहीत. सामाजिक गफलतींमध्ये सर्वांना गोवतात.

आसमंतातील विसंगती, दांभिकता पाहून त्यांना वाटणारा असंतोष अनेक कवितांमधून जाणवतो.

‘करा रे खुश्शाल करा हवा तो राडा

धम्माल करण्याचा जमाना आहे,

बिन्धास करा बलात्कार, भ्रष्टाचार, अत्याचार, भर सभेत लोकसभेत  

हवामान चांगले आहे, फेस्टिवल कार्निवलचा सीझन आहे’

या ओळींनी सुरू होणारी कविता वाचताना मराठीतील नामवंत कवी नामदेव ढसाळांच्या ‘माणसाने’ या कवितेची आठवण यावी. परंतु ढसाळांच्या कवितेत ठासून भरलेल्या उद्वेगाची जागा षांतारामांच्या कवितेत उपहास घेतो. याचं कारण असं की षांतारामांना आसमंताची लागलेली झळ ही ढसाळांच्या तुलनेत सौम्य आहे. ती त्यांना त्यांच्या चैत्रिक संवेदनशीलतेला दिसणाऱ्या विसंगतीतून जाणवते. त्या विसंगतीच्या खोलात शिरायची त्यांची मनोधारणा नाही.

ढसाळांचं देवाधर्माशी भांडण आहे ते एका विशाल मानवी समूहाला ज्ञानापासून, आत्मसन्मानापासून वंचित ठेवण्यासाठी वापरण्यात आलेलं षडयंत्र या प्रकारचं आहे. षांतारामांचं भांडण हे देवाधर्माच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवहारांमधील दांभिकतेशी आहे. आणि त्या भांडणाविषयी त्यांच्याकडून जे उद्गार बाहेर पडतात त्यात ते

‘परमेश्वर एक ठपका... ठिपका

ठिपक्याठिपक्यांची रांगोळी ... भपका’

असं परमेश्वराविषयी पोटतिडकीनं काहीबाही लिहितानाच त्याला

‘परमेश्वर एक करतासवरता भिकारी’

असं लिहायलाही कचरत नाहीत खरे, पण यातील ‘करतासवरता’ या शब्दातून त्यांची आस्तिकतादेखील सिद्ध होते.

षांतारामांच्या अंतर्मनातील आस्तिकत्वाचं दर्शन घडवणारी एक महत्त्वाची कविता आहे, ती म्हणजे ‘पाठमोरा’. या कवितेत परमेश्वराचा थेट उल्लेख एक शब्दानेही नाही. मात्र

‘माझ्यासमोर पाठमोरा

पाठलाग माझा करीत होता’

अशा, डोळ्यांसमोर नेमकी स्थिती आणता येण्यासाठी प्रयास करायची इच्छा तर व्हावी, परंतु ते शक्य मात्र होऊ नये अशा गूढतेनं सुरू होणारी कविता जेव्हा

‘पण तो राहिला पाठमोरा

आला नाही सामोरा

त्याचा दिसला नाही चेहरा’

या ओळींनी होते, तेव्हा कवीची परमेश्वराविषयीची तक्रार हीच असल्याचं स्पष्ट होतं की, त्याला त्याची चाहूल तर लागते आहे आणि प्रत्यक्ष दर्शन मात्र घडत नाही. उलट त्यांना दिसतं काय तर त्यांच्या ‘अवतार’ या शीर्षकाच्या कवितेत त्यांनी मार्मिकपणे म्हटल्याप्रमाणे

चाललेले परमार्थाचे विंडो शॉपिंग 

अशा रीतीने, देवाधर्मातील दांभिकतेवर ताशेरे झोडणाऱ्या कविता हा त्यांच्या सामाजिक आशयाच्या कवितांमधील एक अत्यंत महत्त्वाचा गुच्छ आहे. मराठीतील यच्चयावत कवींच्या कवितांमध्ये येणारा विठ्ठल षांतारामाच्या कवितेतही येतो. विठ्ठलाला ते विचारतात की,

‘समज, वीट काढून घेतली तुझ्या पायाखालून

तर भूमिगत होशील का रे तू? 

ती आहे म्हणून तू आहेस का रे?

आहे तरी काय ती वस्तू अ-वीट?’

