‘रिबेल्स अगेन्स्ट द राज’ : ज्या सात असामान्य विदेशी व्यक्तींनी भारत आणि भारतीयांच्या भवितव्याशी, जीवन संघर्षाशी स्वत:ला अखेरपर्यंत जोडून घेतलं, त्यांच्या विलक्षण कथा
ग्रंथनामा - झलक
सतीश कामत
  • ‘रिबेल्स अगेन्स्ट द राज’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 05 September 2023
  • ग्रंथनामा झलक रामचंद्र गुहा Ramchandra Guha रिबेल्स अगेन्स्ट द राज Rebels Against The Ra

ज्या परदेशी व्यक्तींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत मोलाचं योगदान दिलं, अशा सात वीरांची कहाणी प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी ‘रिबेल्स अगेन्स्ट द राज’ या पुस्तकात सांगितली आहे. २०२३चा ‘एलिझाबेथ लाँगफोर्ड पुरस्कार’ मिळवणाऱ्या या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद सतीश कामत यांनी केला असून तो मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. अनुवाद कामत यांचं या पुस्तकाची नेमकी ओळख करून देणारं हे मनोगत

..................................................................................................................................................................

लेखनाला असतो, तसा अनुवादालाही अनेकदा व्यावसायिकतेच्या पलीकडील हेतू असतो. आवडलेली एखादी वस्तू आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवावीशी वाटते, त्यांच्यासोबत वाटून घ्यावीशी वाटते, तेव्हा त्यामागील हेतू व्यावसायिक जाहिराती पलीकडील असतो, तसाच. व्यावसायिक अनुवादात अर्थकारण असतंच, पण अनेकदा मूळ पुस्तकाच्या वाचनातून आपल्याला समृद्ध करणारा जो अनुभव येतो, तो इतरांसोबत वाटून घेण्यातील कृतज्ञ सार्थकतेपुढे ते गौणही ठरलेलं असतं. ‌‘रिबेल्स अगेन्स्ट द राज’ हे रामचंद्र गुहा यांचं पुस्तक अशांतलंच एक.

स्वत:चा देश, धर्म, वंश आणि वर्ण यांपलीकडे जात ज्या सात असामान्य विदेशींनी भारत आणि भारतीय यांना आपलं मानलं आणि त्यांच्या भवितव्याशी, जीवन संघर्षाशी स्वत:ला अखेरपर्यंत जोडून घेतलं, त्यांच्या या कथा. गुहा सार्थपणे त्यांना ‌‘कालातीत अशा नीतिकथा’ मानतात.

जन्मानं आपला नाही, अशा देशाला ‘मायदेश’ म्हणून आपलासा करणं, अंत:प्रेरणेला प्रतिसाद देत एकट्यानं स्वदेश सोडणं, वसाहतवादी राजवटीच्या विरोधातील स्वातंत्र्य आणि नवनिर्माण, याकरता त्या देशातील नागरिकांनी छेडलेल्या लढ्यात सहभागी होऊन तुरुंगवास भोगणं, हे या पुस्तकातील समावेशासाठी लेखकानं लावलेले निकष.

हे ‌‘बंडखोर' कसे उतरले होते, हे वाचणं उद्बोधक आणि रंजकही आहेच; पण आपापल्या पिंडानुसार ते कशाकशावर, कोणत्या काळात आणि कशा प्रकारे व्यक्त झाले, यातून उलगडणारी त्यांची व्यक्तिमत्त्वंही विलोभनीय आहेत. त्यांना मानवी स्वभावातील राग-लोभाचे, अपेक्षाभंगाचे, आशा-निराशेचे कंगोरे जरूर आहेत, पण नि:स्वार्थ परार्थ वृत्ती, साधी राहणी, समर्पण भावना आणि सदसद्विवेकाशी तडजोड न करण्याचं व्रत, ही त्यांतील साम्यस्थळं ठळकपणे ठसणारी आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आणखी एक समान दुवा म्हणजे महात्मा गांधी. त्यांच्यातील साम्यस्थळं पाहता, यात अस्वाभाविक असं काही नाही. मात्र यापैकी प्रत्येकानं आपापल्या बुद्धीची स्वायत्तता जपत काळाच्या त्या त्या टप्प्यावर गांधींकडे कसं पाहिलं आणि त्यांना कसा प्रतिसाद दिला, हे गुहा म्हणतात त्याप्रमाणे, गांधींचा वारसा किती जटिल आहे, याचंच द्योतक आहे.

गांधींचा भारतीय राजकारणाच्या पटावर १९१५च्या सुमारास प्रवेश झाला, त्यापूर्वीच देशात आलेल्यांमध्ये ॲनी बेझंट (१८९३), बेंजामिन हॉर्निमन (१९०४) आणि सॅम्युएल उर्फ सत्यानंद स्टोक्स (१९०४) यांचा समावेश होता. यांपैकी बेझंट आयरिश, हॉर्निमन ब्रिटिश, तर स्टोक्स अमेरिकी. उरलेले चौघे भारतात आले, ते गांधींचं नेतृत्व राष्ट्रीय चळवळीत प्रस्थापित झाल्यावर.

मॅडेलिन स्लेड उर्फ मीरा बहेन (१९२५), फिलिप स्प्रॅट (१९२४) हे ब्रिटिश तर राल्फ रिचर्ड उर्फ डिक किथान (१९२९) हे अमेरिकी आणि भारतात आल्यानंतर एकदाही आपल्या मूळ देशात भेटीसाठीही न गेलेल्या कॅथरिन मेरी हेलमन उर्फ सरला बहेन (१९३२) याही ब्रिटिश... मात्र आपलं आत्मिक ध्येय गांधींच्या सहवासातच गवसेल, या ध्यासातून इंग्लंडमधून वयाच्या तिशीत साबरमती आश्रमात दाखल झालेल्या मीरा या एकमेव. इतर तिघांच्या भारतात येण्यामागच्या प्रेरणेत गांधींचा पूर्वप्रभाव नव्हता.

बेझंट वयानं आणि सार्वजनिक कार्यातील अधिकारानंही गांधींपेक्षा ज्येष्ठ. लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेताना, थिऑसॉफीवरील त्यांच्या भाषणांना श्रोता म्हणून गांधी उपस्थित असत. बेझंट यांचा पवित्रा उद्धारकर्त्याचा म्हणावा असा. मात्र भारतीयांना स्वयंशासनाचा हक्क मिळवून देण्यापुरता तो एकतर्फी नव्हता, तर पौर्वात्य- प्रामुख्यानं हिंदू दृष्टीच्या अभ्यासानं पाश्चिमात्यांचं आत्मिक पुनरुत्थान करू पाहणाराही होता.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

राष्ट्रवाद, राष्ट्र-राज्य, धर्म या संकल्पनांचा पराभव करण्याची जबाबदारी उदारमतवादी विचारवंतांनी घ्यायला हवी!

देशभक्ती म्हणजे राष्ट्रवाद नव्हे, उन्मादी वा असहिष्णू कट्टरवाद तर नव्हेच नव्हे

द्वैभाषक बुद्धिजीवींचा उदय आणि ऱ्हास

गोडसेभक्ती आता मुख्य प्रवाहात

..................................................................................................................................................................

शिक्षणातून धर्म वगळल्यामुळे भारताचं भौतिकीकरण, थिल्लरीकरण, अराष्ट्रीयीकरण झालं आहे, असं त्यांचं मत होतं आणि धर्माला त्याची सुयोग्य जागा त्यांना मिळवून द्यायची होती. ‘रामायण’-‘महाभारत’ हे साहित्य आणि त्यात समावेश असलेला भूतकाळ, यात भारतीय राष्ट्रीयतेची बीजं अविच्छिन्नपणे रोवली गेली आहेत. भारत हे एक सातत्यपूर्ण अस्तित्व आहे आणि तिची आर्य संस्कृती ही एक अखंड समग्रता आहे. मुस्लिमांसह अनेक आक्रमकांना हे सातत्य व एकत्व नष्ट करता आलेलं नाही, असं त्यांचं निरीक्षण होतं.

याचे प्रतिध्वनी गेली काही वर्षं आपल्या भवताली उमटताना दिसत असले, तरी त्यातील कर्कश विद्वेषाचा मागमूस बेझंट यांच्या दृष्टीत नव्हता. किंबहुना त्यांचे देशबांधव असलेले तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यवादी आणि शेकडो वर्षांपूर्वीचे आक्रमक यांत ‌‘सत्ताधीश’ म्हणून असलेला फरक त्यांनी परखडपणे नोंदवला होता. इस्लाम या विदेशी धर्माच्या आगमनामुळे दोन्ही बाजूंमध्ये अस्वस्थता आणि वैमनस्य जरूर निर्माण झालं, मात्र त्याच वेळी या नव्या सत्ताधीशांनी भारतीय ‌‘राष्ट्रा’च्या बांधणीसाठी मोलाची साधनसामग्री पुरवली. त्यामुळे भारतीय राष्ट्रीयतेच्या बहुरूपी वैभवात नव्या पैलूंची भर पडली. केवळ ब्रिटिश वेगळे होते. जेथून आले होते, तेथे ते परत गेले. ते येथल्या मातीत सामावून गेले नाहीत, तिच्याशी एकरूप झाले नाहीत, असं त्यांचं विश्लेषण होतं.

लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर बेझंट यांना राष्ट्रीय चळवळीतलं सर्वोच्च स्थान प्राप्त झालं होतं. ‘सविनय कायदेभंग’सारख्या कल्पक चळवळींमुळे महात्मा गांधी यांच्याकडे ते जाऊ लागलं, तेव्हा अस्वस्थ झालेल्या बेझंट यांनी गांधींना ‘हुकूमशहा’ ठरवलं होतं. त्यांचे अनुयायी गांधींना ‘महात्मा’, ‘अवतार’ अशी धार्मिक विशेषणं देऊन त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे, असं भासवतात, इतरांना दडपतात, असे आरोपही केले होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मात्र ‌‘आपले सर्व विचार आणि कृती यांमागे हिमालयातील काल्पनिक महात्म्यांचे आदेश असतात,’ अशी श्रद्धा बाळगणाऱ्या बेझंट ‌‘एक प्रकारे स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करतात. साहजिकच कोणताही विरोध त्यांना सहन होत नाही,’ अशी उपरोधिक टिपणी खुद्द टिळक यांनी त्याआधी काही काळ केली होती. गांधींनी ‘मिठाचा सत्याग्रह’ केला, तेव्हाही ‌‘गांधींचे मत सर्वांना सर्वोच्च म्हणून स्वीकारावे लागते; नाही स्वीकारले तर ‘देशद्रोही’, ‘मायभूमीचे शत्रू’ असे शिक्के मारले जातात,’ अशी तक्रार बेझंट यांनी केली होती. अशा वक्तव्यांचे प्रतिध्वनी तर आजही कोलाहलाच्या स्वरूपात भवताली ऐकू येत असतात.

सॅम्युएल स्टोक्स वयाच्या २४व्या वर्षी भारतात आले, ते हिमालयाच्या पहाडी प्रदेशात कुष्ठरोग्यांवर उपचार करणाऱ्या अमेरिकी डॉक्टरच्या सेवाभावाने प्रभावित होऊन. त्यांचा पिंड रचनात्मक कार्यकर्त्याचा. या प्रदेशाच्या सफरचंदावर आधारित अर्थव्यवस्थेचे ते जनक. शिवाय ब्रिटिश अधिकारीवर्ग आणि स्थानिक संस्थानिकांच्या वेठबिगारीतून पहाडी प्रदेशातील गावकऱ्यांच्या मुक्तीचा प्रश्न ऐरणीवर आणण्यातही त्यांचा मोठा वाटा. तेही आध्यात्मिक चिंतक आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते.

त्यांनी एका पत्रात म्हटलं होतं : ‌“माझ्यासारख्या अमेरिकेत जन्मलेल्या व्यक्तीकरता पूर्वेकडे सखोल अर्थवाही आणि आत्मिक घुसळण घडवून आणणारा संदेश होता. त्यामुळे माझा पूर्ण दृष्टीकोन बदलला. आता काळाकडे चिरंतनाच्या परिप्रेक्ष्यातून पाहत, उलथापालथ आणि बदलांना मी निर्भयपणे सामोरा जातो.”

त्यांचा राष्ट्रवाद संकुचित नव्हता. स्वत:च्या वंशाच्या हितापलीकडे जात, सर्व मानवजातीच्या हिताला जो स्थान देत नाही, अशा राष्ट्रवादासाठी झटणं व्यर्थ आहे, असं त्यांनी बजावलं होतं. बेझंट ज्यामुळे एवढ्या प्रक्षुब्ध झाल्या होत्या, त्या चळवळींचे स्टोक्सही साक्षीदार होते. त्यांना मात्र गांधींच्या या चळवळींच्या गाभ्यात राजकीयता नव्हे, तर आध्यात्मिकता आणि नैतिकता दिसली होती. निर्भयपणे उभे राहा, पण कोणाला अपाय पोहोचवू नका; मृत्यूला धैर्यानं सामोरे जा, पण कोणाची हत्या करू नका; मृत्यूची तमा न बाळगता दुष्प्रवृत्ती आणि अन्याय यांचा प्रतिकार करा, पण कोणाविषयी क्रोध बाळगू नका, हे गांधींचं आपल्याला आवाहन आहे, ही त्यांची या आंदोलनाविषयीची समज होती.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

भारत खऱ्या अर्थाने लोकशाही राष्ट्र आहे? त्याचे उत्तर ‘फिप्टी फिप्टी’ असेच आहे

महात्मा गांधी यांच्याविषयीची पाच उत्तम पुस्तकं!

“एकूणात समाज म्हणून आज आपण अधिक मुक्त आहोत” : रामचंद्र गुहा

रामचंद्र गुहा यांची मराठीतली पहिलीवहिली आणि (बहुधा) एकमेव मुलाखत

..................................................................................................................................................................

स्वराज्यातल्या एकाधिकारशाहीच्या प्रतिकारासाठीही ती प्रासंगिक आहे. वंशश्रेष्ठत्वाच्या पायावर उभा असलेला, ‌‘कमअस्सल’ लोकांवर प्रभुत्व गाजवणं, हा आपला ‌‘धर्म’ मानणाऱ्या आणि हिटलरच्या नेतृत्वाकडं या ध्येयपूर्तीचं साधन म्हणून पाहणाऱ्या जर्मन साम्राज्यवादाच्या अधिक घातक स्वरूपाविषयी याच स्टोक्स यांनी १९३९ साली गांधी, नेहरू आणि सुभाषबाबू यांना कळकळीनं लिहिलेल्या पत्रांतून इशारा दिला होता. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या रूपातील सर्वच आवृत्त्यांना तो कमी-अधिक प्रमाणात लागू होतो.

हॉर्निमन हे पत्रकार म्हणून नोकरी करण्यासाठी भारतात आले आणि राष्ट्रीय चळवळीचे वाहक म्हणून अखेरपर्यंत निर्भिडपणे लढत राहिले. वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या आक्रमणांचा तर त्यांनी सामना केलाच, पण ‌‘बॉम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्राच्या मालकांच्या बदलत्या राजकीय दृष्टीकोनाचाही त्यांनी प्रतिकार केला.

काँग्रेसअंतर्गत जहाल व नेमस्त यांच्यातील वादात त्यांनी नेहमी आंदोलनकारी जहालांची पाठराखण केली आणि संचालक मंडळाच्या कलानुसार त्याची बरी वा वाईट किंमतही मोजली. वृत्तपत्राचा ताबा घेत, संपादकीय धोरण मालकाच्या दावणीला बांधण्याचा राजकीय खेळ तेव्हाही सुरू होता आणि सरकारी हस्तक्षेपाला बोल लावता येणार नाही, अशा प्रकारे वृत्तपत्रीय विचारांची स्वायत्तता तेव्हाही दडपली जात होती.

स्प्रॅट यांना इंग्लंडमधील कम्युनिस्ट पक्षानं भारतातील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी- दुसऱ्या शब्दांत रशियन क्रांतिसदृश परिवर्तनाच्या शक्यता आजमावण्यासाठी काही महिन्यांकरता भारतात पाठवलं होतं. पण त्यांनी आयुष्य भारतात घालवलं. कम्युनिस्ट ते कट्टर कम्युनिस्टविरोधक, अमेरिकावादी, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचे समर्थक असा त्यांचा वैचारिक प्रवास.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गांधी, हिंदू समाजाचा मनोविश्लेषणात्मक अभ्यास, आणि लेनिन व साम्यवादी कार्यपद्धती यांचं पोथिनिष्ठेला आव्हान देणारं, वेगळी अंतर्दृष्टी देणारं त्यांचं चिंतन आजही प्रासंगिक आहे.

‌‘‘स्वत:चं भवितव्य ठरवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास जनसमुदायाला प्रवृत्त करण्याचा गांभीर्यानं प्रयत्न करणारे गांधी हे भारताच्या इतिहासातले पहिले... गांधींच्या योजनेत केवळ एखाद्या वर्गाच्या हितसंबंधांवर भर असणार नव्हता, तर राष्ट्रवादी आणि क्रांतिकारी अशा दोन्ही आदर्शवादांना ती चालना देऊ पाहत होती, आणि वर्गीय हितसंबंधांएवढाच आदर्शवादही महत्त्वाचा असतो,’ असं स्प्रॅट यांचं अ-मार्क्सवादी प्रतिपादन.

आत्मप्रेम आणि आत्ममग्नता तसेच पुरुष अधिकारी व्यक्तीविषयीचा पूज्यभाव, यांमुळे हिंदू समाजात सामाजिक सुधारणा आणि राजकीय क्रांतिकारकत्व सहजसुलभ नव्हतं, असं त्यांचं निदान. ‌‘आपल्या सत्ताधीशांविषयी हिंदू असाधारण वाटावा इतका सहिष्णू आहे, मग तो सत्ताधीश वंशपरंपरागत राजा असो, स्थानिक सुभेदार असो, परकीय आक्रमक असो वा विद्यमान लोकप्रिय नेते असोत. एकदा नेता प्रस्थापित झाला की, आयुष्यभरासाठी इतरांची स्वीकारार्हता गृहीत धरतो. पाश्चात्त्य आणि मुस्लीम यांचा त्यांच्या नेत्यांविषयीचा दृष्टीकोन परिवर्तनीय असतो,’ असं त्यांचं निरीक्षण.

लेनिन इतर पक्षांसोबत काम करू शकत नव्हते वा त्यांना करायचं नव्हतं, म्हणून त्या सर्वांना त्यांना दडपून टाकावं लागलं. पुढे स्वपक्षातली भिन्न मतं असलेल्यांचीही मुस्कटदाबी, वृत्तपत्रांचे कठोर नियमन, लोकांनी त्यांच्या आशा-आकांक्षांना ज्यातून वाचा फोडली असती, त्या लोकांच्या संस्था, निर्वाचित स्थानिक स्वराज्य संस्था आणि कामगार संघटना यांच्यावर त्यांच्या शिस्तबद्ध पक्षाचं काटेकोर नियंत्रण आणण्यापर्यंत त्यांची मजल गेली, असं त्यांनी निदर्शनाला आणलं होतं.

लेनिनवाद आणि फासीवाद, डाव्यांची तसेच उजव्यांची एकाधिकारशाही यांच्यातील साम्यस्थळं दाखवून देतानाच, उजव्या विचारांच्या पक्षांची प्रेरणाही कशी लेनिनवादी असू शकते, याचं स्प्रॅट यांचं विश्लेषण आज जगभर खरं होताना दिसत आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

राष्ट्रवाद, राष्ट्र-राज्य, धर्म या संकल्पनांचा पराभव करण्याची जबाबदारी उदारमतवादी विचारवंतांनी घ्यायला हवी!

देशभक्ती म्हणजे राष्ट्रवाद नव्हे, उन्मादी वा असहिष्णू कट्टरवाद तर नव्हेच नव्हे

द्वैभाषक बुद्धिजीवींचा उदय आणि ऱ्हास

गोडसेभक्ती आता मुख्य प्रवाहात

..................................................................................................................................................................

मीरा या जवळपास २० वर्षे गांधींच्या निकट सहवासात राहिलेल्या. त्यांना माता व पिता मानणाऱ्या. मात्र व्हाइसरॉय यांचे खाजगी सचिव लेथवेट यांनीच नमूद केल्याप्रमाणे, ‘‌‘गांधी यांच्या भोवतालच्या अनेक व्यक्तींपेक्षा त्यांची स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख होती. गांधींच्या अस्तित्वाशी सुसंवादी असं स्वत:चं आयुष्य त्या स्वतंत्रपणे जगत होत्या. त्या केवळ गांधींचं प्रतिबिंब नव्हत्या.”

मात्र त्या मनस्वी होत्या. ग्रामीण स्वावलंबन आणि पर्यावरणाचं संवर्धन यांविषयीच्या गांधींच्या कल्पना राबवणारे प्रयोग त्यांनी करून पाहिले, पण त्या ते तडीस नेऊ शकल्या नव्हत्या. स्वतंत्र भारतात कोणाची सत्ता चालते, हे नोकरशाहीनं त्यांना दाखवून दिलं होतं! ‌‘‘मी तीनदा माझा राजीनामा सादर केला, पण सरकार तो स्वीकारत नाही. गेल्या जुलैमध्येच साडेतेरा लाख रुपये मंजूर झाले आहेत, पण कामाला अद्याप सुरुवात नाही. निरुपयोगी सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन देणं एवढंच चालू आहे. दीड वर्ष केवळ चर्चाच सुरू आहे. मी आता थकले आहे आणि निधीही शून्य आहे.”

खुद्द राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान नेहरू यांनी शब्द टाकूनही १९५०च्या दशकाच्या पूर्वार्धात ही स्थिती होती. मीरा १९५९ साली भारताचा कायमचा निरोप घेऊन ऑस्ट्र्रियात वास्तव्याला गेल्या, मात्र गांधींच्या मूल्यांपासून गांधीवाद्यांना आणि सरकारला दूर जाताना पाहिलं की, त्या लेखाद्वारे वा पत्राद्वारे व्यक्त होत असत.

किथान आणि सरला यांचा पिंड रचनात्मक कार्यकर्त्याचा. वयाच्या तिशीत प्रवेश करतानाच दोघेही भारतात आले. सरला यांनी हिमालयातील पहाडी प्रदेश तर किथान यांनी दक्षिणेकडील- मुख्यत: तामिळनाडूतील खेडी हे आपलं कार्यक्षेत्र केलं. किथान धर्मोपदेशक म्हणून भारतात आले होते. ‌‘यंग इंडिया’तील लेखाद्वारे गांधींचा त्यांच्या नैतिक विश्वात प्रवेश झाला. भारतातील ख्रिस्ती आस्थापनांतील वंशवाद, भेदाभेद, श्रेष्ठत्वाची भावना आणि सुखवस्तू राहणी यांवर टीका करत त्यांनी हद्दपारीही ओढवून घेतली होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

स्वातंत्र्यानंतर ग्रामीण उद्योगशीलतेचं प्रशिक्षण देणाऱ्या गांधीग्रामची स्थापना, विनोबांच्या ‘भूदान यात्रे’त सक्रिय सहभाग, जातिभेदातीत वर्गीय समानतेवर भर देणारं गावागावांतलं काम करत त्यांनी देशातच अखेरचा श्वास घेतला. अपरिचित राहिलेल्या किथान यांची दखल घेऊन गुहा यांनी त्यांना कृतज्ञ आदरांजली वाहण्याची संधी वाचकांना दिली आहे.

तुलनेनं सरला बहेन या कमी उपेक्षित. गांधींचा प्रभाव असूनही, त्यांच्या विचारांना स्वत:च्या स्वतंत्र उपक्रमशीलतेची जोड त्यांनी दिली होती. हिमालयाच्या पहाडी गावांतील स्त्रियांना त्यांनी श्रममूल्यं जोपासणारं, जमिनीशी नातं जोडणारं, स्वावलंबनातून आत्मविश्वास घडवणारं आणि समाजातील कार्याला प्रवृत्त करणारं शिक्षण दिलं. पुढं हिमालयातील चिपकोसारख्या पर्यावरणीय आंदोलनात त्यांच्या आश्रमात प्रशिक्षित झालेल्या मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‌

‘‘मातेशी निगडित त्यागाची मूल्यं आणि संगोपनाची वा काळजी घेण्याची पारंपरिक वृत्ती, ही भारतीय स्त्रीत्वाची गांधीवादी कल्पना. तिचा त्यांनी प्रगतिशील मूल्यांशी, तसंच समानता, स्वातंत्र्य व पाश्चात्त्य सामाजिक कार्यकर्त्या स्त्रीचे वैशिष्ट्य असलेली स्वावलंबित्वाची प्रबळ भावना, या सामाजिक ध्येयांशी मिलाफ केला,” असे सार्थ कौतुकोद्गार एका अभ्यासकानं काढले होते.

किथान यांच्याप्रमाणेच सरला यांनीही विनोबांमध्ये गांधींना शोधण्याचा प्रयत्न केला... त्यांनी सूत्ररूपात केलेलं दिग्दर्शन हा प्रभाव अधोरेखित करतं : राजकारण + धर्म = सर्वनाश; विज्ञान + धर्म = सर्वोदय.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

भारत खऱ्या अर्थाने लोकशाही राष्ट्र आहे? त्याचे उत्तर ‘फिप्टी फिप्टी’ असेच आहे

महात्मा गांधी यांच्याविषयीची पाच उत्तम पुस्तकं!

“एकूणात समाज म्हणून आज आपण अधिक मुक्त आहोत” : रामचंद्र गुहा

रामचंद्र गुहा यांची मराठीतली पहिलीवहिली आणि (बहुधा) एकमेव मुलाखत

..................................................................................................................................................................

स्वत:च्या राष्ट्रानं अंकित केलेल्या अन्य देशांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि त्यातील नागरिकांच्या शोषणाचा जाहीरपणे धिक्कार करणाऱ्यांवर त्या त्या काळात ‌‘गद्दारी’चा शिक्का मारण्यात सत्ताधारी वर्गाचा हातखंडा असतो. सामान्य जनताही त्याच्या प्रभावाखाली येताना दिसते. या सात असामान्य व्यक्तींनी तर अशा एका अंकित देशाला आपली मायभूमी मानीत साम्राज्यवादाच्या विरोधातील संघर्षात सहभाग घेतला होता. अशा स्थितीत, या सातपैकी किमान पाच ब्रिटिश त्या काळात त्यांच्या मूळ देशबांधवांच्या तिरस्काराचा विषय बनले होते काय, हे स्पष्ट नाही. कदाचित ॲनी बेझंट वगळता इतर व्यक्ती त्या काळात त्यांच्या देशात आवर्जून दखलपात्र नसाव्यात. आज मात्र मानवी इतिहासातील सदसद्विवेकाच्या राखणदारांच्या पंक्तीत जगभरातील विचारी आणि संवेदनशील व्यक्ती त्यांचा समावेश करतील.

‘रिबेल्स अगेन्स्ट द राज’  - रामचंद्र गुहा, अनुवाद - सतीश कामत

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - ५३२ | मूल्य - ७०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......