अजूनकाही
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
धनंजय चिंचोलीकर उपाख्य बब्रुवान रुद्रकंठावारच्या मृत्यूच्या बातमीनं सुन्नच झालो. त्याची कारणं तीन. एक म्हणजे आजारातून सावरतोय हे दिसत असताना तो अचानक गेला. दुसरं म्हणजे तो वयानं एका तपानं लहान, म्हणजे खरं तर मरायचं वय माझं होतं. तिसरं म्हणजे त्याच्या लेखनाचा मी भक्त होतो, पण हे तितकंसं खरं नाही. धनंजयसारखं आपल्याला लिहिता येत नाही, म्हणून माझ्या मनात उत्सुक असूया होती आणि माझ्याबद्दल सहज जाणवणारा जास्त लोभ त्याच्यात होता.
धनंजय चिंचोलीकर उपाख्य बब्रुवान रुद्रकंठावार यातल्या कुणावर मी जास्त फिदा आहे, हे सांगता येणं कठीण आहे. हे पारडं सतत खालीवर झुकत असायचं. दोन नावांनी (Nom De Plume) लिहिणाऱ्या या एकाच माणसाला जसं लिहिता येतं, तसं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, असं मला नेहमी वाटायचं.
माझ्या लहानपणाची नाळ ज्या गावाशी जोडली गेलेली आहे, त्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या अंधानेर या गावापासून फार लांब नसलेलं चिंचोली लिंबाजी हे धनंजयचं गाव असल्याचा सलगीचा मृदगंध आमच्या मैत्रीला लाभला. धनंजयचं शालेय शिक्षण चिंचोली गावातच झालं आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो वैजापूरला गेला. शिकता शिकता तो ‘मराठवाडा’ या दैनिकाचा वैजापूरचा वार्ताहर म्हणून काम करू लागला. काहीबाही लिहूही लागला. महाविद्यालात असतानाच त्याचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्या ‘चिघोर’ नावाच्या कथासंग्रहाचं प्रकाशन चक्क प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हस्ते झालं होतं.
ही माहितीही धनंजयच्या फेसबुकवरच्या पोस्टसमधून समजली, त्यानं सांगितली नाही. अलीकडच्या काही वर्षांत आम्ही जरा निकट आलेलो, ते केवळ लेखन आणि वाचनाच्या ओढीनं; तत्पूर्वीची आमची ओळख जेमतेम होती. जेमतेम ओळखीच्या कुणासोबत मन मोकळं करावं, अशी त्याची वृत्तीच नव्हती.
मे १९९८ ते मार्च २००३ या काळात ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तपत्र समूहाच्या औरंगाबादला ब्युरोला मी ‘लोकसत्ता’चा खास प्रतिनिधी म्हणून होतो. २१ वर्षांनी औरंगाबादला परतलो होतो. माझ्या बालपणीच्या चिटुकल्या आणि टुमदार औरंगाबादचं बकाल महानगर झालेलं होतं. त्यामुळे एक पत्रकार म्हणून गाव नीट समजून घेणं गरजेचं होतं. वृत्तपत्रातली प्रत्येक स्थानिक बातमी वाचणं आणि दररोज एक तास नवीन वसाहतीत फिरणं सुरू केलं.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
दरम्यान ‘तरुण भारत’ या वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीत ‘बब्रुवान रुद्रकंठावार’ या नावानं येणाऱ्या मजकुरानं लक्ष वेधून घेतलं. शैली ताजी, टवटवीत आणि महत्त्वाचं म्हणजे भाषेला मराठवाडी बोलीचा जायकेदार व बोचरा तडका. लहानपण मराठवाड्यातल्या गाव-खेड्यात गेलेलं असल्यानं ते लेखन माझ्या नात्याचं वाटू लागलं.
