निरंजन घाटे : विद्वत्तेची झूल न पांघरलेला विद्वान
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
सुबोध जावडेकर
  • निरंजन घाटे यांच्या १८५व्या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 30 April 2017
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो वाचत सुटलो त्याची गोष्ट Vachat Sutalo Tyachi Gosht निरंजन घाटे Niranjan Ghate सुबोध जावडेकर Subodh Jawadekar विज्ञानकथा Science Stories

ज्येष्ठ विज्ञानलेखक निरंजन घाटे यांचं ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट -एका लेखकाच्या ग्रंथप्रेमाची सफर’ हे १८५वं पुस्तकं नुकतंच प्रकाशित झालं आहे. विपुल लेखन करणाऱ्या घाट्यांच्या घराच्या भिंतीच पुस्तकांच्या आहेत! चित्रशाळेतली त्यांची खोली तर केवळ पुस्तकांनी खच्चून भरलेली आहे. तिच्यात शिरताना डोंगरातल्या गुहेत शिरावं तसं पुस्तकांच्या गुहेत शिरल्यासारखं वाटतं. त्यांच्या ग्रंथप्रेमाविषयीच्या या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्या मित्राने लिहिलेल्या त्यांच्याविषयीच्या पूर्वप्रकाशित लेखाचं हे पुनर्मुद्रण...

..................................................................................................................................................................

गेली पंचवीस-तीस वर्षं माझी आणि निरंजन घाटेंची मैत्री आहे. बहुतेक वेळा मित्रांवर काही लिहिणं कठीण असतं. कारण प्रशंसापर लिहिलं तर लोकांना ते खरं वाटत नाही. ते म्हणतात, ‘मैत्रीखातर लिहिलं असेल झालं’. म्हणजे मित्रावर अन्याय होतो. परखडपणे लिहिलं तर लोक म्हणणात, ‘बघा, एवढ्या वर्षांची मैत्री पण कसं लिहिलंय अगदी!’

पण निरंजन घाटेंवर लिहिताना ही अडचण नाही. एकतर विज्ञानलेखनाच्या क्षेत्रात त्यांचं इतकं नाव आहे की, त्याच्यावर कितीही प्रशंसापर लिहिलं तरी ते मैत्रीखातर लिहिलंय असं कुणी म्हणू शकणार नाही. दुसरं म्हणजे त्यांना स्तुती फारशी आवडत नाही. ‘तुमचा अमुक लेख चांगला झालाय’ कुणी म्हटलं की ते ‘थॅंक यू’ म्हणून पटकन विषय बदलतात. त्यामुळे त्यांच्या भोवती स्तुतिपाठकांचा गोतावळा कधीच आढळणार नाही. काहीतरी मतलब साधण्यासाठी त्यांची प्रशंसा करणारे त्यांना दुरूनच ओळखू येतात. त्यांना काय साधायचंय तेही ताबडतोब लक्षात येतं. त्यांच्या तोंडावरच ते त्यांना असे काही चार शब्द सुनावतात की, परत कधी ते त्यांच्या जवळपास फिरकत नाहीत. मग ते ‘किती तुसडा माणूस आहे हो हा’ असं त्यांच्या पाठीमागे म्हणत राहतात. पण घाट्यांच्याच शब्दात सांगायचं तर “म्हणेनात का, मला काSSही फरक पडत नाही!”

