टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अर्णब गोस्वामी, स्वाती सिंह, योगी आदित्यनाथ, अरुण शौरी आणि नितीन गडकरी
  • Tue , 30 May 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya अर्णब गोस्वामी Arnab Goswami स्वाती सिंह Swati Singh योगी आदित्यनाथ Yogi Adityanath अरुण शौरी Arun Shourie नितीन गडकरी Nitin Gadkari

१. प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांना भाषणबाजीला आवर घाला, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले. माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना फटकारून सांगितलं की, तुम्ही एखादी बातमी देऊ शकता, त्याच्याविषयी तथ्य मांडू शकता. मात्र, तुम्ही थेट एखाद्याचे नाव घेऊ शकत नाही; हे योग्य नाही. रिपब्लिकन वृत्तवाहिनीने शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भात दिलेल्या बातमीमध्ये प्रेक्षकांना चिथावणी देणारं निराधार वृत्तांकन केल्यामुळे आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप थरूर यांनी केला आहे.

हे पाहा मिलॉर्ड, तुमचा आवाज अर्णबइतका मोकळा आणि स्पष्ट असेल, तर तुम्हीही न्यायालयात किंचाळा ना? तो किंचाळण्याचं घटनेनं दिलेलं स्वातंत्र्य उपभोगतोय. त्यात काही अर्थ असावा, अशी अपेक्षा का? ती त्याच्या चाहत्यांचीही नाही, त्याच्या वाहिनीच्या प्रेक्षकांचीही नाही; मग इतरांनी कशाला ती अपेक्षा बाळगायची? ज्याचा आवाज मोठा आणि जो पुरोगाम्यांवर आवाज चढवून त्यांना गप्प करून टाकतो, तो देशभक्त, इतकं सिंपल मॅटर इतकं कॉम्प्लिकेटेड कशाला करताय मिलॉर्ड?

……………………………………………………………………………………………

२. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील महिला कल्याण राज्यमंत्री स्वाती सिंह यांनी लखनऊमध्ये ‘बी द बिअर’ या बिअर बारचे उद्घाटन केले. गोमतीनगरसारख्या उच्चभ्रू परिसरातील या बिअर बारच्या उद्घाटनप्रसंगी फीत कापतानाचे स्वाती सिंह यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वाती सिंह यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. स्वाती सिंह यांच्या मैत्रिणीचा हा बिअर बार आहे.

एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या सबलीकरणाला मदत केली, त्याचं कौतुक केलं तर त्यात बिघडलं कुठे? उत्तर प्रदेशासारख्या मागासलेल्या आणि बुरसटलेल्या विचारांच्या म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या राज्यात एक स्त्री बिअर बार सुरू करण्यापर्यंत व्यावसायिक झेप घेते, त्याचं कौतुक महिला कल्याणाची जबाबदारी असलेल्या मंत्रीणबाई करणार नाहीत तर कोण करणार? तिच्याकडे जणू गोमांसच सापडलं असावं, असा कालवा करण्याची गरज काय?

……………………………………………………………………………………………

३. मोदींविरोधात उभा राहतो, त्यांच्यावर प्रदीप शर्मा (आयएएस) आणि तिस्ता सेटलवाड यांच्याप्रमाणे कायद्याचा ससेमिरा लावण्यात येतो, असा आरोप अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपचे माजी नेते अरुण शौरी यांनी केला आहे. मोदी खूप लवकर चिडतात, असेही ते म्हणाले. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, केंद्र सरकारविरोधात बातमी दिल्यामुळे ‘राजस्थान पत्रिका’ या वृत्तपत्राला राजस्थान सरकारने जाहिराती दिल्या नाहीत. मोदी आणि अमित शहा हे रोज राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारधारेला वेगवेगळ्या संस्थांमध्ये आपल्या पद्धतीने प्रोत्साहन देतात. मोठ्या संस्थांमध्ये कोणत्या लोकांची नियुक्ती करण्यात आली यावर एक नजर टाका, असे सांगत त्यांनी इंडियन कौन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्चचे (आयसीएचआर) उदाहरण दिले.

शौरीसाहेब, मोदींच्या पक्षाला ३१ टक्के मतं मिळाली असली म्हणून काय झालं? त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांच्यापासून देशाचा नवा इतिहास सुरू होतो. मोदी म्हणजे आजचा भारत, उद्याचा हिंदुस्थान. ते पर्सनली काही घेत नाहीत हो, फक्त देशावर टीका केली की, त्यांना खूप राग येतो. आता मोदींवर टीका म्हणजे देशावरच टीका, असं समीकरण असल्यामुळे तिथे त्यांचाही नाईलाज होतो. आता तुमचा नंबर लागला, तर तुम्हीही पर्सनली घेऊ नका.

……………………………………………………………………………………………

४. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी विरोधात असताना आम्हीही करतच होतो. यापूर्वी कर्जमाफी झाली, पण त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत विदर्भात ५० टक्के सिंचन होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. राज्य सरकारने शेतीला पूरक अशी कामे सुरू केली आहेत, असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी म्हणाले. कालवे आणि तलावातून जोपर्यंत शेतीला पाणी उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

गडकरीसाहेबांच्या बोलण्याचा सुगम अर्थ असा की, कर्जमाफीने काही प्रश्न सुटणार नाही. शेतीला पाणी उपलब्ध झाल्याशिवाय काही शेतकरी सुखी होणार नाही. ५० टक्के जलसिंचन जेव्हा होईल तेव्हा होईल, तोवर फाशी लावून घेणे हाच सुखी होण्याचा एकमात्र मार्ग असल्याने उगाच कर्जमाफीसारखे हंगामी उपाय योजण्यात काय अर्थ? त्यापेक्षा गळफास लावून घ्या आणि सुखी व्हा.

……………………………………………………………………………………………

५. केरळमध्ये गुरांच्या व्यापारावर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ गोमांस महोत्सव साजरा होतो, तेव्हा पुरोगामी गप्प का बसतात, असा सवाल उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला आहे.

अहो, गप्प कसले बसतील, उलट आनंद करतायत आणि ज्यांना आवडतंय ते मिटक्या मारत चाखतायत. मध्यंतरी बाबराबरोबर अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्वांना आक्रमक, परप्रांतीय ठरवून आपण आपल्या दिव्यज्ञानाचा प्रत्यय दिलाच होता. आता निदान योगी म्हणवून घेताना आपल्या धर्मपरंपरेची तरी माहिती ठेवायला हवी होती. गुजरातमध्ये कोणी खमण महोत्सव साजरा केला किंवा उत्तर प्रदेशात पराठा महोत्सव साजरा केला, तर तो जसा नैसर्गिक तसाच केरळात गोमांस महोत्सव नैसर्गिक. ते त्यांचं पारंपरिक अन्न आहे. त्यांच्यासारख्या अनेक हिंदूंसाठी गाय ही माता नाही, चविष्ट मांस देणारा प्राणी आहे. भारताचा पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न थांबवून हिंदू धर्माचं सर्वांना सामावून घेणारं समावेशक स्वरूप आत्मसात केलंत, तर बरेच क्लेश वाचतील... देशाचे!

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.