अजूनकाही
प्रसिद्ध मराठी विज्ञानकथा लेखक डॉ. अरुण विनायक मांडे यांचं २८ जुलै २०२५ रोजी निधन झालं. नगरमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी विज्ञानलेखन आणि विशेषतः विज्ञानकथा लेखनातही मोठं योगदान दिलं. त्यांची ८०पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झाली असून, त्यातील आरोग्यविषयक पुस्तकांचे अनुवाद महत्त्वाचे आहेत. ‘मायग्रेन आणि डोकेदुखी’, ‘कॅन्सर आणि निसर्गोपचार’, ‘पाठदुखी विसरा’, ‘योगिक प्राणायाम’ अशा पुस्तकांतून त्यांनी मराठी वाचकांना आरोग्याबाबत सजग करण्याचं काम केलं आहे. जीवनशैली सुधारण्यासाठीची उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत, हे या पुस्तकांचं ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. त्यातही ऑफिसमध्ये फिटनेस कसा राखायचा, टीनएजर्ससाठी फिटनेस मंत्र, अशी सध्याच्या व्यग्र जीवनशैलीला अनुसरून त्यांनी लिहिलेली पुस्तकं उपयुक्त आहेत. या पुस्तकांना ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळाला, मिळतो आहे. त्याचप्रमाणे डॉ. मांडे यांचं आरोग्यविषयक स्तंभलेखनही नियमित सुरू होतं.
इतकं विपुल लेखन करतानाही त्यांच्या लेखनात एक ताजेपणा, सच्चेपणा कायम जाणवत राहायचा. आकर्षक मांडणीमुळे त्यांचं लेखन नेहमीच वाचनीय होत असे. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक प्रभावी नभोनाट्यं लिहिली. केवळ प्रौढ वाचकांसाठीच नव्हे, तर कुमार वाचकांसाठीही त्यांनी आवडीनं लिहिलं. हे त्यांच्या लेखनशैलीतील विविधतेचं आणखी एक उदाहरण आहे.
विज्ञानकथा हे डॉ. मांडे यांचं विशेष आवडीचं क्षेत्र होतं. ‘अमाणूस’ या विज्ञानकथासंग्रहात त्यांनी वैज्ञानिक कल्पना, वैद्यकीय अनुभव आणि माणूसपणाचा शोध या तीनही अंगांचा सुरेख मेळ साधला होता. त्यामुळे त्यांच्या कथा विज्ञानाच्या चौकटीपलीकडे जाऊन मानवी मनाचा आणि मूल्यांचा शोध घेणाऱ्या ठरतात.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
'अमाणूस' या संग्रहाला नारायण धारप यांनी उत्तम प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी डॉ. मांडे यांच्या शैलीचा खास उल्लेख केला आहे. “कथा कल्पनेवर कधीही आक्रमण न करणारा, अत्यंत नैसर्गिक नर्मविनोद. तो कृत्रिम नाही, प्रच्छन्न नाही, ओढूनताणून आणलेला नाही.” या शब्दांमध्ये धारप यांनी डॉ. मांडे यांची शैली अचूक पकडली आहे. याच प्रस्तावनेत धारपांनी डॉ. मांडे यांचे अनेक विज्ञानकथा संग्रह प्रसिद्ध होतील असं म्हटलं आहे आणि ते पुढे खरंही झालं.
मराठी विज्ञानकथांमध्ये डॉ. मांडे यांनी एक वेगळा सूर निर्माण केला होता. त्यांचं लेखन एकीकडे हलकंफुलकं वाटतं आणि त्याच वेळी त्यातून फार मोठा अर्थ समोर येतो. ‘अतिरेकी’सारख्या त्यांच्या कथांमध्ये अनेकदा सद्यस्थितीवर एक उपहासात्मक भाष्य असतं, सामाजिक विसंगती नेमकेपणे मांडलेली असते.
‘शेवटची कथा’ ही त्यांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण विज्ञानकथा. यातील लेखकाची मूळ कथा आपल्यासमोर प्रत्यक्ष येत नाही, मात्र मासिकात प्रसिद्ध झालेल्या कथेवर संपादकांना आलेल्या प्रतिक्रियांमधून ती आपल्या मनात उभी राहते — ही कल्पना आणि मांडणी दोन्ही आगळी आहेत. ‘द्विधा’ या कथेतील भविष्यातील समाज असो की, ‘रूबी’ या कथेतील रोबॉटच्या भावना, डॉ. अरुण मांडे यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. कुमारवयीन वाचकांसाठी लिहिलेली त्यांची ‘खरंच, आईशप्पथ!’ ही कथा आणि तिचा अनपेक्षित शेवट हाही त्यांच्या शैलीचा प्रत्यय देणारा आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
‘प्रदूषण’ आणि ‘गुणसूत्र’ या नभोनाट्यांसाठी त्यांना अखिल भारतीय आकाशवाणी पुरस्कार मिळालेले आहेत. ‘विज्ञान गमती’ या पुस्तकासाठी त्यांना १९९४-९५चा महाराष्ट्र शासन पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर नाट्यदर्पण प्रतिष्ठान पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार, विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, आणि पुणे विद्यापीठाचा चिपळूणकर विज्ञान पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. ‘अमाणूस’ या संग्रहाला स्व. मामा कडलक पुरस्कार मिळाला, तसेच विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं.
डॉ. मांडे यांच्या कथांमधील पात्रं साधी असली, तरी ती आयुष्याच्या असाधारण वळणांवर उभी असतात. त्यामुळे आपण त्यात चटकन गुंततो आणि त्यांच्या प्रश्नांवर विचार करू लागतो. यातून त्यांचं लेखक कौशल्य ध्यानात येईल. त्यांनी नारायण धारप यांच्या अपूर्ण भयकादंबरीचा शेवटही समर्थपणे लिहिला होता आणि तोही धारपांच्याच शैलीत, ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे.
आयुष्यभर डॉक्टर म्हणून हजारो रुग्णांची सेवा केल्यावर अखेरीस मरणोत्तर देहदान करून त्यांनी एका आदर्श डॉक्टरचा धर्मही पूर्णत्वास नेला.
मराठी विज्ञानकथांच्या कार्यक्रमांमध्ये डॉ. मांडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मलाताई यांची वेळोवेळी भेट झाली, तेव्हा त्यांच्या शांत, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. पुढे एका स्पर्धेच्या परीक्षणाच्या वेळी एकत्र काम करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्या सौम्य विचारसरणीचा, साहित्यविषयक जाणिवांचा, आणि नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा अधिक जवळून परिचय झाला. फोनवरून संवाद साधतानाचं त्यांचं मृदू बोलणं कायम लक्षात राहिल.
डॉ. अरुण मांडे यांच्या निधनामुळे मराठी विज्ञानकथांचा एक वेगळा आणि महत्त्वाचा सूर हरपला आहे. त्यांचे साहित्य, त्यांचे विचार आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील. त्यांना विनम्र आणि भावपूर्ण आदरांजली!
............................................................................................................................................................
लेखिका मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
meghashri@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.

Post Comment