१९८३ साली मुंबई विद्यापीठात एक परिसंवाद झाला होता. त्यात निरंजन घाट्यांनी एक निबंध वाचला होता. जरी मी त्याआधी घाट्यांच्या कथा वाचल्या होत्या तरी त्यांना कधी पाहिलं नव्हतं. त्या वेळी मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं. परिसंवाद संपल्यावर मी त्यांची ओळख करून घेतली.  प्रथमदर्शनातच घाटे एखाद्या लेखकासारखे मुळीच दिसत नाहीत असं मनात आलं. ते एखाद्या लष्करी अधिकाऱ्यासारखे जास्त दिसत होते. सहा फुटाच्या वर उंची. दणकट शरीरयष्टी. केसांचा क्रू कट. चेहऱ्यावर उग्र भाव. त्यामुळे जरा दबकूनच गेलो होतो. पण थोड्याच दिवसांत लक्षात आलं की, वरून उग्र दिसणारा हा माणूस आतून फार प्रेमळ आहे. खूप वाचन करणारा आहे. त्यावर भरभरून बोलणारा आहे. फटकळ आहे पण कुणाबद्दल वावगा शब्द त्याच्या तोंडून कधी बाहेर पडणार नाही. मित्रांच्या तोंडावर त्यांची यथेच्छ थट्टामस्करी करेल, पण कुणाच्या माघारी त्याची टवाळी कधीही करणार नाही. कुणाही बद्दल याच्या मनात आकस नाही, असूया नाही. उलट ज्यांच्याबद्दल सामान्यत: उपहासानं बोललं जातं, ज्यांची टिंगल केली जाते, अशा माणसाचा एखादा गुण हेरून तो आवर्जून चारचौघात बोलून दाखवणारा आहे. आयुष्यात अनेकांनी त्याला वाईट वागणूक दिली. वरवर मैत्री दाखवून दगा दिला. पण त्यांच्याबद्दलही घाटे कधीही वाईट बोलल्याचं मी ऐकलेलं नाही. कधी विषय निघालाच तर मॅटर-ऑफ-फॅक्ट हकीगत सांगतील. तीही इतक्या अलिप्तपणे की, जणू काही ते कुणा तिसऱ्याच्याच आयुष्यातली घटना सांगताहेत. मित्रासाठी तर हा माणूस जीवही काढून देईल. त्यामुळे परिचयाचं रुपांतर घट्ट मैत्रीत कधी झालं ते कळलंच नाही.

मैत्रीला जागण्याच्या निरंजन घाट्यांच्या स्वभावाची अनेक उदाहरणे देता येतील. माणूस म्हणून ते किती उमदे आहेत यावरही खूप काही लिहिता येईल.

निरंजन घाटे यांच्या साहित्यावर हजार-बाराशे शब्दांत लिहिणं केवळ अशक्य आहे. त्यांनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या पुस्तकांची संख्या आजच्या घडीला १८५ आहे. त्यांच्या प्रत्येक पुस्तकावर मोजून फक्त एक वाक्य लिहायचं ठरवलं तरी निदान दोन-अडीच हजार शब्द लिहावे लागतील. आणि तरीही पुस्तकात न आलेल्या पाच-सहाशे लेखांवर लिहायचं राहूनच जाईल. तेव्हा घाट्यांनी हाताळलेले काही ठळक साहित्यप्रकार घेऊन त्यावर एक-दोन परिच्छेद लिहायचं मी ठरवलं आहे.

पहिला प्रकार अर्थातच विज्ञानकथा. विज्ञानकथा हा घाट्यांचा लाडका साहित्यप्रकार आहे. घाट्यांनी लिहिलेले विज्ञानकथांचे एकूण सोळा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यातले ‘झू’ आणि ‘करड्या छटा’ हे अनुवादित कथांचे संग्रह आहेत. हे दोन संग्रह सोडले तरी उरलेल्या चवदा संग्रहात दोन-सव्वादोनशे स्वतंत्र विज्ञानकथा आहेत. विज्ञानकथांच्या संदर्भात दोनशे हा आकडा खूप मोठा आहे. जागतिक पातळीवरचे विज्ञानकथेच्या क्षेत्रातले दोन दिग्गज म्हणजे आयझॅक असिमॉव्ह आणि ऑर्थर क्लार्क. असिमॉव्हने त्याच्या आयुष्यात एकूण एकशेसाठ विज्ञानकथा लिहिल्या आणि क्लार्कने शंभराच्या आतबाहेर. हे लक्षात घेतलं तर दोनशे विज्ञानकथा म्हणजे किती मोठा आकडा आहे ते लक्षात येईल. अर्थातच इथं घाटे हे असिमॉव्ह आणि क्लार्कपेक्षा श्रेष्ठ आहेत असं मला अजिबात सुचवायचं नाहीये. पण दोनशेपेक्षा जास्त विज्ञानकथा लिहिणं हे केवढं मोठं काम आहे एवढंच फक्त सांगायचं आहे. इतक्या विज्ञानकथा लिहिणारे महाराष्ट्रातच तर नाहीतच, पण जगातही फार कमी लोक असतील.