आपल्या आसपास जे घडत असतं त्याबद्दल षांतारामांची कविता ही बव्हंशाने नाराजीच व्यक्त करते. मात्र या सामाजिक आशयाच्या कविता त्यांच्या चैत्रिक संवेदनेला खटकलेल्या गोष्टी जरी मांडत असल्या तरी त्यात कुठेतरी दूरस्थपणा जाणवतो, जो पुसला जातो त्यांच्या स्त्री-पुरुष संबंधांवरील कवितांमध्ये.

‘कळावे’मध्ये स्त्रीला संबोधून असलेल्या अनेक कविता आहेत. मात्र या कविता या मराठीतील एकूण प्रेमकवितांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत, त्या अशा अर्थी की, त्यात सुप्त शारीर अभिलाषांची लपवाछपवी आणि त्या अनुषंगानं येणारी अव्वाच्या सव्वा भावनिकता तुलनेमध्ये खूपच कमी आहे. षांतारामांची प्रेमकविता ही शारीर पातळीवर मोकळेपणे व्यक्त व्हायला अजिबात कचरत नाही. याचं कारण हेच आहे की, ते शारीर संबंधांतील चैत्रिकता महत्त्वाची मानतात. शिवाय त्यांच्या कवितेतील स्त्रियादेखील स्त्री-पुरुष संबंधातील शारीरतेला न कचरणाऱ्या आहेत. पु.शि. रेग्यांच्या नंतर दिलीप चित्रे आणि नामदेव ढसाळ वगळता अशी शारीरता मराठी कवितेत अभावानेच दिसते. आणि कवितांच्या संख्येतील शारीरतेचं प्रमाण लक्षात घ्यायचं तर षांतारामांच्या कवितेतील शारीरता काहीशी जास्तच आहे.

त्यातही षांतारामांच्या कवितेतून त्यांचे स्त्रीबरोबरचे जाणवणारे संबंध हे ‘दोन देत दोन घेत’ प्रकारचे असल्याचं जाणवतं. या कवितांमधील स्त्री ही मराठी कवितांमध्ये विरळा आहे. तसंच या कवितांचं असंही वेगळेपण आहे की, स्त्रीकडून झालेली आपली अवहेलना मांडायला ही कविता अजिबात कचरत नाही. ‘कळावे’तील सुरुवातीच्या कवितेपासूनच षांतारामांच्या कवितांमधील स्त्री-पुरुष संबंधांचं वेगळेपण जाणवतं. ‘अनप्रेडिक्टेबल’ या कवितेच्या सुरुवातीलाच येणाऱ्या 

‘काय गं रक्तपिपासू वाघ की वनराज सिंह

आंबटशौकीन कोल्हा की लबाड लांडगा

कुत्रा शिकारी की राजबिंडा घोडा

सांग तरी आवडतो कोण तुला

कधी सगळे तर कधी कावळेबावळे एकटेदुकटे

तुझ्या दिवाण-ए-खासमध्ये गप्पांसाठी जमतात’  

या ओळींमधून ते स्पष्ट करतात की, ही स्त्री आपल्या भोवती अनेकांना जमवणारी आहे. शिवाय सगळ्या प्राण्यांचे उल्लेख करून त्यांनी मानवी लैंगिकतेतील ‘आहार, निद्रा, भय, मैथुनं च’ या सुभाषितातील पशुत्व अधोरेखित केलं आहे.

याच कवितेत पुढे ओळी येतात त्या अशा :

‘आपण म्हणूया की तुझ्या लेखी सब गडी बारा टक्के’

त्यामुळे होमवर्क केलेल्या वस्तादांची वेळीअवेळी वर्दळ तुझ्याकडे

आणि धगधग तुझ्या कवितेची पाठ खाजवणाऱ्यांची’

या ओळींमधून त्या स्त्रीचे पुरुषांबरोबरचे संबंध अधिक गहरे असल्याचे सांगितलं जातं आणि पुढे हे देखील कळतं की, ही स्त्री कविता करणारीही आहे. थोडक्यात काय तर ही स्त्री चारचौघींसारखी नाही आणि ती तिच्याच सारख्या ‘हट के’ पुरुषांच्या गराड्यात आहे, ज्यातील एक पुरुष प्रस्तुत कवीदेखील आहे. मराठी कवितेत अशी स्थिती चटकन् आठवत नाही.

