निखिल वागळे : सबकुछ वागळे!
दिवाळी २०१७ - व्यक्तिचित्रे
निळू दामले
  • पत्रकार निखिल वागळे
  • Thu , 27 October 2016
  • निखिल वागळे निळू दामले Nikhil Wagle Niloo Damle

मराठी जनतेला माहीत असलेल्या समकालीन मोजक्या व्यक्तींमध्ये आज निखिल वागळे यांची गणना होते. गेली सात-आठ वर्षं ते इलेक्ट्रॉनिक माध्यमात दिसतात. ‘आयबीएन लोकमत’ आणि ‘महाराष्ट्र वन’ या दोन वृत्तवाहिन्या त्यांनी आकाराला आणल्या. दोन्ही वाहिन्यांवर वागळे यांची छाप आहे. या वाहिन्या म्हणजे ‘सबकुछ वागळे’.  या वाहिन्यांतून वागळे लोकांसमोर आले ते एक आक्रमक राजकीय पत्रकार या रूपात. त्यांचा आवेश,  अभिनिवेश, शब्द, शैली हे सारं मराठीत नवं आहे. त्यांची धाटणी काहीशी अर्णव गोस्वामीसारखी.  माध्यमांत त्यांच्यासमोर टिकून राहणं कठीण काम असतं. पडद्यावर दिसणारा माणूस एकतर त्यांच्याबरोबर असला पाहिजे, नाही तर त्यांच्याविरोधात असला पाहिजे. अधलंमधलं त्यांच्या कार्यक्रमात चालत नसतं, नाही.

वाहिन्यांवर येण्याआधी वागळे ‘महानगर’ नावाचं एक सायंदैनिक चालवत. तिथंही ‘सबकुछ वागळे’च होते. ‘महानगर’ चालवत असतानाच ‘षटकार’ हे खेळ नियतकालिक, ‘चंदेरी’ हे सिनेमा-नाट्यनियतकालिक आणि ‘अक्षर’ हे वार्षिक (दिवाळी अंक) वागळे चालवत असत. ‘षटकार’ आणि ‘चंदेरी’मध्ये मात्र वागळे सबकुछ नव्हते. कारण वागळे सिनेमा आणि खेळात आक्रमक नव्हते. तिथं संजय कऱ्हाडे आणि मीना कर्णिक ही त्या क्षेत्रातली माहीतगार माणसं काम पाहत असत. ‘अक्षर’मध्येही वागळे सबकुछ नसत. अनेक मित्र त्यांच्याबरोबर अंक आखण्यात, घडवण्यात सहभागी असत. ‘अक्षर’ हा दिवाळी अंक नुसता राजकीय अंक नसे, त्यात साहित्य-सिनेमा-नाटक-वैचारिक इत्यादी भागही असत. वागळ्यांच्या आक्रमकतेला वाव नसणारे अनेक विषय दिवाळी अंकात असत.

‘महानगर’, ‘षटकार’, ‘चंदेरी’ आणि ‘अक्षर’ ही वागळे यांनी व्यक्तिशः विकसित केलेली पत्रकारिता होती. स्वतःचं सर्वस्व पणाला लावून ही नियतकालिकं वागळेंनी सुरू केली होती.  ते सारं त्यांचं कर्तृत्व होतं.  त्या आधी वागळे ‘दिनांक’ साप्ताहिकात लिहीत असत, काही काळ ते दिनांकचे संपादकही होते. दिनांकमध्ये काम करत असताना आणि त्याच्याआधी वागळे फ्रीलान्सिंग करत असत.  सा. माणूस,  सा. मनोहर, मासिक किर्लोस्कर अशा ठिकाणी त्यांनी लेख लिहिले, ठिकठिकाणी जाऊन लोकांशी बोलून मजकूर लिहिला.  त्याआधी आणीबाणीच्या काळात भूमिगत- बंडखोर नियतकालिकांमध्ये ते लिहीत,  संपादनात भाग घेत.

साधारणपणे १९७४ ते २०१६ एवढा दीर्घकाळ वागळे पत्रकारितेत आहेत. 

स्वातंत्र्य आंदोलनात पत्रकारिता केलेल्या व्यक्तींचा प्रभाव१९७० नंतरही टिकून होता. स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन हे एक मोठं पर्व होतं. स्वातंत्र्य आंदोलनाची सवय आणि शैली जडलेल्या पत्रकारांनीच संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलनही कव्हर केलं होतं. स्वातंत्र्य आंदोलन आणि नंतरची आंदोलनं यात भाग घेणाऱ्या पत्रकारांची पत्रकारिता विशिष्ट ध्येयाला वाहिलेली होती. त्याअंगानं ती स्वतंत्र पत्रकारिता नव्हती. स्वातंत्र्यलढ्याला पोषक असणारे मुद्देच पत्रकार उचलत असत. त्या काळात समाजात त्या आंदोलनाच्या पलीकडचे असंख्य मुद्दे होते, प्रवाह होते. शेकडो नव्हेतर हजारो वर्षांपासूनच्या परंपरा आणि गोच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात तशाच शिल्लक होत्या. धुरीण म्हणत की, आधी स्वातंत्र्याचं पाहूया, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतर गोष्टींचं पाहू. या धुरीणांचं नेतृत्व मान्य करून पत्रकार आपापली कामं करत असत. त्यामुळं विषय, शैली, मुद्दे इत्यादी बाबतींत पत्रकारिता मर्यादित रूपाची होती. पत्रकारिता हे एक स्वतंत्र मूल्य आहे, हा विचार स्वातंत्र्यकाळात झाला नव्हता. पत्रकारिता करणारी माणसं गांधीवादी असत, समाजवादी असत, हिंदुत्ववादी असत, जातीअंतवाली असत, मार्क्सवादी असत, निखळ पत्रकार नसत.

ध्येयवादी पत्रकारितेमध्ये निखिल वागळे यांची वाढ झाली. ते पत्रकारिता करू लागले, तेव्हा वरील प्रवाहात वाढलेले ‘माणूस’चे माजगावकर, ‘मराठवाडा’चे अनंत भालेराव, ‘मराठा’चे अत्रे, ‘किर्लोस्कर’चे मुकुंदराव किर्लोस्कर, ‘महाराष्ट्र टाईम्स’चे दिनू रणदिवे आणि दि. वि. गोखले, ‘लोकसत्ता’चे माधव गडकरी या आणि अशा माणसांची छाप पत्रकारितेवर होती. पैकी समाजवादी मंडळींचा प्रभाव वागळे यांच्यावर होता. वागळे समाजवाद्यांच्या राष्ट्रसेवा दलात कार्यकर्ते म्हणून वाढले. वागळे समाजवादी पक्षाचे बांधील कार्यकर्ते नव्हते, पण सेवादलातून स्वीकारलेली बांधीलकी मात्र त्यांच्यात होती. बांधीलकी ही एक गोचीच असते.  बांधीलकीचे फायदे असतात आणि तोटेही असतात. एकीकडे ती माणसाला दिशा देते, ताकद देते; पण दुसरीकडे ती माणसाची नव्या गोष्टी स्वीकारण्याची क्षमता मर्यादित करते. एक प्रकारचं एकारलेपण, आंधळेपण बांधीलकीमधून येतं.

पत्रकारिता व्यक्तिमत्त्व घडत असताना मोकळेपणा आणि बांधीलकी या दोन परस्परविरोधी प्रेरणा त्याला खेचत-ढकलत असतात. माजगावकर हिंदुत्ववादी विचारांकडून पत्रकारितेत आले होते.  पण त्यांनी मोकळेपणा- बांधीलकीचा तोल सांभाळला. भालेराव समाजवादी-गांधीवादी संस्कारातून पत्रकारिते आले होते. त्यांनीही तोल सांभाळला. माजगावकर आणि भालेराव यांची व्यक्तिमत्त्वंच तशी होती, मृदू होती, समाजाला सांभाळून घेण्याचा भाग त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मोठा होता.  दै. मराठवाडा, सा.माणूसमध्ये झालेलं त्यांचं व्यक्तिगत लिखाण किंवा नियतकालिकातल्या मजकुरावर पडलेली त्यांची छाप यातून त्यांचं तोल सांभाळणारं व्यक्तिमत्त्व दिसून येतं.

निखिल वागळे यांची आणीबाणी ते ‘महाराष्ट्र वन’पर्यंतची पत्रकारिता पाहिली की, लक्षात येतं, तोल हा भाग त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बसत नाही. वागळे यांच्यावर गांधी,  लोहिया, मार्क्स, आंबेडकर, शाहू आणि फुले यांचा प्रभाव आहे. ते प्रभाव त्यांच्या पत्रकारितेच्या प्रेरणा आहेत. खरं म्हणजे वरील व्यक्तींचे विचार एकमेकाला छेद देणारे आहेत,  ते विचार एकत्र करणं म्हणजे वैचारिक भेळ आहे. भेळीतले सर्व घटक आपल्या जिभेला स्वतंत्रपणे अनुभव देतात,  पण त्यातून एकत्रित अनुभव येत नाही. काही घटक जिभेला सुखावतात, काही डोक्याला सुखावतात, काही पोटाला सुखावतात, काही नाकाला सुखावतात. कित्येक घटक पोटाला त्रासही देतात. भेळीवर जगू पाहणाऱ्या माणसांचं खरं नसतं. 

भेळ करणाऱ्या माणसांचे हेतू स्वच्छ असतात. त्यांना समाजाचं हित हवं असतं. समाजातलं दुःख, विषमता, अन्याय या गोष्टींचा त्यांना अतोनात त्रास होतो, त्या गोष्टी नष्ट व्हायला पाहिजेत असं त्यांना तीव्रपणे वाटत असतं. पंचाईत अशी की, त्यांच्या इच्छा फलद्रूप करण्याची क्षमता त्यांच्या भेळीत नसते.

वागळे वरील भेळ मंडळींतले आहेत.

आपण पत्रकार आहोत की, क्रांतिकारक आहोत, याबद्दलही पत्रकारांमध्ये गोंधळ असतो. पत्रकार एखादी क्रांती, समाजाची सेवा, परिवर्तन इत्यादी गोष्टी डोक्यात घेऊन पत्रकारितेत येतात. आपण पत्रकार आहोत की समाजकारण करणारे आहोत, याचा निर्णय त्यांना करता येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून धड पत्रकारिता होत नाही आणि धड राजकीय- सामाजिक कार्यही होत नाही. राजकारणातल्या माणसाकडे पत्रकारितेचं कसब असू शकतं, पण तो मुख्यतः राजकारणी असायला हवा. पत्रकारी करणाऱ्या माणसाकडे राजकीय विचार असू शकतो, पण तो मुख्यतः पत्रकार असायला हवा.

स्वभावानं वागळे आक्रमक आहेत. ते बेभान होतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमात आणि त्यांच्या लेखनात त्यांचा बेभानपणा दिसतो. त्यांच्यापेक्षा वेगळे विचार करणाऱ्या माणसांना वागळ्यांचा आक्रमकपणा त्रासदायक ठरतो. अलीकडे राजकीय पक्षाच्या लोकांनी वागळ्यांना तोड देत आपलं घोडं पुढं दामटवण्याच्या वाटा शोधल्या आहेत. काँग्रेसी आणि हिंदुत्ववादी नेते वागळ्यांच्या आक्रमकपणाला हसून, बगल देत, कधी कधी तितकंच आक्रमक होत आपलं म्हणणं रेटतात. आताशा वागळे आणि समोरची माणसं यांच्यात एक तोल तयार झाला आहे. वागळे पडद्यावर वेगळे असतात आणि पडद्यामागं हसत-खेळत विरोधकांशी सख्य सांभाळतात, असा माध्यमातल्या लोकांचा अनुभव आहे.

वागळ्यांना खूप शत्रू झालेत. सोशल मीडियात वागळ्यांवर असभ्य भाषेत फार लिहिलं जातं. आक्रमक पत्रकारितेमुळे त्यांना खूप प्रशंसकही लाभले आहेत. त्यांच्यावर राग असणारी माणसं त्यांच्यापासून दूर असतात, एका अंतरावर असतात. वागळ्यांना त्याचा त्रास होत नाही. प्रशंसा करणारी माणसंही खूप आहेत. वागळे हुरळून जात नाहीत. टीका आणि प्रशंसा दोन्हींचा वागळ्यांवर परिणाम होत नाही. वागळे त्यांच्या स्वतःच्या दुनियेत मग्न असतात.

वागळे पत्रकारितेसाठी माणसांना भेटत आले. चळवळींशी संबंध असल्यानं त्यांच्याभोवती भरपूर माणसं वावरत आली. माणसांत वावरणं आणि नंतर लिहिणं अशी पत्रकारितेची एक पद्धत आहे.  वागळे त्यातले. त्यात बांधीलकीची भर. अशा माणसांना वाचायला कमी वेळ मिळतो. सामान्यतः स्वतःला आवडणाऱ्या आणि पटणाऱ्या विषयांचं वाचन ही माणसं करतात. एका शिस्तीत आणि सातत्यानं वाचन करण्याची सवय या माणसांना नसते. खूप वाचन करणारे पत्रकार कमी बोलतात. उदा. तळवलकर. मर्यादित वाचन असणारी आणि माणसांमध्ये अधिक वेळ खर्च करणारी माणसं अधिक बोलतात. उदा. गडकरी.  वागळे गडकरींच्या गटातले.

काहीही न लपवता,  मार खायची तयारी ठेवून वागळे बेभान पत्रकारिता करतात. अशा पत्रकारितेतून तोटे आणि फायदे, त्रास आणि सुख, टीका आणि प्रशंसा त्यांच्या वाट्याला येतो. ती ते आनंदानं स्वीकारतात!

 

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

damlenilkanth@gmail.com

Post Comment

Kalpak Mule

Mon , 09 January 2017

महानगरचे निखिल वागळे आणि त्यानंतरचे वागळे यात खूप अंतर आहे. हातवारे करून आणि आक्रस्ताळेपणे बोलून स्टुडिओ पत्रकारिता करणे हे सच्च्या पत्रकारितेची लक्षणं नव्हेत. दुसऱ्यांना तुमची मतं काय आहेत हे विचारण्यापेक्षा, त्यांनी शोधपत्रकारितेतून स्वतःची निर्भीड मतं द्यावीत. असे वागळे सद्या महाराष्ट्राला हवे आहेत. महानगरचे निखिल वागळे पुंन्हा भेटावेत हि आशा करतो. नवी वर्षात त्यांनी हा संकल्प जरूर करावा, हि ईश्वरचरणी प्रार्थना.


Bhagyashree Bhagwat

Thu , 27 October 2016

लेख खूपच प्लेन वाटला. लेखकाचं नेमकं म्हणणं कळत नाही.