महात्मा गांधी यांच्याविषयीची पाच उत्तम पुस्तकं!
सदर - गांधी @ १५०
रामचंद्र गुहा
  • महात्मा गांधी यांच्याविषयीच्या पाच उत्तम पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Wed , 02 October 2019
  • सदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi रामचंद्र गुहा Ramachandra Guha

प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी म. गांधी यांचं दोन भागांत लिहिलेलं इंग्रजी चरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्या आणि म. गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्तानं त्यांची https://fivebooks.com या पोर्टलवर मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. त्या मुलाखतीवर हा लेख आधारित आहे. अनुवाद – राहुल माने

आज महात्मा गांधी यांची १५०वी जयंती. त्यानिमित्तान ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होत असलेल्या विशेषांकातील हा एक लेख.

............................................................................................................................................

भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही आणि दुसरा सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आणि गांधीजी या भारतीय राष्ट्राचे जनक म्हणून ओळखले जातात. अमेरिकेतील लिंकन आणि जेफरसन, फ्रान्समधील डी गॉले, ब्रिटनमधील चर्चिल, चीनमधील माओ, व्हिएतनाममधील हो चि मिन्ह इत्यादींच्या तुलनेत ते भारतातील प्रमुख राष्ट्रीय व्यक्ती आहेत. ते जगातील सर्वांत महत्त्वाच्या आणि सर्वांत मोठ्या देशांपैकी एक असे अग्रणी राष्ट्रवादी नेते होते.

पण ते फक्त एक राजकीय नेते नव्हते. ते एक नैतिक तत्त्वज्ञ होते, ज्यांनी जगाला अन्याय, अर्थात हिंसेविरोधात लढा देण्याचं विशिष्ट तंत्र दिलं. या तंत्राला त्यांनी ‘सत्याग्रह’ म्हटलं आणि अमेरिकेसह जगातील बऱ्याच देशांमध्ये त्याचं पालन केलं गेलं. गांधी धर्माच्या बाबतीतही एक अतिशय विशेष असे विचारवंत होते. हिंदू-मुस्लीम या दोन प्रमुख धार्मिक समुदायांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी ते जगले आणि त्यांच्यातील सौहार्द कायम राखण्यासाठी ते मरण पावले. सध्याच्या काळात जगातील समुदायांमध्ये कलह आणि दुही निर्माण झाली आहे, तेव्हा मला वाटतं की, गांधी हे अजून समर्पक आणि समकालीन आहेत.

ते जवळजवळ ८० वर्षांचं दीर्घायुष्य जगले आणि या संपूर्ण काळात त्यांनी ग्रेट ब्रिटन, दक्षिण आफ्रिका तसंच भारतामध्ये काम केलं आणि अभ्यास केला. त्यांनी उत्तम लिखाण केलं. त्यांचं संग्रहित लिखाण ९० खंडांमध्ये आहे. त्यांचं आत्मचरित्र ४० हून अधिक भाषांमध्ये अनुवादित केलं गेलं आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस लिहिलेलं ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक अजूनही जगभरातील विद्यापीठांमध्ये शिकवलं जातं. म्हणून ते एक कार्यकर्ते असण्याबरोबरच असामान्य विचारवंत आणि लेखकसुद्धा होते.

गांधी वादग्रस्तही होते. त्यांनी भारतात आणि भारताबाहेर राहून अनेकांबरोबर वादविवाद केले. अगणित लोकांनी त्यांचे राजकीय विचार, धर्माविषयीची मतं, समाजसुधारणेबद्दलची मतं यावर त्यांच्याशी संवाद साधला. विसाव्या शतकामध्ये भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला स्पर्श केलेली, अशी गांधी ही व्यक्ती होती. ज्या मुद्द्यांबद्दल त्यांचं चिंतन चाललं होतं, ते केवळ भारतातच नाही, तर जगभरात आपल्यासमोर प्रश्न म्हणून उभे आहेत.

आपल्याला गांधींबद्दल काहीच माहिती नसल्यास रिचर्ड अटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटानं सुरुवात करायला हरकत नाही. ही एक चांगली कथा आहे. त्यातील अभिनय खूप चांगला आहे. विशेषत: मुख्य भूमिकेतील बेन किंग्जले यांचं काम एकदम आकर्षक आहे. हा चित्रपट गांधींच्या राजकीय जीवनाचा आणि ब्रिटिशांविरुद्धच्या त्यांच्या संघर्षाचं एक रेखाचित्र प्रस्तुत करतो. तो गांधींच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि पत्नीबरोबर असलेल्या त्यांच्या भांडणांविषयीसुद्धा सांगतो.

विद्वान आणि विशेषतः चरित्रकाराचं कर्तव्य हे असतं की, त्यानं कोणतीही माहिती दडवून ठेवू नये. जे जे रसपूर्ण किंवा महत्त्वाचं आहे, ते ते सर्व समाविष्ट केलं पाहिजे. जरी एखादी गोष्ट आपल्याला अस्वस्थ करत असेल किंवा त्याला प्रसिद्धीसाठी कमी लायक किंवा कमी परिणामकारक बनवत असेल तरीही आपण ते आपल्या लिखाणात समाविष्ट केलं पाहिजे. अर्थातच, मी मोठ्या प्रमाणात गांधीजींचं कौतुक करतो. परंतु हे मी सांगू इच्छितो की, आंबेडकरांबरोबर झालेल्या चर्चेत ते नेहमीच अचूक नव्हते. ते त्यांच्या तरुण आणि क्रांतिकारी विचारांच्या विरोधक सहकाऱ्यांना ‘शहाणपणाचे धडे’ देताना दिसतात. त्यांनी काँग्रेस पक्षावर ज्या प्रकारे नियंत्रण ठेवलं, तेदेखील आपल्या समोर आहे. ते एक संपूर्ण राजकारणी व्यक्तिमत्त्व होतं आणि त्यांचं मुख्य राजकीय माध्यम त्यांच्या ताब्यातून निसटून जाऊ नये अशीच त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीनं ते राजकीय व्यवस्थापक होते.

आणखीन एक— ते खूप चांगला पती नव्हते आणि पूर्णपणे विध्वंसक पिता होते. ते आणि त्यांचा पहिला मुलगा हरिलाल यांच्यातला खळबळजनक पत्रव्यवहार आता उपलब्ध आहे. या मुलाबरोबरचे त्यांचे संबंध खूपच अडचणीचे झाले होते. माझ्या सर्व सहानुभूती त्या मुलाबरोबर आहेत आणि मला वाटतं की, सर्व वाचकांच्या सहानुभूतीदेखील असतील.

जेव्हा गांधींचं वैयक्तिक जीवन, राजकीय जीवन आणि त्यांचे सैद्धांतिक विचार यांची पाळी येते, तेव्हा असे अनेक प्रसंग आहेत, जेव्हा मला गांधींबाबतीत अजिबात सहानुभूती वाटत नाही. त्यांच्याशी वाद घालणाऱ्या लोकांबद्दल मात्र मी सहानुभूती बाळगतो. 

१) माय डेज विथ गांधी – निर्मलकुमार बोस

१९४७च्या काळात गांधी शांतता प्रस्थापित करण्यासाठी बंगालमध्ये राबत होते. हा काळ असा होता की, पूर्व बंगालमध्ये धार्मिक दंगल ही अतिशय क्रूर होती आणि गांधींना दुभाषाची आवश्यकता होती. बोस बंगाली भाषक होते आणि गांधींना त्यांचं लिखाण माहीत होतं. त्यांच्याबरोबर त्यांचा पत्रव्यवहारसुद्धा झाला होता. म्हणून बोस त्यांच्याबरोबर गेले. पूर्व-बंगालमधील खेड्यात फिरत असलेला ७७ वर्षांचा हा माणूस होता.  सर्व प्रकारच्या समस्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी हे धैर्यवान प्रयोग करून हिंदू-मुस्लिमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता.

त्याच वेळी ते स्वत:वरही ब्रह्मचर्याशी संबंधित काही प्रयोग करत होते. मानववंशशास्त्रज्ञ आणि चरित्रकार म्हणून निर्मलकुमार बोस यांना ते रुचले, परंतु  एक शिष्य या नात्यानं ते अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी काही पत्रं लिहिली, ज्यांची गांधींनी उत्तरं दिली.

निर्मलकुमार बोस यांचा गांधींशी असलेला संबंध हा एका विशिष्ट कालवर्तुळाशी संबंधित आहे. गांधीजींच्या जीवनात या काळात ते त्यांच्याबरोबर होते, जिथं गांधींनी आपलं आयुष्य स्वत:वरील विचित्र, चमत्कारिक आणि अक्षम्य प्रयोगांमध्ये गुंतवलं होतं. अटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटापेक्षा या कथेमध्ये आपण अधिक गुंतागुंतीच्या गोष्टी पाहू शकता. हा असा काळ होता की, यावेळी गांधी त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च कर्तृत्त्वस्थानी होते. ७७ वर्षांचा गृहस्थ आसाम व बंगालमधील गावांमधून चालत आहे. संपर्क व्यवस्था अतिशय खराब आहे. मलेरिया आणि डिसेंट्रीचा प्रादूर्भाव आणि अशा बऱ्याच अडचणी आहेत. ते हिंदू-मुस्लीम यांना एकत्र आणून शांती स्थापित करण्याचा ऐतिहासिक प्रयत्न करत आहेत, असा तो अवघड काळ होता.

गांधींच्या प्रयोगानं बोस आश्चर्यचकित आणि निराश झाले होते. परंतु तरीही ते त्यांचे प्रशंसक राहिले. मला वाटतं की, हे पुस्तक खूप उपयोगी आहे. कारण ते एखाद्या विद्वान लेखकाचं असून गांधींच्या वैयक्तिक हवाल्यानं घटना व सत्य वर्णन उपलब्ध करून देतं.

बोस हा केवळ चमकणाऱ्या डोळ्यांचा निरागस शिष्य नाही, तर ते स्वतः एक विचारवंत आणि लेखक होते. त्यांना त्यांच्या लिखाण विषयातील व्यक्तींविषयी सखोल संशोधन करण्याची इच्छा होती. बोस यांच्या वर्णनात आलेले गांधी हे त्यांच्या आयुष्यातील अलग-थलग पडलेले आणि थोडे निराश झालेले होते. कारण त्या वेळेस देश फाळणीच्या दिशेनं चालला होता. भारत अविभाजित ठेवण्यासाठी गांधींनी आयुष्यभर संघर्ष केला. दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या काळापासूनच त्यांनी हिंदू-मुस्लीम सौहार्दाची पाठराखण केली. ते स्वत: हिंदू होते, श्रद्धाळू होते आणि हिंदू परंपरेत खोलवर बुडालेले होते. परंतु दक्षिण आफ्रिकेत त्यांचे जवळचे सहकारी मुस्लीम होते.

भारतात त्यांनी हिंदू व मुस्लीम या दोन मोठ्या आणि विवादित समुदायांमध्ये एक तह घडवून आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी ते अयशस्वी ठरले. कारण फाळणी झाली आणि हिंदू-मुस्लीम एकमेकांवर आक्रमण करून गेले. त्यांच्या वयाच्या त्या काळात स्वत:ला सावरून पुन्हा ध्येयवादाच्या दिशेनं नेऊन, पूर्वेकडील बंगालमधून पदयात्रा काढण्याचा प्रयत्न त्यांच्या इच्छाशक्तीचा निदर्शक होता.

२) अ विक विथ गांधी - लुई फिशर

लुई फिशर अमेरिकन पत्रकार होते. त्यांनी १९४२ मध्ये गांधींची त्यांच्या आश्रमात भेट घेतली होती.  लुई फिशर यांनी गांधींवर एकापेक्षा अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘द लाईफ ऑफ महात्मा गांधी’ हे चरित्र गांधींच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झालं. या पुस्तकावरच अटेनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट आधारित होता.

या पुस्तकाची पार्श्वभूमी दुसरं महायुद्ध चालू असतानाच्या भयंकर संकटाच्या काळातली आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी थोडं मागं जाऊ. राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ बरीच वर्षं चालू होती आणि ब्रिटिश राजवटीकडून बऱ्याच महत्त्वपूर्ण सवलती देण्यात आल्या होत्या. भारतीयांना सत्तेचं अंशत: विकेंद्रीकरण करण्यात आलं होतं आणि नऊपैकी सात प्रांतांमध्ये काँग्रेस सरकारं सत्तारूढ होती. जर दुसरं महायुद्ध झालं नसतं तर कॅनडा, न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिका यांच्यासारखा भारत ब्रिटिशांच्या सत्तेपासून हळूहळू बाहेर पडून स्वतंत्र झाला असता आणि तरीही त्याची ब्रिटिश राणीच्या मुकुटाप्रती प्रतीकात्मक निष्ठा कायम राहिली असती.

युद्धामुळे संपूर्ण परिस्थिती बदलून गेली, कारण युद्धात ब्रिटिशांची परिस्थिती एकदम नाजूक बनली होती. १९३९, १९४०, १९४१ या काळात अमेरिका युद्धात उतरली नव्हती, ब्रिटिश दुसऱ्या युद्धात एकाकी लढत होते. सोव्हिएत रशियासुद्धा १९४१ पर्यंत युद्धाबाहेर होता. त्यावेळी ब्रिटिश सत्तेला भारताच्या स्वातंत्र्याबद्दल अजिबात फिकीर नव्हती. त्यांना फक्त स्वतःचं अस्तित्व जपत हिटलरचा पराभव करायचा होता.

गांधी आणि काँग्रेस यांच्यापुढे भयंकर दुविधा होती. एका बाजूला त्यांचे साम्राज्यवादी शक्तींबरोबर मतभेद असूनसुद्धा गांधीजींना ब्रिटिश लोकांबद्दल अतिशय वैयक्तिक स्वरूपाची सहानुभूतीसुद्धा होती. त्यांचे ब्रिटनमध्ये शिकलेले अनेक ब्रिटिश मित्र होते आणि बदल म्हणून त्यांना लंडनसुद्धा खूप आवडे. जेव्हा लंडन शहरावर जर्मन बॉम्ब कोसळले, तेव्हा वेस्टमिनिस्टर अॅबे या ठिकाणी बॉम्ब पडले असतील या विचारानं ते रडले होते.

गांधी त्यांच्या सैद्धांतिक मूल्यांना तिलांजली देऊन ब्रिटिशांना सांगायचा विचार करत होते, “हिटलर हा सैतान आहे. त्याचा पराभव करण्यासाठी आम्ही तुमची मदत करू.” या ठिकाणी आम्ही म्हणजे गांधी आणि नेहरू यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस पक्ष होता. ते ब्रिटिश सत्तेला म्हणाले, “आम्ही तुमच्याबरोबर काम करण्यास तयार आहोत, पण युद्ध संपल्यावर तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य बहाल केलं पाहिजे.” ही खरोखरच एक समजून घेण्यासारखी अट होती. कारण जर ब्रिटिश त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढत असतील तर त्याचा अर्थ भारताचं स्वातंत्र्यसुद्धा होतो. तत्कालीन पंतप्रधान आणि कट्टर साम्राज्यवादी विन्स्टन चर्चिल यांनी हे धुडकावून लावलं. त्यांचा भारतातील व्हाईसराय लिनलिथगो हा चर्चिल इतकाच कडवा होता. 

तर इकडे भारतामध्ये गांधी विचारमग्न होते, “काय करू? मला माझ्या लोकांसाठी स्वातंत्र्य हवं आहे, पण ब्रिटिश लोकांना मदतसुद्धा करायची आहे. अमेरिकन लोकांना गांधींच्या अवघडलेल्या परिस्थितीबद्दल सहानुभूती होती. ज्या वेळी गांधी ब्रिटिश सत्तेला सांगत होते, “तुम्ही जर आम्हाला स्वातंत्र्याचं आश्वासन दिलं नाही, तर मी तुमच्या सत्तेविरुद्ध देशभर आंदोलन सुरू करेन.” नेमके याच वेळी फिशर भारतात आले होते. हे आंदोलन पुढे ऑगस्ट १९४२ चं ‘भारत छोडो आंदोलन’ ठरलं आणि याच्या आधी फिशर यांनी भेट दिली होती. 

मध्य भारतातील गांधींच्या आश्रमात ते जातात. त्यांचं लेखन विश्लेषणात्मक कमी आणि वर्णनात्मक जास्त आहे. ग्रामीण जीवनातील दैनंदिन जीवनशैलीचं आणि आश्रमातील वातावरणाचं समृद्ध आणि माहितीपर असं वर्णन त्यांनी केलं आहे. आश्रमातील भोजन एकदम साधारण दर्जाचं होतं. एक आठवडा तिथं उकडलेल्या भाज्या खाल्ल्यानंतर फिशर यांना मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये जाऊन व्यवस्थित जेवण करण्याची इच्छा होते.

फिशर हे गांधींच्या भोवतालचा लवाजमा, तेथील पुरुष आणि स्त्रिया, त्यांची पत्नी, त्यांचे शिष्य यांचे वर्णन करून गांधींशी चर्चा करतात. कमालीच्या मुक्तपणे आणि मनमोकळेपणानं त्यांनी संवाद साधला आहे.

हे पुस्तक मला अतिशय प्रिय आहे, कारण हे गांधींचं निकट दर्शन आहे.

विसाव्या शतकातील राजकारणाच्या अनुषंगानं फिशर यांच्याबद्दल एक गोष्ट वाचकांना कदाचित आवडेल. ती ही की, फिशर यांच्या कारकिर्दीची सुरुवात कम्युनिस्ट म्हणून झाली. त्यांनी अनेक वर्षं रशियामध्ये घालवली आणि रशियन महिलेबरोबर लग्न केलं. ते रशियन अतिशय अस्सलिखित बोलत आणि तत्कालीन अनेक अमेरिकन पत्रकारांप्रमाणे रशियन क्रांतीबद्दल नवखे होते. परंतु स्टालिनच्या निर्दयतेनं त्यांचे डोळे उघडले आणि ते परत गांधींकडे परतले.

साम्यवादापासून निराश झालेले आर्थर कोस्लर आणि इतर लेखकांबरोबर मिळून फिशर यांनी ‘The God That Failed’ या ग्रंथामध्ये योगदान दिलं होतं. फिशर हे आंतरराष्ट्रीय अनुभव असलेलं व्यक्तिमत्त्व होतं. ते रशियामध्ये राहिले. ते युरोपमध्ये फिरले आणि नंतर त्यांना भारतामध्ये गांधींचा शोध लागला. तर या दृष्टिकोनातून हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.

या पुस्तकात वारंवार येणारा एक उल्लेख म्हणजे गांधींचे चरख्यावरील विणकाम. गांधी नेहमी लोकांना यासाठी प्रोत्साहित करायचे. विणकाम हे मानसिक/बौद्धिक श्रम आणि शारीरिक श्रम यांतील विभागणी नष्ट करण्याचा, तसंच जातीच्या भिंती तोडून टाकण्याचा एक मार्ग आहे. भारतीय जातव्यवस्थेत उच्चवर्णीय ब्राह्मण आणि मंदिरातील पुजारी हे ग्रंथ वाचतात आणि क्षत्रिय हे जमिनीचे मालक असतात व युद्ध करतात. त्याच्यानंतर वैश्य आहेत, जे व्यापारी आहेत. फक्त शुद्र आणि दलित जे भारतीय समाजातील चौथे आणि पाचवे स्तर आहेत, ते शारीरिक श्रम करतात. भारतीय जातीव्यवस्थेत शारीरिक श्रमाकडे तुच्छतेच्या नजरेनं पाहिलं जातं. त्या दृष्टीनं गांधी प्रत्येकाला सांगायचे की, प्रत्येकानं त्याच्या हातानं श्रम केले पाहिजेत.

दुसरा मुद्दा असा होता की, गांधी आर्थिक स्वावलंबनवर विश्वास ठेवत. स्थानिक उद्योग ब्रिटिश सत्तेमध्ये उदध्वस्त झाले, हे भारताच्या मागासलेपणातील महत्त्वाचं कारण होतं. आपण इंग्लंडमधून आणि त्यातही मँचेस्टरमधून कपड्यांची आयात करायचो. त्यामुळे असं म्हणण्याची एक रीत पडली की, “आम्ही आमचे कपडे स्वतः विणू आणि विकेंद्रित पद्धतीनं आम्ही ते करू. आमच्यापैकी प्रत्येक जण काहीतरी विणणार.” 

तिसरा भाग असा की, त्यांच्या सहकारी स्वातंत्र्यसैनिकांमध्ये समर्पित बंधुतेची भावना ते विकसित करत होते आणि विणकाम हे त्यातील कृतीशीलतेनं आणि अहिंसेनं करण्याचं माध्यम होतं. नाझी राजवट लोकांमध्ये एवढी एकता कशी साध्य करते? ते एकत्र संचलन करतात आणि ते किती धोकादायक आहेत, हे शत्रूंना दाखवून देतात. नाझी संचलनाविरुद्ध गांधींनी दिलेला विणकामाचा पर्याय कल्पना करून पहा.

या प्रकारे तुम्ही गांधींचं विणकामाबद्दल असलेलं आकर्षण समजून घेतलं पाहिजे. एकेकाळी हा जातीमधील भेद नष्ट करण्याचा सामाजिक समतेचा, आर्थिक स्वयंनिर्भरता शोधण्याचा आणि राष्ट्रीय एकतेचा कार्यक्रम होता. सर्वांसाठी विणकाम हीच एक कृती होती.

३) महात्मा गांधी – नॉन व्हायोलंट पॉवर इन अॅक्शन – डेनिस डाल्टन

डेनिस डाल्टन हे एक ८० वर्षांचे निवृत्त अमेरिकन प्राध्यापक आहेत. मी त्यांना कधीही भेटलो नाही, पण त्यांच्या कामाचा मी बऱ्याच काळापासून चाहता आहे. त्यांनी इंग्लंडमधून १९६०च्या आसपास पीएच.डी. केली, नंतर कोलंबिया विद्यापीठात शिकवण्याचं काम केलं. १९७०- ८०च्या काळात त्यांनी गांधींवर अतिशय मूलगामी स्वरूपाचं लेखन केलं, ज्यामुळे मी खूप प्रभावित झालो. त्यावर त्यांचं हे पुस्तक आधारित आहे.

डाल्टन यांचं काम का महत्त्वाचं आहे याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. सर्वप्रथम हे की, त्यांचं काम हे प्राथमिक संशोधनावर आधारित आहे. गांधींवर काम केलेल्या इतर विश्लेषकांप्रमाणे ते आपलं काम फक्त संग्रहित साहित्याबद्दल मर्यादित ठेवत नाहीत. गांधींच्या स्वत:च्या लिखाणाचे ९० खंड सध्या उपलब्ध आहेत आणि फक्त गांधींनी या सर्व खंडांत स्वतः काय म्हटलेलं आहे, यावर विश्लेषण किंवा पुनर्विश्लेषण करून पुस्तक लिहिणं सोपी गोष्ट नाही. ते याकडे तर पाहतातच, त्याशिवाय तत्कालीन वृत्तपत्रं गांधींबद्दल काय म्हणत होती, याकडेसुद्धा ते लक्ष देतात.

गांधींचे राजकीय शत्रू त्या वेळी काय म्हणत होते याबद्दलसुद्धा ते लिहितात. या पुस्तकात अहिंसा मार्गाचा निषेध करणाऱ्या, तसंच सशस्त्र संघर्ष हा ब्रिटिश राजवट घालवण्यासाठी अधिक कार्यक्षम मार्ग असल्याच्या क्रांतिकारकांच्या दाव्याविषयीचा महत्त्वपूर्ण मजकूर आहे. अहिंसा हा कमकुवत, स्त्रीसुलभ गुण आहे, अशा तऱ्हेनं गांधींच्या अहिंसेविरुद्ध ते पुरुषी आक्रमण करायचे. डाल्टन गांधींबरोबर मतभेद असलेले दलितांचे क्रांतिकारी नेते डॉ. आंबेडकर यांच्याबद्दलसुद्धा बोलतात. या पुस्तकामध्ये मिठाचा सत्याग्रह आणि १९४७मधील कलकत्ता इथं शांती स्थापित करणाऱ्या गांधींचं प्रदीर्घ उपोषण, या दोन्ही घटनांबद्दल उत्कृष्ट लेखन आहे.

डाल्टन यांच्या कामाबद्दल आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ते गांधींच्या विचारांच्या उत्क्रांतीकडे लक्ष देतात. गांधी असतील किंवा मार्क्स किंवा हॉब्स किंवा मिल, कोणताही महान तत्त्वज्ञ त्यांचं आयुष्य दररोज जगत असतात आणि त्याप्रमाणे त्यांचे विचार घडवत असतात, उत्क्रांत करत असतात. ज्यांना आयुष्याच्या उत्क्रांतीबद्दल एक क्रमवार, विकासशील किंवा ऐतिहासिक असा उत्क्रांतीचा दृष्टिकोन नाही, ते फक्त निवडक अशा गोष्टींबद्दलच बोलतात. अस्तित्वात नसलेल्या नियमिततांची ते अपेक्षा करत राहतात.   

डाल्टन हे गांधींच्या मतांमध्ये झालेल्या उत्क्रांतीचं दर्शन घडवतात. ते दाखवून देतात की, गांधी यांची जात आणि वंश याबद्दलची मतं अतिशय रूढीबद्ध होती. पण त्यांचे हे पूर्वग्रह नंतर गळून पडले. नंतर त्यांची याबद्दलची मतं अधिक विशाल आणि मानवतावादी बनली. त्यामुळे हे पुस्तक गांधींच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा विकास कसा झाला, याचा एक दस्तऐवज तर आहेच, तसंच गांधींच्या भारतीय टीकाकारांच्या गंभीर, मूलभूत आणि उल्लेखनीय अशा टीकांचं विश्लेषण करणारंसुद्धा हे पुस्तक आहे.

अहिंसक आंदोलनाच्या परिणामकतेकडेसुद्धा ते आपलं लक्ष वेधतात. या पुस्तकातील एक वाक्य इथं संदर्भासाठी देता येईल - “कृतीमधील अहिंसक सामर्थ्यानं त्यांची कारकीर्द परिभाषित झाली : त्यांनी वापरलेले कल्पक मार्ग आज जगाला उत्तेजित करतात.”

हा मुद्दा अधिक विस्तारानं सांगायचा असेल तर डाल्टन यांच्या पुस्तकातील ‘मोहनदास, माल्कम आणि मार्टिन’ या शेवटच्या प्रकरणाकडे पाहता येईल. यामध्ये ते एकविसाव्या शतकातील गांधी यांचा वारसा—जो मार्टिन ल्युथर किंग यांनी चालवला आणि जो माल्कम एकस यांनी नाही चालवला—याबद्दल बोलतात. मार्टिन ल्युथर किंग आणि अमेरिकेतील वंशसंबंध यावर गांधी यांचा प्रभाव याबद्दल डाल्टन यांचं विश्लेषण आहे. गांधी हे त्यांच्या अहिंसक असहकार आंदोलनामधून अन्यायकारी सत्तेची कशा प्रकारे निर्भत्सना करतात, हे डाल्टन आपल्याला सांगतात.

“अहिंसा ब्रिटिश सत्तेविरोधात प्रभावी ठरली आणि अधिक निर्दयी अन्यायकारक सत्तेविरोधात ती प्रभावहीन ठरली असती,” हे गृहीतक प्रथमदर्शनी बरोबर आहे असं वाटतं. एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते—कदाचित ती काल्पनिक असेल—व्हिएतनामचे हो चि मिन्ह १९५० च्या दशकात नवी दिल्लीत आले होते. तेव्हा ते एका समूहाला बोलताना असं म्हणाले होते की, जर गांधीजींनी फ्रेंचांविरोधात लढा दिला असता तर त्यांनी कदाचित एका आठवड्यातच अहिंसा सोडून दिली असती. याप्रमाणे डच (ज्यांची इंडोनेशियामध्ये अतिशय निर्दयी राजवट होती) किंवा हिटलर विरोधात या प्रकारचा प्रयत्न निरर्थक ठरला असता. ब्रिटिशांची ज्या प्रकारे मानहानी झाली, त्या अर्थानं इतर असंवेदनशील किंवा भावनाहीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे कदाचित शक्य झालं नसतं.

हेसुद्धा खरं आहे की, ब्रिटिश मतप्रवाहामधील एक शक्तीशाली असा मजूर पक्षाचा गट नेहमीच भारतीय स्वातंत्र्याच्या बाजूनं उभा राहिला. गांधी भारतात परत येण्यापूर्वी म्हणजेच १९०५-०६च्या सुमारास केईर हार्डी यांनी मजूर पक्षाची भारतीय स्वातंत्र्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली होती. नंतर जसजसा मजूर पक्ष १९२० आणि १९३० च्या काळात वाढत गेला, त्याप्रमाणे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देणारे अधिकाधिक राजनेते, बुद्धिमंत लोक पुढे येत गेले. जॉर्ज ऑर्वेलसारखे लेखक, ‘न्यू स्टेट्समन’चे किंग्सले मार्टिन, फर्नर ब्रोकवे आणि व्हेरा ब्रिटन (गांधींचे मित्र असलेले संयतशील नेते) हे सर्व ब्रिटिश वृत्तपत्रांत भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीबद्दल सातत्यानं लिहीत होते.

हे सर्व सांगून झाल्यावर हे सांगायला पाहिजे, हे सर्व फक्त डावपेचाचा भाग नव्हतं. “गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला एक नैतिक गाभा आहे. त्यांनी निर्दयी सत्तेला नष्ट करण्यापेक्षा अन्यायी सत्तेची मानहानी करण्याचा मार्ग निवडला.” गांधी नेहमी म्हणायचे, जर मी साम्राज्यवादी अधिकाऱ्याला गोळी मारली तर मी १०० टक्के बरोबर आणि तो १०० टक्के चूक असं म्हणण्याशिवाय त्यांचा जीव घेण्याचा मला कोणता न्याय अधिकार आहे?”

अहिंसा ही व्यक्ती-व्यक्तींतील नात्यांच्या नैतिक समंजसपणावरसुद्धा अवलंबून असते, जी म्हणते, “माझ्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तीमध्येसुद्धा माणुसकी आहे. चला त्या माणुसकीचा शोध घेऊ. मग आम्ही दोघे एकमेकांबद्दल आदर आणि समजूतदारपणा वाढवू.” तर अहिंसा फक्त डावपेचात्मक, व्यावहारिक आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे एक शस्त्र नाही, त्याला एक नैतिक अधिष्ठानसुद्धा आहे आणि हे मला वाटतं कुणीसुद्धा विसरू नये.

४) गांधीज रिलिजन : अ होमस्पून शॉल – जे. टी. एफ. जॉर्डन्स

जे. टी. एफ. जॉर्डन्स यांचं म्हणणं आहे की, गांधींना त्यांच्या धर्माशिवाय समजून घेणं अशक्य आहे. जॉर्डन्स सुरुवातीला बेल्जियन धर्मगुरू होते. ते भारतात आले आणि एका चर्चमध्ये सामील झाले. काही काळानं चर्चमधून बाहेर पडले. नंतर त्यांची गांधींबद्दलची रुची वाढली. मग ते अभ्यासक झाले. सध्या ते ऑस्ट्रेलियामध्ये प्राध्यापक आहेत.

गांधी हे श्रद्धाशील व्यक्तिमत्त्व होतं, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला श्रद्धाबाह्य अशी अध्यात्मरूपातील किनार होती. ते स्वतःची सनातनी हिंदू म्हणजे कर्मठ, श्रद्धाळू हिंदू या अर्थानं ओळख करून द्यायचे, पण ते मंदिरात जात नसत. ते दक्षिण भारतातील एका मंदिरात गेले होते, कारण त्या मंदिरानं दलितांना पहिल्यांदा प्रवेश दिला होता. ते कधीही मंदिरात न जाणारे हिंदू होते. ते हिंदू होते, परंतु हिंदू धर्माच्या काही परंपरांना त्यांनी क्रांतिकारक पद्धतीनं आव्हान दिलं. त्यांचे सर्वांत जवळचे मित्र ख्रिश्चन धर्मगुरू होते. मुस्लीम लोकांना स्वतंत्र भारतात समान अधिकार असावेत आणि हिंदूंनी मुस्लिमांवर अत्याचार करू नयेत, असं मानणारे ते हिंदू होते.

गांधींचे धर्माबद्दलचे विचार हे अतिशय वेगळे आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अशा एका व्यक्तिमत्त्वाबद्दल तुम्ही बोलत आहात, ज्या वेळी विशेषतः डार्विनच्या ‘द ओरिजिन ऑफ स्पेसीज’ या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर तर्कनिष्ठ निरीश्वरवादाचा स्फोट झाला होता. हार्डी यांनी ‘देवाचे अंत्यसंस्कार’ ही कविता लिहिली, कारण शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी देवाकडे पाठ फिरवली होती. परंतु हा काळ आक्रमक धर्मप्रसाराचासुद्धा होता, ज्या काळात ख्रिश्चन धर्मगुरू भारतामध्ये आणि मुस्लीम धर्मगुरू हे आफ्रिका आणि इतर भागांत प्रसार करत होते.

आजसुद्धा आपण एका बाजूला बुद्धिवंत लोक अहंकारी निरीश्वरवाद आणि धार्मिक मूलतत्त्ववाद या दोन्हींच्या मध्ये असलेल्या धर्माचे अस्तित्व अमान्य करताना आढळतात. गांधी आपल्याला यातून बाहेर पडण्याचा पर्याय देतात. गांधी सांगतात की, तुम्ही धार्मिक असू शकता आणि त्याच वेळी आयुष्यात एक प्रकारचं रहस्य आहे, जे तर्कनिष्ठता आणि विज्ञान पूर्णपणे समजावून सांगू शकत नाही.  

तरीसुद्धा ईश्वराकडे जाण्याचा कोणताही एकच रस्ता नाही. तुम्ही तुमचं नशीब स्वीकारा, तुम्ही हिंदू आहात, ठीक आहे. तुम्ही अनेक पिढ्यांपासून हिंदू आहात, मग याचा विचार करा की, तुम्ही दुसऱ्या धर्मांपासून काय शिकू शकता. ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू आणि पारसी लोकांबरोबर मैत्री विकसित करा. तुम्ही जर तुमचा धर्म दुसऱ्याच्या आरशात पाहू शकला तर तुम्ही त्यातील अपूर्णता शोधून काढू शकता. हा एक अतिशय आकर्षक आणि बहुआयामी असा धर्म समजून घेण्याचा मार्ग आहे.

धर्म गांधींच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी होता. गांधी हा एक धार्मिक माणूस होता. हा एक असा माणूस होता की, ज्याला धर्माबद्दल कदर होती आणि तरीसुद्धा तो स्वतःला हिंदू धर्मातील कर्मठतेविरुद्ध बंड करणारा म्हणायचा

मला वाटतं जॉर्डन्सचं पुस्तक हे श्रद्धा व धर्म यांचं गांधींच्या जीवनातील केंद्रीय स्थान या विषयावरील सर्वांत संतुलित, गौरवशाली आणि प्रभावशाली पुस्तक आहे. 

अंतिमत: आपण याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे की, गांधी यांची हत्या मुस्लिमांबद्दल त्यांची सद्भावना अधिक असल्यामुळे एका हिंदूनं केली होती.

गांधींचा धर्माप्रती मनमोकळ्या स्वभाव असला तरीही त्यांनी आपल्या मुलाला एका मुस्लीम मुलीशी लग्न करू दिलं नाही. त्यामागे एक व्यावहारिक, राजकीय कारण होतं. ते एका अतिशय कर्मठ अशा समाजात काम करत होते, हिंदू-मुस्लीम यांना एकाच राजकीय व्यासपीठावर पहिल्यांदा आणत होते. जर हे लग्न झालं असतं तर राजकीय चळवळ कोलमडली असती आणि इस्लामिक धर्मगुरूंनी मुस्लीम मुलीचं अपहरण आणि इतर आरोप केले असते. हा काल १०० वर्षांपूर्वी १९२०च्या आसपासचा होता. माझी खात्री आहे की, आज गांधींनी कोणताच विरोध केला नसता.

५) हरिलाल गांधी : अ लाईफ – चंदूलाल भागूभाई दलाल

हे पुस्तक चंदुलाल भागुभाई दलाल या लेखकानं मूळ गुजरातीमध्ये लिहिलं आहे. गांधींच्या आर्काईव्हचं सादरीकरण केलेल्या त्रिदीप सुर्हूद यांनी त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे. सुर्हूद यांनी या पुस्तकाला अतिशय विस्तृत अशी प्रस्तावना लिहिली आहे.

गांधींचं लग्न अतिशय तरुणपणी झालं. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म १८८८ साली झाला, जेव्हा ते २० वर्षांचेसुद्धा नव्हते. हरीलालच्या जन्मानंतर लगेच गांधी लंडनला वकिलीची पदवी घेण्यासाठी गेले. हरिलालच्या आयुष्यातील पहिली दोन वर्षं ते अनुपस्थित होते. ते परत येतात, वर्ष व थोडा काळ भारतात घालवतात आणि परत दक्षिण आफ्रिकेला उपजीविकेसाठी जातात. यावेळी ते पत्नी आणि हरिलालला भारतातच ठेवून जातात. काही वर्षांनंतर पत्नी आणि हरिलाल दक्षिण आफ्रिकेला जातात. आणखी काही वर्षांनंतर हरीलालला मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी परत पाठवलं जातं. म्हणजे हरीलालच्या आयुष्यातील सुरुवातीच्या अनेक वर्षांत त्याचे वडील अनुपस्थित असतात.

जेव्हा गांधी तिशीच्या उत्तरार्धात असतात, तोपर्यंत हरीलाल स्वतःच्या भविष्याबद्दल विचार करू लागतो. गांधी त्यांच्या मुलाला सांगतात की, तुरुंगात जा. माझे अनुकरण करा, समाजासाठी सर्व गोष्टींचा त्याग करा. जसा मी केला आहे. आणि हा मुलगा म्हणतो, जेव्हा तुम्ही माझ्या वयाचे होता, तेव्हा तुम्ही लंडनला वकील होण्यासाठी गेला होता, मग मी लंडनला वकील होण्यासाठी का जाऊ शकत नाही?

गांधी त्यांच्या मुलाच्या इच्छा-आकांक्षाबद्दल असंवेदनशील होते. त्यांच्या मुलाचा प्रेमविवाह होता, ज्याला गांधींनी कधीही मंजुरी दिली नाही. मुलगा पत्नीप्रती समर्पित असतो, पण पत्नी मध्येच त्याला सोडून जाते.

आपला मुलगा आपल्या मनाप्रमाणे काही करत नसल्यामुळे गांधी वरचेवर अधिक क्रोधी बनत चालले, अधिक त्रस्त होत चालले होते. यामुळे हरीलालसुद्धा त्रासतो. एका टप्प्यावर तो आपल्या वडिलांच्या असामान्य अशा अधिकारशाही प्रतिमेचा द्वेष करतो आणि दुसऱ्या पातळीवर तो वडिलांच्या कटाक्षासाठी तळमळतो. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही ठिकाणी हरीलाल तुरुंगात जातो.

हरिलालनं मॅट्रिक्युलेशन होण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. परंतु तो त्यात अयशस्वी ठरतो. नंतर त्याच्या पत्नीचं निधन होतं. नंतर बऱ्याच वेळा त्यानं व्यावसायिक बनण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सर्व व्यावसायिक प्रयत्न अयशस्वी ठरले. नंतर तो दारूचा व्यसनाधीन बनतो. त्यानंतर वडिलांशी असलेल्या रागामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारतो. यामुळे कस्तुरबा अत्यंत उद्विग्न मनोवस्थेत एक पत्र लिहितात. त्या सार्वजनिकदृष्ट्या कधीतरीच क्रोधीत होत, पण यावेळी त्या मुलाला वर्तमानपत्रातून लिहितात की, ‘तुझ्या वडलांना लाज वाटावी, असं तू का करत आहेस?

तर हे अत्यंत गुंतागुंतीचे नातेसंबंध आहेत आणि हे दुर्मीळ नाही. अनेक यशस्वी लोक हे चांगले पती किंवा वडील नसतात. आधुनिक इतिहास अनेक उदाहरणांसह याचा साक्षी आहे. पण गांधींच्या बाबतीत आपल्याकडे त्या दोघांमध्ये झालेल्या पत्रव्यवहार आहे. आपण त्या दोघांतील समजुतीचा अभाव आणि त्यामुळे पुढे दोघांत येणारा राग, विशेषतः मुलाच्या मनात येणारा कडवटपणा त्यांच्यातील पत्रव्यवहाराच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो.

हे पुस्तक हा वस्तुस्थितीचा खरा हवाला आहे. लेखकाला हे सर्व सरळ सत्य वस्तुनिष्ठदृष्ट्या सांगायचं होतं. त्यामुळे कोणताही अतिरेक, अतिशयोक्ती न केलेलं हे पुस्तक अतिशय परिणामकारक ठरतं. हरीलाल गांधींच्या अंत्यसंस्कार वेळी गेला नाही, याबाबत एक कहाणी आहे. कोणी म्हणतं की त्याला बातमी उशिरा कळली आणि तो नंतर दिल्लीला गेला. पण ही एक दु:खद घटना आहे. आधी आपण अटेनबरो यांच्या चित्रपटाबद्दल बोललो. आणखी एक चित्रपट आहे आणि त्याचं नाव आहे ‘गांधी, माय फादर’. हा फिरोज अब्बास खान यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या नातेसंबंध असलेल्या या चित्रपटाची सुरुवात मात्र एका नाटकापासून झाली आहे. मी वाचकांना म्हणेन की, हा चित्रपट जरूर पहा.

गांधींच्या आत्मचरित्राचा मी या यादीमध्ये समावेश केला नाही, कारण ते आधीच खूप लोकप्रिय आहे. ते अनेक आवृत्त्यांमध्ये आणि अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक महत्त्वाच्या प्रकाशकानं ते छापलेलं आहे आणि ते सगळीकडे उपलब्ध आहे. मला वाचकांना अशी काही पुस्तकं सुचवायची होती, ज्यामुळे अधिक ताज्या वातावरणात आणि अधिक सकस दृष्टिकोन व कमी माहीत असलेले मुद्दे कळावेत. पण निश्चितपणे त्यांनी गांधींची आत्मकथासुद्धा जरूर वाचावी.

............................................................................................................................................................

रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी : भारतात येण्यापूर्वी' या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5018/Gandhi-Before-India

............................................................................................................................................................

लुई फिशर यांच्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5073/Mahatma-Gandhi

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......