असंच फिरताना एक दिवस ‘तरुण भारत’ दैनिकाची पाटी दिसली. कार थांबवली आणि आत संपादकीय विभागात गेलो. स्वत:ची ओळख करून दिली. (माझं नाव पत्रकारिता आणि राजकारणात तेव्हा बहुतेकांच्या परिचयाचं होतंच. कारण ‘लोकसत्ता’त आणि राजकीय वृत्तसंकलनात होतो, भरपूर लिहीत होतो.) अनेक जण जमा झाले. गप्पा झाल्या. काही नवे बंध जुळले, त्यात एक धनंजय. तोच ‘बब्रुवान’ असल्याचं कळल्यावर त्याच्या लेखनावर फिदा असल्याचं सांगितलं, तेव्हा मनाची कवाडं बंद करून घ्यावीत, तसा धनंजय संकोचला होता, हे अजूनही आठवतं.
दिल्ली सोडून आम्ही औरंगाबादला स्थायिक झाल्यावर धनंजयशी मैत्री म्हणता येईल अशी घसट झाली ती मे २०१५नंतर आणि त्याचं श्रेय ‘संडे क्लब’ला. पावणे सहावर फुटाची उंची, लख्ख गव्हाळ वर्ण, झुबकेदार मिशा, मिशांआड लपलेलं अस्फुट हसू, कंगव्याची शिस्त न जुमानणारे डोईवरचे केस, चष्म्याआडच्या डोळ्यात उत्सुकता ओतप्रोत भरलेली, कपड्यांचा चॉईस चोखंदळ म्हणावं असा आणि वागण्यात ऐट. म्हणजे हा लेखक, चित्रकार वगैरे असावा असं वाटणारं एकंदरीत धनंजयचं व्यक्तिमत्त्व; काहीसं ‘काऊ बॉय’कडे झुकणारं. अमेरिकन काऊ बॉय इंग्रजी चित्रपटांत मुख्य सहभूमिकेत सहज सामावून गेला असता, असं त्याचं आकर्षक व्यक्तिमत्त्व होतं.
नीट लक्ष दिलं तर, हा माणूस चारचौघात असला तरी आत्ममग्न असतो. त्याचे डोळे काही तरी टिपत आणि कान काही तरी रेकॉर्ड करत असतात, हे लक्षात यायचं. अर्थात आपण बारकाईनं निरीक्षण करतोय, हे लक्षात आलं तर, धनंजयच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच संकोचत असत. धनंजय चिंचोलीकर याच्यासारखी सूक्ष्म निरीक्षण क्षमता असलेला कुणीही लेखक, पत्रकार आजवर माझ्या पाहण्यात आलेला नाहीये. बोलताना, चालताना, ऐकताना, टीव्ही पाहताना त्याचं हे निरीक्षण अखंड सुरू असतं आणि मग हे सगळं त्याच्या लेखनात खुबीदार नेटकेपणानं उमटायचं!
‘न घेतलेल्या मुलाखती’ हे धनंजयच एक अफलातून पुस्तक (प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन) आहे. त्यातल्या अनेकांना मी प्रत्यक्षात अनेकदा भेटलो आहे, पण त्यापैकी एकालाही न भेटता त्या मुलाखती लिहिताना धनंजयनं ती सगळी बडी माणसं त्यांच्या इतक्या तपशीलांतील लकबीसह उभी केली आहेत की, आपण स्तिमित होतो. त्या लेखनाचं कौतुक दस्तुरखुद्द अटलबिहारी वाजपेयी यांनी केल्याचं एक पत्र प्रमोद महाजन यांनी पाठवलेलं आहे, यातच सारं आलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची न घेतलेली या लेखनातली मुलाखत वाचताना, अरे आपल्या परिचयाचे बाळासाहेब ‘असे’ आपल्या लक्षात आले नाहीत, असा प्रश्न किमान मला तरी पडला.
धनंजयनं मराठवाडी बोली त्याच्या लेखनातून पेश केलेली आहे. मराठवाडी ‘लहेजा’तील त्याचं लेखन हा त्यानं मराठी साहित्याला दिलेला बावनकशी भरजरी ऐवज आहे. ‘आम आदमी विदाउट पार्टी’, ‘बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’ (प्रकाशक- जनशक्ती वाचक चळवळ), ‘येऱ्ही तेऱ्ही मगजमारी’ (प्रकाशक- देशमुख आणि कंपनी) हे त्याचं लेखन माझ्या या म्हणण्याचा पुरावा आहे. अरुण साधू यांच्यासारखा विलक्षण ताकदीचा लेखक आणि पत्रकारही धनंजयच्या मराठवाडी लहेजाच्या प्रेमात होता. अरुण साधू यांनी त्या संदर्भात भरभरून लिहिलेलं आहे (तरी साधूंनी केलेलं ते कौतुक मिरवणं बब्रुवानच्या स्वभावात नव्हतं.)
