टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अक्षयकुमार, सायना नेहवाल, बिपिन रावत, नरेंद्र मोदी, पिनरई विजयन आणि तेजस एक्सप्रेस
  • Mon , 29 May 2017
  • विनोदनामा टपल्या अक्षयकुमार Akshay Kumar सायना नेहवाल Saina Nehwal बिपिन रावत नरेंद्र मोदी Narendra Modi पिनरई विजयन Pinarayi Vijayan तेजस एक्सप्रेस Tejas Express

१. लष्करप्रमुख बिपीन रावत काश्मिरातील सद्यस्थितीतबाबत म्हणाले, काश्मीर खोऱ्यात सध्या प्रचंड प्रमाणात हिंसक कारवाया होत आहेत. जमाव आमच्यावर दगडफेक करतो. वस्तुत: या लोकांनी आमच्यावर दगडफेक करण्याऐवजी शस्त्रे चालवली तर मला जास्त आनंद होईल. कारण त्यामुळे आम्हाला जे करायचे आहे, ते करता येईल. खोऱ्यातील जनता आमच्या जवानांवर दगडफेक करते, पेट्रोबॉम्बचा वर्षांव करते. अशा वेळी माझ्या जवानांनी काय करू, असे विचारले तर मी त्यांना ‘वाट बघा आणि मरा’ असे सांगू शकत नाही. तुमच्यासाठी शवपेट्या तयार करून ठेवल्या आहेत, त्यात तुमचे मृतदेह फुलांनी सजवून तुमच्या मूळ गावी पाठवेन, असे मी त्यांना सांगू का? लष्करप्रमुख म्हणून मला माझ्या माणसांचे मनोबल उंचवण्यासाठी आवश्यक ते सर्व करणे भागच आहे.

आपण भारतीय लष्कराचे प्रमुख आहोत, गोरक्षक दलाचे नाही आणि आपल्या देशातल्या जनतेचा उद्रेक शमवण्याच्या बाबतीत बोलतो आहोत, शत्रुराष्ट्रातल्या कारवाईबद्दल नाही, याचं किंचितही भान नसलेले हे लष्करप्रमुख निवृत्तीनंतर विद्यमान सरकारमध्येच मंत्रीपदावर किंवा अन्य उच्चपदावर विराजमान होतील, यात शंका नाही. काश्मीरच्या जनतेने शस्त्रांनी हल्ला केला की, ‘आम्हाला जे करायचे ते करता येईल’, ही त्यांची भाषा या सरकारच्या काश्मीरविषयक धोरणाचा गाभा म्हणून स्वीकारायला हरकत नसावी.

……………………………………………………………………………………………

२. सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणारा अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांचा नक्षलवाद्यांनी निषेध केला आहे. नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा निषेध करत आहोत, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे. देशातील प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, खेळाडू आणि सेलिब्रिटींनी क्रांतीच्या आणि गरिबांच्या बाजून उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे. त्यांनी पोलिसांच्या अत्याचाराचा आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवावा, असंही नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे.

नक्षलवादी नेमके कोणासाठी आणि कोणाविरुद्ध लढतायत? किती शोषक मारले गेले या लढ्यात? जवानांच्या कारवाईत मारला जाणारा नक्षलवादी जसा गरीब आणि शोषित असतो तसाच सीआरपीएफचा जवानही गरीबच असतो की! गरिबांनी एकमेकांना मारायचं आणि शोषक आहेत तिथे, आहेत तसेच राहणार, ही क्रांतीची कल्पना आहे का नक्षलवाद्यांची? मग ते करतात त्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचं आणि अत्याचारांचं काय करायचं?

……………………………………………………………………………………………

३. केरळमधील लोकांच्या खाण्याच्या सवयी अतिशय चांगल्या असून केरळी लोक खाण्याच्या आरोग्यदायी आणि पोषणमूल्ये असणाऱ्या पारंपरिक पद्धती अवलंबतात. दिल्ली आणि नागपूरमधून केरळी लोकांना खाण्याच्या बाबतीतले धडे घेण्याची आवश्यकता नाही, आम्ही काय खावे हे दिल्ली आणि नागपूरकरांनी शिकवू नये, असा तडाखा केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही आठवडी बाजारात होणाऱ्या दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी आणली आहे. त्यामुळे देशातील अनेकांना खाण्याच्या सवयींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अहो विजयन भाऊ, कोणी खायचं काय हे तर हे राष्ट्रगणंग ठरवणार आहेतच, पण, ताटात कशाच्या शेजारी काय असावं, कशी रांगोळी काढावी, आधी कोणता घास घ्यावा, कोणती बोटं कशासाठी वापरावीत (त्याचा दांडगा अनुभव आहे त्यांना), हेही ते शिकवणार आहेत. ‘वदनी कवळ घेता’ न म्हणता जेवलं तर दंड आणि तुरुंगवास भोगण्याची तयारी ठेवा मिष्टर, आहात कुठे!

……………………………………………………………………………………………

४. मुंबई-गोवा तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्या चार फेऱ्यांमध्ये ३३७ हेडफोन्स चोरीला गेल्यानंतर आता रेल्वेने तीस रुपयांचे स्वस्त हेडफोन विकत घेतले आहेत. तेजस एक्स्प्रेसमध्ये विमानातल्याप्रमाणे अत्याधुनिक सोयीसुविधांसह मनोरंजनासाठी हेडफोन्स देण्यात आले होते. मात्र बहुतांश हेडफोन्सची चोरी झाल्याने आता साधे हेडफोन्स देण्यात येत आहेत.

थोडक्यात, सार्वजनिक मालमत्तेची चोरी करू नका, हे लोकांच्या गळी उतरवणं शक्य नाही; त्यापेक्षा स्वस्त आणि भिकार वस्तू चोरा, तीच तुमची लायकी, असं रेल्वेने प्रवाशांना सांगितलं आहे.

……………………………………………………………………………………………

५. लोकशाहीत टीका आणि सूचना यांना कायमच महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचा आदर करायलाच हवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात म्हटलं आहे. सरकारने जनतेचे म्हणजे ऐकून घ्यायलाच हवे. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत. विधायक टीकेमुळे तर लोकशाहीला बळच मिळते, असे सांगून सरकारवर टीका करणाऱ्यांचे तसेच विविध सूचना करणाऱ्यांचे आपण आभार मानू इच्छितो, असं पंतप्रधान म्हणाले.

मुलांनो, सांगा यातून काय कळतं? यातून इतकंच कळतं की केंद्र सरकारचे समर्थक आणि मोदी यांचे चाहते हे त्यांच्या कितीही प्रेमात असले, तरी त्यांची ‘मन की बात’ ऐकत नाहीत किंवा ऐकत असले तरी मनावर अजिबातच घेत नाहीत.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Navnath Karche

Thu , 01 June 2017

it's not good....


sameer gaikwad

Mon , 29 May 2017

टाळूपर्यंत मुंग्या आणणारया टपल्या मस्त जमल्यात ..