स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...
पडघम - देशकारण
हरीश खरे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 20 April 2024
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

दमलेले, तेज हरपलेले पंतप्रधान रेटून नेताहेत, पण तरीही निवडणूक ‘जिंकल्यात जमा’ असल्याचं धरून चालता येणार नाही, हे भाजपच्या लक्षात येऊ लागलं आहे.

सुमारे दोनेक महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या मौसमाला सुरुवात झाली. २०२४ सालच्या निवडणुकीचा निकाल लागल्यात जमा आहे, अशी तेव्हा ‘हवा’ होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भाजपला हमखास मतं जिंकून देणारा ‘हुकमी एक्क्का’. अजेंडा प्रस्थापित करणं, आपलं म्हणणं सफाईदारपणे लोकांच्या गळी उतरवणं, आणि हा-हा म्हणता देशाचा मूड आपल्या बाजूला वळवून घेणं, हे त्यांचं हातखंडा काम. त्यांना त्यांचं हे हातखंडा काम नीट पार पाडता यावं, म्हणूनच निवडणूक आयोगानं निवडणुकीचं हे असं लांबलचक वेळापत्रक आखलं आहे, अशीही ‘बोलवा’ होती.

मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या आदल्या दिवशी मात्र भाजपचं हे रामबाण अस्त्र कुचकामी ठरताना दिसत आहे. प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मॅक्स वेबर हा एक थोर समाजशास्त्रज्ञ. ‘करिष्मा’ (charisma) ऊर्फ जादू ही संकल्पना त्यानं प्रथम मांडली. त्यानंच ‘करिष्म्याचं चाकोरीकरण’ (routinisation of charisma) ही संकल्पनाही मांडली. व्यक्तिमत्त्वातला करिष्मा ऊर्फ जादू कुणातही असू शकते. एखादा संत वा धार्मिक व्यक्ती असेल, एखादी चित्रपटतारका असेल, एखादा खेळाडू असेल वा एखादा राजकारणीही असेल. काळाच्या ओघात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला टवटवीतपणा हळूहळू लोप पावू लागतो. कधीही न संपणारी जादू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला देऊ करणार्‍या त्यांच्या युक्त्याप्रयुक्त्या ओसरणीला लागतात.

जादुई व्यक्तिमत्त्वाची जादू उठून दिसते, ती मंचावरच्या इतर कलाकारांच्या तुलनेत. पण कालांतराने याच जादूमुळे इतर लोक मंचावरून उतरून जातात. आणि जादुई व्यक्तिमत्त्वाचा एकपात्री खेळ सुरू होतो. मग या जादुई नटाच्या भात्यातल्या सगळ्या युक्त्याप्रयुक्त्या प्रेक्षकांना चिरपरिचित होत जातात. पूर्वी नाट्यपूर्ण भासणारे विराम कंटाळवाणे होऊ लागतात. संवादफेकीतलं नावीन्य संपून जातं. देहबोलीमधला ताजेपणा हरपतो. जे नट स्वतःचा सातत्यानं पुनर्शोध घेत राहतात, तेच मंचावर अधिराज्य गाजवू शकतात.

अर्थात, मोदींच्या भक्तांचा पंथ आता जरी काहीसा आक्रसलेला असला, तरी तो अजूनही अस्तित्वात आहे, हे नाकारता येणार नाही. ही मंडळी मोदींच्या व्यक्तिमत्त्वातल्या जादूला भुललेली नव्हेत, खास. त्याहून हे प्रकरण वेगळं आहे. गुरूच्या, नियंत्याच्या वा नेत्याच्या अथांग शहाणपणावर आणि अधिकारावर निर्विवाद निष्ठा असलेल्या श्रद्धाळू लोकांचा जथ्था म्हणजे हा ‘भक्तपंथ’. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या ‘देवा’च्या ठायी सर्व प्रकारच्या संकटांपासून आणि मानवी मूर्खपणापासून समाजाचं (आणि मानवतेचं) रक्षण करण्याचं सामर्थ्य असतं.

मोदीभक्तांच्या मते मोदींकडून कुठलीही चूक होणं अशक्य आहे; आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मोदींपाशी आहेत, तसंच आपली राष्ट्रीय थोरवी आणि वैभव उंचावण्यासाठीचा मार्ग निष्कंटक करण्याची क्षमताही त्यांच्यापाशी आहे, यावर भक्तांचा ठाम विश्वास आहे.

आक्रसत गेलेला हा पंथ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे. स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे.

