म्हणे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. अरे ह्या!
ग्रंथनामा - झलक
राजन खान
  • ‘आता तू मोठा हो’ या कादंबरीचं मुखपृष्ठ आणि राजन खान
  • Fri , 17 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक आता तू मोठा हो Ata tu Motha Ho राजन खान Rajan Khan

हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मांच्या पोटात शिरून नात्यांचं आणि कर्मकांडांचं वर्णन स्वत:ला ‘माणूस’ या जातीचा मानणाऱ्या निरागस मुलाच्या नजरेतून करणारी प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन खान यांची ‘आता तू मोठा हो’ ही नवी कादंबरी अलीकडेच प्रकाशित झाली आहे. सदामंगल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेल्या या कादंबरीतला संपादित अंश…

.............................................................................................................................................

ज्या दिवशी गणपतीची चतुर्थी होती, अगदी त्याच दिवशी नेमकी ईद पण होती. मला तर खल्लास वैताग आला होता. दोघींना वेगवेगळ्या दिवशी यायला काय धाड भरली होती?

मांला आवडत नाही, मी गणपतीची चतुर्थी आणि रमजानची ईद म्हटलेलं. ती म्हणते, गणेश चतुर्थी म्हणावं, रमजान ईद म्हणावं. मी विचारतो, गणेश आणि गणपतीत फरक काय? तर तिला तो सांगता येत नाही. रमजानची ईद आणि रमजान ईद यात फरक काय? तर तेही तिला सांगता येत नाही. हळूच म्हणते, आम्हाला तशी लहाणपणापासून सवय लागलीय ना म्हणायची, म्हणून म्हणते. मी विचारतो, मग तुमच्या सवयी मी का घ्याव्यात? तर म्हणते, बिघडायला लागलायंस तू. गप्प रहा.

बाबाला विचारलं, गणेश आणि गणपतीत फरक काय? तर तो म्हणतो, दोन्ही एकच रे. तुला जे म्हणावंसं वाटेल ते म्हण. दोन्ही शब्दात काही तरी जातीय फरक असावा. असे बरेच शब्द आहेत आपल्या भाषेत किंवा अक्षरंसुद्धा आहेत, ज्यांनी जाती ओळखू येतात. एकच भाषा लेकाच्यांनी जातीजातीत वाटून टाकलीय. पण तू आताच डोक्याला तकतक करून घेऊन नको. मोठा झाल्यावर कळेल तुला ते…

बाबाकी ये हमेशाकी आदत है, त्याच्या चिडीचे किंवा माझ्यासमोर टाळण्याचे काही मुद्दे आले की, तुला ते मोठा झाल्यावर कळेल. त्याच्या लक्षातच येत नाही किंवा तो लक्षच देत नाही, मी मोठा झालोय म्हणून. घसघशीत अशी दहावीची परीक्षा देऊन अकरावीत गेलोय मी. मिशीची कवळी रेघही दिसू लागलीय हळूहळू ओठावर. चड्डीबी कवा कवा ओली ज्याते झ्योपेमंदी. पण तरीबी बाबा अभीभी आपल्याला बच्चा समजतो. अजून पण सोन्या, शोण्या, शोनुल्या, शोणुल्या, बबड्या अशा हाका मारतो…

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पण सच्ची बोलू क्या? आपुणला पण ज्याम आवडतं, त्याचं तशा हाका मारणं. भन्नाट गोड वाटतं. बाबाची माया जाणवते. कधी कधी वर्गातल्या किंवा घराशेजारच्या मित्रमैत्रिणी किंवा मां-बाबाच्या ओळखीचे कुणी लोक घरी येतात, तेव्हा बाबा त्यांच्यासमोरही तशाच हाकांनी बोलतो मला. तर ते गेल्यावर मां त्याला झापते, लोकांसमोर एवढ्या घोडम्या पोराला तू अशा लाडिक हाका कशाला मारतोस? तर बाबा तिच्यावर उखडतो, तू शिकवणार का अक्कल मला? पोरगं माझंय. मी काहीही म्हणीन… बाहेरचे मित्रमैत्रिणीही हसतात मला. अजून तुझा बाबा तुला कुक्कुलं बाळ समजतो का विचारतात. पण त्या येडचापांचं आपल्याला काही वाटत नाही. बावळट भिंगारे.

