अजित पवार… एक भंगलेलं स्वप्न...
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • अजित पवार
  • Mon , 02 February 2026
  • संकीर्ण श्रद्धांजली अजित पवार Ajit Pawar शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस NCP

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नव्हते का, ते भाजपमध्ये गेलेच का, त्यांनी शरद पवार यांच्याशी पुन्हा का जुळवून घेतलं... असे अनेक प्रश्न माध्यमांत चर्चिले जात आहेत. अजित पवार यांचा मी काही प्रवक्ता नाही तरी सांगतो, राजकारण हे एक दुष्टचक्र आहे… त्यात एकदा अडकलेली मान सोडवून घेता येत नाही...

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

बुधवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी अजित पवार यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूची बातमी आली. गुरुवारी सकाळी त्यांचं पार्थिव पंचत्वात विलीन झालं. हा २४ तासांचा काळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरांत हळहळ व्यक्त करणारा होता. खरं तर ते काही महाराष्ट्रातल्या एकजात सर्वांचे नेते किंवा आप्तस्वकीय नव्हते, तरी प्रत्येक घरांत त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त झाला. अतिशयोक्ती नव्हे, पण माझ्या मेव्हण्याचा सात वर्षांचा नातू, वरद हाही शाळेला सुटी मिळाल्यावर घरी आला आणि ‘फार वाईट झालं’, असं म्हणत होता, यातच सारं काही आलं...

अजित पवार यांची माझी पहिली भेट १९९१मध्ये झाली. तेव्हा ते लोकसभा सदस्य होते. नंतर लगेच ते ही जागा तत्कालीन संरक्षणमंत्री झालेल्या त्यांच्या काकांसाठी म्हणजेच शरद पवार यांच्यासाठी रिक्त करून महाराष्ट्रात परतले आणि विधानपरिषद सदस्य झाले. सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. तेव्हा ते महाराष्ट्रात परतले नसते आणि दिल्लीतच राहिले असते, तर कदाचित महाराष्ट्रातल्या आजच्या राजकारणाचा रंग आणि बाज पूर्णपणे वेगळा राहिला असता, पण ते घडायचं नव्हतं.

अजित पवार महाराष्ट्रात परतले आणि तिथपासून हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची नाममुद्रा इतकी ठसठशीतपणे उमटत गेली की, मावळत्या आठवड्यात त्यांच्या झालेल्या मृत्यूनं महाराष्ट्रातल्या काही घरांमध्ये अनेकांचे डोळे ओलावले, काही घरांत आप्तस्वकीय गेल्यासारखा शोक व्यक्त झाला.

त्यांच्या अपघाती निधनानंतर दुःखाचा उसळलेला महासागर बघून त्यांच्या आईची आठवण झाली. मातृत्वाची छाया नेहमीच विशाल, उबदार आणि गडद असते. अगणितांचा अनावर झालेला शोक बघताना मनात विचार आला, त्यांच्या मातेचा शोक किती गडद आणि अथांग असेल? अगणित कार्यकर्ते, हितचिंतक, चाहते या सर्वांचं दुःख एकीकडे आणि साक्षात पुत्र गमावलेल्या आईचं पाषाणशीळ अव्यक्त  दु:ख... कुणाच्याही आवाक्यात न येणारं...

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

माझा दै. ‘लोकसत्ता’तील सहकारी पत्रकार धनंजय कर्णिकनं अजित पवारांशी पहिली ओळख ते खासदार म्हणून विजयी झाले, त्यानंतर करून दिली, पण तेव्हा ती फार काही पुढे सरकली नाही. आमच्या पहिल्याच भेटीत लक्षात आलेली बाब म्हणजे, त्यांचे डोळे भेदक आहेत. समोरच्याच्या नजरेला नजर भिडवून बोलण्याची त्यांची सवय आहे, जणू ते समोरच्या माणसाच्या मनाचा ठाव घेत असावेत. शिडशिडीत आणि तरतरीत शरीरयष्टी, भालप्रदेश जरा विस्तीर्ण, वर्ण सावळा, डोईवर भरपूर आणि काहीसे कुरळे केस, पेहराव स्वच्छ आणि समोरचं कामाचं टेबल एकदम नीटनेटकं. बोलणं थेट आणि अतिशय स्पष्ट. शिवाय समोरच्याला पटेल किंवा नाही, याबद्दल चेहऱ्यावर बेफिकरी असलेला हा माणूस पहिल्याच भेटीत आवडला.

ते महाराष्ट्रात परतल्यावर मात्र आमच्यातली ओळख मैत्रीत रूपांतरित झाली. मित्रपरिवारात हळूहळू ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होत होते, तो हा काळ होता. त्यांच्या काम करण्याच्या शैलीचा आणि स्पष्टवक्तेपणाचा बोलबाला व्हायला सुरुवात झालेली होती, तेव्हापासूनच म्हणजे १९९५-९६पासून त्यांच्याशी सलगी वाढत गेली.

तेव्हाचा एक प्रसंग सांगतो. मंत्रालय विधिमंडळ वृत्तसंकलनाच्या त्या काळात धनंजय कर्णिक, धनंजय गोडबोले, प्रताप आसबे आणि मी असा एक कथित ‘गोट’ होता. राज्यात भाजप-सेना युतीचं सरकार होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते मधुकरराव पिचड होते. त्या तुलनेनं अजित पवार, आर. आर. पाटील, दिग्विजय खानविलकर, दिलीप सोपल, दिलीप वळसे पाटील ही तरुण मंडळी सभागृहात सतत चुळबूळ करत असत. सरकारच्या अनेक चुकांवर बोचकारे ओढत असत.

ही मंडळी तेव्हा ज्या पद्धतीनं सरकारच्या विरोधात संसदीय पद्धतीनं सक्रीय होती, त्यामुळे सरकार पक्षाला कायम त्रास सहन करावा लागत असे! मला आता नेमका आठवत नाही, धनंजय कर्णिक की प्रताप आसबेने हे टोळकं सभागृहाच्या ज्या भागात बसत असे, त्याला ‘अशांत टापू’ असं नाव दिलेलं होतं. हे नाव तेव्हा खूपच प्रचलित झालं होतं.

त्या काळातली ही घटना आहे. एकदा कुठल्या तरी विषयावर गप्पा सुरू असताना मी अजित पवार यांना ‘अहो दादा त्याचं असं आहे...’, असं म्हटल्याबरोबर अजित पवार यांनी उजवा हात वर करून मला थांबवलं आणि ते म्हणाले, ‘मला तुम्ही पत्रकार तरी दादा म्हणू नका. तुम्ही सगळे पत्रकार आम्हाला वयानं आणि अनुभवांनी ज्येष्ठ आहात. शिवाय, आमच्या नेत्यांशी तुमचा थेट कॉन्टॅक्ट (हा टोमणा!) आहे’, तेव्हापासून मी त्यांचा उल्लेख नावाने करू लागलो.

त्या काळात माझ्याकडं भाजप बीट होतं, तरी धनंजय कर्णिक आणि ‘गोटा’मुळे अजित पवार यांच्याशी संपर्क येत गेला. मी नागपूरला होतो. मुंबईत नियमित येणं-जाणं होतं. त्यामुळे मुंबई आणि नागपूर अशा दोन्ही ठिकाणी अजित पवार यांच्या भेटी होत. मी पत्रकार होतो, पण त्याचा कोणताही परिणाम न होता ते रोखठोक बोलत आणि वागत. मी ‘इकडच्या गोष्टी तिकडे करत नाही’ आणि भोचकपणा करत नाही, त्याच्या बातम्याही करत नाही, हे लक्षात आल्यावर, माझ्यासमोर त्यांच्यातला रोखठोकपणा आणखीनच करारी होत गेला. त्यांचं सर्वस्व असलेल्या काकांचं वागणं वेगळं; पूर्णपणे विरुद्ध. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज साधारणपणे येत नाहीच. तोंडात खडीसाखर डोक्यावर बर्फ आणि चेहरा निर्विकार ठेवत सलगीचं मृदू बोलणं, ही त्यांची खासीयत, तर अजित पवार याबाबतीत टोकाचे विरुद्ध. बारामतीचं हे ‘पाणी’ काही वेगळंच असल्याचं हळूहळू लक्षात येत गेलं. 

राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री आणि नंतर कितीही नाही म्हटलं, तरी शरद पवार यांच्यासारख्या कणखर गडाला टक्कर देणारा अजित पवार हा नेता आहे, हे महाराष्ट्राच्या हळूहळू लक्षात येत गेलं. नेतृत्व राज्यभर प्रस्थापित व्हावं यासाठी अखंड श्रम, जनतेत पाळंमुळं रुजावीत यासाठी भटकंती, अशी त्यांची राजकीय साधना होती. ते कधी मरगळलेले, चुरगाळलेले बघायला मिळाले नाहीत. उत्साह, तडफ आणि जिद्द यांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्या काळात उक्तीच्या बाबतीत ते बरेच वादग्रस्तही ठरले, पण जर बोलताना चूक झाली असेल, तर ती मान्य करण्याचा दुर्मीळ असणारा‌ उमदेपणा या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेला असल्याचं लक्षात आलं.

आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र यात एक दुरावा आहे, हे अजित पवार यांच्या लक्षात आलेलं होतं. शहरी भागात असणारी कथित तारांकित संस्कृती, चालीरीती आणि वागण्या-बोलण्यातली कचकडी कृत्रिमता यात त्यांचं मन कधीच रंगलं नाही. शहरी भागात आपल्याला फारसा ‘टीआरपी’ मिळणार नाही, हे त्यांनी जाणलं होतं.

स्वत:च्या रांगड्या बोलण्या-वागण्याला आणि त्यातून नेतृत्व प्रस्थापित व्हायला मुंबईबाहेरच वाव आहे, हे ते चांगलं जाणून होते, म्हणून काम संपलं की, मुंबई सोडण्याची त्यांना घाई असे. फार वाच्यता न करता सांगतो, उच्चभ्रू मलबार हिलवर एक खासगी कार्यक्रम होता. कार्यक्रम छोटा म्हणजे एक खोलीचं उद्घाटन होतं. उपस्थिती जेमतेम सात-आठ लोकांची. सगळे एकमेकांचे चांगले मित्र होते. खाक्यानुसार  अजित पवार वेळेवर आले, पण रमले नाहीत. वीस-पंचवीस मिनिटांतच ‘मन नाही रमत इथं, त्यापेक्षा कामं उरकून टाकतो’, असं म्हणून त्यांनी तिथून मुक्काम हलवला!

 

मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा अजित पवार यांनी कधीच लपवून ठेवली नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं संयुक्त सरकार येण्याआधीच त्यांनी त्यांचं स्थान शरद पवार यांच्या खालोखाल आहे, हे स्पष्ट करून टाकलेलं होतं. राष्ट्रवादीची  स्थापना झाल्यावर ते स्थान त्यांनी पहिल्या बारा-पंधरा वर्षांत चांगलं बळकट केलेलं होतं. (हे शरद पवारांच्या लक्षात कसं आलं नाही, हे एक कोडंच आहे!) १९९९ ते साधारण २०१२पर्यंत अजित पवार महाराष्ट्रात फिरफिर फिरले. शरद पवार यांना भविष्यात का असेना आपल्याला टक्कर द्यावी लागणार आहे, याचा अंदाज त्यांना आलेला होता.

म्हणूनच गावोगाव तळागाळात फिरताना त्यांनी कार्यकर्त्यांची त्यांची एक वेगळी टीम तयार केली. २००४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादीचा दावा होता, पण शरद पवारांनी तसा दावाच केला नाही. साहजिकच मुख्यमंत्रीपद हुकलं, म्हणून अजित पवार नाराज झाले. खाजगीत का असेना, ही नाराजी बोलून दाखवण्याचा बेधडकपणा ते विसरले नाहीत. शरद पवार सातत्यानं आपले पंख कापतात, ही खंत त्यांनी पेटती ठेवली. एक ना एक दिवस शरद पवार नावाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा त्यांचा मनसुबा २००४च्या विधानसभा निवडणुकीनंतरच रोवला गेला, असं म्हणण्यास खूप वाव आहे. 

पुलाखालून बरच पाणी गेलं. २०१४मध्ये देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार राज्यात सत्तारूढ झालं. देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार यांची ‘दोस्ती’ रुजण्याचा तो काळ होता. फलस्वरूप २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र यांचा मुख्यमंत्री आणि अजित उपमुख्यमंत्री म्हणून सकाळी शपथविधी झाला. ‘पहाटेचा शपथविधी’ म्हणून ती बंडखोरी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी ठरली. मात्र ‘तयारी’ बऱ्यापैकी अपुरी ठरली हे अजित यांच्या लक्षात आल्यावर बंडखोरीचा तो बॉम्ब फुसका ठरला.

