‘होल्डिंग टाईम कॅप्टिव’ : इब्राहिम अल्काझी यांच्याविषयीचं हे पुस्तकं वाचताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतके पैलू दिसतात की, त्यांना बघावं असं वाटलं मला…
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
पाशा
  • ‘होल्डिंग टाईम कॅप्टिव’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Sat , 06 April 2024
  • ग्रंथनामा दखलपात्र इब्राहिम अल्काझी : होल्डिंग टाईम कॅप्टिव Ebrahim Alkazi : Holding Time Captive इब्राहिम अल्काझी Ebrahim Alkazi

काही पुस्तकं शय्यासोबत करतात... महिनो न् महिने कधी ती उशाशी असतात… कधी पायथ्याशी, तर कधी पोटाशी. ती रोज हाती धरवत नाहीत. कधी कधी त्यांच्याकडं पाठ करून तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करता. मात्र तुमच्या बिछान्यावरील त्यांचं अस्तित्व मध्यरात्री अंधारातही तुम्हाला जाणवतं. इब्राहिम अल्काझी यांचं त्यांच्या मुलीनं, अमाल अल्लाना यांनी लिहिलेलं चरित्र सध्या माझ्या बिछान्यावर आहे...

खूप जाडजूड पुस्तक आहे हे. लठ्ठच म्हणीन मी. जवळजवळ महिन्याभरापूर्वी ‘क्रॉसवर्ड्स’मध्ये मी ते बघितलं. कारण जोहर, गोविंदा, नसीरुद्दीन अन् रॉबिन विल्यम्स यांच्या गराड्यात ते उभं होतं. किंमत म्हणावं तर महाग होती. (शेवटी अ‍ॅमेझॉनवर मला पुस्तकं स्वस्तात मिळालं!) क्रॉसवर्डसमध्ये मी ते वाचायला हातात घेतलं.

अमल अल्लाना खूप लिहितात. अगदी पहिल्या पानापासून अक्षरांच्या ओळी धावत सुटतात. उगाच नाही या कथनाची सुरुवात इब्राहिम अल्काझीच्या सायकल स्वारीने होते. एकोणीसशे एकोणचाळीसपासून... ते १३ वर्षांचे असल्यापासून... ही कथा शेवटच्या टप्प्यावर येते ती सहाशे पंधराव्या पानावर... सत्तेचाळीसाव्या प्रकरणावर... अमल त्या प्रकरणाला म्हणतात- ‘डीसॲपिरन्स 2016’.

मी अजून त्या प्रकरणापर्यंत पोहचलेलो नाही, कधी पोहचेन माहीत नाही. पण माझ्यापुरतं त्या प्रकरणाला मी नाव दिलंय ‘हरवलेले’. ‘क्रॉसवर्डस’मध्ये मी उभ्या-उभ्या ते प्रकरण फक्त नजरेखालून घातलं. त्याची सुरुवात अमाल करतात ते वाक्य मी वाचलं अन् मी पुस्तक घट्ट छातीशी धरलं. अमाल लिहितात- ‘माझे वडील अचानक बोलयचेच थांबले...’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अल्काझी यांच्या खूप मुलाखती आता माध्यमात उपलब्ध आहेत. दूरदर्शनमधला माझा मित्र काल मला म्हणाला, ‘अल्काझी जेव्हा चित्रीकरणासाठी स्टुडिओत आले होते, तेव्हा ते विस्मरणाच्या कवेत होते... ओम पुरी-ओम शिवपुरी यांच्या नावात, त्यांच्या भूमिकेत ते किंचित गोंधळले होते. त्यांच्या बोलण्यात काळ पाळण्यासारखा झुलत होता, पण त्यांचा एकन्एक शब्द ऐकण्यासारखा होता... आणि पाहण्यासारखासुद्धा...’

मी अल्काझी यांना कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही, ना त्यांची नाट्यकला कधी अनुभवली. आज सहज म्हणून करण थापर यांनी त्यांची घेतलेली मुलाखत बघितली. जे वाटलं ते विचित्रच आहे. थापर एवढा नाटकी वाटला की, त्याच्यापुढे अल्काझी न-नाट्य दर्जेदार वाटले. नाट्यसृष्टीत हयात कोणाची गेली, असा प्रश्न पडला. हा तो काळ आहे जिथं नको तिथं ‘नाट्य’ उदयाला आलं आहे. यू-ट्यूबवर त्यांच्या मुलाखती पत्रकारांनी घेतलेल्या आहेत. या मुख्यत्वे त्यांच्या कलाप्रवासाच्या आहेत. स्वतः कॅमेरापुढे अभिनयाबद्दल किंवा दिग्दर्शनाबाबत बोलताना ते दिसत नाहीत...

या पुस्तकातून त्या कळतात, पण मार्लन ब्रांडो ते अल पचिनोपर्यंत सर्वांचा ‘नाट्यगुरू’ ली स्त्रासबर्ग आणि वॉरन बीट्टी ते रॉबर्ट डी नीरो यांच्या गुरू स्टेल्ला अडलर यांच्या एकट्या किंवा नटमंडळी यांनी घेतलेल्या मुलाखती बघितल्यावर अल्काझी यांचे असे दस्तावेज हवे होते, असं वाटलं.

अल्काझी यांच्या आयुष्यातील नाट्य आणि न-नाट्य त्यांच्या मुलीनेच लिहिल्यामुळे या पुस्तकात वादातीत असं काही नाही. इब्राहिम आणि रोशन या दाम्पत्याखेरिज इब्राहिम आणि उमा आनंद, चेतन आनंद यांच्या पत्नी, यांच्यातील संबंधावर लिहिताना अमल समंजसपणे लिहितात, सांगतात... तेही सविस्तरपणे.

एकूणच हे चरित्र फार समंजसपणे आणि सविस्तरपणे लिहिलंय. यातला खूप आशय, खूप नोंदी जणू रोजनिशी किंवा उपलब्ध माहितीनुसार असाव्यात अशा आहे. आणि त्या असणारही, कारण अल्काझी कुटुंबात जतन परंपरेला मोठं स्थान आहे. त्यांच्या गॅलरी आहेत, संस्था आहेत. प्रदर्शन भरवली जातात, चर्चा आयोजित केल्या जातात.

आणि या कुटुंबात नाटकाचा पाया रोवणारी नांव सुलतान पदमसीपासून सुरू होतात. हे नर्गिस यांचे भाऊ. त्यांचा इब्राहिमवर प्रभाव. आणि मग वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी सुलतान यांची आत्महत्या.

अल्काझी यांचा सुरू झालेला कलाप्रवास... चित्रकार ते नाटककार... थिएटर ग्रुप ते राडा, लंडन ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा... भारतीय कलावंताची जंत्रीच इथं आहे… हे आयुष्य भरभरून वाहणारं, खळखळणारं आहे.

ही एका पुण्यातील अरब माणसाची कथा आहे... अरबस्तानात सुरू झालेली... स्वतः ला मराठी-अरब असं म्हणवून घेणाऱ्या माणसाची. आणि वाचक म्हणून मीही अरबस्तानातील वाळवंटात चालावं, असं एकएक पान वाचतोय. या पुस्तकात मी अडकलोय ते या पुस्तकातील छायाचित्रांमुळे. ती मी बघतोय, तो काळ अनुभवतोय...

करोनापूर्वी न्यूयॉर्कमध्ये ब्रॉडवेवर एडवर्ड अलबी यांचं ‘थ्री टॉल वुमेन’ हे नाटकं आम्ही बघत होतो. त्यातील ग्लेंडा जॅक्सन या थोर नटीबद्दल आमची चर्चा सुरू होती. आणि अचानक समोरचा वृद्ध माणूस आमच्याकडे वळला, आणि म्हणाला, ‘तुमच्या देशात काय कमी प्रतिभावान नटनट्या आहेत? अलकनंदा समर्थ, सुधा आणि ओम शिवपुरी, कुसुम बेहल, मनोहरसिंग…’ तो एक वृद्ध भारतीय होता...

अलकनंदा समर्थ या शोभना समर्थ यांची चुलत बहीण, तर सुधा शिवपुरी मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’मधली मल्लिका… अमल अल्लाना यांच्या या पुस्तकात या अभिनेत्री आणि अभिनेते विविध रूपांत आहेत. अल्काझी आणि त्यांनी निवडलेली स्त्री-प्रधान नाटकं आणि त्यातील मुख्य भूमिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री यांवर असलेलं प्रकरण दिग्दर्शक आणि त्याची नायिका याची एकदम वेगळी कारणमीमांसा आहे.

अल्काझी यांनी केलेली नाटकं आणि त्यातील नेपथ्य, कॉस्च्युम, मेकअप आणि कलावंतांचा ताफा... नुसती छायाचित्रं बघण्यासाठी हे पुस्तक घ्या. प्रत्येक कलावंताने जवळ बाळगावं, असं हे चरित्र आहे. मात्र हे पुस्तक चाळताना अल्काझी यांचं ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची आज ओळख चित्रपटसृष्टीला अभिनेते पुरवणारी यंत्रणा अशी आहे का, हा प्रश्न मला पडला.

या पुस्तकात अल्काझी यांच्या समवेतला नाट्यपट कितीतरी चेतानादायी आहे. त्यांच्या नाटकांच्या पोस्टर्सची छायाचित्रं हॉलिवूडमध्ये क्लिक केल्यासारखे आहेत. अलकनंदा समर्थ किंवा हिमा देवी, यांची छायाचित्रं किँवा Odipus किंवा Antigone नाटकाचं पोस्टर आजही न्यू यॉर्कमध्ये ब्रॉडवेवर झळकू शकेल... इतकी चकाचौंध, श्रीमंती आहे त्यात.. आज ते वैभव  नाहीच, आजच्या नाट्यसृष्टीत तर नक्कीच नाही... तिच्याच शोधात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधील विद्यार्थी चित्रपटसृष्टीत येतात.

ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी चित्रपटसृष्टीत नावं काढलं, त्यांच्याबद्दल अल्काझी खूप प्रेमानेच बोलले आहेत… अभिमानानेही... मात्र नसीरुद्दीन ‘अमिताभ’ झाले नाहीत... या पुस्तकात या कडवटपणावर अजून मला काही आढळलं नाही...

अल्काझी आणि सिनेमा असं या पुस्तकात वरवर अजून मला काही आढळलेलं नाही. या माणसाला कधी वाटलं नसेल या मध्यामाबद्दल? चित्र, नेपथ्य, नट, दिग्दर्शन हे सर्वस्व मानणारा माणूस भारतीय चित्रपटसष्टीपासुन दूर का होता? देव आनंद आणि चेतन आनंद यांच्या बरोबरचं एक छायाचित्र आहे, पण तो मुख्यत्वे उमा आनंद, चेतन यांच्या पत्नी आणि अल्काझी यांच्या आयुष्यातील त्रिकोणाची तिसरी बाजू म्हणून...

अल्काझी यांनी जवळपास पन्नास नाटकं दिग्दर्शित केली. मी एकही पाहिलेलं नाही. त्यांचं एकही नाटक मला यू-ट्यूबवर आढळलं नाही. या पुस्तकात त्यांची शिस्त, दरारा, यांचे किस्से नाहीत. त्याची ओळख आहे. यू-ट्यूबवर त्यांच्या शिष्यांनी सांगितलेले किस्से आहेत… अगदी थप्पड लगवीपर्यंतचे... या पुस्तकात सौम्य वाटणारं आयुष्य तसं मला नाट्यमय वाटलं. मारिया कॅलास या ऑपेरा गायिकेच्या प्रतिभेचा आणि वादळी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारं ‘मास्टरक्लास’ या नावाचं टेरेन्स मॅकनॅली या लेखकाच्या नाटकाची आठवण मला उगाच आली. कधीतरी अल्काझी विषय होतील नाटकाचा… ते आणि त्यांचे शिष्य किंवा ‘अंधायुग’ निर्मिती नाटकाचा विषय होईल.

हे पुस्तकं वाचताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतके पैलू दिसतात की, त्यांना बघावं असं वाटलं मला. त्यांच्या नाटकांच्या चित्रफिती कोणी केल्या आहेत का? त्यांचा नाटकांचे ध्वनिचित्रण आहे का कुठे? कोणी केलंय का? मला बघायचं आहे… फक्त एकदा.. त्यांचं एखादं नाटक…

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जाणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!

इब्राहिम अल्काझी यांच्याविषयी निस्सिम इझिकेल यांनी लिहिलेली कविता

इब्राहिम अल्काझी : आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक, नाटकाच्या क्षेत्रातला ‘ऋषी’

इब्राहिम अल्काझी : “मी एनएसडीमध्ये होतो म्हणजे त्या वेळी भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील सगळ्या गोष्टी तिथं एकत्रित झाल्या होत्या असं कृपया समजू नका.”

.................................................................................................................................................................

आपण मुंबईत राहतो. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील नाटकं इथं चालतात... एकेकाळी पारसी ते इंग्रजी नाटकं इथे खूप चालायची. अल्काझी यांच्या सुरुवातीच्या नाटकांची नावं म्हणजे पूर्ण युरोपीय नाटकं... बघणारा प्रेक्षकही होता... आंग्ल रंगभूमीचा प्रभावही होता... पण या पुस्तकातील महत्त्वाचा भाग अल्काझी यांना भारतीय पठडीतील भारतीय भाषांमधील नाटकं करायची होती... जिद्दीनं... हिंदी भाषा रंगभूमीवर स्थापित करायची होती..

लंडनमधील शिक्षण संपवून आपल्या मायदेशी परतलेल्या अल्काझी यांना या देशाच्या परंपरा… आपल्या नाट्य-गायन-नृत्य शैली आणि विशेषतः जोडभाषा म्हणून हिंदी याची असलेली जाणीव फार भावणारी आहे...

(या पुस्तकातील बाला सरस्वती या थोर नृत्यांगनेचं छायाचित्र बघून हात आपसूकच जोडले जातात. ती त्यांची नृत्यगुरू) त्याचबरोबर मराठी रंगूमीवरील घडामोडींबाबत त्यांची उत्सुकता याच भागात अमल ठळकपणे नमूद करतात.

आपल्या रंगकर्मींना व्यक्त होण्यासाठी एक राष्ट्रीय भाषा हवी, या अट्टाहासाने अभ्यासक्रमात आपल्या विद्यार्थ्यांनी काय शिकावं आणि अल्काझी यांनी त्याना काय शिकवलं, हे वाचून मग आज ते शिक्षण ते विद्यार्थी… राष्ट्रीय नाट्य संकल्पना कुठं आहे, हा प्रश्न मला पडला...

त्या काळापर्यंत पुस्तकात नावं डोकावतात ती मुख्यत: फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या विश्वातील दिग्गजांची... या परिचित भारतीयांनाही हिंदी अस्खलित यावं हा अल्काझी यांचा आग्रह... मग पर्व सुरू होतं, ते स्वबळावर ‘ ‘थिएटर युनिट’ची सुरुवात’ या प्रकरणानं, खरं तर ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामां’चं ते बीजारोपण... आणि मग हे पुस्तकं जणू पारंपरिक भारतीय वेशभूषेत अवतरतं...

छायाचित्रात बलराज साहनी, दिना पाठक दिसतात. विजया मेहता, गिरीश कर्नाड, मामा वरेरकर, शंभू मित्रा, ज्ञानेश्वर नाडकर्णी ही नावं येतात... प्रख्यात इंग्रजी नाटकांचे अनुवादित हिंदी नाटकांचे दाखले येतात… अल्काजी यांचा कलाप्रवास, त्यांची निर्मिती, त्यांचे दिग्दर्शन... ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधील वादळी कारकीर्द परिचित अशीच आहे... खरं  तर राष्ट्रीय नाट्यविद्यालय एका अर्थानं त्यांना अपेक्षित असे हिंदी भाषेचं ‘नाट्यघर’ झालं... ‘आषाढ का एक दिन’, ‘अंधा युग’, ‘जस्मा ओडन’... भारतीय परंरेनुसार त्यांनी रंगमंचावर आणली... या पुस्तकात त्यांचं हे ऋण ठळक झालं आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या नाट्यउत्सवात मी अरुंधती नाग यांनी गिरीश कार्नाड यांच्या दिग्दर्शनाखाली केलेलं ‘बिखरे बिंब’ नावाचं हिंदी नाटक २००८मध्ये बघितलं असावं. मुळात ते कार्नाड यांचं कन्नड नाटक... अरुंधती नाग रंगभूमीवर सर्व भारतीय भाषा बोललेली अभिनेत्री... आणि ते कन्नड नाटक हिंदीत… एकपात्री... त्या वेळी मला ते एक फक्त उत्तम नाटक, नाट्य प्रयोग वाटला होता…

पण आज हे अल्काझी चरित्र समोर असताना वाटलं, भारतीय भाषांमधील ते कन्नड नाटक हिंदीत करताना त्या दिवशी ते ‘राष्ट्रीय’ झालं होतं... किती उशीर केला मी हे समजावून घ्यायला... पण अल्काझी यांना अपेक्षित हिंदी रंगभूमी आज उरली आहे का? ती राष्ट्रीय रंगभूमी आहे का?

आजही मुंबईत गर्दी खेचणारं ‘पुराने चावल’ हे हिंदी नाटक निल सायमनचं मूळ इंग्रजी नाटक आहे. इंग्रजीतून हिंदीत येणं गैर नाही, पण मूळ हिंदी लेखकांचा शोध कोण घेणार? हिंदीतील मोहन राकेश, धर्मवीर  भारती, अल्काझी काळापुरते होते बहुतेक... मग आले ते ‘अंधायुग’.

हे साधं सरळ पुस्तकं असतं, तर एव्हाना मी वाचून, चाळून कोणाच्या तरी माथी ते मारलं असतं, पण या पुस्तकातील छायाचित्रं मला यातल्या बाराखडीपेक्षा प्रिय आहेत... आणि यातलं एक छायाचित्र मला ‘अल्काझी पर्वा’मध्ये घेऊन जातं. माझे डोळे बंद नसतात तेव्हा... धर्मवीर भारती यांचं ‘अंधायुग’ दिल्लीच्या भग्न पुराने किल्लामध्ये अल्काझी यांनी सादर केलं होतं... दंतकथा जणू...

पण त्या भग्न किल्ल्यासमोर आपल्या नटसमूहाला दिग्दर्शित करताना रिहर्सलमध्ये पाठमोऱ्या उभ्या असलेल्या अल्काझी यांचं छायाचित्रं बघून मात्र मला हुंदकाच फुटतो... भग्नअवशेषात ‘नाट्य’ बघणारा आता कोण आहे?

ते नाट्य बघणाऱ्या आपल्या बापाच्या चरित्राला अमल अल्लाना नावं देतात- ‘होल्डिंग टाईम कॅप्टिव’… म्हणजे ‘काळ धरी करी’. तो काळ मी धरतो पुस्तकाच्या रूपानं माझ्या हातात... सध्या तरी... रात्री… दिवसा... दुपारी...

.................................................................................................................................................................

पाशा

yashpalpasha@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......