धनंजयचं हे लेखन फर्मास उपहासगर्भ आहे, प्रवाही आहे, हसू आणणारं आणि मध्येच येणाऱ्या एखाद्या सणसणीत पंचमुळे अंतर्मुख करणारं आहे. तो ‘मराठवाडी लहेजा’त राजकीय किंवा सामाजिक विषयावर जे भाष्य करतो ते चपखल, अचूक आणि जळजळीतही असलं तरी, त्यात कोणाचाही उपमर्द नसतो. लेखनाचा एक निर्भेळ, कसदार आणि वास्तववादी आविष्कार आहे तो.
त्याची बहुपेडी निरीक्षणं मांडणारी टिपणं तो फेसबुकवर लिहीत असे. ललित गद्य, सूक्ष्म निरीक्षण आणि पंच याचा ते लेखन म्हणजे आनंदायी संगम असायचा. धनंजयची शब्दकळा वाचताना अनेकदा आपल्याला असं लिहिता यायला हवं असा मत्सर वाटतो, हा कबुलीजबाब पुन्हा पुन्हा देतांना मला मुळीच संकोच वाटत नाही.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
धनंजयचं आत्ममग्न असणं ही प्रातिभाच्या वाटेवर सुरू असलेली पारायणं असतं, हे त्याच्या या लेखनातून लक्षात येतं. (कधी कधी विनाकारण वाटतं , मौनाच्या नावाखाली हा भावनेचे काही कढ तर दाबून ठेवत नाहीये ना?) राज्य सरकारचा पुरस्कार मिळाल्याबद्दल धनंजयची मध्यंतरी एक प्रकट मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीतही धनंजय कमी आणि संवादक जास्त बोलत होता! नांदेडला पत्रकारिता करताना त्याला ‘बब्रुवान रुद्रकंठावार’ हे टोपण नाव सुचलं, या व्यतिरिक्त त्या मुलाखतीतून काहीही हाती आलं नाही...
धनंजयला माझ्याविषयी ओढ का आहे, याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. त्यानं त्याच्या फेसबुक नोंदीमध्ये माझ्यावर अनेकदा लिहिलं. हे कमी पडलं की काय म्हणून आमच्या घरातल्या पुस्तकं, चित्रं, झाडं यावर आणि हेही कमी म्हणून की काय, आमच्या घरात असलेल्या ब्लॅक लेबल व्हिस्कीच्या एक गॅलनच्या रिकाम्या बाटलीत लावलेल्या मनीप्लांटवरही लिहिलं.
आमच्या घरी होणाऱ्या अनेक मैफिलीत ‘स्वामी’ श्याम देशपांडे व शाहू पाटोळे सोबत धनंजय सहभागी झाला. ‘मंतरलेल्या सोनेरी पाण्या’सोबत आमच्या मठीत रंगणाऱ्या त्या मैफिली विविध विषयांवर आमच्या कल्पना शक्तीचे लक्ष लक्ष दिवे उजळवणाऱ्या (हे आमचं मत होतं!) असत. तेव्हा आजारी असलेली माझी बेगम मंगला या मैफलीची चिकित्सक साक्षीदार असे; ती फारसं बोलत नसे, पण भाषा, साहित्य, गाणं याचा एखादा संदर्भ चुकला की, ती लगेच तो दुरुस्त करे.
या मैफलीत धनंजय मला रॉय किणीकर यांच्या ‘उत्तररात्र’ या संग्रहातील आध्यात्मिक छटा असलेल्या कवितेसारखा अनेकदा भासत असे. त्या वेळी असं वाटायचं की, कोणत्याही क्षणी धनंजय-
“हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना देहातिल तो म्हणतो”
असा एखादा किणीकर यांचा तुकडा म्हणून दाखवेल. त्याला माझी पत्रकारिता आणि मुशाफिरी याबद्दल आत्मीयता आणि उत्सुकताही असायची. मग मैफलीत माझ्या लेखनातला कुठला तरी एखादा संदर्भ, एखादा तुकडा काढून तो मलाच बोलता करायचा.