अर्थात घाट्यांनी इतक्या विज्ञानकथा लिहिल्या याचं एक कारण त्यांच्या कथा आकारानं छोट्या असतात. काही तुरळक अपवाद सोडले तर आठ-दहा पानाच्या वर त्यांची कथा सहसा जात नाही. अशा छोट्या कथा त्यांनी का लिहिल्या, किंवा त्यांना तशा का लिहाव्या लागल्या, ते त्यांनीच एके ठिकाणी सांगितलेलं आहे. सुरुवातीच्या काळात मासिकांचे संपादक ‘मोठ्या विज्ञानकथा नकोत, आमच्या मासिकाची पाच-सहा पाने होतील अशी कथा द्या’ अशी मागणी करत. लहान कथा म्हटल्या की, साहजिकच वातावरण निर्मिती करण्यासाठी पुरेसा अवकाश नसतो आणि व्यक्तीरेखा फुलवण्यावरही मर्यादा पडतात. त्यामुळे त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या विज्ञानकथा पुरेशा फुललेल्या किंवा विकासित झालेल्या नाहीत. घाईघाईने आटोपून टाकल्यासारख्या वाटतात. त्यातून आणखी म्हणजे जीवनाबद्दल सूत्ररूपानं काही सांगायला, किंवा ते एखाद्या पात्राच्या तोंडी घालायला, त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या कथा सवंग असतात, थिल्लर असतात असा आरोप त्यांच्यावर झाला. समीक्षकांनी तर त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यांच्या कथांतून जीवनदर्शन होत नाही असाही अर्थ काढण्यात आला. तो अर्थातच त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. अनेकदा विज्ञानकथेत होणारं जीवनदर्शन इतर साहित्यातून होणाऱ्या जीवनदर्शनापेक्षा काहीसं वेगळ्या रूपात प्रगटतं. ते टिपायला वेगळी नजर लागते. घाट्यांच्या अनेक कथांमधल्या चमकदार कल्पना केवळ चमत्कृती म्हणून आलेल्या नसतात. त्यातून त्यांना माणसाच्या जगण्यावर एका वेगळ्याच कोनातून प्रकाश टाकायचा असतो. तर कधी भोवतालच्या परिस्थितीवर भाष्य करायचं असतं.

..................................................................................................................................................................

पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3405

..................................................................................................................................................................

उदाहरणार्थ, त्यांच्या ‘प्रोटोकॉल’ या संग्रहातली  ‘इ. स. २०५० नी नोबेल प्राईझ’ नावाची त्यांची एक कथा घेऊया. मराठी लेखकाला नोबेल पारितोषिक का मिळत नाही? असा प्रश्न त्या काळात, म्हणजे २०५०साली उपस्थित होतो. (म्हणजे बघा, अजून तीसेक वर्ष तरी मराठी कथा-कादंबऱ्या जागतिक पातळीवर पोचणार नाहीत, असा रेशमी चिमटा काढलेला आहे!). आता ते का नाही मिळालं या प्रश्नाचा शोध घेण्याच्या कामाला संगणकाला जुंपण्यात येतं. नोबेल पारितोषक मिळवलेली पुस्तके आणि मराठी पुस्तके याचा तौलनिक अभ्यास तो संगणक करतो. बरेच दिवस संशोधन केल्यावर तो आपले निष्कर्ष जाहीर करतो, “नोबेल मिळवलेल्या अनेक साहित्यकृतींचे आणि एकूण एक मराठी साहित्याचं परिशीलन केल्यावर मला असं आढळून आलं आहे की, कित्येक मराठी कादंबऱ्यांना यापूर्वीच नोबेल मिळालेलं आहे!”

अनेक मराठी कथा-कादंबऱ्या परकीय लेखकांच्या कथासूत्रांवर आधारलेल्या असतात, या कटु सत्याचा यापेक्षा जास्त जळजळीत शब्दात उपहास केलेला मला तरी आजपर्यंत कुठं आढळलेला नाही.

विज्ञानकथांची डबल सेंच्युरी तर त्यांनी ठोकली आहेच, पण त्यांनी विज्ञानकादंबऱ्या लिहिल्या आहेत. एकदोन नव्हे, चांगल्या दहा. डबल फिगर!

विज्ञानसाहित्याची म्हणून काही खास बलस्थानं असतात. त्यापैकी एक, म्हणजे आत्ता सांगितला तसा झोंबरा उपहास. विज्ञानकथेमध्ये सद्यस्थितीचं प्रोजेक्शन भविष्यकाळात केलेलं असतं. भविष्यकाळात होऊ घातलेल्या बदलाचं चित्र त्यात आलेलं असतं. ते अतिशयोक्तीपूर्ण रेखाटलेलं असलं तरी ते खोटं नसतं. सध्याच्या जीवनपद्धतीची ती तर्कशुद्ध फलश्रुती असते. मानवजातीचं ते अटळ भविष्य असतं. त्यामुळे वाचकाला त्याच्याकडे त्याच्याकडे डोळेझाक करता येत नाही. अलिप्तपणे पाहता येत नाही. म्हणून तर विज्ञानकथेतला उपरोध चांगलाच जिव्हारी लागणारा असतो. आपल्या अनेक कथांतून घाटे हा उपहास ताकदीनं वापरतात.

..................................................................................................................................................................

निरंजन घाटे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा

http://www.booksnama.com/client/

..................................................................................................................................................................

त्यांची ‘मच्छर’ ही दीर्घकथा आणीबाणीच्या काळात लिहिली होती. ती हुकूमशाहीचा उपहास करणारी होती. आणीबाणीवर टीका करणारी होती. पण ती विज्ञानकथा असल्यामुळे तेव्हांच्या सेन्सॉरनं तिच्याकडं दुर्लक्ष केलं होतं. ती त्यांच्या तावडीतून सहीसलामत सुटली होती. (मला वाटतं, विज्ञानकथेकडे दुर्लक्ष करायची परंपरा अशी जुनी आहे!)

विज्ञानकथा म्हणजे काय, तिचं सामर्थ्य नक्की कशात आहे याची खोल जाण घाट्यांना अगदी सुरुवातीपासूनच आहे. १९८३ साली मुंबई विद्यापीठात झालेल्या परिसंवादात त्यांनी जो निबंध वाचला होता त्याचं शीर्षक होतं, ‘मराठीतील विज्ञानसाहित्य : काल, आज आणि उद्या’. त्या निबंधात त्यांनी दोन प्रश्न उपस्थित केले होते.  ‘कुठल्याही वाड्मयाचा काही हेतू असतो का?’ आणि ‘काही हेतू पुढे ठेवून लिहिलेले वाड्मय दर्जेदार असेल का?’ असे हे दोन प्रश्न. प्रश्न तसे नवीन नाहीत. साहित्याच्या अभ्यासकांना परिचित आहेत. पण त्यांनी ते विज्ञानकथेच्या संदर्भात विचारले होते, तीस वर्षांपूर्वी विचारले होते, हे महत्त्वाचे. त्या परिसंवादात ‘विज्ञान शिकवण्यासाठी विज्ञानकथा लिहाव्यात’ या भूमिकेला त्यांनी विरोध केला होता. या घटनेला आज तीस वर्षं होऊन गेली. त्या परिसंवादावर एक पुस्तकही निघालं. एखादा अपवाद सोडला तर आजचा कोणताही विज्ञानकथाकार विज्ञान शिकवण्याचा हेतू मनात धरून विज्ञानकथा लिहीत नाही. पण तरीही काहीजण अजूनही विज्ञानकथा ही विज्ञान शिकवण्यासाठी असते हेच गृहित धरून बसली आहेत!

या भूमिकेमुळे घाट्यांच्या कुठल्याही कथा-कादंबऱ्यांमध्ये विज्ञान शिकवण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी काही मजकूर, आकृत्या, विज्ञानविषयक अनावश्यक माहिती कधी येत नाही. ‘केवळ विज्ञानकथा वाचून विज्ञान शिकणं हा प्रकार मला तरी अवघड वाटतो’ असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंच आहे. तसं पाहिलं तर घाट्यांनी मनात आणलं असतं तर आपल्या विज्ञानकथेत माहितीचे ढीग रचणं त्यांना कठीण होतं का? त्यांच्यासारख्या लेखकाला, - ज्यानं केवळ विज्ञानावरच साठ-सत्तर पुस्तकं लिहिली आहेत अशा लेखकाला हे अशक्य होतं का? पण नाही, विज्ञानकथांच्या पुस्तकात अट्टाहासानं वैज्ञानिक माहिती घालणं हे त्यांना मुळातच गैर वाटतं.

विज्ञान शिकवण्यासाठी लेख लिहावेत, पुस्तकं लिहावीत. तशी त्यांनी भरपूर लिहिली आहेत. लोकार्थी विज्ञानाची म्हणजे पॉप्युलर सायन्सची थोडीथोडकी नव्हे तर सत्तरएक पुस्तकं त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यात अणुपासून अवकाशापर्यंत, प्राणीजीवनापासून कामजीवनापर्यंत, शस्त्रास्त्रांपासून सिनेमांपर्यंत, उत्क्रांतीपासून अॅन्टार्क्टिकापर्यंत, आरोग्यापासून प्रदूषणापर्यंत आणि खेळांपासून निसर्गापर्यंत, सगळ्या विषयावरची पुस्तकं आहेत. त्यांच्या वसुंधरा या पुस्तकाचं कौतुक तर खुद्द पु. ल. देशपांड्यांनी केलं होतं. या शिवाय शास्त्रज्ञांच्या चरित्राची त्यांची दहा पुस्तकं आहेतच.

विज्ञानकथांच्या जोडीनं घाट्यांनी युद्धकथा लिहिल्या आहेत, गुप्तहेरकथा लिहिल्या आहेत, साहसकथा लिहिल्या आहेत, गुन्हेगारकथा लिहिल्या आहेत, इतकंच काय पण खाण्यापिण्यावरही त्यांचं पुस्तक आहे. चार विनोदी कथा-कादंबऱ्या त्यांच्या नावावर जमा आहेत. घाट्यांना जे जवळून ओळखतात त्यांना माहीतच आहे की, घाट्यांचा सेन्स ऑफ ह्युमर उत्तम आहे. चुटके सांगायला आणि ऐकायला त्याना प्रचंड आवडतं. केवळ विनोद ऐकवण्यासाठी म्हणून ते अनेकदा मित्रांना फोन करतात. त्यांच्याकडे चुटक्यांचा आणि लिमरिक्सचा प्रचंड साठा आहे. आणि त्यांच्या घरात विविध विषयावतील पुस्तकांचा प्रचंड साठा आहे. अनेकांच्या घरात भिंतीवरच्या कपाटात पुस्तकं असतात. घाट्यांच्या घराच्या भिंतीच पुस्तकांच्या आहेत! चित्रशाळेतली त्यांची खोली तर केवळ पुस्तकांनी खच्चून भरलेली आहे. तिच्यात शिरताना डोंगरातल्या गुहेत शिरावं तसं पुस्तकांच्या गुहेत शिरल्यासारखं वाटतं. मुख्य म्हणजे ही सगळी पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत. या जगड्व्याळ पसाऱ्यातून नेमकं पुस्तक काढून त्यातला नेमका परिच्छेद ते क्षणार्धात काढून देऊ शकतात.

जयंत नारळीकर यांनी पहिली विज्ञानकथा लिहिली त्याच्या आधीपासून घाटे विज्ञानकथा लिहीत आहेत. १९७४ साली नारळीकरांनी जेव्हा नारायण विनायक जगताप या नावानं आपली पहिली विज्ञानकथा लिहिली होती आणि मराठी विज्ञान परिषदेच्या स्पर्धेत पहिलं बक्षिस मिळवलं होतं तेव्हा दुसरं बक्षिस घाट्यांना मिळालं होतं. पण विशेष म्हणजे त्या आधी त्यांना मराठी विज्ञान परिषदेचं बक्षिस दोनदा मिळालं होतं. त्यानंतर दरवर्षी आठ-दहा विज्ञानकथा लिहायचा त्यांचा शिरस्ता कायम राहिला आणि आजही ते नव्या दमानं लिहीतच आहेत.

विज्ञानकथा लोकमानसात रुजावी, मराठी वाचकांना त्यांची गोडी लागावी, समीक्षकांनी त्यांची योग्य ती दखल घ्यावी, यासाठी ते गेली अनेक वर्षे ते प्रयत्न करत आहेत. सुमारे पन्नासएक चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचलेले आहेत. ‘विज्ञानसाहित्य आणि संकल्पना’ या मराठीतील एका महत्त्वाच्या ग्रंथाचं संपादन त्यांनी प्रसिद्ध समिक्षक कै. डॉ. व. दि. कलकर्णी यांच्या बरोबर केलं आहे. या शिवाय विज्ञानकथांच्या चार संकलित पुस्तकांचं संपादन त्यांनी केलं आहे. मराठी विज्ञानसाहित्याच्या इतिहासाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे.

मुख्य म्हणजे घाटे यांचं संशोधन दुसऱ्या कुणाच्या निबंधावर आधारित नसतं. पहिली मराठी विज्ञानकथा कुणी लिहिली या विषयावरील संशोधनासाठी त्यांनी अनेक दिवस वाचनालयात ठिय्या देऊन त्यांनी मासिकांचे जुने अंक चाळले होते. चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘रॉबर्ट बंधूंच्या आधी आपल्याकडे मुंबईच्या चौपाटीवर तळपदे यांनी विमान उडवले होते’ ही बातमी खरी की खोटी त्याचा शहानिशा करण्यासाठी त्यांनी त्या काळातले टाइम्स ऑफ इंडिया आणि केसरीचे अंक मुद्दाम काढून बघितले होते. त्यात अशी कुठलीही बातमी आल्याचं त्यांना आढळलं नाही. आपल्या पूर्वजांबद्दल त्यांना अभिमान निश्चित आहे, पण तरी आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाबद्दल त्यांच्या अव्वाच्या सव्वा कल्पना नाहीत. ‘आपल्या पूर्वजांचे विज्ञान’ आणि ‘आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान’ या विषयावर त्यांनी लिहिलेली दोन पुस्तके जिज्ञासूंनी जरूर वाचायला पाहिजेत.

प्रौढांसाठी इतक्या विषयांवर इतकी पुस्तके लिहिली असली तरी मुलांसाठी साहित्य लिहिणे या प्रकाराला ते गौण मानत नाहीत. बालवाङ्मय आणि किशोरांसाठी लिहिलेली त्यांची बारा पुस्तके आहेत. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचे तीन पुरस्कारही मिळाले आहेत. प्रौढ साक्षरांसाठीही काही पुस्तकं त्यांनी मुद्दाम लिहिली आहेत.

घाट्यांशी माझी ओळख झाली त्याला आता तीस वर्षं होतील. या तीस वर्षात मी त्यांना विविध विषयावर किमान तीस हजार तरी शंका विचारल्या असतील. बहुतेक वेळा त्या विज्ञानासंबंधित असल्या तरी साहित्यावर, इतिहासावर, भूगोलावर आणि भाषेसंबंधीही काही शंका आल्या तर घाट्यांना फोन करायचा हा माझा शिरस्ता असतो. इतकंच काय पण क्रिकेट, जुने चित्रपट, काविता, शुद्धलेखन या बद्दलच्या शंकाही मी त्यांना विचारतो. माझा अनुभव असा आहे की, दहापैकी नऊ वेळा ते माझ्या प्रश्नांची तात्काळ आणि समाधानकारक उत्तरं देतात. एखाद्या वेळेला बघून सांगतो म्हणून सांगतात. आणि तासाभरात स्वत: फोन करून सांगतातही. कधीतरी क्वचित ‘मला माहित नाही’ असंही प्रामाणिकपणे सांगतात. मला हे फार महत्त्वाचं वाटतं. जो माणूस शंभरातली एखादी गोष्ट मला माहीत नाही म्हणून सांगतो त्यानं सांगितलेल्या इतर नव्याण्णव गोष्टी बरोबर असतात. पण जो सगळ्याच गोष्टींवर अधिकारवाणीनं बोलतो त्याच्या शंभरातल्या नव्याण्णव गोष्टी बहुधा चुकीच्या असतात!

घाटे अशी सर्वज्ञतेची झूल कधीच पांघरत नाहीत. हीच त्यांच्या विद्वत्तेची खूण आहे.

..................................................................................................................................................................

लेखक विज्ञानकथाकार आहेत.

subodh.jawadekar@hotmail.com                                             

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

George Threepwood

Wed , 03 May 2017

मित्रवर्य निरंजन घाटे यांच्यावरचा हा लेख वाचून अतिशय आनंद झाला. या गुणी विद्वानाला अनुल्लेखाने मारण्याचे आणि कायम दूर ठेवण्याचे जे पातक आजवर घडले आहे, त्याचे थोडेसे तरी क्षालन या मजकुरामुळे होईल असे मला वाटते. लेखक आणि संपादक हे दोघेही यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. माझी आणि घाट्यांची ओळख तशी खूप जुनी आहे, १९७७-७८ मध्ये ते नागपुरला होते, तेव्हापासूनची. ते नंतर नागपुरातून पुण्याला परत गेले, त्यानंतर बहुधा एखाद-दोन वेळाच आमची पुन्हा प्रत्यक्ष भेट झाली, पण त्यांच्या येथील मुक्कामात त्यांचा जो काय माझा परिचय झाला होता, त्याचे काय वर्णन करावे? खरोखरच ते एक अत्यंत साधे, सरळ, उत्साही व्यक्ती आहेत. हसरे, माझ्यासारख्या वयाने लहान असलेल्या, त्यावेळेच्या नुकत्याच कॉलेजातून बाहेर पडलेल्या तरूण मुलालाही बरोबरीने मित्रासारखे वागवणारे, लाघवी स्वभावाचे, मदतीला सदा तयार असलेले घाटे तेव्हा मला फार भावून गेले होते. आजही त्यांची आठवण मी विसरू शकत नाही. पुढे एकदा केव्हा तरी माझी पत्नी एका परिसंवादासाठी पुण्याला गेली होती, तिथे त्याच कार्यक्रमात तिला ते भेटले. ओळख झाल्यावर त्यांनी लगेच माझे नाव घेतले आणि केवळ त्या एका धाग्यावर तिची एवढी खातिरदारी केली की ती एकदम गदगद होऊन गेली. त्यानंतर मी अनेकदा पुण्याला गेलो, पण माझा मुक्काम दर वेळी एवढा थोडा असतो की मनात असूनही त्यांना भेटणे राहूनच गेले आहे. कधीतरी सवडीने त्यांना भेटून हा अनुशेष भरून काढायचा आहे. आजच्या या लेखाने या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. त्यासाठी तुमची विशेष आभार. << आयुष्यात अनेकांनी त्याला वाईट वागणूक दिली. वरवर मैत्री दाखवून दगा दिला >> असे जे तुम्ही लिहिले आहे, त्याचे एक उदाहरण मला माहीत आहे. कोणाचीही नावे घेणे हे उचित होणार नाही, म्हणून फक्त ओझरता मोघम उल्लेख करतो. पुण्यातून प्रसिद्ध होणारे एक मराठी नियतकालिक आहे. ते सुरू करायचे ठरले तेव्हां त्याच्या संपादकांना घाट्यांचीच आठवण आली, आणि तेही आनंदाने धाऊन गेले. पहिल्या अंकापासून पुढचे अनेक अंक त्यांनी संपादित केले, सजवले. मलासुद्धा त्यांनी खास पत्र पाठवून त्यासाठी लिहिते केले. पण पुढे या नियतकालिकाने मुळे पकडली आणि त्याला स्वतःचे पाय फुटले, तेव्हा दुधातून माशी फेकून द्यावी तेवढ्या सहजतेने त्यांना तेथून दूर करण्यात आले. पण त्यांनी कधी याची वाच्यता केली असेल असे मला वाटत नाही. इतका हा निरपेक्ष माणूस आहे. घाटेजी, तुम्ही आणखी शंभर वर्षे मराठीची अशीच सेवा करावी, हीच सदिच्छा. --- हर्षवर्धन निमखेडकर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......