खरं तर बाबा बोलतो खूप. त्याला बडबडायला आवडतं. सगळे विषय खुलून बोलतो. जगभरच्या गोष्टी सांगत राहतो. पण काही विषय तो मध्येच अचानक आवरतो, आणि माझ्या मोठं होण्यावर ढकलतो. जादा करून देव, जाती, धर्माचे विषय. ते मात्र त्याचं आपल्याला आवडत नाही. आणि आपण म्हणालो ना, बाबा, तुझं मला हे आवडलं नाही, तर त्यावर काय भारी हसतो बाबा, आणि एकदम जवळ घेता मऊसूत, मिठीत. कुरवाळतो. झकास वाटतं. खल्लास.

कधी कधी तर मी पण नाटक करतो, त्यानं तसं भारी हसून मिठीत घ्यावं म्हणून. त्याची एखादी चांगली गोष्ट पण आवडली नाही असं बळंच सांगतो. पण बाबा हुशार आदमीय पक्का. फसत नाही. मुद्दाम जवळ घेत नाही. मग मलाच राहवत नाही यार. मीच त्याच्या बगलेत शिरतो न सांगतो, डोक्यात हात फिरव माझ्या… तर बाबा घट्ट कवेत घेत म्हणतो, कार्ट्या, मी कायम तुझ्याच मालकीचा आहे. ही कूस तुझीच आणि तुझ्यासाठीच आहे. तिच्यात येण्यासाठी नाटक कशाला? कितीही मोठा झालास तरी या कुशीत तुला मुक्त प्रवेश आहे… त्यावर मां म्हणते, तुझ्यासारखाच नाटक्या झालाय तो. त्यावर बाबा तिला म्हणतो, की तुझ्यासारखा? त्यावर मां गप्प राहते. मी सांगून टाकतो, तुम्हा दोघांसारखा.

तर मी सांगत होतो, गणपती आणि रमजान ईद नेमक्या एकाच दिवशी आल्याचं. असं कधी होत नाही न माझा तरी अनुभव नाही, दोन्ही एका दिवशी येण्याचा. पण या वर्षी ते दोन्ही एकाच दिवशी आले होते न माझी तर ज्याम म्हंजे ज्यामच भानगड होऊन बसली होती. सवाल ये खडा हुवा था की त्या दिवशी नेमकं जायचं कुणाकडं? आज्जीकडं की नानीकडं? आज्जीकडं गणपती न नानीकडं ईद. दोन्हीकडं जबर मज्जा. पण एकीकडं जावं तर दुसरीकडची मजा हुकणार. आणि आपली तर त्याचीच तयारी नाही. मला तर दोन्हीकडची मजा पाहिजे. आज्जीबी पायजे न नानीबी पायजे. दोन्हीकडं भारीच असतं भौ सगळं. गणपती पण भारी न ईद पण भारी. हे हिंदू न मुसलमान लोक गणपती न ईदची ऐश करून टाकतात पार.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मला ऐकलेली श्रीकृष्णाची एक गोष्ट आठवत होती. तो म्हणे एकाच वेळी दोन दोन ठिकाणी हजर राहू शकायचा. इधरबी हौर उधरबी. भारी ना? तसं कृष्णासारखं आपल्याला जमायला पाहिजे होतं. तशी जादू यायला पाहिजे होती. म्हणजे आपण एकच, पण एकाच वेळी ईदची धम्माल करतोय इकडं आणि तिकडं गणपतीचीसुद्धा. आज्जी पण खुश आणि नानी पण खुश. आपण तर दुप्पट खुश. इकडं शिरखुर्म्याचा चमचा तोंडात आणि तिकडं मोदकाचा घास. इकडं आपण नमाजसाठी डोकं टेकवतोय जमिनीवर आणि तिकडं टाळ्या वाजवत गणपतीची आरती म्हणतोय. इकडं आपण गंभीर आवाजात सर्वांबरोबर मिलाद म्हणत रस्त्यावरून चाललोय नमाजसाठी ईदगाहवर आणि तिकडं आपण सर्वांबरोबर कल्ला करत रस्त्यावर गणपतीच्या मिरवणुकीत नाचतोय दे धम्माल…व्वा! अरे व्वा व्वा व्वा! कितना मजा, किती मज्जा! दोन्हीकडं बराबर मामला. आज्जीला वाटतंय, नातू आपल्याकडंय आणि नानीला वाटतंय, पोता आपल्याकडंय.

