टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • बाचू चामबुगॉन्ग माराक, न्या. महेशचंद्र शर्मा आणि विजय जॉली
  • Fri , 02 June 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya बाचू चामबुगॉन्ग माराक Bachu Chambugong Marak न्या. महेशचंद्र शर्मा Mahesh Chandra Sharma विजय जॉली Vijay Jolly थेरेसा मे Theresa May

१. संपूर्ण देशभरात भाजप गोमांस विक्री, कत्तलखान्यांविरोधात भूमिका घेत असताना मेघालयात मात्र केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका भाजप नेत्याने बीफ पार्टीची घोषणा केली आहे. बीफ पार्टीचे आयोजन करणारे नेते बाचू चामबुगॉन्ग माराक यांना पक्षातून निलंबित केले जाण्याची शक्यता आहे. उत्तर गारो हिल्सचे अध्यक्ष असलेल्या बाचू यांनी बुधवारी फेसबुकवर एक बॅनर पोस्ट केला होता. ‘गारो हिल्स भाजप नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी बिची-बीफ पार्टीचे आयोजन करेल,’ असा मजकूर पोस्टवर लिहिण्यात आला होता. ईशान्य भारतातील भाजपच्या नेत्यांनी याआधीदेखील गोमांसाबद्दल पक्षाच्या अगदी उलट भूमिका घेतली आहे.

आयआयटी मद्रासमध्ये बीफ पार्टीवरून दंगा करणारे गोगुंड आता मेघालयात स्वपक्षीय नेत्याच्या समाचाराला जातील काय? तिथे सगळेच गोभक्षक आहेत, हे लक्षात घेऊन प्रयाण केलं तर बरं होईल. सगळ्या भारताला आणि हिंदू जीवनपद्धतीला एकाच साच्यात कोंबण्याच्या हट्टाग्रहाला असेच तडाखे दिले नाहीत, तर या एका अविवेकी पक्षाच्या कारकीर्दीत देशाचं संघराज्यात्मक स्वरूप कोलमडून पडायला वेळ लागणार नाही.

……………………………………………………………………………………………

२. गोपाष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गाईला पृथ्वीवर आणले... गाय म्हणजे साक्षात औषधालयच. तिचे दूध आणि त्याचे तूप म्हणजे अमृतच... अशा गाईची हत्या करणाऱ्याचा वध करावा, असे वेदांमध्ये म्हटले आहे... तेव्हा भारत सरकारने गाईला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्यावा... ही वक्तव्ये आहेत राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र शर्मा यांची. बुधवारी निवृत्तीच्या दिवशीच दिलेल्या निकालात त्यांनी ही शिफारस केली. एवढेच नव्हे, तर गायीची हत्या करणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या शिक्षेत वाढ करून, ती जन्मठेपेवर न्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

गायीचे भक्त स्वत:ला निव्वळ प्रेमापोटी गोपुत्र म्हणवून घेतात, अशी आजवरची समजूत होती. काही खरोखरचे ‘गोपुत्र’ही आहेत, याची शर्मा यांनी खात्री पटवून दिली. शर्मा यांना वेदकाळाची फार आवड आहे. आता निवृत्तीनंतर त्यांना एक गाय आणि एक बैल आणि दोन-तीन मोर देऊन काही वल्कलांसह एखाद्या निबीड अरण्यातल्या गुंफेत पाठवलं, तर उर्वरित भारत वर्तमानकाळात जगायला मोकळा होईल.

……………………………………………………………………………………………

3. भाजप नेते आणि माजी आमदार विजय जॉली यांना रस्त्याकडेला गाडी उभी करून पाणीपुरी खाणे महागात पडले. जॉली यांनी दिल्लीतल्या प्रसिद्ध गोलगप्प्यांवर ताव मारला खरा. पण, आठ पाणीपुरी रिचवल्यानंतर मागे वळून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, चोरट्यांनी त्यांची गाडी फोडून आठ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता.

कोणताही अस्सल खवय्या ही बातमी वाचून काय विचारेल? तो विचारेल, पाणीपुरीची प्लेट किती पुऱ्यांची होती. उरलेले गोलगप्पे जॉली यांनी खाल्ले की नाही? आयुष्यात असे प्रसंग येतच असतात. पण, पाणीपुरीचा खरा चाहता हातातली पाणीपुरी प्लेट संपवल्यानंतरच आव्हानांचा सामना करायला सिद्ध होतो.

……………………………………………………………………………………………

४. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी म्युझिक व्हिडिओ बनवला आहे. या दोन मिनिटांच्या व्हिडिओत त्यांनी चक्क साडी नेसली आहे. तसंच हिंदी गाणं वापरून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 'दोस्तो, धन्यवाद शुक्रिया मेहरबानी. अब फिर समय आया है साथ निभाने का, पिछले समय जो साथ निभाया उसका भी सलाम।', असे या गाण्याचे बोल आहेत. व्हिडिओत थेरेसा मे अनवाणी चालताना आणि साडी नेसून मंदिरात पूजा करताना दिसून येत आहेत. 'थेरेसा के साथ' असं या व्हिडिओचं नाव आहे.

एकेकाळी भारत हा ब्रिटिश साम्राज्यातला एक देश होता... आता ब्रिटन हे भारताचं एक सुदूर भूमीवरील राज्य बनण्याइतके भारतीय तिथे स्थायिक झालेले आहेत. मे-काकूंच्या भक्तिपरायण अवताराचं आणि त्यांच्या व्हिडिओतल्या मोदीभेटीच्या फोटोंचं कौतुक संपल्यानंतर कोणीतरी त्यांच्याकडून ‘गायीला माता मानण्याची आणि यापुढे गोमांसभक्षण न करण्याची’ प्रतिज्ञा वदवून घ्या... त्यांचं पंतप्रधानपद फिक्स!

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.