टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • स्मृती इराणी, नरेंद्र मोदी, मनमोहनसिंग, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि तैमूर रझा
  • Tue , 13 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या स्मृती इराणी Smriti Irani नरेंद्र मोदी Narendra Modi मनमोहनसिंग Manmohan Singh देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उद्धव ठाकरे Uddhav Thackeray तैमूर रझा Taimoor Raza

१. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचा वणवा आता गुजरातमध्येही पसरल्याचं दिसतं. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी गुजरातच्या अमरेलीमधील एका कार्यक्रमात भाषण करत असताना केतन कासवाल या तरुणानं त्यांच्या दिशेनं बांगड्या फेकल्या. या घटनेनंतर पोलिसांनी केतनला लगेचच ताब्यात घेतलं. मात्र, या घटनेमुळे एकूणच देशभरात शेतकऱ्यांच्या मोदी सरकारविरोधातील रोष वाढत चालल्याचं चित्र आहे.

शेतकऱ्यांचा रोष आहे वगैरे ठीक आहे... पण, त्यांच्या घरात आईबहिणी नाहीत का? त्या बांगड्या घालतात म्हणजे आपल्यापेक्षा कमी कुवतीच्या, कमी बुद्धीच्या आहेत, अशी त्यांची समजूत आहे का? ज्यात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतरत नाहीत, असं एकतरी क्षेत्र आता उरलं आहे का? मग कर्तबगारीच्या बळावर मंत्रीपदावर पोहोचलेल्या महिलेवर कमकुवतपणाचं प्रतीक म्हणून बांगड्या फेकून आपण आपला मूर्खपणाच सिद्ध करत नाही का?

……………………………………………………………………………………………

२. राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सध्या श्रेयवादाचं राजकारण सुरू झालं आहे. कर्जमाफीनंतर शिवसेनेनं थेट देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधून फडणवीस यांना चिमटा काढला आहे. कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी कुणी देईल काय, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला नाही, याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीत आहोत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. सरकारनं ही कर्जमाफी मोकळ्या मनानं आणि दिलदारीनं दिलेली नाही. सरकारमध्ये राहून रोज या प्रश्नावर शिवसेनेनं लाथा घातल्याचा हा परिणाम आहे, असं ठाकरे म्हणाले.

शिवसेना इतक्या गोष्टी पटत  नसताना सरकारमध्ये राहून करते काय, या प्रश्नाचं उत्तर आता मिळून गेलं. लाथा घालणं हे कोणाशी जोडलं आहे, हे त्यांच्या लक्षात असेलच. खरं तर ही एक राजकीय हुशारीच सुरू आहे भाजप-सेनेची. सत्तेत राहून विरोधी पक्षाचीही स्पेस व्यापायची आणि दोघांनी मलिदा खायचा, अशी ही आयडिया आहे. त्यामुळेच यांना, तुम्ही सरकारमधून बाहेर का पडत नाही, असं विचारण्यात हशील नाही. नाट्यप्रयोगाचे उरलेले अंकही पाहात राहायचे आता.

……………………………………………………………………………………………

३. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाचशे रुपयांची नवी नोट बाजारात आणणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटांवर ए हे इनसेट अक्षर असणार आहे. पाचशे रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्यावरही पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.

अरे बापरे, पण, पाचशेची नवी नोट जुनी कधी झाली? ती येऊन काही महिने होण्याच्या आत दुसरी नोट. आता पुन्हा घबराट पसरणार. लोक जुनी झालेली पण खरं तर नवीच असलेली आताची पाचशेची नोट घेणार नाहीत, त्यावरून भांडणं होणार. नोटा बदलायला धावणार. नोटा बदलण्यासाठी रांगेत उभं राहण्याचा एक वेगळा भत्ता सुरू होणार बहुतेक आता देशात.

……………………………………………………………………………………………

४. पाकिस्तानातील अल्पसंख्याक शिया समाजाच्या एका व्यक्तीला फेसबुकवर इस्लामची निंदा केल्याने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशा प्रकारची ही पहिलीच शिक्षा आहे. सायबर गुन्ह्याचा विचार केला तरी त्याचं स्वरूप पाहिलं तर ही शिक्षा फारच कठोर मानली जात आहे. ईश्वरनिंदेच्या आरोपावरून अजून पाकिस्तानात कुणाला फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही. पंजाब प्रांतातील बहवालपूर जिल्ह्यातील दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश शाबीर अहमद यांनी तीस वर्षे वयाचा आरोपी तैमूर रझा याला शनिवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

हे तथाकथित धार्मिक लोक शुद्ध डोक्यावर पडलेले असतात काय? तुम्ही ईश्वराला मानता तर त्याच्या निंदेची शिक्षा द्यायला तो असमर्थ आहे का? नास्तिक आणि ईश्वर यांच्यातल्या भांडणात तुमची लुडबूड कशाला? आपल्या तथाकथित सर्वशक्तिमान परमेश्वराचं घर असलेल्या प्रार्थनागृहांवर सशस्त्र पहारे बसवणाऱ्या आणि भिंती उभारून कडेकोट बंदोबस्त करणाऱ्यांकडून विवेकबुद्धीची अपेक्षा व्यर्थच आहे म्हणा.

……………………………………………………………………………………………

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर एकही सुट्टी न घेतल्याचं तेही सांगतात आणि त्यांची भक्तमंडळीही याबद्दल कौतुकारती ओवाळत असतात. मग अशात हा प्रश्न पडतो की, त्यांच्याआधी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात किती दिवस सुट्टी घेतली? याआधी इतकं काम करणारे पंतप्रधान जणू देशाला लाभलेच नव्हते, असा त्यांचा आव असतो. मोदी यांच्याआधीचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एकही सुटी घेतलेली नाही. एका कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात पंतप्रधान कार्यालयाकडून, म्हणजे मोदी सरकारकडूनच ही माहिती मिळवली आहे.

असं होण्याचं एक साधं कारण आहे... भारतीय राज्यघटनेत पंतप्रधानांच्या सुट्टीबाबत कोणतीही तरतूदच नाही. पंतप्रधान हे संपूर्ण कार्यकाळात पदावरच असतात, हे गृहीत आहे. मनमोहन सिंगांना इतर अनेक गोष्टींप्रमाणे या गोष्टीचं भांडवल करता आलं नाही; मोदींनी मनमोहन यांच्या अनेक गोष्टींप्रमाणे याही गोष्टीचं भांडवल केलं आणि मोदीभक्तांच्या मते देशाला स्वातंत्र्यच २०१४ साली मिळालेलं असल्याने कसलीच शहानिशा न करता ढोल पिटण्याची त्यांना सवय आहेच.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......