टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रज्ञासिंह ठाकूर, अरविंद केजरीवाल, देवेंद्र फडणवीस आणि उर्जित पटेल
  • Sat , 29 April 2017
  • विनोदनामा टपल्या प्रज्ञासिंह ठाकूर Pradnya Singh Thakur अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis उर्जित पटेल Urjit Patel

१. २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर हिला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर तिने पत्रकार परिषद घेतली. ‘नऊ वर्षांपासून मी तुरुंगात होते. या काळात मी भावना व्यक्त करू शकली नाही’, असे सांगून ‘माझ्याविरोधात काँग्रेसने षडयंत्र रचला होता’, असा आरोपही तिने केला. ‘काँग्रेसने रचलेल्या षडयंत्ररूपी काळ्या सागराशी संघर्ष केल्यानंतर मी तुरुंगातून अर्धमुक्त झाले आहे. मात्र, कुठेतरी मी मानसिकदृष्ट्या बंधनात राहणार आहे’, असेही तिने स्पष्ट केले. ‘दहशतवादीविरोधी पथकाने आपल्याला बेकायदा अटक केली’, असेही ती म्हणाली. ‘‘भगवा दहशतवाद’ हा काँग्रेसने आपल्याविरोधात केलेला कुप्रचार आहे. राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी भगव्या दहशतवादाला घाबरलेच पाहिजे,’ अशा शब्दांत तिने काँग्रेसवर निशाणा साधला.

प्रज्ञाताई, आता लवकरच निवडूनही याल तुम्ही कुठून ना कुठून! एवढा प्रचंड त्याग केलेली माणसं आजकाल मिळतात कुठे सहजगत्या? इकडच्या तिकडच्या पक्षांमधून वाटमारी करून आणावी लागतात. फक्त ते भगव्या दहशतवादाचं एक काय ते ठरवा... तो कुप्रचार होता, तर मग त्याला ‘राक्षसी वृत्ती’च्या लोकांनी घाबरायलाच हवं, या म्हणण्याला अर्थ काय? आपण भगव्या दहशतवादी आहोत, असं स्पष्टपणे आणि अभिमानाने सांगायचे सुदिन आलेले आहेत, त्यांचा लाभ घ्या आणि स्पष्ट बोला.

...................................................................................................

२. दिल्ली महापालिका निवडणुकीतील पराभवातून सावरण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना ‘जागरूक राहा, प्रामाणिक राहा,’ असा सल्ला दिला आहे. पक्ष कधीही सोडणार नाही, अशी शपथदेखील केजरीवाल यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दिली. भाजपने पक्षांतर करण्याची ‘ऑफर’ दिल्यास ती ऑफर रेकॉर्ड करा, असेदेखील केजरीवाल यांनी ४८ नगरसेवकांना सांगितले आहे.

केजरीवालांची आणि त्यांच्या पक्षाची एकंदर परिस्थिती पाहता काही दिवसांनी केजरीवाल रोज सकाळी या ४८ जणांना पावडर लावून, तेल लावून, भांग पाडून महापालिकेत पाठवताना दिसतील, अशी चिन्हं आहेत. त्यांच्या मनगटांवर ‘आपबंधना’चा एकेक दोराही बांधून टाका लगेहाथ!

...................................................................................................

३. भाजपने राज्यात घवघवीत यश मिळवले. ही मोदी लाट नव्हे तर त्सुनामी आहे. विकास आणि विश्वासाच्या जोरावर भाजपला यश मिळाले आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केले. भाजप हा महाराष्ट्रव्यापी पक्ष आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे सेवक म्हणून कार्य करावे. विजयातून अहंकाराची भावना निर्माण झाल्यास आपलीही अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादीसारखी होईल, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

हे बाकी बरं केलंत देवेंद्रभाऊ. नाहीतरी पक्षात आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आयात केलेल्या वाल्मिकींचीच बहुसंख्या आहे. तुमच्यासमोर बसलेल्यांतही तेच सर्वाधिक असणार. पण, त्यांची अवस्था काय वाईट झाली, ते कळलं नाही? राष्ट्रवादी हरली तरी त्यांचं काहीच बिघडलं नाही, ते तर तुमच्याकडे पावन होऊन परत सत्तेत बसलेले आहेत. याला वाईट अवस्था कसं म्हणायचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने यांच्या पुनर्वसनासाठी तुम्हाला सत्ता दिली, हे तरी कसं काय खरं मानायचं?

...................................................................................................

४. देशभरात सर्वाधिक भ्रष्टाचार असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. या यादीत कर्नाटक पहिल्या स्थानी असून केरळ, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार असल्याचे समोर आले आहे. ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’ने देशभरातील २० राज्यांमध्ये सर्वेक्षण केले आहे. तीन हजारांहून अधिक लोकांशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भ्रष्टाचारामध्ये कर्नाटक पहिल्या स्थानी असून त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि पंजाब या राज्यांचा नंबर लागतो.

अध्यक्षमहोदय, आपलं राज्य सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे, याची मी आपल्याला ग्वाही देतो. या एका क्षेत्रात महाराष्ट्र पिछाडीवर, चौथ्या स्थानावर कसा घसरला, याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत आणि व्यक्तिश: लक्ष घालून मी राज्याला या क्षेत्रातही पहिल्या क्रमांकावर आणल्याशिवाय राहणार नाही, हे आश्वासन देतो. आम्ही कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत, स्थानबद्ध आहोत...  वगैरे वगैरे....

...................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर देशभरात अभूतपूर्व चलनतुटवडा निर्माण झाला होता आणि नोटांसाठी लावलेल्या रांगांमध्ये दीडशेहून अधिक जणांचा मृत्यूही ओढवला. मात्र पंतप्रधान मोदींच्या निर्णयाआधी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांचा पुरेसा साठा तयार होता, अशी माहिती रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली आहे. संसदेच्या स्थायी समितीला उर्जित पटेल यांनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा होण्याआधीच नव्या नोटा छापून तयार ठेवण्यात आल्या होत्या, असे सांगितले. ‘गोपनीयतेच्या कारणास्तव रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यात नोटाबंदीवर झालेल्या चर्चेची कोणतीही नोंद ठेवण्यात आली नाही,’ असेदेखील उर्जित पटेल यांनी सांगितले.

सगळ्या नोटा छापून तयार होत्या, सरकारमधले उच्चपदस्थ आणि मान्यवर पटेल हे त्या काळात फावल्या वेळात ढोकळा आणि फाफडा खात आणि मसाळावाली चाय पीत त्याच नोटांनी ‘बिजिनेस’ अर्थात नवा व्यापार हा खेळ खेळत बसायचे, असं आमचा खास वार्ताहर कळवतो.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.