‘पॉप्युलर बुक हाऊस’ (PBH) बंद करावं लागतंय…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
सुनील-माधव गाडगीळ
  • पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरील, मॉडर्न कॅफे चौकातील ‘पॉप्युलर बुक हाऊस’
  • Fri , 09 March 2018
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो पॉप्युलर बुक हाऊस Popular Book House

‘इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’, ‘अभिनव पुस्तक मंदिर’ ही पुण्यातली फर्ग्युसन रोडवरील पुस्तकांची दुकानं गेल्या काही वर्षांत बंद झाली. गेल्या वर्षी ‘अंतर्नाद’ हे मासिक बंद झालं. आता मॉडर्न कॅफे चौकातील ‘पॉप्युलर बुक हाऊस’ बंद होतंय. हे दुकान बंद करताना त्याचे मालक असलेल्या सुनील-माधव गाडगीळ यांनी प्रसिद्धीसाठी दिलेलं निवेदन जसंच्या तसं...

.............................................................................................................................................

गेली ६४ वर्षं आपल्यासारख्या शेकडो पुस्तक प्रेमींचं, आप्तमित्रांचं, लेखक, प्राचार्य, ग्रंथपाल, हितचिंतक, अनेक मान्यताप्राप्त संस्था, व्यावसायिक बंधू आणि आमचा आजी-माजी स्टाफ यांचं प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही हा व्यवसाय यशस्वीरीत्या चालवू शकलो.

या व्यवसायानं आम्हाला एक ओळख दिली... एक आयडेंटिटी... अनेक मान्यवरांचे पाय आमच्या उंबऱ्याला लागले ते यामुळेच. यात लेखक, खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते, उद्योगपती, गायक, शास्त्रज्ञ, शासकीय व पोलीस अधिकारी असे दिगग्ज होते. त्यातील बऱ्याच जणांशी आमची चांगली मैत्री झाली, जी टिकून आहे. त्यांनी व पुस्तकप्रेमींनी आमचं कायमच कौतुक केलं. देशी-विदेशी वाचक पुण्यात आले की, मुद्दाम आमच्याकडे येऊन जात... तीन-चार पिढ्यांशी आम्ही जोडलो गेलो होतो.

पुस्तकांबरोबरच काळानुरूप आम्ही कायमच वेगवेगळे प्रयोग केले... कॉम्पुटर, मॅनेजमेंट, हिंदी या विषयांची पुस्तकं वाचकांसमोर आणणारं बहुतेक आमचं दुकान पहिलं होतं... सीडी, व्हीसीडी,  डीव्हीडी, ऑडिओ बुक, किंडल, पेन ड्राईव्ह, सारेगामा कारव्हाची विक्री आम्ही ग्राहकांसाठी सुरू केली. 

पुण्यातील पहिलं एसी, तसंच व्यवहारात कॉम्पुटरचा पहिल्यांदाच वापर ही आमची आणखी काही वैशिष्ट्यं.

काही प्रकाशक संस्थांच्या नवीन पुस्तकांचं प्रकाशन आमच्या इथं झालं. अनेक पुस्तक प्रदर्शनांत आमचा सहभाग असायचा. आमचे ‘दिवाळी धमाका सेल’, ‘न्यू इयर सेल’, ‘वन डे सेल’ हेही खूप लोकप्रिय होते. वाचकांसाठी ती पर्वणीच असायची.

पहिलं ऑनलाईन बुक स्टोअर आम्ही सुरू केलं होतं, पण ते काळाच्या फार आधी सुरू केलं असं मागे बघताना आता जाणवतं... त्यात आम्हाला सपशेल अपयश आलं.

जगप्रसिद्ध ‘टाईम’, ‘न्यूजवीक’ या साप्ताहिकांचे आम्ही पुण्यासाठी अनेक वर्षं मुख्य वितरक होतो. दर आठवड्याला शेकडो ‘टाईम’ आणि ‘न्यूजवीक’ आम्ही संपूर्ण पुण्यात वाटायचो... ‘नॅशनल जिओग्राफिक’चं देखील असंच.

सांगण्यास अभिमान वाटतो की, जितकी वर्षं ही वितरणाची व्यवस्था आमच्याकडे होती, त्या सबंध कालावधीत एकदाही खंड पडला नाही.

नवीन तंत्रज्ञान आम्ही कायमच वापरात आणलं. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ई-मेल याचा वापर भरपूर केला. त्याजोगे आम्ही आमच्या ग्राहकांच्या कायमच संपर्कात राहिलो. ‘टीम पीबीएच’ या व्हॉट्सअॅप ग्रुपनं अनेक मित्र दिले. या ग्रुपद्वारे आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवू शकलो. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

व्यवसायात राहूनदेखील आम्ही कधी कोणाशी ‘स्पर्धा’ केली नाही. ग्राहक कायम खूष आणि संतुष्ट कसे राहतील याकडे आम्ही जास्त लक्ष दिलं.

पण ....

परिस्थिती बदलली... आवड बदलली, प्रायोरिटीज बदलल्या आणि एक वेळ अशी आली की, ‘पॉप्युलर बुक हाऊस’ बंद करावं लागणार या कटू सत्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही मनाची तयारी केली…

‘पॉप्युलर बुक हाऊस’ (PBH) लवकरच आपला निरोप घेईल.

चौसष्ट वर्षं... इतका प्रदीर्घ काळ, आमचं या व्यवसायाशी नातं होतं, पुस्तकं हेच आमचं जग होतं... ते तुटणार म्हणून खंत आहे... दुःख आहे...

‘पॉप्युलर बुक हाऊस’ला दिलेल्या प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत...आणि राहू…

त्याच जागेत लवकरच एका नव्या रूपात, नव्या स्वरूपात आपल्या सेवेस येत आहोत. या नव्या ‘व्हेंचर’ला आपला पाठिंबा मिळणार याची खात्री आहेच....

धन्यवाद

आपले

सुनील गाडगीळ - माधव गाडगीळ

.............................................................................................................................................

लेखक सुनील गाडगीळ व माधव गाडगीळ हे पॉप्युलर बुक हाऊसचे मालक आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘इंडिया आउट ऑफ वर्क’ : लेखकद्वय सरकारला प्रश्न विचारणारे आहेत. त्यामुळे अलीकडच्या आपल्या प्रथेनुसार त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल’ असल्याचा शिक्का बसू शकतो

मात्र ते जे प्रश्न उपस्थित करत आहेत, ते टाळून भारताने २०४७मध्ये उच्च उत्पन्न गटात प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण कसे होईल? रोजगार, अर्थव्यवस्था, शिक्षण यांमध्ये उत्पन्न झालेल्या या संकटाला लेखकद्वय ‘ट्रिपल ई क्रायसिस’ असे संबोधतात. प्रस्तुत पुस्तकाचा प्रमुख उद्देश भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाची गणना उच्च मनुष्यबळ विकसित असलेल्या देशांमध्ये व्हावी हा आहे........

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......