पण खऱ्यात हे कसं जमणार राव?आपण एकच आणि एका वेळी एकाच ठिकाणी जायला जमणार आपल्याला. आपण लेकाचे काही गोष्टीतले देव नाही, एकाच वेळी दोन ठिकाणी जायचं जमायला. मला वाटलं, बाबाला विचारावं, देव व्हायला काय करावं लागतं म्हणून? किंवा देवाला येणारी जादू शिकायची कुठं शाळाय का म्हणून? पण देवबिव म्हटलं की, किंवा चमत्कार-बिमत्कार म्हटलं की, त्याचं माथं सणकतं न तो भाषण ठोकत सुटतो, हे माहितीय आपल्याला, म्हणल्यावर सुमडीत गप राहिलो. खाजवून अवधान आणा कशाला? ही मांची म्हण… पण दोन्हीकडं एकाच वेळी जायचं कसं या प्रश्नानं जीव तगमगत राहिला

शाळेत कळलं मला पयल्यांदा, या वर्षी गणपती न रमजान ईद एकाच दिवशी येणार म्हणून. मग मास्तरांसह पोरांमध्ये सगळ्या शाळाभर चुकचुक. अरेरे, अगंगं, ह्या ह्या आणि छ्या छ्या! का? तर वर्षातली एक हक्काची सुट्टी वाया जाणार. त्यातल्या कित्येक लोकांना गणपतीचं घेणं नाही न कित्येक लोकांना ईदचं देणं नाही. पण सण कुणाचा का असेना, सुट्ट्या तर सर्वांनाच मिळतात. तेवढंच काम बंद, शाळा बंद. पण तीच आपली जास्तीची सुट्टी बुडणार याचं प्रत्येकाला हळहळतं दु:ख. प्रत्येकाचं म्हणणं, सण कधी नेहमीच्या सुट्ट्यांच्या दिवशी येऊ नयेत, नेमके कामाच्या दिवशीच यावेत आणि कोणतेही सण नेमके एकाच दिवशी येऊ नयेत. कामसू माणसांचं त्यानं फार नुकसान होतं. बिचाऱ्याची विश्रांती बुडते.

माझ्या पण आधी ध्यानातच आलं नाही, काय घोळ झालाय तो. बादमे दिवा लागला डोक्यात आणि मग उलघाल सुरू झाली. शालेतल्या बाकीच्या पोरांपेक्षा न मास्तरांपेक्षा अपणा दुखना अलगच था. मला रमजान ईद पण हवी होती न गणपती पण हवा होता. माझं दोघांशीही घेणंदेणं होतंच. मला ईद पण साजरी करायची होती न गणपती पण मनवायचा होता. पण दोन्ही एकाच दिवशी आल्यानं समदा घोळ झाला होता. मला नानीकडं पण जायचं होतं न आज्जीकडं पण जायचं होतं. त्या दिवशी आज्जीकडं जावं तर नानीकडची ईद बुडणार आणि नानीकडं जावं तर आज्जीकडचा गणपती बुडणार. विसर्जनाच्या आधीच बुडणार! अरेरे! ह्या ह्या! छ्या छ्या!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मला तर आधी मालूमच न्हौतं, गणपती न ईदमध्ये असा गोयंदा होतो म्हणून. खरं तर चारपाचच वर्षं झाली, मला ही ईद आणि गणपतीची गंमत कळायला लागली. त्याच्या पैले आपला पण संबंध नव्हताच, या दोन्ही गोष्टींशी. म्हणजे मला थोडं थोडं कळू लागलं होतं, हिंदू लोक गणपती बसवतात आणि मुसलमान लोक रमजान ईद मनवतात म्हणून. पण तोवर कधीही मी या दोन्हीतही भाग घेतला नव्हता. आणि आमच्या – म्हणजे मी, मां आणि बाबाच्या घरात असं काही होतच नव्हतं. ना कोणता धर्म, ना कोणते सणवार. आणि शाळेला तर जवळजवळ  सर्वच धर्मांच्या ठळक ठळक सणावारांच्या सुट्ट्या मिळतात, तर मी त्या सुट्ट्या खात होतो, दर वर्षी इमानदारीत, पण या सुट्ट्या आपल्याला धर्मांच्या कृपेनं मिळतायंत याच्याशी मला घेणंदेणंच नव्हतं. म्हणजे बघा, पतेतीची सुट्टी मिळणार पारशांची किंवा नाताळची सुट्टी मिळणार ख्रिश्चनांची. पण आपला या दोन्ही धर्मांशी काय संबंध? आणि मी तर अजून पारशी नेमके कोण आणि ख्रिश्चन नेमके कोण, हेसुद्धा पाहिलेलं नाही. वर पतेती म्हणजे काय न नाताळ म्हणजे काय, हेसुद्धा मला नेमकं माहीत नाही. तरीही आम्हाला सुट्ट्या मिळणारच त्यांच्या धर्मांच्या. आपण आपल्या नेकीनं भोगायच्या. सुट्ट्या आहेत ना, तर तेवढंच घरी राहायला मिळेल आणि भरपूर खेळायला मिळेल, एवढाच आपला भारी आनंद. तेच बौद्ध, जैन, शीख यांच्या सुट्ट्यांचंही.

आणि नेमकं तेच हिंदू आणि मुसलमानांच्या सणांबद्दल किंवा त्यांच्या सुट्ट्यांबद्दलही व्हायचं माझं. दोन्हींचंही आपल्याला घेणंदेणं नाही. म्हणजे मी हे अगदी सहावीसातवीत असेपर्यंत. पत्ताच नव्हता मला, हिंदूंचे सण असतात, मुसलमानांचे सण असतात, त्यांचे सण त्यांना साजरे करता यावेत म्हणून, त्यांच्या धर्मांच्या नसलेल्या लोकांनाही सुट्ट्या मिळतात आणि मी, मां, बाबा तर कोणत्याच धर्माचे नाही. आणि तरीही आम्ही सर्व धर्मांच्या फुकटच्या सर्व सुट्ट्या खात राहणार.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आणि बाबाची एक गंमत सांगायची म्हणजे, तो कोणत्याही धर्माची सुट्टी असो, प्रत्येक सुट्टीच्या दिवशी घरात तणतणत  राहायचा की, लेकाच्या या धर्मांच्या सुट्ट्या कायमच्या बंदच केल्या पाहिजेत या देशातून. देशाच्या नावाच्या जेवढ्या सुट्ट्या आहेत दोनचार तेवढ्या ठेवल्या पाहिजेत. बाकी बंद. किंवा त्या त्या धर्मांच्या सुट्ट्या फक्त त्या त्या धर्मांच्या लोकांनाच दिल्या पाहिजेत. बाकीच्यांचा संबंध नाही. पण हिंदूंचे खूपच लाड होतात सुट्ट्यांच्या बाबतीत. त्यांच्या सणांच्या सर्वांत जास्त सुट्ट्या असतात वर्षभर. एक तर देशातल्या प्रत्येक धर्माला वर्षातून फक्त एकच सुट्टी दिली पाहिजे किंवा धर्मांना समान न्याय म्हणून सर्वच धर्मांच्या वर्षात येणाऱ्या सर्वच्या सर्व सणांच्या सुट्ट्या दिल्या पाहिजे आख्ख्या देशाला. म्हणजे मग आख्खा देश वर्षभर आरामात सुट्टीवर राहील. म्हणे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. अरे ह्या!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4267

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Heena khan

Fri , 17 November 2017

pustak wachaychi utsukta wadhali


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......