या निवडणुकीच्या वेळी मोदींनी केलेल्या चुकांची यादी करणं आता तितकंसं कठीण उरलेलं नाही. कत्छथीवू (Katchatheevu) द्वीपाचा प्रश्न उकरून काढताना मोदी एखाद्या निकृष्ट दर्जाच्या मालाची उठावणी करत असल्यासारखे भासू लागले आणि त्यांनी त्यांची विश्वासार्हता स्वहस्तेच धुळीला मिळवली. कुठलाही शहाणा नेता पूर्वीच निकाली निघालेले भूराजनैतिक प्रश्न उकरून काढत नाही. वातावरणनिर्मिती केल्याशिवाय तर नाहीच नाही. पण ते मोदींनी केलं, आणि पंतप्रधानपदी बसल्यापासून पहिल्यांदाच ते एखाद्या बेजबाबदार नेत्यासारखे भासू लागले.

बदनाम झालेल्या ‘निवडणूक रोखे’ योजनेच्या बचावाला धावून येणं, ही मोदींची दुसरी चूक. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे स्पष्टपणे बेकायदेशीर ठरवलेले असताना असं करून मोदींनी स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली. याच न्यायपीठाने ‘कलम ३७०’ आणि अयोध्येतलं ‘राममंदिर’ या, मोदींच्या लाडक्या प्रकल्पांना आपला वरदहस्त पुरवला होता. पण निवडणूक रोख्यांच्या बाबतीत मात्र मोदी याच सर्वोच्च न्यायपीठाचं मत मानायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांची प्रतिमा एकाएकी ‘न्यायव्यवस्थेला धूप न घालणारा पंतप्रधान’ अशी होऊन बसली.

निवडणूक रोखे घोटाळ्याचा परिपाक म्हणजे ‘नैतिक उच्चासनावर असलेला नेता आणि पक्ष’ अशी मोदी आणि भाजप यांची प्रतिमा रातोरात डागाळली आणि ‘भूमीपासून चार अंगुळं वर चाललेला’ त्यांचा रथ जमिनीवर आदळून इतरांच्या पातळीवर आला. कधी नव्हे, ती ‘चंदा दो, धंदा लो’ ही काँग्रेसने दिलेली घोषणा अचूक शरसंधान करून केली.

भाजपची आर्थिक बाजू बलाढ्य असल्याचं ढळढळीत दिसत होतंच. त्यांनी ती अनेकदा मिरवूनही दाखवली होती. ही आर्थिक बाजू एकाएकी आदरणीय वाटेनाशी झाली. जणू मध्ययुगातला एखादा उग्र संन्यासी देवभूमीवरचं भ्रष्ट किटाळ धुऊन काढण्यासाठी आला असावा, असं पंतप्रधानांचं जपलेलं-जोपासलेलं वलय. या वलयालाच तडा गेला. मोदींचं नैतिक बळ क्षणात ओसरून गेलं.

हे पुरेसं नव्हतं म्हणून की काय, अरविंद केजरीवाल यांना अटक करून मोदींनी स्वतःच्या अडचणींमध्ये भरच घातली. अनेक भ्रष्ट मंडळींनी रोख्यांचा वापर करून काही संस्थांपासून स्वतःचा ‘बचाव’ केल्याचं चित्र निवडणूक रोखे प्रकरणाचा व्यापक पर्दाफाश झाल्यामुळे उघडकीला आलं होतं; दुसरीकडे त्याच संस्था दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर धाड टाकताना दिसू लागल्या.

परिणामी ही अटक निव्वळ सूडभावनेनं केली जात असल्याचं चित्र तयार झालं. ‘हे बरं नव्हे’ असं लोक बोलू लागले. ‘भ्रष्टाचारा’विरुद्ध मोदींनी चालवलेल्या मोहिमेला असलेलं नैतिक अधिष्ठान नाहीसं झालं. ते निव्वळ राजकीय प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी वापरण्याचं देवघेवीचं हत्यार ठरलं. ‘वॉशिंग मशीन’ ही भाजपला काँग्रेसनं उपरोधानं बहाल केलेली उपाधी अनेकांना चपखल वाटू लागली.

त्यात ‘अब की बार, ४०० पार’ची वल्गना. मोदींच्या कच्छपि लागलेल्या लोकांपैकी अनेकांनाही ही वल्गना अस्वस्थ करून गेली. ‘बाबासाहेबांच्या राज्यघटने’ला धक्का लावण्याचा आपला अजिबात इरादा नाही, अशी सारवासारव करत एकाएकी बचावाच्या पवित्र्यात जाणं पंतप्रधानांना भाग पडलं.

दुसर्‍या बाजूला ‘२०२४ची निवडणूक आम्ही जिंकल्यात जमा आहे’ या मोदींच्या प्रचाराला विरोधी पक्ष जुमानेनासा झाला. उलट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रतिस्पर्धी मोदींनी दिलेल्या आणि न पाळलेल्या वचनांबद्दल मोदींना जाब विचारू लागले. त्यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीची कसून चिकित्सा होऊ लागली. पंतप्रधानांनी वा त्यांच्या पित्त्यांनी केलेल्या कुठल्याही आरोपांचा समाजमाध्यमांवर काही तासांच्या अवधीत धुव्वा उडवण्यात येऊ लागला. भारतातल्या दैनंदिन आयुष्याच्या कठोर आणि कुरूप वास्तवाचे चटके भाजपच्या स्वप्नातल्या सोनेरी भारताच्या प्रतिमेला बसू लागले.

मध्य प्रदेश आणि गुजराथ यांचा अपवाद वगळता इतर सर्व राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी एकत्रितरित्या वा एकेकट्याने अनपेक्षित आणि अभिनव कल्पकता दाखवून भाजपच्या प्रख्यात डावपेचांना आव्हान दिलं. विशेषतः, यच्चयावत स्थानिक आणि प्रादेशिक अस्मितांनी मोदींनी ठरवलेल्या ‘राष्ट्रीय’ ध्येयधोरणांपुढे आणि हितापुढे गुडघे टेकलेच पाहिजेत, या मोदींच्या फतव्याला ठामपणे विरोध करण्यात आला.

संस्थात्मक पाठबळ आणि छुप्या डावपेचांचा नि मुखवट्यांचा अवाढव्य साठा या दोन्ही बाबतींत भाजप त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चार पावलं पुढेच आहे, हे जरी खरं असलं; तरी मैदानात आणखी एका बलाढ्य खेळाडूचं आगमन झालं आहे. अनेक आरोपांची राळ उडवून ज्यांना पुरतं नामोहरम करण्यात आलं आहे, त्या एनजीओ हा तो नवा खेळाडू.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींच्या सद्दीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या प्रभावळीतल्या इतर संस्था यांचा अपवाद वगळता लोकशाही भारतातल्या ‘एनजीओ’ या महत्त्वाच्या संस्थात्मक घटकातल्या बहुतेक संस्थांचं अक्षरशः खच्चीकरण करण्यात आलं. ज्यांच्या भूमिका आणि विचारधारणा आपल्यासारख्या नाहीत, त्या कुणालाही काडीचंही महत्त्व देण्याची गरज नाही, असं मोदींच्या उद्दाम सत्तेला वाटतं. पण या निवडणुकीच्या वेळी लोकशाहीवादी आणि प्रागतिक विचारांच्या अनेक संस्थांनी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून गावोगावी रान उठवलं आहे.

जनमानसामधला असंतोष, खदखद, आणि संताप या सार्‍याला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वाचा फुटली आहे. गावोगावी ‘टी-पार्टी’सदृश बैठका होताहेत. याउलट, बरीच जाहीर भलामण करण्यात आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘स्वयंसेवक’ मात्र निव्वळ ‘ठेकेदार’ वा ‘दलाल’ होऊन बसले आहेत.

‘जिंकल्यात जमा’ प्रकारची भाकितं करणारे रणनीतिज्ञ तूर्तास जात्यधारित समीकरणांची जुनीच जुळणी करण्यात मग्न आहेत, तर पंतप्रधान पुन्हा एकदा त्याच त्या शिळ्या ‘हिंदू-मुस्लीम’ कढीला ऊत आणण्यापुरते उरले आहेत. त्यांच्या भूमिका आणि दावे दिवसेंदिवस अधिकाधिक पोकळ भासू लागले आहेत. देहानं दमले-भागलेले तर ते आहेतच, पण त्यांचा राजकीय संदेशही कंटाळवाणा आणि प्रभावहीन भासतो आहे. आणि सहा आठवड्यांच्या खेळाला मात्र नुकती कुठे सुरुवात होतेय…

.................................................................................................................................................................

लेखक हरीश खरे हे ‘द ट्रिब्यून’ या दैनिकाचे माजी संपादक आहेत. त्यांचा हा लेख ‘द वायर’ या इंग्रजी संकेतस्थळावर १९ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखाचा दुवा :

 https://thewire.in/politics/six-week-show-begins-but-the-charisma-has-gone

भाषांतर : मेघना भुस्कुटे

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......