दोनच दिवसांत अजित पवार राष्ट्रवादीत परतले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त सरकारात पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. तरी त्यांच्याविषयी पक्षात कायमच संशयाचं वातावरण राहिलं, कारण त्यांची आणि फडणवीस यांची वाढलेली घसट. शिवाय, राष्ट्रवादीतही भाजपबरोबर जाण्याचा सूर पक्का होऊ लागलेला होता. हा सूर आळवणाऱ्यांची संख्या वाढल्यावर अजित यांनी शरद पवार यांना (ठरवून) दिलेला दुसरा धक्का लोकांनी फारसा लक्षात घेतला नाही.

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात शरद पवार यांनी जेव्हा अचानकपणे (?) निवृत्तीची घोषणा केली, तेव्हा पक्षाला धक्काच बसला. त्यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी विनवणी करण्याची मग अहमहमिका सुरू झाली. त्याला अपवाद एकट्या अजित यांचा होता. ‘‘साहेबांना निवृत्त व्हायचं असेल, तर तसा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नक्कीच आहे. तो अधिकार त्यांनी वापरायला कोणती हरकत नाही.’’ असा अतिशय थेट, बेधडक आणि जाहीर पवित्रा त्यांनी घेतला.

शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये ‘ऑल वेल’ नाही, तर बरंच काही बिनसलेलं आहे, हे त्यातून स्पष्ट झालं. त्यातच पक्षातूनही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढलेली होती. तो क्षण बंडखोरी करण्यासाठी योग्य होता, पण त्यांनी ते टाळलं आणि पक्षावरची पकड आणखी बळकट केली.

 

या दरम्यान भाजप-शिवसेनेत बऱ्याच घडामोडी घडत होत्या. फडणवीस एकाच वेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी शिवसेनेत असणारी नाराजी संघटित करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुढे करून फडणवीस यांनी मोर्चेबांधणी केली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे होते आणि राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांच्याकडं गृहखातं होतं, पण या दोघांनाही कोणताच सुगावा लागू न देता शिवसेनेत फूट पाडण्यात फडणवीस यशस्वी झाले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्याला विधानसभेतल्या बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दिला आणि ‘सुरतमार्गे गुवाहाटी’ला शिवसेनेचे बंडखोर रवाना झाले. 

एकनाथ शिंदे गुवाहाटीहून परतले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं लागलं. तो अपमान जिव्हारी लागणारा होता, पण फडणवीस यांनी तो गिळला आणि त्यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावला. अजित फुटले, नुसतेच फुटले नाहीत, तर राष्ट्रवादीचे बहुसंख्य सदस्य घेऊन फुटले. इतकंच नाही, तर पुढच्या २०२४च्या निवडणुकीत पवारांच्या गटापेक्षा अजित यांच्या राष्ट्रवादीच्या गटाला महाराष्ट्रात जास्त जागा मिळाल्या. पवारांना विधानसभा सदस्यांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गेली पाच-सहा दशकं महाराष्ट्रावर असलेला पवारांचा एकछत्री अंमल त्यांनी झटक्यात संपुष्टात आणला. त्यानंतर पवारांच्या गटानं गटानं महाराष्ट्राच्या राजकारणात बाळसं पकडलंच नाही, उलट अजित यांच्यासमोर पवारांना नमतं घ्यावं लागलं, असं चित्र महाराष्ट्रासमोर आलं.

दुसऱ्याच्या रेषेपेक्षा आपली रेषा मोठी करण्यासाठी नवी रेषा आखण्याची अजित यांची चाल यशस्वी ठरली. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हे चित्र पूर्णपणे बदलेलं आहे. त्यांचा राष्ट्रवादी पक्ष निराधार झालेला आहे. ‘बॅक टू स्क्वेअर वन’ या म्हणीप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादींची सूत्रं पुन्हा एकदा शरद पवारांच्या हाती गेलेली आहेत.

दिल्लीच्या राजकारणात सुरू असलेल्या चर्चा मी अनेकदा जयदेव डोळेला सांगत असतो. राज्याचा अर्थसंकल्प स्थिरस्थावर झाल्यावर मार्चनंतर फडणवीस दिल्लीत जातील आणि राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होईल आणि अजित मुख्यमंत्री होतील, अशी ती चर्चा होती. दिल्लीतली कोणतीही चर्चा लगेच अमलात येत नाही, ती चर्चा ‘मॅच्युअर्ड’ व्हायला काही महिने, काही वर्षंही लागू शकतात. दिल्लीतली चर्चा खरी ठरण्याच्या आतच अजित काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच मोठी उलाढाल अपेक्षित आहे. (दुसरी चर्चा ज्ञानपीठ पुन्हा एकदा महाराष्ट्राकडं येणार अशी आहे, असो!)

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

अजित मैत्रीला जागणारे होते. ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा मी नागपूरला होतो. एक दिवस विनायक मेटे याचा फोन आला. (वयानं धाकटा असलेला विनायक आमच्या बीडचा, म्हणून मैत्री जरा घट्ट!) तो म्हणाला, ‘‘दादा बोलणार आहेत.’’  नमस्कार चमत्कार, अभिनंदन झाल्यावर अजित म्हणाले, ‘‘भेटूया.’’ मी म्हटलं, ‘‘पहाटे पाचनंतर केव्हाही सांगा.” ‘‘येतो की उद्या पहाटे साडेपाचपर्यंत, विनायकला घेऊन.’’ अजित पवार म्हणाले. मी म्हणालो, ‘‘तुमच्या सगळ्या ताफ्याची आणि वसंतनगरची झोपमोड कशाला, मीच येतो.’’ दुसर्‍या दिवशी पहाटे साडेपाचला विनायक आणि मी पोहोचलो, तर डायनिंग टेबलवर अजित आमची वाट पाहत होते.

आमच्या गप्पांमध्ये नागपूरच्या तीन-चार नामवंत साहित्यिकांना भेटण्याची योजना ठरली. माझ्याकडून त्यांचा सहाय्यक त्या साहित्यिकांचे फोन नंबर टिपून घेता होता, तर अजित म्हणाले, ‘‘अरं येड्या, बरोबर लिहून घे आणि फोनवर नीट बोल, बडी माणसं आहेत ती सारी...’’ 

 

अशीच आणखी एक भेट. माझ्या हृदयावर अन्जिओप्लास्टी झाल्यानंतरचे ते दिवस होते. विनायक मेटे म्हणाला, ‘‘भेटायला येतो.’’ थोड्या वेळानं वाहन थांबल्याचा आवाज आला, म्हणून बाहेर आलो. पाहतो तर  विनायक मेटे घराचं गेट उघडण्याची खटपट करत होता आणि मागे अजित उभे होते! पटकन पुढे होऊन मी गेट उघडलं आणि म्हटलं, ‘‘ना कोई चिठ्ठी, ना कोई संदेश, ना पोलीस बंदोबस्त...’’ माझं बोलणं तोडत ते म्हणाले, ‘‘दोस्तीत कशाला पाहिजे चिठ्ठी अन्‌ संदेश? आठवण आली म्हणून भेटायला आलो!’’ गप्पा, चहापान झालं. निघालेल्या अजितना मी म्हणालो, ‘‘मुख्यमंत्री झाल्यावर असेच अवचित या...’’ अजित पवार खळाळून निर्मळ हसत म्हणाले, ‘‘तुम्ही आधी बरे व्हा. मुखमंत्रिपदाचं नंतर बघू.’’ आणि ते कारमध्ये बसून निघून गेले.… आता तर ते जगण्यातल्या शेवटच्या प्रवासालाही निघून गेले आहेत. एक स्वप्न अकाली भंगलं आहे...

 

अजित पवार सत्तेशिवाय राहू शकत नव्हते का, ते भाजपमध्ये गेलेच का, त्यांनी शरद पवार यांच्याशी पुन्हा का जुळवून घेतलं... असे अनेक प्रश्न माध्यमांत चर्चिले जात आहेत. अजित पवार यांचा मी काही प्रवक्ता नाही तरी सांगतो, राजकारण हे एक दुष्टचक्र आहे… त्यात एकदा अडकलेली मान सोडवून घेता येत नाही...

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......