शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sun , 13 July 2025
  • संकीर्ण व्यंगनामा नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP पाकिस्तान Pakistan

२०२४चा उत्तरार्ध ते २०२५च्या मध्यापर्यंत शिरोजीने ‘बखर’ लिहिली नाही. शिरोजीसारख्या बहुप्रसव आणि सतत उद्यमशील असलेल्या इतिहासकाराकडून हे अपेक्षित नव्हते.

एक संपादक म्हणून आम्ही याचा आढावा घेतला. या काळात शिरोजीने बखर लिहिली नसली, तरी रोजनिशी मात्र लिहिली आहे. त्यात त्याने १८ जानेवारी २५ रोजी लिहिले आहे - “मोदीकालीन भारतात सगळ्याचाच एक पॅटर्न होऊन गेला आहे. राजकारणात आणि समाजकारणात सतत वेगवेगळ्या घटना घडत असतात. परंतु मोदीकालीन भारतात सरकारपक्ष, प्रसारमाध्यमं आणि मोदी समर्थक यांच्या या घटनांवरच्या प्रतिक्रिया मात्र त्याच त्याच असतात. त्यामुळे अर्थातच विरोधी पक्ष, मोदीविरोधी यू-ट्यूब चॅनेल्स आणि मोदीविरोधक यांच्या त्या प्रतिक्रियांवरच्या प्रतिक्रियांमध्येसुद्धा तोच तोचपणा येतो. याचा दोन्ही पक्षांना कंटाळा येत नाही, कारण त्यांना राजकीय कुरघोड्या करायच्या असतात. परंतु अशा दारुण अवस्थेत रोज नव्याच्या शोधात असलेल्या इतिहासकाराने काय करावे?”

शिरोजी फक्त घडलेल्या घटनांची नोंद करणारा सामन्य इतिहासकार नव्हता. तो कुठल्या तरी राजकीय पक्षाची एकच एक बाजू लावून धरून एकच एक ट्यून परत परत वाजवणारा शाहीरसुद्धा नव्हता. इतिहासाच्या अवलोकनामधून आणि इतिहासलेखनामधून मानवी जीवनाबद्दल आणि मानवाच्या राजकीय वर्तनाबद्दल चिंतनीय असे काही मिळणार नसेल, तर इतिहासलेखनामध्ये त्याला फारसे स्वारस्य नव्हते. जीवनदृष्टीमध्ये काही भर पडणार नसेल तर शिरोजीला इतिहासलेखन कंटाळवाणे वाटत असे. ‘History is a mid-wife of philosophy’ असे त्याचे म्हणणे होते.

त्याचबरोबर विनोदनिर्मितीच्या मागे हात धुऊन मागे लागलेले लेखक असतात. शिरोजी त्यातला नव्हता. झाडावर फुले उमलून येतात, त्याप्रमाणे प्रसंगामधून विनोद आपोआप उमलून आला पाहिजे, असे त्याचे म्हणणे होते.

त्यामुळे एक संपादक म्हणून असे सतत वाटते की, शिरोजीची रोजनिशी एक ‘बुक ऑफ अॅफॉरिझम्स’ (‘तत्त्ववचनांचा एक बटवा’) म्हणून सहज प्रसिद्ध करता येईल. ‘इतिहासामधील तत्त्वज्ञान’ आणि ‘इतिहासलेखनामधील तत्त्ववचने’ असे शिरोजीच्या लिखणाचे स्वरूप आहे. आज बाविसाव्या शतकातील तिसऱ्या दशकात शिरोजीच्या लोकप्रियतेचे गमक त्याच्या लिखणामधील या दोन लक्षणांमध्ये आहे, असे वाटते. असो.

शिरोजी काही काळ शांत होता, परंतु त्याचा फोकस मोदीकालीन मध्यमवर्गाकडे वळला होता. मध्यमवर्ग हा कुठल्याही लोकशाहीचा आधार असतो. शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये अॅरिस्टॉटलचे मध्यमवर्गाविषयीचे एक वाक्य लिहिले आहे - “ज्या समाजात मध्यमवर्ग नसतो, ज्या समाजात गरीब लोक मध्यमवर्गापेक्षा खूप जास्त असतात, त्या समाजात गोंधळाला सुरुवात होते. चांगला मध्यमवर्ग समाजाचा एक जबाबदार असा राजकीय विभाग असतो.” थोडक्यात, ज्या समाजात जबाबदार मध्यमवर्ग बहुसंख्येने असतो, त्या समाजात लोकशाही आणि शांतता टिकते. पराकोटीच्या श्रीमंतीत आणि पराकोटीच्या गरिबीत माणूस अतिरेकी विचारांच्या आहारी जातो, असे अॅरिस्टॉटलचे मत होते.

मध्यमवर्ग हा अतिरेकी श्रीमंत आणि अतिरेकी गरीब या दोन वर्गांमध्ये ‘बफर’प्रमाणे काम करतो. आघातप्रतिबंधनाचे काम करतो. परंतु गंमत अशी झाली होती की, मोदीकालीन भारतात मध्यमवर्ग स्वतःच अतिरेकी विचारसणीकडे सरकू लागला होता. शिरोजीच्या मते ही फार चिंताजनक बाब होती. तसं बघायला गेलं, तर जगभरचा मध्यमवर्ग साधारणपणे प्रगतीशील असतो, असे आपल्याला दिसून येते. परंतु मोदीकालीन भारतात सगळे उलटे होत चालले होते. हा मध्यमवर्ग प्रतिगामी होत चालला होता.

इथे मोदीकालीन मध्यमवर्गाचा भोंदूपणा रंगवताना शिरोजी जॉर्ज बर्नार्ड शॉची मदत घेतो. आपल्या ‘मॅन अँड सुपरमॅन’ या नाटकात शॉने हे चित्र रंगवलेले आहे. माणुसकीमधून जन्मलेली नैतिकता विरुद्ध स्वार्थामधून जन्मलेली दांभिकता, या दोघांमधील संघर्ष हा एक मोठ्या चर्चेचा विषय आहे. माणुसकी आणि नैतिकता हे शॉच्या स्वर्गाच्या संकल्पनेचे भाग आहेत. त्याच्या विरुद्ध भोंदू स्वार्थातून तयार होणाऱ्या सुखांचा नरक! या स्वर्ग आणि नरकामधील द्वंद्व ‘मॅन अँड सुपरमॅन’ या नाटकात शॉने रंगवले आहे.

शॉचा नरक ही अतिशय आकर्षक जागा आहे. सुखांनी आणि रसिकतेने रसरसलेली! त्या उलट स्वर्ग ही त्यामानाने शांत आणि बोअर जागा आहे. अनेक सुखांना नाकारून नीतीने वागणाऱ्या लोकांची ही जागा आहे. शॉ म्हणतो, माणुसकीची आणि माणसाची सगळी प्रगती नीतीच्या या कंटाळवाण्या स्वर्गामधून जन्म घेते. या उलट, माणसाची सगळी अधोगती सुखाच्या नरकामधून जन्म घेते.

थोडक्यात, स्वर्ग ही तात्त्विक आणि नैतिकदृष्टया सतत प्रगत होत जाणाऱ्या लोकांची जागा आहे, असे शॉचे म्हणणे आहे. याच्या उलट म्हणजे नरक. फक्त स्वार्थ, सुखे आणि आत्मप्रीतीच्या आहारी गेलेल्या लोकांची जागा! मोदीकालीन मध्यमवर्ग शॉच्या दृष्टीने नरकाचा रहिवासी होता.

‘मॅन अँड सुपरमॅन या नाटकात सैतान आणि जॅक टॅनर यांच्यामधील एक संवाद आहे. जॅक टॅनरने स्वतःला नैतिकतेला आणि तात्त्विक प्रगतीला वाहून घेतलेले आहे. शॉने स्वतःवरूनच हे पात्र तयार केले आहे. जॅकचा जीव स्वार्थाने आणि आत्मप्रीतीने भरलेल्या नरकात घुसमटून जातो. सैतान त्याला या ‘सुखाच्या नरकात’ आनंदाने राहायला सांगतो. त्यावर जॅक पाठ फिरवून बोअर पण प्रगतीशील स्वर्गाकडे निघून जातो. जाताना तो सैतानाला त्याच्या सुखाच्या नरकावर फिदा असलेले सुखाच्या नरकाचे रहिवासी कसे आहेत, हे अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगतो.

सुखाच्या नरकामधील रहिवाश्यांबद्दल जॅक जे जे सांगतो आहे, ते ते सगळे मोदीकालीन मध्यमवर्गीयांना तंतोतंत लागू पडते, असे शिरोजीने रोजनिशीमध्ये लिहिले आहे. या उताऱ्याची सुरुवात शिरोजीने इंग्रजीमध्ये दिली आहे. त्याच्या पुढे संपूर्ण उताऱ्याचे मराठी भाषांतर शिरोजीने दिले आहे. जॅक सैतानाला म्हणतो -  “Your friends are all the dullest dogs I know. They are not beautiful: they are only decorated. They are not clean: they are only shaved and starched…

तुझे मित्र हे कमालीचे मठ्ठ लोक आहेत. ते सुंदर नाहियेत, ते फक्त नटलेले आहेत. ते स्वच्छ नाहियेत, ते फक्त दाढ्या घोटलेले आणि स्टार्चचे कपडे घातलेले लोक आहेत. ते खऱ्या अर्थाने प्रतिष्ठित नाहियेत, ते फक्त फॅशनेबल कपडे घातलेले लोक आहेत. ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. हे तुझे मित्र दुष्टसुद्धा असू शकत नाहीत, ते फक्त कचकड्याचे आहेत. ते कलात्म नाहियेत, फक्त कामुक आहेत. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते कर्तव्यदक्ष नाहियेत, फक्त कणाहीन आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत. ते धैर्यवान नाहियेत, फक्त भांडकुदळ आहेत. ते निश्चयी नाहियेत, नुसतेच दुराग्रही आहेत. ते निपुण नाहियेत, नुसतेच अहंकाराच्या आहारी गेलेले आहेत. ते आत्मसंयमी नाहियेत, फक्त बोथट आहेत. ते आत्मसन्मान असलेले नाहियेत, नुसतेच दिमाखी आहेत. ते दयाळू नाहियेत, नुसतेच भावनिक आहेत. ते समाजाभिमुख नाहियेत, नुसतेच गप्पिष्ट आहेत. ते कनवाळू नाहियेत, फक्त तोंडदेखला विनय दाखवणारे आहेत. ते बुद्धिमान नाहियेत, ते फक्त आंधळेपणाने आपल्या मतांचा अकारण गर्व बाळगणारे लोक आहेत. हे लोक प्रगतीशील नाहियेत हे फक्त दिखाऊ लोक आहेत. हे कल्पक नाहियेत फक्त अंधश्रद्ध आहेत. हे न्यायप्रिय नाहियेत फक्त खुनशी आहेत. हे उदार नाहियेत, फक्त तुष्टीकरण करणारे आहेत. हे शिस्तबद्ध नाहियेत, फक्त दबलेले आहेत. आणि सत्याचे पाईक तर हे अजिबताच नाहियेत. हे शंभर टक्के खोटारडे लोक आहेत. आपल्या आत्म्याच्या कण्याच्या शेवटच्या कणापर्यंतचे खोटारडे लोक!”

परंपरेच्या गोंडस नावाखाली प्रतिगामित्वाची तळी उचलून धरणाऱ्या ब्रिटिश मध्यमवर्गाला, तुम्ही नक्की कोण आहात, हे शॉने या उताऱ्यात स्पष्टपणे सांगितले आहे. शिरोजीने तोच खिळा मोदीकालीन मध्यमवर्गाच्या कपाळावर ठोकला.

मध्यमवर्गाविषयीच्या अॅरिस्टॉटलच्या मताविषयी विचार करताना शिरोजीला मोदीकालीन समाजाची चिंता वाटत होती, आणि त्याच वेळी शॉच्या नजरेतून याच मध्यमवर्गाकडे बघताना त्याचे मन निराशेने आणि विषण्णतेने भरूनही जात होते.

मोदीकालीन भारतात अतिश्रीमंतांच्या मर्कटचाळ्यांचे अंधानुकरण करण्यात मध्यमवर्ग धन्यता मानत होता. या काळामध्ये, भारतीय अर्थव्यवस्थेने आज ब्रिटनला मागे टाकले, उद्या जपानला मागे टाकले अशा आचरट बातम्या मध्यमवर्गावर रोज येऊन आदळत होत्या. मध्यमवर्ग आनंदाने बेभान होत होता. आणि त्याच वेळी ८० टक्के जनतेला आपण फुकट रेशन देतो आहोत, याविषयीसुद्धा हाच मध्यमवर्ग अभिमान बाळगत होता. भावनांची आणि विचारांची पूर्ण दिवाळखोरी!

पाच पंधरा टक्के लोक श्रीमंत होते. मोठ्या मोठ्या हॉटलांमध्ये गर्दी करत होते, सोन्याचांदीच्या दुकानांमध्ये गर्दी करत होते, उंच उंच टॉवर्समध्ये राहत होते. भारतामधले १५ टक्के लोक म्हणजेसुद्धा वीस-बावीस कोटी लोक होतात. एवढे लोक सोन्या-चांदीची दुकाने भरून टाकायला पुरेसे असतात.

गर्दीचे हे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून भारताच्या आर्थिक प्रगतीचे गोडवे मोदीकालात गायले जात होते. बाकी मग, या श्रीमंत समाजाचा भार उचलायला, या श्रीमंत वर्गाच्या तत्त्वांसाठी रस्त्यावर उतरायला गरिबीत खितपत पडलेला ८० टक्के वर्ग होताच! समाजात होणाऱ्या बहुतेक सगळ्या अव्यवस्थेचे आणि अस्वस्थतेचे खापर या वर्गावर फोडले जात होते आणि जात राहणार होते.

मोदीकालीन भारत म्हणजे ८० टक्के गरिबीचा अथांग सागर होता. त्यात पाच टक्के श्रीमंत आणि पंधरा टक्के मध्यमवर्गाची जमीन. गरिबीच्या अथांग महासागरात वीस टक्क्यांची श्रीमंत बेटे!

या अथांग गरीब वर्गाला आपली गोची माहीत नव्हती. तो कसलाच विरोध करणार नव्हता. निवडणुकीच्या वेळी हजार-पंधराशे रुपये घेऊन तो आपले मत देणार होता. त्याला आपली गोची कळली असती, तर तो अस्वस्थ होऊन फैज अहमद फैज यांच्या ओळी गायला असता -

‘हमीं को क़ातिल कहेगी दुनिया

हमारा ही क़त्ल-ए-आम होगा

हमीं कुएँ खोदते फिरेंगे

हमीं पर पानी हराम होगा’

संपादक म्हणून आम्ही शिरोजीच्या रोजनिशीमधील ही गंभीर चिंतने आपल्यासमोर मुद्दाम ठेवत आहोत. शिरोजीच्या विनोदाकडे जाताना वाचकाला त्याची गंभीर पार्श्वभूमी माहिती असावी.

आम्ही शिरोजीच्या बखरीचे संपादक असलो, तरी गोंधळात पडतो. मोदीकालीन भारतातील भयाण सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा विनोद आकाराला आला होता. आम्हाला प्रश्न पडतो की, हा विनोद शिरोजीच्या दुर्दम्य विवेकशक्तीचा आविष्कार होता की, व्यथित झालेल्या त्याच्या तत्त्वचिंतक मनाने मोदीकालीन भारतामधील सामाजिक परिस्थितीवर उगवलेला हा सूड होता?

आज आम्हाला मोठी प्रस्तावना लिहिल्याबद्दल अजिबात अपराधी वाटत नाहिये. अॅरिस्टॉटल, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि फैज अहमद फैज यांच्या मतांबद्दलचे विचार मनामध्ये घोळत असताना हजार-बाराशे शब्द कधी झाले कळलेच नाही. असो.

सादर करत आहोत शिरोजीच्या बखरीचा बाविसावा भाग!

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम जवळच्या बैसारन घाटीमध्ये भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी नृशंस हल्ला केला. अतिशय दर्दनाक अशी ही घटना होती. सगळा भारत चिडून उठला. हा पाकिस्तानप्रणित दहशतवाद आहे, याविषयी कुणालाच शंका नव्हती. हा हल्ला झाल्यावर एक-दोन दिवसांत सगळे पांडेजींच्या ठेल्यावर जमले.

अविनाश - आता राडा बघा तुम्ही!

समर - कसला राडा?

अविनाश - मोदीजी आता काय करतात बघा!

भास्कर - काय करणार मोदीजी?

अविनाश - तुम देखते रहो!

पांडेजी - अविनाशजी, मोदीजी की काबिलियत पर भरोसा हैं, लेकिन पाकिस्तान भी एक न्यूक्लिअर बम वाला देस हैं!

अविनाश - ते सोडा! पाकिस्तानी पार घाबरलेत. सगळं सैन्य राजीनामा देऊन पळून चाललंय त्यांचं!

समर - तुला काय माहिती?

अविनाश - व्हॉटस् अप मेसेज आला होता मला.

भास्कर - मी पाकिस्तानातल्या लोकांची फेसबुक पेजेस पाहिली. ते म्हणतायत की, भारताचं सैन्य घाबरलंय!

अविनाश - तुला लाज नाही वाटत आपल्या शूर सैन्याबद्दल असं बोलतोयस तू!

भास्कर - मी कुठं बोलतोय? पाकमधले लोक बोलतायत.

अविनाश - नालायक साले!

समर - तू नाहियेस का बोलत त्यांच्या सैन्याबद्दल?

अविनाश - ते खरंच पळून चालले आहेत मोदीजींना घाबरून!

भास्कर - तुला काय माहिती?

अविनाश - श्रीकृष्ण जरासंधाला मारायला गेले, तेव्हा जरासंधाचं सैन्य असंच पळून गेलं होतं.

राघव - त्याचा इथं काय संबंध?

नाना - त्याला म्हणायचंय की, मोदीजी हेसुद्धा श्रीकृष्णासारखे अवतार आहेत.

राघव - ओह! इंटरेस्टिंग!

अविनाश - मोदीजी आपले पंतप्रधान आहेत इथंच आपण जिंकलो आहोत. लढायचीसुद्धा गरज नाही.

राघव - खरे आहे! मग कशाला करायची युद्धाची तयारी?

समर - मी म्हणतो मोदीजी असताना पहलगाम झालंच कसं?

अविनाश - तू गप रे! गुलाम कुठला?

राघव – खरं तर समरचा प्रश्न योग्य आहे.

नाना - (शांतपणे) मोदीजींचं सगळीकडे लक्ष असतं, पण हाताखालचे लोक सगळेच तेवढे तयारीचे नसतात.

भास्कर - म्हणजे जिंकले तर मोदीजी आणि चूक झाली तर हाताखालचे लोक का?

अविनाश - (चिडत) तुम्ही लोकांनी घोळ घालून ठेवलाय तो निस्तारतायत मोदीजी. काम करू द्या त्यांना.

नाना - नेहरूंच्या जागी मोदीजी असते, तर तेव्हाच सगळा काश्मीर घेतला असता.

अविनाश - आणि मुख्य म्हणजे युनोमध्ये काश्मीर प्रश्न गेलाच नसता.

नाना - १९६५च्या युद्धात शास्त्रीजींऐवजी मोदीजी असते, तर सरळ लाहोरमध्ये घुसले असते.

अविनाश - ७१च्या युद्धाच्या वेळी असते, तर बांग्लादेशाबरोबर बलुचिस्तानसुद्धा वेगळा केला असता.

नाना - आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानचं जे नव्वद हजार सैन्य आपण पकडलं होतं, ते पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीर परत दिल्याशिवाय परतच दिलं नसतं.

राघव - असं कसं करता आलं असतं? जिनिव्हा कराराप्रमाणे परत द्यायलाच लागतं शरण आलेलं सैन्य.

अविनाश - मोदीजींना विचारण्याची हिम्मत झाली नसती जिनिव्हाची.

भास्कर - जिनिव्हा हा माणूस नाहिये गाव आहे.

अविनाश - त्यानं काही फरक पडत नाही. मोदीजी इज मोदीजी.

(मोदीकालीन भारतातील बहुसंख्य मधमवर्गाच्या सामान्य ज्ञानाची हीच अवस्था होती! - संपादक).

भास्कर - मग का नाही केलं मोदीजींनी तसं प्रत्येक वेळी?

अविनाश - अरे राजा, मोदीजी कसं करतील सगळं? मोदीजींचा जन्म १९५०चा आहे. वेडाच आहेस तू! (हु हु हु)

समर - अविनाश, त्याला म्हणायचंय की, मोदीजी अवतार आहेत  तर त्यांनी हजर राहायचं प्रत्येक वेळी!

अविनाश - तू कृष्णाची चेष्टा करतो आहेस का?

नाना - तो मोदीजींची चेष्टा करतोय.

भास्कर - मी तुझी चेष्टा करतोय!

अविनाश - माझी चेष्टा करायला तुझ्या आजोबाला उतरायला लागेल स्वर्गातून. मूर्ख कुठला!

भास्कर - ६५च्या युद्धाच्या वेळी मोदीजी १५ वर्षांचे होते.

अविनाश - तेच सांगतोय मी.

भास्कर - आणि ७१च्या युद्धाच्या वेळी मोदीजी २१ वर्षांचे होते.

अविनाश - तेच सांगतोय मी.

भास्कर - कृष्ण भगवान आठ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी ‘कालिया मर्दन’ केले. बारा वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी चाणूर वगैरे राक्षस मारले. एकवीसच्या आत कंसाला मारलं. तसं करायचं होतं त्यांनी टिक्का खान, याह्या खान आणि भुट्टोचं!

अविनाश - वेडा आहेस का रे तू? मोदीजी तेव्हा निवडून तरी आले होते का?

समर - कृष्ण कुठे निवडून आला होता?

अविनाश - तू गप रे तुला काही कळत नाही. मूर्ख!

भास्कर - म्हणजे आला होता का निवडून?

अविनाश - तू कृष्ण भगवानांची चेष्टा करतो आहेस.

भास्कर - मी तुझी चेष्टा करतो आहे.

अविनाश - माझी चेष्टा करायला तुझा आजोबा उतरला पाहिजे स्वर्गातून!

(लॉजिकशी संपूर्ण घटस्फोट घेतल्याशिवाय ‘मोदीभक्त’ बनता येत नसे! - संपादक).

नाना - तुमचे बरोबर आहे. मोदीजींना तेव्हा ते सगळं करता आलं असतं, परंतु त्यांच्या मते तेव्हा वेळ आली नसणार. सगळे योग ठरलेले असतात!

भास्कर - (जोरात हसत) हे पटण्यासारखं आहे.

समर - आता आली आहे का वेळ?

अविनाश - बघाच तुम्ही. मोदीजी यावेळी सगळा काश्मीर घेऊन टाकणार. शिवाय पाकिस्तानचे तीन तुकडे करणार. एक बलुचिस्तान, मग सिंध, मग पंजाब, मग खैबर पखतूनवा आणि काश्मीर!

समर - हे पाच तुकडे झाले.

अविनाश - फालतूपणा करू नकोस. सगळं ठरलंय!

नाना - कधी काय करायचं याचा मुहूर्तसुद्धा ठरले आहेत.

अविनाश - नानांच्या गल्लीमध्ये मोरेश्वरपंत पिंगळे राहतात. त्यांनी नथुरामच्या अस्थी सिंधू नदीमध्ये कधी विसर्जित करायच्या याचा मुहूर्त काढून मोदींना मेल केला आहे.

(महात्मा गांधी यांचे खुनी नथुराम गोडसे यांनी इच्छा व्यक्त केली होती की, ‘अखंड भारत’ होईल तेव्हाच त्यांच्या अस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित केल्या जाव्यात. त्याचा संदर्भ वरील चर्चेला आहे. शिरोजी येथे वाह्यात विनोद करत आहे, असे वाचकांचे मत होण्याची शक्यता आहे. परंतु शिरोजी पुरावे असल्याशिवाय काहीही लिहीत नसे. शिरोजीला आलेल्या भक्तांच्या मेसेजेसचे स्क्रीन शॉट्स काढून शिरोजीने आपल्या संगणकावर सेव्ह केले आहेत. शिरोजीच्या वारसदारांच्या परवानगीने आम्ही तो सगळा खजिना वाचकांना लवकरच उपलब्ध करणार आहोत.)

भास्कर - काय म्हणतो?

अविनाश - एक खास दूत आला होता मोदीजींकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे.

समर - काय म्हणून?

अविनाश - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नका म्हणून?

समर - त्याचा काय संबंध इथं ?

अविनाश - लाहोर महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका यांच्या निवडणुका एकत्रच घ्यायचा प्लॅन आहे.

भास्कर - (प्रचंड हसतो)

अविनाश - हसायला काय झालं रे चोंग्या! फोन दाखवत माझ्याकडे व्हॉट्सअप मेसेज आहे.

(या मेसेजचा संदर्भसुद्धा आम्ही तपासला आहे. असा मेसेज खरोखरंच त्या दहा दिवसांत व्हायरल झाला होता. संदर्भ - शि कॉ सा व्हॉ अ मे - फुलफॉर्म - शिरोजीने संगणकावर साठवलेले व्हॉट्स अप मेसेजेस).

भास्कर - तुला कुठून येतात हे भारीमधले मेसेजेस?

अविनाश - आमचा एक ग्रूप आहे. त्या ग्रूपवर डायरेक्ट वरून येतात हे मेसेजेस.

राघव - वरून म्हणजे?

अविनाश - ते सीक्रेट आहे.

समर - का?

अविनाश - तेसुद्धा सीक्रेट आहे.

भास्कर - आम्हाला घे की, त्या ग्रूपमध्ये.

अविनाश - नको. तुम्ही देशद्रोही आहात. दादा रागवेल.

समर - हा दादा कोण?

अविनाश - आदरणीय आहे तो.

भास्कर - ब्रह्मचारी आहे का तो?

अविनाश - हो. देशासाठी ब्रह्मचारी राहिलाय.

भास्कर - कळलं मला कुठला ग्रूप आहे.

पांडेजी - अविनाशजी एक बात कहूं?

अविनाश - बोला की!

पांडेजी - वॉर वगैरे कुछ नहीं होगी!

अविनाश - मुहूर्त निघाले आहेत सगळे.

पांडेजी - पाकिस्तान और भारत दोनों के पास एटम बम हैं. कुछ नहीं होगा.

राघव - न्यूक्लिअर देशांमध्ये युद्ध होत नाहीत. झाली तर दोन्ही देशांचा संपूर्ण नाश होतो.

नाना - (गालातल्या गालात हसत) बघा तुम्ही काय होतंय ते.

अविनाश - मोदीजी ही काय चीज आहे, हे अजून तुम्हाला कळलेलं नाहिये.

समर - अरे मोदीजी मोदीजी काय करतोस? राघव म्हणालाय ना ‘न्यूक्लिअर पॉवर कंट्रीज’मध्ये युद्ध होऊ शकत नाही.

भास्कर - न्यूक्लिअर वेपन्स असतील तर काय करणार आहे मोदीजी तुझा?

अविनाश - तू आदरणीय मोदीजींना ‘अरे-तुरे’ करू नकोस चोंग्या.

अविनाश - एक लक्षात ठेवा. ज्या दिवशी नथुरामच्या अस्थी सिंधू नदीत विधीपूर्वक विसर्जित होतील, त्या दिवसापासून किमान २०० वर्षे भाजप सत्तेवरून जात नाही.

भास्कर - मागच्या वेळी तू हजार वर्षे म्हणाला होतास.

अविनाश - तू गप रे!

यावर संभाषणावर ती भेट संपली. पहलगाम ते भारत-पाक युद्ध या काळात अविनाश आणि नाना अतिशय एक्साइट झालेले होते. देशभक्तीने भारलेले मेसेजेस ते दोघे रोज इतरांना पाठवत होते. भास्कर आणि समर वैतागले होते. बालाकोट हल्ल्यानंतर ‘मोदीलहर’ आली, तशी परत आलेली त्यांना नको होती. राघव आणि पांडेजी म्हणत होते की, आता बालाकोटसारखी छोटी चकमक करून मोदीजींची लोकप्रियता वाढणार नाही. राजकारणात परत परत तोच खेळ चालत नाही. आता युद्ध झालं तरच लहर यायची शक्यता होती आणि आणि युद्ध होऊ शकणार नाही, या मतावर राघव आणि पांडेजी दोघेही ठाम होते. चकमकी होतील, पण युद्ध नाही. असे त्यांचे म्हणणे होते.

अखेर ७ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानची सीमा न ओलांडता पाकिस्तानामधील अतिरेक्यांच्या तळावर क्षेपणास्त्रांचे हल्ले केले. त्यानंतर तीन दिवस भारत आणि पाकिस्तानने एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यांचे हल्ले केले. पाकिस्तानने भारताची विमाने पाडल्याचा दावा केला. भारताने पाकिस्तानाच्या विमानतळांवर हल्ले करून त्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली. लाहोर विमानतळावरील हवाई संरक्षण यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली. दोन्ही देशांमधील प्रसारमाध्यमं या काळात खूप खोट्या बातम्या देत राहिली. भारतीय नौदलाने कराची बंदरावर हल्ला केला, भारतीय विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून पेशावरवर हल्ला केला, अशा तद्दन खोट्या बातम्या ‘गोदी मीडिया’ देत राहिला. एकंदरीत, दोन्ही देशामधील मीडिया आपण युद्ध जिंकले आहे असे सांगत राहिले.

त्या काळी नेटवर हवाईयुद्धाचे अनेक गेम्स होते. यातली विमाने खरी भासत. या गेम्सच्या क्लिप्स खऱ्या युद्धाच्या क्लिप्स म्हणून पसरवल्या गेल्या. दोन्ही देशांमधील सामान्य जनतेला वाटत राहिले की, आपल्या विमानांनी शत्रू राष्ट्रात घुसून भयंकर नुकसान केले आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्राने शरणागती पत्करली आहे, अशी बातमी कुठल्याही क्षणी येऊ शकते.

या काळात अविनाश अनेक अफवा बातम्या म्हणून फॉरवर्ड करत राहिला. तो प्रचंड एक्साइट झाला होता. पुढच्या महिन्यात आपण पासपोर्ट न घेता लाहोरला जाणार असे त्याने सगळ्यांना सांगितले. कमी-जास्त प्रमाणात सगळ्या भक्तांची हीच अवस्था होती. फसले नाहीत फक्त राघव आणि पांडेजी यांच्यासारखे लोक आणि शेअर मार्केट. ते शांत राहिले.

मग १० मे २०२५ रोजी दुपारी युद्धबंदी झाली. तीसुद्धा अमेरिकेच्या अध्यक्षांनी जाहीर केली. अविनाश आणि भक्तसमुदाय हिरमुसला. ११ तारखेला रविवार होता. १२ तारखेला म्हणजे सोमवारी शेअर मार्केट सुसाट वर गेले. नथुरामचे अस्थिविसर्जन आणि लाहोर महानगरपालिकेची निवडणूक या दोन्ही गोष्टी पुढच्या युद्धापर्यंत स्थगित झाल्या आहेत, हे भक्तांना मान्य करावे लागले. त्यात भारताची विमाने पाडली गेली, अशी जगभर चर्चा सुरू झाली होती. यूट्यूबवरील परदेशी चॅनेल्स आणि परदेशी वृत्तपत्रे भारतीय विमाने पाडली गेल्याची चर्चा करत राहिली. त्यामुळे भक्त मंडळी सणकली. या अशा वातावरणातच पांडेजींच्या ठेल्यावरची पुढची बैठक १८ मे २०२५ रोजी संध्याकाळी झाली.

राघव - आम्ही म्हणत होतो की, युद्ध होणे अशक्य आहे.

अविनाश - युद्ध झाले आहे, आणि ते मोदीजींनी जिंकले आहे.

समर - आम्हाला आवडेल भारताने युद्ध जिंकले असेल तर, पण मग अचानक युद्धबंदी का केली?

नाना - या फार गहन गोष्टी आहेत. तुम्हाला कळणं अशक्य आहेत.

भास्कर - तुम्हाला कळल्या आहेत, तर तुम्ही समजावून सांगा.

नाना - वेळ आली की, समजावून सांगेन.

अविनाश - आदरणीय नाना आहेत म्हणून आपल्याला कळतील तरी या गोष्टी.

समर - पण मी म्हणतो की, युद्धबंदी केलीच का ?

भास्कर - पाकव्याप्त काश्मीर का घेतला नाही? बलुचिस्तान का तोडला नाही?

नाना - गहन गोष्टी आहेत या. तुम्हाला सांगेन मी वेळ आली की.

भास्कर - कधी येणार आहे ती वेळ?

अविनाश - सांगतील नाना!

समर - वेळ आली की, सांगू असं सांगून तुम्ही वेळ मारून नेताय का?

अविनाश – अरे, सांगतील ना नाना!

नाना - आत्ता पाकिस्तानची अशी तोडफोड करणे फायद्याचं वाटलं नसेल मोदीजींना!

समर - आपण युद्ध जिंकत असताना युद्धबंदी का केली इतकंच समजून घ्यायचं आहे आम्हाला.

अविनाश - तुला म्हणायचंय काय देशद्रोह्या? हरामखोर साला! भारताच्या सैन्यावर संशय घेतोय!

(ही भक्त मंडळींची कायमची ट्रिक होती. अवघड प्रश्न उभा राहिला की, ‘देशद्रोही’, ‘सैन्यद्रोही’, ‘देवद्रोही’, ‘धर्मद्रोही’ असे म्हणत राहायचे. अर्थात कसलेले विरोधक या ट्रिकला भीक घालत नसत.)

भास्कर - आम्ही सैन्याला कुठे काय म्हणतो आहोत?

समर - उलट आम्ही म्हणतोय की, आपलं सैन्य जिंकत असताना मोदीजींनी युद्धबंदी का केली?

अविनाश - तो मोदी तुम्हा देशद्रोह्यांना पुरून उरणार आहे. त्या पुण्यात्म्याला एका बाजूला पाकिस्तानशी लढावं लागतंय, दुसऱ्या बाजूला भारताच्या प्रगतीवर जळणाऱ्या युरोप, चीन, रशिया, जपान आणि ऑस्ट्रेलियाशी लढावं लागतंय आणि आतल्या बाजूला तुम्ही!

समर - ते सोड! पाकिस्तान तोडला का नाही?

(मोदीजी मनात आले, तर पाहिजे ते करू शकतात, त्यांना पाहिजे तशी परिस्थिती वळवू शकतात, अशी प्रतिमा मोदीजींच्याच प्रचारयंत्रणेने तयार केली होती. त्यामुळे आता समर वगैरे तोच तोच प्रश्न विचारून भक्तांना हैराण करत होते.)

नाना – अरे, आंतरराष्ट्रीय खेळ असतात हे. आपण पाकिस्तानला अचानक झटका दिला आहे. आता आतंकवादी हल्ले बंद होतील कायमचे.

समर - उरी सर्जिकल स्ट्राईकनंतर आणि बालाकोट हल्ल्यानंतर तुम्ही असंच म्हणाला होतात.

अविनाश - तू गप्प बस. मोदीजी घेतील बघून!

नाना - अचानक हल्ला केल्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे.

भास्कर – अहो, कसला घाबरला? त्यांच्या आर्मी चीफ ला फील्ड मार्शल केलंय त्यांनी पाकिस्ताननं युद्ध जिंकलं म्हणून!

नाना - अगदी वरून मला बातमी आहे की, पाकिस्तान खूप घाबरला आहे अचानक हल्ल्यामुळे.

समर - (अचानक आपल्या फोनमध्ये बघत) अरे, आपले परराष्ट्रमंत्री काय म्हणतायत बघा ट्विटरवर! पाकला पहिल्या हल्ल्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं की, आम्ही हल्ला करतोय म्हणून!

अविनाश - (प्रचंड संतापत) तू गप्प बस समर. तू असा मूर्खपणा करत राहिलास, तर मला काही तरी ‘डायरेक्ट अॅक्शन’ घ्यावी लागेल.

समर - कसली ‘डायरेक्ट अॅक्शन’?

अविनाश - तुझ्या गालावर ‘डायरेक्ट अॅक्शन’ घेईन मी!

राघव – अरे, खरंच तसं ट्वीट केलं आहे जयशंकरसाहेबांनी! मी मघाशीच बघितलं आहे.

नाना - असं शक्य नाही.

राघव - अहो नाना योग्य केलं मोदी सरकारनं. पाकिस्तान हे एक अण्वस्त्र सज्ज राष्ट्र आहे. आपण पाकिस्तानवर नाही, तर फक्त अतिरेकी तळांवर हल्ले करत आहोत, हे सांगणं आपलं काम होतं.

नाना - (चेहरा पडलेला) शक्य नाही. मोदीजी घाबरत नाहीत पाकड्यांच्या अणुबॉम्बना.

राघव - घाबरण्याचा प्रश्न नाही, जबाबदार राष्ट्र आहोत आपण. आपण अणुयुद्धाचा धोका पत्करला असं चित्र तयार होऊन कसं चालेल?

अविनाश - एक तर हे ट्वीट खोटं आहे किंवा हा जयशंकर देशद्रोही आहे.

अच्युत - (पहिल्यांदाच बोलत) आपण सांगितलं आणि नंतर हल्ला केला म्हणजे सगळे अतिरेकी पळून गेले असणार! मग कसला हल्ला केला तुम्ही?

भास्कर - पाकडे तयारीत राहिले असणार त्यामुळे.

राघव - ते तयारीत होते म्हणून आपली विमानं पाडायचा चान्स पाकिस्तानला मिळाला, अशी चर्चा आहे सगळ्या यू-ट्यूबवर!

अविनाश - आपली विमानं पाडली गेली, हा खोटा प्रचार आहे! १०० टक्के खोटा. पाकडे आणि तुम्ही देशद्रोही लोक!

भास्कर - आम्ही कुठं काय म्हणतो आहे? आम्ही फक्त यू-ट्यूबवर आणि जगभरच्या वर्तमानपत्रांत सुरू असलेली चर्चा सांगतो आहोत.

अविनाश - हरामखोर साले. मोदीजींचं यश बघवत नाहिये त्यांना.

समर - आपले एयर व्हाइस मार्शल अवधेश कुमार भारती यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला की, भारताची विमानं पाडली गेली का? त्यावर ते म्हणाले की - युद्धात नुकसान होतच असतं. शत्रूला फायदा होईल अशी कुठलीही माहिती आम्ही देणार नाही.

अविनाश - कुठं बोलला हा हरामखोर?

भास्कर - आपल्या सैन्याबद्दल तोंड आवरून बोल अव्या!

(हळूहळू मोदीविरोधकसुद्धा सगळ्या ट्रिक्स शिकले होते. - संपादक)

अविनाश - हा कसला सैन्याचा भाग? युद्धात नुकसान होतंच असतं म्हणे!

राघव - भारत सरकारने आयोजित केलेल्या अधिकृत प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले भारती. म्हणजे मोदी सरकारचा पाठिंबा होता त्या स्टेटमेंटला.

नाना - तुम्हाला आनंद झाला असेल ना?

राघव - आपली विमानं पडली असतील, तर आम्हाला दुःखच होईल. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की, जयशंकरसाहेबांनी पाकला आधी सांगितल्यामुळे जर आपली विमानं पडली असतील, तर जबाबदारी कुणाची?

भास्कर - नेहरू असते तर अशी चूक केली नसती त्यांनी!

नाना - (चिडून) आता तुम्ही बोलणारच काहीतरी खुस्पटं काढून!

समर - इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी पहिला हल्ला केला असता बिनधास्त! ‘आयर्न लेडी’ होत्या त्या!

भास्कर - (चिडवत) हल्ला करताना आधी सांगायचं! (हा, हा, हा)

समर - हल्ला करताना आधी सांगायचं, मग म्हणायचं आम्ही जिंकलो आहोत आणि मग अचानक युद्धबंदी करायची!

भास्कर - शास्त्रीजी असते, तर असं केलं नसतं.

राघव - तुम्ही चिडवू नका त्यांना!

नाना - (संतापानं लाल झालेले) अरे, काय चेष्टा लावली आहे? हा असता तर असं केलं नसतं, तो असता तर असं केलं नसतं!

भास्कर - तुम्हीच सुरुवात केलीत मघाशी. मोदीजी असते नेहरूंच्या जागी तर असं केलं नसतं आणि तसं केलं नसतं!

अविनाश - नसतंच केलं! नेहरूंपेक्षा मोदीजी मोठे आहेत.

नाना आणि अविनाश लालेलाल झाले होते. अचानक युद्धबंदी का झाली, हेच त्यांना कळत नव्हतं. खरं तर युद्धबंदी केली गेली ते योग्य होतं. मोदी सरकारने तो निर्णय अगदी योग्य पद्धतीने घेतला होता. अणु-युद्धाचा धोका वाढत चालला होता. खरं तर, अण्वस्त्रांच्या शोधानंतर कुणाही अण्वस्त्रसज्ज देशावर थेट हल्ला केला गेला नव्हता. भारताने तो केला आणि आता पुढचा अतिरेकी हल्ला केला, तर त्याची फार मोठी किंमत भरावी लागेल, असा इशारा पाकिस्तानला दिला. परंतु राजकारणाच्या चर्चेमध्ये या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्थान उरले नव्हते. नेहरूंच्या जागी मोदी असते तर, इंदिरा गांधी यांच्या जागी मोदी असते तर, नेहरूंऐवजी वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर, असल्या चर्चा भाजपनेच सुरू केल्या होत्या. त्याचीच किंमत ते आता भरत होते. भास्कर आणि समर आता त्याच भाषेत मोदीसमर्थकांशी बोलू लागले होते.

भास्कर - ६५चं भारत पाकिस्तान युद्ध १७ दिवस चाललं, ७१चं १३ दिवस चाललं आणि कारगिल युद्ध तर ६० दिवस चाललं.

अविनाश - तुला म्हणायचं काय आहे?

भास्कर - हे युद्ध चार दिवसांत संपवायची काय घाई झाली होती मोदीजींना?

अविनाश - तू गप!

भास्कर - मी गप्प बसतो, तू बोल आणि सांग काय घाई झाली होती युद्धबंदीची! नेहरू असते, तर असं नक्की केलं नसतं!

(यावर हातामधला चहाचा कप आपटून नाना निघाले. ते लालबुंद झाले होते. अविनाशसुद्धा उठला आणि दोघे निघून गेले).

यावर ही चर्चा थांबली!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मोदीकालीन भारतात अशा चर्चा चालत. खरं तर शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे की, एकंदर युद्धपरिस्थिती मोदीजींनी चांगल्या प्रकारे हाताळली. अण्वस्त्रांचा शोध लागल्यापासून अण्वस्त्रसज्ज राष्ट्राच्या भूमीवर कुणी हल्ला केला नव्हता. तो मोदीजींनी केला. अतिरेकी हल्ले सहन केले जाणार नाहीत, हा स्पष्ट इशारा दिला. चार दिवसांत युद्ध थांबवले गेले, हे योग्यच झाले. एका अण्वस्त्रसज्ज राष्ट्राशी किती दिवस युद्ध करणार? परंतु हे सारे जनतेला सांगायचे नाही, ही मोदीजींची नीती होती. ‘युद्ध युद्धाच्या ठिकाणी, ‘हेडलाइन मॅनेजमेंट’ तिच्या ठिकाणी’ असा मोदींचा खाक्या होता. भारताची विमाने पडली गेली की नाही, हा तसा महत्त्वाचा मुद्दा नाही. युद्ध म्हटले की, काहीतरी हानी होणारच! परंतु विमाने पाडली गेली असे ‘नॅरेटिव्ह’ तयार झाले, तर त्याचा आपल्या प्रतिमेवर काय परिणाम होतो आहे, हे मोदीजींच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.

मोदीजींच्या ‘नॅरेटिव्ह’च्या अट्टाहासाबद्दलही शिरोजीचे काही म्हणणे नव्हते. त्याच्या दृष्टीने सगळ्यात मोठा मुद्दा जनता कुठल्या ‘नॅरेटिव्ह’च्या मागे किती विचार करून जाते आहे हा होता. मोदीकालीन भारतात आधीच आत्ममग्न असलेल्या मध्यमवर्गाची विचारशक्ती नष्ट कशी होईल, याचे सतत प्रयत्न होत होते. त्यासाठी ‘सोशल मीडिया’चा आणि ‘गोदी मीडिया’चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. मध्यमवर्ग ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, ती जाणूनबुजून राजकीय स्वार्थासाठी खिळखिळी केली गेली होती. याला शिरोजीचा विरोध होता. म्हणून त्याने हा बखरीचा उपदव्याप सुरू केला होता. त्याला दोन्ही बाजू लोकांसमोर मांडायच्या होत्या. लोकांनी गंभीर विषय वाचावेत म्हणून त्याने विनोदाचा आधार घेतला होता. परंतु, शिरोजीची रोजनिशी वाचली, तर आपल्याला कळते की, मोदीकालीन मध्यमवर्गाविषयी शिरोजी निराश झाला होता.

त्याने लिहिले आहे - “ज्या वर्गाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उदात्त तत्त्वांचे पाईक बनायचे, तोच वर्ग मोदीकालीन भारतात द्वेषाने भरलेले मेसेजस सोशल मीडियावर व्हायरल करण्यात धन्यता मानत आहे. आपण एका उच्च-मध्यम जातीत जन्मलो आहोत आणि ‘घासूगिरी’ करून एखादी डिग्री मिळवली आहे, म्हणून आपण बुद्धिमान आहोत, असा गैरसमज असलेले हे लोक आहेत. शॉ म्हणतो तसे खोट्यामध्ये धन्यता मानणारे खोट्या आत्म्याचे स्वार्थी आणि अहंकारी लोक!”

असो. आज बाविसाव्या शतकाच्या पंचविसाव्या वर्षांत आपल्यासाठी शिरोजीची बखर ही एक खिडकी बनली आहे. मोदीकालीन भारतामधील वैचारिक आणि तत्त्वज्ञानात्मक जीवन समजून घेण्यासाठीची खिडकी!

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......