पाकिस्तान ते इस्लाम व्हाया पुस्तकं
दिवाळी २०१७ - लेख
नीतीन वैद्य
  • लेखात उल्लेख असलेली पुस्तकं आणि लेखक
  • Sat , 29 October 2016
  • नीतीन वैद्य Neeteen Vaidya पाकिस्तान इस्लाम

माझं वाचन हौसेच्या पातळीवरचंच आहे. त्याला कसलंच नियोजन व शिस्त नाही. पैस बराचसा मराठी व हिंदीपुरता. अफाट इंग्रजी साहित्यविश्व कुठल्याच अर्थानं आवाक्यात नाहीत. थोडीफार धडपड करतो एवढंच. तरी एका विषयावर वेगवेगळ्या बाजूंनी प्रकाश टाकणारी पुस्तकं काही योगानं, काही प्रयत्नपूर्वक पण सलग वाचली. त्याच्या या जमेल तशा नोंदी. ही वाचन मुशाफिरी गेल्या दीड वर्षांतली आहे.

आतिश तसीर या पत्रकाराचं ‘इतिहासाचा अनभिज्ञ यात्री’ हे विलक्षण पुस्तक (‘स्ट्रेंजर टू हिस्ट्री’, अनु.- शारदा साठे, मौज प्रकाशन, नोव्हेंबर २०१४) दीड वर्षापूर्वी (एप्रिल २०१५) वाचनात आलं. विलक्षण आयुष्य लाभलेल्या तसीरचं हे तितकंच विलक्षण घटनाक्रम असलेलं, कमालीचं पारदर्शी आत्मकथन. भारतातल्या एकेकाळच्या स्टार पत्रकार तवलीन सिंग आणि पाकिस्तानचे हेवीवेट राजकारणी, उद्योगपती सलमान तसीर यांच्या वादळी सहवासातून आतिशचा जन्म झाला. सलमानला हा संबंध स्वीकारणं राजकीयदृष्ट्या परवडणारं नसल्याने तवलीन यांनी धाडसानं जाणीवपूर्वक मुस्लीम संस्कारांसह एकटीनं त्याला वाढवलं. घरच्या गोतावळ्यात ते शक्य होईना, तेव्हा केरळमध्ये आतमधल्या निवासी शाळेत ठेवलं. परिवारापासून कायम लांब राहणं, वडिलांनी नाकारणं यामुळे आतून आलेल्या एकटेपणावर मात करत आतिशने पत्रकारितेचं उच्च शिक्षण घेतलं. वयाच्या पंचविशीत त्याची पहिलीच नेमणूक ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये झाली. २००५मध्ये लंडनमध्ये ट्यूब रेल्वेत बॉम्बस्फोट झाले. इंग्लंडला आलेला दहशतवादाचा हा पहिला थेट अनुभव. यामागच्या स्थानिक कारणांचा शोध घेणं ही आतिशची पहिली असाइनमेंट होती. प्रत्यक्षातलं आयुष्य कथा-कादंबरीपेक्षा जास्त नाट्यमय असतं, आतिशची ही स्टोरी ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध होते. सलमान ती वाचतात आणि मुलाला खडसावणारं पत्र लिहितात. लंडनमधल्या मुस्लिमांच्या दोन पिढ्यांमधल्या संघर्षाबाबतचं त्याचं विश्लेषण (ते खरं आहे, प्रत्ययालाही येतं आहे) ते खोडून काढतातच, पण त्याच्या मुस्लीम असण्यावरच (आणि त्यामुळे मुस्लीम मानसिकता समजून घेण्याच्या त्याच्या क्षमेतवरही) प्रश्नचिन्ह