धनंजयच्या कौटुंबिक आयुष्याविषयी मला काहीच ज्ञात नाही. त्याची राजकीय विचारसरणी ठाऊक नाही, तो नेमकं काय करतो, त्याचा चरितार्थ कसा चालतो, त्याच्या घरी कोण-कोण आहे, त्यानं पत्रकारिता का सोडली, माणूस म्हणून त्याच्यात काय खोड्या आहेत... असं त्याच्याविषयी मला काहीही माहिती नाही, पण आमच्या मैत्रीत ही माहिती असणं-नसणं महत्त्वाचं नव्हतं. त्याला माझं लेखन आवडतं आणि मी तर त्याच्या लेखनावर फिदाच आहे, असा आमच्यातला हा राजीखुशीचा मामला होता!
मंतरलेल्या सोनेरी पाण्याचा अत्यंत चविष्टपणे आस्वाद कसा घ्यावा, ते धनंजयकडून शिकण्यासारखं होतं. मैफलींच्या काळात मंतरलेलं सोनेरी पाणी आणि धनंजय हे एक अद्वैत तयार व्हायचं... ते सोनेरी पाणी त्याचा गंध, त्याची चव आणि चाललेल्या गप्पा याच्या नशेत स्वतः काही न बोलता धनंजय तासन्तास बसू शकत असे.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
मंतरलेल्या सोनेरी पाण्याच्या मैफलीतही खामोषी पांघरून बसणारा माझ्या मित्र वर्तुळातला धनंजय एकमेव ‘मनुक्ष्य’ प्राणी होता! पण जेव्हा तो बोलत असे, तेव्हा त्याच्या बोलण्याला एक ठामपणा असे. काहीतरी वचावचा बोलावं, ऐकीव माहितीवर विसंबून राहून बोलावं किंवा मैफलीत हजर नसलेल्या कोणाची तरी टर उडवत रहावं, असा त्याचा स्वभाव नव्हता. निर्मळ आणि नितळ असं त्याचं मन होतं; फसवणाऱ्या प्रकाशक मित्राबद्दल मैफलीतही वावगा शब्द न उच्चारण्याची त्याची क्षमाशील वृत्ती माझ्या या म्हणण्याची साक्षीदार आहे. त्याच्याबरोबरचे अनेक जण त्याच्यापेक्षा पुढे निघून गेले, पण त्यांच्या पुढे जाण्याबद्दल धनंजयच्या मनात असूया आहे, असं कधीच जाणवत नसे.
बरं स्वतःच्या लेखनावर खूप काही बोलावं असाही त्याचा स्वभाव नव्हता. त्यानं भसाभसा काही लिहिलं नाही; जे काही लिहिलं ते कसदार आणि अस्सल ऐवज या सदरात मोडणारं आहे. धनंजय असो की बब्रुवान, हा माणूस आणि लेखक, मला कायमच ध्यानमग्न साधूसारखा वाटायचा. त्याची स्तुती केली तरी त्याला त्याचं फार अप्रूप नव्हतं आणि टीका केली तर तर ते दुखावलेपणाने घ्यावं, असाही त्याचा स्वभाव नव्हता. एकूणच वागणं, बोलणं आणि लेखन याबद्दल बहुसंख्य लेखकांत आढळणारं हळवेपण त्याच्यात नव्हतं. याबाबतीत काहीशी संकोची आणि काहीशी मिश्कील आत्मलुब्धता त्याच्यात होती.
धनंजयला खरंच मरायचं होतं का, याबद्दलही मी साशंक आहे. गेली काही वर्षं तो आजारी होता. मध्यंतरी तर इतका आजारी होता की, डॉक्टरांच्या बोलण्यातून त्याच्या मृत्यूची वार्ता केव्हाही येईल असे संकेत मिळायचे. त्या काळात त्याच्या डोळ्यात बघवलं जात नसे. मी तर त्याला भेटायला जाणं सोडून दिलं होतं. मला असा असहाय धनंजय म्हणा की, बब्रुवान बघणं शक्यच होत नव्हतं. तेव्हा त्याच्यासमोर असतानाही मला त्याचं मोहक टपोरं अक्षर आणि लेखनच आठवत राहायचं, जगण्या-मरण्याच्या उंबरठ्यावर क्षणाक्षणाला आणि कणाकणानं तो मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशाकडे वाटचाल करतोय असा तो काळ होता.
या काळात रुग्ण आणि त्याचा जीवनसाथी कोणत्या मानसिक घुसमटीतून जात असतात याचा अनुभव मी माझ्या बेगमच्या आजारपणात तब्बल पावणे तीन वर्षं घेतला आहे. त्यामुळे त्या काळातील धनंजय आणि त्याची बायडी जयश्री या दोघांचं आशा-निराशेच्या हिंदोळ्यावरचं भावजीवन कसं होतं, याचा अंदाज मला आहे.
धनंजय या काळात विलक्षण चिवटपणे लढत राहिला आणि एका क्षणी परतण्यात यशस्वी झाला. मृत्यूशी हस्तांदोलन करून धनंजय परत आला. कामाला लागला. फेसबुकवरचं त्याचं लेखन सुरू झालं. दोन पुस्तकांची सिद्धता करण्याच्या कामात तो गुंतला. त्या काळात त्याचं बोलणं, जयश्री आणि शाहू पाटोळे वगळता, सर्वांना समजत नसे म्हणून त्यानं लिखित संदेश पाठवून पुन्हा संपर्क प्रस्थापित केला.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
सुमारे दोन वर्षभरापूर्वी धनंजयच्या एका पुस्तकाला माझी प्रस्तावना हवी, असं शाहूनं सांगितलं. मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, पण ते पुस्तक तेव्हा काही झालं नाही. धनंजय घरी परत आल्यावर एक दिवस त्याचा मेसेज आला की, पुस्तकासाठी ब्लर्ब हवा आहे. त्यानं पुस्तकाची ई-प्रत पाठवली. ती वाचून व्हायच्या आतच ब्लर्ब मिळवण्यासाठी धनंजय चिकाटीनं पाठपुरावा करत होता. दर दोन-चार दिवसाआड तो पुस्तकाची खबरबात कळवत असे. अभिनेत्री मुक्ता बर्वे ही धनंजयच्या नात्यातली. तिचा भाऊ मुखपृष्ठ कसा करतो आहे, टाईप सेट कोणता नक्की केला आहे, दुसऱ्या पुस्तकासाठीचा जयदेव डोळे याचा ब्लर्ब आलेला आहे, वगैरे तपशील त्याच्या कळवण्यात असत. अखेर मी ब्लर्ब पाठवला. तो आवडल्याचा त्याचा निरोप आला. पुस्तक कधी काढायचं, कार्यक्रम कधी करायचा वगैरे वगैरे तपशील शाहू पाटोळे यानं सांगितलं.
एकूण काय तर, धनंजय तंदुरुस्त असल्याच्या शुभ संकेताच्या त्या ओल्या रेषा वाटत होत्या. औरंगजेबाची कबर असलेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील खुलताबादच्या बाजारात उरुसात पूर्वी म्हणजे ४५-५० वर्षांपूर्वी अस्सल अत्तर मिळायचं. (आता मिळतं का नाही ते माहिती नाही.) त्यासाठी खास निळ्या, पांढऱ्या, हिरव्या कांचेच्या पैलू पाडलेल्या पिटुकल्या शीशा असत. त्यातलं वाळ्याचं अत्तर माझ्या खास आवडीचं होतं. उन्हाळ्यात त्या अत्तराचा एक थेंब पाण्यात टाकला की, पाणी शीतल व चवदार होत असे आणि एक थेंब कापसाच्या बोळ्यावर टाकून टेबलवर ठेवला की, त्या गंधानं उन्हाची काहिली कमी झाली असं वाटत असे.
धनंजयशी असणारी माझी मैत्री त्या अत्तरासारखी होती... म्हणूनच खरंच जर करता आलं असतं, तर माझं उरलेलं वय धनंजयच्या ओंजळीत अलगद टाकून दिलं असतं आणि धनंजय/बब्रुवाननं मग, त्याच्या शैलीत हा मजकूर माझ्यावर लिहिला असता...
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment