२०२५ सालच्या जुलै महिन्यात विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय राजकारण निर्णायकरित्या बदलून टाकले. त्यांनी बेंगलोरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारने २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘वोट चोरी’ केल्याचा आरोप केला. बेंगलोर सेंट्रल या लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण त्यांनी दिले. इथे ‘एक लाख मतांची चोरी झाली’ असा आरोप त्यांनी केला. या लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातल्या सात मतदारसंघांत मिळून काँग्रेस सुमारे ८० हजार मतांनी पुढे होती. परंतु महादेवपुरा एकट्या मतदारसंघात भाजप १ लाख १४ हजार मतांनी पुढे गेली. याच मतदारसंघात १ लाख २५० खोटे मतदार ‘रजिस्टर’ झाल्याचे ‘पुरावे’ राहुल गांधी यांनी दिले.
या आरोपानंतर एकच राळ उडली. काँग्रेस पक्षाने मोठी ‘सोशल मीडिया कॅम्पेन’ सुरू केली. खोटी मते कशा प्रकारे वाढली, याच्या लोकांना स्मजतील अशा छोट्या छोट्या कॅप्शन्स तयार केल्या. या कॅप्शन्स व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम, एक्स आणि यू-ट्यूब शॉर्ट्स या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्या.
मुख्य कॅप्शन्स पुढीलप्रमाणे होती -
डुप्लिकेट मतदार - ११९६५
खोटे पत्ते देऊन मतदार झालेले - ४०००९
एका घराच्या पत्त्यावर रजिस्टर झालेले अनेक मतदार - १०४५२
फोटो न देता मतदार झालेले ४१३२
‘फॉर्म ६’चा गैरवापर करून झालेले मतदार - ३३६९२
या आरोपामुळे सगळा भारत ढवळून निघाला.
शिरोजीसुद्धा अस्वस्थ झाला. या एका आरोपामुळे तो भाजप ‘फ्रॉड’ करून जिंकली, असं म्हणणार नव्हता, परंतु निवडणूक आयोगानेच दिलेल्या याद्यांचे विश्लेषण करून राहुल गांधी जाहीरपणे बोलत होते. ते काही संसदेमध्ये बोलत नव्हते. संसदेमध्ये काहीही बोलता येते. खटला होत नाही, पण बाहेर आणि तेसुद्धा पत्रकार परिषद घेऊन! राहुल गांधी यांना नक्कीच काहीतरी विश्वास वाटत असणार! बरं, पंधरा दिवस होऊन गेले तरी निवडणूक आयोगाने एफआयआरसुद्धा दाखल केला नव्हता.
शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले - “हे प्रकरण गंभीर आहे. हे आरोप गंभीर आहेत. हे आरोप भाजपवर चिकटणार आहेत. हे खरे आहेत की खोटे याविषयी सामान्य मतदार आता फार विचार करणार नाही. तो सरळ विश्वास ठेवून मोकळा होणार! विशेषतः निम्न मध्यमवर्ग आणि ब्राह्मणेतर मध्यमवर्ग! हे दोन वर्ग गेल्या एक दोन वर्षांत हळूहळू भाजपच्या विरोधात जाऊ लागले होते. कारण त्यांचे जीवनमान अवघड होत चालले होते. ‘पिछड़ा’ आणि ‘अतिपिछड़ा वर्ग’ तर भाजपच्या विरोधात आधीच गेला होता. हे दोन वर्गसुद्धा राहुल गांधी यांच्यावर सरळ विश्वास ठेवून मोकळा होणार होते!
लोक वैतागलेले होते आणि लोकसभा निवडणुकीनंतर ज्या प्रकारे घटना घडत गेल्या, त्याने लोक अस्वस्थ झाले होते. प्रश्न भाजपच्या १६ टक्के निष्ठावान मतदारांचा नव्हता. तो मतदार, भारत ‘विश्वगुरू’ झाल्याच्या धुंदितच होता. प्रश्न रोजची भाकरी मिळवण्यासाठी जगाचे टक्केटोणपे खाणाऱ्या लोकांचा होता. या लोकांना डोळे उघडे ठेवून विचार करावा लागत असतो. हे लोक काय काय घडते आहे, हे डोळे उघडे ठेवून बघत असतात. ‘अंधभक्त’ होण्याची चैन त्यांना परवडत नाही.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. आम्ही ‘चारशे पार’ करणार, अशा लंब्याचौड्या घोषणा दिल्यावर त्यांना २४० जागा मिळाल्या होत्या. परंतु या पार्श्वभूमीवर झालेल्या दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्र या विधानसभा निवडणुका भाजपने आश्चर्यकारक पद्धतीने जिंकल्या होत्या.
प्रत्येक वेळी भाजप जिंकली की, तीच तीच कारणे देण्यात येत होती. मोदींचा करिश्मा, त्यांचे ‘हिंदू-हृदय-सम्राटत्व’, भाजपचा शिस्तबद्ध केडर बेस, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मारलेली वैश्विक भरारी! परत परत तीच कारणे! ही असली कारणे ऐकून लोक वैतागलेले होते. ज्यांचे जीवनमान खालावलेले होते असा वर्ग आपण ‘विश्वगुरू’ झालो आहोत, या प्रचारावर कसा विश्वास ठेवू शकणार होता?
भारताचा जीडीपी ६.५ टक्क्यांनी वाढत आहे, असा दावा मोदी सरकार करत होते. परंतु हे सारे आकडे ‘ऑर्गनाईझ्ड सेक्टर’चे होते. ‘अन-ऑर्गनाईझ्ड सेक्टर’ची अवस्था वाईट होती. ‘अन-ऑर्गनाईझ्ड सेक्टर’चा विचार केला, तर जीडीपीमध्ये १ ते २ टक्क्यांची वाढ होती. ही छोटीशी वाढ सगळ्या जनतेचे जीवनमान सुधरवण्यासाठी पुरेशी नव्हती. पुरेशा नोकऱ्या निर्माण करण्यासाठी पुरेशी नव्हती.
शिवाय, भारतामधील खालच्या वर्गाचे उत्पन्न महागाईच्या प्रमाणात वाढले नव्हते. या वर्गाकडे ना फ्लॅट होते, ना मोठे इन्श्युरन्स होते, ना मेडिकल इन्श्युरन्स होते! डोळे उघडे ठेवून परिस्थिती समजून घेणे, हा एकच ‘इन्श्युरन्स’ या लोकांकडे होता. हे लोक चोरी यासारख्या प्रकाराकडेसुद्धा मोकळ्या मनाने आणि ‘कॉमनसेन्स’ जागा ठेवून बघू शकत होते. प्रसिद्ध हिंदी कवी आदम गोंडवी यांनी या वर्गाची भावना फार प्रभावीपणे व्यक्त केली होते. ते लिहितात -
‘चोरी न करें, झूठ न बोलें तो क्या करें।
चूल्हे पें क्या उसूल पकाए शाम को।।
घर में ठंडे चूल्हे पर अगर पतीली है ।
बताओ कैसे लिख दूँ धूप फागुन की नशीली हैं ।।’
परिस्थितीकडे एवढ्या मोकळेपणाने पाहणाऱ्या लोकांना थोडा काळ फसवणे शक्य असते, पण सदासर्वकाळ फसवता येणे अशक्य असते. या लोकांच्या विचारांचे अँटेने सतत काम करत असतात, हे लोक सतत सजग असतात. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर हे अँटेना काम करू लागले होते.
भाजप घटना बदलण्याच्या विचारात आहे, एवढे कळल्यावर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खूप गोंधळ माजला होता. भाजप २४०वर येण्यात या समजाचा म्हणा, गैरसमजाचा म्हणा, खूप मोठा भाग होता. आता तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतांच्या अधिकाराची चोरी! आता काही खरे नव्हते! भाजप आता गोत्यात आली होती. ‘वोट चोरी’ झाली की नाही, हे व्हायचे तेव्हा सिद्ध होवो, पण आता भाजपने काही ‘तिकडम’ केली नाही, काही ‘चालबाजी’ केली नाही, तर या पुढच्या निवडणुका जिंकणे तिला फार अवघड बनून जाणार होते.”
आदम गोंडवी यांच्या ओळी उदधृत करून शिरोजीने आपण कोणत्या वर्गाविषयी बोलत आहोत, हे बरोबर अधोरेखित केले होते. या वर्गाला भारत ‘विश्वगुरू’ झाला आहे की नाही, हा विचार करण्यातसुद्धा काही रस नव्हता. आपले जीवन सुधारत आहे की नाही, हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. ‘मोकळी जीवनदृष्टी’ हे त्यांचे प्रमुख लक्षण होते. याच लोकांनी काँग्रेसला २०१४ साली भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लोकभेमध्ये ४५वर आणले होते.
हे लोक बघत होते की, एकामागून एक अनपेक्षित निकाल लागत आहेत. हे लोक ईव्हीएमचीसुद्धा चर्चा ऐकत होते. विश्लेषण करण्यासाठी निवडणूक आयोग काँग्रेसला मतदार याद्या देत नाहिये, हेसुद्धा हे लोक ऐकत होते. आणि आता महादेवपुरा!
तिकडे काँग्रेस पक्षसुद्धा सतर्क झाला होता. जसजसे अनपेक्षित निकाल लागत गेले, तसतसा काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या मागू लागला… ज्या कॉम्प्युटरवर ‘रन’ करता येतील आणि पटापट विश्लेषण करता येईल अशा याद्या द्या!
