टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • योगी आदित्यनाथ, मनू महाराज, पृथ्वीराज चव्हाण, महादेव जानकर आणि प्रीती झिंटा
  • Sat , 06 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या योगी आदित्यनाथ Yogi Adityanath मनू महाराज Manu Maharaj पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan महादेव जानकर Mahadev Jankar प्रीती झिंटा Preity Zinta

१. उत्तर प्रदेशात कट्टरतावादी हिंदू संघटनांच्या वाढत्या उच्छादावरून करण्यात येत असलेल्या टीकेला आदित्यनाथ यांनी उत्तर दिले आहे. एखाद्याने आमची बदनामी करायचीच ठरवले असेल तर आमचा नाईलाज आहे, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सहारनपूर आणि आग्रा येथे काही दिवसांपूर्वी भाजप व बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलिसांना भिडले होते. यावेळी एक खासदार आणि पोलीस अधिकारी जखमी झाला होता. तसेच गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात स्वयंघोषित गोरक्षकांचा उपद्रवही वाढला आहे. बुलंदशहरमध्ये नुकतेच हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारण्यात आले. उत्तर प्रदेशात कोणताही भेदभाव नसून कायद्याच्या राज्याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात कोणीही असुरक्षित नाही, हे मी हमी देऊन सांगू शकतो, असे ते म्हणाले.

करेक्टाय. उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे आणि कायदा गोरक्षकांच्या, हिंदू युवा वाहिनी संघटनेच्या हातात आहे, हे इतरांनी, अगदी पोलिसांनीही लक्षात घेतलं पायजेलाय. या संघटना जे काही करतील, तो कायद्याच्या अंमलबजावणीचाच भाग आहे, हे लक्षात घेतल्यास या संघटनांच्या बदनामीचा विषयच उदभवणार नाही. बदनाम सही नाम तो हुआ, हे त्यांना माहिती असल्याने बदनामीने असाही त्यांना काही फरक पडणार नाही.

................................................................................................

२. हिंदी चित्रपटसृष्टी सोडून वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आपण सिनेमांवर पाणी सोडून आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघ घेतला. एकदाही आयपीएल न जिंकलेल्या या संघावर सुरुवातीपासूनच खूप विश्वास आहे. हा संघ हा माझ्या मुलासारखाच आहे म्हणूनच या संघासोबत जास्तीत जास्त सामने जिंकण्यासाठी मी उत्सुक आहे, असं प्रख्यात अभिनेत्री प्रीती झिंटा म्हणाली.

हिंदी सिनेमातली सद्दी संपुष्टात आल्यानंतर आपण पोटापाण्याचा आणि चर्चेत राहण्याचा एक ग्लॅमरस मार्ग म्हणून आयपीएलचा संघ विकत घेतला, असं प्रीती म्हणाली असती, तर ते तिच्या प्रांजळ आणि प्रामाणिक प्रतिमेला शोभून दिसलं असतं. बाकी संघावरची आणि खेळाडूंवरची तिची माया अधूनमधून मैदानात उतू जात असते आणि या संघाचे सामने पाहणारे लोक अनेकदा त्या वात्सल्याच्या क्षणांकडेच डोळे लावून बसलेले असतात, हे खरंच आहे.

................................................................................................

३. बिहारमधील दारूबंदीमुळे, इतरत्र होते तशी सहजगत्या उपलब्ध असलेली दारू फक्त अनावश्यक महाग आणि घातक बनली आहेच. त्याचबरोबर राज्यातील उंदीर दारूच्या अधीन झाले आहेत! पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उंदरांना दारूची चटक लागल्याची तक्रार एका ठाणे अंमलदाराने केली. पोलिसांच्या मालखान्यात (जप्त केलेल्या वस्तू ठेवण्याची जागा) ठेवलेल्या दारूच्या बाटल्या उंदीर खाली पाडून फोडतात आणि त्यातील दारू पितात, असा या ठाणे अंमलदाराचा दावा आहे. जप्त करून मालखान्यात ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळल्यावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. मालखान्यात सीलबंद करून ठेवलेल्या दारूच्या सर्व बाटल्या उघडून उंदरांनी सर्व दारू फस्त केल्याचाही पोलिसांचा दावा आहे. गेल्या वर्षी पाच एप्रिलपासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आल्यापासून घालण्यात आलेल्या छाप्यांत पाच लाख लिटरहून अधिक विदेशी दारू, तीन लाख लिटर देशी दारू आणि बारा हजार लिटर बिअर असा साठा जप्त करण्यात आला. 

बिहारचे उंदीर मालखान्यातली दारू पिऊन टाइट झाल्यानंतर खाकी कपडे घालून अंमलदार म्हणून ठाण्यात वावरतात की काय, याची चौकशी व्हायला हवी. कारण, दारू उंदीर पितात आणि वास यांच्या तोंडाला येतो, अशी अजब गंमत आहे. काही काळाने उंदीर ब्लॅकमध्ये दारूविक्री करतात, असंही मनूमहाराजांना ऐकावं लागणार आहे. दारू प्यायल्यावर उंदरांमध्ये तेवढी अक्कल आपोआपच येणार, हे कोणताही अस्सल मद्यप्रेमी छातीठोकपणे सांगू शकेल.

................................................................................................

४. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट हे परदेश दौऱ्यावर गेल्याने काँग्रेस आणि शिवसेनेने त्यांच्यावर आगपाखड केली आहे. या मंत्र्यांना तातडीने परत बोलाविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.

सांगा पाहू मुलांनो याचा अर्थ काय? करेक्ट. या मंत्र्यांनी शिवसेनेच्या सहकाऱ्यांना सोबत घेतलेलं नसणार आणि काँग्रेसच्या ज्या आमदारांना सोबत नेलंय ते टीका करणाऱ्यांच्या विरोधी गटातले असणार. बाकी या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही खरं तर काहीच बोलता कामा नये. २००९मध्ये आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी असा संवेदनशील काळात असंवेदनशील दौरा आखला होता, तेव्हा आताच्या सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती आणि तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी तिला भीक न घालता दौरा पूर्ण केलाच होता.

................................................................................................

५. मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही, असे वक्तव्य राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी हे विधान केले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

सत्तारोगाची लागण झाली की भलेभले कार्यकर्तेही कसे बहकतात, ते जानकरांकडे पाहून कळतं. आपल्यावर एका समाजाचा शिक्का मारू नका, असं म्हणण्याजोगं विविधांगी काम ज्यांनी केलं आहे, ते शरद पवारही जिथे अर्धशतकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात व्यतीत केल्यानंतरही ‘मराठा स्ट्राँगमन’च राहतात, तिथे जानकरांची काय कथा? बाकी याच भाषणात, पुढच्याच श्वासात जानकरांनी कोणता विषय मांडला, तर धनगर आरक्षणाचा. ही त्यांच्या सर्वसमावेशकतेची ग्वाही म्हणावी की काय?

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.