पुरुषांची प्रवृत्ती ही सहसा आपली मर्दुमकी मिरवण्याकडे किंवा आपल्या शल्याचं कौशल्यानं प्रदर्शन मांडून सहानुभूती मिळवण्याकडे असते. स्त्रीकडून आपण नाकारलं गेल्याचं सहसा कुणी सांगत नाही. त्यात त्याच्या पुरुषी अहंकाराला कुठेतरी धक्का लागतो. जो त्याला नकोसा वाटतो. षांतारामांच्यात मात्र असा एक विरळा उमदेपणा आहे की, ते मुळात आपल्या भावनेतला शारीर रांगडेपणा लपवत नाहीत की, आपण झिडकारले गेल्याचंही सांगायला कचरत नाहीत.

‘हँगओवर’ शीर्षकाच्या कवितेतील या ओळी उदाहरणार्थ अशा :

‘तीन पायांची लंगडी खेळणारी तू लबाड कोंबडी

तुला म्हणे नको होती अतिपरिचयाची जून तंगडी

म्हणून माझी उचलबांगडी हे मला सांगणे न लगे’ 

अशी आपल्या पीछेहाटीची कबुली ते खुल्लमखुल्ला देतात.

‘आत्महत्या’ या शीर्षकाच्या एका कवितेच्या शेवटच्या ओळीत संबंधित स्त्रीचा नवराच कवीला सांगतो आहे की,

‘वचन देऊ नकोस, घेऊ नकोस

गुंतून पडू नकोस, भागवून घे हौस

लक्षात ठेव

तिला आवडतात मीठमसालावाली

गरमागरम माणसं

बाकी फेकून देते थंडगार कणसं’

‘कळावे’तील कवितांमधील स्त्रिया आणि अर्थातच त्यांच्याबरोबरचे स्त्री-पुरुष संबंध हे मुलुखावेगळे आहेत. या कवितांमध्ये जशी कुणी ‘गोरीसखी’ म्हणून तीन-चार कवितांमध्ये उल्लेख आलेली; कविता करणारी आणि वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा, शिकारी कुत्रा, राजबिंडा घोडा, कोंबडा अशा प्राण्यांच्या तोलामोलाच्या तालेवार पुरुष मंडळींच्या गराड्यात रमणारी स्त्री आहे, तशीच ‘बाई’चा उच्चार ‘बै’ असा करणारी कुणी साधीसुधी शादीशुदा स्त्रीदेखील आहे. या ‘बै‘च्या तीन छोटेखानी कविता या रासवट, रांगड्या शृंगाराचा इरसाल नमुना आहेत.     

‘कळावे’तील बऱ्याचशा कविता या प्रेमाच्या आठवणींच्या आहेत, पण त्यात विलक्षण खिलाडूपणा आहे. कुठलंही रडगाणं नाही. सहानुभूती मिळवायचा प्रयत्न नाही की लपवाछपवी नाही. यातील बहुतांश कविता या आटोपशीर आकाराच्या आहेत. बऱ्याचशा कविता तर चार-पाच ओळींच्याही आहेत. पण मराठीत गाजलेल्या चारोळ्यांपेक्षा त्या कितीतरी सकस आहेत.

‘कळावे’तील बहुतांश ‘स्त्रीपुरुष संबंधां’वरील कवितांमधील शारीर वर्णनं ही चैत्रिक संवेदनशीलतेचं दर्शन घडवणारी आहेत. त्यामुळेच त्यामध्ये प्रणयाचा शृंगारिक भाग जेवढ्या विस्तृत प्रमाणात आला आहे, तेवढा मानसिक भाग आलेला नाही, हे देखील या कवितांचं एक वेगळेपण आहे. अर्थात ‘कळावे’तील सामाजिक आशयाच्या कवितांपेक्षा स्त्रीपुरुष संबंधांच्या कविता या जास्त उत्कट वाटतात आणि त्यामुळेच मराठीतील प्रेमकवितांच्या शारीर भागामध्ये त्यांचं योगदान हे खचितच लक्षणीय ठरावं.

षांतारामांच्या कवितेचं आवर्जून दखल घ्यावी असं आणखी एक वैशिष्ट्य असं की, त्यामध्ये बेगडीपणाचा, कृतकपणाचा लवलेश नाही. म्हणजे असं की, बऱ्याचशा कविता वाचताना ही कवीची खरोखरची अनुभूती आहे की, भाषेनं नादावल्यामुळे केलेली शाब्दिक आतषबाजी आहे, अशी शंका उभी रहाते, तसं षांतारामांच्या कविता वाचताना सहसा होत नाही. याचं कारण असं की त्यांची कविता ही उत्स्फूर्त उदगारातून साकारते. त्यात घडवलेपणाचा भाग जवळपास नाहीच. त्यामुळेच त्यांची कविता ही झिलई लावलेली नाही. परिणामी त्यात सफाईदारपणा कमी जाणवतो खरा, पण त्यांच्या या कच्चेपणातच त्यांच्या कवितेचं सच्चेपण दडलेलं आहे. विशुद्ध कविता म्हणता येतील अशा कवितांचं प्रमाण या उदगारांमधून साकारलेल्या काहीशा ओबडधोबड वळणाच्या कवितांमध्ये विरळा आहे.

तर या कविता वाचल्यावर प्रश्न उभा राहू शकतो तो त्यांची प्रतवारी आणि वर्गवारी ठरवण्याचा. यासंदर्भात जरा मुळापासून तपासणी करणं गरजेचं ठरावं. म्हणजे असं की, आपल्यासमोर जेव्हा एखादी संहिता येते तेव्हा तिचा साहित्यप्रकार कोणता हे आपण आपल्याही नकळत ठरवतो. विशेषत: त्यातील ‘गद्य’ कोणतं आणि ‘पद्य’ किंवा ‘काव्य’ कोणतं हे तर आपल्याला पहाताक्षणी जाणवतं, तरीही हे ठरवण्यासाठी आपण कोणते निकष वापरतो असा प्रश्न जर आपल्याला कुणी विचारला तर आपल्याला थोडंसं गडबडायला होतं. आणि त्याही पुढे जाऊन कुणी जर कवितेची व्याख्या विचारली तर बहुधा आपली बोलतीच बंद होते. याचं, विशेषत: कवितेच्या बाबतीतलं, एक कारण असं असतं की, कोणत्याही साहित्यप्रकारांच्या तुलनेत कविता ही खूपच प्रचंड प्रमाणात लिहिली जात असल्यानं कवितेमध्ये एवढे निरनिराळे प्रवाह असतात की, पठड्या आणि प्रयोग यांची संख्या विचारात घेता ‘कविता ’ हा सर्वांत संपन्न साहित्यप्रकार ठरावा. साहजिकच त्यातून एक सर्वसमावेशक गुणसूत्र काढणं, हे जवळपास अशक्य कोटीतलं साहस ठरावं.

एक काळ असा होता की कविता ही वृत्त, छंद वगैरेमध्ये लिहिली जायची. तेव्हा आपण कवितेची सरळसोपी व्याख्या ‘विशिष्ट साच्यांमध्ये गोवलेली शब्दरचना’ अशी करू शकलो असतो. परंतु आपल्या व्यक्त होण्यावर निर्बंध घालणारं वृत्त-छंदांचं जोखड ‘मळ्यास माझ्या कुंपण पडणे मला न अगदी साहे’ हे तत्त्व शिरोधार्य मानून मर्ढेकरोत्तरी काळात झुगारून देत कवितेनं मुक्तछंदाला आपलंसं केल्यानंतर मात्र कवितेची सर्वसमावेशक व्याख्या करणं हे अधिकच अवघड होऊन बसलं. मुक्तछंदाची वाट चोखाळल्यानंतर सुरुवातीचा काही काळ किमान लयीचं भान तरी अबाधित होतं. परंतु काळाच्या ओघात तेही क्षीण होत गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतील कविता चक्क विधानांची झालेली आहे. त्यातल्या त्यात ओळींची कमी-अधिक लांबी हेच आज सकृद्दर्शनी कवितापण जाणवून देणारं लक्षण ठरत आहे. त्यातही एखाद्यानं जर ‘बॉक्स अलाइनमेंट’ करायचं ठरवलं तर हे लक्षणही कुचकामी ठरू शकेल. आणि कवितेच्या आस्थेवाईक वाचकांना अशा गद्यसदृश परिच्छेद दिसणाऱ्या कवितांना अलीकडच्या काही वर्षांमध्ये सामोरं गेल्याचं स्मरत असेल. जसं की, हिंदीतील विष्णू खरे यांच्या हिंदीतून मराठीत भाषांतरित झालेल्या काही कविता किंवा मराठीत अलीकडेच प्रसिद्ध झालेली मंगेश नारायणराव काळे यांची ‘तृतीय पुरुषाचे आगमन’ ही कविता.

एकूणात काय तर, काळाच्या ओघात कवितेचं रूप वाहत जाऊन जो गाळ टिकून आहे तो हळूहळू सकृद्दर्शनी/वरपांगी गद्याकडे सरकताना दिसतो आहे. तरी देखील कवितेचं जे कवितापण टिकून आहे ते खरं तर महत्त्वाचं आहे. कारण कवितेच्या व्याख्येची पाळंमुळं या गाळातच आहेत आणि ती ढोबळमानानं अशी आहेत की, तरल संवेदनेनं केलेल्या अ-गद्य रचनेला कविता असं म्हणता येईल.

तर कविता अशी सतत रूप बदलत असली तरीही वेगळ्या धर्तीची कविता सततच लिहिली जात असते, हा कविता या साहित्यप्रकाराच्या स्थितिस्थापकत्वाचा सज्जड पुरावा आहे. कवितेच्या या थोरवीमध्ये अन्य कलाप्रकारांमधील संवेदनशील मनांनी केलेल्या मुशाफिरीचाही मोठा हिस्सा आहे. ग्रेस यांचे संपादन लाभलेल्या ‘संदर्भ’ नावाच्या एका नियतकालिकात त्यांनी किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे वगैरेंच्या कविता प्रसिद्ध केलेल्या होत्या. ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका नीला भागवत यांच्या नावावर तर एक कवितासंग्रहच आहे आणि त्यानंतरही त्यांच्या कविता अधनंमधनं वाचायला मिळत असतातच. तर असेच चित्रकलेच्या क्षेत्रातील एक कवी आहेत, ते म्हणजे ‘कळावे’चे कवी षांताराम’. कवितेच्या लोंढ्यामध्ये हा प्रवाह आपल्या वेगळेपणानं नक्कीच लक्ष वेधून घेईल आणि त्याचा काही ना काही संस्कार जरूर होईल.

षांतारामांची कविता ही मूलत: विधानांची कविता आहे, जिला आपण त्यांचा स्वच्छंद असं म्हणू शकतो! या कवितेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की, या कविता वाचताना त्यांचं वय जाणवत नाही. आज जी समकालीन कविता लिहिली जाते त्यात षांतारामांची कविता बेमालूम मिसळून जाऊ शकते. त्यामुळेच एका कवितेत जेव्हा उल्लेख येतो की,

‘कदाचित उद्याच बहुधा

मी बहाद्दर, त्र्याहत्तर वर्षांचा होणार

म्हणजे नको असलेली शंभरी गाठण्यासाठी

तब्बल २७ वर्षे आणखी

अस्मादिकांना सरपटावे लागणार’

तेव्हा वाचणाऱ्याला खाडकन् जाग येते आणि जाणवतं की, आपल्याला या कवीचं ‘अवघे पाउणशे वयमान’ जाणवलंच नव्हतं. आणि षांतारामांना ओळखणाऱ्यांना हे कळतं की, एरवी संशयातीत असा अपवादात्मक खरेपणा व्यक्त करणारी ही कविता देखील क्वचित प्रसंगी खोटी होते तर! याचं कारण असं की, आता पंचाहत्तरी गाठलेल्या षांतारामांच्या वागण्याबोलण्यात त्यांनी वरील कवितेत म्हटल्याप्रमाणे ‘शंभरी गाठणं नको असल्याचा’ लवलेश सुतरामही दिसत नाही. ते अद्यापही उत्साह आणि नवनवीन कल्पनांनी फसफसणारे वाटतात, त्यांनी जिथं अनेक वर्षं अध्यापन केले त्या ‘ जे जे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये त्यांनी अगदी अलीकडेच आपल्या विद्यार्थ्यांना सोबतीला घेऊन सादर केलेलं ‘ऋतुसंहार’ हे प्रदर्शन त्याचा सज्जड पुरावा ठरावं.

-तर असं हे ‘कळावे’ वाचल्यानंतर ‘वाचकांचा लोभ’ विनंती न करताच लाभणार, त्यातील विशेषत: ‘अर्धचित्री’ चीजा तर वाचकांना कायमच्या स्मरणात राहणार आणि अशाच कविता करत षांतारामांनी शंभरी गाठावी असं वाचकाला मनोमन वाटणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे!

कळावे​ - षांताराम पवार

मौज प्रकाशन गृह, मुंबई

पाने - १४०, मूल्य - २०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4051

.............................................................................................................................................

लेखक सतीश तांबे मराठीतील प्रसिद्ध कथाकार आहेत.

satishstambe@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......