खरं तर २०२३ सालच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़ विधानसभा निवडणुकीमधील आश्चर्यजनक निकालानंतरच ही मागणी सुरू झाली होती. तेव्हा या याद्या दिल्या गेल्या नाहीत. त्यानंतर राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्र या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये एकामागून एक अत्यंत आश्चर्यजनक निकाल लागत राहिले, भाजप जिंकत राहिली. प्रामाणिकपणे काम करणारे पोलस्टर्स, जमिनीवर तीस तीस वर्षे काम करणारे पत्रकार, राजकारण अत्यंत तीक्ष्ण नजरेने बघणारे विचारवंत अशा सगळ्या लोकांचे अंदाज चुकवत भाजप जिंकत राहिली।
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात खरं तर भाजपचे ‘पानिपत’ झाले होते. भाजपप्रणित आघाडीला ४८पैकी फक्त १८ जागा मिळाल्या होत्या. परंतु त्यानंतर पाच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित आघाडीला महाराष्ट्र विधानसभेत २८४पैकी २३७ जागा मिळाल्या.
असे का झाले, याचा विश्लेषण अर्थातच काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीमध्ये सुरू झाले. त्यात दिसून आले की, लोकसभा निवडणुकीनंतरच्या पाच महिन्यांत महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये अचानक प्रचंड वाढ झाली होती. या पाच महिन्यांत किमान ४५ लाख मतदार वाढले. त्या आधी मतदारांची संख्या ४५ लाखांनी वाढायला नऊ वर्षं लागली होती.
यानंतर मात्र इलेक्ट्रॉनिक याद्यांची मागणी फारच तीव्र होत गेली. प्रत्येक वेळी निवडणूक आयोग नकार देत राहिला. घ्यायच्या तर कागदी याद्या घ्या, अशी भूमिका घेत राहिला. जीवनमान खालावलेले लोक हे सारे बघत होते, टी-स्टॉलवरही चर्चा ऐकत होते. का नाही मिळत याद्या, ‘कर नाही त्याला डर कशाला’, असे सूर चौफेर उमटू लागले होते.
शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे - “२४ जूनपासून मी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. खूप लोकांशी बोललो. जवळ जवळ सत्तर टक्के लोक म्हणत आहेत की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गोंधळ झाला आहे. याचा अर्थ असा नाही की, गोंधळ झाला असेलच. पण ‘पब्लिक पर्सेप्शन’ काय आहे, हे आपल्या लक्षात आले पाहिजे. लोकांच्या मनात निवडणूक आयोगाविषयी संशय निर्माण झाला आहे. अर्थात त्याला आयोगाचे वर्तनच जबाबदार आहे. अंधभक्त सोडले, तर कुणाचाही संशय वाढेल असेच वर्तन निवडणूक आयोगाने केले आहे. महाराष्ट्रात शेवटच्या तासात ७५ लाख मते पडली. ते आरोप झाल्यावर प्रत्येक मतदान केंद्रावरच्या मतदानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितले गेले. त्याला आयोगाने नकार दिला. त्यामागोमाग व्हिडीओ रेकॉर्डिंग्ज निवडणुकीनंतर दीड वर्षे न ठेवता केवळ ४५ दिवसांनी डिलीट केले जातील, असा कायद्यात बदल केला गेला. या अशा गोष्टींमुळे आयोगाची विश्वासार्हता खाली खाली जात राहिली आहे. खरं तर ही विश्वासार्हता २४ सालच्या लोकसभेच्या वेळीच कोसळली होती. ‘सीएसडीएस-लोकनीती पोल्स’ने तेव्हा याबाबत सर्व्हे केला होता. त्यात फक्त २८ टक्के लोक निवडणूक आयोग विश्वासार्ह आहे, असे म्हणत होते. हाच आकडा २०१९ साली ५१ टक्के होता. म्हणजे आता तर बोलायलाच नको.”
शिरोजीच्या या टिपणांवरून इतिहास आळोखे-पिळोखे देऊन नव्या आवर्तनासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो आहे की काय, असे शिरोजीला वाटत होते, हे स्पष्ट होते. शिरोजी अस्वस्थ होता आणि भारतसुद्धा. या काळात ‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल, तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता!
हीच अस्वस्थता शिरोजीच्या तेविसाव्या बखरीमध्ये उतरली आहे.
- श्रीमान जोशी, संपादक, ‘शिरोजीची बखर’
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘वोट चोरी’ प्रकरण पेटले तसे पांडेजींनी सगळ्यांना फोन केले. अविनाश आणि नाना सोडून सगळ्यांनी यायचे मान्य केले, पण हे दोघे काही केल्या येईनात! शेवटी पांडेजी शेजारच्या हलवायाच्या दुकानावर गेले आणि किलोभर इम्रती पुड्यात घेऊन आले. त्याचे छायाचित्र काढून त्यांनी नानांना पाठवले. खाली लिहिले – ‘जौनपूरसे आई हुई झगडूराम नारायणदास हलवाईकी स्पेशल इम्रती! नानाजी खास आपके लिए - तत्काल पधारने की क्रिपा करें!’ त्यानंतर अर्ध्या तासात नाना आले! येताना अविनाशलासुद्धा घेऊन आले.
नाना - बहुत बहुत धन्यवाद पांडेजी! आपको हमारी याद रह गई.
पांडेजी - याद रह गई?
भास्कर - (हसत) ‘तुम्हाला आमची आठवण राहिली’ याचं भाषांतर आहे ते पांडेजी!
पांडेजी - हां हां, जैसेही हम जौनपूर के कैंडी रोड से गुजर रहे थे और जैसीही हमे नानाजी की याद आई हम सीधे झगडूराम हलवाई की दुकान चले गए!
अच्युत - कैंडी म्हणजे काय?
राघव - कैंडी म्हणजे कँडी.
अच्युत - कँडीला ‘कैंडी’ का म्हणतात?
राघव - तो कँडीचा हिंदी उच्चार आहे.
अच्युत - विचित्रच आहे. (हु हु)
राघव - आपण नाही का शिक्षणतज्ज्ञ मेकॉलीला ‘मेकॉले’ म्हणत?
अच्युत - पण त्याचं नाव मेकॉलेच आहे.
भास्कर - करेक्ट, हिंदीमधले अच्युतसुद्धा कँडीचा खरा उच्चार ‘कैंडी’ आहे, असंच म्हणतात.
(समर जोरात हसतो. अच्युत गप्प बसतो.)
(‘आत्मकेंद्रितता’ हे भाजपच्या बहुसंख्य मतदारांचं मुख्य लक्षण होतं. हा गुण म्हणा, दुर्गुण म्हणा तुमच्यात असल्याशिवाय तुम्ही मोदी समर्थक होऊ शकत नाही. कारण व्यक्तीची आत्मकेंद्रितता सामाजिक पातळीवर नेली की, ‘मोदीवाद’ तयार होतो! - संपादक)
अविनाश - (मोबाईलमध्ये बघत.) मी सर्च केलं नेटवर. खरंच आहे झगडूराम हलवाई जौनपुरमध्ये! पत्तासुद्धा ‘कैंडी रोड’ असा लिहिला आहे.
पांडेजी - एक चीज जान लीजिए अविनाश बाबू, हम अपने पिताजीसे झूठ बोल सकतें हैं, लेकिन हमारे नानाजी से नहीं! बहुत आदरणीय हैं नानाजी हमारे लिए!
(नाना यावर प्रसन्न हसले. झालेल्या कौतुकाने त्यांचे गाल लालेलाल झाले).
भास्कर - अविनाश तू पांडेजींचे म्हणणे जसे चेक करून घेतोस, तसे मोदीजींचे का घेत नाहीस?
अविनाश - काय गरज आहे! मोदीजी अवतार आहेत! पांडेजी अवतार आहेत का? (पांडेजींकडे वळून) ओ पांडेजी तुम्ही अवतार आहात का मोदीजींसारखे?
पांडेजी - मोदीजी अवतार हैं या नहीं मुझे नहीं मालूम, लेकिन मैं निश्चित तौर पे कह सकता हूँ की, मैं अवतार नहीं हूँ.
अविनाश - बघ!
(चर्चा सुरू झाली, त्यामुळे इम्रती सत्कारणी लागली. ते बघून प्रसन्नतेचे भाव पांडेजींच्या चेहऱ्यावर उमटले.)
राघव - तुमचे अवतार अजून काही बोलले नाहीत ‘वोट चोरी’बद्दल!
अविनाश - मोदीजी खोटारड्या लोकांना उत्तरं देत बसत नाहीत. खोटं आवडत नाही मोदीजींना!
(भास्कर आणि समर जोरात हसतात)
अविनाश - हे बघ, मोदीजी कधीही खोटं बोलत नाहीत. सगळा देश साक्षीदार आहे. त्या बिचाऱ्यांना वेळ तरी आहे का खोटं बोलायला? एवढं करतात ते देशासाठी!
समर - एवढं काम करतायत तर मग ‘वोट चोरी’ करण्याची का पाळी आली?
अविनाश – अरे, किती थुंकाल सूर्यावर? शेवटी ती थुंकी तुमच्याच तोंडावर येऊन पडणार आहे! त्या सूर्याला काहीही फरक पडणार नाहिये.
भास्कर - काही फरक पडत नाही, तर ‘इलेक्ट्रॉनिक मतदार यादी’ द्यायला सांग की, तुझ्या सूर्याला!
अविनाश - कुणाला द्यायची?
भास्कर - काँग्रेसला!
अविनाश - कशाला?
अच्युत - हे बघ अविनाश, आपण भाजपवाले आहोत. आपल्यावर कुणी आरोप करत असेल, तर आपण ते आरोप खोडून काढलेच पाहिजेत.
नाना - मग हेच करत बसावं लागेल आपल्याला. राष्ट्रकार्य व्हायचंच नाही काही!
राघव - जे काही राष्ट्रकार्य करायचं आहे, ते नीतीमत्ता पाळूनच करायचं असतं नाना!
नाना - गरज नाही. मोदीजी अवतार आहेत, काही गरज नाहिये त्यांना नीतीमत्ता पाळण्याची
अविनाश - तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर नाहियेत.
समर - म्हणजे?
नाना - अवतार हा देवाचा अवतार असतो. हे सगळे जग आणि या जगातली सगळी नीतीमत्ता त्यानेच तयार केली आहे. नीतीचा खरा अर्थ देवाला माहीत असतो. त्यामुळे देव म्हणेल तीच नीती.
अविनाश - देवाला शिकवायला नका जाऊ तुम्ही!
समर - मोदीजी अवतार असतील, तर त्यांनी एखादा चमत्कार करून दाखवावा!
भास्कर - गोवर्धन पर्वत उचलून दाखवा म्हणावे त्यांना!
अविनाश - (चिडत) तू गप बस! मोदीजी काय नोकर आहेत का तुझे?
भास्कर - तुम्ही गोवर्धन पर्वत उचलून दाखवा, नाहीतर इलेक्ट्रॉनिक मतदार यादी द्या.
अविनाश - भाजप नेहमी नियम पाळूनच जिंकत आली आहे. खोटेपणा रक्तातच नाही भाजपच्या! मोदीजींच्याही नाही.
राघव - ते बरोबर आहे तुझं! पण खरंच का देत नाही रे मतदार यादी तुम्ही?
नाना - आमचा काय संबंध? निवडणूक आयोगाकडून घ्या.
अविनाश - हो निवडणूक आयोगाकडून घ्या. त्यानं दिली तर! (हु हु हु).
नाना - नाहीतर सर्वोच्च न्यायालयाकडे जा! ते सांगतायत का बघा निवडणूक आयोगाला यादी द्यायला!
(अविनाश मोठ्याने हसतो)
(२०२४च्या निवडणुकीनंतर मोदीभक्तांना वाटू लागले होते की, लोकशाहीचे सगळे स्तंभ मोदीजींनी आपल्या पायाखाली दाबून धरले आहेत. त्यांचा भ्रमनिरास व्हायची वेळ आता आली होती. - संपादक)
राघव - हे बघ, आम्हाला सर्वोच्च न्यायालयावर आरोप करायचे नाहियेत. तू उगीच नाही तो विषय काढू नकोस.
अविनाश - सर्वोच्च न्यायालयाला सांग ना यादी द्यायला.
राघव - गेलेच आहेत लोक सर्वोच्च न्यायालयात!
अविनाश - तुम्हाला केळंसुद्धा मिळणार नाहिये तिथं.
भास्कर - हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान झाला!
नाना - अविनाशवर दावा लावा न्यायालयाचा अपमान केला म्हणून, बघा न्यायालय काय म्हणतं ते.
(सर्वोच्च न्यायालय म्हणजे आपला घरगडी आहे असे मोदीभक्तांना वाटू लागले होते. - संपादक)
भास्कर - आमचं म्हणणं एवढंच आहे की, तुम्ही याद्या द्या. सामान्य माणसाचंसुद्धा म्हणणं आहे की, याद्या दिल्या गेल्या पाहिजेत.
समर - आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बूथवर संध्याकाळी पाचनंतर किती मतदान झालं त्याचे व्हिडिओ.
भास्कर - महाराष्ट्रात संध्याकाळी ७५ लाख मतदान झाले, असे आरोप असतील तर त्याचे निराकरण करा.
नाना - नाही पडली.
समर - मग नंतर तुम्ही मतदानाचे आकडे का वाढवले एकदम?
अविनाश – अरे, दिवसभरात पडलेल्या मतांचे आकडेच वाढवले. जशी माहिती येत गेली, तसे वाढले आकडे!
समर - तुम्ही नक्की केलेलं नाहिये ना काही?
अविनाश - नाही, मोदीजींना गरजच नाहिये असलं काही करण्याची.
भास्कर - मग देऊन टाका ना व्हिडिओसुद्धा!
अविनाश - काय गरज?
अच्युत - ‘कर नाही त्याला डर कशाला’ असं लोक म्हणतायत. आम्ही काय उत्तर द्यायचं?
नाना - एक विचार करा, एवढी मतं कशी टाकता येतील? ईव्हीएमवर एक मत टाकायला किमान एक मिनिट लागतं. टायमरच तसा लावलेला असतो.
राघव - मी चौकशी केली आहे तज्ज्ञांकडे. ते टायमिंग ईव्हीएमचं सील न उघडता बदलता येतं.
अच्युत - कसलं सील?
समर - अरे, मशीन सील केलेलं असतं मतदानाच्या वेळी. ते उघडून कुणी टॅम्पर करू नये म्हणून.
अच्युत - आणि ते सील न उघडता टायमिंग सेट करता येतं?
राघव - माझा तज्ज्ञ मित्र म्हणाला - हो, करता येतं!
अविनाश - कसली फालतू चर्चा करताय तुम्ही? मूर्ख लोक.
समर – बरं, बाबा आम्ही नाही करत फालतू चर्चा. तू मोदीजींना सांग व्हिडिओ द्यायला.
अविनाश - तू गप रे!
नाना - तुम्ही एक विचार करा, राहुल म्हणतोय की, महाराष्ट्रामध्ये ४५ लाख मतदार रजिस्टर करून भाजप जिंकून आले.
अविनाश - परवा म्हणाला एक कोटी.
भास्कर - तो रिव्हाइज केलेला आकडा होता.
भास्कर - आणि त्याचा पुरावा देणार आहे तो.
समर - आणि राहुल पुरावा नाही दिला, तर आम्ही त्याला खोटारडा म्हणू.
भास्कर - अवतार नाही म्हणणार.
अविनाश - (संतापत) तू गप्प बस! एकदम गप्प!
नाना - अविनाश, असं चिडू नये. मी विचारतो प्रश्न त्यांना. (भास्करकडे वळत) भास्कर, खोटी मतं रजिस्टर झाली. ती करायला एक कोटी लोक भाजपने आणले असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
अविनाश - (जोरात हसत) व्हॉट अ शॉट नाना!
राघव – अहो, कशाला लागतायत एक कोटी लोक? १० हजार स्वयंसेवकांची टीम तयार करायची, निवडणुकीच्या पाच महिने आधी. म्हणजे दीडशे दिवस आधी. प्रत्येक स्वयंसेवकांनी रोज एक जरी खोटा मतदार रजिस्टर केला, तरी पाच महिन्यांत दीड कोटी मतदार रजिस्टर होतात.
अविनाश - इतके कसे शक्य आहे?
समर - रोज दहा हजार लोक एकेक मत रजिस्टर करणार म्हणजे दिवसात किती झाले?
अच्युत - दहा हजार!
समर - या प्रमाणे दहा दिवसांत किती झाली?
अविनाश - एक लाख.
समर - मग या प्रमाणे शंभर दिवसांत किती झाली?
भास्कर - एक लाख गुणिले शंभर! म्हणजे एक कोटी.
अच्युत - म्हणजे दीडशे दिवसांत दीड कोटी!
अविनाश – अरे, शनिवार-रविवार वगैरे काही आहे की नाही?
राघव - म्हणूनच तर राहुल म्हणतोय की, ४५ लाख ते एक कोटी ‘खोटे मतदार’!
नाना – अहो, एवढी १० हजारांची टीम तरी कशी तयार करायची? कागदावर गणित करण्याएवढं सोपं आहे का ते?
अविनाश - व्हॉट अ शॉट नाना! (नाना गालातल्या गालात हसतात).
भास्कर - अहो, स्वयंसेवक वापरायचे!
(समर आणि भास्कर जोरात हसतात, राघव आणि पांडेजी गालातल्या गालात हसतात)
अविनाश - तोंड सांभाळ अच्युत!
अच्युत - (एकदम गडबडतो) काय झाले? काही चुकलं का माझं?
समर - तुझं काही चुकलं नाही. चोराच्या मनात चांदण्यांचा प्रकाश पडला.
नाना - शांत हो अविनाश. फालतू विनोदांकडे लक्ष देऊ नये. (भास्करकडे वळत) अरे भास्कर, मला एक सांग, टीम बनली तरी रजिस्टर कसे होणार एवढे मतदार? झोपला आहे का निवडणूक आयोग?
भास्कर - रजिस्टर करणाऱ्या माणसाला हजार रुपये द्यायचे प्रत्येक रजिस्ट्रेशनसाठी. मग काय! छायाचित्र न लावता रजिस्ट्रेशन, एका घरनंबरवर दोन-दोनशे मतदारांचे रजिस्ट्रेशन! बिनापत्त्याच्या मतदारांचे रजिस्ट्रेशन, मतदाराचे तोंड न बघता रजिस्ट्रेशन!
अविनाश - तुमच्याकडे काय पुरावा आहे?
भास्कर - आमच्याकडे काहीही पुरावा नाही. नाना म्हणाले एवढा सारा घोळ कसा शक्य आहे, म्हणून आम्ही फक्त सांगतोय की, एक कोटी खोटे मतदार कसे रजिस्टर करता येतील.
अविनाश - म्हणजे तुम्ही पुरावा नसताना सांगताय काय झालं आहे ते!
भास्कर - आम्ही काय झालं आहे त्यावर काहीच बोलत नाहिये. आम्ही फक्त गणित करतोय, नानांनी प्रश्न विचारला म्हणून!
नाना - ठीक आहे, आपण चर्चेपुरते म्हणू की, झाले मतदार रजिस्टर! पण त्यांनी अॅक्च्युअल मतं द्यायला पाहिजेत ना!
अविनाश - व्हॉट अ शॉट नाना!
राघव - त्यात काय अवघड आहे? मतदानाच्या दिवशी ज्या मतदारसंघात घोळ घालायचा आहे, तिथे बाहेरच्या लोकांना न्यायचे. तयार केलेली मतदार कार्डं द्यायची. आणि म्हणायचे करून या ‘मतदान’ म्हणून!
भास्कर - आणि हे लोक कमी पडले, तर संध्याकाळी पाचनंतर दाबायची बटणं!
अविनाश – अरे, किती नालायक माणसं आहात तुम्ही.
भास्कर - असं घडलं आहे असं म्हणत नाही आहोत आम्ही. आम्ही फक्त नानांनी विचारलं म्हणून सांगतो आहोत. तसं बघायला गेलं तर आमचा निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे.
अविनाश - मग कशाला पाहिजेत तुम्हाला इलेक्ट्रॉनिक याद्या आणि व्हिडिओ?
समर - आम्हाला नकोच आहेत.
अविनाश - मग?
समर - काँग्रेस पक्षाला हव्या आहेत आणि आता सामान्य जनतेलासुद्धा हव्या आहेत.
भास्कर - त्या द्यायला पाहिजेत तुम्ही! नाहीतरी आपल्या निष्पाप निवडणूक आयोगाबद्दल लोकांमध्ये संशय वाढत जाणार हे नक्की.
अविनाश - काहीतरीच! नाही दिली तर काय करणार आहे तुमची जनता?
भास्कर - हे बघ आपण हिशोबाने बोलू.
अविनाश - बोल.
भास्कर - कुठल्याही पक्षाला लोकांची खरी मतं लागतातच!
नाना - (अस्वस्थ होऊन) कशी?
भास्कर - समजा, ४५ लाख खोटे मतदार रजिस्टर झाले. महाराष्ट्रात २८४ मतदारसंघ आहेत. म्हणजे प्रत्येक मतदारसंघात किती झाले?
अविनाश - किती झाले?
भास्कर - (मोबाईलमध्ये कॅल्क्युलेट करत) ४५ लाख भागिले २८४ म्हणजे प्रत्येक मतदारसंघात झाले १५,८४५. असं करून तुम्हाला २८४पैकी सुमारे २३० जागा जिंकता येतील. कारण बहुतांश मतदारसंघात विजयाची टक्केवारी १५ हजाराच्या आतच असते.
समर - पण जर लोक चिडले आणि विरोधी पक्षाचे उमेदवार वीस हजारापेक्षा जास्त मतांनी जिंकायला लागले, तर मग घोळ घालूनही काही उपयोग होणार नाही.
अच्युत – ‘लाडली बहना’सारख्या योजनेमुळेसुद्धा नाही?
समर – अरे, ते पैसे नीट देता येणार आहेत का तुम्हाला पाच वर्षं? महाराष्ट्र कंगाल होत चालला आहे.
पांडेजी - हमें क्या लगता है नानाजी, चुनाव आयोगने इलेक्ट्रोनिक वोटिंग लिस्ट देने का दिल और गुर्दा दिखाना चाहिए?
अविनाश - दिल और गुर्दा दिखाना चाहिए म्हणजे?
समर – अरे, दिल म्हणजे हृदय, गुर्दा म्हणजे किडनी.
अविनाश - हृदय आणि किडनी दाखवायची म्हणजे?
नाना - लपवलेल्या गोष्टी दाखवायच्या.
राघव - नाही. हिंमत दाखवायची!
नाना - तुम्ही दुसरं काहीही मागा, मोदीजी असेपर्यंत तुम्हाला लिस्ट आणि व्हिडिओ मिळणार नाही.
अविनाश - आणि निवडणूक जिंकायचे अजूनसुद्धा अनेक छान छान मार्ग माहीत असणार मोदीजींना! तुम्हाला पुरून उरणार आहेत ते!
समर - हो. लोक म्हणतायत की, महाराष्ट्र मतदार ‘अॅड’ करून जिंकला, आता बिहार मतदार ‘डिलीट’ करून जिंकायचा उद्योग चाललाय?
अच्युत - म्हणजे?
भास्कर - तिथं नव्यानं मतदार याद्या तयार करायचं काम काढलं आहे.
अच्युत - का?
भास्कर - गरीब आणि दलित चिडले आहेत भाजपवर.
समर - म्हणून त्यांची नावं ‘डिलीट’ करायची याद्यांमधून.
राघव - असं राहुल म्हणतोय!
अच्युत - मतदार म्हणून रजिस्टर व्हायचं असेल, तर अकरा कागदपत्रं मागितली गरिबांकडून.
भास्कर – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कांत म्हणाले की, एवढी कागदपत्रं तर माझ्याकडेसुद्धा नाहीत.
समर - तिकडे ऑलरेडी ६५ लाख लोकांना ‘डिलीट’ केलंय. अजून पन्नास एक लाख ‘डिलीट’ होऊ शकतात.
राघव - बिहार विधानसभेमध्ये २४३ जागा आहेत. ६५ लाख ‘डिलीट’ झाले, म्हणजे प्रत्येक मतदारसंघात सरासरी २६ हजार! महाराष्ट्रात त्याच्या उलट गेम झाली!
समर - असे बिहारी लोक म्हणतायत हं अविनाश. आमचा चुनाव आयोगावर संपूर्ण विश्वास आहे.
नाना - लोकांना काय बोलायचं ते बोलू देत, परंतु जोपर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत घुसखोर लोकांची नावं मतदार यादीतून ‘डिलीट’ होणार म्हणजे होणारच!
राघव - पण न्यायमूर्ती बागची म्हणाले आहेत की, घुसखोर शोधण्याची जबाबदारी गृहमंत्रालयाची आहे, निवडणूक आयोगाची नाही.
अविनाश - त्याला म्हणावे- ‘यू शट अप जस्टिस बागची, मोदीजी इज देअर. यू जस्ट शट अप!’
समर - अय्यो! न्यायालयाचा अवमान!
अविनाश - मोदीजी अवतार आहेत त्यांच्यासमोर कुणी बोलायचं नाही! संपला विषय!
राघव - मोदीजींना म्हणावे - आधी गोवर्धन पर्वत उचला, मग बघू पुढे! मग आमचे बिचारे न्यायमूर्ती बागचीसुद्धा काही नाही बोलणार!
भास्कर - पण जोपर्यंत तुम्ही गोवर्धन पर्वत उचलत नाही, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचं ऐकायचं. कारण घटना ‘सुप्रीम’ आहे!
पांडेजी - (पुढे होऊन चर्चा थांबवत) चलिए इम्रती खाईए! लड़ाई बहुत हो गई!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
ही बखर तर मोठ्या नाट्यपूर्ण वळणावर संपली! खरं तर, इतक्या साऱ्या बखरी झाल्या, परंतु शिरोजीनेच काय परंतु त्याच्या पात्रांनीही कधीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला नव्हता. दिल्ली निवडणुकीच्या वेळी एकेका घरात दोन-दोनशे मतदार ‘रजिस्टर’ झाल्याचे निदर्शनास आले, तेव्हा मात्र शिरोजीने संशयाचा विचार मांडायला सुरुवात केली. यावेळेस तर हद्द झाली. पत्ता नसलेले ४०,००० मतदार! पत्ता नसलेले ४० हजार मतदार महादेवपुरात असतील, तर तो फर्जीवाडा आहे, असेच म्हटले पाहिजे, असेच आज २१२५मधील वाचक म्हणेल.
राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात फार मोठा घाव घातला होता. संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता. जे काही आरोप करायचे आहेत ते अॅफिडेव्हिट करून करा, असा बचाव निवडणूक आयोगाने केला होता. अशा बचावाने आता फक्त भक्तांचे समाधान होणार होते. खरा संशय याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे वाढत होता. दिवसामाशी वाढत होता.
या सगळ्या गोंधळामुळे शिरोजी इतके दिवस जे म्हणत होता, त्यावर शिक्कामोर्तब झाले. भारतीय लोकशाही जिवंत होती. तिच्यावर हल्ले झाले, परंतु प्रत्येक वेळी ती पुन्हा उभी राहिली. आजवर शिरोजीने कधीही लोकशाहीच्या चिवटपणावर संशय व्यक्त केला नव्हता. त्याने कधीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला नव्हता. वाचकांनी कुठलीही बखर काढून वाचावी. शिरोजीचा समन्वयवादी दृष्टीकोन आपल्या डोळ्यात भरेल. आज मोदीकालानंतर शंभर वर्षे गेली आहेत. २०२५मध्ये भारतीय लोकशाहीने भरलेला हुंकार आणि त्याचे श्वास आज आपल्याला १०० वर्षांनंतरही जाणवत आहेत. याचे सारे श्रेय संयमाच्या सुलक्षणांनी अवगुंठित झालेल्या शिरोजीच्या लेखणीला आहे.
- श्रीमान जोशी, संपादक, ‘शिरोजीची बखर’
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment