मारुती चितमपल्ली नावाचा अरण्यऋषि...
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • मारुती चितमपल्ली
  • Tue , 24 June 2025
  • संकीर्ण श्रद्धांजली मारुती चितमपल्ली Maruti Chitampalli

ज्येष्ठ लेखक मारुती चितमपल्ली यांचं १८ जून २०२५ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी निधन झालं. २६ जानेवारी २०२५ रोजी चितमपल्ली यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्म’ पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने लिहिलेल्या ‘अक्षरनामा’वर लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

‘भगवे'पणाचा निकष न आणता यंदा मारुती चितमपल्ली यांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला, याचा विशेष आनंद आहे. खरं तर, त्यांना पद्मविभूषण हा सन्मान दिला असता तरी चाललं असतं, इतकं त्यांचं कर्तृत्व मोठ्ठं आहे. मारुती चितमपल्ली हे नाव नाही, तर ते ‘वनव्रतस्थते’चं पर्यायी नाव आहे, पद्म सन्मानाच्या भगव्या यादीत फुललेलं हिरवं डौलदार फूल म्हणजे मारुती चितमपल्ली आहेत, वन आणि सागरी व्यासंगाचं भारतीय ज्ञानपीठ म्हणजे मारुती चितमपल्ली आहेत. नागपूर सुटल्यापासून, म्हणजे साधारण जून २०१२नंतर आमची भेट तशी एकच झाली, पण हा माणूस त्याच्या पुस्तकांच्या रुपात एखाद्या वन संतासारखा कायम सोबतीला आहे.

पद्म सन्मान जाहीर झाला आणि चितमपल्ली यांची झालेली १९८०च्या दरम्यान केव्हा तरी झालेली पहिली भेट आठवली— विशेषत: तेव्हा ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकात आलेलं त्यांचं लेखन वाचनात आलेलं असल्याचे ते दिवस होते. ते लेखन वेगळं होतं, त्याला अनवट असा रानगंध होता, तो आजही आहे. तसं तर, व्यंकटेश माडगूळकर, ना. धों. महानोर, र. वा. दिघे यांच्या लेखनातून रान, तिथले पशू, पक्षी, किडे, झाडं-फुलं, फळं, माती... असं बरंच काही कळलेलं होतं.

ग्रामीण मातीतच जडणघडण झालेली असल्यानं माडगूळकर, आनंद यादव यांचं लेखन आणि  महानोरांच्या कविता बेहद्द आवडायच्या. त्या सर्वांच्या लेखनाची नाळ आपल्या चिरपरिचित मातीशी आहे, असं वाटायचं, म्हणून ते ‘आपलं लेखन’ असल्याचं ‘फिलिंग’ यायचं.

चितमपल्ली यांच्या लेखनाचा पोत मात्र वेगळा होता; त्यांचं लेखन माडगुळकर आणि तत्सम यांच्या पुढचं होतं. लेखनात ललित बहर फारसा नव्हता, अलंकारिक भाषा नव्हती, काही तरी नवीन सांगत असल्याचा अभिनिवेशी थाट नव्हता आणि ज्ञानी असण्याचा आव नव्हता तर कृतज्ञता होती. जंगलाच्या गाभ्याला थेट भिडणारा त्यातला आशय महत्वाचा होता. जंगल प्रदेशाचं अपरिचित जगणं व्यक्त करणारं ते लेखन, वाचणारानं अचंबित व्हावं, अशा विलक्षण साध्या शैलीत होतं.

कधी त्या लेखनानं जणू निर्सगाला कवेत घेतलंय असं वाटायचं तर कधी, रानवाटांच्या कुशीत हे लेखन छानपैकी पहुडलेलं आहे, असं वाटायचं; तर कधी श्रावणसरीत त्या रानवाटा तुडवत आपणही मारुती चितमपल्ली यांच्यासोबत चालतोय असं वाटायचं; तर कधी जंगलाच्या श्वास-नि:श्वासाबद्दल अतीव आत्मीयतेनं कोणी तरी बोलतंय आणि त्याचा अनाहत नाद आपल्या मनात गुंजारव करतोय असं वाटायचं. इतकी आत्मीयता, ओतप्रोत अपार ममत्व त्यांच्या लेखनात होतं. ते नंतर अधिकाधिक घनगर्द व्यापक होत गेलं. जे जंगलाबाबत तेच पुढे चितमपल्ली यांनी सागराबद्दल केलेल्या संशोधनाबद्दल घडलं. या व्यसंगातून त्यांनी मराठी भाषेत जी काही शब्दांची भर घातली आहे, ते एकूणच कर्तृत्व दहा जणांच्या कवेत मावणारं नाही, इतकं अफाट आहे.

तेव्हा माझा पत्रकारितेचा पडाव नुकताच नागपूरला पडलेला होता. पत्रकारितेत असल्यानं कोणालाही थेट भिडण्याइतका कोडगेपणा (या गुणाला हल्ली ‘कॉन्फिडन्स’ असं म्हणतात!) तोपर्यंत अंगी बाणला होता. आधी फोन करून मारुती चितमपल्ली यांच्याशी भेटीची वेळ ठरवून घेतली. त्यांच्याशी फोनवर बोलताना ‘मला भेटणं हा तुमचाही सन्मान आहे’ असा राजकीय वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराला शोभणारा साहजिक अविर्भाव माझ्यात असणार!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मध्यम पण बळकटपणा प्रभावित करणारा बांधा, विस्तीर्ण भाल प्रदेश, डोईवर अर्धकुरळे व काळे दाट केस, डोळ्यावर काळ्या मोठ्या फ्रेमचा चष्मा, पूर्ण बाह्यांचा पांढरा लायनिंगचा पॅन्टमध्ये व्यवस्थित ईन केलेला धुवट शर्ट आणि पायात साध्याशा वहाणा असलेले मारुती चितमपल्ली भेटले. आधी त्यांच्या या साध्या दर्शनाने आणि नंतर त्यांच्या ऋजू शब्दही जरा वरच्या पट्टीतीलच वाटावा, अशा बोलण्या आणि लाघवी वागण्याने तेव्हा जे गारुड झालंय, ते आजवर कायम आहे.

नंतर नागपूरच्या लक्ष्मी नगरातील त्यांच्या नवश्रीमंत मध्यमवर्गीयांच्या तुलनेत साध्याशा फ्लॅटमध्ये आम्ही अनेकवेळा भेटलो. (या फ्लॅटमध्ये वर्षांनुवर्ष एकच बदल होत गेला आणि म्हणजे, घरातील माणसांपेक्षा पुस्तकांची संख्या अशा मोठ्या गतीनं वाढत गेली की, त्या गर्दीत माणसं परकी वाटत). तर, कधी कार्यक्रमात भेटलो, तर कधी ‘साहित्य प्रसार केंद्र’ या राजाभाऊ कुळकर्णी यांच्या बर्डीवरील पुस्तकाच्या दुकानात तर, कधी आम्ही व्यासपीठावर सोबत असू. वर्षांमागून वर्षं उलटत गेली, पण मारुती चितमपल्ली पहिल्यांदा भेटले, तेव्हा होते तसेच साधे राहिले आणि त्याच मृदुपणे बोलत राहिले.

२०१६च्या डिसेंबरमध्ये माझा दोस्तयार डॉ. अनिल पिंपळापुरे याच्या ‘खगायन’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांच्यासोबत नागपुरात व्यासपीठावर होतो – चितमपल्ली यांच्यातला तो साधेपणा तस्साच नाही तर बराचसा वाढलेला आणि त्या साधेपणाला खुलवणारं साधनेचं वलय आलेलंय असं जाणवलं. ते निवृत्त होऊन तेव्हा वीस वर्षं उलटलेली होती. अंगकाठी किंचित वाकलेली, खांदे काहीसे ओघळलेले, दाढी छातीपर्यंत वाढलेली आणि व्यासंगाचं शीतल तेज चेहऱ्यावर मंदपणे विलसत असलेले मारुती चितमपल्ली एखाद्या संत किंवा आत्ममग्न ऋषीप्रमाणे वाटले. ते त्यांचं रुपडं इतकं भावलं की, “आयुष्यभर वनसाधना करणारे मारुती चितमपल्ली आणि एखादा संत-ऋषी यात साधर्म्य आहे,” हे बोलून दाखवण्याला मी आवरच घालू शकलो नाही!

.................................................................................................................................................................

हेहीवाचापहा

मारुती चितमपल्ली : वनसाधनामग्न संत-ऋषी

सोलापूरकरांनो, मारुती चितमपल्लींचा ‘नारायण सुर्वे’ करू नका!

.................................................................................................................................................................

एक खंत नोंदवायला हवी, चितमपल्ली यांनी वनातील झाडं- त्यांची पानं, बहर, फळं, फुलं, पशू, पक्षी एवढंच नाही; तर किडे, अळ्या, मुंग्या याविषयी मूलभूत असं लेखन केलं; त्यावर संशोधन केलं, त्याच व्यासंगात आयुष्य झोकून दिलं. आधी पक्षी आणि उतारवयात महा तन्मयतेनं मग्न होऊन मत्स्य या विषयांवर महाअचाट कोश तयार केले.  हे असं काम यापूर्वी मराठीत झालेलंच नव्हतं. ना ती कविता होती न ललित, ना कथा की कादंबरी. बरं, जे काही चितमपल्ली यांनी सिद्ध केलेलं होतं ते संशोधकीय थाटाचं बोजडही नव्हतं. मराठी साहित्याला विलोभनीय चकवा देणारी ती एक अभिव्यक्ती आहे, असंही म्हणता येईल.

हे अतुलनीय असं काम आहे आणि त्यातही दोन्ही कोश तर विलक्षण संन्यस्त वृत्तीनं निर्माण झालेले आहे, पण या लेखनाची गंभीर समीक्षा झाली नाही. कदाचित तो क्रूस पेलणं अशक्य आहे, म्हणून कोणी समीक्षक त्या लेखनाची समीक्षा करून त्याचं अनमोलत्व पटवून देण्याच्या फंदात पडला नसावा!

‘चकवा चांदण’ हे निसर्ग साधनेच्या वेगळ्या वाटेवरच्या मारुती चितमपल्ली यांचं आत्मपर लेखनही त्यांच्यातल्या साधेपणा आणि आजवर अज्ञात राहिलेल्या व्यासंगाचा ऐवज आहे, पण त्याचीही म्हणावी तशी गंभीर दखल मराठी समीक्षक आणि अभिजनांनी घेतली नाही.

चितमपल्ली मार्केटिंगच्या ‘साहित्यिक मॉल’मध्ये कधी वावरले नाहीत. स्वत:चा मठ म्हणा की पंथ निर्माण करून भक्तांचा गोतावळा करण्याच्या वाटेवर ते कधी चालले नाहीत. तसं चालणं मुळी त्यांच्या रक्तातच नाही. कोणत्या कंपूत, गटात सहभागी व्हावं आणि स्वत:चे ढोल स्वत:च बडवावे किंवा इतरांच्या किरट्या कर्तृत्वाचे ढोल आपण बडवून त्यांच्याकडून स्वत:च्या कर्तृत्वाचे ढोल बडवून घेताना घुसमट होईल, असाच चितमपल्ली यांचा स्वभाव आहे.

अशात तर भगवा घेऊन चालणाऱ्या किंवा भगव्या वाटेवर चालणाऱ्या किंवा भगव्याची ‘कवनं’ गाणाऱ्या सुमारांनाही सरकारकडून ‘रमणा’ प्राप्त होतोय. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं केवळ वनरंगी तल्लीन राहणाऱ्या मारुती चितमपल्ली यांना पद्म सन्मान देण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे आणि त्यांची निवड करण्याचा सुज्ञपणा दाखवणाऱ्या निवडकर्त्यांचं कौतुक करण्याचा कद्रूपणा दाखवण्याचं काहीच कारण नाही!

वयाची नव्वदी पार केलेले मारुती चितमपल्ली हे एक हाडामांसांचे माणूस आहेत आणि त्यांनाही भावना, राग आणि लोभ आहेतच. मानवी जगण्यात उन्मळून पडावे असे प्रसंग अपरिहार्यपणे येतात तसे त्यांच्या आयुष्यात काही कमी आले, असेही नाही. असे जे प्रसंग आले त्यातले काही इतर अनेकांप्रमाणे मलाही ठाऊक आहेत. मात्र त्याही प्रसंगात मारुती चितमपल्ली यांनी दाखवलेली शांत चित्तवृत्ती केवळ आणि केवळ ऋषीलाच शोभेशी आहे. उन्मळून पडावं अशा प्रसंगातही वन आणि प्राणी व्यासंगाचं अग्निहोत्र कायम तेवत ठेवण्याची त्यांची वृत्ती आपल्याला नतमस्तक करायला लावणारी आहे. 

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

हा माणूस खरंच संत किंवा ऋषी आहे याची जितीजागती प्रचीती आहे. कोणतंही संकट आलं, तरी शीतल छाया देण्याचं, फळण्याचं, फुलण्याचं असीमधारा व्रत वृक्ष पाळतोच. तोच व्रतस्थ बाणा रानावनात राहून त्या वृक्षांकडूनच बहुदा मारुती चितमपल्ली शिकले असावेत.

सोलापूर हे मारुती चितमपल्ली याचं जन्मगाव. त्याच सोलापूरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मारुती चितमपल्ली यांची निवड झाली. तेव्हा ‘कोण हे चितमपल्ली’ असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती अर्थातच नव्हती, तरी त्यांच्या निवडीवरून काही अभिजन दुखावले गेले. ‘सोलापूरकर’ आणि ‘सोलापूरच्या बाहेरचे’ असा वाद रंगवला गेला. विदर्भ साहित्य संघातला वावर;  त्यातही विशेषत: अनेक वर्षं मनोहर म्हैसाळकर यांच्याशी असणारी सलगी आणि एक पत्रकार म्हणून साहित्य संमेलनाच्या निवडणुका कशा लढवल्या जातात, हे अनुभवल्यामुळे (माफ करा सोलापूरकरांनो!) मीही मत तसंच मनानं चितमपल्ली यांच्यासोबत होतो.

सोलापूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मारुती चितमपल्ली विजयी होणं, ही एक औपचारिकता उरलेली होती, याची खात्री पटलेली होती. तरी एक कडवटपणा वातावरणात पसरवला गेला आणि मारुती चितमपल्ली यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला.

चितमपल्ली यांचं मोठेपण असं की, प्रतिस्पर्ध्यांविषयी त्यांनी प्रचारात आणि निवडणुकीत विजय मिळाल्यावरसुद्धा किंचितही कटुता व्यक्त केली नाही. विनाकारण टीकेचे जहरी आसूड ओढले जातात तेव्हा राजकारणात वावरणारांचे सभ्यपणाचे मुखवटे कसे गळून पडतात आणि त्याचा अकारण तोल कसा सुटतो, हे एक पत्रकार म्हणून जवळून बघितल्यानं, तर मारुती चितमपल्ली यांची त्या काळातील अनुभवलेली ऋजुता आणि सुसंस्कृतपणा मनाच्या कुपीत कस्तुरी गंधासारखा जपून ठेवावा असाच आहे. अशी जी माणसं पत्रकारिता करताना माझ्या पिढीला भेटली, त्यामुळेच जगण्याचा अर्थ कळला, त्यामुळेच जगण्याचं सार्थक झालं, अशी माझी ज्यांच्याविषयी भावना आहे. त्यात एक मारुती चितमपल्ली आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......