आज २१२५मधून मोदीकालीन भारत बघत असताना त्या काळातील राजकीय लढाया बघून आश्चर्य वाटते. आज आपण ज्या गोष्टी गृहित धरतो, त्या गोष्टींसाठी त्या काळी सर्वोच्च न्यायालयात किल्ले लढवावे लागत.
आज तुम्ही श्रीमंत असा अथवा गरीब, तुम्ही अठरा वर्षांचे झालात की, लगेच तुमच्या मोबाईलवर तुमचे ‘मतदार ओळखपत्र’ येते. तुम्ही गाव बदलले की, निवडणूक आयोगाचा ट्रॅकर तुम्हाला तुमचा मतदारसंघ बदलायचा आहे का, असा प्रश्न विचारतो. तुम्ही होकार दिलात की, लगेच मतदारसंघ बदलून मिळतो. बायोमेट्रिक सेफ्टीमुळे तुमच्या नावावर कुणीही मतदान करू शकत नाही. तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमचे वय आणि तुमचा पत्ता; यामधील कोणतीही तीन तपशील दुसऱ्या कुठल्याही मतदाराशी जुळत असतील तुम्हाला बोलावले जाते आणि शहानिशा केली जाते. आजच्या भारतात सगळे कसे सुरळीत चाललेले असते.
मोदीकालीन भारतातही हे सगळे करणे अवघड नव्हते. तेवढी तांत्रिक प्रगती त्या वेळी झाली होती. त्या काळी, कोट्यवधी गरीब लोकांच्या खात्यात थेट पैसे टाकले जात होते. त्याच खात्यांशी ही ‘मतदार ओळखपत्रा’संदर्भातली माहिती जोडून टाकता आली असती, पण तसे व्हायला २०४७ उजाडावे लागले. याच्या कारणाचा विचार आजच्या वाचकांनी आपल्या स्वतःशीच करायचा आहे.
त्या काळी प्रश्न फक्त गरिबांचा होता. त्यांच्या बँक खात्यांना ‘मतदार ओळखपत्रं’ जोडली, तर त्यांची नावे मतदार यादीमधून वगळायचे काही कारण नव्हते. श्रीमंत लोकांचा प्रश्न कधीच नसतो. ते आपली स्वतःची काळजी घेतच असतात. मोदीकालीन भारतात ‘मतदार ओळखपत्रा’मधील माहितीचे ‘क्रॉस रेफरन्सिंग’ करण्याचेही तंत्रज्ञान उपलब्ध होते. त्यामुळे तसे बघायला गेले तर ‘बनावट मतदार ओळखपत्र’ बनवणे अशक्य होते. तरीही ‘बनावट मतदार ओळखपत्रं’ तेव्हा लाखोंनी बनत! या गोष्टीच्या कारणाचाही विचार आजच्या वाचकांनी आपल्या स्वतःशी करायचा आहे.
एवढी सगळी तांत्रिक प्रगती झालेली असताना २०२५ साली ‘वोट चोरी’चे वादळ उठले. २०२५ साली झालेल्या या ‘वोट चोरी’ गोंधळाचे दोन आयाम होते. एक म्हणजे, कर्नाटक, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे बनावट मतदार तयार करून ‘वोट चोरी’ केली गेली, असे आरोप झाले. दुसरे म्हणजे, त्याच वेळी, बिहारमध्ये गरीब, दलित, यादव आणि मुस्लीम वगैरे लोकांची मते कापून वोट चोरीचा प्रयत्न केला जात आहे, असेही आरोप केले गेले.
आजची बखर बिहारमधील ‘वोट चोरी’च्या प्रश्नाबद्दल आहे. बिहारमध्ये मतदारयाद्यांची SIR म्हणजे ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ केली जावी, असा आदेश निवडणूक आयोगाने २४ जून रोजी काढला. अशी रिव्हिजन त्या काळी साधारणपणे दोन अडीच दशकांनी केली जात असे. मतदारयाद्या ‘अपडेट’ करण्यासाठी अशी रिव्हिजन आवश्यक होत असे. त्या वेळी सरकारचा अधिकारी त्याला दिलेल्या बूथमधील प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती अपडेट करत असे.
कुणी मृत झाले आहे का, घर बदलून गेले आहे का, गाव सोडून गेले आहे का, लग्न होऊन सासरी गेले आहे का, नव्याने अठरा वर्षांचे झाले आहे का, अशा अनेक गोष्टी बघून नावे वगळणे किंवा नवीन नावे टाकणे, अशा गोष्टी केल्या जात. अशा पद्धतीने बदललेली यादी जाहीर केली जात असे. त्यात कुणाचे नाव निष्कारण कापले गेले आहे का, चुकीचे टाकले गेले आहे का, कुणावर काही अन्याय झाला आहे का, हे विचारले जात असे. त्याबाबत काही तक्रारी आल्या, तर चौकशी होत असे आणि यादी दुरुस्त केली जात असे.
एकेका राज्यामधील आठ-नऊ कोटी मतदारांपर्यंत पोहोचायचे आणि एवढा सगळा उपदव्याप करायचा असा हा प्रकार होता. यासाठी किमान आठ-दहा महिन्यांचा काळ लागत असे. या वेळी मात्र निवडणूक आयोगाने हा सगळा उद्योग जून २४ ते सप्टेंबर १५ अशा अडीच-तीन महिन्यांच्या कालावधीत करायचा घाट घातला. साधारणपणे हा उद्योग निवडणुका तोंडावर आलेल्या असताना केला जात नसे. या वेळी मात्र २०२५च्या बिहार निवडणुका तोंडावर आलेल्या असताना, या प्रकाराला हात घातला गेला. त्याही पुढे जाऊन ऐन पावसाच्या आणि पुरांच्या हंगामात करण्याचा घाट घातला गेला. लोक विचारू लागले- ‘अहो, एवढे संकेत तोडून हे सगळे करण्याची एवढी काय निकड होती? एवढी काय गरज होती?’
शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे - “बिहारमध्ये घुसखोर आले आहेत म्हणून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचे निवडणूक आयोग सांगत आहे. परंतु यात दोन गोष्टी महत्त्वाच्या! एक म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या आधी आयोगातर्फे KAP सर्व्हे केला जातो. Knowledge, Attitude And Practice survey. मतदारांना निवडणूक, मतदान, मतदार ओळखपत्र वगैरेबद्दल किती माहिती आहे? ते निर्भय आहेत का? निवडणूक प्रक्रियेविषयी त्यांना किती माहिती आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या सर्व्हेमध्ये शोधली जातात.
एप्रिल २०२५मध्ये केलेल्या बिहारची मतदारयादी ‘निअर परफेक्ट अॅक्युरसी’ची आहे असे निवडणूक आयोगानेच जाहीर केले होते. ‘निअर परफेक्ट अॅक्युरसी’ म्हणजे ९८ टक्क्यांपेक्षा जास्त सटिकता! या पार्श्वभूमीवर लोक विचारू लागले की, मतदारयादी परफेक्ट होती, तर मग ही ऐन पावसातली आणि घाईगडबड कशासाठी?
दुसरे म्हणजे, घुसखोर आलेले आहेत तर ते काम गृहमंत्रालयाचे आहे. निवडणूक आयोगाने ते आपल्या अंगावर घेण्याचे कारण काय? हे काम निवडणूक आयोगाचे नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १९९५ सालच्या ‘लाल बाबू हुसैन विरुद्ध इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर’ या खटल्यात दिलेला आहे.”
शिरोजी पुढे लिहितो - “थोडक्यात, आपणच एप्रिलमध्ये सांगायचे की, बिहारची मतदारयादी परफेक्ट आहे, आणि आपणच म्हणायचे की, ऑफिसर आणि मतदार पुरात वाहून गेले, तरी बेहत्तर पण रिव्हिजन झालीच पाहिजे. कुठलाही सुबुद्ध माणूस यावर काय बोलणार?”
शिरोजीचा मुद्दा अर्थातच योग्य होता. अर्थातच, या रिव्हिजनवर मोठा गदारोळ उठला. लोक म्हणू लागले की, काहीतरी घोळ घालण्याचे कारस्थान सुरू आहे. एवढ्यात सात ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी बेंगलोरमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘बेंगलोर सेंट्रल’ या मतदारसंघात घोळ घातला गेला आहे, असा आरोप केला. बेंगलोर सेंट्रल या लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातल्या सात मतदारसंघांत मिळून काँग्रेस ८० हजार मतांनी आघाडीवर होती, पण एकट्या महादेवपुरा मतदारसंघात भाजपला एक लाख चौदा हजाराची आघाडी मिळाली आणि भाजप बत्तीस हजार मतांनी जिंकली. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या याद्यांचेच विश्लेषण करून आरोप केला की, महादेवपुरात एक लाख दोनशे पन्नास मतदार बोगस आहेत.
यावरही देशभर गदारोळ उठला. ७ ऑगस्टच्या आरोपांनंतर ‘बोगस मतदार वाढी’चे आरोप महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा अशा सगळ्या भागांमधून होत राहिले. दरम्यान, बिहारच्या मतदारांच्या ‘ड्राफ्ट लिस्ट’ मधून म्हणजे रिव्हिजनच्या पहिल्या यादीमधून सुमारे ६५ लाख नावे कापली जाण्याची शक्यता आहे, असे योगेंद्र यादव आणि इतर लोक जुलै महिन्यातच म्हणू लागले होते.
योगेंद्र यादव हे मोदीकालीन भारतामधील एक अत्यंत प्रसिद्ध सेफॉलॉजिस्ट आणि राजकीय कार्यकर्ते होते. त्यांनी आरोप केल्यानंतर, १ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने ‘बिहार ड्राफ्ट लिस्ट’ जाहीर केली. यात गंमतीची गोष्ट अशी की, या यादीमध्ये खरच ६५ लाख नावे कापली गेली होती. विरोधक म्हणू लागले की, ही सगळी नावे गरीब, दलित, मुसलमान आणि यादव लोकांची असणार. लोक म्हणू लागले की, इतर राज्यात मतदार वाढवून भाजप जिंकली, आता विरोधी पक्षाचे मतदार कापून भाजप बिहार जिंकायच्या प्रयत्नात आहे.
पुन्हा एकदा एकच गदारोळ उडाला. एवढे झाले तरी निवडणूक आयोगाचा उत्साह कमी झाला नव्हता. आता यात भर म्हणून निवडणूक आयोगाने ही ‘ड्राफ्ट व्होटर लिस्ट’, ‘नॉन सर्चेबल’ आणि ‘नॉन मशीन रीडेबल’ फॉरमॅटमध्ये आणली. आधी ती ‘सर्चेबल’ आणि ‘मशीन रीडेबल’ होती. आता विरोधकांना तिचे विश्लेषण अशक्य व्हावे म्हणून ती ‘नॉन सर्चेबल’ आणि ‘नॉन मशीन रीडेबल’ फॉरमॅटमध्ये वेबसाईटवर चढवली गेली. त्यामुळे पंधरा दिवसांत चौथ्यांदा गोंधळ उडाला.
शिरोजीने आपल्या बखरीमध्ये लिहिले आहे- “घटनेने अधिकार दिलेल्या प्रत्येक यंत्रणेवर प्रत्येक नागरिकाने विश्वास ठेवला पाहिजे, पण एखादी यंत्रणा प्रत्येक बाबतीत ‘लॉजिक’ सोडून वागते आहे, असे चित्र तयार होऊ लागले, तर नागरिकांनी तरी काय करावे? मशीन ‘रीडेबल लिस्ट’ देणार नाही, ऐन पावसात आठ महिन्यांचे काम अडीच महिन्यांत करायचा घाट घालणार, मतदानाचे व्हिडिओ देणार नाही, लोकसभेच्या याद्यासुद्धा मशीन ‘रीडेबल’ फॉरमॅटमध्ये देणार नाही, अशा भूमिका घेऊन कसे चालेल? माझ्यासारखे लोक याही परिस्थितीमध्ये या यंत्रणांवर विश्वास ठेवतील. अगदी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवेपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवतील, पण सामान्य लोकांनी किती धीर दाखवावा? असो.”
हा गोंधळ वाढत गेला तसा १४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने SIR केसमध्ये आदेश दिला की, १ ऑगस्ट रोजी जाहीर केलेली ‘ड्राफ्ट लिस्ट’ ‘सर्चेबल’ आणि ‘मशीन रीडेबल’ फॉरमॅटमध्ये जाहीर करा. हा आदेश झाल्यावर तशी लिस्ट अपलोड केली गेली. ती ‘मशीन रीडेबल लिस्ट’ घेऊन योगेंद्र यादव विश्लेषणाच्या कामाला लागले.
आज बाविसाव्या शतकात आपल्याला कल्पना येणार नाही, पण या साऱ्या आरोपांमुळे त्या काळात प्रचंड कोलाहल माजला होता. नेमक्या त्याच वेळी गरिबांच्या मतांचा अधिकार जाणार म्हणून राहुल गांधी यांनी १७ ऑगस्टपासून बिहारमध्ये ‘वोट अधिकार यात्रा’ काढली. भारतातील गरिबाकडे आपले आयुष्य बदलण्यासाठी मत हाच एक मार्ग होता. तोच गेला तर कसली सरकारी मदत आणि कसले आरक्षण! राहुल गांधी यांच्या यात्रेला अतिप्रचंड प्रतिसाद मिळाला. इकडे ‘मशीन रीडेबल लिस्ट’ घेऊन योगेंद्र यादव कामाला लागलेच होते.
राहुल गांधी यांची यात्रा आणि योगेंद्र यादव यांचे विश्लेषण सुरू होऊन आठवडा होत नाही, तर पश्चिम बंगालमध्ये सप्टेंबर महिन्यापासून ‘स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन’ सुरू करायचे आदेश आले. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक २६च्या मार्च एप्रिलमध्ये होती. लोक म्हणू लागले की, इथेही रिव्हिजन करायची होती, तर बिहार बरोबरच जूनपासूनच का नाही केली? आता इथेही घाईगडबड करायची आहे का?
खरं तर ही निवडणूक आयोगाची घाईगडबड बघून शिरोजी अगदी उबून गेला होता. त्याने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे - “मोदी सरकार आपल्या पद्धतीने आणि गतीने चालले आहे. या सगळ्या घटनांबद्दल लोक काय विचार करत आहेत, याचा विचार न करता चालले आहे. सरकारच्या या वृत्तीमुळे लोकांमधली अस्वस्थता वाढत चालली आहे, हे नक्की! यातून नजीकच्या भविष्यात मोठ्या राजकीय घटना घडणार आहेत हे नक्की!”
या सगळ्या घटनांचा ‘दलित’ आणि ‘मागास’ या वर्गांवर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार शिरोजी करू लागला होता. या वर्गाविषयी विचार करताना सुप्रसिद्ध हिंदी कवी आदम गोंडवी यांच्या कवितेकडे तो ओढला जात होता.
“अंत्यज-कोरी पासी हैं हम
क्यूँकर-भारतवासी हैं हम
अपने को क्यूँ वेद में खोजें
क्या दर्पण-विश्वासी हैं हम”
गोंडवी यांच्या या ओळी २८ ऑगस्ट रोजी आपल्या रोजनिशीमध्ये उदधृत करून शिरोजी लिहितो - “कोरी आणि पासी यांच्यासारख्या दलितांमधीलही दलित असलेल्या लोकांना सामावून घेण्याची भाषा हिंदुत्ववादी लोक करत आहेत. चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांना या तत्त्वज्ञानाच्या आरशात मुखदर्शन करून आपली ओळख पटवून घ्यायची आहे का, याचाही विचार व्हायला हवा. सध्या या दलित आणि गरीब लोकांना काय वाटते आहे, याचा फारसा विचार न करता राज्यशकट हाकला जातो आहे. हे सत्ताधीश लोक, कोरी आणि पासी अशांसारख्या लोकांचा प्रतिसाद गृहित धरत आहेत काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर फार थोड्या दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, परंतु त्या घटनेमुळे अखिल दलित समाजाची धार्मिक विचारसरणी किती अमूलाग्र बदलली होती, याचा अंदाज फार थोड्या आत्ममग्न सवर्णियांना होता. या गरीब आणि दलित लोकांना फुकटचे रेशन दिले आणि यांच्या बायकांना निवडणुकीच्या तोंडावर दोन-चार हजार रुपये दिले की, यांची मते मिळून जातील, असा विश्वास या लोकांना वाटतो आहे का? धर्मविचारापेक्षा आणि छोट्या फायद्यापेक्षा आपला मतदानाचा अधिकार या लोकांना जास्त महत्त्वाचा वाटू शकतो, हे या सत्ताधारी लोकांच्या लक्षात येत नाहीये का? हे गरीब आणि दलित लोक आता लोकशाहीच्या आरशात बघून स्वतःला ‘आयडेंटिफाय’ करू लागले आहेत, असे मला वाटू लागले आहे. बघुयात काय होतंय ते!”
शिरोजी स्वतः कुठल्याही फॉर्म्युलेशनपासून तटस्थ होता. धर्म विरुद्ध लोकशाही, धर्माधिष्ठित लोकशाही, किंवा लोकशाहीमधील धर्म, अशा फॉर्म्युलेशनमध्ये स्वतःला अडकवत नव्हता. तो फक्त तटस्थपणे सगळी परिस्थिती बघत होता. इकडे भारत मात्र ढवळून निघाला होता. भारतात एक ‘उफान’ आले होते. भारतातल्या या उफाणलेल्या परिस्थितीत आणि उफाणलेल्या मनःस्थितीत शिरोजीने ही चोविसावी बखर लिहिली आहे.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
२०२५ सालचा ऑगस्ट महिना आहे. भारत उफाणलेला आहे. पांडेजी नेहमी शांत असतात, परंतु तेसुद्धा थोडे अस्वस्थ आहेत. शेवटी ‘वोट चोरी’ म्हणजे काय! जर खरंच होत असेल तर फारच अवघड काम! नाना आणि अविनाश ठेल्यावर येऊन बसले होते. ते भजी खात होते. पांडेजी विचारात होते.
अविनाश - (भजी खात खात) च्यामारी या सर्वोच्च न्यायालयाच्या! विरोधकांच्या सगळ्या केसेस डिसमिस का नाही करत एकदम!
पांडेजी - (विचारातून जागे होत) ऐसा कैसा कर सकता हैं कोई?
अविनाश - का नाही करायचं? दिसतं आहे सगळा खोटा प्रचार चाललाय! डोक्याची चिप काढल्यासारखे वागतायत विरोधी पक्ष! सरळ हातोडी उचलायची, टेबलावर आपटायची - केस डिसमिस्ड!
पांडेजी - जो सबूत सामने आये हैं वो तो देखने होंगे नं?
अविनाश - घंटा! हे पुरावे नाहियेत हे सगळे जॉर्ज सोरोसचे पैसे आहेत.
नाना - आणि ट्रम्पचे!
(इतक्यात राघव, समर आणि भास्कर येतात)
भास्कर - (येतायेताच) च्यामारी या सर्वोच्च न्यायालयाच्या!
नाना - का रे बाबा?
भास्कर – अहो, सरळ सरळ दिसतं आहे की, निवडणूक आयोग घाई करत आहे. सरळ सरळ दिसत आहे की, गरीब लोकांची मतं कापली जातायत. आणि यांचं चाललंय हातोडी आपटत - ऑर्डर ऑर्डर! कसली घंटा ऑर्डर? सगळी बिहार निवडणूक चोरतंय निवडणूक आयोग आणि यांचं चाललंय नुसतं ऑर्डर ऑर्डर! पुढची तारीख, पुढची तारीख खेळतायत!
राघव – अरे, बरोबर चाललंय सगळं.
समर - मला नाही पटत! योगेंद्र यादव आधीच म्हणाले होते की, ६५ लाख नावं कापली जातील ड्राफ्ट लिस्टमध्ये. गेली की नाही?
भास्कर – अरे, वाट कसली बघताय तुम्ही?
राघव – अरे, न्यायमूर्ती म्हणाले आहेत की, फायनल लिस्ट येऊ द्या, त्यात बघू किती नावं कापली जातायत. फार जास्त नंबर असेल तर आम्ही SIR रद्द करू!
पांडेजी - बिल्कुल सही फर्माया हैं सुप्रीम कोर्टने!
अविनाश - या योगेंद्र यादवाला तर पहिल्यांदा अटक केली पाहिजे.
भास्कर - का? तुमच्या चोऱ्या पकडतो म्हणून का?
समर - भारी माणूस आहे.
नाना - योगेंद्र यादव कसला? सलीम यादव आहे तो.
भास्कर - सलीम यादव.
नाना - त्याचं लहानपणीचं नाव ‘सलीम’ आहे. नंतर मित्र हसायला लागले म्हणून ‘योगेंद्र’ झालं.
भास्कर - यादव माणसाचं नाव ‘सलीम’ कसं असेल?
राघव - खरं आहे. योगेंद्र यादवांचे वडील त्यांना प्रेमानं ‘सलीम’ म्हणायचे.
नाना - म्हणजे सगळं घरंच तसलं आहे.
समर - तसलं म्हणजे?
अविनाश - तसलं म्हणजे तसलं! (हु हु हु).
राघव - तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते म्हणा, पण योगेंद्र यादवांनी जो गोंधळ बाहेर काढला आहे, त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाला घ्यावी लागणार आहे.
अविनाश - (विषारी आवाजात) सलीम!
राघव - योगेंद्र यादवांनी काल काही गोष्टी एक्पोज केल्या आहेत. त्या सगळ्यांची उत्तरं निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहेत.
नाना - काय घंटा एक्सपोज केलंय सलीमनं?
(नानांच्या तोंडातून घंटा हा शब्द ऐकून अविनाश हु हु हु करून हसतो)
राघव - योगेंद्र यादवांनी ‘बिहार व्होटर ड्राफ्ट लिस्ट’चं विश्लेषण केलं आहे. निवडणूक आयोगाने नव्वद हजार बूथमध्ये जे काही केलं आहे त्याचं विश्लेषण! पहिला मुद्दा, बिहारमध्ये २००० बूथमध्ये २०० मतं कापली गेली आहेत. ३०० बूथमध्ये ३००पेक्षा जास्त मतं कापली गेली आहेत, ६५ बूथमध्ये ४००पेक्षा जास्त मतं कापली गेली आहेत आणि ११ बूथमध्ये ५००पेक्षा जास्त मतं कापली गेली आहेत.
अविनाश – अरे, लाखाच्या घरात मतदान असतं. चार-दोनशेनं काय फरक पडणार?
राघव - एका बूथमध्ये हजार-बाराशेच मतं असतात. त्यातली चारशे आणि पाचशे मतं म्हणजे पन्नास टक्के मतं कापली गेली आहेत. २०० म्हणजेसुद्धा वीस टक्के मतं कापली गेली आहेत.
अविनाश – अरे, तुम्ही गप बसा रे! आयेगा तो मोदीही!
नाना - सलीमला काहीही म्हणू देत एवढ्या छोट्या कारणासाठी सर्वोच्च न्यायालय काही करणार नाही.
अविनाश - लास्ट टाईम मोदी छा गया था बिहार में. इस टाईम भी छा जाएगा!
राघव - गेल्या वेळी मोदीकाकांच्या एनडीएला किती मतं मिळाली होती माहिती आहे का?
अविनाश - किती?
राघव - (फोनमध्ये बघत) १ कोटी ५७ लाख १ हजार २२०.
समर - आणि राहुल आणि तेजस्वीला किती मिळाली होती माहिती आहे का?
अविनाश - मोदीजींना दीड कोटी म्हणजे राहुलला दहा-बारा लाख असतील. (हु हु हु)
राघव - राहुल आणि तेजस्वी यांना मिळाली होती १ कोटी ५६ लाख ८८ हजार ४५८.
समर - म्हणजे फक्त १२ हजार ७६८ कमी!
अविनाश - हे आकडे सलीमनेच दिले आहेत का?
नाना - सलीम आणि जॉर्ज सोरोस!
राघव - हे बघ निवडणूक आयोगाची वेबसाईट. वाच!
अविनाश - तूच वाच!
नाना - हे बघा १२ हजार असो किंवा १२ लाख. आ गया तो मोदीही नं?
भास्कर - गेल्या वेळी कसाबसा आला. आता तो १२ हजाराचा आकडा येतो आहे स्वप्नात काकासाहेबांच्या! (हा हा हा!)
समर - आता कळलं का प्रत्येक बूथचा हिशोब का महत्त्वाचा आहे ते!
भास्कर - शिवाय आता बायका चिडल्या आहेत महागाईमुळे.
समर - योगेंद्र यादवांनी दाखवून दिलं आहे की, कित्येक बूथवर पुरुषांपेक्षा जास्त महिला स्थानांतरित झाल्या आहेत.
भास्कर - म्हणजे बायकांची मतं कापली.
नाना - जास्त लग्नं झाली असतील त्या गावात.
राघव - ते बघेल सर्वोच्च न्यायालय.
नाना - (गालातल्या गालात हसत) बघू ना कसं बघतंय ते!
भास्कर - योगेंद्र यादव म्हणतायत की, एका घरात २०पेक्षा जास्त मतदार अशा खूप केसेस आहेत.
नाना - किती असणार असून असून? ४० हजार, ५० हजार!
राघव - एका घरात वीसपेक्षा मतदार! ड्राफ्ट लिस्ट म्हणतेय की, असे ८२ लाख मतदार आहेत बिहारमध्ये.
भास्कर - ड्राफ्ट लिस्ट आहे का फर्जिवाडा!
अविनाश - असू शकतात अशी घरं ग्रामीण भागात.
भास्कर - शहरात आहेत मुख्यत्वेकरून!
अविनाश - असू शकतात!
राघव - २० मतदार म्हणजे १८च्या पुढचे. त्याच्या आतली पोरं पोरी असणारच ना घरात? म्हणजे बिहारमध्ये एका घरात चाळीस लोक राहतात असं म्हणायचं आहे तुला?
नाना - असतील! (हु हु हु)
(मोदीकालीन भारतात अनेक भक्त शरम नावाची गोष्ट कोळून प्याले होते. - संपादक)
भास्कर - तेजस्वी यादवाची लोकं ते पत्ते शोधत गेले म्हणजे कळेल.
नाना - राज्य आमचं आहे म्हणावे. नीतीश फक्त नावाचा मुख्यमंत्री आहे. फटके पडतील!
(मोदीकालीन भारतात चर्चेमध्ये थोडे ट्रॅप केले की, अंधभक्त अशा प्रकारे अंगावर धावून येत. एक ‘फॉल्स सेन्स ऑफ पॉवर’ आला होता या लोकांना. ‘फॉल्स सेन्स ऑफ पॉवर’ आलेल्यांमध्ये स्त्रिया सुद्धा होत्या. - संपादक)
भास्कर - एवढं सोपं आहे का फटके मारणं? अरे, तो बिहार आहे.
अविनाश - म्हणजे तुला म्हणायचे काय आहे?
भास्कर - मला इतकंच म्हणायचे आहे की, ‘तो बिहार आहे’.
अविनाश - हे बघ आता बिहारमध्ये काही झालं, तर त्याची जबाबदारी या सलीम यादवावर आहे.
नाना - सलीमला अटकच केली पाहिजे.
समर - का? त्यानं गोंधळ घातला आहे का मतदारयादीत?
अविनाश - कुणीही घोळ घातलेला नाहिये. हा माणूस उगीच संशय वाढवून गोंधळ निर्माण करतोय, म्हणून करायची अटक!
राघव - तुम्ही काही म्हणा, तेजस्वीचे लोक त्या सगळ्या पत्त्यांवर जाणार आहेत.
समर - आणि प्रत्येक बूथवर उभे राहणार आहेत. बिहार स्टाईलमध्ये.
राघव - आणि संध्याकाळी सहानंतर आठ आठ टक्के मतदान कसं होतं तेसुद्धा बघणार आहेत ते!
नाना - (हसत) निवडणूक आयोगाने ते व्हिडिओ नको का द्यायला तुम्हाला?
राघव - मतदानाची वेळ सहाला संपते. तेव्हा जेवढे लोक लायनीत असतील तेवढेच मतदान झाले पाहिजे.
अविनाश - ते सिद्ध करायला व्हिडिओ मिळाले पाहिजेत ना तुम्हाला. (हु हु हु)
समर – अरे, सहा वाजता किती लोक बूथवर उभे आहेत, त्याचा व्हिडिओ बाहेरून नाही का काढणार तेजस्वीचे लोक?
नाना - तो काही पुरावा नाही होऊ शकत. न्यायालयात फक्त निवडणूक आयोगाचेच व्हिडीओ पुरावा म्हणून चालणार! (हु हु हु)
भास्कर - तो बिहार आहे.
अविनाश - (घाबरून) भीती दाखवू नको तू मला!
नाना - हे बघा, तुम्हाला काय करायचं ते करा. काल नीतीश कुमारनं प्रत्येक घरामधल्या एका बाईला १० रुपये जाहीर केले आहेत. आचार संहिता लागू होण्याच्या आधी सगळ्या बायकांच्या खात्यात जाऊन पडणार आहेत पैसे.
अविनाश - (गात) लाडली बहेना हैं तू मेरी! (हु हु हु)
राघव - म्हणजे अडीच हजार कोटी रुपये उडवले आपले.
अविनाश - तू दिले आहेस काय अडीच हजार कोटी?
(राघव हसून दुर्लक्ष करतो)
नाना ( गालातल्या गालात हसत) आयेगा तो मोदीही!
राघव – अहो, पैसे देऊन निवडून यायची खात्री असती, तर इतकी घाईगडबड केली असती का तुम्ही?
समर - बायकांनी पैसे घेऊन मतं नाही दिली तर काय करायचं? (विकट हसतो).
राघव - राहुलच्या ‘वोट अधिकार यात्रे’तली गर्दी बघितली ना?
नाना – अरे, कसली गर्दी ती सगळे यादव आणि मुस्लीम - नुसती ‘हस्सन-हुस्सेन गँग’! काही उपयोग नाही.
अविनाश - आयेगा तो मोदीही!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
तर अशी ही सगळी नांदी बिहार निवडणुकीची! ऑगस्ट संपता संपता एवढे वादळ उठले होते. आता भारतभरातून ‘वोट चोरी’चे आरोप होऊ लागले होते. २९ ऑगस्टला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाजपच्या पाचशे टिम्स SIRमध्ये गोंधळ घालायला घुसल्या आहेत, असा आरोप केला. एक तारखेला ‘बिहार वोट अधिकार यात्रे’ची सांगता झाल्यावर मोदीजींच्या वाराणसी मतदारसंघात घोळ झाल्याचे पुरावे आम्ही देणार, असे काही काँग्रेसवाले म्हणू लागले. त्या मागोमाग हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान आणि छत्तीसगढ येथील पुरावे देण्याच्या हाका उठू लागल्या.
हे झाले की, नंतर आम्ही लोकसभेच्या ७० जागांबद्दलचे पुरावे देणार असे काँग्रेसवाले बोलू लागले. काँग्रेसने केलेल्या या आरोपांवर ६० टक्के लोकांचा विश्वास बसतो आहे असा सर्व्हे C-Voterने जाहीर केला. त्यानंतर काय झाले कुणास ठाऊक पण नंतर दोनच दिवसांत, ‘आत्ता लगेच लोकसभेची निवडणूक झाली, तर भाजप पूर्ण बहुमत मिळवेल’, असाही सर्व्हे C-Voterने जाहीर केला. कशाचा पायपोस कशात उरला नाही. राजकीय वादळाचे ढग भारतीय लोकशाहीच्या क्षितिजावर दिसू लागले. काय होणार ते शिरोजीलासुद्धा कळेना. त्याने याबद्दल आदम गोंडवी यांच्या दोन ओळी आपल्या रोजनिशीमध्ये लिहिल्या आहेत -
‘कोठियों से मुल्क़ के मेआर को मत आँकिए
असली हिंदुस्तान तो फुटपाथपर आबाद हैं’
घरामध्ये बसून खरं-खोटं करण्याचा प्रयत्न करू नका. खरा भारत फुटपाथवर राहतो आहे. त्याच्या मनात जे काही असते तसेच घडणार असते. हे असे सगळे असल्यामुळे, काय घडणार आहे, याविषयी अंदाज वर्तवताना शिरोजी कधीही दिसत नाही. त्याची पात्रं बोलतात, अंदाज वर्तवतात, भांडतात, पण शिरोजी शांत असतो. इतिहासाच्या या अशा छोट्या आवर्तनात शिरोजीला फार रस दिसत नाही, परंतु असे असले तरी या छोट्या आवर्तनांविषयीची सगळी माहिती शिरोजी अत्यंत निगुतीने जमवत आणि नोंदवत राहतो.
अशी अनेक छोटी छोटी आवर्तने घडल्यानंतर, लोकशाहीचे महाआवर्तन अंगडाई घेणार, याविषयी शिरोजी निर्धास्त होता. त्यामुळेच की काय, कुठल्याही वादळात शिरोजीच्या लोकशाही, संविधान, प्रेममयता आणि क्षमाशीलता यांच्याविषयीच्या निष्ठा हादरताना दिसत नाहीत. हाच खरा ‘चार्म’ आहे शिरोजीचा आणि त्याच्या बखरीचा, हे आजचे २१२५मधील वाचक नक्कीच मान्य करतील!
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment