टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • लालूप्रसाद यादव, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, कपिल मिश्रा, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अनिल विज, चितळे बंधू मिठाईवाले
  • Wed , 17 May 2017
  • विनोदनामा टपल्या लालूप्रसाद यादव Lalu Prasad Yadav नरेंद्र मोदी Narendra Modi देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis कपिल मिश्रा Kapil Mishra अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal ममता बॅनर्जी Mamata Banerjee अनिल विज Anil Vij चितळे बंधू मिठाईवाले Chitale Bandhu Mithaiwale

१. पारंपरिक विज्ञान हे शाश्वत असून निसर्गाशी एकरूप होते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधुनिक विज्ञानातील त्रुटींकडे लक्ष वेधले. आधुनिक विज्ञानाच्या आधारावर प्रगत झालेले देश हे प्रदूषणकारी ठरत असून प्रदूषणाच्या प्रश्नाला आपले पारंपरिक विज्ञान हेच उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पारंपरिक विज्ञान हे शाश्वत विकासावर आधारित असून विनाशावर नाही, असे फडणवीस म्हणाले.

शाश्वत विज्ञानाच्या नावाखाली छद्मविज्ञान रेटण्याच्या राजीव दीक्षिती फंड्यांपैकी हा एक फंडा. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ज्या विमानाने, मोटारीने आले, तिथपासून ते ज्या सिस्टमवर भाषण करत होते, ज्यावर ते ध्वनिमुद्रित, चित्रमुद्रित होत होतं, तिथपर्यंतची प्रत्येक गोष्ट आधुनिक विज्ञानाने शोधून काढलेली आहे आणि शाश्वत विकासाच्या वल्गनांमध्ये देश गुरफटला असता तर इथे श्वेतक्रांती आणि हरितक्रांतीही झाली नसती आणि मोठी लोकसंख्या उपाशी मेली असती. आधुनिक विज्ञानाचे सगळे फायदे घ्यायचे आणि वर त्याला नावं ठेवून शेंडा ना बुडखा कल्पनांचा उदोउदो करायचा, या कृतघ्न संस्कृतीला साजेसंच आहे म्हणा हे.

................................................................................................................

२. भारतात जन्मल्याची लाज वाटते, असे विधान करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका करताना, भारतात जन्म घेतल्याची लाज वाट असेल तर ममता बॅनर्जींनी समुद्रात उडी मारावी, कोलकातापासून समुद्र जवळच आहे, त्यांनी जाऊन उडी मारावी, असे वादग्रस्त विधान हरियाणामधील भाजप नेते आणि क्रीडा मंत्री अनिल विज यांनी केले आहे.

विजसाहेब, तुमची सूचना स्तुत्यच आहे. पण, तुम्ही समुद्रातून बोलताय का, ते सांगा आधी. पहिली उडी मारायचा मान तर तुमचा आहे ना? तुमच्या मान्यवर पंतप्रधानांनी, इथे नाही, परदेशात जाऊन भारतात राहायची कशी लोकांना लाज वाटत होती, वगैरे मुक्ताफळं उधळली होती. तेव्हा त्यांना दिल्लीहून कोलकात्याचं विमान तिकीट पाठवलं होतं का? दिल्लीला समुद्र नाहीये. की तिकडे यमुनेतच व्यवस्था केलेली आहे आपल्या पक्षजनांची?

................................................................................................................

३. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू राम बनू पाहत आहेत. त्यांना जनता हनुमानासारखी म्हणजेच ते सांगतील ते निमूटपणे ऐकणारी हवी आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज मोदींवर निशाणा साधला. याचा शेवट अर्थातच संपूर्ण व्यवस्था नष्ट होण्यात आहे, असे लालू म्हणाले.

लालूजी, तुमच्या हातात सत्ता होतीच की एकेकाळी. तुमच्यापैकी काहींनी राजकारणाचा कुस्तीचा आखाडा करून टाकला, काहींनी नौटंकी करून टाकलीत. पब्लिकला ‘हशिवहशिवहशिवन्यात’ समाधान मानलंत. आता पब्लिक तुम्हाला रडवून या प्रतिरामचंद्रांना डोक्यावर घेऊन नाचतंय... मुळात तुम्ही संधी असताना ज्यांचं माणसांत रूपांतर करण्याऐवजी माकड बनवलंत, त्यांच्यासाठी हनुमान बनणंही प्रमोशनच आहे की!

................................................................................................................

४. आंबा बर्फी असो वा चक्का आणि बाकरवडी असो वा पेढे, ‘चितळे बंधू मिठाईवालें’कडे मिळणाऱ्या अशा चविष्ट खाद्यपदार्थांसाठी दुपारी करावी लागणारी प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येण्याचे स्पष्ट संकेत रविवारी देण्यात आले. दुपारी एक ते चार खरेदीसाठी गेल्यास रिकाम्या हाताने परताव्या लागणाऱ्या ग्राहकांना ‘चितळें’नी सुखद धक्का दिला असून, येत्या एक जुलैपासून टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व शाखांच्या वेळा बदलणार आहेत. दुपारी दुकान बंद ठेवण्याची ‘पुणेरी’ सवय मोडून चितळे यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी हा लोकप्रिय निर्णय घेतला आहे.

तर म्हणजे एकंदर आता काहीही होऊ शकेल पुण्यात... पुण्यातल्या पाट्या आणि दुकानदार नम्र होतील, पुण्यातले रिक्षावाले मीटरप्रमाणे भाडं घेतील आणि कोणतंही भाडं नाकारणार नाहीत, पुण्यातले दुचाकीस्वार वाहतुकीचे नियम पाळतील, पुण्यातल्या दुचाकीस्वार मुली अधूनमधून बिनास्कार्फच्याही दिसू लागतील; काय सांगावं, पुण्यातले लोक आता विचारलेला पत्ताही न खेकसता आणि बरोबर सांगू लागतील... कलयुग कलयुग म्हणतात ते हेच की काय?

................................................................................................................

५. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर खळबळजनक आरोपांची मालिका सुरू केली आहे. राजधानीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केजरीवाल यांनी बनावट कंपन्यांच्या नावाने देणग्या वसूल केल्याचा आरोप केला. तसेच  केजरीवाल यांना थोडी जरी लाज वाटत असेल तर त्यांनी आज संध्याकाळपर्यंत राजीनामा द्यावा. न दिल्यास मी त्यांची कॉलर धरून त्यांना तिहार तुरुंगात टाकेन, तशी शपथ मी घेतली आहे असं त्यांनी ठणकावलं. त्यानंतर पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मिश्रांना पुढच्या काही मिनिटांतच चक्कर आली आणि ते पडले.

चक्कर येणारच ना... एकदम किती जबाबदाऱ्या घ्यायच्या त्या... त्यातल्या काहींचा आपल्याला अधिकारही नाही, याचंही भान नाही बिचाऱ्यांना आरोपबाजीच्या आवेशात. पण, भाजपच्या वळचणीला गेलं की, गाड्याखालच्या नळ्याप्रमाणे प्रत्येकाला ‘गंगाधरही शक्तिमान है’ असा साक्षात्कार होतो आणि आपोआप बेटकुळ्या फुगू लागतात बहुतेक. लिंबूपाणी द्या त्यांना. लिंबाने तरतरी येते म्हणतात.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......