लावतात. ‘केवळ मुस्लीम बापाच्या पोटी जन्मलो, ठरावीक वेळी नमाज पढतो म्हणून आपण खरे मुस्लीम आहोत, असं तुला वाटतं काय?’, असा बोचरा प्रश्न करतात. ‘मी रोज उंची स्कॉच पितो, रोजे ठेवतोच असं नाही. डुकराचं मांसही वर्ज्य नाही तरी मी सच्चा मुस्लीम आहे’ असं बजावतात. मुस्लीम असणं म्हणजे नक्की काय याच्या शोधासाठी त्याला प्रवृत्त करतात. मग नोकरीमधून दीर्घ रजा घेत सिरियामधल्या दमास्कसपासून आतिशची शोधयात्रा सुरू होते. जगभर हुकूमशाही राजवटीविरोधात असंतोष सुरू झालेला हा काळ (त्यावेळी विशेष कुणाचं लक्ष नसलेल्या सिरियामधूनच खऱ्या बंडाळीला सुरुवात होईल असं त्यानं लिहिलं आहे. ते आज प्रत्यक्षात उतरलंय.) पूर्ण आठ महिने सिरिया, तुर्कस्तान, इराण, इराक, जॉर्डन, सौदी अरेबिया असा तो फिरतो. सर्वांशी सतत संवाद करत, पाहत स्वत:च्या मुस्लीम असण्याचा अर्थ शोधत राहतो. नंतर दोन वेळा पाकिस्तानमध्येही दीर्घ वास्तव्यासाठी जाऊन तो देश उभा-आडवा पिंजून काढतो. पण वडिलांची भेट होते ती विचित्र परिस्थितीत. ज्या वेळी भेट ठरते, त्याच दिवशी बॉम्बस्फोटात बेनझीर भुत्तो यांची हत्त्या होते. त्यावेळी सलमान पंजाबचे गव्हर्नर असतात. धक्का बसलेले, एकाकी असतात, भेट होते, पण संवाद होत नाही. यथावकाश आतिशच्या शोधयात्रेचं पुस्तकं प्रकाशित होतं. ते देण्याच्या निमित्तानं तो संवाद साधण्याचं ठरवतो, पण त्याआधीचं सलमान यांची त्यांच्या सुरक्षारक्षकाकडून हत्या होते. संवाद आणि आतीशने राखून ठेवलेले प्रश्न कायमसाठी मौनात गडप होतात. पुस्तकं संपतं, आयुष्य सुरूच राहतं. पुढची आतीशने त्याच्या ब्लॉगवर नोंदवलेली कथाही कल्पनेत शोभावी इतकी विलक्षण आहे. पंजाब प्रांताचे गव्हर्नर असताना सलमान नळावरच्या किरकोळ भांडणावरून धर्मनिंदेच्या आरोप ओढवलेल्या आणि त्यापोटी फाशीची शिक्षा झालेल्या एका ख्रिस्ती महिलेची बाजू घेतात. तिची फाशी रद्द व्हावी यासाठी प्रयत्न करतात, याचा राग अनावर होऊन त्यांचा सुरक्षारक्षक कमांडर मुमताज कादरी सलमान यांच्यावर सलग २७ गोळ्या झाडतो. खटला उभा राहतो, तो सलमान यांनी धर्मद्रोही कृत्य केलं वा नाही यावर. शोकांतिका म्हणजे आरोपीचे वकील त्याचा पुरावा म्हणून आतीशचंच पुस्तक सादर करतात. सलमान यांचं त्यातलं पत्र न्यायालयात वाचून दाखवलं जातं. वेगळ्या खटल्याची गरज उरत नाही. सलमान यांच्यावरचा आरोप सिद्ध होऊन मुमताज कादरीची सुटका होते.

मला यानंतरच्या घटनाक्रमाचं, त्यातल्या विलक्षणं नाट्याचं कुतूहल वाटत राहिलं. त्यामुळे यासंबंधांतल्या बातम्यांवर लक्ष ठेवलं होतं. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या दबावामुळे हत्येचा खटला पुन्हा उभा राहिला. त्यावेळी म्हणजे ऑगस्ट २०११मध्ये सलमान यांचा मोठा मुलगा शाहबाज याचं धर्मांध मुस्लीम अपहरण करतात. पण पहिल्या निकालानं आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाल्याने खटला संथगतीने का होईना चालू राहिला…तब्बल पाच वर्षांनी त्याचा निकाल लागून १ मार्च २०१६ रोजी आरोपी मुमताज कादरीला फाशीची शिक्षा झाली. शाहबाज तासीरचीही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पाच वर्षांनी सुटका करण्यात यश आलं. आंतरराष्ट्रीय दबावाखातर का होईना या उद्वेगजनक घटनाक्रमाची काहीशी दिलासादायक सांगता झाली असं वाटत असतानाच या फाशीच्या विरोधात देशभर विविध शहरांतून हजारो धर्मांधाचे मोर्चे निघताहेत अशी बातमी आली आहे.

या दरम्यान मला या सगळ्यामागची मानसिकता, त्यामागची वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून मांडलेली ऐतिहासिक-सामाजिक कारणं जाणून घ्यावीत, समजून घ्यावीत असं वाटायला लागल्यानं माझ्या मर्यादेत शोध घ्यायला लागलो. ‘टाइम’चे काही अंक नंतर निवांत कधी वाचावेत म्हणून काढून ठेवले होते. (असं निवांतपण कधीही येत नाही हा भाग अलाहिदा) त्यात ‘समर जर्नी इश्यू’ या अंतर्गत एक अंक होता- ‘ट्रॅव्हल्स थ्रू इस्लाम’ (१ ते ८ ऑगस्ट २०११). इस्लामी जगातल्या बदलांचा वेध घेणाऱ्या या अंकात मुख्य स्टोरी आहे. महंमद इब्न बतुता या मोरोक्कन युवकाचा ७०० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक प्रवास. इ.स.१३२५मध्ये वयाच्या २१व्या वर्षी बतुताने मोरोक्कोपासून सुरू केलेला प्रवास तत्कालीन जगातल्या ‘दार-उल-इस्लाम’ म्हणवल्या जाणाऱ्या सर्व भागांतून मोरोक्कोपर्यंत येतो. तब्बल एक लाख वीस हजार किलोमीटरचा हा प्रवास त्याने पायी, गाढव, उंट, बोट अशा शक्य त्या सर्व साधनांनी केला. त्याला तीस वर्षं लागली. २००८नंतर मुस्लीम जगात असंतोषताचं वारे वाहायला लागलं होतं. बतुताच्या मार्गावरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ‘टाइम’च्या वार्ताहरांनी पुनश्च केलेल्या प्रवासाचे अनुभव या अंकात आहेत. सौदी अरब, तुर्कस्तान, मोरोक्को, सोमालिया, सहारा, तजाकिस्तान, कझाकिस्तान असा हा प्रवास, गेल्या ७०० वर्षांमध्ये इस्लामी जगात झालेले बदल नोंदवावेत या हेतूने झाला. पण बऱ्याच ठिकाणी बतुताला दिसलं त्याच अवस्थेत इस्लामी जग जणू फ्रीज झालं असं दिसतं. जीवनशैलीत बदल झाले तरी मानसिकता अजून ‘दार-उल-इस्लाम’ अशी उर्वरित जगापासून स्वत:ला वेगळं काढणारीच आहे.

२००५साली लंडनमधील ट्युब रेल्वेत झालेले बॉम्बस्फोट ही आतिशच्या पुस्तकाचं निमित्त होतं. याच घटनेवर लंडनला जाऊन लिहिलेलं निळू दामलेंचं ‘लंडन बॉम्बिंग’ (मौज प्रकाशन २००८) हे पुस्तक वाचलं. हेही संवादातून काही शोधू पाहणारं पुस्तकं आहे. स्थलांतरं जगाच्या इतिहासाइतकीच जुनी. पण अलीकडे स्थलांतरितांचं स्थानिक समाजात मिसळून, विरघळून जाणं इतिहासजमा झालंय. असुरक्षिततेच्या भावनेतून सर्वत्र ‘घेट्टो’ तयार होतोहत असं दामले म्हणतात. दामलेंचीच इस्लामिक जगातील बदलांचा वेध घेणारी ‘अवघड अफगाणिस्तान’, ‘पुन्हा अवघड अफगाणिस्तान’, ‘जेरुसलेम’, ‘इस्तंबूल ते कैरो’ ही पुस्तकंही यावेळी सलग वाचली. माणसं बदलायला तयार नाहीत, उलट उर्वरित जग वेगाने बदलतंय, त्या प्रमाणात ही मुळांकडे खेचली जाताहेत हाच अनुभव.

भारताची दीर्घकाळ ठसठसणारी दुखरी नस म्हणून इस्लाम म्हटलं की, आपल्याला पाकिस्तान आठवतो. (खरं तर त्यापेक्षा अधिक मुस्लीम भारतात राहतात.) त्याचा संघर्षाचा, नवं स्वतंत्र जग उभं करण्याच्या उर्मीतून आजच्या खेळखंडोबापर्यंतचा प्रवास प्रतिभा रानडेंनी बराचसा सलग घटनांच्या जंत्रीतून नोंदवला (‘अस्मितेच्या शोधात पाकिस्तान’, राजहंस प्रकाशन, डिसेंबर २००९) तर बियाथ्थिल मोईद्दीन उर्फ बी.एम. कुट्टींनी प्रत्यक्ष अनुभवातून मांडला (‘पाकिस्तानात साठ वर्षं’, अनु.- अरविंद गोखले, चिनार पब्लिशर्स, नोव्हेंबर २०११) आहे. कुट्टींचं हे पुस्तकही त्यामुळे महत्त्वाचं. कुट्टी मूळचे केरळचे मलबारी मुस्लीम. (‘मोपल्यांचं बंड’वाले). रानडेबाई ज्या घटनाक्रमाकडे ताटस्थ्यानं पाहत तो संदर्भातून शोधतात, त्यातल्या बऱ्याच घटनांना कुट्टी साक्षी आहेत. फाळणीच्या वेळी ते जेमतेम विशीत, शिक्षण नुकतंच संपलेलं. सुट्टीत मित्राकडे सहज म्हणून मुंबईला येतात, तिथून तितक्याच सहज म्हणून कराचीला जातात आणि पुढे तिथलेच होतात. तदनतंर गेली साठ वर्षं पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्षांशी त्यांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध राहिला. राजकीय पक्षांचे जाहीरनामे, घटना, दस्तऐवज अचूक लिहिणारे असा त्यांचा लौकिक झाला. आणि पाकिस्तानात लोकशाही मूल्यं रुजावीत म्हणून प्रयत्न करणारे असाही.

भारताचा सतत त्रास देणारा नाठाळ शेजारी म्हणून पाकिस्तान आणि तिथल्या दिवसेंदिवस अधिकाधिक कट्टर बनत जाणाऱ्या मुस्लीम संस्कृतीबद्दल आपलं काहीसं कडवट मत बनलं तरी दोन्ही देशांचा डीएनए, सामाजिक-सांस्कृतिक लसावि-मसावि एकच आहे, असं (आणि सतत ते सांगितलं पाहिजे असंही) वाटणाऱ्यांचीही मोठी संख्या आपल्याकडे आहे.

दोन्ही देशातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील समांतर प्रवाहांची नोंद सातत्याने, काहीशा कर्तव्यबुद्धीने अशी मंडळी करत असतात. पत्रकार फिरोज अशरफ १९७८पासून पाकिस्तानमधील घडामोडींबद्दल ‘नवभारत टाईम्स’मध्ये ‘पाकिस्ताननामा’ हे हिंदी सदर लिहीत आहेत. १९७८ ते १९८५ या काळात ‘धर्मयुग’मध्ये ‘पाकनामा’ या नावानं, तर १९८५पासून पुढे २५ वर्षं (हे पुस्तक निघेतो) ‘नवभारत टाईम्स’मध्ये ‘पाकिस्ताननामा’ या नावानं खंड न पडता त्यांनी बाराशे लेख लिहिले. त्यातल्या निवडक ८८ लेखांचा ‘पाकिस्तान - समाज आणि संस्कृती’ (लोकवाङ्मय गृह, ऑगस्ट २०१३) हा संग्रह. पाकिस्तानातील अंतर्गत घडामोडी, त्याचे तिथली वर्तमानपत्रं, साप्ताहिकं यात उमटणारे पडसाद यांच्या नोंदी करणारं हे सदर दस्तावेज ठरावं. ‘१६ डिसेंबर - शोकदिन’ या लेखात अशरफ यांनी बांगलादेशच्या निर्मितीदिनाचे पाकिस्तानात दरवर्षी उमटणारे पडसाद नोंदवलेत. ही शरणागती पाक लष्कराला एवढी झोंबलेली आहे की, तो दिवस शोकदिन म्हणून पाळला गेला तरी या घटनाक्रमाची कुठेही वाच्यता होत नाही, वस्तुस्थिती जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. हे वाचताना मला कुट्टींच्या पुस्तकाबद्दल मी केलेली नोंद आठवली. ती अशी – “हे पुस्तक पाकिस्तानमधील स्वातंत्र्यलढ्यापासूनचे सर्व पेच तपशीलानं माडतं, तरी काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीत राहतात. बांगलादेशची निर्मिती ही पाक इतिहासातली त्यांच्या दृष्टीने कटु तरी सर्वांत महत्त्वाची घटना. कुट्टी कथनाच्या ओघात तथ्याच्या पार्श्वभूमीपर्यंत येतात, अन तिथेच थांबतात. पुढचं प्रकरण १९७२मध्ये सुरू होतं. नंतरही पुस्तकभर बांगलादेशचा कुठेही उल्लेख येत नाही…” असो.

अरविंद गोखलेंचं पुस्तकही असंच पाकिस्तानमधील सांस्कृतिक विश्वातील घडामोडींची नोंद करणारं आहे (‘असाही पाकिस्तान’, रोहन प्रकाशन). दोन्ही देशांच्या संस्कृतीची पाळंमुळं एकच आहेत, तिथल्या सामान्य जनतेत भारताबद्दल असलेला (तथाकथित) कौतुकमिश्रित हेवा असं बरंच काही मांडणारे हे लेख. काही मत बनवण्याआधी जाणून घेण्याच्या दृष्टीनं हे लेख महत्त्वाचे आहेत. गंगादास हॉस्पीटलसारखे काही भारतीय तपशीलही महत्त्वाचे. शिवाय गोखले पत्रकार या नात्यानं सहा वेळा पाकिस्तानात जाऊन पायी बरीच भटकंती करून आले आहेत. त्यामुळे तपशीलांना विश्वासार्हताही आहे.

जगभर सर्वत्रच इस्लाम आणि मुस्लीम समाज याबद्दल समज-गैरसमजांचं वादळ घोंगावत असताना विद्यापीठीय विद्वान मेहमूद ममदानी मैदानात उतरतात. हॉवर्ड विद्यापीठातून पीएच.डी. झालेले ममदानी राजकीय संस्कृतीचे भाष्यकार, मानववंशशास्त्रज्ञ म्हणून जगभर नाव मिळवून आहेत. ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम’ हे त्यांचं पुस्तक (अनु. पुष्पा भावे, मिलिंद चंपानेरकर, रोहन प्रकाशन, फेब्रुवारी २०१४) जगभरच्या अतिरेकी थैमानाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांमधील असुरक्षिततेची, असंतोषाची कारणमीमांसा करू पाहतं. दुसऱ्या महायुद्धानंतर दोन्ही महासत्तांनी (खरं तर अमेरिका या एकमेव महासत्तेनं) जगभरच्या छोट्या राष्ट्रांमध्ये आपले हितसंबंध जपण्यासाठी केलेले गैरवाजवी हस्तक्षेप, घडवून आणलेली हत्याकांडं, सत्तांतरं याची तपशीलानं मांडणी करतात. जगभरच्या दहशतावादामागे अमेरिकेचं दुटप्पी राजकारणच आहे असा निष्कर्ष काढतात! काहीसं एकांगी तरी ‘मस्ट रीड’ कॅटेगरीतले हे पुस्तक समजून घेत, रवंथ करत (एवढी तपशीलांची विपुलता आहे) वाचावं असं आहे. यात शेवटी दिलेली संदर्भांची यादी दडपण येण्यासाठी पुरेशी ठरावी. ‘९\११नंतर अमेरिकेत ज्या जाहीर चर्चा झाल्या, त्या ऐकताना महाशक्तीला स्मृतीभ्रंशाचा जबरदस्त फटका बसला आहे की काय असं मला वाटू लागलं,’ असं ममदानी पुस्तकाच्या सुरुवातीलाच म्हणतात. यावरून पुढील दिशा लक्षात यायला हरकत नाही.

निळू दामलेंनी गेल्यावर्षी (जुलै-ऑक्टोबर २०१५) पाकिस्तानच्या अंतरंगावर प्रकाश टाकणारे चार लेख ‘अनुभ‌व’ मासिकासाठी ‘पाकिस्तान नावाचं कोडं’ या सदरांतर्गत लिहिले होते. अलीकडे प्रकाशित झालेली अधिकारी व्यक्तींची नऊ पुस्तकं आधाराला घेत दामलेंनी आजच्या पाकिस्तानचा गुंता समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. असं बरंच लेखन त्यांच्या ब्लॉगवरही आहे. ‘The unraveling Pakistan in the age of Jihad’, ‘Pakistan - a hard Country’, ‘Understanding Islamic Parties, political-Violance and Extremism in Pakistan’ ही त्यातल्या काही पुस्तकांची नावंच पुरेशी स्पष्ट आहेत.

ही सगळी वृत्तचित्रं म्हणजे जणू इस्लामी जगताची वेगवेगळ्या ठिकाणांवरून केलेली लँडस्केप्स आहेत. सर्वसमावेशक चित्र व्हावं म्हणून लांबून काढलेली, आकारामुळे व्यक्तिगत तपशील देता न आलेली. प्रत्येकानं हव्या त्याच रंगात रंगवलेली.

मग कादंबरीकडे वळलो. कादंबरी काल्पनिक तरी तथ्यांच्या तपशीलानं रंगवलेलं मिनिएचर. संस्कृती वेगळी, अगदी टोकाची वेगळी, तरी नातेसंबंधाचा गुंता सगळीकडे सारखाच. त्यामुळे या विश्वात रमायला झालं. ‘थाउजंड स्प्लेंडीड सन्स’ (अनु. मधुकर प्रधान, मेहता, नोव्हेंबर २०१०), ‘काईट रनर’ (अनु. वैजयंती पेंडसे, मेहता, सप्टेंबर २००७) या खालिद हुसैनीच्या लोकप्रिय कादंबऱ्या, नोबेलविजेता ओरहान पामुकचं ‘माय नेम इज रेड’ (अनु.गणेश विसपुते, साकेत, २०१४), पॉप्युलरच्या तुर्की कादंबऱ्यांच्या मालिकेमधल्या ‘ट्युलिपच्या बागा’ (गुल इरेपोलु, अनु. ललिता कोल्हटकर, २०१५), ‘अझिझ बे ची शोकांतिका’ (आयफर टंक, अनु. अरुणा दुभाषी, २०१५), ‘तास वाजे झणाणा’ (अहमत हमदी तानपिनार, अनु. सविता दामले, २०१५) या चारही कादंबऱ्यांतून तुर्की संस्कृतीचा ऑटोम साम्राज्यापासून विसाव्या शतकापर्यंतचा छेद तपशीलानं होतो. तरी विशेषत अहमत हमदी तानपिनार यांच्या दोन्ही कादंबऱ्यांचा (मूळ ‘सतलेरी आर्यलामा इन्स्टिट्यूट’ आणि ‘हुजूर’) कालखंड विसाव्या शतकाचा पूर्वार्ध आहे. त्यामुळे तुर्की समाजाचं सांस्कृतिक-सामाजिक चित्रण तपशीलानं येतं. हा कालखंड तुर्की इतिहासातला सगळ्यात घुसळणीचा कालखंड. नव्या विचाराच्या केमाल अतातुर्कने लष्करी क्रांती करून ऑटोमन साम्राज्याचा अंत घडवला. तेव्हापासून (१९२६) तुर्कस्तानचा आधुनिकतेकडे प्रवास सुरू झाला असं मानलं जातं. तुर्कस्तान सगळ्या इस्लामी जगातही आधुनिक झालेलं, पाश्चात्य राष्ट्रांत सामील होण्याची आस लागलेलं राष्ट्र झालं ते याच कालखंडात. तुर्कस्तानात अतातुर्कला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे, पण साधारण याच कालखंडात (१८१०-१९४०) घडणाऱ्या तानपिनार यांच्या दोन्ही कादंबऱ्यात अतातुर्कचा वा सांस्कृतिक, लष्करी क्रांतीचा दुरानव्येही उल्लेख होत नाही याचं आश्चर्य वाटलं.

भारतीय लेखिकांच्या मालिकेतली सलमा यांची मूळ तमिळ कादंबरी ‘इरंधम नामशिन कथाई’ (‘The hour past midnight’, ‘मध्यरात्रीनंतरचे तास’, अनु. सोनाली नवांगुळ, संपा. कविता महाजन, मनोविकास प्रकाशन, एप्रिल २०१५) तामिळनाडूमधल्या निमशहरी गावातल्या मुस्लीम वस्तीचं चित्र तपशीलानं रेखाटते. महावस्त्रातल्या रेशमी कलाकुसरीची आठवण व्हावी इतक्या नजाकतीनं. स्त्रीची पुरुषप्रधान समाजात होणारी घुसमट, धार्मिक रूढींच्या बंधनानं जखडून ठेवलेलं मानस, त्यातूनही वाट काढण्याची धडपड या सगळ्यातून येत जाणारी शहाणीव...गुंतून जायला होतं.

‘बाक़र गंज के सैयद’ (राजपाल अँड सन्स, २०१५) ही अजगर वसाहत यांची ऐतिहासिक तथ्यांचे तुकडे जोडत निर्मिलेली विलक्षण हिंदी काल्पनिका. एकंदर भारतीय संस्कृतीतलं मुस्लीम संस्कृतीचं अस्तित्व ठळकपणे नोंदवणारी…वाचावीच अशी. अवध-लखनौपासून कोलकात्यापर्यंतच्या पट्ट्यातील उतरत्या मुघल काळातील मुस्लीम राजकीय संस्कृतीचं तपशीलानं केलेलं हे जरतारी विणकाम. आजच्या बाकरगंजमधल्या सय्यदांचे पूर्वज कधी काळी इराणमधून बाबर, हुमायून बरोबर दिल्लीत आले, त्यांना आजच्या सय्यदांपर्यंत आणून जोडणाऱ्या धाग्यांचा शोध, ही या काल्पनिक शोधयात्रेची थीम. मोगलाई आणि नंतर इंग्रजी अमलाखालची अनेक छोटी संस्थानं, त्यातले अंतर्गत सत्तेसाठीचे हेवेदावे, कटकारस्थानं, सांस्कृतिक तपशीलांनी समृद्ध असं हे सय्यदाख्यान. अब्दुल बिस्मिल्लाहंची (‘झीनी झीनी बीनी चदरिया’ नंतरचं हे पुढचं पाऊल) ‘अपवित्र आख्यान’ (राजकमल प्रकाशन, २०१२) ही आजच्या शहरी हिंदू मुस्लीम प्रश्नाकडे वेगळ्या समजेनं, शहाणीवेनं पाहणारी कादंबरी.

दुनिया ने तजुर्बातो-हवादिस की शक्ल में

जो कुछ मुझे दिया है, लौटा रहा हूँ में

हा साहिर लुधियानवीचा शेर सुरुवातीला येतो, ते अन्वयर्थक आहे. हिंदी वा संस्कृतमधून उच्चशिक्षण घ्यावं अशी आस असणाऱ्या जमीलला मुसलमान असल्यानं ऊर्दू वा फारसी शिकायला हवं होतंस असं प्रत्येक मुलाखतीच्या वेळी सुनावलं जातं, तर यास्मिन शिकलेली, नोकरीसाठी मुस्लीम नेतेच तिच्या तारुण्याची मागणी करतात, बुरखा पांघरूनही यात फारसं वावगं न मानमारी. जमीलचचं तुटत, अस्थिर होत एकटं होत जाणं, तर यास्मिनचं निर्ढावणं, स्थिरावणं यातला अंतविर्रोध अस्वस्थ करतो. म्हटलं तर ही गोष्ट आजच्या तुमची-आमचीही.

….पुस्तकं संपलेली नाहीत, तसंच शोधणंही. यातली ममदानींच्या पुस्तकाचा अपवाद करता बहुतेक सामान्य वाचकांसाठी लिहिलेली आहेत, पण मला कुठेही प्रबंध लिहायचा नव्हता, नाही. कुठलेही निष्कर्ष काढायची घाई नव्हती, नाही. फक्त गोष्ट तिच्या पार्श्वभूमीसह सर्व बाजूंनी पाहायची, समजून घ्यायची होती, आहे. सत्याला एक-दोन नव्हे तर अनेक बाजू असतात. कुठलीच एक पूर्ण सत्य असत नाही याची जाणीव हा यातला (वा अशा अन्यही शोधातला. तसं याच काळात समकालीन नाटक समजून घेण्यात अशीच ३०-४० पुस्तकं वाचत होतो) महत्त्वाचा भाग. प्रत्येक वेळी नव्यानं जाणवणारा, एकारलं होण्यापासून रोखणारा.

वाचणं आणि समजून घेणं याचा अर्थ दरवेळी सत्याकडं रेसभर का होईना सरकणंच की! (विद्वान याला कदाचित भाबडेपण म्हणतीलही) पुस्तकंही दरवेळी खरंच बोलतात असं नाही. तरी कसलाच पूर्वग्रह बाळगायचा नाही, सर्व बाजूंनी भिडायचं असं केल्यानं भरकटणं, वाहवत जाणं होत नाही हा माझा अनुभव आहे. सत्य शेवटी जिगसॉ पझलसारखं असतं. सगळे तुकडे जुळलेच तर होणारा आनंद साक्षात्कारीच असावा. माझं या वाटेवरचं चालणं हौशी, पोहोच-आकलन मर्यादित, त्यामुळे असं कुठलंच गंतव्य नसलेला हा वाचन-प्रवास. कुठंच पोहचायचं नसलं की, प्रवास ही आनंदाचा होतो. नाहीतरी सामान्य आयुष्याकडून आणखी जास्त काय अपेक्षावं!

 

लेखक पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख