हे पुस्तक बहुभाषिकतेच्या दुनियेत आपल्याला सफर घडवून आणतं
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सतीश देशपांडे
  • ‘बहुभाषिकता : गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 06 July 2018
  • ग्रंथनामा शिफारस बहुभाषिकता : गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया डॉ. अविनाश पांडे विनया मालती हरी

शिक्षण आणि भाषा यासंबंधीच्या चर्चाविश्वात आजवर बरीचशी चर्चा झाली ती मातृभाषेच्या अंगाने. म्हणजे शिक्षणाची भाषा मातृभाषा असावी की बाजारात उपयुक्त ठरणारी इंग्रजी असावी, यावर. हे चर्चाविश्व चौफेर व्यापले जाईल असे विचार, मतमतांतरे, संशोधन मोठ्या प्रमाणावर मराठीत तरी झाले नाही. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (एनसीएफ) २००५ सालच्या आराखड्यात ‘बहुभाषिकता’ ही संकल्पना स्वीकारण्यात आली. बऱ्याच शासकीय धोरणांच्या बाबतीत होते तसेच याही बाबतीत झाले. ही संकल्पना स्वीकारली, पण ती धोरणदप्तरातून शालेय वर्गात काही उतरली नाही. सन्माननीय अपवाद वगळता यावर कोणी अभ्यासपूर्ण बोलले नाही. २०१५ साली या संकल्पनेवर विचारविनिमय झाला तो एका परिसंवादातून. तो परिसंवाद मुंबई विद्यापीठाचा भाषाविज्ञान विभाग आणि युनिक फाऊंडेशनचे डॉ. रखमाबाई संसाधन व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने. त्यात शिक्षण आणि भाषा यांच्यातील संबंधांबाबतच्या ढोबळ, चाकोरीबद्ध समजांपलीकडे जाऊन, ही संकल्पना वर्गात शिकवण्याचा भाग कशी बनवायची, यावर चर्चा झाली. जी चर्चा बहुभाषिकता ही संकल्पना लोकमानसात रूजविण्याकामी महत्त्वाची आहे. या परिसंवादात वाचले गेलेले निबंध बहुभाषिकतेचा एकेक कंगोरा स्पष्ट करणारे होते. त्या निबंधांचं संकलन म्हणजे  हे पुस्तक. डॉ. अविनाश पांडे आणि विनया मालती हरी या दोघांनी संपादित केले आहे. 

या पुस्तकात संपादकीय दोन लेख वगळता वैचारिक-सैद्धांतिक व अनुभव व्यवहाराची चिकित्सा या दोन विभागांत एकूण १६ लेख आहेत. डॉ. गणेश देवी, डॉ. अनिता रामलाल, वंदना भागवत, डॉ. ए.पी.अश्विन कुमार, डॉ. रेणुका ओझरकर, डॉ. चंद्रकांत पुरी, शिरीन इराणी, निलेश निमकर अशा मान्यवरांचे निबंध लेखस्वरूपात पुस्तकात समाविष्ट आहेत. पुस्तकात एक संपादकीय लेख असताना दुसऱ्या संपादकांचा लेख विशेष संपादकीय म्हणून का प्रसिद्ध केलाय, हे त्या संपादकद्वयींनाच ठाऊक. कधीकधी एखादी विशेष बाब असेल तर वर्तमानपत्रात विशेष संपादकीय प्रसिद्ध केले जाते, तसे त्यांनी केले असावे बहुधा. लेखांचा संग्रह आणि तोही बऱ्याच प्राध्यापकांच्या लेखांचा, म्हणजे त्याची भाषा बोजडच असणार. या पुस्तकाच्या बाबतीतही तेच घडले आहे. भाषा क्लिष्ट वाटते, पण बहुभाषिकतेसारखा जरा वेगळा विषय असल्याने, ही नेमकी काय संकल्पना आहे, त्याचा शिक्षणाशी, आपल्या सामाजिक-राजकीय पर्यावरणाशी, व्यक्तिमत्त्वाशी काय संबंध आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक देत असल्याने ते वाचावेसे वाटते. 

शिक्षणाचे आणि सर्वांगीण विकासाचे अतूट नाते आहे. म्हणूनच तर आपल्या राज्यसंस्थेने प्राथमिक शिक्षण घेता येणे हा बालकांचा हक्क आणि तो हक्क त्यांना मिळवून देणे ही पालकांची जबाबदारी म्हणून मान्यता दिली आहे. माध्यान्न भोजन, मोफत गणवेश आणि पुस्तके ही तर शासनाच्या शिक्षण विभागाची जबाबदारी आहेच, पण त्याहीपलिकडे सार्वत्रिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमके काय याची चर्चा अनेकदा झाली आहे. यावर अनेक समित्या, आयोगानेही भाष्य केले आहे.

गुणवत्तेचा नि भाषेचा अतूट संबंध आहे. भारतात भाषिक वैविध्य मोठ्या प्रमाणावर आहे. भारतासारखे बहुभाषिकत्व इतर संस्कृतीमध्ये, सभ्यतेमध्ये खूप कमी आढळते. आपलेच उदाहरण घेऊ यात. आपण रोज विविध भाषांना सामोरे जात असतो. मराठी मातृभाषा असली तरी आपण हिंदी, इंग्रजी, किंवा आपल्या परिसरातल्या भाषेशीही आपला संबंध येत असतो, किंवा आपण सीमावर्ती असू तर शेजारच्या राज्यांच्या भाषांना सामोरे जात असतो. त्यामुळे भारतासारख्या देशात व्यक्तीला ‘माझी फक्त हीच भाषा आहे’, असे ठामपणे म्हणता येत नाही. ग्रेट ब्रिटनमधील लोकांना केवळ त्यांचीच इंग्लीश येते. दुसरी भाषा अवगत नसते. पण भारतात, कॅनडात, आफ्रिकेत बहुभाषिकता आढळते. नायजेरिया, कॅनडा, आफ्रिकेतील काही देशांनी बहुभाषिक आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याचे काम केले आहे. आपल्याकडे बहुभाषिकतेचे सोडाच, पण  मातृभाषेतून शिक्षण देण्यात खूप कमी यश मिळाले आहे. यासंबंधीचे भाष्य भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या लेखात वाचायला मिळते. ‘या देशात भाषेबाबतचा कायदा किंवा नीती अस्तित्वात आहे, अशी आपली समजूत आहे. परिस्थिती वेगळी आहे. आपल्या राज्यघटनेतील आठव्या सूचीमध्ये भाषांची केवळ यादी दिलेली आहे, जिच्यामुळे केवळ उच्च शिक्षणासाठीचा निधी आकर्षित केला जाऊ शकतो. उदा. भोजपुरीसारखी समृद्ध भाषा ही आठव्या परिशिष्ठाचा भाग नाही म्हणून सरकार भोजपुरी भाषेशी संबंधित शिक्षणासाठी अनुदान देऊ शकत नाही. अथवा भोजपुरी विद्यापीठाची स्थापना करू शकत नाही.’ हे एक उदाहरण झाले. अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यातून भाषांची कशी गळचेपी होते, हे दिसून येईल.

स्थानिक भाषांमध्ये उच्च शिक्षणासाठी तरतूदच नसल्याने त्या भाषा शैक्षणिक पातळीवर लोप पावणार आहेत. ठराविक नि मोजक्या भाषांतूनच उच्च शिक्षण दिले जावे, असा अट्टाहास असेल तर मग हे धोरण मेकॉलेसारखेच आहे. आपण एकीकडे गव्हर्नन्सची भाषा करतो, पण दुसरीकडे सरकार दरबादी भाषांची दखल घेणाऱ्या विभागांत कमालीची उदासीनता आहे. भाषा हा विषय मानव संसाधन विभागाच्या अंतर्गत येत नसून तो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. हा तर विरोधाभासच!

डॉ. देवी ‘परिसर भाषेतून शिक्षण’ ही कल्पना मांडतात. त्यांच्या मते, आपण जर तसे करू शकलो, तर देशातील बहुभाषिकत्व टिकवून ठेवू आणि त्याचबरोबर मुलांचा विकास हा आधुनिकतेच्या अंगाने करू शकू. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षणाऐवजी बहुभाषिकतेतून शिक्षणाचा आग्रह धरावा. पण भारतीय संदर्भात बहुभाषिकतेचा अर्थ हा वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणे इतका मर्यादित नव्हे. कारण ती आपली स्वाभाविक परिस्थिती आहे. शाळेत प्रवेश घेताना आपल्याकडे माध्यम निवडले जाते. बहुभाषिकतेचे तत्त्व असे माध्यम निवडण्याहून भिन्न आहे. कारण ते शाळांच्या आणि मुलांच्याही दृष्टीने हानीकारक आहे. पण आपल्याकडचे धोरण हे माध्यमातच अडकले आहे. त्यामुळे भाषा वाचवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या शाळाच भाषांच्या मारेकरी कशा ठरताहेत, हे डॉ. देवी सोदाहरण दाखवून देतात. इंग्रजी वा ठराविक भाषेतूनच आधुनिक शिक्षण उपलब्ध आहे, हे सत्य आहे, पण आपण परिसर भाषांतून आधुनिक शिक्षण निर्माण करू शकलो नाही, हे विदारक सत्य आहे. 

बहुभाषिकतेचा संबंध हा विवेकपूर्ण आचरणाशी (संज्ञानात्मक (कॉग्निटीव) व्यवहार) आणि शाळा-कॉलेजात मिळणाऱ्या यशस्वितेशी कसा असू शकतो, अशी मांडणी डॉ. रमाकांत अग्निहोत्री यांनी केली आहे. ते म्हणतात, ‘भाषेची जागृती ही न्याय्य व समतेच्या सामाजिक संघर्षाचा भाग बनवणे हे आज गरजेचे आहे. जर अर्थपूर्ण आणि सृजनात्मक शिक्षण ही सामाजिक संघर्षाची गुरूकिल्ली आहे, तर सर्वप्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू हा भाषा आहे. आपले अधिकतर ज्ञान भाषेच्या माध्यमातून उर्जित केले जाते. भाषाच आपल्या विचारांची संरचना करते तथा अभिव्यक्तीची सीमादेखील ठरवत असते.’ या व्यापक दृष्टिकोनातून आपण धोरण आखून त्यात भाषांच्या वैविध्याचा विचार केला नाही. बहुभाषिक वर्गाकडे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास अधिक जबाबदारीची जाणीव होईल. मिश्र भाषेतून व्यवहार ही नित्याची बाब झाली आहे. बहुभाषिक वर्ग हे समाजाचेच एक जैव अंग आहे. ती एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. डॉ. अग्निहोत्री काही शैक्षणिक प्रयोग सुचवितात. तेही बहुभाषिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ते एक उदाहरण देतात, दिल्लीसारख्या बहुभाषिक ठिकाणी भाषा शिक्षणाच्या वर्गात मुले बंगाली कवितेपासून अभ्यासाला सुरूवात करू शकतील. तिचा इंग्रजीसह वेगवेगळ्या भाषांत अनुवाद करू शकतील. त्यातून त्यांना विविध भाषांतील विविधता, समानता उलगडत जाईल. दुसरे उदा. म्हणजे मुलांना इंग्रजी शब्दांची बहुवचने बनविण्याचे नियम शिकवण्याऐवजी शिक्षकाने एखाद्या अशी कृतीचे नियोजन करावे ज्यात विविध भाषांतर्गत शब्दांची बहुवचने बनवण्याची प्रक्रिया कशी चालते, याची पडताळणी मुलांना करता येईल.. अशा वेगवेगळ्या प्रयोगांतून मुलं बहुभाषिकतेच्या आधारे आपले अवकाश मोठे करू शकतील. ते शिक्षण आणि सामाजिक अशा दोन्ही बदलासाठी आवश्यक आहे. आपल्याकडे बरेच शिक्षक नावीन्यपूर्ण योजना राबवताना दिसतात. अशा नव्या कल्पना बहुभाषिकतेच्या आधारावर मागवून घेतल्या तर शिक्षणात सकारात्मक बदल होतील. 

डॉ. मॅक्सिन बर्नसन यांनी आपण बहुभाषिकतेचे स्वरूप समजून घेण्यात कसे कमी पडलो आहे, त्याची मांडणी केली आहे. त्यांच्या मते, ‘हे स्वरूप म्हणजे केवळ ‘एक’ सुटी भाषा तर नाहीच, पण ‘एक भाषा अधिक आणखी एक भाषा’ अशी भाषांची ती बेरीजही नाही. उलट ही बहुभाषिकता भारतीय व्यक्ती, विविध समुदाय आणि शाळा यांना घडवणारी अशी बहुभाषिकता आहे. आपली भाषिक संपदा ही मानक ठरवणारी एकजीनसी नसून ती प्रवाही आणि बहुजीनसी असते. भाषिक वर्तनामधील विविधता संदेशन सुलभ करण्याचे कार्य करत असते, संदेशनात अडथळा आणण्याचे नाही. भाषिक संपदेतल्या सीमारेषा धूसर असतात आणि त्यातूनच अनेक अस्मितांच्या शक्यता निर्माण होतात.’  एकुणच काय तर बहुभाषिकता संकल्पना बहुआयामी आहे नि भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात ती अधिक सकारात्मकतेने घ्यावी लागेल. बहुभाषिक वर्गासाठी आवश्यक असणारा शाळेतला अभ्यासक्रम, त्यासंबंधीची पाठ्यपुस्तके, वर्गातील देवाणघेवाण, यांच्या नियोजनाकडे एक नीती म्हणून पाहण्याचे आपल्यासमोर आव्हान आहे. इथे भाषांकडे स्वतंत्र, वेगवेगळ्या गोष्टी म्हणून न बघता, भाषाभाषांमधल्या सीमारेषा या सच्छिद्र असतात याचे भान ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यांची शिकण्याची, त्यांना शिकवण्याची पद्धत बदलून त्यातून मग मूल्यशिक्षण देता येईल. अशी पद्धतीच नवा समाज घडवायला आवश्यक आहे. यामध्ये दोन कळीचे मुद्दे आहेत. एक- मुलांचे भावविश्व आणि शाळा यांची सांगड घालावी लागेल, आणि दुसरे म्हणजे- एका भाषेतून दुसऱ्या भाषेत होणारे संक्रमण टिपावे लागेल. प्रा. मोहंती म्हणतात त्याप्रमाणे, ‘बहुभाषिक शिक्षणद्धती ठोस मांडणीच्या अभावी शैक्षणिक आराखडा म्हणजे निव्वळ आभासी ठरणार आहे.’ त्यामुळे नव्या रचनेच्या आधारावर ही मांडणी करावी लागेल. शिवाय ती वास्तविकही असायला हवी. 

बहुभाषिक होण्यासाठी विशेष काही करण्याची गरज नाही. आपल्या सभोवताली असणाऱ्या भाषांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. एकूणच काय, तर बहुभाषिकता ही आपल्या ठिकाणी असतेच, आपण तिचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. अलिकडच्या संशोधनानेही हे सिद्ध केले आहे की, बहुभाषिक क्षमता आणि शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करणे यांत सकारात्मक संबंध आहे. बहुभाषिकत्वातून आकलनाची लवचीकता वाढते आहे नि सामाजिक सहिष्णुतेकडे वाटचाल होते आहे. वंदना भागवत नमुद करतात, ‘भाषिक वैविध्य हे जैववैविध्याइतकेच आपल्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे आहे.’ ‘ताणरहीत परिस्थितीत समग्र आकलन होईल अशा शिक्षणाची खात्री देणे आणि जात, वंश व लिंगभाव यांचे पूर्वग्रह निपटून काढण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शैक्षणिक योजनाकार जोवर अभ्यासक्रमातील भाषेकडे आणि तिच्या सर्व आयामांकडे लक्ष पुरवत नाहीत तोवर समता, न्याय आणि लोकशाही ही ध्येये दुरवरची स्वप्नेच राहतील.' ही स्वप्ने वगैरे खूप मोठी गोष्ट आहे. कारण भाषेच्या शिक्षणाचा विचार प्राथमिक पातळीवर जरी विचार केला तर असे दिसून येईल की, आपल्याकडे कमालीच्या कंटाळवाण्या पद्धतीने एखादी भाषा शिकवली जाते. त्या शिकवण्याचा संबंध परीक्षेतल्या मार्कांशी सतत जोडला जातो. मार्कांपुरती भाषा शिकायची, त्या मार्कांचा उपयोग करून पुढच्या वर्गात प्रवेश घ्यायचा, यापलीकडे आपला फारसा विचार जात नाही. संस्कृत, हिंदी, पाली या भाषांचे आपल्याकडले वर्ग आणि शिकणे- शिकवणे असेच असते. पाचवीपासून इंग्रजी शिकतो. मात्र पदवी मिळवल्यावरही स्वत:चा परिचय उत्तम इंग्रजीतून करून देता येत नसेल तर त्या शिक्षणाचा अर्थ तरी काय? उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळवायचे हा दृष्टिकोन जो आपल्याकडे निर्माण झालाय तोच घातक आहे.

बहुभाषिक होताना किंवा त्रिभाषा सुत्राचा अंमल होताना भाषा शिकण्यातील, शिकवण्यातील सोपेपणा हरवता कामा नये. आपल्याकडे परकीय भाषा शिक्षणही उपलब्ध आहे, पण तिथेही आपला दृष्टिकोन कौशल्यापुरताच मर्यादित ठेवला आहे. तो जरूर असायला हवा, पण समग्रता आल्याविना आपल्याला नवभाषेचे आकलन कसे होणार? एखादी नवभाषा आत्मसात करणे म्हणजे त्या भाषेतून एखादी गोष्ट समजून घेता यायला हवी, सहज सुलभ व्यक्त होता यायला हवं, सुसंगत लेखन करता यायला हवं, त्यातल्या छटा रंग आत्मसात व्हायला हवेत, सर्जकता आणि संवेदना या दोन्ही बाबी याशी एकरूप व्हायला हव्यात. तरच त्या नवभाषा शिकण्याला अर्थ आहे. आपल्याकडे तीन भाषांचे सूत्र आहे. पण त्यातून फार काही हाती लागलं नाही. त्यामुळे चुका सुधारून आता बहुभाषिकतेचे सूत्र अमलात आणायला हवे. 

महाराष्ट्र सरकारने मराठीच्या विकासासाठीचे पुढील पंचवीस वर्षांसाठीचे धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले समिती गठीत केली. त्याचेही मूल्यमापन सदर पुस्तकात डॉ. अविनाश पांडे आणि रेणुका ओझरकर यांनी केले आहे. भाषेच्या शिक्षणासंबंधीची भूमिका, बहुभाषिकता, बहुभाषिकतेचा-शिक्षणाचा-भाषिक नियोजनाचा नि लोकशाहीचा संबंध आहे, हे या समितीच्या मसुद्यातून स्पष्ट होते. या समितीने बहुभाषिक समाज ही संकल्पना मांडली आहे. बहुभाषिक समाज म्हणजे एकाच समाजात स्वतंत्र, स्वयंपूर्ण अशा एकापेक्षा जास्त भाषिक व्यवस्था असणे होय. त्यातील प्रत्येक भाषा तिच्या भाषिक वातावरणापासून, संदर्भापासून स्वतंत्र पाहिली जाते. दुरदृष्टीच्या अभावापायी त्रिभाषासुत्राची आपल्याकडे मोडतोड झाली हे या समितीनेही मान्य केले आहे. बहुभाषिकतेच्या सामाजिक अवकाशात आपल्या भाषांचे सहअस्तित्व आहे, त्या अवकाशापासून भाषांना तोडून त्यांच्याकडे सुट्या पद्धतीने न पाहता त्याकडे त्या सामाजिक अवकाशातील भाषा-भाषांमधील परस्परसबंधांच्या संदर्भात पाहायला हवे, हे समितीच्या मसुद्यावरील मूल्यमापनातून जाणवते.

भटक्या विमुक्त समाजातील मुले, विशेष मुले यांना मुख्यप्रवाहात आणताना येणाऱ्या भाषिक अडचणी, त्यांचे प्रश्न याविषयी चंद्रकांत पुरी, पवन खेबूडकर, शिरीन इराणी यांनी सखोल मांडणी केली आहे. प्राथमिक शिक्षणात घरातल्या भाषेचे स्थान काय असावे, घरच्या भाषेपासून शाळेच्या भाषेपर्यंतचा मुलाचा प्रवास सुकर कसा होईल, या प्रश्नांचा उहापोह निलेश निमकर यांनी केला आहे. घरची भाषा ही काही अशुद्ध नव्हे, ती टाळून शाळेतल्या भाषेकडचा त्याचा प्रवास कसा काय आनंददायी होईल? हा प्रश्न विचारून त्यांनी शिक्षणप्रक्रिया, परिसर भाषा, तिचा आदर, तिचे स्थान यावर प्रकाश टाकला आहे.

हे पुस्तक बहुभाषिकतेच्या दुनियेत आपल्याला सफर घडवून आणतं. त्यातले एकेक पैलू सुटेसुटे करून मांडतं. मातृभाषा, सेकंड लँग्वेज, परिसर भाषा, नवभाषेचं शिक्षण, शिक्षणाची भाषा असे अनेक पैलू या पुस्तकातून आपल्याला समजतात. एकूणच काय, तर व्यक्ती आणि ज्ञान यांत बहुभाषिकता काय भूमिका बजावू शकते याचा वेध या लेखसंग्रहातून घेतलाय. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4440

.............................................................................................................................................

लेखक सतीश देशपांडे मुक्त पत्रकार आहेत.

sdeshpande02@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ramesh singh

Sat , 07 July 2018

सर, लेख चांगला आहे. उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.


Ashwini Funde

Fri , 06 July 2018

बहुभाषिकता याबद्दल सदर लेख वाचताना वरील आठवण झाली म्हणून उल्लेख केला.लेख उत्तम झाला आहे. सोप्या भाषेत भरपूर माहिती या लेखातून मिळते. विविध अभ्यासकांच्या निबंधांचा सारांश लेखात आला असून शिक्षण व्यवस्थेतील भाषा नि सर्वांगीण विकास यांच्यातील आंतरसंबंध उत्तमरीत्या मांडला आहे. संपूर्ण पुस्तकांची ओळख करून दिल्याने आनंद वाटतोय.


Ashwini Funde

Fri , 06 July 2018

कालच "खामखा" ही Short film पहिली.. त्यात मंजिरी फडणीसला दहा भाषा येत असतात नि इतर time pass म्हणून शिकलेल्या आणखी काही... असं ती सांगते...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......